दिवस तुझे ते ऐकायचे....

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
13 Feb 2019 - 7:25 am

नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ बहुतेकांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिनाचीच ओळख करून देत आहे.

तर १३ फेब्रुवारी हा ‘जागतिक रेडीओ दिन’ म्हणून साजरा केला जातो.

pict

टीव्हीच्या आगमनापूर्वी रेडीओ या श्राव्य माध्यमाने आपल्यावर अधिराज्य केले होते. किंबहुना तो आपला जीवनसाथी होता. त्या काळात आपल्यातील अनेकांचे संपूर्ण शालेय जीवन हे रेडीओच्याच संगतीने पार पडले आहे. तेव्हा त्यावरील शांत बातम्या, माहिती, निवेदने, करमणुकीचे विविध कार्यक्रम आणि सुमधुर जाहिराती ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असायचे. कुटुंबातील अनेकांच्या सकाळच्या आवरायच्या वेळा या रेडीओवरील कार्यक्रमांशी घट्ट निगडीत होत्या. घरातील ज्येष्ठ मंडळी त्यावरील पहाटेचा पहिला कार्यक्रम चुकवत नसत. तर कित्येक तरुण कुटुंबे ही विविध भारतीचा ‘बेला के फूल’ हा रात्रीचा शेवटचा गाण्यांचा कार्यक्रम ऐकल्यावरच झोपी जात.
क्रिकेट आणि अन्य काही खेळांचे धावते समालोचन त्यावर ऐकणे हे रोमांचक व थरारक असे.

घरातील वा मनगटावरील घड्याळांच्या अचूक वेळा या ‘रेडिओ-टाइम’नुसार लावल्या जात ! अनेक व्यावसायिकांना वा गृहिणींना आपले काम करता करता रेडीओची साथसोबत मोलाची वाटत असे; किंबहुना आजही वाटते. त्याकाळी एखाद्या कलाकाराची ओळख समाजात ‘रेडीओस्टार’ म्हणून करून देत असत आणि त्या व्यक्तीलाही त्याचे भूषण वाटे.

माध्यमांच्या इतिहासात डोकावता रेडिओने दीर्घकाळ आपले ‘युग’ गाजवले. त्यानंतर टीव्ही, संगणक आणि आंतरजाल अशी दृक्श्राव्य माध्यमांची प्रगती झाली आणि ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसली. तरीसुद्धा आजही रेडीओवर प्रेम करणारे शौकीन बरेच आहेत. डोळ्यांना ताण नाही आणि आपले काम करतानाही तो ऐकता येणे ही त्याची वैशिष्ट्ये अबाधित आहेत. आजच्या टीव्हीवरच्या झगमगाटाशी तुलना करता तर रेडीओची ‘शांत’ प्रवृत्ती अधिकच भावते. किंबहुना गेल्या दोन दशकांत रेडीओने देखील कात टाकून श्रोत्यांना अधिक आपलेसे केले आहे.

तर असे हे सुश्राव्य माध्यम विस्मरणात जाऊ नये म्हणूनच या जागतिक दिनाची संकल्पना पुढे आली. प्रथम ती २०११च्या ‘युनेस्को’च्या बैठकीत मांडली गेली. त्यानंतर २०१२ पासून दरवर्षी हा जागतिक दिन साजरा केला जातो. आता १३ फेब्रुवारी हाच दिनांक म्हणून का निवडला गेला? तर १३/२/१९४६ला संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आपली रेडीओ सेवा चालू केली होती, त्याची आठवण म्हणून.
तर अशा या आजच्या दिनी सार्वजनिक स्तरावर काही कार्यक्रम साजरे होतीलच. माझा हा धागा काढण्याचा उद्देश आता सांगतो. आपल्या गतायुष्यातील रेडीओच्या कार्यक्रमांच्या अनेक आठवणी आपल्याजवळ असतील. त्यांची इथे उजळणी आपण करूयात. आजही आपल्यातील काहीजण दिवसाचे काही तास रेडीओ ऐकत असतील. पण आपण जरा पूर्वीच्या काळाचे स्मरणरंजन करूयात. विशेषतः तो काळ, जेव्हा ‘सरकारी रेडीओ’ हेच श्राव्य माध्यम लोकांसाठी उपलब्ध होते. त्याच्या जोडीला आजच्या सरकारी आणि खाजगी रेडीओ वाहिन्यांबद्दलही लिहायला हरकत नाही.

आता थोडे ‘रेडीओ’ उपकरणांबद्दल. पूर्वी भला मोठा रेडीओ, मग ट्रांझिस्टर, खिशात मावणारा रेडीओ आणि आता मोबाईलमधले रेडीओ- अ‍ॅप अशी स्थित्यंतरे आपण पाहिली असतील. त्याच्या गमतीजमती देखील लिहा. कोणे एके काळी रेडीओ ऐकण्यासाठी सशुल्क सरकारी परवाना काढावा लागत असे. तसेच त्याचे वार्षिक नूतनीकरणही पोस्टात जाऊन करावे लागे. हे ऐकून आताच्या तरुणांना चक्क हसू येईल ! माझ्या आठवणीनुसार तो परवाना प्रकार १९८० –८२ दरम्यान मा. वसंत साठे हे केंद्रीय नभोवाणी मंत्री असताना रद्द करण्यात आला होता (चू भू दे घे). त्यानंतर खऱ्या अर्थाने रेडीओ-सेवा ही जनतेसाठी ‘फुकट’ उपलब्ध झाली.

....

रेडीओ दिनानिमित्त सुरवातीस एक विचार मनात आला होता. तो म्हणजे १९७०-९० दरम्यानच्या माझ्या काही रेडीओच्या आठवणींचा एक लेख लिहावा. परंतु, नंतर लक्षात आले की त्याचा आवाका मोठा आहे आणि वैयक्तिक स्मरणशक्तीला मर्यादा आहेत. तेव्हा हा विषय माझ्या एकट्याच्याने पेलणे अवघड आहे. त्याऐवजी आपण सर्व इच्छुकांनी मिळून इथे स्मरणरंजन करावे हे उत्तम.
....

तर असा आहे या धाग्याचा उद्देश. याचबरोबर या ‘आकाशवाणी’वरील माझे निवेदन संपले ! आता तुमच्या प्रतिसादांचे स्वागत.
*********************************************
चित्र जालावरुन साभार.

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

वन's picture

13 Feb 2019 - 10:13 am | वन

खरंय त्याकाळी रेडीओने आपल्याला भरपूर श्रवणसुख दिले आहे.

विविध भारतीवरील अनेक कार्यक्रम (तेव्हाचे आणि आताचे) माझ्या आवडीचे आहेत. कॉलेजात असताना मी रात्री ९ चा ‘साज और आवाज’ खूप आवडीने ऐकायचो. त्यात आधी एक कलाकार त्या हिंदी गाण्याची फक्त धून वाजवे. नंतर ते मूळ गाणे पूर्ण ऐकवले जाई. त्या १५ मिनिटात २ गाणी बसत. आता हा कार्यक्रम नसतो.

काही जाहिराती तर पाठ झाल्या होत्या. जशा की.....
.. फिनोलिक्स नं आणलं पाणी.....
प्रकाशचे माक्याचे आयुर्वेदिक तेल म्हणजे....

अजून बरेच काही आहे. आठवेल तसे लिहितो.

कुमार१'s picture

13 Feb 2019 - 11:15 am | कुमार१

वन, धन्यवाद.
साज और आवाज माझाही आवडता होता. ‘भुले बिसरे गीत’ व जयमाला आजही लोकप्रिय आहेत.

