लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दरार में ,,,,,,,, भाग १

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
9 Apr 2019 - 8:04 am

१८५७ साली हिंदुस्थानांत इंग्रजांच्या विरुद्ध घडलेल्या घटनांना नक्की काय नांव द्यावे याबद्दलची मतें त्यानंतर १०० वर्षे तरी पक्की होऊ शकली नव्हती. हिंदुस्थानचे त्याकाळातले सर्वेसर्वा "कंपनी सरकार" किंवा "कंपनी बहादूर" आणि नंतरचे "राजे" असलेल्या इंग्रजाना ते अर्थातच हिंदुस्थान शिपायांचे बंड वाटत राहिले. जरी त्यानंतर बऱ्याच स्वातंत्र्यवीरांना ते वर्ष "स्वातंत्र्यसमराची सुरवात" असे वाटले तरी बराच काळ स्वतंत्र भारतांतील शासकीय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांत १९४७ नंतर सुद्धा - इंग्रजांनी घालून दिलेल्या आराखड्याना अनुसरून- १८५७ मध्ये भारतांत घडलेल्या घटनांचा उल्लेख अंमळ संदिग्ध आणि संक्षिप्तच राहिला.

हिंदुस्थानांत व्यापाराकरता म्हणून आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १७व्या शतकाच्या सुरवातीस झाल्यावर पहिल्या कांही वर्षांतच कंपनीने बादशहा जहांगीरकडून व्यापाराची सनद मिळवली. नंतरच्या सुमारे १५० वर्षांत ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराखेरीज इतरही अनेक उद्योग केले - वेगवेगळ्या बंदरांत स्वतःच्या व्यापारी उपयोगाकरता वखारी बांधल्या, त्यांच्या संरक्षणाकरता फौज उभारली आणि ती वापरत, स्थानिक राजांच्या आपापसांतील भांडणांचा फायदा घेत, अनेक मुलुखांवर वर्चस्व मिळवत, तेथल्या राजांना वेगवेगळ्या तहाअन्वये अनेक प्रकारच्या बंधनात जखडून टाकत, खच्ची करत, हिंदुस्थानांतील अनेक भाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या आपल्या अंमलाखाली आणले. हिंदुस्थानांत १६व्या शतकापासून राज्य करणाऱ्या आणि एकेकाळी पूर्ण जगातल्या १/४ लोकसंख्येवर अधिपत्य असणाऱ्या पण आता क्षीण झालेल्या "मुघलिया सल्तनत" ला कंपनीने मुघल बादशहा शहा आलम २ च्या राज्यकाळांत १७६४ सालापासूनआपल्या वर्चस्वाखाली आणले.

तसे पाहिले तर औरंजेबानंतरचा कुठलाच मुघल बादशहा हाती असलेली सत्ता राखू तर शकला नाहीच पण मुघल अंमलाखालील प्रदेश अनेक कारणांनी इतरांच्या हाती जात राहिला. ज्या मुघल सरदारांकडे बंगाल, अवध आणि हैदराबाद हे भाग होते त्यांनी आपला सवता सुभा सुरू केला. काही काळ पेशव्यांच्या वतीने मुघलांना "संरक्षण" देणारे मराठा सरदार नंतर मुघलांकडचा काही भाग तोडून घेत आणि पेशव्यापासूनही फारकत घेत आपापल्या मुलखावर "राज्य" करू लागले. इराणचा नादिरशहा यांने एकदा आणि त्यानंतर अफगाणिस्तानचा अब्दाली यांने एकदा दिल्लीतले जे काही जमेल ते पळवले. १८५७ साल सुरू होतांना मुघल "बादशहा"चा अंमल दिल्ली आणि आजूबाजूचा थोडासा प्रदेश एव्हढ्याच पुरता उरला होता. त्यावेळचा "बादशहा" बहादुरशहा जफर देखील त्या वेळच्या ब्रिटिश रेसिडेंटने इतर शाहजाद्यांपेक्षा जास्त पाठबळ दिल्यानेच इतर शहाजाद्याना बाजूला सारत त्याच्या वडिलांच्यानंतर गादीवर बसू शकला होता आणि नंतर सुद्धा गाडी टिकवण्याकरता रेसिडेंटसाहेबांची व्यवस्थित खातिर करत रहाणे जरूरीचे झाले होते.

