मंडळी
पहिलेच सांगतो की हा लेख जरासा विस्कळीत होणार आहे. समजुन घ्याल अशी अपेक्षा.
तबला शिकायला लागल्यापासुन अनेक गाणी मनात रुंजी घालत असतात, मनात विविध प्रश्न येत असतात आणि मग कधीतरी युरेका!! असा क्षण येउन त्यांची उत्तरे मिळत असतात. वेगवेगळे कायदे, ताल,मुखडे,रेले, लग्ग्या, तिहाई, उठान शिकता शिकता मी पुर्वीपासुनच ऐकत असलेली गाणी जणु पुन्हा नव्याने ऐकायला लागलो आणि एकेका संगीतकाराने, गायकाने, वादकाने काय कमाल केली आहे असे वाटुन विस्मयचकीत होउ लागलो.
जसे जसे एकेक ताल शिकत गेलो तसे तसे त्या तालांवर बेतलेली गाणी ऐकायचा छंदच लागला किंवा गाणी ऐकुन ताल ओळखायचा छंद लागला म्हणा.
आता एक धुमाळी ठेकाच घ्या. साधा धुमाळी ८ मात्रांचा
"धिन धिन | धाधा तिन|तिरकिट धिन| धागे तिरकिट" ---ह्या ८ मात्रा वेगवेगळ्या गाण्यात किती वेगवेगळ्या रुपाने आपल्या समोर येतात पहा.
बर्याच नाटकांमध्ये "पंचतुंड नर रुंड मालधर" ही नांदी गायली जाते. त्यात हा धिन धिन| धा तिन| त्रक धिन |धागे त्रक बनुन जातो तर "राजसा जवळी जरा बसा" या शृंगारीक लावणीत कत धिन| धा तिन| त्रक धिन |धागे त्रक बनतो. तेच जेव्हा नारदीय किर्तनात जय जय राsssssम कृष्ण हाsssहारी असा लांबलचक सुर लावतात तेव्हा हाच धुमाळी ईतका विलंबित होतो कि तो धुमाळी ठेका आहे असे समजुन घ्यावे लागते.
"धा गे न ती न क धिन " बोल असलेला ८ मात्रांचा केरवा हा तर हिंदी संगीतात चावुन चोथा झालेला ताल. गाईड मधले "काटो से खिंच के ये आंचल" असो कि सलमानचे "तेरे मस्त मस्त दो नैन" सारखे तद्दन बाजारु गाणे, याचे व्हेरिएशन्स सर्वत्र दिसतात. पण इतक्या पद्धतीने वाजवता येणारा आणि वेगवेगळ्या मुडच्या गाण्यांना कवेत घेणारा हा ताल आगळाच. कधी "धाधाधा ती |ता धाधाती" तर कधी "धा तिन नाना| ता तिन नाना" बनुन तो बटाट्याप्रमाणे कुठल्याही भाजीत सामावुन जातो.
"तिन तिन ना धिन ना धिन ना" बोल असलेला ७ मात्रांचा रुपक हा ही एक भन्नाट ताल. गाईडमधले "पिया तोसे नैना लागे" हे रुपक मधले एक अप्रतिम गाणे. फार कमी लोकांना माहित असेल की संतुरवादक शिवकुमार शर्मा यांनी यात तबला वाजवला आहे. मराठीत " आशा भोसले यांचे चांदणे शिंपीत जाशी" हे सुद्धा रुपकचे असेच अप्रतिम गीत. तसेच "जय शारदे वागीश्वरी" हे ऋतु हिरवा मधील गाणे. पण ईथे रुपक जुळत असला तरी त्याऐवजी "धाधिन्ना तिटकत गदीगन" वाला "तेवरा " ताल वाजवला आहे.
जाता जाता पं. सामताप्रसाद हे संगीतकार आर. डी. बर्मन यांचे गुरु. शोले मधील घोडेस्वारी पाठी वाजणारा " धिर धिर किटतक" त्यांचाच.
"तिरकिट तक ता" ह्याचीफोड करुन जे तिरकीट किटतक आणि तिटकत बनतात त्यांनी माझा बराच गोंधळ केलाउडवला होता.
लहानपणापासुन आपण सगळे आरत्या म्हणत आलोय. पण ह्या सगळ्या आरत्या "दादरा" तालावर बेतल्या आहेत हे मला फार उशिरा कळले. मग ती सुखकर्ता दुखःहर्ता असो कि अजुन कोणती आरती. पण भा.रा. तांब्यांचे अप्रतिम "तिन्हि सांजा सखे मिळाल्या" सुद्धा दादरावरच बांधले आहे. ह्याचे लता मंगेशकरांनी गायलेले बंगाली व्हर्जनसुधा खास ऐकण्यासारखे .
बारा मात्रांचा चौताल "धाधा धिनता तीटधा धिनता तिटकत गदीगन" म्हणजे लताबाईंचे गगन सदन तेजोमय हे डोक्यात एकदम फिट बसले आहे.
शेवटी अनेक गाणी अभंग आणि भजने यांना जुळणारा भजनी ठेका "धिन्ना धिन धिना तिन्ना धिन धिना" याबद्दल मी काय सांगणार? भीमसेनजींचे "माझे माहेर पंढरी" "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल " किंवा लताबाईंचे "अवचिता परिमळु" नुसते सुरु झाले की समाधी चा आनंद मिळवुन देणारा हा ठेका.
असो. मी काही यातला उस्ताद नव्हे , पण विद्यार्थी जरुर आहे. आणि तसेही भारतीय संगीतातील अशी एकेक विद्या अवगत करायला एक जन्म पुरेसा नाहिच. त्यामुळे ईथेच थांबतो. अभिप्राय जरुर कळवा.
प्रतिक्रिया
4 Mar 2019 - 8:13 pm | यशोधरा
वाह! सध्याच्या मिपा लेखांमध्ये ओअॅसिस आहे हे लिखाण! धन्यवाद! ऑडिओ देता येईल का?
5 Mar 2019 - 10:24 am | आनन्दा
ताइ क्षमा करा पण हे वाक्य पटले नाही..
https://www.misalpav.com/node/44204
https://www.misalpav.com/node/44203
https://www.misalpav.com/node/44198
https://www.misalpav.com/node/44196
https://www.misalpav.com/node/44193
https://www.misalpav.com/node/44174
हे तुम्हाला सध्याचे वातातरण म्हणाय्चे आहे का? बाकी ती राजकीय धुळवड सोडुन द्या हो, शेवटी तुम्ही आणि रामे, जयंतकाका, स्वीटटॉकर यांसारखेच लोक मिपा घडवत आहेत.
निवडणूका जवळ आल्या की धुरळा उसळायचाच, पण त्या धुरळ्यात पण मिपा आपले वेगळेपण टिकवुन आहेच ना.
राग नसावा.
5 Mar 2019 - 2:31 pm | यशोधरा
छे, राग नाही, हे धागेही छानच आहेत की. तबला जरा अधिक प्रिय आहे, इतकेच. :) एका धाग्याचे अधिक कौतुक केले म्हणजे बाकीचे धागे आवडले नाहीत असा अर्थ काढू नये.
