मैत्र - ६

Primary tabs

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
5 Mar 2019 - 7:41 pm

आजचा दिवस धावपळीचा गेला होता तरी सगळे आनंदी होतो. कॉलेजमध्ये वर्षभर होणाऱ्या स्पर्धा, उपक्रम या सगळ्या भानगडींपासून दुर रहाणाऱ्या शकीलने आज ‘वक्तृत्व स्पर्धेचा’ करंडक अनपेक्षितपणे खेचून आणला होता. हा करंडक गेला असता तर जोशीसरांचे आठवडाभर शिकवण्यात लक्ष लागले नसते. थकवा जाणवत होता तरी आम्ही नेहमीप्रमाणे शाम्याच्या ओट्यावर जमलो होतो. शाम आणि दत्ता माझी स्कुटर घेऊन सगळ्यांना कप दाखवायला गेले होते. त्यांना बराच वेळ झाला होता जाऊन, एव्हाना यायला पाहिजे होते. मी, ठोब्बा, राम, शकील सगळेच ओट्यावर बसलो होतो. आज कुणीही ओटाकट्याला दांडी मारणार नव्हताच. काकूंनी धोंड्याला मळ्यात पिटाळलं होतं केळी आणायला. म्हणजे आज मस्त केळी घातलेल्या साजुक तुपात केलेल्या शिऱ्याने ‘सेलिब्रेशन’ होणार होते. आम्ही गप्पा मारत होतो तोवर धोंडबा केळीच्या फण्या घेऊन आला. दोन आमच्याकडे दिल्या. इन्नीला हाक मारुन दोन फण्या आत पाठवल्या आणि ओरडून म्हणाला
“काकू, तुच कर गं, इन्नीला नको सांगू हां अजिबात! उगा थोड्यासाठी मजा नको जायला.”
इन्नी त्याला नाक मुरडत आत गेली. शाम आणि दत्ता दोघेही आले तेव्हढ्यात. दत्त्याने करंडक अजुनही डोक्यावरच धरला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता.
त्यांना पहाताच धोंडबा म्हणाला “काय दत्त्या, अप्पाच्या स्कुटरला झुल तरी घालायची आन चार बेगडं तरी घालायची स्वतःच्या कानात, हातात. आरं काय नाचतंय सकाळधरुन!”
“गपरं धोंडबा, तुला अडान्याला काय कळायचं वक्तृत्व काय अस्तय त्ये” म्हणत दत्त्याने करंडक ओट्यावर ठेवला. त्याला एकूनच तो करंडक कॉलेजला द्यायचा नव्हता.
“काय एक एक नाटक आस्तय या जोशीसराचं. आता कप ज्यानं जिकला त्याच्या मान्नीवर सोबन का कालेजात?” हा त्याचा सरळ प्रश्न होता.
काकूंनी शिऱ्याच्या डिश बाहेर ओट्यावरच आणुन दिल्या. इन्नीने पाण्याची कळशी आणि फुलपात्रे बाहेर आणून ठेवली आणि मुठभर स्केचपेन घेऊन माझ्या शेजारी बसली.
धोंडबा शिऱ्याचा छातीभरुन वास घेत म्हणाला “च्यायला शाम्या, काकूला सत्यनारायेन परसन्न असनार. आमची म्हतारी करती मस जीव काढून पन असा शिरा काय साधत नाय राव तिला.”
मी एक घास खाल्ला. खरच शिरा अप्रतिम झाला होता. आज तर तो जास्तच चवदार लागत होता.
