पहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २ बेल्जियमवरचा बलात्कार

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
7 Jan 2019 - 12:56 pm

पहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २
बेल्जियमवरचा बलात्कार

मागील भागात आपण श्लीफेन योजना आणि त्याद्वारे जर्मनीने बेल्जियमवर हल्ला का केला हे पहिले. आता आपण ह्या भागात बेल्जियमचा लढा आणि पुढे काय झाले ते पाहूयात

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तर ४ ऑगस्ट १९१४रोजी जर्मन सैन्याने बेल्जियमची हद्द ओलांडली. जर्मनीने तीन प्रमुख सैन्यदलांकरवी साधारण साधारण साडे सात लाख सैन्य बेल्जियम मध्ये उतरवले होते.(वरचा नकाशा पहा) पहिल्या सैन्य दलाचा प्रमुख होता फॉन क्लुक

बेल्जियम मध्ये राजधानीचे शहर ब्रुसेल्स आणि इतर नामुर, अँटवर्प, मॉन्स, आणि लीज ही महत्वाची शहरे. त्यापैकी नामुर, मॉन्स आणि लीज शहराभोवती भक्कम तटबंदी, खंदक आणि इतर जय्यत संरक्षण व्यवस्था होती. बेल्जियमच्या एकूण २ लाख सैन्यापैकी दीड लाख सैन्य ह्या तीन ठिकाणच्या किल्ल्यातच एकवटलेले होते. जर्मनहद्दी पासून सर्वात जवळचे म्हणजे फक्त ४० किमी आत असलेले शहर म्हणजे लीज. हे अत्यंत महत्वाचे शहर होते. ब्रुसेल्स कडे जाणारे तसेच बेल्जीयम मध्ये जाणरे सगळे महत्वाचे रस्ते, लोहमार्ग ह्या शहरातूनच जात त्यामुळे इथली तटबंदी अतिशय भक्कम होतीच शिवाय ह्या तटबंदी भोवती १० किमी च्या त्रिज्येवर आणि एकमेकापासून चार किमी अंतरावर बुलंद अशा बारा किल्ल्यांची मालिका होती. हे किल्ले म्हणजे आपण वाचतो तसे जुन्या काळातले किल्ले नव्हते तर सिमेंट कॉंक्रीटने बांधलेल्या भक्कम अर्ध-भूमिगत गढ्या होत्या. लीज आणि नामुर इथल्या ह्या गढ्या किंवा किल्ले १८८० साली हेन्री ब्रियाल्मा ह्या नामवंत इंजीनियरने बांधल्या होत्या. एकट्या लीज भोवतीच्या किल्ल्यांत २३ हजार सैनिक, ४०० लांब पल्ल्यांच्या तोफा अनेक छोट्या, उखळी तोफा, असंख्य मशिनगंन्स आणि प्रचंड प्रमाणात दारुगोळा अशी जय्यत तयारी होती. त्याकाळी सगळ्या युरोपात लीजचा हा गढ अभेद्य मानला जाई. लीजचा पाडाव झाल्याशिवाय जर्मन सैन्याला पुढे जाता येणे शक्य नव्हते आणि त्याचे कारण होते लोहमार्ग. लीज मधून सर्व बेल्जीयमभर आणि फ्रेच सीमेपर्यंत रेल्वे जात असे आणि त्याचे मुख्यालय लीज इथेच होते म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवून तेच लोहमार्ग वापरून जर्मन् सैन्याला फ्रेंच हद्दीपर्यंत पोहोचवण्यासाठी जर्मनांना लीज काबीज करणे भाग होते.
१९०४ सालच्या रुसो-जपान युद्धात पोर्ट आर्थर हे रशियन तटबंदीचे बंदर जपानी आक्रमणाला तोंड देत ९ महिने झुंजले होते तर त्यापेक्षा किती तरी अधिक भक्कम लीज कमीतकमी तितका वेळ तरी जर्मनांना झुंजवत राहील असा फ्रेंच आणि बेल्जियन सेनापातीन्चा विश्वास होता.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जर्मनीने तीन सैन्यदलामधून(Armies) साधारण साडेसात लाख सैन्य बेल्जियम मध्ये घुसवले होते. त्यांचा प्रमुख होता जनरल फॉन ब्युलो. पहिले सैन्यदल राजधानी ब्रुसेल्स काबीज करून पुढे फलॅण्डर्स इथून फ्रान्स मध्ये घुसणार होते तर दुसरे दल लीज, नामुर, मॉन्स जिंकत फ्रांस मध्ये घुसून परीस कडे कूच करणार होते.तिसरे सैन्यदल अर्देन्स्च्या निबिड जंगलाच्या उत्तरेकडून बेल्जियमच्या भूप्रदेशातून कूच करत फ्रांस मध्ये घुसणार होते.चौथ्या सैन्यदलाने दोन दिवस आधीच लग्झेम्बर्ग मधून आर्देन्सच्या जंगलाच्या दक्षिण बाजूने फ्रान्सच्या दिशेने आगेकूच सुरु केलेली होती.