बाकी, क्षमा केली आहे! =))
4 Mar 2019 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं लेख ! अजून विस्ताराने लिहा. आमच्यासारख्या किंचित कानसेन पण संगितात अज्ञानी असलेल्यांना थोडेसे समजेल तरी.
4 Mar 2019 - 8:53 pm | मराठी_माणूस
मस्त.
फक्त एक शंका, गाइड मधील ते गाणे "मोसे छल किये जा" होते का "पिया तोसे नैना लागे" ?
4 Mar 2019 - 9:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
पिया तोसे हेच होते, चु.भू. द्या.घ्या
5 Mar 2019 - 8:46 pm | प्रदीप
'मोसे छल' आहे. मोती लालवाणी ह्या सचिन देव बर्मनच्या एका चाहत्याने त्यांच्या अनेक सहकार्यांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या. त्यांतील पं. शिवकुमार शर्मांची मुलाखत तीन भागात आहे, व ती केवळ अप्रतिम आहे. त्यांतील दुसर्या भागाचा दुवा येथे देत आहे. त्यात सुमारे ५:५० पासून पुढे ते 'मोसे छल' विषयी सांगताहेत.
5 Mar 2019 - 2:51 am | सोन्या बागलाणकर
वाह झकास लेख!
मी स्वतः थोडाफार तबला शिकलेलो असल्याने वाचायला जास्त मजा आली.
तबल्याची खरी मजा ऐकायची असेल तर "नाचे मन मोरा" हे एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मेरी सुरत तेरी आंखें चित्रपटातील गीत अवश्य ऐकलंच पाहिजे.
पुलंच्या भाषेत "छप्पर उडवणारा" तबला त्यात ऐकायला मिळतो. जेवढा जीव ओतून रफीसाहेबानी हे गाणं गायलंय तितकाच पंडित शांता प्रसाद यांनी तबला पेटवलाय. निव्वळ थरारक!
झपताल म्हटला की मला "आवाज देके हमे तुम बुलाओ मोहब्बत में इतना ना हमको सताओ" हेच गाणं आठवतं. तसेच दादरा म्हटलं कि "अभी ना जाओ छोडकर" हे सदाबहार गीत आठवतं. तबला शिकताना सगळ्यात पहिला शिकवला जाणार ताल म्हणजे १२ मात्रांचा साधा सरळ तीनताल - "धा धीं धीं धा । धा धीं धीं धा । धा तीं तीं ता । ता धीं धीं धा" पण तो सुद्धा "मधुबन में राधिका नाचे रे" ऐकताना काय बहार आणतो.
अशी अनेक गाणी आठवणीत आहेत जसे मेरे हमसफर, मेरे पास आ - रेफ्युजी (रूपक), अब क्या मिसाल दू - आरती (केहरवा), अल्ला तेरो नाम - हम दोनो (दीपचंदी).
आता एक लेख रागांवर आधारित चित्रपटगीतांवरपण येऊ द्या.
5 Mar 2019 - 1:39 pm | राजेंद्र मेहेंदळे
मी काही रागदारीचा जाणकार नाही. त्यामुळे तो विषय सोडा. उगाच आपले थोडेफार तालाचे ज्ञान होते म्हणुन लिहिले. पण ताल आणि सुर हे वेगळे प्रकार आहेत.
5 Mar 2019 - 8:34 am | सौन्दर्य
मी देखील थोडाफार तबला शिकलो. माझा आवडता ताल म्हणजे रूपक, ह्या तालावरची बहुतेक गाणी ऐकायला फार छान वाटतात. (दिल लगाकर हम ये समझे, शुक्र तारा मंद वारा) तबला गुजरातमध्ये असताना शिकल्यामुळे तेथील गरबा ज्या तालावर वाजवला जातो तो ताल म्हणजे 'हींच' वाजवायला आवडतो. (धिन ना धीनाक, तीन ना तीनाक). एकताल देखील ऐकायला छान वाटतो. राजेंद्र मेहेंदळे साहेब म्हणतात त्याप्रमाणे गाणी ऐकून कोणता ताल वाजवला असेल हे ओळखायची सवय लागली. मेहेंदळे साहेब आणि इतर, अजून अशीच छान छान माहिती येऊ देत.
5 Mar 2019 - 9:37 am | विजुभाऊ
फारच छान लेख.
मजा आली.
टाळ बोले चिपळीला , नामाचा गजर ही भजने ऐकताना मृदंदुंगावर वाजवलेले ठेके तेच आहेत का?
5 Mar 2019 - 1:44 pm | राजेंद्र मेहेंदळे
विजुभाउ
वर तुम्ही सांगितलेल्या गाण्यांना भजनी ठेकाच असला तरी मृदुंगाचे ठेके हा पण एक वेगळा विषय आहे. मृदुंग या वाद्याला खर्ज म्हणजे बेस जास्त असतो आणि वाजवताना हाताचा पंजा (बोटे) पसरुन वाजवले जाते त्याउलट तबला ढोलकी मध्ये बोटे जवळ ठेवावी लागतात.
त्यामुळे शक्यतो पट्टीचे ढोलकीवाले मृदुंग वाजवणे टाळतात (हाताचे वळण खराब होईल म्हणुन)
5 Mar 2019 - 11:48 am | ज्ञानोबाचे पैजार
आमची प्रगती हापिसात टेबल, टिव्ही / रेडीओ समोर खुर्चीचे हात, जेवणाचे ताट किंवा न्हाणीघरात बादली वाजवण्या पर्यंत आहे, त्या मुळे तालांच्या बाबतीत पास.
वर उल्लेख केलेली गाणी परत ऐकली आणि कानांना ताल थोडा थोडा समजला.
तबल्याचा यथेच्च उपयोग केलेले अजून चित्रपट
१. झनक झनक पायल बाजे.
२. नवरंग आणि
३. बैजु बावरा
नुसता तबला (गाण्याशिवाय) ऐकायला सुध्दा अतिशय आवडते.
पैजारबुवा,
5 Mar 2019 - 2:28 pm | यशोधरा
.
मलापण.
5 Mar 2019 - 1:01 pm | विजुभाऊ
मला पेटीसारखी स्वरवाद्ये वाजवता येतात. पण तालाची खूप भीती वाटते.
पेटीवर गाणे वाजवताना त्या सोबत कोणी तालवाद्य वाजवायला लागले की मी हमखास चुकतो
ताल आत्मसात कसा करता येईल हे कोणी साम्गेल का
5 Mar 2019 - 1:54 pm | आनन्दा
माझा एक भाउ सरळ एक अॅप वापरायचा तालासाठी.
कोनते ते आठवत नाही. पण उपलब्ध आहे प्ले स्टोअर वर.