विनिता००२'s picture

13 Feb 2019 - 11:44 am | विनिता००२

तो फोटोतला रेडीओ फारच आवडला. :)

सखी सहेली, बेला के फूल, जयमाला, हवा महल आवडते कार्यक्रम :)

नूतन's picture

13 Feb 2019 - 12:37 pm | नूतन

मी तर अजूनही रेडिओची 'फॅन'आहे.फेविकाॅल लावल्यासारखं तासनतास सोफ्यात खिळण्यापेक्षा मला काही करता करता रेडिओ ऐकायला किंबहुना रेडिओ ऐकता ऐकता काही करायला आवडतं.
मला आठवतंय,आकाशवाणीवरील कार्यक्रमाशी लोकाचं रूटीन बांधलेलं असायचं,निवेदक जवळचे वाटायचे .अशीच एक आठवण---पूर्वीच्या मुंबई ब आणि आजच्या अस्मिता वाहिनीवर सकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारीत होतात.70 च्या दशकात बरेचदा सुधा नरवणे वृत्तनिवेदिका असायची. आमचे एक शेजारी ,ज्यांना आम्ही दादा म्हणायचो,ते बातम्या सुरू होताच ऑफीसला जाण्यासाठी घराबाहेर पडत.डबा द्यायला वेळ लागला तर बातम्या लागल्या असं न म्हणता ते म्हणत.....अगं बघ बघ ,सुधा आली पण....
मुंबई ब,विविध भारती,उर्दू सर्विस,श्रीलंका ब्राॅडकास्टींग काॅरपोरेशन विदेश विभागावरून सकाळी साडेसातला प्रसारीत होणारा पुरानी फिल्मोंके गीत,अमीन सयानीची बिनाका गीतमाला......रम्य आठवणी...

पुणे केंद्रावरच्या बालोद्यान चे ते शाळेची घंटा असणारे सिग्नेचर म्यूझीक अजून आठवते

कुमार१'s picture

13 Feb 2019 - 12:58 pm | कुमार१

लिहील्याबद्दल वरील सर्वांचे आभार.

तर बातम्या लागल्या असं न म्हणता ते म्हणत.....अगं बघ बघ ,सुधा आली पण.... >>>>> एकदम सही !

... आणि रात्री ८.१५ ला दिल्ली केंद्रावरून मराठी बातम्या असायच्या. त्यातील “दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत...” हे अगदी अगदी आठवते.
ही बातम्या देणारी मंडळी जणू आपल्या कुटुंबाचाच एक भाग असत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2019 - 1:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं !

शीर्षकावरून, एक विडंबन आहे असे वाटले. पण, एक जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक मस्तं लेख पुढे आला ! :)

मराठी कथालेखक's picture

13 Feb 2019 - 1:41 pm | मराठी कथालेखक

रेडिओमुळे अनेक गीतांचे गीतकार, संगीतकार, गायक नीट लक्षात रहायचे.विविधभारती वरगाणे लावण्यापुर्वी अगदी स्पष्ट आणि खणखणणीत आवाजात निवेदक वा निवेदिका सांगायचे "आईये अब सुनते है आशा भोसले और किशोर कुमार की आवाज में शैलेंद्र का लिखा गीत, संगीत से सवांरा है एस डी बर्मनने और फिल्म का नाम है ..." छान वाटायचं हे ऐकताना. रात्रीचे छायागीत सोडले तर इतर बहूतेक गाण्यांच्या कार्यक्रमात अशा प्रकारचे निवेदन असायचे. सकाळी अकरा वाजता मधू मालती या कार्यक्रमात हीच उद्घोषणा मराठीतून असायची (गाणे मात्र हिंदी).
छायागीतचा आराखडा थोडा वेगळा असायचा. त्यात धीरगंभीर आवजात आणि हिंदी-उर्दु मिश्र अशा जुन्या धाटणीच्या भाषेत निवेदक/निवेदिका (काही नावे अजून आठवतात जसे शहनाज, ममता सिंग ई) काही विषय घेवून बोलायचे. त्यांचे काहीसे जड शब्द फारसे कळाले नाही तरी ऐकायला खूपच छान वाटायचे. त्यानंतर ते गाणे वाजवायचे. कधी गाणे फारसे आवडले नाही तरी या निवेदनामुळे कार्यक्रम आवडायचा. अजूनही मी जर कधी रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान कार चालवत असलो तर १०१ नक्कीच लावतो. १०:३० च्या आपकी फर्माईशमधली फर्माईशकर्त्यांची लांबलचक यादी ऐकायला मात्र कंटाळा येत असे.
पुर्वी अत्यंत आवडीचे गाणे रेडिओवर वाजले की काय विलक्षण आनंद व्हायचा ..

अनिंद्य's picture

15 Feb 2019 - 1:08 pm | अनिंद्य

"आईये अब सुनते है आशा भोसले और किशोर कुमार की आवाज में शैलेंद्र का लिखा गीत, संगीत से सवांरा है एस डी बर्मनने और फिल्म का नाम है ...
+ १
हे फार आवडायचे. ह्यामुळे शेकडो गाण्यांचे गीतकार, संगीतकार, सिनेमाचे नाव आणि गायक आम्हा भावंडांना तोंडपाठ झाले :-)

Chandu's picture

13 Feb 2019 - 1:59 pm | Chandu

रेडीयो सिलोन आणी ऑल इंडिया उर्दू सर्विस माझी आवडती.
सकाळी 8वाजता लोमा टाईम (हे product कधीच बाजारात दिसले नाही)अशी उद घोषणा हौउन "आफी के गीत"लागायच.(ते आप ही के गीत आहे हे खूप उशीरा समजलं).त्यातली "पसंद करने वालोंके नाम"खूप वेळ चालायचे आणी नेम क्या सिनेमाच्या नावाच्या वेळेला रेडिओचा गळा बसायचा.
तीच गोष्ट दुपारी 3.30वाजता च्या ऑल इंडीया उर्दू सर्व्हिस ची.लाम्ब लचक फर्माईश करणा र्यान्ची यादी.नन्तर अवामी खबरें.त्यातले नजाकतदार उर्दू समजले नाही तरी ऐकायला मजा यायची
झुम्रितलैय्या,बालाघाट,राजनंद गाव,शेखुपरापाकिस्तान,,किश्न्गंज,इत्यादी गावातच केवळ श्रोते रहातात आणी त्याना फर्माईश करयला वेळ कसा मिळतो यावरही बरेच वेळा मित्रांमधे comments व्हायच्या.
असो.
आज F M वर सुद्धा काही काही channels बरी आहेत.
Short wave फारसे ऐकले जात नाही.
मध्यान्तरी redio garden नावाचे सन्केतस्थळ समजले होते.त्यावर जगाचा नकाशा असून कोठेही क्लिक केल्यास तिथले रदिऔ प्रोग्राम ऐकता येतात असे दिसले.

कुमार१'s picture

13 Feb 2019 - 2:33 pm | कुमार१

लिहील्याबद्दल वरील सर्वांचे आभार.

डॉ. सुहास, तुमच्याही आठवणी जरूर लिहा.

म क,
रेडिओमुळे अनेक गीतांचे गीतकार, संगीतकार, गायक नीट लक्षात रहायचे. >>>> +११
चंदू,
झुम्रितलैय्या,बालाघाट,राजनंद गाव,शेखुपरापाकिस्तान,,किश्न्गंज,इत्यादी गावातच केवळ श्रोते रहातात >>> +१ अगदी !

redio garden नावाचे सन्केतस्थळ >>> छान माहिती
धन्यवाद !

वन's picture

13 Feb 2019 - 7:30 pm | वन

१. पुर्वी अत्यंत आवडीचे गाणे रेडिओवर वाजले की काय विलक्षण आनंद व्हायचा . >>>> +१.
हा आनंद कॅसेटमधील गाणी ओळीने ऐकताना होत नाही. एखादे गाणे अवचित ऐकण्याचा आनंद काही औरच.

२. दर बुधवारी संध्याकाळचे ८ वाजलेले अन 'अमिन सयानी' की आवाज 'ये सिलोन ब्रॉटकॉस्टिन्ग कॉर्पोरेशन का विदेश विभाग है' अशा सुरवातीने होणारी 'बिनाका गीतमाला' काय वर्णावी?

