इंद्रायणी काठी

मेघमल्हार's picture
मेघमल्हार in जनातलं, मनातलं
19 Feb 2019 - 12:27 pm

सूर्यनारायण काही अंतर वर सरकलाय. पण ते तेज अजून तितकसं प्रखर झालं नाहीये. दूरवर नदीपात्रात काहीसं धुकं आहे. हवेत प्रचंड गारठा आहे. या अशा बोचऱ्या थंडीतही लोक नदीत स्नान करत आहेत. पैलतीरावर कोणी एक सूर्याला अर्घ्य देत आहे. ऐलतीर तसा रिकामाच आहे. भल्या सकाळी मी आळंदीत इंद्रायणीच्या काठावर उभा आहे. हातापायांवर पाणी घ्यावं म्हणून घाट उतरून थोडं खाली गेलो. कधी एके काळी, समृद्ध रूपात इंद्रायणी इथून खळाळली असेल, काठावर हिरवीगार झाडी असेल, संत महात्मे इथे रोज स्नानार्थ येत असतील. आता गतकाळाच्या सुखद स्मृती तिच्या डोहात खोलवर कुठेतरी जपून, संथपणे, केवळ ती वाहते आहे. थोडं पाणी पायावर घेतलं नि घाटाच्या वरच्या दिशेने निघालो. काही स्वयंसेवक परिसर झाडताना दिसले. हे दृश्य मनाला दिलासा देणारं होतं. पुन्हा एकदा नदीकडे पाहिलं, गार वारं पाण्याला स्पर्शून अंगाला भिडत होतं. तिचं मूळ चैतन्याचं स्वरूप तिला पुन्हा पहायला मिळेल नि तिच्या वाटेतल्या गावांचे काठ फुलवत हि जीवनदायिनी सतत प्रवाही राहील अशी आशा मनी धरून मी समाधी मंदिराकडे वळलो.

मंदिरा बाहेरचा परिसर अजून भाविकांनी फुलायचा होता. काही दुकानं उघडली होती. उदबत्तीचा मंद सुगंध दरवळत होता. "दादा या इकडं, चप्पल ठेवा..." अशी साद दुकानदार घालत होते. मी घरातूनच फुलं, तुळशी घेऊन आलो होतो, पण चप्पल ठेवायच्या निमित्ताने एका दुकानातून फुलं विकत घेतली. थोड्या अंतरावर गंध लावणारे एक-दोघे उभे असलेले दिसले. त्यांना चुकवून मी देऊळवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी गेलो. समोरच खाली पितळेचं छोटं रेखीव कासव आहे. त्याला लागूनच वर गुरू हैबतबाबांची पायरी आहे. महाद्वारातुन आत जाताच मंत्रपठणाचा आवाज कानावर आला. आतलं सगळं वातावरणच प्रसन्न होतं. मनाला शांती देणारं. आवारातल्या श्री एकनाथ पाराला मनोमन नमस्कार केला नि दर्शनरांगेकडे आलो. आज गर्दी कमी होती. वीणामंडपही रिकामा होता. एरवी तिथे बऱ्याचदा हरिपाठ, रंगात आलेलं कीर्तन, तल्लीनतेने ऐकणारे श्रोते असं सुंदर चित्र पहायला मिळतं. टाळ मृदंगाच्या नादात चाललेलं भजन ऐकणं हा एक तिथला अनोखा सोहळा असतो. एवढ्या सकळीक मी पहिल्यांदाच आलो होतो, त्यामुळे कदाचित सगळीकडे काहीसा निवांतपणा अनुभवायला मिळत होता. दर्शनरांग हळूहळू पुढे सरकत होती. कितीतरी वयस्कर मंडळी मागे-पुढे रांगेत दिसत होती. बहुधा ते आळंदीत मुक्कामी आले असतील. कधीही पहा ह्या वृद्ध वारकरी जनांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच असतो. मधेच कोणीतरी "बोला पुंडलिक वरदे...पंढरीनाथ महाराज कि जय" मोठ्ठयाने म्हणत होतं. माझ्यासकट इतरही त्यांना नकळत साथ देत होते.