तरीही अजूनही मुघल "बादशहा" हा एकच "बादशहा" होता आणि इतर सगळेच फक्त राजे होते. या नावापुरत्याच उरलेल्या, वीतभर राज्य आणि हातभर बिरुदावली असलेल्या बादशहाच्या अजूनही हिंदुस्थानवर असलेल्या प्रभावाने १८५७ मध्ये निदान काहीकाळ तरी इंग्रज हादरले होते.

बहादुरशहा एक उत्तम कवी (फारसी, उर्दू, ब्रजभाषा आणि पंजाबी अशा विविध भाषातून, "जफर" हे टोपण नांव वापरून शायरी करणारा), सुफी तत्ववेत्ता, घोडेस्वार आणि तिरंदाज (तरुणपणात) आणि दिल्लीच्या रहिवाशांची काळजी करणारा होता. राज्यकारभाराच्या संबंधांतले कुठलेही निर्णय घेण्याबद्दल फारसे स्वातंत्र्य न राहिल्याने १८५७ साल उजाडेपर्यंत बहादुरशहाला राज्य करण्याचे काम फारसे शिल्लक राहिले नव्हते. मुशायरे आणि मैफिली, दिल्लीच्या परिसरातील दर्ग्याना भेट, वार्षिक ईदच्या सणाचा समारोह, "फुलवालोंकी सैर" हा फुलांचा वार्षिक प्रचंड बाजार आणि प्रदर्शन तसेच आपल्या "राज्यातील" हिंदू आणि मुसलमानांना एकत्र ठेवणे अशा अनेक "राज्यकार्यात" हा बादशहा व्यग्र असे. उर्दू आणि फारसी शिक्षणाचे एक महत्वाचे केंद्र हा दिल्लीचा लौकिक मात्र अजून टिकून होता आणि अनेक पिढयांपासून चालत आलेली शेरो-शायरी, संगीत आणि वेगवेगळ्या कलांतील चढाओढ शाबूत असल्यामुळे आणि अशाच तऱ्हेचे वातावरण असलेले अवधचे (लखनौ) संस्थानदेखील इंग्रजांनी एक वर्षापूर्वी घशात घातल्याने दिल्ली त्या काळांतल्या विविध ललित कलांचे माहेरघर झाली होती.

बहादुरशहाने, स्वतः एक उत्तम शायर असतानाही "झौक" हे टोपण नांव वापरणाऱ्या शायरांची "शागिर्दी" शेरोशायरीकरता स्वीकारली होती. त्यामुळे "झौक"ना राजकवींचा मान तसेच मासिक वेतनही मिळत असे . "मिर्झा गालिब" या त्याकाळच्या आणखी एका प्रसिद्ध शायराला आपणच या मानास पात्र आहोत असे वाटत होते (हा मान त्यांना "झौक" च्या १८५४ साली झालेल्या मृत्यूनंतर मिळाला). मिर्झा (म्हणजे मराठीतील "राजमान्य राजश्री") गालिब उच्च कुळातील रंगेल आणि मोठ्या लोकांत ऊठबस असलेले शायर होते तर झौक गरीब घराण्यातले आणि फारसे पुस्तकी शिक्षण न झालेले असे होते. "झौक"च्या रचना साध्या भाषेत आणि जनमानसाची लगेच पकड घेणाऱ्या असत तर गालिबच्या रचना क्लिष्ट, वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावता येण्यासारख्या आणि म्हणून उच्चशिक्षितांनाच आस्वाद घेता येण्यासारख्या असत. या दोन्ही महारथींमध्ये जरी नेहमीच तुलना होत असली तरी दोघेही आपापल्या पद्धतीने मैफलीवर आपली छाप पाडत . "मोमीन", "शेफ्ता" आणि "अझुरदा" हे त्या काळातले आणखी काही प्रसिद्ध उर्दू शायर होते.

