पहिल्या भागात आपण पाहिले की पॉन्झी स्किम कशा आकाराला येतात व कशा नष्ट होतात. सोबत नष्ट होतात अनेक आयुष्ये, स्वप्ने आणि खूपसारा कष्टाचा, घामाचा पैसा. चला, पैसा तर पुन्हा कमावल्या जाऊ शकतो पण विश्वासाला जो जबरदस्त तडा जातो तो आयुष्यभर भरुन येत नाही. अशी माणसे मग पुढे कोणताही व्यवहार करतांना साशंक राहतात, किंवा व्यवहार करतच नाहीत. त्यांची आर्थिक प्रगती खुंटते.
या भागात आपण पाहू पॉन्झी स्किम्स कशा ओळखाव्या, त्यापासून कसे दूर राहावे.
सर्वप्रथम, पॉन्झी स्किमकडे लक्ष देण्यापूर्वी आपण आपल्या स्वतःच्या आर्थिक परिस्थितीकडे बघावे. आपले खर्च, इन्कम, नियोजन, विमापॉलिसी व शेअर-जमीन-सोने यातली गुंतवणूक योग्य प्रकारे झालेली आहे का? त्यात काही गोंधळ असेल तर तो बघावा. तुमचे खर्च हे तुमच्या इन्कमपेक्षा जास्त होत चालले आहेत का? तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे व तो फेडण्यास तुम्ही सक्षम नाही असे वाटत आहे का? अनेक आकस्मिक खर्च उभे राहीले आहेत व झटपट विनासायस कोणी पैसे देईल अशी तुम्हाला खात्री वाटत नाहीये. तुम्ही स्वतःला खूप हुशार समजता. सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ह लोभी / हावरट आहात. ही सगळी लक्षणे तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही पॉन्झी स्किमवाल्यांसाठे अतिशय उत्तम गिऱ्हाईक आहात. या स्किममध्ये फसणारी लोकं अशाच कोणत्या न कोणत्या परिस्थितीत असतात. तेव्हा आपल्याकडे आधी लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा योग्य तो आराखडा तुमच्यासमोर राहायला हवा. पैसे नसतील तर हिंमत ठेवावी, लगेच खचून जाऊ नये. खचून जाणे हतबल करतं आणि हतबल झालं की विनासायास कोण्यान कोण्या जाळ्यात आपण अडकले जातो.
पॉन्झी स्किम्स ओळखण्याचे साधे सोप्पे नियम.
ह्या योजना अवास्तव दावे करत असतात. महिन्यात पैसे दुप्पट. महिन्याला दहा टक्के व्याज, वगैरे अचाट दावे असतात. हे खरे वाटू शकतात, पण जगात आजवर अशी कोणतीही पद्धत अस्तित्वात आलेलीच नाही ज्याने महिन्याला, तीन महिन्याला पैसे दुप्पट होतील. कधीतरी कोणाला तरी जॅकपॉट लकीली लागतो, पण तो नियम नव्हे. ते नशीब. दावे करुन जॅकपॉट लागत नसतात. दुसरे असे की कंपनीचा प्रत्यक्ष व्यवसाय काय आहे हे कोणालाही ठावूक नसते. कंपनीचे कोणतेही उत्पादन नसते, सेवा नसते, कुठेही कारखाने, ऑफिसेस ज्यात खरेखुरे काम होत असते ते नसते. कोणतेही सेवा-उत्पादन नसल्याने कोणतेही ग्राहक नसतात. केवळ एकच ऑफिस व पैसे गोळा करणारे एजंट्स असतात. हे एजंट्स अल्पावधीतच प्रचंड श्रीमंत झालेले असतात. कंपनीचे संचालक गोड बोलून स्वप्ने दाखवण्यात पटाईत असतात. कंपनीचे बिझनेस मॉडेल तुमच्या प्रांतात नसते, ते कुठेतरी दुसर्या राज्यात, दुसर्याा देशात असते, जिथे तुम्ही स्वतः जाऊन तपासू शकत नाही.कंपनी आपल्या गुंतवणूकीच्या योजनेला रिस्कफ्री, गॅरंटीड रिटर्न्स अशा नावाने सांगत असते. हे अगदी सोपे सुटसुटीत चारपाच नियम आहेत पॉन्झी स्किम्सपासून स्वतःला वाचवायचे.
तरीही लाखो लोक फसत आले आहेत. भारतातले आजपर्यंतचा सर्वात मोठा चिटफंड घोटाळा, शारदा चिटफंड स्कॅम नावाने ओळखला जातो. यात अवघे पश्चिम बंगालसह ओडिसा, त्रिपुरा, आसाम ह्या चार राज्यातल्या १७ लाख लोकांना तीस हजार कोटींना फसवण्यात आले. हा स्कॅम इतका मोठा होता की ह्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला हलकासा भूकंपाचा धक्का बसला. शेकडो एजंटांनी आत्महत्या केल्या, शेकडो लोक तुरुंगात गेले. अनेकांची आयुष्यभरची कमाई बुडाली.
नाशिकमध्ये गेल्या दोन तीन वर्षात गाजलेला घोटाळा म्हणजे केबीसी स्कॅम. सुमारे पाच हजार ते दहा हजार कोटींचा हा घोटाळा भाऊसाहेब चव्हाण नावाच्या साध्यासुध्या दिसणाऱ्या , पुर्वाश्रमीचा स्टोअरकीपर असलेल्या माणसाने घडवून आणला. महाराष्ट्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यात केबीसीने धुमाकूळ घातला. सर्व रक्कम गोळा करुन चव्हाण सिंगापूरला आपल्या कुटूंबियांसह पळून गेला आहे व गुंतवणूकदार पोलिस व न्यायालयाकडे चकरा मारत आहेत.
पॉन्झी स्किमच्या ऑफर्स भुरळ पाडणाऱ्या असतात. अविश्वसनिय असूनही त्या पैसे देत असतांना दिसतात म्हणून लोक मोहात पडतात. समोर दिसत असलेली संधी, चालून येत असलेली लक्ष्मी धुडकावता येत नाहीत. इतर लोक कसे वेडे आहेत, आपणच कसे हुशार ठरू ह्या ओवरकॉन्फिडन्समधून लोक धोके ओळखू शकत नाहीत. आपला मोह आवरता येत नाही, हा मोह शिकाऱ्याने लावलेला गळ असतो. त्या मोहाला भुलणारे सर्वस्वी दोषी असतात. तेव्हा सुरुवातीलाच गुंतवणूकीच्या सर्व योजना काटेकोरपणे तपासून, सेबी सारख्या शासकिय मान्यताप्राप्त संस्थेकडे त्याची नोंद आहे का, स्थानिक कर-विभागाला व संबंधित सरकारी यंत्रणेला सदर कंपनीच्या स्किमबद्दल माहिती आहे का, कंपनीची सर्व माहिती खरी व वैध आहे का या सगळ्या गोष्टींची खातरजमा करुन मगच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. फसवणूक झाल्यानंतर मारायच्या चकरा आधीच मारल्या तर निदान पैसे गमावण्याचे दु:ख व मनस्ताप तरी होणार नाही. चांगल्या स्किम्समध्ये, वैध व मान्यताप्राप्त कंपन्यांत योग्य सल्लागारांमार्फत गुंतवणूक केली तर ती समाधान व परतावा उत्तम देते.
प्रतिक्रिया
28 Jan 2019 - 6:19 pm | विजुभाऊ
उत्तम महिती