इकडे इन्नीची भुनभून चालली होती “अप्पा काढू दे ना थोडी डिझाईन. थोडीच काढते. छान दिसेल.” वगैरे. मी “नाही, अजिबात नाही” लावून धरलं होतं.
शिरा कसा झालाय विचारायला काकू दारात येऊन उभ्या राहिल्या होत्या. म्हणाल्या “असं रे काय करतोस अप्पा? एवढी म्हणतेय पोर तर काढूदे की तिला काय रांगोळी काढायची ती.”
आता काकूंनीची तिची बाजू घेतल्यावर इन्नीला अजुन हुरुप आला “बघ ना आई, उगाच आगाऊपणा करतोय. डिझाईन काढायला काय परत परत हात मोडणारे का याचा?”
हे ऐकून मात्र काकू वैतागल्या “काय नतद्रष्ट कारटी आहे. घाला काय गोंधळ घालायचा तो.” म्हणत त्या आत गेल्या. धोंडबा ठसका लागेपर्यंत हसला, म्हणाला “तु काढ गं इन्ने रांगोळी. जागा कमी पडली तं आपुन त्याचा दुसरा हात मोडू उद्याच्याला. तु्ह्यासाठी अप्पा यवढं बी करायचा नाय का?”
“काहीही बोलू नको धोंडीदादा.” म्हणत इन्नीने माझा प्लॅस्टर केलेला हात हळूवार मांडीवर घेतला. एवढं होऊनही डिझाईन काढायचा हट्ट मात्र तिने सोडला नव्हता. “कर काय करायचे ते” म्हणत मी प्लॅस्टर केलेला हात तिच्या हवाली केला आणि डाव्या हाताने शिरा खायला सुरवात केली. शाम्या आत जाऊन अजून थोडा शिरा घेऊन आला. आम्ही गप्पा मारत शिरा खात होतो. मी अधून मधून इन्नीलाही एक एक घास भरवत होतो. "हलवू नको नाहीतर तुलाच दुखेल म्हणत इन्नीचे डिझाईन काढणे सुरु होते. तिने अगोदर एक छोटीशी कोयरी काढून तिच्याभोवतीने नाजूक डिझाईन रेखाटायला सुरवात केली. आता सुटका नव्हतीच.
शामने विचारले “चहा हवा काय रे थोडा? उगाच जीभेच्या शेंड्याला चटका.”
“चहा पेत्यात व्हयरं शिऱ्यावं? उगा तोंडाची चव घालवायची” म्हणत धोंडबा सगळ्यांच्या डिश घेऊन आत गेला.
चिंतूकाकांनी बाहेर येत म्हटलं “शाम, दिवाबत्ती नाही करायची का आज?”
ही “आता उठा!” अशी सुचनाच होती आम्हाला. अंधारुनही आलं होतं. प्लॅस्टरवर एक रेषाही काढायला जागा नव्हती तरी इन्नीचं मन काही भरलं नव्हतं. शेवटी उठलो. दत्ताने स्कुटरला किक मारली. त्याची सायकल माझ्या घरीच होती. ती घेऊन तो परस्पर मळ्यात जाणार होता. धोंडबानेही “गेलो रं” म्हणत सायकलवर टांग मारली.
“अप्पा, सकाळी मी आणि शाम चाललोय मुंबईला. संध्याकाळपर्यंत येऊ. दत्ता सोडवेल तुला कॉलेजला” म्हणत शकील आणि राम दोघेही निघाले. आजचा दिवस खरच फार छान गेला होता. अगदी लक्षात रहावा असा.