5 Mar 2019 - 8:00 pm | विनोद१८
...उपाय एकच तो म्हणजे तबला शिकणे, दुसरा कोणताही नाही. तबला शिकताना जो रियाझ केला जातो त्यानेच ताल अंगात मुरतो म्हणजेच आत्मसात होतो व तो पक्का होतो, अर्थात प्रचंड कष्ट उपसायची तयारी हवी, चिकाटी हवी. त्यासाठी उत्तम गुरूचे मार्गदर्शन आवश्यक आहे. अगदी मनापासुन आवड असेल (Passion) तर शक्य आहे.
तबला ऐकायला जितका सोपा तितकाच उत्तम प्रकारे वाजविण्यास कठिण, कालांतराने एकदा थोडा थोडा येऊ लागला म्हणजे तितकाच आनंद देणारा. प्रयत्न करुन पहा तुमच्या पेटीवादनात प्रगती होइल व तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल.
5 Mar 2019 - 8:40 pm | प्रदीप
लेख आवडला.
राजेंद्र व इतरांसारखाच मीही तबल्याचा विद्यार्थी आहे. पण मी उच्छृंखल विद्यार्थी असल्याने, सोलो वादनापेक्षा माझे लक्ष सदैव चित्रपटगीते, नाट्यगीते व भावगीतांबरोबर तबला, ढोलक, ढोलकी, खोल, संबळ, बोंगो, कांगो हे सर्व कसे वाजवले गेले आहेत, ह्याकडेच जास्त. वर्षांनूवर्षे हेच, अनेकदा ऐकत आल्याने त्यातील बारकावे थोडेफार समजू लागले आहेत, आणि लेखात राजेंद्रने नमूद केल्याप्रमाणे, अनेकदा तेव्हाच्या वादकांनी स्वःच्या रचना केल्या, स्वतः समजून, उमजून लग्ग्या लावल्या, नवे ठेके लावले, ते सर्व ऐकून त्या सर्वांचे कौतूक केल्याशिवाय राहवत नाही. ह्या विषयाचा अभ्यास करत करत जसजसा मी पुढे जाऊ लागलो, तसतसे हळूहळू, माझे लक्ष त्या साथींमधील पॅटर्न्सकडे जाऊ लागले. मग, हे कुणी वाजवले असेल, ते कुणी वाजवले असेल अशा तर्हेची शोधाशोध सुरू झाली. काही माहिती मिळाली, काही शोध अजूनही सुरूच आहेत.
नाचाच्या गीतांमधे, व विशेषतः सोलो वादक म्हणून नावाजलेला कुणी ज्येष्ठ कलाकार साथीसाठी घेतला असेल, तर तिथे त्याला तबला वाजवण्याची मुभाच दिलेली असते. तिथे तबला बहारीचा वाजणार हे उघडच आहे (उदा. 'मधुबन मे राधिका', 'लागा चुनरी मे दाग'). त्याचे कौतूक आहे, पण त्याहीपेक्षा माझे लक्ष साध्या गाण्यांतच साथ अशी केली गेली की ती गाण्यास उठाव देऊन गेली -- गाण्याला चार चाँद लावून गेली-- अशांकडे असते. अशी अनेकानेक गाणी-- विशेषतः लताबाईंची-- आहेत. त्यांतील थोडी इथे नमूद करतो.
माझ्या मते साथ अशी असावी की ती गाण्याच्या ढंगाशी अनुकूल तर पाहिजेच, पण त्याचबरोबर तिचे स्वतःचे वैशिष्ट्यही सहज उठून दिसावे. मग विवीध लग्ग्या आल्याच. तसेच गीताच्या मूडला धरून वाजवेलेल गेलेले 'उठाव' ( पॉजनंतर सुरू होतांना वाजवला गेलेला छोटा तुकडा), दोन वाक्यांमधील 'जॉईनर्स' (सांधकाम करणारे तुकडे), कधी मधेच ऑफबीट वाजवले गेलेले-- हे सर्व विशेष उल्लेखनीय. असे जेव्हा होते, ते निदान मलातरी 'नाचे मन मोरा', 'मधुबन मे राधिका' इत्यादींपेक्षा अधिक लक्षणीय वाटते.
हिंदी चित्रपट गीतांत नौशादांकडे दादरा अप्रतिम वाजला आहे व तो वाजवलाय, अब्दुल करीम ह्या कलाकाराने. हे गुलाम महम्मदचे धाकटे बंधू., स्वतः तयारीने तबला सोलो वाजवीतच. तसेच साथीसाठी तबला व ढोलकही अतिशय तयारीने वाजवीत. नौशादांच्या 'मोहे पनघट पे', 'ऐ हुस्न जरा जाग तुझे इश्क जगाए', 'याद मे तेरी याद जागते हम', 'दो सितारों का जमीपर' ह्या गाण्यांत करीमांनी बेहतरीन दादरा वाजवला आहे. नुसता ठेका दमदार आहे, लग्ग्या मोहक आहेत, पण त्यांचे उठावही भर्जरी. त्यांचा एक विशीष्ट उठाव त्यांनी ह्या सर्वच गाण्यात वाजवलेला ऐकू येईल. उदा. 'मोहे पनघट' अथवा 'दो सितारों का' ह्यांतील तबल्याची सुरूवात ऐकावी. (इथे मुद्दाम तबल्याचे बोल देणे मी टाळत आहे, ज्यायोगे तबला न समजणार्यांनाही त्याचा आनंद घेता यावा). ह्या सर्व गीतांत अधूनमधूनही, त्यांनी सुंदर जोड-तुकडे टाकले आहेत. ते अगदी सहज येतात, व चकित करून जातात. ह्याच बरोबर दादर्यातीलच, नौशांदांचेच 'बेकस पे करम कीजिए' करीमांनी काय वजनाने वाजवले आहे! अगोदर नमूद केलेल्या गीतांपे़क्षा हे गीत धीम्या लयीतील आहे. आणि ती साथ त्या गाण्याला जणू काही जोजवीतच पुढे घेऊन गेली आहे, असे मला वाटत रहाते.
करीमांनीच नौशादांकडचे काही केहेरवेही अतिशय दमदार वाजवले आहेत. उदा. 'नगरी नगरी द्वारे द्वारे', 'दिल तोडने वाले'. थोडी धीम्या लयींतील गाणी असल्याने, तबल्याचे वजन विशेष महत्वाचे ठरते.
करीमांचाच विषय निघाला आहे, तर त्यांच्या शंकर- जयकिशनकडील अतिशय तयारीने वाजवलेल्या ढोलकचा उल्लेख येणे अपरिहार्य आहे. करीमांचे ढोलकमधील बायाचे काम विलक्षण होते. ह्याचे एक उदाहरण 'मेरे सपने मे आना रे सजना' चा शेवटचा व्हायोलिनचा सोलो पीस ('कोडा') ऐकावा. तसेच 'दिन सारा गुजारा तोरे अंगना', 'झूमता मौसम मस्त महिना', 'तेरा जाना','दिल अपना और प्रीत पराई','तेरा तीर ओ बेपीर', 'तेरा जलवा जिसने देखा', 'ओ मोरा नादान बालमा' ह्यांतील ढोलकची मजा अनुभवावी. ह्यांतील 'नादान बालमा' वर एक संपूर्ण ओळ त्यांनी फक्त दायावरच वाजवली आहे. ह्याचा तेव्हा बराच बोलबाला झाला होता. 'वो चले', 'अंदाज मेरा मस्ताना' ह्यांतील लग्ग्यांचे वैविध्य ऐकून मी नेहमीच हरखून जातो. लक्ष्मी-प्यारेंच्या पहिल्याच 'पारसमणी' तील 'हंसता हुवा नूरानी चेहरा' चा ढोलक त्यांचाच! वास्तविक हे ढोलक अगदी मामुली वाद्य समजले जात होते. पण त्याला करीमांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. करीमांनंतर अनेकांनी ढोलक वाजवलेत, पण करीमांच्या ढोलक वादनांता त्यांनी कुणीही, कसलीही भर टाकलेली नाही.
