कादर खानः कलाकार नंबरी, लेखक दस नंबरी!

Primary tabs

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
3 Jan 2019 - 6:58 pm

हा माणूस गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या रूपांत आपल्याला भेटत होता. "बाप नंबरी बेटा दस नंबरी" तर आम्ही केवळ याच्या आणि शक्ती कपूरच्या केमिस्ट्रीकरता पाहिला होता. त्यातले ते फ्रॉड वाले २-३ सीन्स अत्यंत धमाल आहेत. माझे ऑल टाइम स्ट्रेसबस्टर्स!

गोट्या पोट्या मॅनपॉवर एजन्सी

नट बोल्ट सोडा बॉटल ओपनरवाला

जाली नोट छापनेकी मशीन

हे तिन्ही सीन्स मी असंख्य वेळा पाहिले आहेत. यातला विनोद काही फार ब्रिलियंट वगैरे नव्हे. पण सगळी मजा सादरीकरणात आहे. वेगवेगळे वेष, बेअरिंग आणि भाषेचा लहेजा घेउन कादर खान आणि शक्ती कपूर ने जी धमाल उडवली आहे त्याला तोड नाही. हे सीन्स पाहताना जाणवते की प्रत्येक वेळेस दोघेही त्या त्या भूमिकांमधे पूर्ण शिरले आहेत. ते बोलत नसतानाही त्यांचे हावभाव पाहा, त्या कॅरेक्टर्स च्या व्यक्तिमत्त्वात त्यांनी घातलेली भर पाहा - सगळेच खतरनाक आहे. विशेषतः कादर ने एकदा पारशी बावा, एकदा गुज्जू आणि एकदा मराठी हवालदार म्हणून धमाल उडवली आहे. हा गुज्जू अवतारात बोलत असताना मधेच शक्ती कपूर फोनची वायर कानात घालतो आणि त्यामुळे यांचा फ्रॉड उघडकीस येइल याची भीती वाटल्याने हळूच त्याला जेव्हा सांगतो, तेव्हा नॉर्मल हिंदीत सांगतो. ही अशी 'मेथड इन मॅडनेस' अनेकदा दिसते त्याच्या सीन्स मधे. ज्या प्रेक्षकवर्गाकरता हे सीन्स लिहीले जातात त्यांना पांचट कॉमेडी आवडते असे गृहीत धरल्याने असे न्युआन्सेस लक्षात ठेवले जात नाहीत असे आपण अनेक हिंदी व विशेषतः मराठी चित्रपटात पाहतो. त्यामानाने कादर खान च्या सीन्स मधे ते पाळलेले लगेच जाणवतात.

कादर खानचे गेल्या दोन दशकांत असे अनेक सीन्स/स्किट्स आहेत. चालबाज मधे शक्ती कपूरला लुटतानाचा एक सीन असो, नाहीतर हीरो नं १ मधला तो सासरा, किंवा कोणत्यातरी चित्रपटात कायम फोटोतून आपल्या मुलाशी बोलणारा - असे अनेक अचाट आणि अतर्क्य कॉमेडी रोल्स त्याने केले. आधी ८०ज मधे जितेंद्रच्या चित्रपटांमधून कॉमेडी व्हिलन नावाचा प्रकार जबरी होता त्याचा, आणि नंतर गोविंदाच्या "नं १" टाइप चित्रपटांतील सासरा किंवा इतर तसेच रोल्सही.

पण एकूणच लहानपणीपासून जे पिक्चर पाहिलेत त्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कादर खान सतत असेच. कधी स्वतः केलेले काम तर अनेकदा चित्रपटाचे संवाद.

८० च्या दशकातील सुरूवातीच्या चित्रपटात व्हिलन म्हणून तो तसा सरधोपट होता, नंतर कॉमिक व्हिलन झाला. पण मला सर्वात आवडला तो थोडा नंतर आलेल्या 'अंगार' मधला जहाँगीर खानचा रोल. कदाचित त्याचे मूळ अफगाण व्यक्तिमत्त्व हा रोल साकारताना नैसर्गिकरीत्या पुढे आले असावे. बाकीही रोल्स इतके आहेत की आता पटकन आठवतही नाहीत. ८० आणि ९० च्या दशकात त्याने इतके विविध रोल्स केले आहेत की कादर खान चित्रपटात नाही अशीच उदाहरणे कमी असतील.