दुसर्या तुकडीतून बाजूला काढलेले ६ बिगेड्स सैन्य म्हणजे साधारण २५-३० हजार सैनिक जनरल फॉन एमिखच्या नेतृत्वाखाली लीज कडे कूच करू लागले.लीज जवळच्या विझे गावात म्युझ नदीवरच्या पुलाजवळ बेल्जियन निमलष्करी दलाच्या तुकडीने त्यांची वाट अडवली. तुकडीचा कमांडर होता जॉन डान. इथे बेल्जीयन आणि जर्मन सैन्यात पहिली चकमक उडाली. आता निमलष्करी दलाचा जर्मन सैन्यापुढे काय पाडाव लागणार. त्याचा विरोध लगेच मोडून काढत जर्मन सैन्य पुढे घुसले. ह्या चकमकीत ऑगस्ट ब्युको आणि ज्यां पियरे हे दोन बेल्जियन जवान मारले गेले. ते दोघे पहिले वहिले बेल्जीयन शहीद ठरले. आजही त्यांचे स्मारक विझे गावी आहे. ह्या लहान चकमकी मुळे जर्मन सैन्याचा आत्मविश्वास दुणावला आणि आपल्याला पुढेही असाच नाममात्र विरोध होणार असे समजून ते थोडे बेसावध झाले. ४ ऑगस्टलाच जर्मन सैन्याची पहिली फळी विझे गावाच्या पुढे म्युझ नदीच्या तीरावर आली. बेल्जियन सैन्याने पूल आधीच पाडून टाकले असल्याने त्याना बोटी तराफे ह्यांच्या साह्याने नदी ओलांडावी लागली. इथे नदीचे पात्र चांगले २०० यार्ड (६०० फूट) लांब आहे आणि प्रवाह शांत होता. पहिल्या फळीने अर्ध्याहून अधिक अंतर कापले असेल तोच जवळच्या पोंटीस आणि बर्कोन किल्ल्यावरून मशीनगनचा तुफान मारा सुरु झाला. हा मारा इतका जबरदस्त होता कि जर्मनाना काही काळ माघारच घ्यावी लागली. दुसरा दिवशी त्यानी सोबत आणलेल्या उखळी तोफांच्या साह्याने मारा करत परत हल्ला चढवला पण त्या अभेद्य तटबंद्यांचा ह्या जर्मन छोट्या तोफांच्या माऱ्याने टवकाही उडाला नाही. त्यादिवशी देखील जर्मन सैन्य माघारी गेले.पण त्यानी तोफांचा आणि मशिनगन्सचा भडीमार मात्र सतत चालूच ठेवला. ह्यामुळे बेल्जियन सैन्याला वाटले कि पोर्ट आर्थर प्रमाणे आता हा वेढा इथेच दीर्घ काळ चालणार. वावटळीप्रमाणे आलेला जर्मन सैन्याचा झंझावात आपण इथे यशस्वीपणे रोखलाय. आता इंग्लंड आणि फ्रांस कडून कुमक येईपर्यंत त्याना फक्त इथेच झुन्जवायचे काम बाकी आहे. त्यामुळे ते थोडे निश्चिंत झाले. जर्मन तोफांच्या आणि मशीन गन्स च्या सततच्या माऱ्याने त्याना नक्की कुठे काय चालले आहे हे समजणेही अवघड झाले होते. ते तटबंदीत- भक्कम चिलखती घुमटीत (cuppola- - ह्याच्या आत ३६० अंशात फिरू शकणार्या तोफा असत .) सुरक्षित असले तरी बाहेर पडून प्रतिकार ही करू शकत नव्हते. ५ तारखेच्या रात्री १४व्या जर्मन ब्रिगेडने विझे गावाच्या दक्षिणेकडून फ्लोरेन आणि इव्हीनी ह्या किल्ल्यांच्या मधून जर्मन तोफांच्या आणि मशिनगन्सच्या माऱ्याचा आडोसा घेत लीज शहराकडे कूच करायचे ठरवले पण पहिल्या काही तासातच त्यांचा कमांडर फॉन बुसाव ठार झाला आणि सैनिकात गोंधळ मजला, सैनिक हतोत्साहित झाले आणि मागे हटू लागले. तेव्हा एरीख फॉन लुडेनडोर्फ हा सैन्याधिकारी पुढे आला. तो काही १४व्य ब्रिगेडचा अधिकारी नव्हता तर बर्लिनहून नियुक्त केला गेलेला संपर्काधिकारी होता आणि त्यावेळी त्याचा हुद्दा होता क्वार्टर मास्टर जनरल. त्याचे काम होते लीज काबीज केल्यावर पुढच्या सैन्य हालचालीत सुसूत्रता आणणे. पण १४व्या ब्रिगेडचा कमांडर मारला गेला आणि सैनिकात गोंधळ माजला आहे हे पाहून त्याने सैन्याची सूत्रे हातात घेतली आणि सैनिकाना धीर देऊन आपली आगेकूच चालूच ठेवली . इतर जर्मन सैन्य ही तोफांचा आणि गोळ्यांचा भडीमार करत होतेच. त्या गोंधळाचा आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्याची तुकडी मुख्य शहर लीज च्या तटबंदीपर्यंत येऊन पोहोचले. गोंधळ तर एवढा झाला होता कि लुडेनडोर्फला ही वाटले लीज शहरात जर्मन सैन्य घुसले आहे आणि त्यानी तटबंदीचा काही भाग तरी काबीज केलेला आहे. त्यामुळे त्याने अक्षरश: आपल्या फक्त एका सहकाऱ्याच्या बरोबरीने शहरात प्रवेश केला. तर काय आश्चर्य शहरात प्रवेश करणारे ते दोघे पहिलेच जर्मन होते आणि मुख्य म्हणजे ते दोघेच होते, त्यांच्या मागून येणारे सैन्य अजून तटबंदीपर्यंत पोहोचलेच नव्हते. पण अजिबात न घाबरता त्याने कमरेचे पिस्तुल उगारत शहरातील बेल्जियन सैन्याला शरण येण्याचा हुकुम सोडला. शहरातले