कथा - माझा बहावा
-------------------------------------------------------------------------------------------------------------
वसंत ऋतूपासून बहाव्याची झाडे फुलू लागली आहेत .
त्या बहाव्यांना समर्पित .
वसंतात फुलावा- मनाचा बहावा ,
त्याचा बहर -कोणी डोळे भरून पहावा !
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्व वाचकांना गुढी पाडव्याच्या लक्ष शुभेच्छा !
-------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------
बस निघाली. वारं लागू लागलं,तसे मी आनंदानं डोळे मिटले. शेजारी आई-बाबा होते. त्यांची बडबड सुरु होती . ते असले तरी - सनी नव्हता . त्याला कामामुळं आमच्या बरोबर येणं जमलं नव्हतं.
गाडीनं वेग घेतला तसा विचारांनीही वेग घेतला... गावाला जायचं हा सुट्टीतला ठरलेला कार्यक्रम असायचा. माझ्या लहानपणाला गावाची एक संपन्न, नक्षीदार किनार होती. त्या नक्षीमध्ये काय नव्हतं ? ...
आता मी खूप मोठी झाली आहे. माझी आणि गावाचीसुद्धा परिस्थिती बदललेली आहे . पण मी गावाला निघालेय. आयुष्यातल्या एका महत्वाच्या वळणानंतर... बसमध्ये बसल्यानंतर मन नकळत लहानपणीच्या काळात गेलं.
----------------------------
अशीच एकदा गावाला चालले होते . शाळा नव्हती म्हणजे मज्जाच की ! उन्हाळ्याची सुट्टी होती...
बस धावत होती. संध्याकाळची वेळ होती .रस्ताही मोकळा होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनाही दूर दूरवर मोकळं होतं . क्षितिजापर्यंत नजर घेऊन जाणारं. रस्त्याकडेला दुतर्फा मोठी झाडं आणि त्यामागे पसरलेली हिरवीगार शेतं. शेजारी वाहणारी, आकाशही ज्यामध्ये आपलं निळं रूप न्याहाळतं होतं अशी नदी , तिच्या वर विहरणारी बगळ्यांची पांढरी पांढरी रांग . या साऱ्यावर पसरलेलं , तिरपं झालेलं पिवळसर ऊन. ओणवून , धरतीच्या खांद्यावर जाता - जाता बागडून घेणारं . सूर्याचा लालकेशरी गोळाही डोंगरामागे लपू पाहत होता . हवेचा तप्तपणा कमी होऊ लागला होता . मनाला उगा हुरहूर लावणारी वेळ असते ती . काहीतरी मनात उगा डोकावत रहातं . अवखळ वय असलं तरी ती हुरहूर जाणवत राहतेच ...पक्षी घरट्यांकडे परतत होते . गुरं घराकडे परतत होती . त्यांच्या गळ्यातल्या घंटा किणकिण वाजवत .
मीही त्यांच्यासारखीच आता घरी पोचणार होते ! …
आता गाव जवळ आलं होतं . माझे केस वाऱ्यावर भुरुभुरू उडत होते . अन त्या वाऱ्यावर स्वार होऊन माझं मन कधीच गावात पोचलं होतं .
गावातल्या मोकळ्या हवेची आणि वातावरणाची काय मजा असते !...
ते शेतात हुंदडणं, त्या विहिरीतल्या उडया, आंबे-करवंदं आणि अंगणातल्या जागलेल्या रात्री. गोष्टी ऐकत ऐकत झोपी जायचं . अर्ध्या रात्री - अर्धीच गोष्ट ऐकून . किती धमाल !
पण एवढंच नाही… गावाला आजी असते. माझी आजी ! …प्रेमळ आजी कुणाला आवडत नाही ? माझं नाव खरं तर ' मोहिनी ' आहे; पण अजूनही ती मला कुक्कुलं बाळ समजून ' गुड्डी 'च म्हणते. मला ते नाव आवडत नाही ; पण आजीच्या तोंडून ऐकताना तेही गोड वाटतं. माझी आजी आहेच तेवढी गोड. मुरलेल्या मधासारखी.
गोरीपान . हसऱ्या चेहऱ्याची .ठसठशीत, लालभडक कुंकू लावणारी. केसात चाफा माळणारी . खणाची चोळी घालणारी अन त्यामध्ये शोभून दिसणारी.
