लक्ष्मी-नारायण

निमीत्त मात्र's picture
निमीत्त मात्र in जनातलं, मनातलं
2 Nov 2008 - 4:31 am

स्वर्गामधल्या "बाल-कवी' मार्गावरील "मुक्तांगण' प्रासादातील "फुलराणी' दालनात पु. ल. देशपांडे बसले होते. त्यांच्यासमोर वाजवायची पेटी होती. शेजारी तबलजी बनून वसंतराव देशपांडे बसले होते. पु. ल. तल्लीन होऊन गात होते.. "उगीच का कांताऽऽ' आणि पेटीवरून विविध प्रकारची स्वरांची नक्षी काढत आपल्याच गाण्याला साथ करीत होते... एक कडवे झाले की तबला वाजवता वाजवता वसंतराव पुढचे दुसरे कडवे गात होते. दोन देशपांड्यांची मैफल आता अगदी ऐन रंगात आली होती.
.. दारात कुणाची तरी पावले वाजली.
"कोण आहे?' पु. ल.
"मी आहे.' ती
"पण "मी' कोण? नाव, गाव, काही आहे की नाही?'
"नाही ना!'
"असं कसं होईल? काही तरी नाव हवंच की!'
"खरंच मला नाव नाही... कारण तुम्ही मला नावच दिलं नाही!'
"वसंतराव, कोण आहे हो ही बाई? ही काय म्हणतेय? मी म्हणे तिला नाव दिलं नाही? मी कोण हिला नाव देणार ?'
"खरंच तुम्ही मला नाव दिलं नाही. "ह्यांची' बायको एवढाच उल्लेख केलाय!'
"पण मग तुमचे "हे' कोण?... असं कोड्यात बोलू नका.. जरा स्पष्टपणे बोला की! आता तुम्ही स्वर्गात आहात. कुणी कुणाला स्वर्गात भ्यायचं नसतं! सांगा बाई, तुमचे "हे' कोण?'
"अहो, तुम्ही एका लेखणीच्या करामतीनं त्यांचं दर्शन घडवलंत साऱ्या जगाला. कुणाकुणाच्या लग्नात त्यांना नेलंत आणि लग्नासाठी लागणारं कापड चोपड, दागदागिने, आणि काय खरेदीसाठी काकू, मामी, आत्या, मावशी इ.इ. ची फलटण घेऊन ते अगदी योग्य त्या दुकानांत घेऊन जातात. मग धाडधाड खरेदी होते. सोन्या-चांदीच्या वस्तू, पैठण्या शालू, जरीचे खण, अहेराचे खण आणि काय काय खरेदी पटकन आटोपून त्यांना लग्नाच्या मांडवात ते परत आणतात...!'
"अहो बाई, हे काय सांगत सुटला आहात?'
कुणा विषयी सांगता हे?'
"अहो, डबल खिशाचा अंगात खाकी सदरा घालणारे डबल काचांचे मळकट धोतर नेसणारे, डोक्‍यावर कापडी मळकट-कळकट टोपी घालणारे...'
"अहो, हे वर्णन मी आमच्या नारायणाचं केलं आहे.'
"हं, तेच आमचे "हे'!'
"असं का? सरळ मी "नारायणाची बायको' असं सांगायला काय हरकत होती?'
"माझी काहीच हरकत नव्हती. हरकत आहे ती आमच्या समाजाची' बायकोनं नवऱ्याचं नाव घ्यायचं नसतं ना?'
"खरंय... आता आम्ही स्वर्गात आल्यापासून ती आपली ज्येष्ठ-श्रेष्ठ भारतीय संस्कृती पार विसरून गेलो..' ते जाऊ दे. तुम्ही आत या... इथं चहा वगैरे काही मिळत नाही. पण तुम्हाला दूध मिळेल. सरबत मधातलं मिळेल. अमृत तर हवं तितकं इथं मिळतं. तुम्हाला काय हवं?'