सैनिक आणि जनता एवढे गोंधळले होते कि त्याना शंका सुद्धा आली नाही कि हे दोघेच येथे आहेत . उलट त्यांची समजूत झाली कि हे दोघे इथे पोहोचले म्हणजे बाहेरील संरक्षक किल्ल्यांचा पाडाव झालाअसून विजयी जर्मन सैन्य आता लोंढ्या प्रमाणे शहरात घुसणार आहे. त्यामुळे गर्भगळीत होऊन त्यानी शस्त्रे टाकली आणि शरणागती पत्करली. साधारण २०० सैनिक त्याने एकट्याने बंदी बनवले, मुख्य म्हणजे शहरातले लोहमार्ग, रेल्वे गाड्या, त्यांचे नियंत्रण कक्ष आणि यंत्रणा सर्व काही जसेच्या तसे जर्मनांच्या हाती पडले. ह्या त्याच्या अतुलनीय कामगिरीबद्दल २२ ऑगस्ट रोजी स्वत: कैसरच्या हस्ते त्याला जर्मनीतील शौर्याचे सर्वोच्च पदक पौर ले मेरीट देऊन गौरवण्यात आले. एरीख फॉन लुडेनडोर्फहे नाव आणि ही व्यक्ती पहिल्या महायुद्ध्च्या इतिहासात अतिशय महत्वाची ठरणार होती. इतकी की युद्धाच्या शेवटच्या १ ते दीड वर्षाच्या कालखंडात तो सम्राट कैसारापेक्षाही महत्वाचा आणि जवळपास अख्ख्या जर्मन सैन्याचा आणि जर्मन जनतेचा हुकुमशहा बनणार होता.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मुख्य शहरावर ताबा मिळवल्यावर लगेच शहरात मोर्चे बांधणी करून आतून लुडेनडोर्फने बाहेरील किल्ल्यांवर भडीमार सुरु केला. आता मात्र ह्या किल्ल्यातल्या बेल्जियन सैन्याची अवस्था बिकट झाली. त्याना बाहेर पडून लीजवर हल्ला करून ते पुन्हा हस्तगत करण्याचा प्रयत्न सुद्धा करता येईना, बाहेरून जर्मन सैन्याचा मारा आणि हल्ले सुरु होतेच. तरीही बेल्जियन सैन्य शरण येत नव्हते . ह्या किल्ल्यामधल्या सैन्याचा सेनापती होता जनरल लेमान आणि तो ह्या १२ किल्ल्यांपैकी एका लोन्कीन इथल्या किल्ल्यात ठाण मांडून बसला होता तो आणि त्याच्या सैन्याने तशाही अवस्थेत १० दिवस म्हणजे १६ तारखे पर्यंत जोरदार लढा दिला. जनरल लेमान आणि त्याचे सैन्य अभेद्य किल्ल्यान्च्या आश्रय घेऊन लढतच राहताहेत आपल्याला ऐकत नाहीत असे पाहून लुडेनडोर्फने बर्लिनहून मोठ्या तोफा मागवल्या. ह्या होत्या स्कोडा ने बनवलेल्या १२ इंची व्यासाच्या मोडेल १९११ ह्या तोफा आणि क्रप्सने बनवलेल्या जगप्रसिद्ध बिग बर्था ह्या साडे सोळा इंची व्यासाच्या तोफा. ही बर्था त्याकाळी जगातली सगळ्यात मोठी तोफ होती.तेव्हाची मुलुख मैदान तोफच जणू. तो पर्यंत जमीनीवर जास्तीजास्त मोठी तोफ होती ११ इंची व्यासाची फ्रेंच मोर्सेर तोफ, नाही म्हणायला ब्रिटीश नौदलाकडे साडे तेरा इंची तोफा त्यांच्या ड्रेडनॉटप्रकारच्या युद्ध नौकावर बसवलेल्या होत्या. पण ही बिग बर्था म्हणजे अजस्त्रच होती, २४ फूट लांब आणि १०० टन वजनाची ही तोफ १८०० पौंड किंवा ८१६ किलो वजनाचा गोळा ९ मैल लांब पर्यंत डागत असे. बर्लिन हून ह्या तोफा इथे आणणे सोपे काम नव्हते मोठ्या मुश्किलीने त्या १२ ऑगस्ट रोजी लीज बाहेर पोहोचल्या आणि मग मात्र त्यानी बेल्जियन सैन्याकरता नरकाचे दरवाजेच जणू उघडले. ह्या महांकाळी बर्था आणि स्कोडापुढे बेल्जियन किल्ले मातीच्या ढेकळासारखे कोसळू लागले.चिलखती घुमटीच्या(cuppola) आत बसलेल्या सैनिकाना ह्या धडधडाटाने वेड लागायची पाळी आली. धूर धूळ आणि आवाज ह्याने त्यांच्या बंदिस्त जागा भरून गेल्या कित्येक बहिरे झाले अनेक घुसमटून मेले.अखेर १६ तारखेला जनरल लेमानचे मुख्यालय असलेला शेवटचा लोन्कीन हा किल्ला भुई सपाट झाला आणि लीज पडले. मातीच्या ढिगाऱ्याखाली बेशुद्धावस्थेत गाडला गेलेला जनरल लेमान जर्मनांच्या हाती लागला. त्याने नाईलाजाने शरणागती पत्करली. त्याला जेव्हा जनरल एमीख समोर नेण्यात आले तेव्हा आपली तरवार इमीख कडे सुपूर्त करताना (शरणागतीचे प्रतिक)तो म्हणाला “मला पकडले तेव्हा मी बेशुद्ध पडलो होतो ह्याची नोंद करायला विसरू नका.”(..म्हणजे नाहीतर मी लढत लढत मरण पत्करले असते पण शरण आलो नसतो) जनरल इमीख हा उमद्या व्यक्तिमत्वाचा सेनानी होता. त्याला शत्रूच्या शौर्याची कदर होती. त्याने मोठ्या सन्मानाने ती तरवार त्याला परत दिली. हे असे शत्रूंच्या देखील शौर्याचे आदर करणारे, उदारमनस्कतेचे दर्शन घडवणारे प्रसंग/परंपरा लवकरच इतिहास जमा होणार होत्या. असो..

