"संथ वाहते, कृष्णामाई..."
कृष्णातीरावरील एक संथ पहाट...
सूर्योदयापूर्वी सांगलीचे सर्वेसर्वा आपल्या दैनंदिन मॉर्निंग वॉकसाठी कृष्णातीरावर निघालेले...
त्यांच्यापाठोपाठ त्यांचे चार-पाच प्रशंसक...
पहाटेचा फेरफटका, आन्हिकं आणि देवपूजा उरकायच्या आत काहीही न खाण्यापिण्याचा सर्वेसर्वांचा कित्येक वर्षांचा दंडक....
चालताचालता सर्वेसर्वा काही 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' करताहेत आणि प्रशंसक त्यावर दुजोरा भरताहेत...
नदीकिनार्याशेजारीच सांगली एमायडीसीचे नवीन प्लॉटस आखलेले, सर्वेसर्वांचाच नवा उपक्रम, सांगलीत नवे उद्योग उभारण्यासाठी...
पाडलेले प्लॉट्स बहुतांशी अजून मोकळेच, क्वचित कुठे एखादी शेड उभारलेली....
चालताचालता सर्वेसर्वांची सर्वनिरिक्षक नजर एका दृश्यावर खिळते...
एका प्लॉटवर एक आरामखुर्ची ठेवलेली...
आणि त्या आरामखुर्चीत एक बाळ...
मुलगी, वय २-३ वर्षे, अंगात फ्रॉक, केस बॉबकट केलेले, पायात मोजे आणि बूट...
सर्वेसर्वांनी ताडलं की ही कृष्णाकाठची निपज नक्कीच नव्हे...
नेहमीची वाट सोडून सर्वेसर्वा त्या आरामखुर्चीच्या दिशेने, पाठोपाठ अर्थातच चकित प्रशंसक.....
सर्वेसर्वा आरामखुर्चीसमोर जाऊन उभे राहिले, मुलगी तिच्या बाटलीतून दूध पिण्यात मग्न....
"बेबी, कोण तू?", सर्वेसर्वा
बेबीने फक्त गोड हसून दाखवलं...
"बेबी, तू इथे एकटी कशी? तुझे आईबाबा कुठे आहेत"
"बाब्बा!" बेबीने उत्तराबरोबर शेडकडे हात दाखवला...
सर्वेसर्वांच्या नजरेहु़कूम एक प्रशंसक शेडकडे धावला आणि काही मिनिटांतच एका गृहस्थाला घेऊन सामोरा आला..
"आपण कोण?", सर्वेसर्वांनी विचारणा केली.
त्या गृहस्थाने सर्वेसर्वांना ओळखून प्रणाम केला आणि आपला परिचय दिला...
"ह्या मुलीला अशी उघड्यावर एकटीला का सोडलीय तुम्ही? तुमच्याबरोबर शेडमध्येच का नाही ठेवत? इथे उघड्यावर काही बाधलं म्हणजे मग?", सर्वेसर्वांच्या आवाजात त्यांचा नेहमीचा आर्जवी करारीपणा डोकावला...
"नाही साहेब, आम्ही म्हणजे तिच्या आईने आणि मी प्रयत्न केला", गृहस्थाने स्पष्टीकरण दिलं, "पण तिलाच इथे उघड्यावर दूध प्यायला आवडतं. आम्ही शेडमध्ये दूध द्यायचा प्रयत्न केला तर ती रडरडून गोंधळ घालते. आणि आमचं तसं लक्ष असतंच..."
"असं होय, ठीक आहे", सर्वेसर्वांनी काहिश्या कौतुकाने बेबीकडे पाहिलं...
बेबीने पुन्हा एकवार गोड हसून जणू प्रतिसाद दिला...
सर्वेसर्वा आपल्या मार्गाला लागले.....
.....
दुसर्या दिवशी ते मुद्दाम बेबीसमोरून गेले...
बेबीने त्यांना तिचा नेहमीचा गोड हसून प्रतिसाद दिला...
तिसर्या दिवशीही तेच....
.....
तिसर्या दिवशी सायंकाळी बाबांच्या नांवे एक चिठ्ठी....
"आम्ही आमच्या मैत्रिणीला भेटायला रोज येतो. पण तुमच्याकडून काहीच स्वागत नाही. ही गोष्ट कृष्णातीराच्या आदरातिथ्याला साजेशी नव्हे..."
.......
दिवस चौथा...
नेहमीप्रमाणे सर्वेसर्वा पहाटे फिरायला निघालेले, बेबीसमोर येऊन थांबलेले...
बेबीने नेहमीप्रमाणे गोड हसून दाखवलं...
आणि, "य्य्य!" म्हणून बाजूला बोट केलं....
सर्वेसर्वा त्या बोटाच्या दिशेने पहातात तो एका छोट्याश्या पाटावर एक ग्लास, केशरी दुधाने भरलेला....
सर्वेसर्वा कधी नव्हे ते मोकळेपणाने गदगदून हसले....
आणि त्यांच्या प्रशंसकांच्या आश्चर्याकडे दुर्लक्ष करून आपल्या प्रातर्विधी-पूजेपूर्वीच त्या ग्लासातलं दूध दोन-तीन घोट प्याले आणि मग आपल्या मार्गाला लागले...
"संथ वाहते, कृष्णामाई
तीरावरल्या सुखदु:खांची..."
(डिस्क्लेमरः वरील कथेतील सर्वेसर्वा तुम्ही ओळखले असतीलच. प्रशंसकांच्या परिचयाची गरज नाही.
आणि बेबी आणि तिचे बाबा... त्यांची ओळख पुन्हा केंव्हातरी...)
प्रतिक्रिया
18 Feb 2019 - 1:32 pm | मनिम्याऊ
काहिच लिन्क लागत नाही. कदाचित् कृष्णाकाठाचा आणि आमचा फारसा परिचय नाही म्हणूनही असेल
18 Feb 2019 - 1:58 pm | विजुभाऊ
मान न मान मै तेरा मेहमान.
# एक अपडेट : खड्ड्यात जाणारी युती उद्धव रावांनी अखम्ड नामजपाच्या जोरावर वर खेचून आणली..... आता महाराष्ट्रात अफजलखानाच्या फौजेच्या सहकार्याने शिवशाही येणार.
( ### पाठीत खंजीर , दगाबाजी , ठोकशाही , भगवे रक्त ,मराठी रक्त , आग , नारोबा , खंडोजी खोपडे ... हे शब्द ज्याने त्याने आपापल्या समजुतीनुसार वरील वाक्यात वापरल्यास स्पोर्ट्स कोट्याचे तीन गुण अधीक मिळतील )
18 Feb 2019 - 6:14 pm | सिरुसेरि
एके काळची रोजची बबलु हत्तीची सकाळची शहर फेरी आठवली .
18 Feb 2019 - 7:36 pm | राजेंद्र मेहेंदळे
पुन्हा पुन्हा वाचली, पण आपला पास
18 Feb 2019 - 9:30 pm | श्रीरंग_जोशी
एकाच वेळी महाराष्ट्र व अमेरिकेतल्या राजकारणाला लागू पडेल अशी रुपककथा :-).
19 Feb 2019 - 3:39 pm | यशोधरा
सर्वेसर्वा ओळखले असं वाटतंय तरी.
पण त्यांना सांगलीला कुठे पोचवलेत?