त्या काळांत ज्या कवींना श्रीमंत व्यापारी, दरबारी, सरदार आणि राजेराजवाडे अशा कुणाचा भरघोस पाठिंबा आणि नियमित मिळणारा पगार नसेल अशा सगळ्याच कवींना आपला चरितार्थ चालवण्याकरता "कसीदा" (थोरामोठयांची कवितेत केलेली स्तुती), "सेहरा" (लग्नप्रसंगात कवितेत केलेली वरपक्षाची स्तुती तसेच वधूवरांना शुभाशिर्वाद) अशा तऱ्हेच्या "free lance" रचना करून किंवा कवितांच्या स्पर्धा ("मुशायरा") मध्ये भाग घेऊन आपल्या रचना ऐकवून, जे कांही कौतुक किंवा उत्तेजन म्हणून मिळवता येईल त्यावर होत असे.

इंग्रजांनी अवध संस्थान खालसा केल्यावर मिर्झा गालिबना त्यांच्या कवितांबद्दल वेळोवेळी अवधच्या दरबारातून मिळणारा पैसा बंद झाला. त्यावर त्यांनी विचारपूर्वक ब्रिटनच्या व्हिक्टोरिया राणीची स्तुती करणारा एक "कसीदा" तिला पाठवून दिला - ती कशी जगातली सर्वशक्तिमान राणी आहे (आणि तिच्या तर्फे भारतावर राज्य करणारा गव्हर्नर जनरल कसा महान आहे) हे तर त्यांत होतेच पण कवी आणि इतर कलावंत यांची कदर करणे, त्यांचे जगणे सुसह्य करणे हे कसे राजांचे कर्तव्यच आहे हे ही राणीला "पटवण्याचा" जोरदार प्रयत्न होता. त्याला प्रयत्न येव्हढ्याकरता म्हणायचे की त्यातले फारसे कांही राणीने मनावर घेतले नसावे, कारण कविराजांच्या पदरांत कांही पडले नाही - पण याच कवनाने पुढे कविराजांचे प्राण वाचवले.

त्यांनी इंग्रजांचा देखील बराच जवळून अभ्यास केला होता. त्यांनी त्या काळांत लिहिलेल्या एका पत्रात गोऱ्या लोकांबद्दलच्या कौतुकमिश्रित आश्चर्याचा भाग म्हणून त्यांच्या तारायंत्रांचा उल्लेख होता. त्यांच्या पत्रात "मिझराब" (सतारीची नखी किंवा सारंगीचा गज, असे काहीही ज्याने तारा छेडल्या जातात आणि संगीताकरता स्वर उत्पन्न होतो) वापरल्याखेरीज वाजणाऱ्या इंग्रजांच्या संगीताचे देखील कौतुक होते - हा बहुतेक "ऑर्गन"चा उल्लेख असावा. भारतांत त्यावेळी नखी/गज यांच्या खेरीज वाजणाऱ्या सनईचा किंवा बासरीचा कविराजाना विसर पडला असावा. बाजाची पेटी (harmonium) तर अजून भारतांतच काय युरोपातही फारशी प्रचलित नव्हती.