आजीचा माझ्यावर खूप जीव आहे. मी भेटले की आजी माझे गालगुच्चे घेते आणि एकदा तरी म्हणते की , “ गुड्डी ना , थेट माझ्यावर च गेलीये ! “
गावाला आमचं मोठं शेत आहे. तिथं आजी-आजोबा दोघंच राहतात; पण मला शहरात राहावं लागतं असल्यानं मला त्यांच्याजवळ राहता येत नाही.
स्टँडपासून घरी चालत जावं लागतं . आम्ही घरी पोचलो. आजीनं आमच्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला . मला वाटतं, मी आता मोठी आहे आणि तिला वाटतं मी अजून छोटीच आहे. तिला ते तसं वाटणं हेही मला आवडतं !
तिने मला जवळ घेतलं तेव्हा तिने केसात माळलेल्या चाफ्याचा परिचित वास आला .
आणि माझी धमाल सुरु झाली.
आमचं गाव तसं छोटंसंच आहे. गावात मारुतीचं एक फार फार जुनं देऊळ आहे. त्याचं नाव रोकडोबा. त्याच्यावरून गावाचं नाव पडलंय ‘ रोकडोली ‘ .
दुसऱ्या दिवशी शनिवार होता. आजी मला देवळात घेऊन गेली. देऊळ पण काय भारी ! काळ्या दगडात बांधलेलं. देवळाच्या पलीकडं एक बांधीव तलाव. खाली उतरायला पायऱ्या. त्या पायऱ्यांच्या जवळच बकुळीचं एक डेरेदार झाड. हे झाड म्हणजे त्या देवळाचा जणू काही आडदांड रक्षकच ! बकुळफुलं वेचताना,त्याचा वास घेताना मला नेहमी वाटायचं की, हे झाड त्या देवळाच्या सुरवातीच्या काळापासूनच इथं असावं. खरं काय ते रोकडोबालाच माहित !...
दर्शन झालं. दोन वेळा प्रसाद खाऊन झाला. खोबऱ्याचा मोठा तुकडा तोंडात कोंबून मी निघाले तलावाकडं. नेहमीप्रमाणं . आजी माझ्यामागं. ती बसली बकुळी खाली . मी दडादडा पायऱ्या उतरून पाण्याजवळ गेले. तशी, काठावरच्या चिखलातून एका बेडकाने पाण्यात लॉन्ग जम्प मारली. मी दचकले . मग डोळे ताणून, वाकून पाहिलं, तेव्हा पाण्यातले चंदेरी मासे दिसले. सळसळणारे , एकमेकांच्या अंगावर झुंबड करणारे .पलीकडं पाण्याबाहेर तोंड काढलेलं एक छोटंसं कासव दिसलं. हे असं पाहणं दरवेळचं .
मग मी परत वर आले. आजीला म्हणाले, " आजी, हे झाड मला आवडतं. तुझ्यासारखंच आहे.... ऐसपैस, जुनं, सावली देणारं, वातावरण सुगंधित करणारं."
त्यावर आजी खुद्कन हसली. तिचे प्रेमळ डोळे चमकले.
रात्री अंगणात गप्पा रंगल्या त्यावेळी आजी म्हणाली, "अहो, ऐकलंत का ? मला एक गम्मत सुचलीये.”
आजोबा म्हणाले ,"हुं ! तुला अन गम्मत सुचतिये ? तू काय गुड्डी एवढी आहेस का आता ? अशा गमतीजमती सुचायला ?"
“ एवढी आल्हाददायक हवा सुटलेली तरी म्हातारबांचं डोकं गरमच ! “आजी म्हणाली
आजोबा पण ना...भारीच आहेत !
" ऐका तर खरं. आपण गुड्डीचं झाड लावू या." आजी म्हणाली
त्यावर आई म्हणाली, " हं S - म्हणजे झाडाला गुड्ड्याच गुड्ड्या येतील आणि डोकं भंडावून सोडतील! एक आहे तीच पुरे आहे."
" अहो, ऐका तरी, आपण ना एक खास झाड लावू या. तिच्या हातानं - तिचं झाड." आजी म्हणाली
माझं झाड ?... वॉव ! मला खूप मजा वाटली ते ऐकून .
" जी झाडं आहेत ना, तीच तुला बघायला होत नाहीत. मलाही शेतीच्या कामांमुळं वेळ होत नाही आणि गुड्डी ? ती इथं कायम राहणार आहे का ? तिच्या या झाडाचं बघण्यासाठी ? " आजोबा म्हणाले.