३. रविवार दुपारची विविध भारती म्हणजे तर चंगळच असायची. एस कुमार प्रायोजीत एक कार्यक्रम आणि cricket with Vijay Merchant अजूनही आठवतात

नूतन's picture

14 Feb 2019 - 9:32 am | नूतन
नूतन's picture

14 Feb 2019 - 9:33 am | नूतन
नूतन's picture

14 Feb 2019 - 9:33 am | नूतन
नूतन's picture

14 Feb 2019 - 9:33 am | नूतन
संजय पाटिल's picture

14 Feb 2019 - 11:35 am | संजय पाटिल

बिनका गितमाला, आपली आवड, इत्यादी कार्यक्रम न चुकवता ऐकायचो...
तसेच गीतरामायण सुद्धा फारच गाजलेले आठवते..

कुमार१'s picture

14 Feb 2019 - 11:50 am | कुमार१

वन, नूतन व संजय, प्रतिसाद आवडले.
.......
१. दुपारी २ च्या सुमारास 'संथगतीने चालणारे बातमीपत्र' असायचे. ऐकताना मजा वाटायची. नंतर कळले की ते पत्रकारांसाठी लिहून घ्यायला असायचे. त्यावेळेस आधुनिक संपर्क माध्यमे नसल्याने.

२. ही आठवण माझ्या आजोबांची आहे.ते आम्हाला भावुकतेने सांगायचे.
पन्डित नेहरू १९६४ मध्ये वारले तेंव्हा ऑल इन्डिया रेडियो वरून अंत्ययात्रेचे धावते वर्णन ऐकताना घरातील लोक अक्षरशः रडले होते. एवढे हृदयाला भिडणारे ते वर्णन होते. अनेकांना आपल्याच घरातील कोणीतरी वारल्यासारखे दुखः झाले होते.

मस्त लिवलंय कुमारसाहेब .. आवडलं आम्हाला . पुन्हा ते दिवस आठवून राहिले . हल्ली मी अमॅझॉनवर परत ट्रान्सिस्टरच्या ऍड बघू लागलो आहे बरं का आणि सध्या एक घ्यायच्याही विचारात आहे

विनिता००२'s picture

14 Feb 2019 - 4:52 pm | विनिता००२

हो न मला पण रेडीओ विकत घ्यावा वाटायलयं :)

लई भारी's picture

19 Feb 2019 - 5:29 pm | लई भारी

नवीन फिलिप्स चे रेडिओ घेऊन बघितले. पण त्यांचा रिसिव्हर चांगला नाही इतका. जुन्या रेडिओ इतकं क्लिअर नाही लागत.

कुमार१'s picture

14 Feb 2019 - 2:37 pm | कुमार१

खिलजी . धन्यवाद !
त्याची मजा येगळीच। ☺️

कुमार१'s picture

14 Feb 2019 - 4:39 pm | कुमार१

आवडला हो तिथला लेख! रेडिओ प्रेमी बरेच आहेत.

ऋतुराज चित्रे's picture

15 Feb 2019 - 12:51 am | ऋतुराज चित्रे

रविवारी विविध भारतीवर दुपारी १ वाजता 'कोहिनूर गीत गुंजार' हिंदी गीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात कोंबड्याच्या खणखणीत आरवण्याने होत असे, तो आवाज ऐकुन आमच्या अंगणातील कोंबडाही आरवायचा.
विविध भारतीवर दोन गाण्यांमध्ये जाहिराती असायच्या, शक्यतो तीनच असायच्या आणि जाहिरात संपल्यावरची ट्यून मस्त असायची.
विविध भारतीवर मोठी गाणी संपूर्ण ऐकवली जात नसे, ऑल इंडिया रेडीओवर संपूर्ण गाणे ऐकवले जायचे. फरमैशी गीते मध्ये झुमरी तलैयासे रामू अकेला, शामू अकेला और उसके बहोतसे साथी हमखास असायचे.
व्हॉल्व रेडिओचा तो हिरवा ' मॅजिक आय ' लहान मोठा करायला मजा वाटायची.

कुमार१'s picture

15 Feb 2019 - 9:28 am | कुमार१

धन्यवाद.

कोहिनूर गीत गुंजार' हिंदी गीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात कोंबड्याच्या खणखणीत आरवण्याने होत असे >>>>

सही ! सहमत. अतिशय प्रिय आवाज होता तो.

विनिता००२'s picture

15 Feb 2019 - 10:52 am | विनिता००२

झुमरी तलैया >> हे काल्पनिक नाव / गाव आहे असे वाटायचे, पण तिथून फर्माईश येतात म्हटल्यावर हे खरे गाव आहे हे पटले :)

विनिता००२'s picture

15 Feb 2019 - 10:53 am | विनिता००२

झुमरी तलैया >> हे काल्पनिक नाव / गाव आहे असे वाटायचे, पण तिथून फर्माईश येतात म्हटल्यावर हे खरे गाव आहे हे पटले :)

मुळातच आपल्याला गाणे ऐकायचे असल्यास रेडिओवर ते गाणे लागण्याची वाट बघावी लागत असे, त्यामुळे दुर्मिळता होती, त्याचा आनंद होता.

'भूले बिसरे गीत', 'बेला के फूल' आणि 'बिनाका (नंतर सिबाका) गीतमाला' अगदी आवर्जून ऐकत असू. बिनाका मधला अमीन सयानींचा आवाज आणि लकबी फारच आवडायच्या. बुधवारी सकाळपासूनच कोणते गाणे कोणत्या 'पायदान'वर असेल याची उत्सुकता असे. सँटोजन की महफिल, मराठी भावगीत (त्यात 'जग हे बंदीशाळा' हे माझे अत्यंत आवडते गीत हमखास लागत असे) वगैरे कार्यक्रम आणि 'लाल इमली धारीवाल, साथ निभायें सालोसाल' किंवा 'उनके जूडे से लिपटी वो मोगरे की खुशबू' अश्या प्रयोजकांच्या जिंगल्स आठवतात.

बाबांचे एक सहकर्मी रेडिओच्या 'हवा महल' ह्या कार्यक्रमासाठी नाटकं लिहायचे. आकाशवाणी नागपूर किंवा भोपाळवरून ती रात्री प्रसारित होत - एकाहून एक सरस नाटकं 'ऐकण्याचा' मनोरम अनुभव रेडिओनं दिला आहे.

अनिंद्य's picture

15 Feb 2019 - 12:49 pm | अनिंद्य

मराठी, संस्कृत आणि उर्दूतली बातमीपत्र वाचणाऱ्या निवेदकांचा आवाज कर्णप्रिय होता, घाई, कर्कशता, अस्पष्ट किंवा चुकीचे उच्चार औषधालाही सापडत नसत. 'इयं आकाशवाणी. संप्रती वार्ताया श्रुयंतां. प्रवाचिका विजयश्री' असे खणखणीत शब्द संस्कृत बातमीपत्राच्या सुरवातीला कानी पडत, ते फार गोड वाटत. आता टीव्हीच्या किंचाळणाऱ्या निवेदकांना कंटाळून बातम्या फक्त 'वाचतो', ऐकत नाही.

बापरे, रेडिओच्या लेखामुळे एवढे स्मरणरंजन ! तरुणपण सरतंय, दुसरं काय :-)

बापरे, रेडिओच्या लेखामुळे एवढे स्मरणरंजन ! तरुणपण सरतंय, दुसरं काय :-)>>>>
अहं, स्मरण चांगले आहे तुमचे, म्हणजे अजूनही तरुणच आहात ! ☺️
अनेक धन्यवाद

वन's picture

15 Feb 2019 - 2:42 pm | वन

क्रिकेट समालोचनात सर्वात आवडते म्हणजे सुरेश सरय्या . किती मधाळ बोलणे अन ओघवती भाषा.याउलट अनंत सेटलवाड त्यांच्या इंग्रजाळलेल्या उच्चारांनी नाही आवडले.गावस्करना गवासकर म्हणायचे तेव्हा असा राग यायचा….

समीरसूर's picture

15 Feb 2019 - 2:45 pm | समीरसूर

नव्वदच्या दशकात विविध भारतीवर सकाळी साडे आठ वाजता 'चित्रलोक' हा कार्यक्रम लागायचा. अतिशय फिल्मी पद्धतीने नवीन चित्रपटांची जाहिरात आणि नवीन गाणी या कार्यक्रमात ऐकवली जायची. मला हा कार्यक्रम खूप आवडायचा. या कार्यक्रमातले निवेदक अतिशय रंगतदार पद्धतीने चित्रपटांची जाहिरात करत असत.