लीज पडल्यावर बेल्जियन सीमेवर जमा झालेले जर्मन सैन्य लोंढ्या प्रमाणे आत घुसले. इथून पुढच्या नामुर अँटवर्प, मॉन्स,दिनांत इथल्या किल्ल्यांचा नि:पात कसा करायचा हे तंत्र माहिती झाल्याने तेथे यश मिळवायला जर्मन सैन्याला फारसे कष्ट पडले नाहीत. जर्मन वेळापत्रक लीज मुळे साधारण महिनाभरतरी लांबले असा दावा दोस्त राष्ट्रांनी नेहेमीच केलेला आहे त्यात मात्र फारसे तथ्य नाही , जर्मन सैन्य बेल्जीयम मध्ये घुसल्यावर राजधानी ब्रुसेल्स जिंकायला साधारण १५ दिवस लागतील असे श्लिफेन योजनेत गृहीत धरले गेले होते, त्याप्रमाणे प्रत्यक्षात २० ऑगस्ट रोजी ब्रुसेल्स पडले चारच दिवसांनी म्हणजे २४ ऑगस्ट ला नामुरही पडले. चाहु बाजूनी घेरले गेले तरी महिनोनमहिने बेल्जियमचे जे किल्ले शत्रूला दाद देणार नाहीत असे जे गृहीत धरले गेले होते त्या धारणेला ह्यामुळे जबर तडाखा बसला. ह्या नव्या प्रकारच्या युद्धात आता अनेक जुने आडाखे, जुनी गणिते कामाची नाहीत. सगळे हिशेब नव्याने मांडावे लागणार आहेत ह्याची जाणीव काही प्रमाणात चर्चिल आणि इंग्लंडचे युद्धमंत्री लॉर्ड किचनेर ह्याना झाली.पण फ्रेंच, ते त्यांच्या १९व्या शतकातल्या युद्ध तंत्रातच रमले होते...