मदन मोहनसाठीही काही गीतांत तबला सुंदर वाजलाय.. 'यूं हसरतों के दाग' मधील संपूर्ण एका आवर्तनावर (' घर से चले थे हम तो खुशी की तलाश मे' मधील 'हम' पासून) बाया वाजवण्याची करामत अफलातून आहे. जाणकार लोकांकडून समजले की ही साथ लालाभाउंची होती. लाला गंगावणे मूळचे तमाशातील ढोलकीवादक. त्यांना सी. रामचंद्रांनी प्रथम हिंदी चित्रपटांत वाजवण्यासाठी पाचारण केले. पण त्यांचे नाव झाले ते 'घर आया मोरा परदेसी' साठी. त्यानंतरही शंकर- जयकिशनसाठी त्यांनी काही गाण्यांवर ढोलकी वाजवली आहे ('आते जाते, पहलू मे आया कोई'). रामचंद्रांकडील 'मेरे मन का बावरा पंछी' ची ढोलकीची साथ लालाभाऊचीच. मी असे ऐकले आहे की 'ओ सजना' चा तबलाही लालाभाउंनीच वाजवला आहे. ह्यातील मूळ बंगाली गीत ऐकावे, त्यातील पचकट तबला ऐकावा व नंतर 'ओ सजना' ऐकावे. तबला एका गीतात काय 'व्हॅल्यू अॅड' करू शकतो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
दत्ताराम शंकर जयकिशनचे र्हिदम अॅरेंजर होते, व ते स्वत: उत्कृष्ट तबला व ढोलक वाजवीत. 'बात बात पे रूठो ना' मधील अंतर्याच्या तिसर्या ओळीवर ('ऑखों मे सूर्खी, दिल मे मुहब्बत, होठों पे छुपी हंसी है'))त्यांनी लावलेली लग्गी 'छप्पर फाडके' सदरातील आहे. सुप्रसिद्ध 'दत्तू ठेका' त्यांची निर्मीती. (उदा. 'वो चांद खिला, वो तारे हँसे')-- एक साधा ठेका घेऊन त्यावरील इंप्रोव्हायझेशन विलक्षण आहे. त्याचप्रमाणे शंकर जयकिशनची अनेक गीते झपतालाती आहेत, त्यांतही त्यांनी एक वेगळेच इंप्रोव्हायाझेशन केले आहे ('आवाज देके').
एकाद्या गीतांत वेगवेगळ्या अंतर्यावरील ओळींवर वेगवेगळ्या लग्ग्या वाजवल्या, व त्या गीताच्या मूडशी मिळत्याजुळत्या असल्या की मजा येते. तबल्यातील ह्याची दोन पटकन आठवतात अशी उदाहरणे म्हणजे, 'जिया ले गयो जी मोरा सांवरीया' व 'मलमली तारूण्य माझे'. ह्यांपैकी जिया ले गयो हे आद्धा अथवा सितारखानी तालातील गाणे आहे. पण त्याच्या दोन्ही अंतर्यावर, प्रत्येकी तीन- तीन लग्ग्या वाजवल्या आहेत, व त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे पहिल्या अंतर्यातील तीन लग्ग्या वेगळ्या, व दुसर्यातील तीन वेगळ्या. रीपिटेशन नाही. व हे सर्व गीताच्या मूडला धरून पुढे नेणारे. 'मलमली' संथगतीत रूपकमधे आहे, व अंतर्यावरून जेव्हा गीत मुखड्यावर येते, तेव्हा तिथे दुपटीतला केहेरवा आहे. इथेही तेच-- दोन मुखड्यांवर तीन- तीन वेगवेगळ्या लग्ग्या. 'जिया ले गयो' कुणी वाजवले मला माहिती नाही. 'मलमली तारूण्य' बहुधा अण्णा जोशींनी वाजवले असावे?
मारूतीराव कीरांनी वसंत प्रभूंसाठी जवळजवळ सर्वच गाण्यांसाठी तबला वाजवला आहे. त्याची मजा वेगळीच आहे. उदा. 'मधू मागशी माझ्या सख्या, परी' ऐकावे. केहेरव्याची लग्गी सुरू आहे, पण मध्येच अनपेक्षितपणे, ते थोडे ऑफबीट वाजवतात, ते इतक्या वर्षांनीही मला, प्रथम ऐकले तेव्हा वाटले, तितकेच मोहक वाटत आलेले आहे. तसेच 'आली हासत पहिली रात' मधील गम्मत. 'तू असता तर' ४ मात्रांत फिरणारे, व त्यांतील ठेक्याचा डौल, मधे आलेले तुकडे छान आहेत.
प्रभूंच्याच 'कन्यादान' मधील अतिशय जलग गतीचे 'कोकीळ कुहू कुहू बोले' कुणीतरी ढोलकीवर सुंदर वाजवले आहे.
लताबाईंसाठी हिंदी चित्रपटांतून अनेक संगीतकारांनी सुंदर मुजरा- गीते दिलेली आहेत. त्यांत अर्थात तबला वाजवणार्याचे कसब दिसून येते. विस्तारभयास्तव इथे फक्त त्यातील एकाच गीताचा उल्लेख करतो - 'जमाने मे अजी ऐसे कईं नादान होते है'. संगीतकाराने ते अतिशय उच्च स्वरांत गावयास लावले आहे, ते जाऊंदेत. पण त्याला काय तबलासाथ केली आहे! ती उ. निजाउद्दीन खाँसाहेबांची होती, असे ऐकून आहे.
शेवटी एका मराठी गीतातील तबलासाथीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'श्रावणात घननिळा बरसला' हे काव्यच मुळात तरल आहे, त्याची संगीतरचना, अॅरेंजमेण्ट व गायन अतिशय अप्रतिम आहे, आणि त्यातील मारूतरावांची तबलसाथ तर, जीव ओवाळून टाकावा अशी आहे. सर्वत्र मुलायम ठेका आहे, पण मला त्यांतील सर्वात भावले ते, त्यांनी दोन वाक्यांमधील पॉजमधे लावलेले नजाकतदार तुकडे. ('जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी'... ही ओळ दोनदा येते, त्या दोन रीपीटेशन्समधील छोटासा पॉज आहे तिथे असा एक तुकडा आला आहे). हे आहे, 'दोन बोटांचे वाजवणे'- केवळ अप्रतिम.
