शवविच्छेदन...... भाग - ३

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
29 Dec 2018 - 2:30 am

शवविच्छेदन...... भाग - १
शवविच्छेदन...... भाग - २

....ती दुपार अशीच गेली. संध्याकाळी पाटलांनी - त्या माणसाचे नाव रवि पाटील होते, त्या दोघांना हॉटेलमधे जंगी मेजवानी दिली. गंमत म्हणजे मद्यपान, जेवण झाल्यावर पाटलांनी डॉ. मानकाम्यांना हॉटेलचे बील चुकते करायला सांगितले. ते बाहेर पडले तेव्हा बराच उशीर झाला होता. पाटील जवळजवळ झिंगले होते आणि डॉ. मानकामे बील भरायला लागल्यामुळे चडफडत दात ओठ खात होता.

डिसुझालाही मद्य हळुहळु चढत होते. त्याच मद्यधुंद अवस्थेत डिसुझा घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी डॉ. मानकामे वर्गात गैरहजर होता. त्याची पाटलांच्या मागे फरफट होत असणार याची कल्पना करुन डिसुझा मनाशी हसला. वर्ग संपल्यावर त्याने लगेचच त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याने जी काही दोनतीन हॉटेलं होती ती पालथी घातली पण ते दोघे काही त्याला सापडले नाहीत. शेवटी कंटाळून तो घरी परतला आणि लवकरच झोपायला गेला.

पहाटे चार वाजता दरवाजावरची घंटी तीन वेळा वाजली. अर्थात ही वेळ आणि त्यावेळी वाजणारी ही घंटी आता त्याच्या चांगल्याच परिचयाची झाली होती. दरवाजात मानकामेला पाहताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. बाहेर त्याची गाडी उभी होती आणि त्यात नेहमीचे ओळखीचे पोते होते.

त्याला पाहताच डिसुझाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

‘‘ आज एकटाच गेलास की काय ? एकट्याने कसं काय जमवलेस तू? एकवढे खोदायचे, परत बुजवायचे म्हणजे.....’’

‘‘तुझी बडबड बंद कर आणि मला जरा मदत कर !’’

त्यांनी धडपडत ते पोते वर नेले व टेबलावर ठेवले. डिसुझाने दिव्याचे बटन दाबले. बल्ब भपकन पेटला आणि जळाला. तेथे क्षणात काळाकुट्ट अंधार पसरला. डिसुझाने कुठून तरी चाचपडत मेणबत्ती पैदा केली व पेटवली. मेणबत्तीच्या प्रकाशात त्या दोघांच्या अवढव्य सावल्या भिंतींवर नाचू लागल्या. मानकामे लगेचच निघून जाणार होता पण तो क्षणभर थबकला. डिसुझाला म्हणाला,

‘‘मला वाटतं तो ते प्रेत कोणाचे आहे ते पाहिलेस तर बरं होईल.... नाही पहाच तू ! त्याच्या आवाजात आता थोडीशी जरब डोकवली. डिसुझा त्याच्याकडे संशयाने पाहात राहिला... डिसुझाने मेणबत्ती त्या पोत्यावर धरली.

‘‘कुठे मिळाले तुला ? कोणी सांगितले तुला त्या मृत्यूबद्दल?

‘‘चेहेरा पहा !’’ एवढेच उत्तर आले.

डिसुझाचा गोंधळ उडाला. त्याच्या मनात शंकांचे मोहोळ उठले. त्याने त्या शवाकडे पाहिले आणि परत मानकामेकडे पाहिले. परत एकदा शवाकडे नजर टाकली... शेवटी त्याने त्याचे ऐकले व मेणबत्तीच्या प्रकाशात त्या प्रेतावरची चादर दूर केली. तसा डिसुझा निर्ढावलेला होता पण तरीसुद्धा त्याला बसलेलेल्या धक्क्याने त्याचा थरकाप उडाला. ज्या माणसाला त्याने काल त्याने हॉटेलमधे चालताबोलता पाहिले होते त्याचे प्रेत पाहताच त्याच्या मनात पहिला विचार आला तो उद्या त्या पोत्यात आपण तर असणार नाही? तो विचार त्याच्या मनात आला आणि कितीही झटकला तरी तो जाईना. त्याचा मेंदू त्या विचाराने पोखरुन निघाला. ताळ्यावर आल्यावर त्याच्या मनात दुसरा विचार आला तो पाटलाचा. त्याचा विचार मनात आल्यावर त्याला त्याच्या मित्राकडे पाहावेना... तो त्याच्या डोळ्यात पाहू शकला नाही आणि त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता.

