मागील दुवा : https://www.misalpav.com/node/44198
ते ऐकल्यावर सगळ्यानाच एकाच वेळेस बांध फुटावा तसे हसू फुटले . वर्गात हसण्याचा लोळ उसळला. संदीपसकट प्रत्येकजण बराच वेळ हसत राहीला. स्वतःचे हसणे संपले की शेजारच्या च्या हातावर टाळी देऊन पुन्हा पुन्हा हसत होता. या सगळ्या गदारोळात बाहेर गेलेला मंदार वर्गात पुन्हा कधी येवून बसला ते समजलेच नाही. हसून हसून डोळ्यात येणारे पाणी पुसत होतो.
शाळेचा शिपाई हातात एक कसलासा कागद घेवून वर्गाच्या दारात उभा होता.
सरांनी तो कागद वाचला. आणि म्हणाले तुमच्या साठी एक महत्वाचे प्रकटन आहे.
सरांनी प्रकटन वाचले. काही वेळ ते काहीच बोलले नाहीत. अरे एक बातमी आहे . पण नको. जाऊ दे .तुम्हाला नाही आवडणार
सांगा सर सांगा.
काल काही जणांनी काहितरी गडबड केली आहे. तुमच्या पैकी त्या काही जणांना मुख्याध्यापक सरांनी बोलावले आहे. तुम्ही पुढे येताय की नावे घेवू?
कुणीतरी काहितरी गडबड केली? कोण असेल ते? वर्गातल्या सगळ्या जणांच्या नजरा आमच्या बाकाकडे . एल्प्याने टंप्याला बाकाखालून पाय मारला. अर्थात तो पलीकडे होता आणि मी दोघांच्या मधे होतो त्यामुळे तो मलाच लागला.
"काय रे काल आपण तिघे तर सोबतच होतो की. का तू दोन तासांच्या मधे पाणी प्यायला गेला होतास तेंव्हा काही केलेस? "एल्प्या
""ए मी कशाला काही करेन. मी तहान लागली होती म्हणून गेलो होतो. तहान लागलेली असताना काही करता तरी येतं का? "टंप्या
"तहान भागवून परत येताना केलं असशील "एल्प्या.
दोघेही खुसु खुसु आवाजात बोलत होते.हे असले खुसु बोलणे म्हणजे एक त्रास असतो. जे काही बोलावं लागतं ते बोलणारा थेट कानात सांगतो ते दोघेही एकमेकांशी बोलत होते पण मी त्यांच्या मधे बसलो होतो त्यामुळे . माझी पंचाईत झाली. दोघेही जे काही बोलायंच होतं ते माझ्याच कानात सांगत होते. मला तर बहुतेक माझ्या दोन्ही कानांना एक आरपार जोडणारा पाईप असावा असेच वाटायला लागले. ते दोघे एकएकटे बोलत होते तो पर्यंत काही नव्हते. पण जेंव्हा दोघेही एकदम बोलू लागले तेंव्हा मात्र माझा मेंदू बधीर झाला. रेडीऑवर एकाचवेळेस दोन स्टेशनं लागावीत तसे. म्हणजे सुधा नरवणे आपल्याला प्रादेशीक बातम्या देत आहेत , इयं आकाशवाणी , संस्कृतं वार्ता: श्रुयंताम. आणि त्याचवेळेस "ये दोसती हम नही तोडेंगे " हे एकाच रेडीओवरून ऐकू आले तर कसे होईल तसे झालं. डोक्यात नुसतं " खुस खुसू खुस खुसू " वाजायला लागले. शेवटी नाईलाज म्हणून मी डोके खाली बाकावर टेकवले. त्याच वेळेस सरांचे आमच्या बाकाकडे लक्ष्य गेले. टंप्या आणि एल्प्या दचकेल माझे डोके खाली बाकावर होते त्यामुळे माझ्या कानात काही बोलायला गेलेला टंप्या थोडा पुढे झुकला . त्याच वेळेस एल्प्या ही पुढे झुकलेला होता. टंप्याचे डोके त्याच्या डोक्यावर ठाण्णकन आपटले. डोके चोळत टंप्या उभा राहीला.
"सर मी नाही. मी काल दुपारच्या सुट्टीत डब्यात शाबुदाण्याची खिचडी आणली होती आणि ती मीच सम्पवली. वरच्या ग्ग्राउंडवर नाही टाकली. ती बहुतेक क तुकडीतल्या लिपारे ने टाकली असावी. तरी त्याला सांगत होतो मी असे करु नकोस म्हनुन "
"मी पण नाही ओ सर उलट दुपारच्या सुट्टीत मी अभ्यास करत बसलो होतो." हे वाक्य एल्प्याशिवाय इतर कोणीही म्हण्टले असते तर सरांनी विश्वास ठेवला असता. पण एल्प्याने हे म्हणावे याचे सगळ्यानाच हसू आले.
"पण मी कुठे विचारलय काही तुम्हाला. तुम्ही कशाला कबुली जबाब देताय."