"इथं काय काय मिळतं ते सांगितलंत पण तुमचा हा हॉल तर चक्क मोकळा मोकळा वाटतो. म्हणजे इथं चूल नाही, गॅस नाही, स्टोव्ह नाही. स्नानगृह नाही, झोपण्याची खोली नाही.. तुम्ही या प्रशस्त पण मोकळ्या हॉलमध्ये एक एकटेच राहता?'
"बरोबर ! तुम्ही कालच पृथ्वीवरून आलात ना? इथली व्यवस्था, इथली शिस्त अगदी वेगळी. कोणतीही वस्तू वगैरे आपल्याला हवी असेल तर प्रत्येक प्रासादाच्या बाहेर सप्तरंग पानांचा, सप्तरंगी फुलांचा - फळांचा एक विशाल वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली उभे राहून तीन वेळा टाळ्या वाजवल्या की आधी झाडांच्या पानांची सळसळ सुरू होते... मग त्या झाडाकडून प्रश्‍न विचारला जातो, "काय हवं ते मागा!' आपल्याला काय हवं ते सांगायचं... तात्काळ ती वस्तू आपल्या हातात येते... आता तुम्हाला मी प्रत्यक्ष प्रचितीच दाखवतो.'
पुल आणि वसंतराव तरातरा आपल्या प्रासादातून बाहेर येऊन कल्पवृक्षाखाली उभे राहिले. तीन वेळा दोघांनी टाळ्या वाजवल्या... पानांची सळसळ हळूहळू वाढू लागली...वादळात सापडलेले झाड कसे अस्ताव्यस्त होऊन गदागदा हलायला लागते तसे ते झाड गदागदा हलायला लागले. पुलंनी आपल्या गळ्यात पेटी अडकवून ती वाजवत गाणे सुरू केले. वसंतराव देशपांड्यांनी गळ्यात तबला अडकवून ते वाजवत, पुलना साथ करू लागले. इतक्‍यात झाडातून प्रश्‍न ऐकू आला, "तुम्हाला काय हवं?'
"अहो, नारायणाची बायको, पटकन तुम्हाला काय हवे ते चटकन सांगा!' पु.ल.
"चांगले गोड ताक मला हवं!'
"हं, हा घे ताकाचा डेरा.' वृक्ष.
कल्पवृक्षाने पानांच्या फुलांच्या गर्दीतून आपले दोन्ही हात बाहेर काढले. त्या हातात ताकाचा डेरा होता.
"पण काय हो? अहो नारायणाची बायको... कल्पवृक्षाकडून काय हवं ते मिळत असताना तुम्ही ताक का मागितलं? बाकी तेही खरंच म्हणा, इंद्राला ताक महाग... म्हणजेच तक्रं शुक्रस्य दुर्लभम्‌... ही काव्यपंक्ती खरी नाही बरं का!' त्या दुसऱ्या नारायणानं म्हटलंच आहे ना- "उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे...' किंवा "घरी कामधेनू पुढे ताक मागे' तसं या नारायणाच्या बायकोनं इथे ताक मागितलं!'
हे ऐकून वसंतराव देशपांडे मोठमोठ्याने हसू लागले.... हसता हसता विचारले, "भाई, या बाईचा नवरा "नारायण' मला माहीत आहे. तो तुमच्या "व्यक्ती आणि वल्ली'च्या गल्लीतला. पण हा दुसरा नारायण कोण?'
"भले, वसंतराव, तुमच्याही लक्षात आलं नाही?' अहो, ते दुसरे नारायण म्हणजे लग्न मांडवातून पळून जाणारे...आलं लक्षात? तो जांबचा नारायण. तथा श्री समर्थ रामदास स्वामी!'
पुलंची ही गंमत ऐकून नारायणची बायको पण खूप हसली!!
नारायणाच्या बायकोने तांब्याभर ताक पटकन पिऊन टाकलं आणि मोठी ढेकर दिली आणि ती तृप्तीने स्वतःशीच हसत म्हणाली, "आता एकदा "हे' भेटले की झालं! मग त्यांच्या बरोबर जाईन. आमचे "हे' कुठे राहतात? ते इथं काय काम करतात? त्यांना भेटायला जायचं तर इथं रिक्षा वगैरे मिळतात काय?'
