आंबट-गोड आठवणिंच्या चिंचा

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
21 Feb 2019 - 1:38 pm

उरण येथे असलेल्या माझ्या माहेरच्या वाडीत ४-५ मोठ मोठी चिंचेची झाड होती. प्रत्येक चिंच वेगवेगळ्या गुणांनी भरलेली. साधारण तीन प्रकार असायचे. एक अतिशय आंबट एक एकदम गोड तर एक जात आंबट गोड. चिंचेची झाडे दिसायलाही हिरवी गर्द खाली भरपूर सावली देणारी.

आमच्या वाडीत राबाच्या शेतावर (म्हणजे तांदुळाचे रोप करण्यापूर्वी पाला टाकून भाजून घ्यायचे शेत) एक उंच बांध होता त्यावर एक अशीच मोठी चिंच होती. ह्या चिंचाही मोठ्या आकोड्याच्या होत्या. अजूनही आठवणीने तोंडाला पाणी सुटत. पाऊस गेला जमीन सुकू लागली की ह्या चिंचेखालच्या बांधाची साफसफाई व्हायची. मग ह्या झाडाखाली गोणता अंथरून अभ्यासाला बसायला मला आवडायचं. हवी हवीशी गार वार्‍याची झुळुक हलणार्‍या हिरव्या फांद्यांतून जणू माझ्यावर पंखा फिरवायची. ह्या झाडाची चिंच पिकल्यावर खूप गोड लागे. पिकलेल्या चिंचा पडायची मी वाटच पाहत असायची. पडली रे पडली की सोलून ती चॉकलेटी रसाळ, गोड चिंच तोंडात चघळत चघळत खाणे म्हणजे अहाहा. त्यात गाभोळलेली म्हणजे कच्ची नाही आणि चॉकलेटी झालेली नाही अशी हिरवीच पण पिकायला आलेली अशी मऊ झालेली हिरवी चिंच पडलेली मिळाली की मनातल्या गुदगुल्या जिभेवर यायच्या. ही पिकलेली चिंच इतकी गोड असायची की त्यामुळे तिला तिखट जेवणात वापरता येत नसे. मग ही अशीच शेजार्‍यांना, नातेवाइकांना वाटून जायची.

एक चिंच आमच्या घराच्या शेजारी होती. ती आंबट गोड, आकारमानाने लहान पण चवीत एक नंबर. हे झाडही माझे लाडके होते कारण ह्याच्या फांद्या आमच्या गच्चीत यायच्या. मग गच्चीतून फांदी पकडून तिचा कोवळा पाला खाणे, केशरी-पिवळी फुलांचा आस्वाद घेणे, नुकत्याच लागलेल्या कोवळ्या चपट्या चिंचा खायला तर मजा यायची. चिंचांनी बाळसे धरले म्हणजे त्यांचे आकोडे झाले की मीठ-मसाल्याची पुडी बांधून गच्चीवर जायचं आणि चिंचा तोडून त्या मीठ-मसाल्याबरोबर खाण म्हणजे खरे चिंचसुख. गच्चीतल्या फांदीवर सहसा पिकण्यासाठी चिंच राहिलेलीच नसे.

साधारण जून मध्ये केशरी-पिवळ्या फुलांचा सडा झाडाखाली पडलेला असायचा. पावसाळ्यात आमच्या ह्या चिंचेला पांढरी फळे लागलीयेत असे वाटायचे. कारण पुष्कळ पांढरे बगळे वळचणीला झाडावर बसलेले असायचे. ह्या झाडाला अजून एक जाड जुड फांदी आडवी गेलेली होती. पाऊस गेला की त्या फांदीला वडील मला पाळणा बांधून देत. त्या पाळण्यात मी कुठल्याही बागेत अनुभवले नसतील इतके उंच उंच झोके त्या हिरव्या गर्द छत्राखाली घेतले आहेत व आकाशाला गवसणी घालत अनेक बालस्वप्नात रमले आहे. झोके घेत असताना वारा येऊन पानगळ झाली की मला स्वर्गात असल्यासारखं वाटायचा.

चिंचा पूर्णं पिकल्या की काही चिंचा गळायच्या ह्या खाली पडलेल्या आंबट गोड चिंचा खाणे हा एक मधल्या वेळेचा टाईमपास असायचा. पिकलेल्या चिंचा हालवून पाड्यासाठी गडी माणूस यायचा. प्रत्येकी चिंचेच्या झाडाचे हालवण्यासाठीचे दर ठरायचे. त्याने चढून चिंचा हालवायला सुरुवात केली की चिंचांचा बदाबदा पाऊस पडायचा. काही चिंचा टणक देठाच्या असायच्या ज्या हालवून पडत नसत मग त्यांना काठीने पाडावे लागत असे. आपण झाडाखाली असलो की चांगलाच मार लागतो ह्या चिंचांचा तो मार बरेचदा गंमत म्हणून आम्ही अनुभवायचो. चिंचा गोळा करण्यासाठी आम्ही घरातील सगळे आणि आजूबाजूची लहान मुले हौसेने यायची. त्यांना आई खाऊ आणि चिंचा द्यायची. ह्या चिंचा गोणीत भरून ठेवायच्या मग त्या गोणी घराच्या पडवीत विराजमान होत असत. काही चिंचा कच्च्याच असायच्या त्यामुळे हा चिंचा पाडण्याचा कार्यक्रम आठ दिवसाच्या अंतरावर दोन-तीन वेळा तरी व्हायचाच.