१० मे १८५७ ला मेरठमध्ये स्वातंत्र्यसमराची पहिली ठिणगी पडण्याआधी काही काळ कंपनीच्या भारतीय सैनिकांमध्ये बराच असंतोष धुमसत होता. १८५७ च्या आधी कंपनीच्या वापरातल्या बंदुकांच्या काडतुसांचा जो अंश बंदुकीच्या नळीत शिल्लक राही तो काढून टाकण्याकरता त्या बंदुकांची नळी वारंवार तारेने साफ करावी लागे आणि म्हणून एकामागून एक फैरी झाडता येत नसत. यावर उपाय म्हणून कंपनीने Enfield या नवीन तऱ्हेच्या आणि जास्त लांबच्या पल्ल्याच्या बंदुका वापरायचे ठरवले आणि या नवीन बंदुकांकरता कांही नवी काडतुसे भारतांत बनवली, ती चरबीने माखलेली होती आणि बंदुकीत ठासण्याआधी ती दातांनी तोडावी लागत. ही गायीची व डुकराची चरबी असून ती तोंडात गेल्यास हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माच्या सैनिकांचा धर्म बुडेल अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली. जेव्हा ही नवी काडतुसे फेब्रुवारी १८५७ मध्ये प्रथम वापरण्याकरता दिली गेली तेव्हा अनेक हिंदुस्थानी सैनिकांनी ती वापरण्यास नकार दिला. त्यामुळे काही ठिकाणी (गोऱ्या) अधिकाऱ्यानी ती वापरण्याची सक्ती केली तर कांही ठिकाणी नव्या बंदुकांचा वापर पुढे ढकलला गेला पण एकूणच सगळ्या सैनिकांत असंतोष पसरला. कंपनीला या वरकरणी साध्या वाटणाऱ्या घटनेचे महत्व फारसे समजले नसावे.

कंपनीच्या हिंदुस्तानी सैनिकांनी कितीही पराक्रम केले आणि कंपनीला युद्धें जिंकून दिली तरी सुभेदार किंवा सुभेदार मेजर अशा मोजक्या हुद्द्यांपलीकडे त्यांना बढती मिळत नसे पण European (फक्त गोरे सैनिक असलेल्या) तुकड्यांमधल्या गोऱ्या सैनिकांना अशी अडकाठी नसे आणि त्यांना पगार, भत्ते आणि इतर सवलतीही हिंदुस्तानी सैनिकांपेक्षा बऱ्याच चांगल्या मिळत. हिंदुस्थानभर सर्वत्र जोरदार ख्रिस्तीकरण आणि संस्थानांचे विलीनीकरण चालूच होते आणि अनेक पिढ्या चालत आलेल्या "भारतीय रूढी आणि पद्धती" (उदा. सती, बालविवाह) सक्तीने बंद केल्या जात होत्या.

या सगळ्यामुळे बराच काळ, कंपनी सरकारला "कसेही करून आपला धर्म बुडवायचा आहे आणि आपल्या रूढी बंद करायच्या आहेत" तसेच "आपला उपयोग फक्त गोऱ्या लोकांच्या फायद्याकरता करून घ्यायचा आहे" ही भावना सगळ्याच हिंदुस्थानी सैनिकांत जोर धरत होतीच. फेब्रुवारी १८५७मध्ये जेव्हा नवी काडतुसे वापरण्याकरता देण्यात आली तेव्हा या भावना आणखीनच बळावल्या. त्यावेळी पडलेल्या ठिणगीचा भडका मे १८५७ मध्ये उडण्याआधी काही काळ सर्व (उत्तर) भारतांत मसलती चालू होत्या, गुप्त संदेश फिरत होते आणि कांही तरी होऊ घातले होते. कंपनीला मात्र आजूबाजूला निर्माण होऊ घातलेल्या वादळाची फारशी कल्पनाही नव्हती.