(वर दिलेल्या गीतांतील तबल्या/ढोलक/ढोलकींच्या गीतांचा आनंद उपभोगायाचा असेल तर हेडफोन, किंवा कमीतकमी ईयरप्लग वापरून ऐकावे.
'आठवणीतील गाणी'च्या दुव्यांतील गीते ऐकण्यासाठी तिथे दिलेल्या दुव्यावर टिचकी मारून फ्लॅश 'एनॅबल' करावा लागेल. हे वेबवरच होऊ शकेल).
5 Mar 2019 - 9:19 pm | यशोधरा
वा! सुरेख प्रतिसाद!
5 Mar 2019 - 9:56 pm | विनोद१८
....लता मंगेशकरांच्या मधुर स्वरातील अमर गीतांचा नजराणा सादर केला आहे, पै. गुलाम महम्मद यांनी. त्यामधील गाण्यांना तबल्याची साथसुद्धा त्यांचीच
( अपवाद फक्त एका गाण्याचा :- चलते चलते मुझे कोइ ले गया था, या गाण्याला साथ होती 'पै. उस्ताद निझामुद्दीन खा साहेबांची असे ऐकले आहे ).
पाकिझामधली सर्वच्या सर्व गाणी कशी आहेत हे मी इथे लिहायची गरज नाही, सर्वांगाने उत्तम लताबाईंचा स्वर, मजरुह सुलतानपुरींचे उर्दू काव्य, पै. गुलाम महम्मद व नौशाद यांचे संगीत सगळेच अप्रतिम. यातील तबला तर अतिशय श्रवणीय https://www.youtube.com/watch?v=PmbcRCCInf4. बारकाईने तबला ऐकण्यासाठी हेडफोन असेल तर उत्तमच.
5 Mar 2019 - 10:10 pm | विनोद१८
'चलते चलते मुझे कोइ ले गया था' याऐवजी "थाडे रहियो ओ बाके यार रे" हे एकच गाणे पै. उस्ताद निझामुद्दीन खा साहेबांनी वाजविले आहे.
6 Mar 2019 - 3:24 am | सोन्या बागलाणकर
मला वाटतं प्रदीपभाऊ तुम्हीच एक फर्मास लेख टाका विस्ताराने. तुम्ही दिलेली सगळीच गाणी आणि त्यातील तबल्याची साथ सुंदर आहे.
जाता जाता, सी रामचंद्र यांनी बहुतेक बऱ्याच गाण्यांमध्ये तबल्याचा सुरेख वापर करून घेतलाय.
असे एक आठवणारे गाणे म्हणजे यास्मिन चित्रपटातील बेचैन नजर बेताब जिगर या गाण्यात मेंडोलिनच्या बरोबर जो तबल्याचा तुकडा आहे त्याला पाय थिरकलेच पाहिजेत, अन्यथा तुम्हाला खुशाल लकवा मारलाय असा समजावं.
मला वाटते या बाकीच्या संगीतकारांबरोबरच ओ पी नय्यर या माणसानेही तबला, ढोलकी आणि एकंदरीतच चर्मवाद्यांना एका वेगळ्याच स्थानावर नेऊन ठेवलं ज्यामुळे ही गाणी आजही एवढी फुल ऑफ एनर्जी वाटतात.
6 Mar 2019 - 8:17 am | सौन्दर्य
प्रदीप जी, अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. ह्यात वर्णिलेले एक एक गाणं ऐकणे म्हणजे जणू पर्वणीच. ह्यातील सगळी गाणी जरी आधी बऱ्याच वेळा ऐकली असली तरी ह्या माहितीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा (एकदाच का अनेकदा) ऐकीन.
हा आनंद दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
6 Mar 2019 - 12:57 pm | अभ्या..
जबरदस्त लिंकसमृद्ध प्रतिसाद प्रदीप दादाचा.
अभ्यास अभ्यास अभ्यास
6 Mar 2019 - 4:09 pm | राजेंद्र मेहेंदळे
अतिशय अभ्यासपुर्ण प्रतिसाद!!
आपला प्रतिसाद वाचुन पुन्हा एकदा ही सगळी गाणी ऐकायची ईच्छा झाली. तसेच स्वतःच्या तोकड्या ज्ञानाचीसुद्धा जाणीव झाली.
असो, अजुन खुप पल्ला गाठायचा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. पण मिपावर माझ्याप्रमाणेच अनेक कानसेन आहेत हे पाहुन जास्त हुरुप आला.
7 Mar 2019 - 7:07 pm | प्रदीप
छे, छे! असे काही नाही. आपण सगळेच विद्यार्थी आहोत. गेल्या काही वर्षांत हा 'रिसर्च' करण्यास मला भरपूर वेळ मिळाला. तेव्हा ह्या चित्रपट संगीताच्या बाबतीत, सध्यातरी- मी तुमच्यापेक्षा जास्त वेळ घालवलाय, इतकाच काय तो फरक.
पण तुमचा सहज, अंतर्मनातून आलेला विनय अतिशय आवडला. कलाकाराने(च नव्हे, तर सर्बच क्षेत्रात) विनयी असले पाहिहे, आणि तसे तुम्ही आहात. तुमच्या तबला-वादनाविषयी मनःपूर्वक शुभेच्छा !
7 Mar 2019 - 3:29 pm | नंदन
लेख वाचत असतानाच यावर प्रदीपदांचा प्रतिसाद यायला हवा, असं वाटत होतं. संग्राह्य लेख आणि त्याहूनही संग्राह्य असा प्रतिसाद!
तंतोतंत!
(किंचित फरकाने, लताबाईंच्या गायनशैलीलाही ही वाक्यं लागू व्हावीत. हा अभेद अनपेक्षित नसला, तरी विलक्षण आहे.)
अवांतरः दत्ताराम यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणार्या डीव्हीडीतला काही भागः
7 Mar 2019 - 7:13 pm | प्रदीप
-- अगदी खरे! ते तिचे, तयारीच्या दृष्टीने सहज शक्य असूनही तानबाजी न करता, शब्द, त्यांचे अर्थ, अतिशय सहजपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे, व गाण्यात स्वतःची व्हॅल्यू अॅड करणे..... सगळे विलक्षण होते.
7 Mar 2019 - 7:37 pm | प्रदीप
एका गाण्याचा, तालाच्या संदर्भात उल्लेख करायचा राहिला. माझ्या निरीक्षणाप्रमाणे, तालाला इतके कठीण गीत मराठी, व हिंदी चित्रपट संगीतात दुसरे कुठलेच नाही. 'कोई मेरे माथे की बिंदीया..' हे गीत लताबाईंनी लक्ष्मी- प्यारेसाठी गायिले आहे.
मुखडा सरळ आहे, पण चालीचे व शब्दांचे, तालाच्या संदर्भातले चलन, अंतर्यात, चक्रावून टाकणारे आहे. माझ्या मते मुखडा व अंतरे दोन्हीही ५ मात्रांच्या आवर्तनांत आहेत. पण एका मुलाखतीत प्यारेलालांनी 'हे गीत आम्ही अकरा मात्रांत बसवले आहे' असे म्हटले होते, ते मला पटत नाही. जाणकारांनी त्यांची मते द्यावीत.