"अहो नारायणाची बायको, एक लक्षात ठेवा की स्वर्गातल्या सर्व पद्धती अगदी वेगळ्या आहेत. पुन्हा त्या कल्पवृक्षाखाली जाऊन उभ्या राहा. तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करा. दोन मिनिटांत ती पूर्ण होईल. जरा थांबा... मीच नारायणाला इथं बोलावतो. बोलवू ना!'
"बोलवा की!'
आता पुन्हा पेटी वाजवत पुल गाणे म्हणू लागले. "नारायणा रमा - रमणा... मधुसुदना मनमोहनाऽऽ करुणा घनाऽऽ.' इतक्‍यात धावत पळत एक माणूस तिथं आला. अत्यंत देखणा.. उंचा पुरा... अंगात पिवळसर रेशमी झब्बा, पांढरा स्वच्छ पायजमा, डोक्‍यावरचे केस काळे... लांब... नीट मागे फिरवलेले, कपाळावर उभा केशरी गंधाचा टिळा...
"भाई... पेटी माझ्याकडे द्या!'
"नाही... मीच पेटी वाजवणार! तू वसंतरावांना तबल्यावरून उठव.. आणि तू तबला वाजव. वसंता, आता तू गा... हं, नारायणा, रमा रमणाऽऽऽ'
आता वसंतराव आकाशाला भिडणाऱ्या स्वराचा आश्रय घेत गाऊ लागले. नारायण तबला वाजवू लागला...
एकदाचे गाणे संपले. पु.ल.नी नारायणाला विचारले, "या कोण हे माहीत आहे काय?'
नारायणाने तिला नीट निरखून पाहिले, आणि तो आनंदाने ओरडला, "लक्ष्मीऽऽ! अगं तू केव्हा आलीस इथं? मला का कळवलं नाहीस? तू मला ओळखलंस? मी नारायण...! तुला मात्र ओळखायला मला फार वेळ लागला. चार ठिकाणी ठिगळ लावलेलं नऊवारी लुगडं तू छान चापून- चोपून नेसायचीस. कपाळावर रुपयाच्या आकाराचं कुंकू, बस्स, कुंकू सोडल्यास गळ्यात फक्त चार काळे मणी... बाकी अंगावर दुसरा कोणताच दागिना नाही... पण तरीसुद्धा तू छान दिसायचीस..' पण आता हे काय तू पैठणी नेसून बालगंधर्वासारखी उभी आहेस, हातात गोठ-पाटल्या. नाकात नथ, कानात बुगड्या... गळ्यात चपला हार. वा.. वाहवा...! अशी तू नटून थटून आल्यावर मला तुला ओळखायला फार कठीण गेलं!'
अहो माझी पण तीच स्थिती झाली. तुमचा आजचा अवतार पाहताना द्वारकेच्या कृष्णाची आणि अयोध्येच्या रामाची आठवण झाली!'
"खरं म्हणतेस?'
"अगदी देवा शपथ!'
"ए, या स्वर्गात "देवा'ची शपथ घेता येत नाही बरं का? ज्या देवाची शपथ तू घेशील तो देव एक निमिषात इथं उपस्थित होईल.'
"निमिषात म्हणजे काय हो?' एक मिनिटात असं तुला म्हणायचं आहे काय?'
"होय तेच! पण स्वर्गात इंग्रजी भाषा चालत नाही. इथं फक्त "देववाणी' चालते. आपापसात आपण मराठी बोलतो. ते चालतं.'
"पण कधीपासून इंग्रजी भाषेवर इथं बहिष्कार पडला?'
"ते माहीत नाही. बहुधा डॉ. लोहिया इथं आले आणि त्यांनी "इंग्रजी हटाव' मोहीम सुरू केली तेव्हापासून...!'