नामुरच्या पतनाबरोबरच बेल्जियम सैन्याचा धीर आणि प्रतिकारही संपला आणि ते माघार घेऊ लागले. लवकरच जर्मनीने जवळपास ९०% बेल्जियम व्यापला.इप्रच्या पश्चिमेकडचा आणि उत्तर समुद्राला खेटून असलेला छोटासा भूभाग राजा अल्बर्टला फ्रेंच आणि ब्रिटीश सैन्याच्या मदतीने वाचवता आला. पुढची ४ वर्षे तो आणि त्याचे सैन्य इथूनच जर्मनीशी दोन हात करत राहिले.वारंवार सांगूनही त्याने इंग्लंडमध्ये आश्रय घेतला नाही. तो जर्मन व्याप्त सीमेवर उभ्या असलेल्या आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तेथेच राहिला आणि वरचेवर सीमेवरच्या सैन्य छावण्याना भेट देत राहिला. त्याच्या शूर, धीरोदात्त वागण्याने आणि जनतेच्या, सैनिकांच्या प्रती दाखवलेल्या निष्ठेने सगळ्यांनाच त्याच्या बद्दल आदर वाटत राहिला. हाच आदर म्हणून असेल किंवा तो कैसरचा चुलत भाऊ असल्याने असेल पण अनेकदा संधी येउनही जर्मन सैनिकांनी त्याला मारण्याचा किंवा साधे जखमी करायचा देखील कधी प्रयत्न केला नाही. अशी उदाहरणं मात्र एकूण युद्धात फार कमी होती आणि पुढे पुढे ती अधिकच दुर्मिळ होत गेली.