7 Mar 2019 - 10:34 pm | विनोद१८
हे गाणे तालाला तसे कठीण वाटत नाही, 'रुपक'च्या अंगाने ह्या ५ मात्रा वाजविल्यात असे कानाला वाटते परंतु ते फसवे आहे प्रत्यक्षात तो रुपकच आहे फक्त ५ मात्रांवर पंचेस दिलेत व बाकीच्या २ मात्रा सायलेंट वाटताहेत त्यामुळेच तो पॉझ घेतल्याचा भास होतोय.
हिंदी चित्रपट संगीतात असे अनेक प्रयोग केले गेलेत तालाचे / ठेक्याचे. जुन्या शा. संगीतावर आधारीत गाण्यांबरोबर बहुतेकवेळा पुर्ण ठेके जसे त्रिताल, आधा, एकताल, दादरा, केरवा, खेमटा इत्यादी अनेक इतर ताल वेगवेगळ्या चलनात / वजनात वाजविले गेले आहेत व अशा पद्ध्तीच्या गाण्यांबरोबर म्हणजे आड्तालाच्या गाण्यांबरोबार हे असे लहान लहान मात्रांचे नवनिर्मीत ताल किंवा वेगवेगल्या प्रादेशिक लोकसंगीतालील पारंपारीक ताल व ठेके वापरले गेले आहेत व हिंदी चित्रपट संगीताची श्रीमंती वाढ्विली आहे.
10 Mar 2019 - 5:28 pm | प्रदीप
हे समजले नाही. तुमच्याकडून समजून घेण्यास आवडेल. व्यनि करतोय.
10 Mar 2019 - 11:31 am | राजेंद्र मेहेंदळे
<<'कोकीळ कुहू कुहू बोले' कुणीतरी ढोलकीवर सुंदर वाजवले आहे.>
माझे गुरु पं. विठ्ठल क्षीरसागर यांना गाणे ऐकविले. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या गाण्यात अण्णा जोशी यांनी तबल्यावर आणि सत्तार (अब्दुल करीम?) यांनी ढोलकवर साथ केली आहे. ढोलकी नाहिये ईथे कुठेच.
अण्णा जोशींची खासियत धागेनती नकधिन- धाधाधा - को कीळ कुहु कुहु बोले ईथे जाणवते ईति सर.
रच्याकने मलमली तारुण्य माझे स्वतः सरांनी वाजवले आहे. तसेच पिंजराची काहि गाणी सुद्धा
10 Mar 2019 - 11:32 am | राजेंद्र मेहेंदळे
कोकिळ कुहु कुहु बोले साठी हा प्रतिसाद प्रदीप यांना होता, चुकुन जागा बदलली.
10 Mar 2019 - 5:35 pm | प्रदीप
त्या गाण्यात जी दायावरची थाप वारंवार येते, ती मला ढोलकीची आहे असे सतत वाटत राहिले.
सत्तार म्हणजे अब्दुल करीम नव्हेत. सत्तार हेही एक तेव्हाच्या ढोलक वादकांमधील विशेष नाव होते, नय्यरच्या सगळ्या गीतांना त्यांनी ढोलक वाजवलाय. असे वाचले होते, की ते नय्यरांचे 'सिटींग म्युझिशियन' होते (म्हणजे, चाल ठरवतांना, त्यातील बारकावे वगैरे निश्चीत केले जातात,त्यावेळे संगीतकाराचे काही ठराविक वादक तिथे असतात, तेही त्या प्रोसेसमधे भाग घेतात). ह्या सत्तारांनी लालाभाऊंबरोबर लाला-सत्तार ह्या नावाने काही चित्रपटांना स्वतंत्रपणे संगीतही दिले आहे.
10 Mar 2019 - 5:38 pm | प्रदीप
पं. विठ्ठल क्षीरसागरांनी वाजवले आहे, ही माहिती उपयुक्त आहे. काय वाजवलेय!!
त्यांनी वाजवलेल्या इतर मराठी- हिंदी- (इतर भाषिक) चित्रपटगीतांविषयी आता औत्सुक्य आहे.
18 Mar 2019 - 4:01 pm | चौकटराजा
मी एका कार्यक्रमा दरम्यान विठ्ठल क्षीरसागरांना फार पूर्वी भेटलो होतो त्यावेळी ते सुधीर फडके यान्चे ठरलेले तबलिये होते असे समजले.
6 Mar 2019 - 12:32 pm | स्वधर्म
इथे खूप जाणकारांनी अनेक गाणी अन त्यातल्या ठेक्यांविषयी सांगितले अाहे. मला वसंतराव देशपांडे यांच्या बगळ्यांची माळ फुले या गाण्यातला तबला अतिशय अावडतो. ताल अाणि सम पटकन सापडत नाही, कारण मी जाणकार नाही. पण हा कोणता ठेका अाहे? गाणे इथे ऐका.
6 Mar 2019 - 3:56 pm | विनोद१८
दादरा ताल म्हणतात त्याला.
7 Mar 2019 - 1:34 pm | स्वधर्म
.
7 Mar 2019 - 2:45 am | सोन्या बागलाणकर
जाता जाता, स्वतः डॉक्टर वसंतराव देशपांडे हे उत्तम दर्जाचे तबला वादक, हार्मोनियम आणि ऑर्गनवादक होते.
6 Mar 2019 - 12:58 pm | अभ्या..
मेहेंदळे साहेब, छंद जोपासताय आनंदाने, भारी वाटले.
किपीटप
10 Mar 2019 - 11:24 am | राजेंद्र मेहेंदळे
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!!
7 Mar 2019 - 1:15 pm | चौकटराजा
तबला ... काही तालांची गंमत या लेखाचा संदर्भ देऊन मला असलेली काही माहिती देत आहे.
तबला हे एका वाद्य आहे . त्याला अवनद्ध वाद्य गटात गणले जाते. म्हणजे आईच्या भाषे त पर्कषन इंस्ट्रुमेन्ट .तबला एक वाद्य आहे पण ताल व लय या संकल्पना वाद्य निरपेक्ष आहेत याचा अर्थ दादरा हा ताल ड्रमसेट , तुंबा , मादल ई वर ही वाजवता येतो . पण त्या वाद्यावर शिकताना त्यातून जे बोल येतात ते तबल्यापेक्षा वेगळे असू शकतात . ताल म्हणजे एका ठराविक कालांतराने संपणारी एक चौकट .त्या चौकटीत गाणे भरले जाते. लय हे आणखी एक परिमाण आहे जे तालाचे अधिक वर्णन करते. गीतातील रसाशी लयीचा अधिक संबंध असतो . साधारणपणे अति संथ लय ही शास्त्रीय संगीताचा पूर्वार्ध पेश करण्यासाठी वापरतात . त्यास " ठाय" लय म्हणायाची पद्धत आहे. सुगम संगीतात ही ठाय वापरली जात नाही . यापेक्षा थोडी जलद लय वापरली जाते. गंभीर व उदास भाव असेल तर अशी लय परिणाम कारक ठरते. उदा. " अर्थ शून्या भासे मज हा कलह जीवनांचा " हे नाट्यगीत . त्याला संथ लय आहे.