शेवटी डॉ. मानकाम्यांनीच त्या जिवघेण्या शांततेला वाचा फोडली. डिसुझाच्या मागून येऊन त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्या पकडीतही जरब होती.

‘‘ लष्करेला त्याचे मस्तक घेऊ देत..!’’ हा लष्करेही एक विद्यार्थी होता आणि त्याला त्याला अजून मस्तकाचे विच्छेदन करण्याची संधी मिळाली नव्हती. मानकामेचा खास लाडका विध्यार्थी. त्याचे वडील मोठे उद्योगपती होते. डिसुझाने काहीच उत्तर दिले नाही.

‘‘हं ऽऽऽ आता व्यवहाराचे पाहू... या प्रेताचे पैसे चुकते कर! तुझा हिशेब जुळला पाहिजे ना बाबा !’’
ते ऐकल्यावर मात्र डिसुझाला आवाज फुटला.

‘‘पैसे ? आणि तुला ?’’ तो किंचाळला. ’’कशासाठी?’’

‘‘ का नको द्यायला? मलाच नाही तर प्रत्येक व्यवहार त्याशिवाय पूर्ण होणार नाही. मीही ते तुला फुकट देण्याचे धाडस करू नये आणि तूही ते फुकट घेण्याचे धाडस करु नये हे बरं ! तसं झालं तर आपण दोघेही या भानगडीत अडकू. अरे बाबा, जेवढ्या आपण जास्त चुका करतो तेवढेच सगळे ठीक चालले आहे असे आपल्याला नाटक करावेच लागेल... त्याशिवाय गत्यंतर नाही. तो म्हातारा पैसे कुठे ठेवतो?’’

‘‘ त्या तेथे !’’ डिसुझाने कपाटाकडे बोट दाखवले.

‘‘चावी !’’ मानकामे शांतपणे म्हणाला. डिसुझाच्या मनात क्षणभर चलबिचल झाली. त्याच क्षणी पुढे काय होणार आहे हे ठरले. मानकामेने बोटांना किल्लीचा स्पर्ष झाल्यावर सुटकेचा निःश्र्वास टाकला. त्याने कपाटा उघडले व कपाटातून एक वही, पेन काढले आणि प्रेतासाठी पैसे काढले.

‘‘ हे बघ ! तू आता पैसे चुकते केले आहेस - तुझ्या सुरक्षितेची पहिली हमी. आता दुसऱ्या हमी साठी तुला याची पावती फाडावी लागेल व या वहीत नोंद करावी लागेल. मग मात्र तुला प्रत्यक्ष सैतानाचीही भीती नाही.’’ मानकामे छद्मी हसत म्हणाला.

पुढच्या काही क्षणात डिसुझाच्या मनात प्रचंड उलथापालथ झाली. नशीबाने त्याच्या मनात सगळ्यात शेवटी जो विचार आला त्याने तो सावरला. पुढच्या कटकटींना तोंड देण्यासाठी मानकामेला दुखवून चालणार नव्हते. इतक्या वेळ हातात उंच धरलेली मेणबत्ती त्याने खाली ठेवली आणि थरथरत्या हाताने त्याने त्या वहीत नोंदी केल्या.

‘‘हं ऽऽ आता कसं ! आणि आता हे पैसे तू स्वतःसाठी ठेऊ शकतोस. मी माझा हिस्सा आधीच काढून घेतलाय. आणि एक महत्वाचे सांगायचे राहिले... माणसाला जेव्हा अचानक धनलाभ होतो तेव्हा त्याने काही पथ्ये पाळावीत असा संकेत आहे.. हॉटेलात मेजवान्या द्यायच्या नाहीत, महागड्या वस्तूंची खरेदी बंद, जुनी कर्जे फेडायची नाहीत... पैसे उसने घ्यायचे, उसने द्यायचे नाहीत... नाईलाज आहे. तू विचारशील मग हे पैसे घेऊन करायचे काय... पण मी सांगतो पैशाची उब वेगळीच असते.. ती तुला आता कळेलच..’’

‘‘ मानकामे मी केवळ तुझ्यासाठी माझी मान फासात अडकवतोय.. लक्षात ठेव !’’ डिसुझा म्हणाला.

‘‘माझ्यासाठी ?’’ मानकामे ओरडला.