कंपनीच्या सैनिकांतील बरेच जण उच्चकुलीन ब्राह्मण होते. त्यामुळे असेल कदाचित पण कंपनीचे सगळे गोरे अधिकारी त्या काळातल्या पत्रव्यवहारांत सर्रास आपल्या सगळ्या हिंदुस्थानी सैनिकांचा उल्लेख थोड्याशा तुच्छतेने "Pandeys" किंवा "Pandies" असा करत. कंपनीने बरेच पूर्व प्रदेशातले आणि दक्षिणेतले सैनिक देखील भरती करून घेतलेले होते त्यांना अनुक्रमे "पुरबिये" आणि "तिलंगा" असे म्हणत. (उत्तर भारतातले सगळे लोक बऱ्याच काळापर्यंत सगळ्याच तेलुगू, तामिळ, कानडी आणि मल्याळी भाषिकांना सरसकट "दख्खनी" किंवा "मद्रासी" तसेच सगळ्याच मराठी बोलणाऱ्यांना "मराठा" असे म्हणत). कंपनीच्या हिंदुस्थानातील सैन्यात हिंदू आणि मुसलमान दोन्हीही धर्माचे सैनिक होते. पूर्ण हिंदुस्थानांत कंपनीच्या जवळ जवळ एकमेकांपासून विभक्त असलेल्या तीन फौजा बंगाल, मुंबई आणि मद्रास या तीन "प्रेसिडेन्सी"मध्ये होत्या पण काही कारणाने Enfield बंदुका आणि त्यांची हिंदुस्थानी सैनिकांना आक्षेपार्ह वाटणारी नवी काडतुसे यांचा मुंबई आणि मद्रास या "प्रेसिडेन्सी"मध्ये मोठासा प्रश्न निर्माण झाला नव्हता.

मेरठमधल्या ज्या सैनिकांनी नवी काडतुसे वापरण्यास नकार दिला होता त्यांना लष्करी कोर्टाने, कांही महिने चाललेल्या खटल्यानंतर दिलेल्या शिक्षा ९ मे १८५७ ला जाहीर झाल्यावर तिथल्या सगळ्याच हिंदुस्थानी सैनिकांनी गोऱ्या वरिष्ठांचा कुठलाही हुकूम न पाळता १० मे १८५७ ला मेरठमध्ये जेव्हढे सापडले तेव्हढ्या गोऱ्या अधिकाऱ्याना ठार मारून छावणीतली शस्त्रास्त्रे, दारूगोळा, खजिना लुटला, तारायंत्रे मोडून टाकली आणि विजयघोषणा देत दिल्लीकरता (७० कि.मी. दूर) कूच केले. दुसऱ्या दिवशी माध्यान्हीच्या सुमारास जेव्हा त्यांचे आघाडीचे घोडेस्वार दिल्लीत पोचले तेव्हा तेथील इंग्रजाना आणि बहादूरशहासकट सगळ्याच दिल्लीकरांना ते पूर्णपणे अनपेक्षित होते.

त्यावेळी दिल्लीत एकही European पलटण नव्हती आणि जी कांही कंपनीची फौज दिल्लीत होती त्यातील हिंदुस्थानी सैनिक अस्वस्थ होते कारण योगायोगाने ११ मेच्या सकाळच्या कवायतीच्या वेळी मंगल पांडेला (ज्यांनी बरॅकपूरच्या पलटणींमध्ये नवी काडतुसे वापरायला आल्यावर बऱ्याच जोरांत असंतोषाचा वणवा पेटवला होता, पण तो भडकण्याआधीच बऱ्याच हिंदुस्थानी सैनिकांना इंग्रजांनी निःशस्त्र केले होते) फाशी दिल्याची बातमी जाहीर झाली होती. त्यामुळे ११ मे पासून जेव्हा मेरठहून निघालेले हिंदुस्थानी सैनिक विजयोन्मादात जसे दिल्लीत पोचू लागले तसे तेथील इंग्रजाना वाढती "गडबड" जाणवू लागली.