चिंचा घरात आल्या की आईचा चिंचांचा कारखाना चालू होत असे. तेव्हा आई प्रार्थमिक शिक्षिका म्हणून शाळेत कार्यरत होती. दुपारी शाळेतून आली की जेवण उरकून आई आणि आजी चिंचेच्या गोणी घेऊन बसत आणि त्या एक एक करून चिंचा सोलत असत. चिंचा सोलताना त्याला असलेले दोरे काढायचे नसतात नाहीतर चिंच आख्खी न राहता तुटू शकते. ह्या दोर्‍यांवरून आठवलं तोंडात टाकलेली चिंच खाऊन संपली की हे दोरे चघळायचे. त्याचा पूर्ण आंबटपणा जाऊन त्या दोर्‍याची चव लागेपर्यंत हे दोरे चघळण्यात मजा यायची.

गोणीतल्या चिंचा सोलून झाल्या की जर चिंच जास्त ओली असेल तर एखादा दिवस ती उन्हात वाळवावी लागे. सुकलेली असेल तर वाळवायची गरज लागायची नाही. मग आई आजीचा चिंचा काटळायचा कार्यक्रम चालू होत असे. चिंचा काटळणे म्हणजे चिंचेतील चिंचोका (बी) विळीवर चिंच कापून एक कक करून काढणे हे क्लिष्ट काम असे. पण चिंचोक्यांना काही काळाने पाखरे लागतात म्हणून चिंच टिकविण्यासाठी ते काढावे लागतात. चिंचा काटळून झाल्या की त्या टिकाव्या म्हणून मीठ लावून गोळे करावे लागत. साधारण एक किलो चिंचेचा एक गोळा बनायचा. गोळा बनवताना जाडे मीठ आधी आई पाट्यावर जाडसर वाटायची मग त्यात काटळलेली चिंच मिक्स करुन पाट्यावरच त्याचा गोळा करायची. हे गोळे पहिला सगळ्या नातेवाईक, जवळच्या लोकांना वाटले जायचे किंवा त्यांच्या नावाचे बाजूला काढले जायचे. घरात एका मोठ्या रांजणात वर्षभराचा साठा करून ठेवायचे मग उरलेले गोळे मणावर विकले जायचे. गावतील बायकाच हे गोळे विकत घेऊन संपवायचे. काहींना तर वाट्यालाच यायचे नाहीत भराभर संपल्याने. पण सतत चिंचेच्या सहवासात राहिल्याने वाताचा त्रासही दोघींना व्हायचा. मग आजीला तर आई करून नाही द्यायची पण कालांतराने तिनेही चिंचा फोडणे बंद केले. घरातल्यापुरती आणि नातेवाइकांना देण्यापुरते गोळे करून बाकी चिंच किरकोळ भावात आख्खीच विकून टाकायची. वाताच्या त्रासामुळे मजुरीनेही कोणी हे काम करायला तसे तयार नसायचे.

त्यावेळी चिंचोक्यांनाही खूप डिमांड होते. चणे-शेंगदाणेवाले तसेच गावातील खाऊच्या दुकानात हे चिंचोके विकले जायचे. मग ते भाजून एका बरणीत विकायला ठेवलेले दिसायचे. मी हे चिंचोके आमच्या चुलीत भाजायचे आणि खिचात भरून मैत्रिणींसाठी शाळेत न्यायचे तसेच घरीही खायचे. चिंचोके खाण्यातली गंमत दीर्घकाळ असते कारण चिंचोके कडक असल्याने शेंगदाण्यासारखे न तुटता ते चघळत चघळत खावे लागतात.

ही चिंच आमच्या परिसरात माशांच्या कालवणात जास्त वापरतात. प्रत्येक कालवणात ह्या चिंचेचा कोळ टाकला जातो. तसेच आमट्यांमध्येही हिचा वापर केला जातो. मी एकदा पुस्तकात बघून कच्च्या चिंचेचा ठेचा केल्याच आठवतंय. कच्च्या तयार झालेल्या चिंचा शिजवून त्याच्या रसातील मिरचीचे लोणचे अप्रतिम लागते. चिंचेची कढी ही मटणाबरोबर काहींचा ठरलेला पदार्थ आहे. चिंच गुळाची जोडी अनेक पदार्थांची रुची वाढवते जसे की अळूवडी, अळूचे फतफते, आंबट वरण आणि इतर काही पदार्थ. गरोदर पणात बहुतांशी स्त्रियांना ह्याच चिंचांचे डोहाळे लागतात. चिंच लावून घासलेली तांबा पितळेची भांडी शोभेला ठेवण्यासारखी लख्ख चमचमतात.

तर असे हे चिंचपुराण जे सध्या पुराणात जमा झाले आहे पण मनात अजून आंबट गोड आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आहे.

हा लेख दिनांक १८/०२/२०१९ रोजी महाराष्ट्र दिनमान या वर्तमान पत्रात प्रकाशीत झालेला आहे.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

21 Feb 2019 - 1:45 pm | प्रमोद देर्देकर

मस्त आठवणी .

खुप सुंदर आठवणी...फार छान लिहीलत!!

नावातकायआहे's picture

22 Feb 2019 - 9:40 pm | नावातकायआहे

मस्त!

उपेक्षित's picture

23 Feb 2019 - 12:53 pm | उपेक्षित

लेख मस्तच आहे पण एक गोष्ट नेहमी खटकते जागुताई, तुम्ही कधी इतरांच्या चांगल्या लेखावर प्रतिसाद देताना दिसत नाहीत.