चित्रपट परिचय - जलेबी

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
24 Mar 2019 - 2:06 pm

२०१६ च्या ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालेले नसले तरी एका बंगाली चित्रपटाचा हा रिमेक आहे असे विकीपिडीयावर वाचल्याने उत्सुकतेपोटी डाउनलोड करुन मी हा चित्रपट बघितला.
चित्रपटाचे शीर्षक जलेबी असले तरी ही गोड-गोड प्रेमकथा नाही.
चित्रपटाच्या सुरवातीस नायिका आयेषा मुंबई-दिल्ली ट्रेनच्या प्रवासाला निघते.
आधीच निराश आणि वेदनेने व्याकूळ असलेल्या आयेषाला एक समवयस्क अनोळखी स्त्री अनू या प्रवासात भेटते. अखंड बडबड करणार्‍या अनूला आयेषा सुरवातीला काहीशा अनिच्छेनेच उत्तर देत असते. पण हळूहळू आयेषाचा एक समांतर प्रवास सुरु होतो .. आठवणींचा आणि वेदनेचा. वेळोवेळी वेदना अनावर होवून , उठून दरवाजात येत , डबडबत्या डोळ्यांनी आठवणींत हरवणारी आयेषा आपल्याला चित्रपटभर दिसत रहाते . आणि फ्लॅशबॅकमधून तिची कथा उलगडू लागते.
जुन्या दिल्लीतील एका जुन्या हवेलीत आपल्या आई व बहिणीसोबत राहणारा देव आणि मुंबईची आयेशा यांची ही कथा आहे. देवचे आपल्या कुटूंबावर, १५० वर्षे जुन्या हवेलीवर, जुन्या दिल्लीतील जुनाट गल्ल्यांवर प्रेम आहे. तिथल्या वातावरणातच तो रमतो. कॉलेजात इतिहास विषय शिकवण्यापेक्षा गाईड बनून लोकांसोबत इतिहास जगण्यात त्याला अधिक रस आहे ..तर आयेषा बिनधास्त आहे.. तिला लेखिका बनायचेय, जग फिरायचेय. उत्कटपणे जगणारी आयेषा देवच्या प्रेमात पडते . गल्लीतील रस्त्यात उभी राहून ओरडून खिडकीत उभ्या देवला लग्नाकरिता विचारणारी , लग्नांतर घरात चोरुन सिगरेट ओढणारी बिनधास्त आयेशा फ्लॅशबॅक मधून समोर येते.
दोन भिन्न प्रकृतीच्या व्यक्ती प्रेमात पडल्या पण एकत्र येवून सुखाने नांदू शकल्या नाहीत तर काय ? नाते संपले तर प्रेम संपते का ? या आणि अशा प्रश्नांभोवती चित्रपट फिरत रहातो.
सात वर्षापुर्वीची आयेषा काहीशी उथळ , बेजबाबदार रंगवली आहे तर आताची आयेषा निराश, व्याकूळ हृदयात वेदना घेवून आहे. सिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनवर ट्रेनचा प्रवास संपतो. सोबतच आयेषाच्या वेदनांचा प्रवासही संपतो. रुढार्थाने जरी गोड शेवट होणे (नायक -नायिकेने एकत्र येणे) शक्य नसते तरी एका असह्य मानसिक वेदनेतून आयेषाची मुक्तता होते.

चित्रपटाला बरा-वाईट-चांगला-अप्रतिम असा कोणताही शेरा देण्यापेक्षा मी इतकेच म्हणेन की आयेषाची वेदना नक्कीच हृदयास स्पर्षुन जाते , तरी भावूक प्रेमकथा ज्यांना आवडतात त्यांना आवडू शकेल असा हा चित्रपट आहे.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2019 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान ! पाहिला पाहिजे. शीर्षकावरून तर अजिबात ट्रेलर सुद्धा बघू नये असे वाटावे.

-दिलीप बिरुटे

मराठी कथालेखक's picture

24 Mar 2019 - 3:53 pm | मराठी कथालेखक

नक्कीच बघा आणि सांगा..
https://torrentcounter.to/movies/jalebi-2018-torrent/
इथे मिळेल.

श्वेता२४'s picture

24 Mar 2019 - 3:25 pm | श्वेता२४

चित्रपट चांगला असेल की महित नाही पण तुम्ही लिहले सुंदर

मराठी कथालेखक's picture

24 Mar 2019 - 3:50 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद..

कुमार१'s picture

24 Mar 2019 - 6:20 pm | कुमार१

चांगला परिचय.

मराठी कथालेखक's picture

24 Mar 2019 - 6:36 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

> २०१६ च्या ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालेले नसले तरी > २०१८ चा आहे चित्रपट. अंधाधून बघायला गेलो होतो तेव्हा याचा ट्रेलर दाखवलेला आम्हाला. बेक्कार :(.

> स्टेशनवर ट्रेनचा प्रवास संपतो. सोबतच आयेषाच्या वेदनांचा प्रवासही संपतो. रुढार्थाने जरी गोड शेवट होणे (नायक -नायिकेने एकत्र येणे) शक्य नसते तरी एका असह्य मानसिक वेदनेतून आयेषाची मुक्तता होते. > शेवट काये?