मी समाधी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या जवळ आलो. मंदिराचं जुनं दगडी बांधकाम भक्कम आहे. आत एक मोठा पाषाणातला, शेंदूर लावलेला गणपती आहे. त्याची पूजा संपन्न होऊन तो काचेच्या दारामागे सुरक्षित बसला होता. एक दालन ओलांडून मी मधल्या गाभाऱ्यात आलो. आपल्या तुकोबांनी हा गाभारा बांधलाय. जगद्गुरू तुकोबांच्या "ज्ञानियांचा राजा गुरू महाराव..." या अभंगात माउलींप्रती असलेला त्यांचा आदर, प्रेम पाहिलं कि आपल्या बेगडी प्रेमाची कल्पना येते. आपण निःशब्द होतो. गाभाऱ्याच्या मध्यभागी वर काचेचं झुंबर लखलखत होतं. बाहेर काही वारकरी लोक ज्ञानेश्वरी वाचताना दिसत होते. मगाशी जो मंत्रपठणाचा आवाज भासला तो यांचा होता तर. ते काय म्हणतायेत हे जरी स्पष्ट ऐकू येत नव्हतं तरी ती लय, तो आवाज कानाला सुखावणारा होता. आता एका छोट्या दारातून गेलं कि गर्भगृहात माऊलींची संजीवन समाधी आहे. दाराच्या वरती दगडात कोरलेला गणपती आहे. बिचार्याच्या सर्वांगाला पेढा चिकटवलेला दिसत होता. खरंतर हे दृश्य प्रत्येक देवळात पहायला मिळतं. भक्तांच्या श्रद्धेपुढे देवाचं काय चालत नाही. दाराच्या दोन्हीबाजूला बंदिस्त चौकटीत सोन्याच्या पत्र्यावर लिहिलेलं पसायदान आहे. माउलींनी अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी भगवंताजवळ हे अलौकिक मागणं मागितलं. कोणीतरी म्हटलंय कि, "सगळ्या विश्वाचे मिळून जर एकच राष्ट्रगीत ठरवावे अशी कल्पना पुढे आली, तर संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाकडे पहावं लागेल". किती सार्थ आहे हे! उंबरठ्याला नमस्कार केला नि आत गेलो. आत समाधीवर अभिषेक सुरु होता. समाधीच्या वरच्या बाजूला देवळीत काळ्या पाषाणातल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. विठूमाऊलीच्या मुखकमलावरचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मन समाधान पावलं. घरातून नेलेली फुलं पुजाऱ्यांनी विठोबा-रखुमाईच्या मस्तकावर वाहिली. त्या फुलांच्या आयुष्याचं सार्थक झालं. पुजारी लोक समाधीला हात लावून नमस्कार करायला सांगत होते. माउलींच्या भेटीने त्या क्षणाला प्रत्येकाची "आनंदाचे डोही आनंद..." अशीच काहीशी अवस्था झाली असेल. नकळत हात जोडले गेले. मी माउलींपुढे नतमस्तक झालो.

"धन्य आजि दिन, झाले संतांचे दर्शन" ह्या आनंदातच बाहेर आलो. अजानवृक्षाच्या सावलीत काही भाविकांचं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं. अगदी समाधीला लागून त्याचं अस्तित्व आहे. त्याच्या तळी अनुष्ठान केलं कि ज्ञानप्राप्ती होते असं म्हणतात. गंमत पहा तरीही तो स्वतःला अजान म्हणवून घेतो. सुवर्णपिंपळाला प्रदक्षिणा घालून एका पायरीवर जरा विसावलो. गेली कित्येक वर्षे, शतके हा प्राचीन अश्वत्थ माउलींच्या आठवणी हृदयात जतन करून अलकापुरीत लीनतेने उभा आहे. कितीतरी बऱ्या-वाईट घटनांचा तो मूक साक्षीदार आहे. सांप्रतकाळीही संतपदीचे सुखसोहळे उपभोगत समाधानाचे अभंग गात आहे. त्याच्या अंगाखांद्यावर आता पाखरांची किलबिल वाढलीये. समाधी मंदिरही आता गजबजु लागलंय. "तनु मन शरण तुझ्या, विनटलो पायी.." असाच भाव इथे जमलेल्या प्रत्येकाच्या ठायी असेल. सूर्याच्या कोवळ्या रेशमी किरणांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे, अगदी तसाच माझा मन:गाभाराही ह्या ध्यानस्थ ज्ञानसूर्याच्या कृपार्शीवादाने उजळून निघाला आहे.

- मेघमल्हार

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2019 - 12:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख. पहिल्यांदा मी जेव्हा आळंदीला गेलो तेव्हा असंच काहीसं वाटलं.
सुरेख लिहिलंय. आवडलं.

