एका चंद्रभासासाठी : एक आस्वाद

Primary tabs

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Feb 2019 - 4:56 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

एका चंद्रभासासाठी

माझ्या मातीला केव्हाची निळी लागली तहान एका चंद्रभासासाठी उभे आयुष्य गहाण तसे रक्तरमांसातून किती शब्द उगवले त्यांचे तान्हेपण सुध्दा रूप- गुण ल्याले त्यांचे जावळ हुंगले, जिणे गेले नाही व्यर्थ आता आईपणासह बाईपणाही कृतार्थ तशी नव्हते कृतार्थ आताआताशा कळते जेव्हा काळजाच्या तळी निळी तहान रडते आता एकदाच फक्तय गाणी उराशी धरून हाक अज्ञात भासांना देते प्राणांच्या आडून आणि सांगते मनाला, ‘बाई असेच असते पोर वाढावे म्हणून नाळ तोडावी लागते’ आता व्हायचीच माझी गाणी माझ्यातून दूर त्यांना वाढता वाढता मिळो गगनबहर त्यांनी स्वतंत्र वाढावे माझ्यापार मोठे व्हावे देहभावाच्या पल्याड त्यांनी असीम झेलावे माझा चंद्रभास व्हावा त्यांच्या भाळावर टिळा तरी बाईपणासाठी, त्यांचा भरू यावा गळा
- अरुणा ढेरे
(कविता-रती, दिवाळी 1987)