सकाळी दत्त्या कॉलेजला न्यायला आला आणि सायकल व्यवस्थित लाऊन प्रथम बाबांना शाळेत सोडवायला गेला. तोवर मी कपडे बदलले. बिनबाहीच्या शर्टमधून हातावरचे प्लॅस्टर फारच उठुन दिसत होतं. इन्नीने त्यावर कुयरी, मोर असली काय काय डिझाईन काढली होती. अगदी एखाद्या शालूचा पदर दिसावा तसं ते प्लॅस्टर दिसत होतं. माझी अडचण आईला कळाली. तिने बाबांची खांद्यावर घ्यायची शाल आणून तिची लांब घडी घालून ती प्लॅस्टरवर टाकली. आता माझं ध्यान एखाद्या ऐतिहासीक नाटकातल्या पात्रासारखे दिसत होते. छातीवर हात, त्यावर लटकणारी काळी शाल. काही विचारु नका. पण शालूच्या पदरापेक्षा हे जरा बरं दिसत होतं. दत्त्या बाबांना सोडून आला. अगदी तिरकी करत, एक डौलदार वळण घेत त्याने स्कुटर वळवली आणि हॉर्न वाजवायला सुरवात केली. हजारदा सांगुनही त्याची ही सवय जात नाही. एखाद्या दिवशी माझ्यासारखा गळ्यात हात बांधून घेईल तेंव्हाच त्याला अक्कल येईल. वह्या डिक्कीत टाकून मी हात सांभाळत स्कुटरवर बसलो. दहा मिनिटात दत्त्याने गाडी कॉलेजच्या आवारात आणुन उभी केली. हायस्कुलचा ड्रेस घातलेल्या मुलांमध्ये कॉलेजची रंगीबेरंगी कपडे घातलेली मुलं वेगळी दिसत होती. प्रार्थनेला वेळ होता, त्यामुळे काही मुले उगाचंच खो खो च्या मैदानावर धुळ उडवत खांबाला झोंबत होती. काही सिंगलबारला लोंबकळत होती. तरीही आज सगळ्या मैदानावर कसलीतरी मरगळ जाणवत होती. आज शकील आणि शाम येणार नव्हते कॉलेजला. कदाचित त्यामुळेही मरगळ जाणवत असावी. इतक्यात सखारामने प्रार्थनेसाठी टोल वाजवला. रोजची पध्दत ठरलेली असल्याने धुळ उडवत पाच मिनिटात व्हरांड्याकडे तोंड करुन रांगा उभ्या राहील्या. आडव्या व्हरांड्यात सरांची रांग उभी राहीली. समोर सर्व विद्यार्थी. पाचवी सहावीची मुले अगदी उत्साहाने प्रार्थनेत भाग घेत तर नववी दहावीची मुले गंभीरपणे प्रार्थनेला उभी रहात. आमचा कॉलेजचा रंगीबेरंगी कळप अगदी एका बाजूला पडल्यासारखा सगळ्यात वेगळा उभा राही. आमच्या शाळेची आणि कॉलेजची प्रार्थना अगदी साग्रसंगीत असे. प्रथम ‘स्थिरावला समाधीत, स्थितप्रज्ञ कसा असे’ ही गीताईतली स्थितप्रज्ञाची लक्षणे होत, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, पसायदान आणि मग जन गन मन होई. हे सर्व झाल्यावर आमचे मराठीचे सर एखाद्या सुविचारावर दहा मिनिट बोलत. आणि मग जो तो आपापल्या वर्गाकडे धावत असे.
आजही नेहमीप्रमाणे प्रार्थना झाली पण जोशीसर सुविचारावर बोलायच्या ऐवजी काही क्षण फक्त उभे राहीले.
मग गंभीर आवाजात म्हणाले “एक दुःखद बातमी. काल आपल्या कॉलेजचा विद्यार्थी कु. श्रीपाद बलमे याचे आकस्मीक निधन झाले आहे. ईश्वर त्याच्या कुटूंबीयांना हे दुःख सोसण्याची शक्ती देवो. आपण सगळे दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्याच्या आत्म्याला श्रध्दांजली वाहू.”
सखारामने हलक्या आवाजात टोल वाजवला. आम्ही सर्व मुलं स्तब्ध उभे राहीलो. दोन मिनिटानंतर परत टोल वाजला. सगळी मुले फारसा गोंगाट न करता वर्गाकडे वळाली. शाळेच्या गेटवर उशीरा आलेली मुलं प्रार्थना संपायची वाट पहात उभी होती. आज त्यांना ‘छडी’ न खाताच प्रवेश मिळाला.