मराठी कथालेखक's picture

24 Mar 2019 - 11:58 pm | मराठी कथालेखक

२०१८ चा आहे चित्रपट.

अरे हो.. बरोबर.. पुन्हा विकीपीडिया पाहिले. २०१६ च्या बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे. ते वाचून मी चुकीचं लिहिलं. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
संपादक मंडळ कृपया दुरुस्ती करुन द्याल काय ?

बेक्कार :(.

:) चालायचंच.. तसाही हा चित्रपट अयश्स्वी ठरलाय.. अनेकांना आवडू शकेल असं मटेरियल नाहीये यात. (पण त्याचवेळी काहींना खूप जास्त आवडण्याची शक्यता आहे.. मी आजच दुसर्‍यांदा पाहिला)
ईजाजत ही काही प्रेक्षकांना आवडला नसेल..किंवा रेनकोट तर अनेकांना पकावू वाटला असेल पण विश्वास ठेवा रेनकोटचेही चाहते आहेत (किमान एक तरी:)
असो..

शेवट काये?

म्हणजे तुम्ही चित्रपट बघणार नाही आहात हे जवळपास नक्की झालंय तर ..:)
असो.. जास्त थेटपणे शेवट सांगणं योग्य होणार नाही (जरी ही रहस्यकथा वा कूटकथा नसली तरीही इतर संभाव्य प्रेक्षकांचा रसभंग होण्याची शक्यता टाळलेली बरी)
..कथानकात साधर्म्य नसले तरी जलेबीची मांडणी ईजाजतची आठवण करुन देते.. तुटलेले नाते, नंतर घडून आलेले काही योगायोग, आठवणींचा प्रवास (तिथे वेटींग रुम आहे इथे ट्रेन)...
[तुम्ही ईजाजत पाहिला असेलच असे गृहीत धरतो आहे]
काही वेळा आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तशाच असतात पण अचानक त्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. एक हृद्य अन् अर्थपुर्ण निरोप पुर्ण भावविश्व बदलू शकतो.

अधिक तपशीलात कथा माहिती करुन घ्यायची असेल तर व्यनि करु शकतो. ..पण चित्रपट बघण्याचा पर्यायही तुमच्याकडे आहेच :)

इजाजत पाहिला नाही पण रेनकोट पाहिलाय आणि आवडला.

https://m.timesofindia.com/entertainment/hindi/movie-reviews/jalebi-the-... इथे बहुतेक शेवट सांगून टाकलाय :D.
ओरिजनल बंगाली सिनेमा सहज कुठे मिळाल्यास बघण्यात येईल. हिंदीमात्र बघणार नाही.

मराठी कथालेखक's picture

25 Mar 2019 - 10:05 am | मराठी कथालेखक

ओरिजनल बंगाली सिनेमा सहज कुठे मिळाल्यास बघण्यात येईल

YouTube var आहे

मी आता काही अधून-मधून काही सेकंदांचे तुकडे बघितलेत. त्यावरुन काही ढोबळ अंदाज..
हिंदीच्या तुलनेत थोडा पांचट (खासकरुन ट्रेन मधला प्रवास - सहप्रवासी ई) वाटला
नायिका चष्मा लावून आहे... यामुळे हिंदीप्रमाणे तिचे डबडबलेले डोळे बघायला मिळत नाही.. हिंदीच्या तुलनेत भावूकता कमी प्रमाणात..
हिंदीतल्या अनूच्या तुलनेत इथलं पात्र काहीतरी विनोदी वाटलं.. असो.. काही सेकंद पळवून घेतलेला अंदाज आहे.. तुम्ही बघितला तर सांगा.

हिंदीमात्र बघणार नाही.

हं.. पण जमल्यास अनू आणि आयेषामधलं शेवटचं दृश्य तितकं बघा... शेवटच्या दहा -बारा मिनटांतच आहे.

अरेरे बंगाली सिनेमा बघायचा प्लॅनपण कॅन्सल.....

मराठी कथालेखक's picture

25 Mar 2019 - 2:12 pm | मराठी कथालेखक

मी फक्त काही सेकंदांचे काही भाग बघून जो अंदाज बांधला त्यावरुन तुम्ही ठरवताय .. :)

मिसळपाव's picture

25 Mar 2019 - 2:39 pm | मिसळपाव

पण 'ईजाजत' मात्र बघ जरूर. आणि तेही रिस्की वाटत असलं तर त्यातली गाणी तरी ऐक - सगळी एक से एक आहेत.

एमी's picture

25 Mar 2019 - 11:57 pm | एमी

मराठी कथालेखक,
मी हिंदी जलेबीचा ट्रेलर पाहिला आहे, बंगाली सिनेमा त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे न बघितलेलाच बरं :D
===

मिसळपाव,
विकीवर कथा वाचली इजाजतची.
The movie is based on the 1964 Bengali movie Jatugriha.
तसं रिस्कीच वाटतंय हा चित्रपट पाहणं कारण मी प्रेमकथा, त्रिकोण, चौकोन वगैरे शक्यतो बघत नाही. पण गुलझार दिग्दर्शक आहे म्हणजे काही सांगता येत नाही; कदाचित बघेनही. गाणी दोनच ऐकली आहेत. सामान आणि कतरा.