हे नारायणाचे बोलणे ऐकून पुल आणि वसंतराव जाम हसायला लागले.
नारायण आणि लक्ष्मीला त्यांच्या हसण्याचा फार राग आला. नारायणाने त्यांना ओरडून विचारले, "अहो देशपांडे कुलोत्पन्न, आमच्याकडे पाहून हसायला काय झालं? आता आम्ही चांगल्या पोशाखात आहोत. रोज पक्वान्नं खातो. रथातून हिंडतो. अप्सरांची नृत्यं पाहतो. गाणी ऐकतो... कमळांच्या पानांच्या द्रोणातून तुमच्यासा?खंच आम्ही अमृतही पितो. तुमचा - आणि - आमच्यात आता फरक काय?'
"नारायणा, बेटा, रागावू नकोस! काल नारद संगीत विद्यालयात आलेल्या नव्या विद्यार्थ्यांना संगीत शिकवायचंय... आम्ही जातो...!' पु.ल. नारायणाला शांत करीत म्हणाले.
आणि ते देशपांडे बंधूही हसत हसत फरार झाले.
आता नारायण आणि नारायणाची बायको एवढेच त्या भव्य प्रासादात उरले. नारायणाला पृथ्वीवरच्या आपल्या घराची आठवण झाली.
"काय गं, आपलं घर पुण्यात आहे हे मला आठवतं. पण ते कुठे आहे?'
"अहो, शनिवार वाड्याच्या पडक्‍या बुरुजासमोरच्या बोळात! आता तिथं आपला अंतू राहतो.'
"हं, आता आलं लक्षात! पण आता पुणंही फार बदललं असेल नाही!'
"तर! लक्ष्मीरोडवरून चालताच येत नाही. टू व्हीलर, फोर व्हीलर, रिक्षा यांची गर्दी एवढी असते की अगदी जीव मुठीत धरून चालावं लागतं!'
"फुटपाथ असतील!'
"आहेत, पण एकाच बाजूला. त्यावर फेरीवाले उभे असतात. थोडक्‍यात काय आपोआपच "रास्ता रोको' कार्यक्रम रोज चालतो!'
"भडसावळ्याचं शालूचं दुकान, द्रौपदी वस्त्र भांडारातली महेश्‍वरी लुगडी अजून प्रसिद्ध आहेत ना?
आपण वधु-वरांसाठी लागणाऱ्या अंगठ्यांची ऑर्डर रामलाल लखनमलकडे देत असू... तो रामलाल अजून आहेत की "रामबोलो भाई...' करत गेला. पण काही म्हण हं, नरहरशेठकडं मंगळसूत्राची ऑर्डर दिली की कसलीही काळजी नसायची...आता तो असेल का गं?'
नारायणाला आता पुण्याची फार तीव्रतेने आठवण येत होती. एकामागून एक पुण्याच्या आठवणी, पुण्याची माणसं, इतकंच काय, दुकानं, रस्ते इ.इ. सर्वांच्या बद्दल तो आपल्या बायकोला प्रश्‍न विचारीत होता...! अमृताचे दोन दोन द्रोण आता दोघांनी रिते केले... "तुला खरं सांगतो बरं का... मी पुण्यात असताना खूप कष्ट केले. माझा सतत संपर्क मार्केटशी येत होता. म्हणून मला लोक "मिनिस्टर फॉर मंडई' असं चेष्टेनं म्हणत. मी खूप राबलो. पण त्या वेळी मी "राबतोय' असं कधीच वाटलं नाही. आणि आता स्वर्गात आल्यानंतर मात्र माझं ते राबणं फार कष्टदायक होतं असं वाटायला लागलं. पृथ्वीवर नि: स्वार्थी भावनेनं सेवा केली तर माणसाला "स्वर्ग' मिळतो. पण एकदा स्वर्गात आलं की सेवेची संधीच उरत नाही. खरं सांगू का? या स्वर्गात काही करताच येत नाही... आपण परत पुण्याला जाऊया. पुन्हा एकदा लग्न मांडवातली सर्व कामं पटापट करूया... ती कापड खरेदी, सोनं खरेदी, लग्नाच्या पंक्तीत सरसर पानं वाढणं... पाणी वाढणं... पंगतीत उभं राहून खड्या आवाजात श्‍लोक म्हणणं... यापैकी कसलीच मजा इथं नाही. आता आपल्या पैकी, निदान जवळच्या नातेवाइकांपैकी कुणाचं तरी लग्न असणारच की!'