आजोबा ना आजीला नेहमी आडवंच लावत असतात. पण तसं त्यांचंही खरं आहे. गावाला दोघंच दोघं राहतात. त्यात आजोबांना शेतीची शंभर कामं ! गडीमाणसं असली तरी , लक्ष हे द्यावंच लागतं. आजीलाही एक कामं असतं का ? बिचारी दिवसभर बिझी असते. तिलाही वेळ मिळत नाही. आजीला झाडांची एवढी आवड, फुलांची एवढी आवड, पण अंगणात एक पारिजातक आणि हिरवा चाफा, एवढी दोनच मोठी झाडं.आणि सदाफुली.बाकी झाडं लक्ष न दिल्याने सूकूनच जायची.
आजोबांनी असं बोलण्याची आणखी एक बाजू म्हणजे, त्यांना वाटतं की माझ्या बाबांनी गावीच राहावं. तर बाबांना शहरातच हवं असायचं . या मोठ्या माणसांचा सगळा घोळच असतो.
खरं तर माझे मिशाळ आजोबाही प्रेमळ आहेत ; पण त्यांच्या बोलण्यातून ते कधी जाणवतच नाही .
मला काही नाही बाई.....गावात राहायचं तर राहायचं की. गावात शाळा आहेच की ! आणि शाळा सुटली की " आजी की पाठशाला !"
पण आजी काय आजोबांना जुमानते होय !
" ते काही नाही. झाड लावायचं म्हणजे लावायचं . गुड्डी कुठलं झाड लावू या ?"
मला माझ्या शाळेच्या वाटेवरचा फुलल्यानंतरचा डेरेदार बहावा आठवला. पिवळ्या फुलांचा, ब्राइटलेमन यलो कलरचा. परीक्षा जवळ आली की फुलणारा.
" आजी, बहावा....." मी म्हणाले.
" मस्त गं गुडडे. आपण बहावाच लावू या . स्वैपाकघरातून मला दिसेलसा लावू या. आपल्या गावात कुठ्ठेच बहावा नाही बघ."
बहाव्याचं रोप गावात कुठलं मिळायला, पण आजीनं ती व्यवस्था केली. मग माझ्या हातानं ते रोप लावण्याचा कार्यक्रम झाला. आजी मिश्किल. आजोबांना म्हणते कशी, " जमाना बदललाय म्हणून बरं. डझनभर नातवंडं असती तर ? डझनभर झाडं झाली असती !"
रात्री झोपताना माझ्या मनात बहावा,स्वप्नात बहावा...पहावा तिकडे बहावा !
सकाळी उठल्याबरोबर मी अंगणात गेले. झाड मोठं झालंय का ते पाहायला...
खुळी मी ! झाड एका दिवसात कुठलं वाढायला ? पण माझं मन...!
आजी होतीच मागं. कोवळ्या उन्हात, शीतल वाऱ्यात. प्राजक्ताची फुलं वेचत. ती जवळ आली ,तसा त्या फुलांचा मंदसा सुवास आला.
" अहो गुड्डाबाई, झाड असं लगेच वाढत असतं का हो ? तुम्ही पण ना ! तसं असतं तर तुम्हीही पटापट मोठ्या झाल्या नसतात का ? अगं, वेळ लागेल याला बहरायला. चार-पाच वर्ष लागतात . पण एक आहे, छान फुलेल हो बहावा, तुझ्यासारखा. गंमत म्हणजे, तू जेव्हा जेव्हा सुट्टीत येशील ना तेव्हा तेव्हा तो बहरलेलाच असेल. सुट्टीत तू येणार म्हटल्यावर माझं मन बहरतं ना तस्सा. त्याच कालावधीत, म्हणजे वसंत ऋतूत फुलू लागतो तो उन्हाळाभर. त्याला उन्हाळी सुट्टी नसते काही - तुझ्यासारखी ."
मी हसतच सुटले. मग म्हणाले, " ओके ..... पण तरी कधी फुलणार ?"
" ते मी कसं सांगू ?" आजी म्हणाली.
सुटी संपली. आम्ही पुन्हा शहरात आलो... पण शाळेत जाता- येता बहाव्याचं ते ठराविक झाड दिसलं की मला तो गावाकडचा बहावा आठवायचा. अजून फुलायला खूपच अवकाश असणारा .