पण बच्चन फॅन्स करता त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे बच्चन च्या इमेजला त्याने सर्वसामान्यांना आपला वाटेल असे 'पॅकेज' केले. १९७७ सालची सिच्युएशन पाहा. अमिताभ प्रचंड लोकप्रिय झाला होता, अँग्री यंग मॅन म्हणून. तोपर्यंत दीवार आणि शोले रिलीज होउन दोन वर्षे झाली होती. हे दोन चित्रपट, आणि त्याचबरोबर आनंद, नमक हराम, अभिमान आणि कभी कभी अशा चित्रपटांमधून अमिताभची एक सतत धुमसणारा, कमी बोलणारा, रागीट अशी प्रतिमा निर्माण झालेली होती. अपवाद दोनच - बॉम्बे टू गोवा आणि चुपके चुपके. या दोन्हीत त्याने विनोदी रोल्स केले असले तरी ते ट्रेण्डसेटर्स झाले नाहीत. बॉम्बे टू गोवा मधला अमिताभ त्याचे मॅनरिजम्स नंतर ओळखीचे झाल्याने थोडा उशीराच गाजला असावा, तो चित्रपट लागला तेव्हा मेहमूदच जास्त छाप पाडून गेला असेल असा माझा अंदाज आहे. तसेच चुपके चुपके मधला अमिताभ धमाल असला, तरी ती हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटातील व्हाइट कॉलर कॉमेडी. अमिताभच्या 'मास इमेज' मधे पुढे फारशी दिसली नाही.

अशा वेळेस मनमोहन देसाईं आणि कादर खान यांनी ती अँग्री प्रतिमा पूर्ण बदलवणारा "अँथनी" निर्माण केला, आणि त्यानंतर लगेच कादर खानने प्रकाश मेहरा करता "सिकंदर" लिहीला. या दोन्ही रोल्स नी अमिताभ आम जनतेत पोहोचला. दीवार, जंजीर, त्रिशूल, शोले हे त्याला सुपरस्टार करायला पुरेसे होते, पण अ‍ॅंथनी आणि सिकंदर ची मजा वेगळीच होती. तुम्हाला सलीम जावेदचा "विजय" भेटला तर तो काहीतरी शार्प डॉयलॉग रागाने मारून तेथून निघून जाईल, पण अँथनी किंवा सिकंदर तुमच्याशी गपा मारतील, ते ही बम्बैय्या हिंदीत. अमिताभला सर्वसामान्य पब्लिककरता अ‍ॅप्रोचेबल करण्याचे काम कादर खानच्या कॅरेक्टर्सनी केले. ती त्याची माझ्या दृष्टीने सर्वात मोठी कामगिरी आहे.

कादर खानची एक मुलाखत बघितली होती. अमर अकबर अँथनी च्या वेळेस हे तिन्ही लोक कसे काम करत वगैरे बद्दल. मजेदार आहे एकदम. तसेच नंतर अजून एका मुलाखतीत त्याच्यात आणि अमिताभमधे कसा दुरावा आला ते ही त्याने सांगितले आहे. अमिताभचे त्याबाबतीत मत काय आहे कल्पना नाही, पण कादर खान ने जे सांगितले ते तसेही विश्वासार्ह वाटते. या दोन्ही क्लिप्स यू ट्यूबवर आहेत.

अमिताभचे अनेक लोकप्रिय संवाद त्याने लिहीले आहेत. गेल्या एक दोन दिवसांत त्यातले बरेचसे चुकीचेच (म्हणजे विशेष खास नसलेले) पेपर्स मधे आलेत. मला सर्वात आवडणारा सीन म्हणजे मुकद्दर का सिकंदर मधला कब्रस्तानातील संवाद - जेव्हा तेथील "फकीर" कादर खान ज्यु अमिताभ व त्याच्या बहिणीला समजावतो. ज्यांनी मुकद्दर का सिकंदर थिएटर मधे पाहिलेला आहे त्यांना हा सीन पुढे सरकतो तसे थिएटर मधे कल्ला वाढू लागतो, शिट्ट्या आणि अनेकदा नाण्यांचे आवाजही - ते सगळे लक्षात असेल. मी पुण्यात "मंगला" मधे अनेकदा अनुभवले आहे. अमिताभच्या असंख्य "एण्ट्रीज" पैकी ही माझी सर्वात आवडती आहेच पण एण्ट्रीच्या आधी ज्यु अमिताभला कादर खान ने जे सांगितले आहे त्याचे सादरीकरणही भन्नाट आहे. आधी ती दोन लहान मुले रडत असताना तो येतो आणि शांत गंभीर आवाजात त्यांची समजूत काढायला सुरूवात करतो. "मौत पे किसकी रस्तगारी है, आज इनकी तो कल हमारी बारी है". तेथून पुढे संगीतामधे "क्रेसेण्डो" म्हणतात तसा त्या डॉयलॉग्ज मधला जोर वाढत जातो आणि मग मोठ्या अमिताभची मोटरसायकलवरून एण्ट्री होते. हा "लीड अप" कादर खाने ने सुंदर लिहीला आहे आणि तितकाच जोरदार सादरही केला आहे. त्याची इथली संवादफेक जबरदस्त जमली आहे.