मी कॉलेजच्या इमारतीकडे जाताना दत्त्याला विचारले “कोण रे हा बलमे? आपल्या कॉलेजमध्ये असुन मला कसा माहीत नाही?”
दत्त्या कोरडेपणाने म्हणाला “अरं ते पाटलाचं शिरप्या रे.”
मी आश्चर्याने विचारले “अरे पण शिरप्याचं आडनाव पाटील ना? मग हे बलमे काय मध्येच?”
“अरं लई बाराचं बेनं व्हतं ते. नगरमधी कुठं तरी त्यांचं गाव हाय. त्या गावची पाटीलकी व्हती म्हनं त्यांच्या खानदानीत. म्हनुन बलमे पाटील. आतरंगी व्हतं रे ते. मरुंदे ते सगळं. तू चाल.”
“अरे पण दत्ता, असं कसं अचानक. हुशार होता राव शिरप्या. जरा आगावू होता पण मन लावून अभ्यास करता तर पहिला नंबर सोडला नसता त्याने कधी. वाईट झाले रे.”
मला खरच वाईट वाटलेले पाहून दत्त्या जरा चिडला “ तू काय सुताक पाळनार हायस का त्याचं अप्पा? तुला त्याचं लिळाचरीत्र माहीत नाय म्हनून. सांगीतलं तर तू एक काय दहापन बोटं घालशील तोंडात.”
एव्हाना आम्ही वर्गापर्यंत पोहचलो होतो त्यामुळे तो विषय तेवढ्यावरच राहीला. जोशीसर आले. पण आज त्यांचेही लक्ष नसावे फारसे. कारण वर्गात आल्या आल्या फळा स्वच्छ पुसून घ्यायचा. डस्टर, खडू, पुस्तक सगळं एका रांगेत टेबलवर मांडून ठेवायचे मग मुलांकडे हसुन पाहून क्लासला सुरवात करायची ही त्यांची नेहमीची सवय. पण आज त्यांनी आल्या आल्या खुर्ची ओढली आणि बसुनच शिकवायला सुरवात केली.