जब जब इस धरती पर पाप की आंधी मंडराने लगती हैं, तब तब उसे तबाह करने के लिए आता हैं (मोठ्ठं म्युझिक) - वीरुदादा!!!

जब जुल्म अपनी हद पार कर देता हैं और हर तरफ सिर्फ खौफ का राज चलता हैं तब मासूम लोगों को इस जुल्म के दरिया से बचाने के लिए आता हैं एक मसीहा (ढीश्श्श्श) - शहेनशहा!!! - अंधेरी रातों में, सुनसान राहोंपर, हर जुल्म मिटाने को ऐसा एक मसीहा निकलता हैं.......अमिताभ बच्चन की बेहतरीन अदाकारी, चुलबुली मीनाक्षी, और खौफनाक अमरीश पुरी....जिसे लोग शहेंनशहा कहते हैं....जी हां, जब शहेनशहा आते हैं, रास्ते रुक जाते हैं, आसमान झुक जाते हैं और शैतान छुप जाते हैं...ऐसे बहादूर देखे हैं थोडे, जुल्मो-सितम के जंजीर तोडे, पीछे पडे तो पीछा ना छोडे, बडा जोर हैं उसके हाथों में....अमर-उत्पल का जोशिला संगीत, किशोर कुमार की बुलंद आवाज...अंधेरी रातों मे, सुनसान राहों पर....देखना ना भुलिए! शहेनशहा!!!! (ढीश्श्श्श)

अनिंद्य's picture

15 Feb 2019 - 3:00 pm | अनिंद्य

गहजब ! धमाल !

शेहनशाहच्या जाहिरातीचा शब्द न शब्द बरोब्बर आहे, कानफाडू म्युझिकसकट आठवतेय :-)
ह्या जाहिरातीचे टेक्स्ट निर्माता निर्देशक टिनू आनंदने स्वतः लिहून दिले होते.

कुमार१'s picture

15 Feb 2019 - 6:35 pm | कुमार१

समीरसूर, अनिंद्य,
तुमच्या आठवणी खूप रोचक आहेत.

वन,
सुरेश सरय्या यांच्याबद्दल सहमत. तसेच हिंदी क्रीडा समालोचनाचा बाप म्हणजे जसदेवसिंग. काय जोशपूर्ण बोलायचे ते. मराठीत बाळ पंडित, करमरकर सुद्धा काय छान क्रिकेट समालोचन करायचे.

कुमार१'s picture

15 Feb 2019 - 6:35 pm | कुमार१

समीरसूर, अनिंद्य,
तुमच्या आठवणी खूप रोचक आहेत.

वन,
सुरेश सरय्या यांच्याबद्दल सहमत. तसेच हिंदी क्रीडा समालोचनाचा बाप म्हणजे जसदेवसिंग. काय जोशपूर्ण बोलायचे ते. मराठीत बाळ पंडित, करमरकर सुद्धा काय छान क्रिकेट समालोचन करायचे.

गामा पैलवान's picture

15 Feb 2019 - 10:20 pm | गामा पैलवान

कुमारेक,

अभियांत्रिकीचा अभ्यास आम्ही रेडियो ऐकंतच केला. रात्री १००० च्या कार्यक्रमापासनं ११३० बेलाके फूल पर्यंत छान अभ्यास व्हायचा. नंतर टेप लावून करायला लागायचा.

लेखातलं चित्रं व्हॉल्व्हच्या रेडियोचं दिसतंय. माझ्या लहानपणी मला जिथे दिवसभर ठेवायचे त्यांच्याकडे होता. मात्र उंचावर असल्याने हात पोहोचायचा नाही. तसंही पाहता लहानांना हात लावायला मनाई असे कारण त्याला बऱ्याचदा सणसणीत शॉक बसायचा.

रेडियोवर सकाळी मंगलप्रभात कार्यक्रम लागायचा तो आठवतो. त्यात (की त्याच्या आधी?) रामदास कामतांच्या धीरगंभीर पहाडी आवाजात गायलेलं शिवतांडवस्तोत्र कोणे एके काळी ऐकलं होतं. नंतर बऱ्याच दशकांनी जालावर शोधाशोध करतांना कुठेतरी एमपी३ मिळाली. एकदा का रामदास कामतांचं ऐकलं की तूनळी वरची सुगम वा पॉप सारखी गायलेली स्तोत्रं आजिबात ऐकवंत नाहीत. माझा कान तयार करण्यामागे रेडियोचं योगदान आहे.

आठवणी जागवल्याबद्दल आभार!

आ.न.,
-गा.पै.

Nitin Palkar's picture

25 Feb 2019 - 3:04 pm | Nitin Palkar

शिवतांडवस्तोत्र सुषमा स्वराज यांनी त्यांच्या एका सत्काराला उत्तर देताना म्हटल्याचा विडिओ मध्यंतरी बघितल्याचे आठवते .... https://www.youtube.com/watch?v=vgVWy2MYNJ0&t=6s या लिंक वर पाचव्या मिनिटाला त्यातील काही भाग आहे.
https://www.youtube.com/watch?v=6N9ejXpAopg रामदास कामत

सुषमा स्वराज यांचं पूर्ण स्पीच खूप छान आहे. धन्यवाद त्यासाठी.
रागा ने असं भाषण दिलं की मी आयुष्यभर काँग्रेस ला व्होट करायला मोकळा. ;)

कुमार१'s picture

16 Feb 2019 - 9:09 am | कुमार१

माझा कान तयार करण्यामागे रेडियोचं योगदान आहे.>>>
अगदी सहमत !
गाण्यांची सोबत अजूनही हवीशी वाटते.

लई भारी's picture

19 Feb 2019 - 5:27 pm | लई भारी

मी अगदी बिनाका गीतमाला ऐकलं नसलं तरी दररोज सकाळी 'सिलोन' वरच्या हिंदी गाणी ऐकत अभ्यास करायचो.

माझ्या वडिलांचं रेडिओ वर प्रचंड प्रेम. सकाळच्या भक्तिगीतांपासून रात्रीच्या हिंदी गाण्यापर्यंत 'बॅकग्राऊंड' ला चालू असायचाच. आजपण त्यांना घरी रेडिओ चालू लागतोच.
आमच्याकडे कधी टेप आला नाही पण त्यांच्याकडे १९७० चा रेडिओ होता, वरती चित्र आहे तशाच प्रकारातला. आणि त्याकाळी प्रचंड क्रेझ होती असं कळतंय. वैशिष्ट्य म्हणजे भावा-भावांची वाटणी झाली तो कागद बघितलाय मी; त्यात काकांच्या वाटणीला बैल आणि वडिलांना तो 'रेडिओ'! मला खात्री आहे ही वडिलांचीच इच्छा असणारं :)
त्या जुन्या रेडिओ मध्ये बिघाड झाल्यावर गेल्या १० एक वर्षात त्यात एफएम रिसिव्हर बसवून घेतला होता, अगदी अलीकडे पर्यंत खणखणीत वाजत होता.

आमच्याकडे 'सांगली' आकाशवाणी चा दबदबा होता, एफएम येई पर्यंत. इतर गोष्टींसोबत नभोनाट्य खूप आवडीने ऐकायचो. काही पुस्तकांची अभिवाचन पण.
अलीकडेच मी पुणे आकाशवाणी वर 'शारदा संगीत' ऐकलं होत.

पदवी झाल्यानंतर नोकरी रुजू होण्यासाठी २-३ महिने होते आणि प्रचंड पाऊस होता त्यावेळी विविधभारतीच अक्ख शेड्युल पाठ होत आणि त्यामुळेच तो काळ सुसह्य होता.

१० वीला बोर्डात आल्यावर शहरातल्या क्लासवाल्यानी रेडिओ जाहिरातीत नाव वापरल्यामुळे सगळीकडे फेमस झालेला गावातील एक मुलगा पाहण्यात आहे!