या उलट अयोग्य लय वापरल्यास गाणे कसे फसते याचे उदा . नौशाद यांचे " दो हंसोका जोडा बिछड गयो रे " यात मध्य लय दादरा वापरला आहे. सिनेमा पाहताना पडद्यावर खिन्न झालेली नायका पाहताना लोक मात्र मस्त टाळीवर ताल धरून गीत " एन्जॉय " करीत असतात .असो .
जगातील सर्व तालामध्ये तीन एकके व दोन एकके असे मूलभूत भाग आहेत . त्यात अनेक मिश्रणे होऊन नवे नवे ताल तयार होतात . आपल्याकडील दादरा व वेस्टर्न मधील वाल्ट्झ हे तीन एककांच्या तालाचे उदाहरण आहे . तसेच आपलया येथील कहरवा हा दोन एकाकाच्य तालाचे उदाहरणं आहे. त्यांच्यकडील मार्च , पोलका ,रॉक हे त्यास समान ताल आहेत .
तीन व दोन एकाकाचे संकर करून आपलयाकडे , दीपचंदी,( १४ मात्रा ) रूपक ,( ७ मात्रा ) झपाताल ( १० मात्रा )हे बनविले आहेत.
ताल , लय , बोल व वाद्य हे सर्व वेगळे आहेत .तबला म्हटले की आपल्या मुख्य हाताने वाजविला जातो जो सहसा लाकडाचा बनलेला असतो तो तबला . जो उप हाताने वाजतो ,जो धातूचा बनलेला असतो तो डग्गा .दोन्ही बाबतीत कातडे घट्ट बसविलेले असते व त्यावर विशिष्ट जागी खुलला किंवा घट्ट आघात केला की वेगवेगळे बोल त्यातून उमटतात .डग्ग्यावर घासकाम करून आसयुक्त बोल निर्माण केला जातो. जसा " नाचे मन मोरा " या गीतात तिक धा धिं ...... वाजविताना केला आहे.
ताल जसा महत्वाचा तसे ठेका व वजन या दोन संकल्पनाही समजून घेणे आवश्यक असते. फिल्म संगीतात अगदी उच्छाद मांडलेला ताल म्हणजे " कहरवा " . पण यात अनेक ठेके व वजने आहेत. मूळ गीत ज्या वजनात वाजविलेले आहे त्याच वजनात आपण वाजविले तरच मूळ गाण्याचा मजा घेता येतो.
फिल्म संगीतात आवर्तनास सोपा असा दुसरा ताल म्हणजे दादरा . तीन व तीन असे भाग असलेला हा ताल . कहिरव्या प्रमाणेच लोकसंगीतात ठाण मांडून बसलेला आहे.
फिल्म संगीत,भाव गीत व उपशास्त्रीय संगीतात ( ठुमरी , दादरा गजल,, टपपा , कववाली ई. ) तीन ताल ( १६ मात्रा ) एकताल (१२ मात्रा ) असे मोठ्या आवर्तनाचे ताल कमी प्रमाणात वापारले जातात.
फिल्म संगीतात अनेक संगीतकारांनी अनेक प्रकारे कहरवा या तालाचा उपयोग केला आहे .या ताला इतका वैविध्य पूर्ण ताल दुसरा नाही ! त्याचे मूळ बोल आहेत " धागे .. नातीं .. नक .. धिं " . पण यात हरेक बोलाला वेगवेगळे वजन देऊन अनेक प्रकार निर्माण झाले आहेत .
खालील उदाहरणे पहा ..
१. मस्ती भरा है समाँ ... इस दुनियामे जिना हो तो ... याला दत्ताराम ठेका म्हणतात .. मराठीत .. शपथ या बोटांची हे गीत .
२. वो हंसके मिले हमसे .... तुकडे है मेरे दिल के ... ओ पी च्या गीतातील एक विशेष वजनाचा कहरावा .
३. कोई नही फिर भी है मूझको क्या जाने किसका इंतजार ..... एल पी ची कमाल ..
४. बागोमे बहार आयी .. एल पी नी वापरलेला अगदी साधा कहरावा .. या वजनात . काली घंटा छायी प्रेम रितू आयी हे ही त्यांचे गीत.
५. ये दिल लेकर नजराना ,,,, तुम सबसे हंसी हो ..... ओ पी चा भांगडा कहरवा.
६. इस मोडपे जाते है....... धागे धिं धागे तिरकिट .. ताके तीन ता के तिरकिट .. पंचम ( आर डी बर्मन ) .
७. टूटे हुवे ख्वाबोने ... तसवीर बनाता हुं .. या कहरव्यात धागे या बोलात धा लांबवुन गे हा नतीं ला जोडला जातो. केवळ फक्त डग्गा घेऊन त्यावर नाणे वाजवून तबल्याचे काम केले जाते असे गाणे आपण ऐकले असेल.
दादरा हा ताल ,खेमटा ( दांडिया वाला ), तसेच गोवन संगीतात वापरला जाणारा एक स्पॅनिश ताल एका सारखे आहेत . निरनिराळ्या लयी वापरून त्याची लज्जत घेतली गेली आहे. कोहिनूर मधील " दो सितारोंका जमीपर है मिलन आज की रात " मधील लडिवाळ दादरा आपले कान तृप्त करतो . मेरा मन तेरा प्यासा ( एस डी ), दिल की आवाज भी सून ( ओ पी ) ही अगदी साध्या दादर्याची काही उदाहरणे .तर भोली सुरत दिल के खोटे, राधा ना बोले, शाम ढले खिडकी तले ही खेमटा ची उदाहरणे.
ज्या तालाचा ओ पी नय्यर यांनी मोठा वापर केला तो एका ताल म्हणजे दीपचंदी पण हा ताल फिल्म मध्ये ७ मात्रानीच वापरला गेला आहे . तरीही तो रूपक ताल पेक्षा भिन्न आहे.
दीपचंदी वानगी दाखल उदाहरणे ..
१. साजन की गलिया छोड चले .२. आज कोई प्यार से, ३. इशारो इशारोमे दिल लेने वाले ३. अजी रूठकर अब कहा जाइयेगा ई.
रूपक.
१. घर आजा घिर आये ( आर डी ) २. तुम गगनाके चंद्रमा ( एल पी) ३. पिया तो से नैना लगे रे ( एस डी ) . ४. ओ बसंती पवन पागल ( शन्कर जय ).५. मेरा जीवन कोरा कागज ( कल्याणजी ), ६. तेरे मंदिरका दीपक ( पंकज मलीक ) ई ई ई अनेक .
एकताल ... १. पवन दिवानी एस डी )२. केतकी गुलाब जुही ( शंकर जय ).
तीन ताल -- हा १६ मात्राचा चार मात्राचे चार भाग असलेला ताल पण त्यात अद्वधा तीनताल नावाचा प्रकार आहे.