शेजारच्या बाकावर शकील आणि शाम नसल्याने दत्त्याची सारखी चुळबूळ सुरु होती. सर काय शिकवतायेत याच्याकडे त्याचे लक्षच नव्हते. त्याचं सारखं चाललं होतं “अप्पा, मी जातो घरी. रानात आज मोकार काम हाय.” सरांनी त्याला दोन तिन वेळा खडू फेकून मारला तरी त्याचं “घरी जातो” सुरुच होतं अधून मधून.
सर आज जरा त्रासलेलेच होते. शेवटी चिडून म्हणाले “दत्तात्रय, काय चाललय तुझं? घरी जायचय का?
सर विचारत नसुन रागावत आहेत हे दत्त्याच्या गावीच नाही. तो उठून म्हणाला “व्हय सर, आज बायका बोलावल्यात खुरपायला.”
मी डोक्याला हात लावला. सर म्हणाले “अरे दत्ता, तू खरच भोळा आहे की मला त्रास द्यायला कोडगेपणा करतो आहेस? खाली बस आणि लक्ष दे जरा कवितेकडे.”
“व्हय सर” म्हणत दत्त्या खाली बसला आणि वहीत रेघोट्या काढीत राहीला.
माझंही फारसं लक्ष लागत नव्हतं वर्गात. शिरप्याचं फारसं दुःख झालं नव्हतं मला पण वाईट मात्र वाटत होतं. हे एक महा ईरसाल कारटं होतं आमच्या कॉलेजमधलं. प्रचंड हुशार. पण सगळी हुशारी खोड्या करण्यातच जायची. एकदा घरी वडीलांबरोबर कशावरुनतरी भांडला. वडील नेहमीच्या शिव्या घालत म्हणाले “घराच्या बाहेर पड. बघू कुणी एक दिवसतरी भाकरी वाढतय का!” यानेही “काय रोजची कटकट तुमची” म्हणत घरं सोडलं. बुवाच्या पानाच्या गादीवरुन चुना घेतला, त्यात हळद कालवली आणि त्याच्या पुड्या बनवून तालुक्याच्या गावी गेला. तेथे एसटी स्टँडवर येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बस मधे कसलंसं मलम म्हणून विकल्या दोन दिवसात. झोपलाही स्टँडवरच. दोन दिवसांनी घरी येऊन वडीलांच्या हातावर पैसे ठेवत म्हणाला “खानावळीच्या हिशोबाने हे चार महिन्याचे पैसे. बाकीचे नंतर देईन.” वडीलांनी कपाळाला हात लावला.
एकपाठी होता. वर्गात कधी वह्या घेऊन गेला नाही. कधी नापासही झाला नाही. चाचणी परीक्षा असो की वार्षीक, हा लिहिणार चाळीसच मार्कांचे. तेही अर्धा तासात. मग पेपर देऊन वर्गाच्या बाहेर.
एकदा मॅथच्या सरांनी मुलांना जरा जास्तच लेक्चर दिलं “अरे अभ्यास करा, नाहीतर हमाली करावी लागेल. आईबापाचा जरा विचार करा. पुण्या-मुंबईच्या शाळेतली मुलं बघा, कशी ८०/९० टक्के मिळवतात” हे आणि ते. शिरप्या उठला आणि वर्गाच्या बाहेर निघाला.
सरांनी विचारल्यावर म्हणाला “घरीही हेच ऐकतो, तुम्हीही तेच ऐकवा! गणित शिकवायला सुरवात केल्यावर सांगा. परत वर्गात येऊन बसेन.”
सरांना चांगलच झोंबलं. मग व्हायचं तेच झालं. सरांची आणि शिरप्याची वरात मुख्याध्यापकांच्या ऑफीसमध्ये. मुख्यध्यापकांनी सगळं ऐकून घेतल्यावर खुप प्रेमाने “बाळ श्रीपाद” अशी सुरवात करुन बराच वेळ समजावून सांगीतले.
पण शिरप्याचे तेच पालूपद “गणित शिकवायचं सोडून आमची लाज काढायला लागल्यावर कोण ऐकून घेईन? सर असले म्हणून काय झालं?”