पुढच्या उन्हाळ्यात आपण कधी एकदा गावी जातोय, असं मला होऊन गेलं.
सुट्टी पडली आम्ही गावाला गेलो मी गेल्या गेल्या त्या झाडाकडं पळाले. झाड मोठं झालं होतं, पण त्याचा तो तेजस्वी पिवळा रंग नावालाही नव्हता. अशी चार-पाच वर्ष गेली.
एकदा आजी कधी नव्हे ती यात्रेला गेली होती. म्हणजे - आजोबांनी तिला जाऊ दिलं हेच विशेष, पण ती तिकडंच ‘ देवाघरी ‘ गेली.
मी एव्हाना तशी मोठी झालेच होते, पण आजी गेल्यावर, मला आणखीच मोठं झाल्यासारखं वाटलं!...
-------------------------------
गाडी थांबली, तसे विचार थांबले. बाबा चहासाठी खाली उतरले. मग आई आणि मीही उतरले. चहा पांचट होता. रंगावरूनही कळत होता आजीच्या हातचा चहा आठवला. मस्त - घट्ट, घरच्या दुधाचा. मनात आलं - आजीची आठवण कशाकशात भरून राहिलीये !...
सनीला मेसेज पाठवला , त्याला माझी काळजी लागून राहिली असणार होती .
गाडी निघाली पुढं आणि मन गेलं मागं. पुन्हा एकदा मागं…
-----------------------
माझी कॉलेजची परीक्षा संपली होती. सुटी लागली आणि आम्ही गावी निघालो. आजी गेल्यावर मी पहिल्यांदाच गावी चालले होते .
बसमध्ये भरारा वारं तोंडावर येऊ लागलं. मी डोळे मिटून घेतले आणि मला आजीची आठवण आली .माझ्या मिटल्या डोळ्यांत पाणी आलं. आता गावी गेल्यावर ?... माझी प्रेमळ आजी नसणार होती. बाकी सगळं सगळं असलं तरी ! मी तिला मिस करणार होते आणि हे फर्स्ट टाइम होणार होतं.
अचानक मला तिची हाक ऐकू आली " गुड्डी !" आणि मी एकदम डोळे उघडले. आता आजी कधीच दिसणार नव्हती. ती कधीच मला गुड्डी म्हणून हाक मारणार नव्हती.आता कुणीच मला गुड्डी म्हणणार नव्हतं......
कुणीच.....?
मी पुन्हा डोळे मिटले. मला पुन्हा हाक ऐकू आली "गुड्डी !’ … हा आवाज सनीचा होता. तो मला लाडानं गुड्डी म्हणतो. त्यानं मला अशी हाक मारली की एकदम "स्पेशल " वाटतं आणि एक म्हणजे, …तो मला सगळ्यांसमोर या नावानं हाक मारत नाही.
सनी पलीकडच्या सोसायटीत राहतो. त्याची आणि माझी फ्रेंडशिप झाली ती एका कारणामुळं - त्याच्या घरापाशी बहावा आहे …
त्याच्या रूमच्या खिडकीतून थेट खालचा तो बहावा दिसतो. टॉप अँगल नं पिवळ्या रंगाची छत्री पहिल्यासारखा!
माझ्या अगदी घराजवळ ‘बहावा’ आहे. हे मला ठाऊकच नव्हतं माझी शाळा संपली. कॉलेज सुरु झालं, तसा शाळेचा रस्ता बदलला आणि वाटेवरचा बहावा भेटायचा बंद झाला.
पण मला पुन्हा बहावा भेटलाच आणि सनीसुद्धा !
त्याच्या खिडकीजवळचा तो बहावा " कोवळा " आहे..... अन तो बरेच दिवस असा कोवळा - कोवळा च राहणार होता . कोवळा असल्याने तो हलक्या फिक्या पिवळ्या रंगाचा होता
आजीचं वाक्य आठवलं , ती म्हणाली होती, " झाडं अशी पटापट मोठी होत असती तर तूही अशीच पटापट मोठी झाली नसतीस का ?
पण मुलं पटपट नसली तरी हळूहळू का होईना - मोठी होतच असतात !