बेल्जियम वरचा बलात्कार

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

६ ऑगस्टलाच म्हणजे लीजने कडवा प्रतिकार सुरु करून जर्मन सैन्याचा भरधाव सुटलेला वारू रोखलयाला दोनच दिवस झाले असताना जर्मनीने लीज वर झेपेलिन वायुयानातून तुफान बोंब फेक केली होती. युद्धात सैन्याबरोबर जनता ही होरपळली जाते. पूर्वी ही असे होत असे, हे खरे, पण आता युद्धाचा, आक्रमणाचाच एक भाग म्हणून शत्रू राष्ट्रातील जनतेला लक्ष्य करून त्यांचा संहार करणे, त्यांच्यात दहशत पैदा करणे हे तंत्र अभिनव होते, क्रूर आणि अश्लाघ्य होते आणि पहिल्या महायुद्धात तरी ते प्रथम जर्मनानीच वापरले होते.एका अर्थी सांगायचे तर पूर्वी सैन्याने आक्रमण करताना शत्रू राष्ट्राच्या संरक्षक फळ्या भेदून त्यांच्या भुप्रदेशात शिरकाव केल्याशिवाय सर्वसामान्य जनतेला काही उपद्रव होऊ शकत नसे पण विसाव्या शतकात विमाने आणि वायुयान ही नवीन आयुधं सैन्याकडे आली.सर्व सामान्य जनतेत दहशत माजवणे आणि देशातील महत्वाची शहरं लष्करी ठाणी इ लक्ष्य करता यावीत म्हणून त्यांचा पहिल्या प्रथम वापर जर्मनानीच केला. विमानं तेव्हा अगदीच प्राथमिक अवस्थेत होती आणि त्यांचा सीमेलगत शत्रू सैन्याच्या हलाच्जली टिपणे भूप्रदेशाची छायाचित्रे घेणे थोडक्यात सांगायचे तर टेहेळणी करणे एवढाच मर्यादित उद्देश होता. ती इतकी नाजूक असत, वारंवार नादुरुस्त होत आणि कमी उंची वरून उडू शकत असल्याने शत्रूला सहज टिपता येत असल्याने वैमानिकांचे आयुष्य अक्षरश: तासात ते १-२ दिवसात मोजले जात असे.
दिनांत ह्या बेल्जियम- फ्रेंच सीमेजवळच्या शहरात जर्मन सैन्य पोहोचले तेव्हा त्यानी रस्ते, लोहमार्ग नदीवरचे पूल इ उध्वस्त केलेले पहिले. फ्रेंच आणि बेल्जियन सैन्याने प्रतिकार न करताच पळ काढला होता (तसे ते लीज पडल्यापासून पळतच होते म्हणा.) ह्या वेळे पावेतो जर्मन सैन्य सरासरी ३० किमी दररोज ह्या वेगाने आगेकूच करित होते आणि त्यामुळे बेल्जियन आणि फ्रेंच सैन्यात चांगलाच गोंधळ उडाला होता. एवढेच नव्हेतर शत्रू सैन्य कसे कुठे आहे ह्याची नीट खबर बात जर्मानानाही लागत नव्हती. अशात दिनांत गावी सैन्य फोचाल्यावर जर्मन सैन्य संध्याकाळच्या जेवणाची तयरी करत असताना म्हणजेच बेसावध असताना शहरातील घरातून इमारतीतून त्यांच्या वर गोळीबार सुरु झाला. काय होते आहे कळायच्या आत काही सैनिक मारले गेले अनेक जखमी झाले. थोडे सावरून त्यानी प्रतिकार सुरु केला आणि लगेचच विरोध मावळला. त्यानी लगेच शहराची नाकेबंदी करून घरांची झडती घेतली तर त्याना लपून बसलेले सैनिक त्यांना सापडले नाहीत म्हणजे आता जनताच घराघरातून गनिमी काव्याने आपल्यावर हल्ले करते आहे अशी समजूत होऊन जर्मनांचा पारा चढला. त्यानी सरळ सरळ ६०० सर्वसामान्य बेल्जियन नागरिकाना चौकात गोळा करून गोळ्या घालून मारले. त्यत महिला आणि मुलं सुद्धा होती. फक्त दिनांतच नाही तर बेल्जियम मधील सर्वच शहरातून गावातून असाच प्रतिकार जर्मनाना होऊ लागला. ह्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे ते सेनाधिकाऱ्याना कळत नव्हते आणि सैनिकाना तर अजिबातच कळत नव्हते. मग सूडाने पेटलेल्या जर्मन सैनिकांनी बेल्जियन जनतेला लक्ष्य करायला सुरुवात केली. आंदेन नावाच्या शहरातही दिनान्तचीच पुनरावृत्ती झाली.जर्मन सैनिकांनी ११८ सर्वसामान्य आणि नि:शस्त्र नागरिकाना भरचौकात गोळ्या घालून मारलं ह्यावर खरेतर जर्मन सेनाधिकाऱ्यानी किंवा त्यांच्या ही वरच्या अधिकाऱ्यानी, सेनापतींनी सैनिकाना समज देऊन सर्वसामान्य जनतेला त्रास न देण्याविषयी बजावायला हवे होते. तसा अंतरार्ष्ट्रीय कायदा ही होता (आणि आहे.) दोषी आणि अत्याचारी सैनिकावर कारवाई करून त्याना शिक्षा करायला हवी होती पण ह्या उलट जनरल फॉन ब्युलो सारख्या सेनापतींनी जाहीर पत्रकं छापून बेल्जियन जनतेला इशारा दिला कि जर त्यानी रस्ते, लोहमार्ग, नदीवरचे पूल उद्ध्वस्त करणे, इमारतीतून लपून छपून जर्मन सैन्यावर हल्ले करणे असे प्रकार केले तर ते जर्मन सैन्य विरुद्ध युद्ध करताहेत असा त्याचा अर्थ घेतला जाईल आणि मग त्याबदल्यात “जर्मन सेनाधिकाऱ्यानी असे गाव किंवा शहर जमीनदोस्त करावे आणि शहरातील संशयित माणसाना अटक करून सरळ गोळ्या घालाव्यात”. असे आदेश त्याने दिलेले आहेत. ह्याच आदेशानुसार तामीन शहरात ३८० नागरिकाना गोळ्या घातल्या गेल्या, तर रो सिंयोल गावी १८२ लोक मारले गेले. अशा डझनावारी घटना घडल्या पण क्रौर्याची परिसीमा गाठली गेली लुवेन शहरात . हे मध्ययुगीन, ऐतिहासिक वारसा लाभलेले देखणे शहर जर्मनांनी बेचिराख केले. खरेतर १९ ऑगस्टलाच हे शहर जर्मन फौजांनी काबीज केले होते पण २५ ऑगस्टला अँटवर्पहून आलेल्या बेल्जियन सैन्याच्या तुकडीने त्यांना बेसावध गाठून अचानक हल्ला केला आणि लगेच तेथुन पळूनही गेले. त्याचा सूड म्हणून पुढचे पाच दिवस जर्मन सैनिकांनी शहरात धुमाकूळ घातला अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती धर्मस्थळ बेचिराख केली सहा हजाराच्यावर स्त्री,पुरुष, मुलं, म्हातारे कोतारे मारले गेले अक्षरश: काही आठवड्यांची अर्भकं संगीनिनी भोसकून मारली. लुवेन विद्यापीठातील जगप्रसिद्ध ग्रंथालय जाळले तीन सव्वातीन लाखाच्या आसपास दुर्मिळ ग्रंथ,हस्तलिखितं आगीच्या भक्ष्य स्थानी पडली. हा सगळा नृशंस,क्रूर आणि घृणास्पद प्रकार बेल्जियमचा बलात्कार म्हणून इतिहासात कुप्रसिद्ध आहे.पण फक्त नागरिकांच्या केलेल्या कत्तली ह्या मध्ये येत येत नाहीत तर जर्मनांनी बेल्जीयम सारख्या देशाला अक्षरश: लुटून फस्त केले.खरेतर कोणत्याही कारणाने एखादा देश दुसर्या देशाने पादाक्रांत केला तर त्या देशाच्या नागरिकांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्या आक्रमणकारी देशाची असते ( इथे दुसरा देश आणि त्याचे नागरिक म्हणतो त्याचा अर्थ युरोपातील देश आणि त्याचे नागरिक बाकी आशिया आफ्रिका सारख्या खंडातील लोक ही माणसे आहेत असे त्याकाळी मानले जात नसे हे ध्यानात असूद्यात.)पण तसे काही न करता उलट चीज वस्तू पासून ते अन्न धान्य गुरे ढोरे सगळे जर्मनांनी लुटले आणि बेल्जियन जनतेला अक्षरश: उपाशी मरायला सोडून दिले.. बेल्जीयामामधील उद्योगधंदे, कारखाने त्यातील समान सुमान , यंत्रे , वाहने सगळे लुटून जर्मनीत नेले गेले , कामगार, शेतमजूर शेतकरी कारागीर असे लोक पकडून वेठबिगार म्हणून राबवायला जर्मनीत घेऊन गेले.