मुख्याध्यापकही मग चिडून म्हणाले “हे बघ श्रीपाद, मी सरांना उद्याच चाचणी परीक्षा घ्यायला सांगतो. जर तुला ८० टक्के मार्क मिळाले तर उद्यापासून कोणतेच सर तुला काहीही म्हणनार नाहीत. चालेल का? नाही पडले तर मात्र हातात लिव्हींग सर्टिफिकेट ठेवीन.”
“हो चालेल” म्हणून शिरप्या बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी फक्त ‘ब’ तुकडीचीच चाचणी परीक्षा आहे हे समजल्यावर आम्हाला हा प्रकार कळला. पण एवढं होऊनही संध्याकाळी शिरप्या माळावर कबड्डी खेळायला हजर. अभ्यासाचे नाव नाही की भिती नाही. दुसऱ्या दिवशी चाचणी झाली. नेहमी प्रमाणे इतर क्लास झाले. दुसऱ्या दिवशी प्रार्थनेनंतर हा सरळ मुख्याध्यापकांच्या ऑफीसमध्ये हजर.
“सर, माझा गणिताचा पेपर?” म्हणत उभा राहीला. सरांनी ड्रॉवरमधून पेपर काढून याच्या हातात दिला. किती मार्क पडलेत वगैरे काही न पहाता हा सरळ बेफिकिरसारखा ऑफीसमधून बाहेर पडला आणि आम्ही डबलबारजवळ उभे होतो तेथे येऊन पेपर आमच्या हातात दिला. शामने घाईने पेपर ऊघडून पाहीला. पन्नास मार्कांपैकी पन्नास मार्क मिळाले होते. निदान आमच्या तरी ऐकीवात हायस्कुलच्या इतिहासात कुणी पैकीच्या पैकी मार्क मिळवलेले नव्हते. शामच्या हातातून त्याने पेपर घेतला. उभ्या उभ्या एका पायाची मांडी वर करत त्यावर घड्या घालून त्या पेपरचं विमान केलं आणि शेपटीत फुंकर मारुन हवेत उडवून निघून गेला. असा हा श्रीपाद. अमावस्येला स्मशानात जाऊन यायची पैंज लाऊन ती जींकणारा.
हा तसा आमच्या ग्रुपकडे सहसा फिरकत नसे पण गेले सहा महीने तो बराच आमच्या मागे मागे अचायचा. जास्त करुन शामच्या. त्याला कारणही तसेच होते. या शिरप्याचे आणि मुलींचे साप मुंगसाचे नाते होते. दोन फुटाजवळ जरी एखादी मुलगी आली याच्या की हा लगेच तिच्या अंगावर फिसकारणार. आम्ही एकदा असेच कॉलेजच्या बागेजवळ टाकलेल्या बाकावर गप्पा मारत बसलो होतो. हे ध्यान समोरुन आलं. हातात कसलसं पुस्तक होतं. त्यात डोकं घालून शिरप्या चालला होता. समोरुन एक मुलगी आली आणि मुद्दाम त्याला धक्का दिला. शिरप्या धडपडला. पण तो सावरायच्या आतच तिने त्याला शिव्या द्यायला सुरवात केली. “मुलींना मुद्दाम धक्के मारतो का? लाज वाटत नाही का? निर्लज्ज कुठला!” तिच्या या आकस्मिक हल्ल्याने शिरप्या बावचळला. आम्ही त्याची गम्मत पहात होतो. हसत होतो.
शाम्या चिडला “हसता काय रे. कसाही असला तरी पोरींच्या बाबतीत सरळ आहे तो.” म्हणत त्याने त्या मुलीची चांगलीच हजेरी घेतली. “काय गं हेमे, शिव्या कसल्या घालतेस त्याला? आम्ही पाहीलय सगळं. आता एक शिवी जास्तीची दिली ना भवाने तर बघ. तुझ्या वडीलांना बोलावून घ्यायला सांगतो सरांना. आगाऊ कुठली. पळ इथनं.” हेमीने काढता पाय घेतला पण शिरप्या मात्र तेंव्हापासून शामच्या गळ्यात पडला.