अलीकडे वडिलांना सारेगामाच 'Carvaan' घेऊन दिल. खुश झालेत ते.
पण आपलं आवडत गाणं संग्रही असलं तरी अचानक रेडिओ वर ऐकण्यातली मजा वेगळीच आहे!
बऱ्याच आठवणी आहेत. विस्कळीत होतंय, त्यामुळे थांबतो :)

विनिता००२'s picture

20 Feb 2019 - 9:52 am | विनिता००२

आपलं आवडत गाणं संग्रही असलं तरी अचानक रेडिओ वर ऐकण्यातली मजा वेगळीच आहे! >> अस गदी अगदी :)

कधीतरी मूड खराब असेल, उदास असेल, अशा वेळी अचानक आवडते गाणे ध्यानी मनी नसतांना कानावर पडले की मूड अगदी बदलून जातो. जाता जाता एखादाच शब्द, म्यूझीकचा तुकडा कानावर आला की परत फिरुन पूर्ण गाणे ऐकावे असे खूपदा वाटते :)

कुमार१'s picture

19 Feb 2019 - 6:15 pm | कुमार१

धन्यवाद

त्यात काकांच्या वाटणीला बैल आणि वडिलांना तो 'रेडिओ'!>>>
हे तर लैच भारी हो !!
तुम्ही जपून ठेवलात की नाही तो ? ☺️

मेघमल्हार's picture

19 Feb 2019 - 7:58 pm | मेघमल्हार

लहानपणी रात्री रेडिओवर "आपली आवड" हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम, बेलाके फूल हे कार्यक्रम विशेष करून ऐकायचो. दिवाळी दिवशी पहाटे नरकासुर वधाच कीर्तन असायचं.

वन's picture

20 Feb 2019 - 8:34 am | वन

लई भारी,
खूप छान प्रतिसाद !
जेव्हा फिलिप्स चे टू इन वन नवे होते तेव्हा त्याचे काय अप्रूप असायचे. लग्नाच्या रुखवतात ते हमखास दिसायचे. आमच्या संसारातील पहिला रेडिओ असाच रुखवतातून आलेला आहे.

जगभरातील रेडिओ ऐकण्याची सोय इथे आहे.

http://radio.garden/

कुठलाही देश निवडा, सुंदर आहे.

श्वेता२४'s picture

20 Feb 2019 - 3:50 pm | श्वेता२४

मला 8-9 वीत असताना सखी सहेली, जयमाला हे कार्यक्रम आवडायचे. पण रेडिओचा सर्वात जास्त आधार वाटायचा ते भारताची क्रीकेट मॅच असेल तर आणि नेमकी लाईट गेली तर. आमच्या शहरात औद्योगिक क्षेत्र जास्त असल्याने दिवसातले 6-7 तास लोड शेडींग ठरलेलेच. अशावेळी ऐन रंगात आलेली क्रीकेटची मॅच लाईट गेल्यामुळे रेडीओवर ऐकायला मिळायची. ते समालोचन इतके जिवंत असायचे की सामना प्रत्यक्ष पाहातोय असंच वाटायचं. कधी नव्हे ते आम्ही बच्चे कंपनी पीनड्रॉप सायलेन्स मोडमध्ये आणि फोर किंवा सिक्स पडला की एकच गलका....... खरंच खूप छान दिवस होते ते.

कुमार१'s picture

20 Feb 2019 - 8:22 pm | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
श्वेता,
रेडीओवरचे क्रिकेट समालोचन इतके जिवंत असायचे>>>>+१११

जेव्हा टीव्ही नव्याने आला होता तेव्हा त्यावरचे समालोचन अगदी संथ नि रटाळ वाटायचे. मग आम्ही त्याचा आवाज बंद ठेवून त्याच्या डोस्क्यावर रेडीओ लावायचो. हा संयोग जबरदस्त वाटे !

मी वैद्यकीय शिक्षण घेतानाची एक आठवण रंजक आहे. आमचे एक practical चालू होते. त्यात प्रत्येकाजवळ स्टेथोस्कोप होता. त्याच दिवशी एक क्रिकेट कसोटी रंगात आलेली. मग त्या वर्गातच एका मुलाने एप्रनच्या खिशात छोटा रेडीओ ठेवला होता आणि त्याचा आवाज शून्यावर. मग हळूच त्याने एप्रनच्या त्या खिश्यावर स्टेथोस्कोप ठेवला आणि मस्तपैकी तो समालोचन ऐकत होता. मात्र काही वेळाने प्राध्यापकांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी त्याला मस्त पकडले !

नाखु's picture

21 Feb 2019 - 8:40 am | नाखु

नक्की कधी माझ्या बालपणी सवंगडी झाला ते फारसं लक्षात नाही पण वडील हयात असेपर्यंत (सन १९७६) ला पुण्यात येऊन (काकाकुवा मॅनशन गल्लीत) परवाना नूतनीकरण करून घेत असत ते स्वच्छ आठवते.
त्या दिवशी पुण्यातील बर्याच कामांसोबत प्रभातला शिनुमा, संतोष भुवनला दोसा अशी चंगळ असायची.
वडीलांच्या अकस्मिक निधनानंतर आजोळी (दुर्गम भागातील दुष्काळी गावात) दोन वर्षं होतो,आजोबा फिलिप्स रेडिओ अगदी कानावर लाउन बातम्या, बाजारभाव आणि साप्ताहिक किर्तन आवर्जून ऐकत असत.
कधीकधी मोठी बहीण त्यावर विविधभारती लावायची पण आजीची नजर चुकवून किंवा बोलणी खायला लागू नये म्हणून अगदी हळू आवाजात.सेलवर असल्यानेच अगदी जपून वापरला जाई (तेंव्हा आजोळी वीज नव्हती,आता आजोळच नाही)
नंतरच्या काळात वसतिगृहात मात्र अगदी सख्खा सोबती झाला, क्रिकेट कॉमेन्ट्री ते छायागीत सर्व ऐकून वयात आलो.
बिनाका हा विषय जिव्हाळ्याचा आणि पैजा लावण्याचा असे इतका त्याचा प्रभाव होता.
आताही दूरदर्शन बंद केले असले तरी विविधभारती रोज ऐकायला आवडते पण इतर वाहिन्यांनी अतिक्रमण केले आहे आणि मुलांची आवड इतर खाजगी वाहिन्या आहे.
भालचंद्र जोशी,सुधा नरवणे ह्या खणखणीत आवाजात बातम्या देणारी काही नावे.
कुमार बर्याच जुन्या आठवणी खपल्या निघाल्या.
आज दिवसभर आठवणीत जाणार

कुमार१'s picture

21 Feb 2019 - 9:45 am | कुमार१

मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
या धाग्याच्या निमित्ताने अनेक रेडीओप्रेमी लिहिते झाले आणि सर्वांचेच छान स्मरणरंजन झाले.

हिंदी बातम्यांचे अनभिषिक्त ‘दादा’ निवेदक होते देवकीनन्दन पान्डेय ! बघा हे आठवून....
"यह आकाशवाणी है अब आप देवकीनन्दन पान्डेय से समाचार सुनिये"

त्यांनी तब्बल ४५ वर्षे बातम्या वाचल्या.

तर इंग्लिश बातम्यांची ‘राणी’ म्हणजे लुतिका रत्नम.
त्यांच्या खास इंग्लिश उच्चारांमुळे त्यांचे नाव नीट कळायला मला बराच काळ लागला.
....
कुमारभाऊ, आठवणी संपायची चिन्हे नाहीत....

नाखु's picture

21 Feb 2019 - 12:02 pm | नाखु

वार्तापत्र लख्ख आठवते.
आकाशवाणी संप्रतित वार्ता शुयरतांन,प्रवाचक बलदेवा,आणि शेवटी इति वार्ता: असं काहीसं असायचं

समीरसूर's picture

25 Feb 2019 - 11:15 am | समीरसूर

बलदेवानंद सागरः :-)

"प्रधानमंत्री ने कहा हैं की हम देश की अखंडता बरकरार रखने के लिए हर कदम उठायेंगे..."

"निकटतम प्रतिद्वंद्वी" हा निवडणूक असतांना नेहमी ऐकायला येणारा प्रकार होता.

सुधा नरवणे स्टार होत्या त्या काळात...