-दिलीप बिरुटे

मेघमल्हार's picture

19 Feb 2019 - 12:55 pm | मेघमल्हार

धन्यवाद सर. आपला आभारी आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Feb 2019 - 12:36 pm | ज्ञानोबाचे पैजार

छोटासा वृतांत आवडला.
माझी अत्यंत आवडती जागा.
कितीही वेळा गेलो तरी समाधान होतच नाही दर वेळी माउली नव्यानेच भेटतात आणि एक नवी उर्जा देउन जातात.
आजकाल गर्दी जरा जास्तच असते, त्यामुळे नीटसे दर्शन होत नाही.
मग बराच वेळ वीणामंडपात बसतो किंवा मागच्या नंदी समोर.
पैजारबुवा,

मेघमल्हार's picture

19 Feb 2019 - 1:04 pm | मेघमल्हार

खरंय आळंदीला गेलं कि समाधान मिळतं.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

पद्मावति's picture

19 Feb 2019 - 12:59 pm | पद्मावति

किति सुरेख लिहिलंय. अगदी चित्रदर्शी.

मेघमल्हार's picture

19 Feb 2019 - 7:22 pm | मेघमल्हार

धन्यवाद. आभारी आहे.

पलाश's picture

19 Feb 2019 - 1:34 pm | पलाश

छान लिहिलं आहे.

मेघमल्हार's picture

19 Feb 2019 - 7:23 pm | मेघमल्हार

धन्यवाद.

प्रेम श्रद्धा आणि तीर्थस्थानी अवचित लाभलेला निवांतपणा शब्दाशब्दात झिरपला आहे.
प्रसन्न वाटले वाचून.

मेघमल्हार's picture

19 Feb 2019 - 7:25 pm | मेघमल्हार

धन्यवाद.
आभारी आहे.

यशोधरा's picture

19 Feb 2019 - 2:52 pm | यशोधरा

आवडलं.

मेघमल्हार's picture

19 Feb 2019 - 7:26 pm | मेघमल्हार

धन्यवाद. आभारी आहे.

लई भारी's picture

19 Feb 2019 - 3:15 pm | लई भारी

प्रसन्न वाटलं, वाचूनच! आता तुम्ही केलंय तस एकदा लवकर सकाळी जायला पाहिजे.

मेघमल्हार's picture

19 Feb 2019 - 7:27 pm | मेघमल्हार

धन्यवाद.
नक्की जाऊन या.

नावातकायआहे's picture

19 Feb 2019 - 5:23 pm | नावातकायआहे

छान आहे. आवडलं!

मेघमल्हार's picture

19 Feb 2019 - 7:27 pm | मेघमल्हार

धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

19 Feb 2019 - 9:52 pm | तुषार काळभोर

लेख आवडला, धन्यवाद.

मला वाटलं होतं की कृष्णाकाठचे बापलेक इंद्रायणीला आलेत की काय.
अंमळ निराशाच झाली.

पण तुमचा लेख छानच आहे. परवाच आळंदीला जाऊन आलो त्यामुळे ते सगळं परत आठवलं

मेघमल्हार's picture

21 Feb 2019 - 10:10 am | मेघमल्हार

धन्यवाद. आभारी आहे.

पण हे समजलं नाही "मला वाटलं होतं की कृष्णाकाठचे बापलेक इंद्रायणीला आलेत की काय."

आनन्दा's picture

23 Feb 2019 - 10:06 am | आनन्दा
मेघमल्हार's picture

26 Feb 2019 - 1:25 pm | मेघमल्हार

वाचलं. पण काय संदर्भ लागला नाही .

श्वेता२४'s picture

20 Feb 2019 - 1:26 pm | श्वेता२४

खूप छान लिहीलंय

मेघमल्हार's picture

21 Feb 2019 - 10:06 am | मेघमल्हार

धन्यवाद

विशुमित's picture

21 Feb 2019 - 1:00 pm | विशुमित

मला आळंदीतील संध्याकाळचा हरिपाठ खूप आवडतो..!!
"रामकृष्ण हरी" ची सुरवात करताना मृदंगावर सुरवातीची थाप पडली ना तर माझ्या अंगातच येते. खरंच!
लहान-थोर वारकरी मनसोक्त नाचतात.
===
सुफी, राजस्थानी, पंजाबी लोकगीतांच्या धर्तीवर, "पारंपरिक वारकरी चाली" चे महत्व देखील जागतिक पातळीवर पोहचावे अशी मनीषा आहे.
कोणाला या संदर्भात काही अधिक माहिती आहे का ?

चौथा कोनाडा's picture

3 Mar 2019 - 12:50 pm | चौथा कोनाडा

सुरेख लिहिलंय. प्रसन्न वाटलं, आवडलं.

संतांचा जिथे वास असतो तिथल्या अनुभुती अत्यच्च असतात.

मेघमल्हार's picture

8 Mar 2019 - 3:44 pm | मेघमल्हार

धन्यवाद. आभारी आहे.