सनी माझं सर्वस्व झाला होता. त्याच्यामुळे माझं आयुष्य एखाद्या बहाव्यासारखं बहरलं होतं. मन भारून टाकणारं . त्याने मला प्रपोझ केलं तेव्हा वसंताची सुरुवात झाली होती बहावे फुलू लागले होते - सारीकडे आणि मनातही .
तो काही दिसायला हिरो वगैरे जरी नसला तरी माझ्यासाठी मात्र जगातला सगळ्यात सुंदर तरुण होता !
बसला एकदम गचका बसला आणि मी डोळे उघडले आणि एकदम मनाला जाणवलं. की सनी खूप दिवस दिसणार नव्हता.... कसंतरीच झालं तेव्हा. वाटलं , काही दिवसांचाच तर प्रश्न आहे.... पण आजी ? ती तर कायमचीच गेलीये..... मग आजोबांना कसं वाटतं असेल? …
मला एकदम अंगणातलं पारिजातकाचं झाड आठवलं. ते झाड तिथंच वाढणार, तिथंच फुलणार आणि त्याची खाली पडणारी फुलं वेचायला आजी नसल्यानं ते तिथंच मातीला मिळणार !
गावी पोचलो. भाकर-तुकडा ओवाळून टाकायला आता आजी नव्हती.
आजोबांचा तरतरीतपणा हरवलेला. जिगसॉ पझलचे सगळे सगळे तुकडे जसेच्या तसेच जागेवर, पण त्यातला एक तुकडा हरवलेला.
हिरव्या चाफ्याचं झाड ही वठलं होतं .
घरात सतत आजी आहे असं वाटत राहिलं.आता तिची हाक येईल, " गुड्डाबाई, चला जेवायला ." ती नंतर म्हणेल , “चल गं, अंगणात जाऊ , नाहीतर, रोकडोबाला जाऊ..." पण नाही .
आणि बहावा नुसताच वाढलेला - ठोंब्यासारखा ! त्याचा तो पिवळा दिमाख नसलेला. का नाही बहरला?कुणास ठाऊक ! का तोही आजीच्या आठवणींमध्ये बहरायचंच विसरला ? ....
त्यावर्षी मी रोकडोबाला गेलेच नाही !
या वेळी आमचा गावचा मुक्काम लवकर संपला.
जायच्या दिवशी सकाळी मी उठून अंगणात गेले. सकाळीही गरम होत होतं . मी बहाव्यापाशी गेले . त्या पानांकडं पाहिल्यावर आजी आठवली....आणि...?
बहाव्याला किंचित फुटवा आला होता. मन आनंदून गेलं .
पण का असं ? हे आजीला का पाहायला मिळालं नाही ? कि ती गेलीये म्हणून हे पिवळेपण फुटायला लागलंय ?
मी ओरडले " आई .."
सगळे जण बाहेर आले. सगळं वातावरणच बदललं त्या पिवळ्या फुटव्यानं.
आजोबांनी थरथरता हात झाडाला लावला. मग झाडाच्या आधारानं उभं राहून डोळे पुसले.
हवेची एक झुळूक आली . झाड सळसळलं.
त्यानंतरच्या उन्हाळ्यात मी गावी गेले, तेव्हा बहावा बहरलेला होता.दिल खोल के ! यलो कलरची बाटली अंगावर सांडून घेतलेल्या खोडकर मुलीसारखा....लहानपणीच्या गुड्डीसारखा!
मी त्या झाडाला मिठी मारली, त्याच्याशी बोललेसुद्धा.सनीबद्दल ही सांगितलं ! पहिल्यांदाच ! आणि वर हे देखील सांगितलं की त्यालासुद्धा बहावा आवडतो म्हणून.
नंतर, बराच काळ लोटला. दरवर्षीचं जाणं कमी झालं. पुढं माझं आणि सनीचं लग्नही झालं. त्यानंतर मी आजच गावी जात होते.
---------------------------------
बसला गचका बसला. बस थांबली.गाव आलं होतं .जुन्या आठवणींचा पट गुंडाळला गेला. वर्तमानात आला .
स्टॅन्डपासून घरी चालत जावं लागतं . आम्ही चालू लागलो. प्रत्येक पावलाला आजीची आठवण गडद होत चाललेली…
घर जवळ आलं आणि डोळ्यांवर विश्वास बसेना.बहावा प्रचंड वाढलेला....तरारलेला. त्याच्या त्या पिवळ्या गारुडासहित ! तेजस्वी आणि ऐश्वर्यसंपन्न ! लांबूनच नजरेत भरणारा .घराच्या आधी दर्शन देणारा.