सुधीर कांदळकर's picture

23 Feb 2019 - 8:40 pm | सुधीर कांदळकर

आठवणींच्या आकर्षक रंगीबेरंगी कॅलिडोस्कोपची दुनिया उघडून दिली आहेत आपण. सूर्यजित सेन इंग्रजी बातम्या द्यायचे. १९७२च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत त्यांनी इंग्रजीत आणि जसदेवसिंगनी वेगवान आणि बहारदार समालोचन केले होते. क्रिकेट न कळणार्‍या, अनाकर्षक वाक्यरचना करणार्‍या सुरेश सरय्यांनी मात्र अतीच पिळले. नंतर ते कमी झाले म्हणून की काय ते दूरदर्शनवरही आले. सेटलवाड, डिकी रत्नागर मात्र मजा आणत. नंतर त्याम्च्या जोडीला पिअर्सन सुरीता आले.

बीबीसीवरचे ब्रायन जॉन्स्टन आणि जॉन आर्लोट. एबीसीवरचा ख्रिस्तोफर मार्टीन जेन्किन्स, पहिल्या टाय टेस्ट्चा साक्षीदार जॉन आर्लोटच होता. सॉलोमनचे थ्रो आणि आर्लॉटचे समालोचन, वाहवा!

रविवारचे क्रिकेट विथ विजय मर्चन्ट, त्यांचे कॉलिन्ग अरूवा, त्यानंतरचे इन्स्पेक्टर ईगल, त्यामधले जबरदस्त साउंड इफेक्ट्स, सॅन्टोजिन की महफिलमधल्या आवाजांची वैशिष्ट्यपूर्ण जातकुळी आणि लकब, सारेच आठवावे.

मुंबई ब आकशवाणीवरील शुक्रतारा गाणे भावसरगम मध्ये प्रथम सुधा मलहोत्रा आणि अरुण दातेंनी म्हटले होते. या कार्यक्रमात कवी स्वतः प्रथम गीताची ओळख करून देत असे. पाडगांवकरांचे शुक्रतारा गीत ओळख करून देणेही बहारदार होते. विंदांचे ’मागू नको सख्या, जे माझे न राहिले रे' मस्त होते.

किती आठवू आणि किती नको असे झाले आहे. बहारदार लेखाबद्दल धन्यवाद.

ता.क. सखी सहेली अजूनही चालू आहे. त्यातली ममता सिंगही अजून आहे.

कुमार१'s picture

23 Feb 2019 - 9:54 pm | कुमार१

सुधीर, धन्यवाद.

तुम्ही बी बी सी च्या आठवणी सांगितल्या हे लै बेश. मी ते कधी ऐकले नव्हते.
बांगला देश जेव्हा प्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागले तेव्हाचे समालोचन आठवते. त्यांचे आपल्याबरोबरचे पाहिले काही कसोटी सामने हे ‘अनधिकृत’ धरले जायचे. त्यात आपण त्यांचा धुव्वा उडवत असू. तेव्हाच्या शालेय वयात आम्हाला त्याचे काय कौतुक वाटायचे.

आपकी फरमाइशमध्ये आपण कधी न ऐकलेल्या काही गावांची नावे चित्रविचित्र असायची. “खरंच, अशी गावे असतात का” असाही प्रश्न तेव्हा पडे. आज या धाग्याच्या निमित्ताने त्यातील दोन गावे मी जालावरून खात्री करून घेतली ! ती अशी:
झुमरीतलैया (झारखंड).
भाटापारा (छत्तीसगड)

तेव्हा मी एकदा माझ्या मोठ्या बहिणीला विचारले होते की या कार्यक्रमात पुणे, मुंबई, बंगलोर अशा शहरांतून कोणीच फरमाइश पाठवत नसते का? त्यावर तिने असे स्पष्टीकरण दिले होते. मोठ्या शहरांत आपली आवडती गाणी ऐकण्यासाठी रेडीओ व्यतिरिक्त टेपरेकॉर्डर वगैरेच्या सोयी उपलब्ध असतात. पण अगदी लहान गावांत लोक गाणी ऐकण्यासाठी केवळ रेडीओवरच अवलंबून असतात.

चौकटराजा's picture

24 Feb 2019 - 9:57 am | चौकटराजा

आकाशवाणी ...दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे....... ललिता नेने , कुसुम रानडे , सदाशिव दीक्षित , सुधा नरवणे , शरद चव्हाण , गोपाळ मिरीकर, विजया जोशी ई ई
दिस इज ऑल इंडिया रेडिओ ..द न्यूज रेड बाय .. बरून हालदार, पामेला सिंग, सुशील झवेरी , एम के धर्मराज , बी एम चक्रपाणी ,लतिका रत्नम ई ई
सांप्रति वार्ता श्रुयंनतां .. प्रवाचक: बलदेवा आनंद सागर: ,,, विजयश्री ई ई .

मराठीच विश्व .. जयराम कुलकर्णी , शोभा चितळे , उषा अरगडे , विजया जोशी , नीलम प्रभू , बाळ कुरतडकर, प्रभाकर जोशी , परशराम सामंत , नाना , हरबा, ताई, बंडा जोशी ई ई

क्रिकेट क्रिकेट , -- विजय मर्चंट , फतेसिंग गायकवाड , अनंत सेटलवाड , केकी तारापोर, राजू भारतन , सुशील चतुर्वेदी , नरोत्तम पुरी , बाळ पंडित , सुरेशचंद्र नाडकर्णी , जसदेव सिंग ई ई

कार्यक्रम -, आमचे आम्ही, बालोद्यान , संगीत सरिता, हवामहल, बेला के फूल , बिनाका.,कामगार सभा , आमची माती आमची माणसे , गुलदस्ता , प्रपंच , भूल बिसरे गीत, दो रंग दो पहलू दो गीत ,बाजार भाव,, मंगल प्रभात जयमाला , मन चाहे गीत . ई ई

काही गावे .. झुमरी तालैय्या , राजानंदगाव ,करीम नगर, रतलाम , भाटा पारा , बल्लारशाह

काही जाहिराती .. गं मग माक्याच तेल का लावत नाहीस ? ,,, लोमा टाइम ,,,,, डारकंस हेअर इफेक्टीव्हली , वॊशिंग पावडर निर्मा ,,, कालनिर्णय घ्याना ..... ई ई

काही अविस्मरणीय सिग्नेचर ट्यून्स , शेतकरी मंडळ पुणे, गृहिणी मुंबई , बालोद्यान पुणे, हवामहाल दिल्ली , आपली आवड पुणे , आकाशवाणी ची सकाळ सुरुवातीची धुन .
विविध भारतीची पहिली जाहिरात .. स्वीटेक्स

कुमार१'s picture

24 Feb 2019 - 10:10 am | कुमार१

@ वन,
पण अगदी लहान गावांत लोक गाणी ऐकण्यासाठी केवळ रेडीओवरच अवलंबून असतात. >>>>
बरोबर, आणि ३०-४० वर्षांपूर्वी तसेच असावे. सैनिकांसाठी जो ‘जयमाला’ कार्यक्रम सुरु झाला, त्याकाळी हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांत पोचणारे रेडीओ हेच माध्यम असावे.

@ चौरा,
तुम्ही सुंदर ‘रेडीओपट’च उलगडला आहे. छान !

ऋतुराज चित्रे's picture

24 Feb 2019 - 12:44 pm | ऋतुराज चित्रे

क्रिकेट क्रिकेट , -- विजय मर्चंट , फतेसिंग गायकवाड , अनंत सेटलवाड , केकी तारापोर, राजू भारतन , सुशील चतुर्वेदी , नरोत्तम पुरी , बाळ पंडित , सुरेशचंद्र नाडकर्णी , जसदेव सिंग ई ई

पहिले हिंदी क्रिकेट कॉमेंटेटर सुशील दोषींना विसरून कसे चालेल ? ... साफ आसमान, खुली हुई धूप, रह रह तक चलती हवा। ... गेंदने बल्लेका भीतरी किनारा लीया और ... बाल बाल बचे

चौकटराजा's picture

24 Feb 2019 - 9:26 pm | चौकटराजा

माळा वाटते मला सुशील दोशीच म्हणायचे होते .......गेंद लुढकती अंडर की तराफा कट होती हुई ... पूरी तरहा चूके वाले तेच ना ,,,,,, ?