मी शिरप्याच्याच विचारात होतो तोच क्लास संपल्याची बेल झाली. नेहमीप्रमाणे ‘उद्याचा टॉपीक’ न सांगताच सरांनी पुस्तके उचलली आणि बाहेर पडले. दत्त्याही “मी जातो गड्या. शाम्याशिवाय काय मन लागना” म्हणत बाहेर पडला. “काय करावं या दत्त्याला?” म्हणत मीही वर्गाबाहेर पडलो. माझ्या मागे शेपटीसारखा ठोब्बाही आला. मी व्हरांड्यातच दत्त्याला थांबवलं. तिथे ठेवलेल्या बाकावर त्याला बसवत म्हणालो
“दत्त्या लेका, कशाला उगाच कॉलेज बुडवतो? दुपारपर्यंत थांब मग जा हवं तर.”
“च्यक” आवाज करत दत्त्या म्हणाला “नाय, नको. मी आपला जातो. तू बस.”
इतक्यात कसलेसे कागद घेऊन सखाराम समोरुन गेला. त्याला पहाताच दत्त्याने हाक मारली.
“ओ सखारामभाऊ, या जरा इकडं.”
सखाराम दोन पावले मागे आला आणि न बोलता दत्त्याच्या तोंडाकडे पहात उभा राहीला.
“काय रं सखा, या शिरप्याची काय भानगड हाय?” दत्त्याने विचारले.
सखारामची बुबूळे हवेत तरंगल्यासारखी फिरली. डोळे भरुन आल्यासारखे झाले. तो फक्त “काय की बुवा. जीव दिला म्हंत्यात त्यानं.” एवढंच बोलून चालायलाही लागला. या सखारामला शिरप्याच्या वडीलांनी खुपदा मदत केली होती. हायस्कुलमधेही प्युन म्हणून त्यांनीच सखाला चिकटवला होता. हे सगळं आठवून कदाचीत त्याला भरुन आलं असावं.
सखाच्या तिरसटपणाचं आश्चर्य वाटण्याऐवजी दत्त्या वेगळ्याच गोष्टींनी हैरान झाला. त्याने सकाळपासून एकदाही शिरप्याचा विचार केला नव्हता पण आता तोही गडबडला.
“हैला अप्पा, हे शिरप्या जीव देनाऱ्यातलं नव्हतं रं. म्हसनात जावून भुताच्या मानगुटीवं बसनारं हे बेनं जीव कह्याला दिन रं?”
‘मला काय माहीत’ अशा अर्थाने मी खालचा ओठ पुढे काढून खांदे उचकले फक्त.
दत्त्या स्वतःशीच बडबडावा तसं म्हणाला “पोरीची भानगड म्हनावी तं हे पोरीसोरींपासुन कासराभर दुर ऱ्हायचं. बाप रोज श्या घालायचा पन हे बापालाच काय समद्या गावाला फाट्यावं मारत हुतं. काय झालं असन रं अप्पा?”
मी म्हणालो “हे बघ दत्ता, तुझ्याबरोबर मलाही अत्ताच कळतय. तू चल वर्गात. जे असेल ते कळेलच की.”
“नाय, आता हा भुंगा डोक्यात घेवून काय वर्गात बसायचं व्हायचं नाय माझ्याच्यानी. त्यात फिजिक्सचा तास हाय. ते बेनं काय मला सुखानं शिकू देनार नाय. पन अप्पा, या शिरप्याची कायतरी मोठी भानगड असनार पघ.” म्हणत दत्त्या निघाला. ठोब्बाने माझी बाही खेचली आणि वर्गाकडे खुण केली. मीही दत्त्याचा नाद सोडून वर्गाकडे वळालो, इतक्यात शकीलच्या बुलेटचा आवाज आला. मी वळून पाहिले तर शकील गाडी स्टँडवर लावत होता आणि शाम्या मागून उगाचच गाडी ओढून मदत करत होता.
तेवढ्यात “ऐ अप्पा, दम जरा. मरुंदे ती खुरापनी. आपली जोड आली. चल वर्गात जावू.” म्हणत दत्त्यानेच मला हसत वर्गाकडे खेचले. या दत्त्याइतका मनस्वी मानूस मी पाहीला नाही. जे त्याच्या मनात येईल तेच करणार. तोवर शाम्या शकीलही येवून आम्हाला मिळाले. सर वर्गात आले होते. आम्हाला दारात पाहून “आत येवू का?” विचारायच्या अगोदरच “या!” म्हणाले.
आम्ही बेंचवर बसत असताना सर दत्त्याकडे पाहून म्हणाले “बसा दत्तात्रेया, आपल्याशिवाय एकूनच भौतिकाला काय अर्थ आहे? नाही का? बसा.”
दत्त्या खाली मान घालून कुजबुजत मला म्हणाला “पघीतलं, याच्या घरी औंदा पोतंभर गहू घालतो. झालं गप तं झालं.”
सरांनी फळ्यावर टॉपीक लिहिला.“एवढे निट वाचून ठेवा. पुढच्या क्लासला यावरच आपण चर्चा करणार आहोत. आज मिटींग आहे. दत्ता, पुढच्या क्लासला तुझ्यापासून सुरवात करणार आहे त्यामुळे निट लक्ष देऊन वाच.” म्हणत सर वर्गाबाहेर पडले. सरांच्या मागोमाग वर्गातली शांतताही बाहेर पडली.