मी झाडाजवळ गेले . आजीच्या कुशीत शिरल्यासारखं वाटलं. झाडाची सावली म्हणजे तिच्या मायेची पाखरच की !
उन्हातून गेल्यावर शीतल झऱ्यात पाय सोडून बसल्यासारखं वाटलं
झाड आनंदानं झुललं. त्याला आधीच कळलं होतं की काय कुणास ठाऊक ! कारण मी त्याच्या कानात कुजबुजले, " आज्जे , तू ना आता पणजी होणारेस,थोड्याच दिवसांत....! “
झाड आनंदानं डोललं, पुन्हा एकदा झुललं - आणि वरची काही फुलं माझ्या अंगावर टपटपली . अंगावर एकदम शहाराच आला आणि डोळ्यात पाणी …
मी झाडाला घट्ट मिठीच घातली .
ते झाड माझं ? की ते झाड म्हणजे आजी ? …
रोकडोबालाच माहित !
-------------------------------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे
bip499@hotmail.com
प्रतिक्रिया
6 Apr 2019 - 8:00 pm | प्रमोद देर्देकर
वा खूप छान !
बऱ्याच दिवसांनी खूप छान ललित वाचयला मिळालं .
येवू दे अजून .
पु. ले . शु.
6 Apr 2019 - 8:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
7 Apr 2019 - 12:33 pm | आरवी
पु ले शु
7 Apr 2019 - 12:45 pm | श्वेता२४
अप्रतीम लिहलय
7 Apr 2019 - 1:02 pm | पाषाणभेद
असे आठवणींचे बंध माणसाला बांधून ठेवतात.
7 Apr 2019 - 7:07 pm | चित्रगुप्त
अतिशय सुंदर, तरल लिखाण.
बहावा म्हणजेच 'अमलतास' ना? सुमारे तीस वर्षांपूर्वी पचमढीला ही शेकडो झाडं फुललेली बघितली होती, त्यानंतर मी घरासमोर रोप लावलं, मग काही काळानंतर दर वर्षी पिवळ्या फुलांचे घोसचे घोस लटकलेले बघण्यात अवर्णनीय आनंद वाटायचा.
अजून झाड तिथेच आहे, आम्ही मात्र आता दर उन्हाळ्यात बाहेर जाऊ लागल्यानं ती शोभा बघायला मिळत नाही.
सुंदर आणि मनाला चटका लावणार्या लिखाणाबद्दल मनःपूर्वक आभार.
7 Apr 2019 - 8:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
बहावा
7 Apr 2020 - 11:23 am | मराठी कथालेखक
बहावा म्हणजेच गुलमोहर ना ?
8 Apr 2019 - 2:15 am | चामुंडराय
छान लिहिलंय.
8 Apr 2019 - 1:26 pm | पद्मावति
अप्रतिम!
20 Apr 2019 - 1:49 pm | बिपीन सुरेश सांगळे
आभार
सर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार
20 Apr 2019 - 1:51 pm | बिपीन सुरेश सांगळे
डॉ म्हात्रे
इतक्या आठवणीने तुम्ही कथेखाली बहाव्याचा फोटो लावला , तो हि सुंदर !
जो मी सुद्धा लावला नव्हता .
खूप खूप आभार
20 Apr 2019 - 1:52 pm | बिपीन सुरेश सांगळे
चित्रगुप्त
विशेष प्रतिक्रियेबद्दल विशेष आभार
24 Jun 2019 - 11:24 pm | इरामयी
पिवळा फुटवा ... हे शब्द आवडले. छान लिहिलं आहे.
25 Jun 2019 - 2:13 pm | Rajesh188
बाहावा हे नाव मी ऐकलं सुद्धा नाही तर पाहणे दूर
हे झाड महाराष्ट्र मधील आहे का असेल तर ह्या झाडाची विविध नावे महाराष्ट्र च्या विविध भागात वेगळी असतील त्याची माहिती द्यावी .
मी पश्चिम महाराष्ट्र मध्ये सातारा जिल्ह्यात राहतो
17 Mar 2020 - 9:22 am | विजुभाऊ
राजेश ,सातार्यात राधीक हॉटेल च्या दारात बहाव्याचे एक झाड आहे.