अमेरिकन त्रिशंकू's picture

10 Aug 2019 - 12:57 am | अमेरिकन त्रिशंकू

सुशील दोशी आणि रवि चतुर्वेदी.
लाला अमरनाथ पण एक्स्पर्ट कॉमेंटरी करायचा.
रॉजर बिन्नी ला रॉजस बिन्नी म्हणायचा.
आणि सारखं मोहिन्दर आणि सुरिन्दर अमरनाथचं कौतुक करायचा.

वन's picture

24 Feb 2019 - 1:03 pm | वन

सुशील दोशी>>>>
अरे, अगदी मस्त आठवण काढलीत !एकदम सही.

बाकी ते विंग्रजी समालोचन चालू असताना मध्ये मध्ये ‘expert comments by…’ असा व्यत्यय असायचा. त्यातले काही तज्ञ बरे असायचे. पण, लाला अमरनाथ मात्र बोअर मारायचे. मला तो छान चाललेल्या समालोचनातील रटाळ व्यत्यय वाटायचा.

मराठी_माणूस's picture

24 Feb 2019 - 2:35 pm | मराठी_माणूस

सुशील दोशी>>>> अजुन एक आठवण. दिवसाच्या शेवटी हमखास येणारे एक वाक्य "सुरज ढलता हुआ और लंबी होती हुई खिलाडीयोंकी परछाईंया"

कुमार१'s picture

24 Feb 2019 - 2:27 pm | कुमार१

पट उलगडतोच आहे तर अजून एक सांगण्याचा मोह होतोय.

आठवण आहे १९७१च्या भारत-पाक युद्धादरम्यानची. आम्ही मुले शालेय वयात. तेव्हा रेडीओवर युद्धाची वार्तापत्रे प्रसारित होत. त्यातली काही हिंदी तर काही इंग्लिशमधून. त्याचे प्रसारण सुरु झाले की घरतील सर्व वडीलधारे रेडीओपुढे जमत आणि अगदी कान लावून ऐकत. माझ्या आजोबांना हिंदी थोडे तर इंग्रजी बिलकुल समजायचे नाही. मग ते वार्तापत्र संपले की माझे काका आजोबांना त्याचा गोषवारा नीट मराठीत सांगत. मग ते अगदी समाधानी दिसत.

आम्हा मुलांना मात्र त्या वयात युद्धाचे गांभीर्य तितकेसे समजत नव्हते.

चौकटराजा's picture

24 Feb 2019 - 9:27 pm | चौकटराजा

बॉबी तल्यार खान !!

ऋतुराज चित्रे's picture

25 Feb 2019 - 7:52 am | ऋतुराज चित्रे

काही अविस्मरणीय सिग्नेचर ट्यून्स
कामगार विश्वची सिग्नेचर ट्यून हुरहूर लावायची, शाळेत निघायची तयारी करावी लागायची.
सुरवातीला दूरचित्रवाणी आकाशवाणीचा लोगो आणि सिग्नेचर ट्यून वापरायचे.
विविध भारतीची पहिली जाहिरात .. स्वीटेक्स
स्वीटेक्स? साल सांगू शकाल का ?

अवांतर : दरदर्शनची पहिली दृष्य-श्राव्य जाहिरात .. पॉइंट डिर्टजन पावडर .

कुमार१'s picture

25 Feb 2019 - 8:06 am | कुमार१

आठवतेय का कुणाला? व्हाल्वच्या रेडीओच्या काळात ही असायची. पावसाळ्यात रेडीओ-प्रसारण नीट ऐकू येत नसे. मग रेडीओपासून एक धातूची तार जोडून पुढे ती गच्चीवर नेली जाई. तिथे त्याला जाळीसारखे काहीतरी जोडलेले असे. कधी वादळ व जोराच्या पावसात तेही तुटून जाई. मग ते दुरुस्त करत बसा.

पुढे ट्रांझिस्टर आल्यावर त्याचीच अंगभूत एरिअल आली आणि हे सगळे प्रकार संपले.

ऋतुराज चित्रे's picture

25 Feb 2019 - 8:17 am | ऋतुराज चित्रे

आठवतंय की , रेडिओची पीन उलटी ( टू पिन ) लागल्यास त्या पितळी जाळीला शॉक बसायचा. जाळी खराब झाल्यास आम्ही तांब्याच्या भांड्यात मिठाचे पाणी घालून त्यात एरियल ची तार बुडवून ठेवायचो,त्यामुळे रेडिओ सिग्नल व्यवस्थीत पकडायचा. रेडिओ मॉस्को तर बीबीसी सारखं खणखणीत ऐकू यायचे.

ऋतुराज चित्रे's picture

25 Feb 2019 - 8:19 am | ऋतुराज चित्रे

सापाच्या कातीसारखी असायची ती रेडियोची लांब जाळी.

वन's picture

25 Feb 2019 - 9:41 am | वन

@ ऋतुराज,

आम्ही तांब्याच्या भांड्यात मिठाचे पाणी घालून त्यात एरियल ची तार बुडवून ठेवायचो >>>>>

हे प्रकार भारीच आहेत! माहिती नव्हते.
एरियलचा प्रयोग आम्ही होस्टेलला असताना केलेला आहे. जवळ छोटा ट्रांझिस्टर असायचा. बरेचदा त्याला खरखर व्हायची. मग लांब वायर आणून हा उद्योग करायचा.

रेडीओमधील स्टेशन्स ३ bands मध्ये विभागली असायची: MW, SW-१ &२. साधारण गृहिणी व मुले यांचे काम MW (पुणे, मुंबई – अ व ब, विविध भारती इ.) यात भागायचे. संध्याकाळी वडील, काका ही मंडळी band बदलून SW वर जायची .तिथे मग BBC आणि इतर विदेशी स्टेशन्स लागत. Band बदलण्यासाठी रेडीओच्या बाजूस एक चक्राकार खटका असायचा. त्याला मुलांनी हात लावायचा नाही, अशी सक्त ताकीद असायची.

शब्दबम्बाळ's picture

25 Feb 2019 - 11:27 am | शब्दबम्बाळ

छान लेख आणि आठवणी!
धागा शीर्षक वाचून, आधी वाटलं मन कि बात वगैरे आहे कि काय?! ;) तिकडे पण नुसतं ऐकायलाच लागतं...
सारेगम कारवा हा रेडिओ कम म्युसिक प्लेयर आहे आत्ता, छान दिसतो पण महाग आहे जरा.
img

कुमार१'s picture

25 Feb 2019 - 11:44 am | कुमार१

शब्दबम्बाळ, धन्यवाद.
एकदम कडक फोटू आहे राव ! मस्त.

मन कि बात वगैरे आहे कि काय?! ;) तिकडे पण नुसतं ऐकायलाच लागतं...>>>>
अहो, या धाग्यावरचे ‘ऐकणे’ एकदम सुमधुर आहे !