बेल्जियन नागरीकांकडून फुटकळ का होईना प्रतिकार होतोय हे पाहून केवळ काही सैनिकांनी संतापाच्या भरात बेल्जियन जनतेवर अनन्वित अत्याचार केले असा जो सर्वसाधारण ग्रह नंतर अनेक इतिहासकारांनी करून घेतला त्यात मात्र फारसे तथ्य नाही.आपल्याला त्याकरता जर्मनी आणि त्यापूर्वीचा प्रशिया, ह्यांची युद्ध आणि युद्ध करण्यामागची मानसिकता, तंत्र , ध्येय-धोरण ज्या प्रमाणे आखले जात असे त्याकडे पाहावे लागेल. ह्याचा उत्तम दाखला म्हणजे प्रशियन सेनानी कार्ल फॉन क्लाउजबिट्स ह्याने लिहिलेला “फॉम क्रीग” म्हणजे ‘युद्ध चिकित्सा’(on war) हा ग्रंथ . हा ग्रंथ म्हणजे युद्ध खोर प्रशियाचा आणि नंतर जर्मनीचा युद्धविषयक धर्मग्रंथच होता म्हणाना.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१८३२ साली हा ग्रंथ प्रकाशीत झाला, त्यानंतर आज पर्यंत म्हणजे जवळपास पावणे दोनशेहून अधिक वर्षात युद्ध, युद्धतंत्र, एकूणच युद्धाचे स्वरूप प्रचंड बदलले आहे, तरीही आजदेखील अनेक देशाच्या लष्करी प्रशिक्षणात ह्या ग्रंथातील तत्वांचा शिकवणुकीचा विचार केला जातो. जर्मन सेनानी मोल्टेके किंवा फ्रेंच सेनानी ज्योफ्रे ते अगदी रोमेल, माकआर्थर, मोंटगोमेरी अशा थोर सेनापतीनी ह्याग्रंथाचे कौतुक केले आहे. त्यातील शिकवणुकीचा युद्धात वापर केलेला आहे (एवढेच नाही तर विएतनाम युद्धात क्लाउजबिट्स च्या शिकवणुकीच्या अगदी विरुद्ध वागल्यामुळे बलाढ्य असुनही अमेरिकेचा नामुश्कीकारक पराभव झाला असे प्रतिपादन युद्ध तज्ञ रोबर्ट कॅसिडी ह्याने आपल्या war on the rocks ह्या पुस्तकात केले आहे म्हणजे बघा.) त्या ग्रंथात जिंकलेल्या राष्ट्रातील जनतेशी कसे वागायचे ह्यासंबंधी काही मार्गदर्शनपर(?) संकेत दिलेले आहेत. “...सैन्याचा पराभव करून जिंकलेले राष्ट्र आणि त्यातील जनतादेखिल विजेत्यांच्या बाबत साहजिक कमालीचा तिरस्कार मनात बाळगून असते आणि संधी मिळाली कि जमेल तसा जमेल तेव्हा वार करते. लहानसहान चकमकीत पराभव करून आक्रमकाना हुसकावून लावाता येईल अशा भ्रमात ते अजिबात नसतात पण मग एक अघोषीत युद्ध त्या देशाच्या घराघरातून , गल्लीबोळातून सुरु होते ज्यात प्रत्यक्ष युद्धापेक्षा जास्त हानी विजेत्या देशाच्या सैन्याची होते , सैनिकांचे मनोधैर्य आणि शिस्त कोलमडून पडते पराजितांऐवजी विजेतेच दडपणाखाली, दहशती खाली येतात. बायका मुलांच्या आणि म्हाताऱ्या कोताऱ्यान्च्या आड लपून लढणाऱ्या, समोरासमोरचे युद्ध टाळणाऱ्या शत्रूशी दोन हात करायचे असतील तर त्यांचा आश्रय दाता म्हणजे जी जनता तिलाच मग वेठीला धरावे लागते. म्हणूनच लहानसहान प्रमाद, आगळीकी, हल्ले दुर्लक्ष न करता उलट त्याची अतिभयानक शिक्षा जाहीर पणे दिली पाहिजे. कुणी लपून एखादी गोळी झाडली तर अक्खे घर आतील सामान्सुमासकट जाळून टाका, आपला एक सैनिक त्यानी मारला तर १०० नागरिक त्याबदल्यात मारा. गरज असो वा नसो, लोकांच्या वागण्या बोलण्यावर, येण्या जाण्यावर, प्रवास करण्यावर हरतर्हेची बंधने आणा आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास जबर शिक्षा करा म्हणजे लोकांच्या मनात दहशत तर बसेलच पण आपण केलेल्या एखाद्या कृत्यामुळे आपल्याच निरपराध भाइबन्दाना हाल भोगावे लागतात , हे पाहून अशा गनिमी काव्याचे हल्ले हळू हळू कमी होतात.गनिमी युद्ध करणार्यांचे मनोधैर्य कमी होते त्यांना मिळणारा लोकाश्रय कमी होतो सैनिकांचे धैर्यही वाढते आणि सुरक्षेची भावना त्यांना अधिक कार्यक्षम करते.” अशी काहीशी ती मांडणी आहे त्यामुळे मग बेल्जियम सारख्या छोट्या, बाल्कन आणि ऑस्ट्रियन तंट्याशी काहीही संबंध नसलेल्या देशाशी त्यातल्या जनतेशी जर्मनी असे क्रूर पणे का वागत आहे हे ह्याची संगती लागते.