अँथनी आणि सिकंदर हे अमिताभचे माझ्यातरी टॉप ५ मधले रोल्स आहेत. सलीम जावेद च्या कॅरेक्टर्स मधे सहसा न दिसणारी एक "warmth" कादर खान ने लिहीलेल्या अमिताभच्या कॅरेक्टर्स मधे दिसते. "मकान ऊंचा बनाने से इन्सान ऊंचा थोडे ही ना हो जाता है" हा वरकरणी (तेव्हाही) चीजी वाटेल असा संवाद, पण त्यानंतर पुढे अमिताभ बोलतो ते ऐकले तर लक्षात येते की ते सिकंदर च्या कॅरेक्टरशी कन्सिस्टंट आहे. अ‍ॅंथनीला ही मिश्किल्/गमत्या करून कादर खान ने अमिताभच्या कॅरेक्टर्स मधे विनोद आणला - पुढे जवळजवळ सर्व चित्रपटांत इतर लेखक/दिग्दर्शकांनीही त्याचे अनुकरण केले. सलीम जावेद चा "विजय" बहुतांश विनोद ड्राय ह्यूमर टाइपचे करतो - चेहरा गंभीर ठेवून "मारलेले" पंचेस असत ते. पण कादर खानचा अमिताभ मुळातच कॉमिक होता. हा कॉमिक अँगल इतका झाला की नंतर अमिताभने कॉमिक साइड किक च्या पात्राची गरजच ठेवली नाही असे लोक म्हणत. पुढे परवरिश, सुहाग, देशप्रेमी, सत्ते पे सत्ता, याराना सारख्या अनेक चित्रपटांतून त्याच फॉर्मचे कॅरेक्टर त्याने अमिताभकरता लिहीले.

चित्रपटाच्या दर्जाप्रमाणे चांगले किंवा टुकार लेखन त्याला सहज जमत असे. "शराबी" मधे अमिताभचे शेर फेमस झाले होते. काही चांगले शेर आहेत पण अनेक टुकार असल्याने जास्त फेमस आहेत. "शराबी को शराबी नही, तो क्या जुआरी कहोगे? गेहूँ को गेहूँ नही, तो क्या जवारी कहोगे", किंवा "जिगर का दर्द ऊपर से कहीं मालूम होता है, के जिगर का दर्द ऊपर से नही मालूम होता" सारखे. पण कादर खान ने ते तसे लिहीण्याचे कारण चित्रपटात आहे. अमिताभ प्रेमात पडायच्या आधी तो दर्द त्याने अनुभवलेला नसतो त्यामुळे त्याला शेर मारायची अफाट हौस हसूनही ते जमत नसतात. त्यामुळे पहिल्या भागात त्याचे सगळे शेर टुकार आहेत. ओमप्रकाश त्याला त्याबद्दल सतत सांगत असतो, तुझे शेर "घटिया" आहेत म्हणून. मात्र नंतर जयाप्रदाला भेटल्यावर पुढे तो बोलतो ते संवाद कादर खान ने बदलले आहेत.

वरकरणी साधे किरकोळ व अनेकदा टुकार वाटणार्‍या त्याच्या अनेक कॅरेक्टर्सच्या मागे बराच विचार असे, तो ते बरेच सीन पुन्हा पहिल्यावर लक्षात येत असे. बम्बैय्या संवाद ही त्याची खासियत होती. हिंदी चित्रपटातले टॉप ४-५ बम्बैय्या कॅरेक्टर्स बघितली तर आमिरच्या रंगीलामधल्या मुन्ना आणि मनोज वाजपेयीच्या भिकू म्हात्रे च्या बरेच आधी अमिताभचा "अँथनी" आणि अमजद खानचा "दिलावर" ही दोन जबरदस्त उदाहरणे. ही दोन्ही कादर खानने लिहीलेली आहेत.