अभ्या..'s picture

25 Feb 2019 - 11:53 am | अभ्या..

आकाशवाणी भारीच,
विशेषतः सोलापूर मिरज सारख्या भागात आकाशवाणी गुलबर्गा वगैरे ऐकायचे. सांगली आकाशवाणी गाण्यांच्या कार्यक्रमासाठी छान होती. त्यांच्या अ‍ॅडस पण छान असायच्या. राधिकाची वस्त्रे छान, रतीमदनाची शान, सपट आणि डीएस चहा, शिवाय खडे बाजार बेळगावच्या काही रेडीमेडच्या जाहिराती सतत असायच्या.
सोलापूर आकाशवाणीचे फोन फर्माईश वगैरे तर इतके फेमस होते की नकलाकार दीपक देशपांडेंनी त्याचा वापर कार्यक्रमातील किश्श्यांसाठी केला आहे. सोलापूरच्या आकाशवाणीने तयार केलेल्या "अय्या मंजू हा लग्नातला शालू व्ही आर पवारकडून घेतलेला का?" अशा जाहिराती अजुनही एफेमचॅनलवर आणि एसटी श्टँडवर वाजवल्या जातात.
पुणे आकाशवाणीचे शेतिविषयक कार्यक्रमातील टिपिकल बोजड शब्द आणि कृत्रिम भाषा मजेदार असायची. त्यानंतरचे बाजारभाव "पुणेकृषिउत्पन्नबाजारसमितीकडूनआलेलेआजचेशेतीमालाचेभाव" ऐकायला मज्जा यायची. कांदा लासलगाव, निफाड, तूर बार्शी, नारळ कुंभकोणम असले शब्द रेग्युलर रिपिट असायचे. त्यातच फुलांचे पण भाव साम्गितले जात.
दिवाळीत पहाटे हमखास किर्तन असायचे.
कधितरी बटने फिरवून पाहायच्या प्रयोगात रेडीओ मास्को वगैरे स्टेशने सापडलेली होती. एका पॉप स्टेशनावरचे "पास द डॉचा पॉला" हे गाणे बरीच वर्षे डोक्यात राह्यलेले होते. ते नंतर दुसरीकडे कुठेही इअकायला मिळाले नाही. डायरेक्ट यु ट्युबवरच ऐकायला मिळाले.
एफेमच्या स्पर्धेत खरेतर आकाशवाणीला फुल्ल वाव होता, नेटवर्क आणि माणसे होती, सरकारी ग्यारंटी होती. अनुभव होता. (बर्‍याचशा एफेम चॅनलचे रिसिव्हर अजुन आकाशवाणीच्या सेटपवरच आहेत) पण प्रायव्हेट एफेमसारखा कंटीन्युअस टकळी चालवायचा धंदा सरकारी आकाशवाणीला नीटसा जमला नाही हेही तितकेच खरे.

सिरुसेरि's picture

25 Feb 2019 - 9:40 pm | सिरुसेरि

छान आठवणी . सांगली आकाशवाणीवर बुधवारी रात्री आवडत्या मराठी गीतांचा "आपली आवड" हा कार्यक्रम असे . यामधे बरेचदा माननीय बकुल पंडीत यांनी गायलेले "उगवला चंद्र पुनवेचा" हे सुरेल नाट्यगीत लागत असे . रात्रीच्या शांत , धीरगंभीर वातावरणात हे सुमधुर गाणे ऐकण्यात वेगळीच जादु असे .

कुमार१'s picture

26 Feb 2019 - 12:41 pm | कुमार१

जागतिक रेडीओ दिनाच्या निमित्ताने केलेल्या या धाग्यातील आवाहनास आपण सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार !
टीव्हीपूर्व काळातील रेडीओ-कार्यक्रम, बातम्या, निवेदक, गायक, क्रीडा समालोचक, जाहिराती आणि विविध केंद्रांची खास वैशिष्ट्ये या सगळ्यांचा छान उहापोह झाला.

रेडीओ-उपकरणातील स्थित्यंतरे, परवाना व त्याचे नूतनीकरण, एरीअल व त्याचे प्रयोग आणि रेडीओच्या संगतीत केलेला अभ्यास आणि त्याच्याशी निगडीत दिवसाचे वेळापत्रक याही गोष्टींच्या आठवणी सुखद होत्या. आजही आपल्यातील काही जण टीव्हीपेक्षा रेडीओचेच शौकीन आहेत; तो त्यांना मोलाचा सोबती वाटतो.

सर्व रेडीओप्रेमींना त्याचे श्रवणसुख असेच मिळत राहो, या सदिच्छेसह आपला निरोप घेतो.

क्या बात! सुंदर विषय आणि तितकेच सुंदर प्रतिसाद...
प्रत्येक प्रतिसाद वाचायला जी मजा आली ती शब्दातीत आहे.

कुमार१'s picture

27 Feb 2019 - 7:50 pm | कुमार१

टर्मिनेटर,
तुमचा प्रतिसादही सुंदर ! त्यामुळे आता हा धागा सुफळ संपूर्ण झाला असे म्हणतो.

कुमार१'s picture

11 Jul 2019 - 10:48 am | कुमार१

प्रसिद्ध माजी इंग्रजी वृत्तनिवेदक बरुण हालदार यांचे
नुकतेच निधन झाले. रेडिओ वर इंग्रजी बातम्या वाचण्यात त्यांचा हातखंडा होता. भाषेच्या शुद्धतेविषयी ते आग्रही असत. अनेक सहकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या तालमीत तयार केले.

श्रद्धांजली !

कुमार१'s picture

9 Aug 2019 - 9:51 pm | कुमार१

माजी क्रिकेट समालोचक श्री. अनंत सेटलवाड यांचे नुकतेच निधन झाले. इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व आणि शब्दांचा अफाट संग्रह ही त्यांची खासियत होती.

श्रद्धांजली !

माझ्या लहानपणी एक खिशात मावेल इतका रेडिओ ट्रान्सिस्टर मिळायचा फक्त 100 रुपयांमध्ये. त्याला छोटा अँटेना देखील असायचा. त्यामध्ये मग विविध भारती वरील कार्यक्रम, आणि लोकल आकाशवाणी वरील कार्यक्रम ऐकायचो. विशेष करून हॅलो फर्माईश आणि आपली आवड हे दोन कार्यक्रम कधी चुकवत नसे.
आज कोणतेही गाणे किंवा कार्यक्रम एक सेकंदात शोधून ऐकता व पाहता येतो पण त्यावेळेला एक गाणे लागले मग ते कोणतेही असो, सर्व कामे सोडून ते ऐकत बसायचो. त्यात जी मजा होती ते मी आत्ता शब्दात सांगू शकत नाही.

तो रेडिओ छोट्या सेल वर चालायचा. 10 रुपयाला 4 सेल मिळायचे आणि एकदा बदलले कि मग 5-6 दिवस तरी चालायचे. त्या वेळी लोक सेल ला "मसाला" असे म्हणायचे. सेल संपले कि आम्ही ते फेकून न देता घराच्या छतावर ठेवायचो, उन्हाने तापले कि मग पुन्हा के काही वेळ चालायचे.

रेडिओ खराब झाला कि मग त्याला नीट करने देखील हळू हळू जमू लागले. पण तो नीट होण्याच्या पलीकडे गेला असेल तर मग त्याचे पार्ट जसे कि अँटेना, साऊंड, लोहचुंबक इ. काढून जमा करून ठेवायचे.

सायकल आणि रेडिओ यांचेदेखील अतूट नाते होते. सायकल ला तो छोटासा रेडिओ ट्रान्सिस्टर तारेने बांधून फुल्ल आवाज करून आपल्या सायकल वर देखील म्युजिक सिस्टिम असल्याचा फील आम्ही घ्यायचो. आज कार मध्ये हजारो रुपयांची म्युजिक सिस्स्टम आहे पण लहानपणीच्या सायकल + रेडिओ कॉम्बिनेशन ला जी मजा आणि आनंद होता तो आज नाही...

जगात जरा उशिरा पदार्पण केल्यामुळे आकाशवाणी म्हणावी तितकी कधी ऐकलीच नाही. :( पण इतकं आठवतंय कि लाइट गेले कि बाबा कॉमेंटरी रेडिओवर ऐकायचे. बाकी आजी आणि बाबांकडूनच रेडिओच्या गोष्टी ऐकल्या आहेत. आणि आता मोठं झाल्यावर FM च ऐकत आलो. हे सगळं वाचून काहीतरी मोठं मिस झाल्यासारखं वाटतंय.. :(

कुमार१'s picture

10 Aug 2019 - 12:20 pm | कुमार१

बाप्पू आणि हर्मायनी,
प्रतिसाद आवडले.

* तर मग त्याचे पार्ट जसे कि अँटेना, साऊंड, लोहचुंबक इ. काढून जमा करून ठेवायचे.
* आज कार मध्ये हजारो रुपयांची म्युजिक सिस्स्टम आहे पण लहानपणीच्या सायकल + रेडिओ कॉम्बिनेशन ला जी मजा आणि आनंद होता तो आज नाही...

+ १११११