‘एका चंद्रभासासाठी’ ही कविता कविता-रती दिवाळी 1987 च्या अंकात प्रकाशित झाली होती. ही कविता त्यावेळी किमान दहा बारा वेळा तरी वाचली असेल. कविता इतकी भावली की ती माझ्याकडून आस्वादच मागू लागली. तिच्या आस्वादाची मला निळी तहानच लागली होती, असे म्हटले तरी चालेल. कवितेचा आस्वाद वैयती लागक कल्पनेतून केलेला असला तरी प्रस्तुत अभ्यासकाने कवितेतील शब्दार्थांचे अनुसरण करतच अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात कवितेचा अर्थ उलगडवण्यापेक्षा कवितेच्या ओळीओळीत अगदी सरळ अर्थ उलगडत जाईल अशी कवयित्रीचीच सहज सोपी शब्दयोजना आहे.
या आस्वादात कवयित्रीपासून कवितेची नाळ तोडून तिच्याकडे एक स्वतंत्र निर्मिती म्हणून मी पहात आहे. माझ्या मातीला केव्हाची निळी अदृष्ट तहान एका चंद्रभासासाठी उभे आयुष्य गहाण
या ओळी वाचून त्यांचा स्वतंत्रपणे अर्थ लावता येईल असे धागे सापडत नाहीत. म्हणून ‘मी’ हा अजून तो आहे की ती हे स्पष्ट व्हायचे आहे. या मी चा मातीला म्हणजेच त्याच्या नैसर्गिक प्रेरणेला- ऊर्जेला कशाची ‘निळी अदृष्ट तहान’ लागलेली आहे तेही अजून पुढील ओळींत स्पष्ट व्हायचे आहे. आणि ज्यासाठी उभे आयुष्य गहाण ठेवावे असा ‘चंद्रभास’ नक्की कशाचे प्रतीक आहे तेही अजून ठळकपणे दृगोचर होत नाही.
तसे रक्तृमांसातून किती शब्द उगवले त्यांचे तान्हेपण सुध्दा रूप- गुण ल्याले
सुरूवातीच्या दोन ओळीतले काही अर्थ इथे उलगडतात. हा मी शब्दांशी खेळणारा प्रतिभावंत असला पाहिजे. आणि या शब्दांच्या कलाकृतीतल्या तान्हेपणात या मी ने माणसाच्या तान्हुल्याचे रूप गुण पाहिले आहेत. त्यांचे जावळ हुंगले, जिणे गेले नाही व्यर्थ आता आईपणासह बाईपणाही कृतार्थ
आतापर्यंतच्या सर्व शब्दांर्थांचे आणि प्रतीयकांचे अर्थ इथे कवितेतच उलगडले आहेत. हा मी म्हणजे एक स्त्री आहे, हे पहिल्यांदा इथे कळते. आणि तिची अदृष्ट निळी तहान एका अपत्यासाठी- एका चंद्रभासासाठी आहे. पण ती आपले उभे आयुष्य शब्दांशी खेळण्यात घालवत आहे. शब्दांतून प्रातिभ निर्मिती करीत आहे. आणि त्या निर्मितीलाच आपले अपत्य मानीत आहे. त्या निर्मितीलाच ती अपत्यासारखी आंजारत गोंजारत आहे. जशा एखाद्या आईने आपल्या अपत्याचे ओले जावळ हुंगावे. आपण शब्दातून निर्मिती करीत असताना आईपणाच्या गर्भवेदना सहन केलेल्या आहेत आणि आदिम परंपरेचा बाईपणाही जपला आहे. आपण कृतार्थ झालो आहोत, असे या कवितागत स्त्री ला वाटते,
इथे तिच्या विचारांचा पहिला आघात संपतो आणि तिचं मन आता कोलांटी उडी घेतं. तशी नव्हते कृतार्थ आताआताशा कळते जेव्हा काळजाच्या तळी निळी तहान रडते
पहिल्या आघातात, आपण गाण्यांनी का होईना पण गर्भधारणेच्या वेदना आणि आईपणाच्या संवेदना अनुभवतो असे ही स्त्री म्हणत असली तरी, मी तशी कृतार्थ नाही असे आता तिला वाटू लागते. तिच्यातील आदिम स्त्री जागी होताच तिच्या नैसर्गिक प्रेरणेची निळी तहान काळजाच्या तळी म्हणजे स्त्री च्या अनुबंधात रडू लागते. आता एकदाच फक्ता गाणी उराशी धरून हाक अज्ञात भासांना देते प्राणांच्या आडून या नैसर्गिक प्रेरणेला ती वास्तवात शरण जाऊ शकत नसली तरी दिवास्वप्नांना ती आता हाका मारू लागली आहे. तिची नैसर्गिक प्रेरणा तिच्या धेयासक्तीनपेक्षा वरचढ ठरू लागल्याचा तिला प्रत्यय येऊ लागला. या दिवास्वप्नांची पुर्तता वास्तवात करता येत नाही म्हणून आता ती गाणी उराशी कवटाळते. म्हणजे त्या गाण्यांतूनच आपल्या भासांना साद घालते. हाक मारते. तिच्या शरीराच्या संवेदना ती आपल्या गाण्यातून टिपते. आविष्कृत करते. निळ्या तहानेला कुरवाळते. थोपटते. आणि वेसनही घालण्याचा प्रयत्न करते.
आणि सांगते मनाला, ‘बाई असेच असते पोर वाढावे म्हणून नाळ तोडावी लागते’
अशा प्रयत्नातूनच ती मनाला बजावते, हे असेच असते मना, जर तुला कलावंत व्हायचे असेल. जर तुझे पोर म्हणजे तुझे गाणे असेच वाढवायचे असेल, त्यांना कलाकृतीचा थोरपणा मिळवून द्यायचा असेल तर तुझ्या बाईपणापासून तुझी नाळ तोडावी लागेल, तरच तुझे ध्येय सफल होईल. इथे पोराची नाळ अभिप्रेत नसावी, तर कलावंताची लौकीक जीवनापासून दूर ठेवण्याची ही नाळ आहे.
इथे या कलावंत स्त्रीच्या विचारांचा दुसरा आघात संपतो. आणि तिसरा आघात सुरू होतो. आता व्हायचीच माझी गाणी माझ्यातून दूर त्यांना वाढता वाढता मिळो गगनबहर
माझी गाणी माझी नाळ तोडून- माझ्या सीमा पार करून मोठी व्हावीत. त्यांचा लौकीक आकाशापर्यंत वाढावा. पण मी यात कुठेही असू नये असे आता या कलावंताला वाटते. मी सुध्दा या गाण्यांकडे इतरांसारखे तटस्थतेने पाहू शकेल असे बळ मला मिळावे. असे पसायदानच या तिसर्या भागात सुरू होते. त्यांनी स्वतंत्र वाढावे माझ्यापार मोठे व्हावे देहभावाच्या पल्याड त्यांनी असीम झेलावे माझ्या गाण्यांनी माझ्या कुबड्या टाकून द्याव्यात. स्वतंत्रपणे वाढावे. देहभावाच्या वेदना, संवेदना त्यांना माझ्यासारख्या भेडसावू नयेत. (म्हणूनच मी शब्दांची अपत्य जन्माला घातलीत.)
माझा चंद्रभास व्हावा त्यांच्या भाळावर टिळा तरी बाईपणासाठी, त्यांचा भरू यावा गळा
माझा चंद्रभास जो मला ग्रासतो आहे. तो चंद्रभास म्हणजे माझी गाणीच आहेत. म्हणून त्यांच्या भाळावर माझा सदैव टिळा राहणार असेल तर मी चंद्रभासासाठी वांझ आहे असे कोणी कसे म्हणू शकेल? मात्र तरीही त्यांनी आई होण्याचा बाईपणाच सोडून द्यावा असे मात्र नाही. तर त्यासाठी त्यांचा नेहमीच गळा भरून यायला हवा. तरच त्यांना माझा टिळा मिरवण्याचा अधिकार. बाईपणासाठी जर कोणाचा गळाच भरून येणार नसेल तर त्याच अनुभूतीतून जन्मलेले माझे गाणे थोर तरी कसे होईल? असे पसायदान शेवटच्या आघातात ही कलावंत स्त्री मागू लागते. सहा सहा ओळींच्या तीन तीन संघातांनी कलावंताच्या लौकीक व अलौकीक भावनांचे नाट्यचित्रण करून ही कविता इथे संपते.
(‘शब्दमल्हार’ जानेवारी 2019 च्या अरुणा ढेरे विशेषांकात प्रकाशित. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

साहित्यिकसमीक्षा

प्रतिक्रिया

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Feb 2019 - 4:52 pm | डॉ. सुधीर राजार...

310 वाचक धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Feb 2019 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितेचा भावार्थ चांगला उलगडून दाखवला आहे.
लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Feb 2019 - 7:14 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद डॉक्टर साहेब