"ते गेले नाहीत. ते त्यांच्या विचारांच्या/कलाकृतींच्या माध्यमातून आपल्यामधे आहेत" वगैरे वाक्ये आपण अनेक लोक थोरामोठ्यांबद्दल वापरताना आपण वाचतो. पण कादर खानच्या बाबतीत ते शब्दशः खरे आहे. आनंद मधे शेवटी अमिताभ रडत असताना बाजूला सुरू असलेल्या टेप मधून पुन्हा "बाबूमोशाय" ऐकू येते तसेच टीव्हीवर चॅनेल सर्फिंग करताना सुद्धा कोठेतरी नक्कीच कादर खान ने लिहीलेले किंवा स्वतःच सादर केलेले एखादे टाइमपास विनोदी वाक्य आपल्या कानावर आत्ता सुध्दा लगेच पडेल, आणि पुढेही येत राहील.

नाहीतर मग शक्ती कपूर/गोविंदा बरोबरच्या त्याच्या क्लिप्स पाहा, मनोरंजनाची गॅरण्टी!

चित्रपटप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

mrcoolguynice's picture

3 Jan 2019 - 7:13 pm | mrcoolguynice

मस्त !

पद्मावति's picture

3 Jan 2019 - 8:00 pm | पद्मावति

वाह, फारएन्ड यांचा लेख. खूप दिवसांनी मिपावर लिहिते झालात. लेख मस्तच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Jan 2019 - 12:46 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मस्तच. कादरखानची एक मुलाखत पाहिली होती. अमर अकबर अँथनीच्या आधी कादरखान संवादात उर्दुचा वापर बर्यपैकी करायचे. एके दिवशी मनमोहन देसाई आले व म्हणाले "तूम मियाभाई बहोत शेरो शायरी लिखतो हो. डायलॉग के लिये.. मुझे मसालेवाले डायलॉग चाहिये. लोगोंको थोडा रुलाना, थोडा हसाना व खूष होके घर जाना. लोगोंके दिमाग को जादा टेन्शन नही देना है. लिख पाओगे?" अमर अकबर अँथनीचे संवाद कादर खान ह्यांनी लिहिले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jan 2019 - 10:00 am | ज्ञानोबाचे पैजार

कारण कादरखान माझाही अतिशय आवडता कलाकार होता. त्याच्या बद्दल फारसे कुठे वाचण्यात आले नाही.
वर जसा शक्ती कपुरचा उल्लेख आला आहे तशी कादरखान आणि जॉनी लिव्हर या जोडीनेही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत.
वेगळ्या प्रकारचे विनोद कादरखानने चित्रपटात रुजवले
पैजारबुवा,

हुप्प्या's picture

4 Jan 2019 - 10:32 am | हुप्प्या

प्रकाश मेहराचे सिनेमे माझे अत्यंत नावडते. माझ्या लेखी ते अत्यंत उथळ, खोटे सिनेमे होते. पण तरी त्यातील कादर खान मात्र एक सच्चा माणूस होता ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एक अत्यंत बुद्धीमान व्यक्ती. पैसे मिळवण्याकरता फिल्मी तडजोडी केल्या पण त्यातूनही त्याचे खरे रूप दिसतेच. आचरटपणा, तद्दन फिल्मी डायलॉग ह्याच्या पलीकडे जाऊनही त्याचे अस्सल्पण दिसते. शक्ती कपूर जर कधी दिवंगत झाला तर मी त्याच्याबद्दल चांगले बोलू शकणार नाही. पण कादर खानबाबत तसे शक्य नाही. मला कादर खानच्या जुन्या खलनायकी भूमिकाही आवडल्या होत्या. खून पसीना हा तद्दन बाजारू सिनेमा असूनही त्यातील कादर खानने केलेले ठाकूर जालीम सिंग नामक खलनायकी व्यक्तिमत्त्व लक्षात राहिले आहे.

फिल्मी दुनियेतला एक गुणी माणूस गेला!

भरपूर हसवणारा मनुष्य. गेल्याने वाईट वाटलं.

फंटूश सिनेमा त्याचा बघितलेला शेवटचा असावा. त्यातही त्याने धमाल आणली होती.