"तुम्ही म्हणताय ते खरं आहे.... अहो आपला किट्टू...!'
"कोण किट्टू?'
"असं का करताय? तुमचे मित्र स्वयंपाकी राघू, त्याचा मुलगा किट्टू म्हणजे कृष्णा... आठवतो ना?'
"हं.. हं. तो किट्टू का?'
"किती वय असेल त्याचं?'
"पंचवीस असेल... तो आपल्या बापासारखा स्वयंपाकी वगैरे नाही बरं का! तो आता पिग्मी डिपॉझिटसचं काम करतो. पैसे बऱ्यापैकी मिळवतो म्हणे. मलाही खरंच असं वाटतं की आपण "खाली' जाऊया... दारिद्य्रानं गांजलो होतो... पण आपल्या राबणाऱ्या हातांना कधी कंटाळा आला नाही. आपण इथे एका जागी बसून नक्की कंटाळून जाऊ. त्यापेक्षा खाली जाऊ... पुन्हा लग्नघरातल्या धामधुमीत सामील होऊ.'
"खरंय... चल. मी स्वर्गातल्या त्या पासपोर्ट ऑफिस - व्हिसा ऑफिसचा शोध घेतो.
आपण पुन्हा वरातीत सामील होऊ. एकदा काय झालं ते आठवतं का? वरात निघाली. डोक्‍यावर गॅसबत्त्या घेऊन त्या नेहमीच्या बायका निघाल्या. पण उरलेल्या दोन गॅसबत्त्या नेण्यासाठी कुणी बाया मिळेचनात. तेव्हा एक गॅसबत्ती मी तुझ्या डोक्‍यावर ठेवली. दुसरी मी माझ्या डोक्‍यावर घेतली. हळूहळू त्या वरातीतून जाताना केवढी गंमत वाटली त्या दिवशी... माझी पावलं बॅंडच्या तालावर पडत होती. बॅंडवाले "राजा की आयेगी बारात' गाणे वाजवत होते. मी आणि तू अगदी "राजा' आणि "राणी'च्या टेचात चालत होतो. लोक आपल्याकडे पाहून कौतुकानं हसत होते. वाहवा... काय ग्रेसफुल चालणं आहे असं म्हणत होते. लक्ष्मी "ग्रेसफुल' म्हणजे काय गं?'
"मला काय माहीत? मी शाळेतच कधी गेले नाही. निदान तुम्ही तीन बुकं तरी शिकलेले!'
त्यावर ते पुनःपुन्हा हसत होते... परस्परांकडे कौतुकानं बघत होते... बघता बघता ती वरात त्यांना प्रत्यक्ष दिसायला लागली. वधु-वराच्या मोटारीतले ते वधु-वर अदृश्‍य झाले. त्यांच्या जागी त्यांना ते स्वतःच लक्ष्मी-नारायण होऊन बसलेले दिसू लागले.
मिरवणुकीच्या दोन्ही बाजूस उभे राहिलेले लोक या वधुवरांकडे कौतुकाने पाहत होते. गर्दीतली एक म्हातारी त्याच वेळी मोठ्या कौतुकानं म्हणाली, "लक्ष्मी-नारायणाची ही जोडी किती सुंदर दिसते पाहा!'

कथावाङ्मय

प्रतिक्रिया

अनिरुध्द's picture

2 Nov 2008 - 6:23 pm | अनिरुध्द

अतिशय सुंदर कथा. कथेतील सर्व पात्र वाचताना डोळ्यांपुढे उभी राहीली.