तीन तालाची उदहरणे .. १. जाओ रे जोगे तुम जाओ रे ... २. देखो बिजली डोले बिन बादलकी ३ मधुबनमे राधिका ४. संग गा गुन गुना ५ सावरे सावरे
अद्धा ची उदाहरणे १. झनक झनक तोरे बाजे पायलिया ( मेरे हुजूर ) २. रूप नगरेकी कुंवारी तरसे पिया आ ( संबंध )
झपताल . दहा मात्रांचा हा ताल फिल्म संगीतात कमी वापरला गेला आहे.
१. आवाज दे के हमे तुम बुलाओ ( शंकर जय ) २. आसू भारी ये जीवनकी राहे ( दत्ताराम ) ३. सवेरेका सूरज ( ओ पी नय्यर ). बाकी भजनी हा ताल असलेली अनेक गीते फिल्म मध्ये आहेत.
7 Mar 2019 - 1:21 pm | पुष्कर
सावर रे उंच उंच झुला - या गाण्याचा ताल भन्नाट आहे. त्यात ३-४ ताल वापरले असून सुद्धा एकातून दुसर्या तालात इतक्या बेमालूमपणे चाल सरकते की काही पत्ता लागत नाही! गाण्याच्या सुरुवातीला सावर रे सावर रे- ५/५ मात्रांचे खंड वाटतात. त्यानंतर उंच उंच झुला पासून सरळ सरळ ८ मात्रांचा जलद केरवा सुरू होतो. आणि शेवटी 'सांगू कसे तुला' ला तिहाई की कायशी घेऊन परत ५ मात्रांवर येतात. पुढे कडवे सुरु होण्याआधी जी धुन वाजते त्यात कुठेतरी दादरा सुरू होतो आणि सगळी कडवी ६-६ मात्रांच्या दादर्यात आहेत. त्यांच्या शेवटच्या ओळीतसुद्धा ६ ते ५ ट्रांझिशन होते! "हृदयनाथ मंगेशकरांना आवरा!" असं म्हणावंसं वाटतं. अस्ल्या प्रचंड अवघड, पण ऐकायला अतिशय मधुर अश्या चाली तेच करू जाणे.
18 Mar 2019 - 6:58 pm | अजय देशपांडे
हे गाणे खूप छान आहे खूप छान निरीक्षण आहे तुमचे
7 Mar 2019 - 2:33 pm | यशोधरा
चौराकाका, पुष्कर मस्तच लिहिले दोघांनी. ह्या धाग्यावर खूप माहिती जमणारसे दिसते. मस्तच. वाखू साठवते.
7 Mar 2019 - 2:54 pm | राजेंद्र मेहेंदळे
प्रतिसाद समजायला २-२ वेळा वाचायला लागत आहेत. काय एकेक विद्वान मंडळी!! भारीच!!
7 Mar 2019 - 5:11 pm | चौकटराजा
नुकताच मी कॅसिओ चा ९००० आय एन हा कीबोर्ड विकत घेतला आहे. सदर कीबोर्ड एक गजब चीज आहे. त्यांत ८०० वाद्ये , २५० ताल त्यांनी दिलेले आहेत. या खेरीज आपल्याला आपले स्वतः:चे असे १०० ताल व १०० वाद्ये तयार करता येतात. त्यासाठी कचचा माल म्हणजे त्यांनी दिलेले ताल.
आता त्यांनी भारतीय ताल व भारतीय वाद्ये यांचे संच दिले आहेत. भारतीय ड्रम विभागात डमरू ,ढोल,, ताशा ,झान्झ,,डफ, तबला , ढोलक पखवाज , घटम ,मादल ,नगारा अशा वाद्यांचे बोल दिले आहेत. मी त्याचा वापर करून आपला धत्तड ततड वाजवून पाहिला . या की बोर्डाशी माझा परिचय फक्त एका महिन्याचा आहे . त्यांनी दिलेला दादरा समजा धा धिं धा , धा तीन ना असा असेल तर मला धाधा धिं तिरकिट , ताता तीन तिरकिट असा दादरा तयार करायचा आहे. पाहू या कसे जमते ते !
8 Mar 2019 - 9:31 am | विजुभाऊ
उत्सव या चित्रपटातील" मेरे मन बाजा म्रुदंग" हे एक गाणे
.https://youtu.be/WbX8o6GKv-g चित्रपटात ते जवळजवळ दाखवलेलेच नाहिये. त्यामुळे ते फारसे ज्ञात नाहिय्ये.
संपूर्ण गाण्यात ढोल ताशे , मृदंग , नादस्वरम , सुंदरी ,घटम अशी शुद्ध भारतीय वाद्ये वापरली आहेत.
यातील कोरस हा देखील वेगळाच.
मोठ्या स्पीकरवर ऐकताना एक विलक्षण अनुभव देते हे गाणे.
रेकॉर्ड करताना हल्ल्ली वेगवेगळे ट्रॅक वापरतात तसे त्या काळी नव्हते.
हे गाणे खरेच खूप अवघड आहे तालाला, आणि हार्मनीला देखील.
8 Mar 2019 - 3:34 pm | माझीही शॅम्पेन
लेख अन प्रतिसाद वाचून भूतकाळात रमलो !!
एकेकाळी मी भन्नाट सोलो तबला वादन करीत असे , सगळ्याबरोबर परीक्षा देऊन उत्तम मार्क्स वैगरे काढले होते , पण साथीला वाजवायची नेहमीच बोंब होती आणि आज आहे , गाण्याची ठेका ऐकून आजहि कुठला ताल हे नक्की उमगत नाही ,नक्की काय उपाय करता येईल , साध्य ढोलकी पण शिकायचा प्लॅन आहे , ठाण्यात कोणी आहे का विकांताला शिकवणारा ?
13 Mar 2019 - 3:34 pm | nanaba
आवडला. खूप कळत नाही ह्या विषयातले, पण वाचून मजा आली.
13 Mar 2019 - 5:44 pm | राजेंद्र मेहेंदळे
५० पूर्ण
12 May 2022 - 12:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
पं. शिवकुमार शर्मा यांचा उल्लेख "मोसे छल किये जाय" या गाण्याच्या निमित्ताने या लेखात आला आहे. मुळचे तबलावादक असलेले पंडीतजी नंतर संतुर या वाद्याकडे वळले आणि त्यात त्यांनी नुसतीच हुकुमत मिळवली नाही तर अनेक सुधारणा केल्या आणि संतुर हे स्वतंत्र वाद्य म्हणुन जगभर पोचवले. पं.हरीप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरीने "शिव-हरी " या नावाने अनेक चित्रपटांना संगीतही दिले. तबल्याच्या काठिण्यापातळीची कल्पना यावी म्हणुन मोसे छल गाण्याची लिंक देत आहे(पंडीतजींनी यापेक्षा सरस वाजवले आहे, पण यातुन हाताच्या हालचाली समजतील म्हणुन)
https://www.youtube.com/watch?v=Lzw_cn2hfCE
पंडीतजींना श्रद्धांजली!!