मराठी कथालेखक's picture

26 Mar 2019 - 1:00 pm | मराठी कथालेखक

चार गाणी आहेत आणि गायिका फक्त एक- आशा.
"खाली हाथ शाम आयी है" पण खूप अप्रतिम आहे .."छोटीसी कहानीसे" ने चित्रपट सुरु होतो.. ट्रेन, वेटींग रुम ..बाहेर पडणारा पाऊस..
इजाजत कसा बघावा.. अगदी निवांत असताना ..शक्यतो पावसाळ्यात..हातात व्हिस्कीचा पेग :)

प्राक्तन चांगला वाटला असे इथे काही लेडीजबायका सांगत आहेत https://www.maayboli.com/node/62306?page=29

तरीही मी रिस्क घेणार नाहीच :D

मराठी कथालेखक's picture

2 Apr 2019 - 5:53 pm | मराठी कथालेखक

लेडीजबायका

हे काय असते आणि :)
असो... मी घेईन ती रिस्क लवकरच.. मग पोस्ट करेन

मदनबाण's picture

2 Apr 2019 - 9:06 pm | मदनबाण

तुमच्या शब्दातुन कळलेला चित्रपट परिचय आवडला ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Arjuna Kruta Kali Stuti from Mahabharatha

मराठी कथालेखक's picture

3 Apr 2019 - 2:23 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

मराठी कथालेखक's picture

13 Apr 2019 - 5:06 pm | मराठी कथालेखक

जलेबी ज्याच्यावर बेतलेला आहे तो बंगाली चित्रपट 'प्राक्तन' मी आज पाहिला.
'रिमेक' म्हणण्यापेक्षा 'बेतलेला आहे' असे म्हणणे जास्त योग्य वाटते कारण कथेत काही महत्वपुर्ण बदल केलेले आहेत. सर्वात मुख्य म्हणजे इथे नायिकेने 'मूव्ह ऑन' केलेले आहे.. तर जलेबीतली नायिका पुर्णपणे भूतकाळात अडकून पडलेली आहे.
त्यामुळे एकूणच चित्रपटाचा मूड बदलतो.... दोन्हींमधला प्रवास हा आठवणींचा पट उलगडणारा असला तरी जलेबीमध्ये खोलवर वेदनांची अनुभूती आहे ज्यात प्रेक्षकही ओढला जातो. बाकी नायक -नायिका यांच्या व्यक्तिरेखा , स्वभाव यांतही बदल केलेले आहेत. प्राक्तनमध्ये नायकाचा हटवादीपणा , पुरुषी अहंकार , काहीशी संशयी वृत्ती दाखवली आहे. तर जलेबीतला नायक जरा जास्तच समंजस खरंतर larger than life प्रकार म्हणता येईल इतका समंजस दाखवला आहे.
दोन्ही चित्रपट आपापल्या ठिकाणी चांगले आहेत.. पण मला जलेबी जास्त भावला. प्राक्तनमधला मुंबई-हावडा हा प्रवास मोठा आहे.. चित्रपटाची लांबी ही बरीच जास्त आहे (प्राक्तन : २ तास २२ मिनटे , जलेबी - १ तास ४२ मिनटे). प्राक्तनमध्ये सहप्रवासी -खासकरुन नवपरिणीत जोडप्याचा पांचटपणा बराच भरला आहे. याउलट जलेबीमध्ये 'भावूकता' हा एकच रस ओतला आहे..त्यामुळेच प्रेमभंग झालेला सहप्रवासी गायक दाखवलाय..
प्राक्तनमधले मालिनीची भूमिका कुणा दुसर्‍या अभिनेत्रीने केली असती तर अजून जास्त परिणामकारक झाला असता.

नायक भूतकाळात अडकलेला आणि नायिका मुव्ह ऑन झालेली दाखवलंय का यात?

मराठी कथालेखक's picture

14 Apr 2019 - 12:11 am | मराठी कथालेखक

नाही.. दोघंही मूव्ह ऑन केलेलं आहे यात. दोन्ही चित्रपटांत नायिकेची वर्तमानात नायकाच्या पत्नीशी भेट होते

दोघांनीही मुव्हऑन केलं असेल तर चांगलंच आहे.

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2019 - 7:38 pm | मराठी कथालेखक

हो.. तसं म्हंटलं तर बंगाली चित्रपट वास्तवाच्या अधिक जवळ जाणारा आहे. अहंकार, मीपणा, संशय , कराव्या लागणार्‍या तडजोडी यातुन होणारे घटस्फोट यात नवीन काही नाही. असंच एक जोडपं दाखवलंय.
जलेबी जास्त नाट्यमय आहे.. पण जास्त भावूक असल्याने मला तो जास्त आवडला.. प्राक्तन जास्त पटण्यासारखा आहे :)