मेरठहून दिल्लीत पोचल्यावरही या सैनिकांचा रोख गोऱ्या (आणि इतर देशी ख्रिस्ती झालेल्या) लोकांवर हल्ले करण्याचाच दिसल्याने गोऱ्या लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्यानी आपल्या हाताखालच्या हिंदुस्थानी सैनिकांना मोर्चे बांधण्याकरता किंवा बंदुका आणि तोफांची जमवाजमव करण्याकरता आपल्यासोबत बोलावले. दिल्लीतील हिंदुस्थानी सैनिकांनी प्रथम त्यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले पण काही तासांतच घोळक्या-घोळक्याने ते मेरठच्या सैनिकांना सामील होत आपल्या गोऱ्या अधिकाऱ्याना आणि त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याच्या मागे लागले. गोऱ्या अधिकाऱ्यानी स्वतः च्या, कुटुंबियांच्या आणि आपल्या शस्त्रास्त्रांच्या रक्षणाचा जमेल तसा प्रयत्न केला पण त्यांना आपला जीव तरी गमवावा लागला किंवा थोड्याफार झटापटीनंतर जमेल तसा पळ काढावा लागला. आपल्या शिस्तीचा आणि थंड डोक्याचा योग्य वापर करत गोऱ्या अधिकाऱ्यानी पळ काढण्याआधी मात्र तारायंत्राद्वारे मेरठचे सैनिक दिल्लीत पोचून गोऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करत असल्याची आणि दिल्लीतील सैनिक बेबंद होऊन त्यांना मिळत असल्याची बातमी झटपट हिंदुस्थानभरच्या अधिकाऱ्याना मिळेल याची खात्री केली. दिल्लीत जेव्हा इंग्रजांच्यावर हल्ले होऊ लागले तेव्हा इंग्रजांशी मैत्री असणाऱ्या कांही दिल्लीकरांनी त्यांच्या मदतीकरता जमेल तसे प्रयत्न केले, कांही दिवस आसरा दिला, वाहने पुरवली आणि दिल्लीतल्या वाढत्या क्षोभाबद्दलची उपयोगी माहिती दिली, पण त्यांना फार काळ दिल्लीत टिकून राहता आले नाही आणि जीव वाचवण्याकरता पळ काढावाच लागला. दिल्लीमधून पळणाऱ्याना (इंग्रज सैनिक, त्यांचे कुटुंबीय, बरोबरचे गाडीवान, घोडेवाले, इतर इंग्रज इत्यादी) अनेक ठिकाणी दिल्लीच्या आसमंतातल्या चोर-दरोडेखोरांनी गाठले आणि अनेकांनी जवळचे सगळेच नव्हे तर प्राणही गमावले.

११ मे १८५७ नंतर बरेच दिवस बहादूरशहासह सगळ्याच दिल्लीकरांना वेगवेगळ्या ठिकाणांहून तिथल्या गोऱ्यांना जमेल तेव्हढे नष्ट करून, मिळेल त्या शस्त्रास्त्रांसह आणि त्या ठिकाणाचा कंपनीचा लुटलेला खजिना सांभाळत दिल्लीत पोचणाऱ्या हिंदुस्थानी सैनिकांच्या लाटांना तोंड द्यावे लागले.

(क्रमशः)

मांडणीविचार

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

9 Apr 2019 - 8:39 am | प्रमोद देर्देकर

बऱ्याच दिवसांनी आगमन झालं तुमचं .
अन्नदाता सारखीच ही पण रोचक मालिका .

येवू दे पुढील भाग लवकर.

शेखरमोघे's picture

9 Apr 2019 - 5:55 pm | शेखरमोघे

धन्यवाद. पुढील लेखन लौकरच मिपावर डकवेन.

कुमार१'s picture

9 Apr 2019 - 9:43 am | कुमार१

येवू दे पुढील भाग लवकर.

शेखरमोघे's picture

9 Apr 2019 - 5:56 pm | शेखरमोघे

धन्यवाद. पुढील लेखन जवळ जवळ तयार.

विजुभाऊ's picture

9 Apr 2019 - 10:37 am | विजुभाऊ

https://www.misalpav.com/node/18704
ही ही एक नोंद त्या काळाची

सोन्या बागलाणकर's picture

21 May 2019 - 7:37 am | सोन्या बागलाणकर

विजुभाऊ,

प्लिज मनावर घ्या आणि त्या मालिकेचे पुढचे भाग टाका.

अभ्या..'s picture

9 Apr 2019 - 11:37 am | अभ्या..

अहाहाहा,
अप्रतिम लेखन
येऊद्या....

शेखरमोघे's picture

9 Apr 2019 - 5:57 pm | शेखरमोघे

धन्यवाद.