यशोधरा's picture

4 Jan 2019 - 11:07 am | यशोधरा

छान लिहिलं आहेस अमोल.

छान लिहिलेत. माझा सिनेमाशी फारसा संबंध येत नाही.. फारसे कळतही नाही त्यातले. अश्यावेळेस तुमच्यासारख्यांचे लेख नवनीत बनून राहतात.

श्रद्धांजली _/\_

मृत्युन्जय's picture

4 Jan 2019 - 11:31 am | मृत्युन्जय

जबरदस्त लेख. कादर खान एक गुणी अभिनेता खरा. त्याचे संवादलेखन देखील अशक्याच होते. मात्र काही चित्रपटात त्याने फारच पाट्या पाडल्यात.

प्रसाद_१९८२'s picture

4 Jan 2019 - 11:33 am | प्रसाद_१९८२

लेख आवडला.
--
कादर खान यांना श्रद्धांजली !
--
मुकद्दर का सिकंदर... कादर खान

नाखु's picture

5 Jan 2019 - 10:11 am | नाखु

मला दो और दो पांच मधील आणि मेरी आवाज सुनो मधील खलनायक जास्त भावला आहे.
मराठीतील अशोक सराफ यांच्या सारखं कादर खान यांचे टायमिंग साधून केलेले विनोद आवडले.
चालबाजमधील छोटी भूमिका असो,वा याराना मधील दुय्यम भूमिका,लक्षात राहतील असे सादरीकरण केले आहे.

वाचकांची पत्रेवाला नाखु

ट्रम्प's picture

5 Jan 2019 - 4:14 pm | ट्रम्प

कादरखान बाबत एवढे चांगले लिखाण फारएन्ड शिवाय दूसरे कोणी करु शकले नसते .
कादरखान बद्दल बरीचशी नवीन माहिती तुमच्यामुळे समजली, धन्यवाद .

भंकस बाबा's picture

6 Jan 2019 - 10:08 am | भंकस बाबा

उत्तम लेख

भंकस बाबा's picture

6 Jan 2019 - 10:08 am | भंकस बाबा

उत्तम लेख

मुकद्दर का सिकंदर... कादर खान

एबीपी माझा साईटवरचा कादर खान यांच्यावरील एक लेख.

काबुल जवळच्या एका खेड्यात आई वडिलांच्या पोटी तीन मुले दगवल्यावर जन्माला आलेला हा चौथा मुलगा. तिथून पुढे त्यांचा अति-संघर्षमय प्रवास.
मुकद्दर का सिकंदर मधला त्यांच्याच तोंडी असलेला हा संवाद कदाचित त्यांनी स्वतःला उद्देशून लिहिला असावा...

"इस फकीर की इक बात याद रखना, जिंदगी का अगर लुत्फ उठाना है, तो मौत से खेलना सिखों, सुख को ठोकर मार, दुख को अपना, अरे सुख तो बेवफाँ है। चंद दिनों के लिए आता है और चला जाता है। मगर दुख, दुख तो अपना साथी है। पोंछ ले आंसु, पोंछ ले, दुख को अपनाले, अरे तकदीर तेरे कद्मो मे होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा।

जेव्हा समजले तेव्हा दु:ख झालं... बॉलिवूडची एक पिढी हळू हळू कायमची पडध्या आड होत आहे. :(
कादर खान + गोविंदा + डेव्हिड धवन यांचे त्रिकुट म्हणजे केवळ आनंद होता...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेनू तू ले जा किते दूर मेरे हानियाँ... :- Heartless - Badshah ft. Aastha Gill | Gurickk G Maan |

प्रचेतस's picture

8 Jan 2019 - 11:52 pm | प्रचेतस

कादर खान + गोविंदा + डेव्हिड धवन यांचे त्रिकुट म्हणजे केवळ आनंद होता

अगदी. ह्या जोडीची जुगलबंदी पाहणे म्हणजे पर्वणी

समीरसूर's picture

9 Jan 2019 - 10:50 am | समीरसूर

आवडला! कादर खान माझे आवडते कलाकार होते. 'दुल्हे राजा' मधला त्यांचा हॉटेलमालक आणि 'अंखियों से गोली मारे' मधला भंगारी दादा हे त्यांचे दोन भन्नाट रोल्स! एकदम जबरदस्त! 'हम'मध्ये विरुद्ध टोकाच्या दोन भूमिका (मेजर आणि एक फालतू नट) त्यांनी मस्त केल्या होत्या.