नाही , म्हणजे सर.... टंप्या काहीतरी बोलायचं म्हणून पुटपुटला.
"सर ते प्रकटन काय आहे ते सांगा न " ही उत्सुकता सर्वानाच होती.
तुम्ही प्रकटन ऐकल्यावर " हे..." असे ओरडणार नसाल तर साम्गतो.
नाही सर अज्जिबात नाही ओरडणार.
नक्की ना.... बघा हा.
नक्की सर . अजिबात नाही ओरडणा आम्ही
" या सोमवारी आपली वर्षा सहल जाणार आहे. यवतेश्वर ला. "
" यवतेश्वर............ हे............. " दबक्या आवाजात सगळेच एकदम ओरडले.
" बघा म्हणालो होतो ना मी." सर हसत बोलले. त्यावर पुन्हा सगळे हसले.
यवतेश्वरची सहल म्हणजे एक धमल करायची पर्वणी होती. सातार्यात पाऊस येतोच मुळी यवतेश्वराच्या डोंगरावरून. कधीही पाऊस येणार असला तर पहिली वर्दी मिळते ती यवतेश्वराला. श्रावणात तर डोंगराला कायम ढगांचा फेटाचा बांधलेला असतो. मला तर तिथे जाण्याच्या कल्पनेनेच एकदम काहितरी भारी वाटायला लागले.
हिरव्या कच्च डोंगरावर ढगांची तो फेटा पहाताना मजा यायची आता तर थेट तिथेच जायचे होते.
या सहलीत येण्यासाठी काही अटी आहेत.
पहिली अट म्हणजे सोबत फक्त खाण्याचा डबा असेल . कोणीही छत्री रेनकोट घ्यायचे नाही. जाताना गाडी रस्त्याने चालत जायचे आणि येताना पायवाटेने पायर्यांवरून उतरायचे आहे. किमान पाच किलोमीटर चालायची तयारी हवी.
भुरभुर पावसात ढगांच्या फेट्यावर जायचे तर पाचच काय पण आणखी दहा किलोमीटर चाललो असतो आम्ही. तास संपला सुट्टी झाली. ती आख्खी सुट्टी सगळेच जण वर्गातच होते. पाणी प्यायला म्हणून सुद्धा कुणी बाहेर गेले नाही. त्या पुढचे दोन तास कसे गेले तेही कुणाला समजलं नाही. सगळेच जण त्या धुक्याच्या फेट्यात हरवून गेले होते.
पण काही म्हणा त्या सहलीच्या प्रकटनामुळे एक भलताच उत्साह संचारला सगळ्यांच्या अंगात. एखाद्या अंधार्या संध्याकाळी बराच वेळ लाईट जाऊन परत आल्यावर जो लखलखीत उजेड पडतो तेंव्हा होते ना तसे काहितरी लखलखीत वाटायला लागले. त्या उत्साहात आम्हाला सरांनी शाळेचा मधला चौक झाडून काढायला साम्गीतला असता तरी आख्या वर्गाने तो दोनतीनदा झाडून काढला असता. रामाने त्याच्या वानरसेनेला लम्केत सेतून बांधायला सांगीतला असेल तेंव्हा अशाच एखाद्या सहलीचे प्रकटन वाचून दाखवले असेल. शाळा सुटताना प्रत्येकजण वेगळ्याच उत्साहात होता. घरी जाताना कोण कोण डब्यात काय काय आणणार तेच बोलत होता. श्रावणी सोमवार असल्याने बहुतेक जणांच्य डब्यात बटाटा खीस किंवा सुबादाण्याची खिचडी हेच असणार होते. तरीही कोणी लिंबाच्या लोणच्याची फोड , कोणी ताक कोणी दह्याची वाटी कोणी पाटवड्या हे आणायचे ठरले.
घरी गेल्यानंतर नेहमीसारखे दप्तर भिरकावून देवून इकडे तिकडे करत रेंगाळण्यापेक्षा पटकन गृहपाठ करून टाकला. अर्थात तो तसाही फार काही मोठा नव्हता. आईला आश्चर्य वाटले. ती म्हणाली देखील काय विनू आज एकदम शाळेतून येवून थेट अभ्यासाला दुपारी कुठे पळायचा विचर आहे का?
नाही नाही.
मग काहितरी विशेष असले पाहिजे. ... थाम्ब तू सांगू नकोस. मी ओळखते. तुम्ही की नाही आज सगळे क्रिकेट खेळणार आहात. नाही पण ओल्या मैदानात कसे खेळणार? हा.... तुमच्या शाळेची सहल जाणार असेल ना सोमवारी.
शाळेची सहल जाणार आहे हे नक्की माझ्या चेहेर्यावर किंवा डोळ्यात मोठ्या अक्षरात लिहीलेले दिसत असणार. मी आरशात पाहिले. माझा चेहेरा होता तसाच होता.