झाड पाहिले की एकदम श्रीमंत झाल्यासारखे वाटते.
16 Mar 2020 - 11:12 pm | बिपीन सुरेश सांगळे
पुन्हा वसंत ऋतूचे दिवस !
पुन्हा बहावा फुलण्याचे दिवस !!
17 Mar 2020 - 9:21 am | विजुभाऊ
खूप सुंदर लिहीलं आहे हो सर.
एकदम सेंटी केलंत.
6 Apr 2020 - 9:46 am | बिपीन सुरेश सांगळे
विजुभौ
खूप आभारी आहे
अन कृपया मला अहो किंवा सर म्हणून नका
मी लहान आहे आपल्यापेक्षा
7 Apr 2020 - 8:09 am | प्रमोद देर्देकर
पुन्हा एकदा वाचलं आणि पुन्हा मन भरून आलं . आता दर वसंत ऋतुत हा लेख वाचणार आणि वर काढणार .
7 Apr 2020 - 9:20 am | बिपीन सुरेश सांगळे
प्रमोदजी
अशी प्रतिक्रिया वाचली की माझंही मन भरून येतं .
काय आभार मानू मी आपले ? ...
मलाही ही कथा पुन्हा पुन्हा वाचविशी वाटते
पुन्हा असं लिहिता येईल की नाही अशी अनामिक भीती स्वतःलाच वाटत राहते
1 Mar 2024 - 8:32 am | बिपीन सुरेश सांगळे
काल , या वसंतातील बहाव्याचा पहिला कोवळा बहर पाहिला .
16 Mar 2024 - 8:06 pm | मिसळपाव
काय सुरेख लिहिलं आहेस रे!! वाचनखूण साठवल्येय...
1 Mar 2024 - 10:30 am | कर्नलतपस्वी
आजोळी जाणं म्हणजे अमृतानुभव. आजी नव्हती पण आजोबा आणी मावश्यांनी कमी जाणवू दिली नाही.
जिगसॉ पझलचे सगळे सगळे तुकडे जसेच्या तसेच जागेवर, पण त्यातला एक तुकडा हरवलेला.
एक तुकडा हरवला तर पझल अनुपयोगी होतं पण नात्यांत तसे नाही. कमी भासते पण इतर नाती त्याची कमी थोडीफार भरून काढतात.
'बहावा', वर अनेक कवीता पण सर्वात जास्त भावली ती मिपाकर दिपाली ठाकूर यांची. अंतरजालावर इंदिरा संत यांच्या नावावर बिनधास्त डकवली आहे.तूनळी खुद्द कवयित्रीने स्वतः व्हिडीओ डकवला आहे. याचा खुलासा खुद्द कवयित्री आणी जुने जाणकार मिपाकरनी खुलासा केलाय. थतफ
बाकी कथा वाचताना आमचे आजोळपण (बाळंतपणा सारखं) आठवलं.
1 Mar 2024 - 11:26 am | सौंदाळा
आधीसुद्धा वाचला होता.
परत वाचून पण तसाच छान अनुभव आला.
या मोसमातला तुरळक फुललेला बहावा मागच्या रविवारीच पाहिला. अभी तो बस शुरुवात है.
1 Mar 2024 - 2:07 pm | श्वेता व्यास
आवडली गोष्ट. छान तरल आहे.
बहावा आवडता वृक्ष आहेच.
5 Mar 2024 - 11:15 am | nutanm
खूप छान कथा.आम्हाला आजोलपणाचे इतके सुख नव्हते पण दोन्ही आजोळी 2 आज्या व एकच आजोबा मात्र भेटायचे इतकेच. एक आईची आई व दुसरे वडिलांचे आइ-- वडील.पण प्रेम जेमतेमच. असो.
15 Mar 2024 - 10:15 pm | चौथा कोनाडा
खुप सुंदर .. अतिशय सुंदर लेखन .. चित्रदर्शी , वेगळ्या वातावरणात घेऊन जाणारे.
वाचता वाचता गावाकडच्या आठवणीत कधी बुडून गेलो तेच समजलं नाही !
माझी आजी आठवली, वाड्यातलं पारिजातकाचं झाड आठवलं , त्यात तिचा जीव गुंतलेला ते आठवलं ! सगळीच सफर झाली !
अ प्र ति म च !
16 Mar 2024 - 12:33 pm | सुबोध खरे
अप्रतिम