पण बेल्जियममध्ये तेव्हा अनेक परदेशी नागरिक, व्यापारी, वार्ताहर, अमेरिकेसारख्या देशानाचे वार्ताहर, दुतावासात अधिकारी, राजदूत सचिव वगैरे मंडळी, रेड क्रॉस सारख्या संघटने तर्फे काम करणारे डॉक्टर नर्स आणि इतर स्वयंसेवक हजर होते त्यानी तसेच बेल्जियम सोडून पाळणाऱ्या नागरीकांनी सांगितलेल्या कहाण्या युरोपात आणि युरोप बाहेर ही पसरू लागल्या. आणि इथे ब्रिटीशाना जर्मनीबद्दल सर्व जगात प्रतिकूल मत तयार करण्याची संधी दिसली.म्हणजे जर्मन सैन्य अत्याचार करीत नव्हते असे नाही पण त्याबातम्याना एक व्यवस्थित रूप देऊन त्या सर्व जगभर पसरवल्या आणि त्यातून आधुनिक प्रचारतंत्राचा जन्म झाला. त्याअर्थी पहिले महायुद्ध हे आधुनिक प्रचारतंत्र म्हणजे प्रपोगंडाचे जनक. आज प्रपोगंडा म्हटले कि हिटलर आणि गोबेल्स ह्यांची नावे आपल्या समोर उभी राहतात पण प्रचारतंत्र हे तसे खूप जुने आणि महत्वाचे शास्त्र आणि शस्त्र आहे. तर ह्या अत्यंत महत्वाच्या प्रचारतंत्र विशेषत: युद्धकालीन प्रचारतंत्राबद्दल थोडी माहिती घेणे आवश्यक आहे.ते करताना अर्थातच विषयांतर होणार आहे पण त्याला इलाज नाही. असो ...तर
त्याबद्दल पुढील भागात ...
क्रमश:
--आदित्य

इतिहासलेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

7 Jan 2019 - 1:31 pm | आनन्दा

शेवटचा भाग आवडला.
प्रपोगंडाचे खरे जनक ब्रिटिश आणि अमेरिकन आहेत... अमेरिकेने पहिल्या महायुद्धात सहभाग घ्यावा म्हणून ज्या प्रकारचा प्रपोगंडा राबवण्यात आला त्याबद्दल लोकसत्तामध्ये एक लेखमालिका चालु होती मधे..

आदित्य कोरडे's picture

7 Jan 2019 - 4:20 pm | आदित्य कोरडे

हो रवी आमले ह्यांची होती तीलेखमाला, पुढच्या भागात पहिल्या महायुद्धाच्या अनुषंगाने प्रपोगंडावर लिहिणार आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jan 2019 - 7:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे लेखमाला. पुढचे भाग जरा पटापट टाका, नाहीतर प्रसंगसाखळी भंगते.

स अर्जुन's picture

8 Jan 2019 - 11:41 am | स अर्जुन

मस्तं चालाली आहे लेखमाला
पुढचे भाग लवकर येऊद्यात

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Jan 2019 - 9:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

वाचतोय. चांगली माहिती मिळतेय, पु.भा.प्र.

diggi12's picture

22 Aug 2024 - 2:56 pm | diggi12

मस्तं आहे लेखमाला
पुढचे भाग लवकर येऊद्यात