मग आईला कसे समजले नाहीतर माझ्या अगोदर अंजी शाळेतून आली तीने सांगितले असेल . जाऊ दे ना आपल्याला काय करायचे आहे ते.
हे बघ विनू तू उद्या दिवसभर काही दंगा केला नाहीस, घरात पसार केला नाहीस तरच जाता येईलसहलीला.
आईच्या मते दप्तरातली बाहेर पाढून ठेवलेली पुस्तके , उघडलेली कम्पास पेटी , चित्रकलेचा कागद आणि रंगपेटीच्या बाहेर घरंघळलेले तेली खडू, पेन्सील ला टोक करताना टोकयंत्रातून बाहेर आलेली ती पेन्सीलच्या लाकडाची शंकूच्या आकारातला त्रिकोणी पापुद्रा, पुस्तकात ठेवायसाठी आणलेले मोरपीस , रेशमाच्या धाग्याची लड , करकरीत जाळी दाखवणारे वाकड्या टोकाचे डौलदार पिंपळाचे पान, इकडे तिकडे उघडून ठेवलेल्या वह्या , पेनात शाई भरण्यासाठी उघडून ठेवलेली दौत, शेजारी शाई पुसायचे फडके, मधेच कुठेतरी पडलेला निळ्या लाल चट्ट्या पट्ट्या ने आखलेला रबरी चेंडू , गलोल तयार करायला म्हणून आणलेल्या सायलच्या टायरट्यूब च्या कापलेल्या पट्ट्या हे सगळे म्हणजे पसारा. गृहपाठ तर झालेला होता, त्यामुळे मंगळवार पर्यंत तरी त्या दप्तरातली वह्या पुस्तके बाहेर निघणार नव्हती हे एक बरे होते.
पण हे सगळे सामान म्हणजे अभ्यासाचाच भाग असतो. हे सगळे आजूबाजूला असले तरच अभ्यास सुचतो. पण हे आईला कसे सांगायचे. काही बोललो आणि ती सहलीला नाही म्हणाली तर? दोनच तर दिवसांचा प्रश्न आहे. नाही करायचा पसारा.
काय रे विनू. सहल कुठे जाणार आहे? इतक्या पावसात कसे जाणार तुम्ही?
अगं आई आमची वर्षा सहल जाणार आहे. पावसातली सहल. मस्त यवतेश्वरावर, सोमवारी. सगळ्या शाळेची. तो नाही का! समोर ढगांचा डोंगर आहे ना तिकडे.
सकाळी निघणार सगळे आणि दुपारी परत. चालत जाणार, येताना पायवाटेने पायर्या उतरत येणार. मोठे मंदीर आहे तिकडे शंकराचे.
मी काय काय बोलत होतो आणि आई ते ऐकत होती. त्यावेळी माझ्या पेक्षा माझा चेहेराच कदाचित जास्त बोलत असावा. कारण आईचे माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या चेहेर्याकडेच जास्त लक्ष्य होते.
सोमवारी सहलीला जायचे या विचारांनीच माझ्या चेहेर्यावर काहितरी मजेदार रंगीत रांगोळी उमटत असावी. माझ्यासारखीच ,आई पण त्या नक्षीत हरवून गेली.
(क्रमशः )
प्रतिक्रिया
2 Apr 2019 - 9:27 am | पलाश
लहान मुलाच्या मनातल्या जगाविषयी निवांतपणे आणि विस्ताराने लिहिली जाणारी ही मालिका फार छान चालली आहे. त्यातही आजचा लेख विशेष आवडला. सुरेख!!
2 Apr 2019 - 2:01 pm | ज्ञानोबाचे पैजार
हा भाग विषेश आवडला,
पुभाप्र,
पैजारबुवा,
2 Apr 2019 - 2:18 pm | भीमराव
मोत्यांची माळ आहे ही लेखमाला,
जुन्या आठवणी जाग्या करत निघाले आहेत.
2 Apr 2019 - 2:24 pm | यशोधरा
झकास!
2 Apr 2019 - 5:43 pm | विजुभाऊ
_/\_
2 Apr 2019 - 6:00 pm | गवि
छान चाललंय विजुभौ.. 'शाळा'च्या तोडीचं झकास लेखन.
2 Apr 2019 - 8:29 pm | अन्या बुद्धे
सुंदर! 'बखर बिम्मची' ची आठवण झाली
3 Apr 2019 - 7:25 am | सोत्रि
अतिशय सुंदर लेखमाला!
- (दोस्त) सोकाजी
12 Jun 2019 - 5:58 pm | विजुभाऊ
http://misalpav.com/node/44667
14 Jul 2020 - 8:13 pm | चौथा कोनाडा
हा ... हा ... कसलं मजेशीर !
वाह !
यवतेश्वरची सहल यानं चांगलाच उत्साह संचारलाय या भागात !
मलाही लहान झाल्यासारखं वाटलं
बाकी यवतेश्वरची आहेच सुंदर !
अतिशय सुंदर लेखमाला !