मी विचारले “काय रे शकील, मुंबईला जाणार होतास ना? काय झाले?
“अरे निघालोच होतो. दुकानात गाडी लावायला गेलो तर गफूर म्हणाला ‘चाचांचा फोन आला होता’. तेच परसो येणार आहेत. मग इकडे गाडी वळवली.”
दत्त्या शामच्या पाठीत गुद्दा मारत म्हणाला “अरारा, हे काय आक्रीत केलं मियाभाऊ? आमच्या बामनाची खिमा रोटी हुकावली तू. तुला सोबत करायच्या नावाखाली खिमा रोटी खायला जातय हे ममईला.”
मी दत्त्याला गप्प करत म्हणालो “सुन ना शकील, आपला शिरप्या माहित आहे ना?”
“पाटलांचा ना? आपला कधीपासुन झाला तो अप्पा? येडी मा का चाँद आहे रे ते. त्याचं काय?” शकील हसून म्हणाला. शिरप्याचे नाव ऐकून शाम्यानेही आमच्या गप्पात लक्ष घातलं.
“अरे त्या येडी माँच्या चाँद ने जीव दिला.” मला ही बातमी कधी एकदा शकीलला सांगतो असं झालं होतं.
माझ्या अपेक्षेप्रमाणे शकीललाही धक्का बसला “क्यु रे! अच्छा लडका था यार. काय झालं?”
शाम्याने कान टवकारले “काय म्हणालास अप्पा? जीव दिला? कधी? का?”
“अरे मला तरी कसं माहीत असेल? काल दिला कधीतरी. सकाळी सरांनी सांगीतले तेवढेच मला माहीतेय.”
शकीलने ठोब्बाला बाहेर पिटाळले “जा वो सखाराम को बुला ठोब्बा. मेरा नाम बोल उसे।”
थोड्याच वेळात ठोब्बा सखारामला समोर घालूनच घेऊन आला. रामही पुढच्या बाकावरुन आमच्यात येऊन बसला.
शकीलने विचाराच्या अगोदरच शाम्याने विचारले “सखाराम काय झालं रे? तु गेला होतास का पाटीलकाकांकडे?”
सखाराम नुसता मख्ख सारखा बसुन होता. शकील ओरडला “सख्या, सुनाई नही देता क्या? क्या माजरा है?”
सखाराम कसंनुसं म्हणाला “देवाच्यान मला काय म्हाईत न्हाई. त्यो पुन्याला गेला आन् शनवारवाड्यावं चढून उडी मारली. आज आनत्याल त्याला गावात. यवढंच कानावं आलय माह्या.”
आम्ही आवाकच झालो. शिरप्या पुण्याला कशाला गेला? तिकडे काय झालं? सगळंच त्रांगड होतं. दत्त्या माझ्याकडे पहातोय, मी शकीलच्या तोंडाकडे पहातोय. सगळेच गोंधळलेले. वर्गात इतर मुलांचा गोंधळ सुरु होता. इतक्यात इन्नी मुलींच्या बेंचमधून पळत पळत आमच्याकडे आली. “दादा, दादा काय होतय?” म्हणत तिने शामचा खांदा हलवायला सुरवात केली तेंव्हा कुठे आमचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्याचा चेहरा अगदी पांढरा पडल्यासारखा झाला होता. डोळ्यातून अक्षरशः अश्रुधारा सुरु झाल्या होत्या. डोळे हळू हळू लाल व्हायला लागले होते.
“शनिवाारवाड्यावरुन? कसं शक्य आहे? नाही! नाही!” असं काहीसं पुटपुटत तो उठला आणि दरवाज्याकडे निघाला. चालतानाही तो अडखळत होता. त्याचे ते रुप पाहून ठोब्बा शकीलचे मनगट गच्च धरुन, घाबरुन मागे सरकला. मी तर अवाकच झालो. इन्नीने त्याला वर्गाच्या दारातच गाठलं आणि आधार दिला. दत्त्याही धावला. शकील गाडीच्या चाव्या माझ्या अंगावर फेकत म्हणाला “अप्पा, गाडी काढ. ठोब्बा पानी ला जलदी.” मी रामला सगळ्यांच्या वह्या गोळा करायला सांगीतल्या आणि शकीलबरोबरच वर्गाबाहेर पडलो.
सखाराम आमच्या या धावपळीकडे डोळे विस्फारुन पहात राहीला…

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

6 Mar 2019 - 7:34 am | आनन्दा

बापरे...

दादानु, लवकर लिवा पुढचा भाग

अनिंद्य's picture

7 Mar 2019 - 1:54 pm | अनिंद्य

नेहमीप्रमाणेच उत्तम !
प्लास्टरवर रांगोळीचे टॅटू ही जबरदस्त कल्पना आहे :-)

श्वेता२४'s picture

8 Mar 2019 - 1:16 pm | श्वेता२४

पु.भा.प्र