अनिंद्य's picture

9 Apr 2019 - 2:38 pm | अनिंद्य

उत्तम लेख, मालिका वाचणार !

योगायोग असा की आज सकाळपासून जफरची 'जा कहियो उन से नसीम-ए-सहेर' गुणगुणत आहे :-)

शेखरमोघे's picture

9 Apr 2019 - 5:59 pm | शेखरमोघे

धन्यवाद. जफर किन्वा इतरान्च्याही उर्दू गझला देवनागरीत अर्थासकट वाचता येण्याची सोय असती तर किती छान झाले असते!

नि३सोलपुरकर's picture

10 Apr 2019 - 1:58 pm | नि३सोलपुरकर

https://www.rekhta.org/ इथे थोडी फार सोय आहे .

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2019 - 5:38 pm | चौथा कोनाडा

वाह अतिशय सुंदर लेख !
शैली खूप ओघवती असल्यानं एका दमात वाचला गेला.
त्यावेळची युद्धजन्य परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहिली.

झौक, मोमीन, शेफ्ता, अझुरदा यांच्या बद्दल पहिल्यांदाच वाचले.
वाह, शेखरमोघे, सुरेखच !
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

शेखरमोघे's picture

9 Apr 2019 - 6:01 pm | शेखरमोघे

धन्यवाद. पुढील लेखन लौकरच मिपावर डकवेन. ती युद्धजन्य परिस्थिती चारच महिने चालली हे त्यात वाचू शकाल.

तुषार काळभोर's picture

9 Apr 2019 - 6:17 pm | तुषार काळभोर

१८५७ च्या बंडाविषयी मंगल पांडे, एनफिल्ड बंदुका, काडतुसे, तात्या टोपे, झाशीची राणी हे फक्त नावापुरते माहिती असतं.

ही सविस्तर पार्श्वभूमी चांगलीच रोचक आहे!

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 1:15 am | शेखरमोघे

धन्यवाद. हे लेखन मुख्यत्वेकरून बहादूरशहावरचे आणि बदलत्या दिल्लीवर आहे.

वाहवा. खूप दिवसांनंतर अशी रोचक, माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक लेखमाला वाचायला मिळते आहे. पुढील सर्व भागांची वाट बघत आहे.
एक छोटीशी सुधारणा : "उजडे हुए 'दयार' मे" असे हवे. दयार म्हणजे जागा, प्रांत, परिसर वगैरे.

१८५७ च्या संदर्भात 'शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी' (१८८०-१९५५) या तात्कालीन शहजाद्यांबरोबर वाढलेल्या लेखकाची पाचशेच्या वर पुस्तके आहेत (म्हणे), पैकी 'बेगमात के आंसू' खूप प्रसिद्ध आहे. (यातील काही कथांचा सुंदर अनुवाद काही काळापूर्वी श्री. जयंत कुलकर्णी यांनी मिपावर दिला होता त्यापैकी 'बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे' चे आणि अन्य कथांचे दुवे बघा.)

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 1:18 am | शेखरमोघे

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील लेखनात सुधारली जाईल.

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 7:39 am | शेखरमोघे

मी वापरलेल्या माहितीत तशाच तर्‍हेच्या Dastan-e-Ghadar या पुस्तकाचा समवेश आहे.

रमेश आठवले's picture

10 Apr 2019 - 12:46 am | रमेश आठवले

हे मोहम्मद रफी यांनी गायलेले लाल किला या १९६० च्या सिनेमातील गीत . गझल स्वतः बहादुर शाह ' जफर ' यांची .
https://www.youtube.com/watch?v=ha3V_87LvR0

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 1:21 am | शेखरमोघे

धन्यवाद. पुढील लेखनात आणखीन बहादूरशहाच्या रचनान्बद्दल लिहिणार आहे.

सिरुसेरि's picture

10 Apr 2019 - 12:44 pm | सिरुसेरि

काळाचा महिमा . छान वर्णन .

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 8:32 pm | शेखरमोघे

आभारी आहे.