‘‘ मला वाटलं तू स्वतःला वाचविण्यासाठी हे सगळे करतो आहेस. तुला नसेल करायचे तर करु नकोस, पण मी जर संकटात सापडलो तर तुझे काय होईल याचा विचार कर. पहिल्या प्रकारासारखाच हा एक प्रकार. पाटील म्हणजे त्या शेखबाईची दुसरी पायरी आहे. आता आपण थांबू शकत नाही. एकदा सुरुवात केली की संपले.... सैतानांच्या नशिबी विश्रांती नसते असे म्हणतात ना !’’ मानकामे डिसुझाच्या पांढऱ्याफटक पडलेल्या चेहेऱ्याकडे पाहात हसत म्हणाला.

डिसुझाच्या मनात दैवाने केलेल्या या क्रूर चेष्टेने अंधार दाटून आला. दैवाला शिव्या देत तो परत किंचाळला,

‘‘ अरे देवा ! पण मी केले तरी काय ? आणि मी कधी आणि कसली सुरुवात केली? मला क्लासचा सहाय्यक नेमले ती वेळ? पण त्यात मी काय पाप केले ? त्यांना कोणीतरी माणूस पाहिजे होता तो त्यांना मिळाला... कदाचित तो तुही असतास...’’

‘‘ मित्रा काय म्हणावं तुला? मला समजत नाही, तू गप्प बसलास तर तुला काय त्रास होणार आहे? गप्प बसण्यात कसला धोका आहे तुला? हे आयुष्य म्हणजे काय हे माहिती आहे का तुला? या जंगलात सिंह राहातात आणि मेंढ्याही. जर तुम्ही मेंढी असाल तर शेवटी तुम्ही या टेबलावर पाटील आणि शेखसारखे येणार जर तुम्ही सिंह असाल तर तू माझ्यासारखा किंवा प्रो.सारखा गाडीत फिरशील. पहिल्यांदा थोडा अडखळशील पण नंतर...जरा प्रो.कडे पहा. तू हुशार आहेस, आणि मला व प्रों.ना तू आवडतोस. मला तर वाटते तुझा जन्मच शिकार करण्यासाठी झालाय ! माझ्या अनुभव मला सांगतोय दोनतीन दिवसात या भीतीच्या बुजगावण्यांना तू मनापासून हसशील’’

एवढे बोलून मानकामे त्याच्या गाडीतून अंधारात नाहीसा झाला. डिसुझा बिचारा हतबल होवून तेथे एकटाच उरला. तो कुठल्या संकटात सापडला आहे याची त्याला आता कल्पना आली. मानकामेबरोबर काम करता करता तो या भयानक प्रकारात त्याचा पगारी साथीदार झाला होता. तो मानकाम्यासमोर किती अगतीक आहे याची त्याला कल्पना आली. या प्रकारातून बाहेर पडण्याची हीच संधी होती. त्याने थोडे धाडस दाखवले असते ते तर त्याला ते सहज शक्य झाले असते पण वहीतील शेखबाईच्या नोंदीने त्याचे तोंड बंद केले. काही तास उलटले आणि विद्यार्थी वर्गात येऊ लागले. पाटलांच्या शवाचे वेगवेगळ्या भागांचे त्यांच्यात वाटप करण्यात आले. पाटलाचे मस्तक लष्करेला देण्यात आले आणि त्याचा आत्मा शांत झाला. संध्याकाळी वर्ग संपण्याआधी डिसुझाने सुटकेचा निश्र्वास टाकला. कोणालाच कसलीच शंका आली नव्हती. मानकामे म्हणाला ते खरं होतं तर... तो मनाशी म्हणाला.

दोन दिवस तो त्या प्रेताची विल्हेवाट पाहात होता. शेवटी शेवटी तर त्याचा आत्मविश्र्वास फारच वाढला आणि तो हास्यविनोदात भागही घेऊ लागला.

तिसऱ्या दिवशी मानकामेने दर्शन दिले. त्याने आजारी असल्याची सबब सांगितली पण त्याने तीन दिवसांचे सगळे तास भरुन काढले. लष्करेकडे त्याने विशेष लक्ष दिले. मानकाम्यांची कुशाग्र बुद्धी पाहून त्या विद्यार्थ्याने स्वतःच्या नशिबाचे आभार मानले. त्याला चक्क या विषयात पदक पटकविण्याची स्वप्ने पडू लागली. पण मानकाम्यांचे शिकवणेच तसे होते. त्याला असे वाटू लागले यात विशेष नवल नव्हते.

आठवड्याच्या आतच मानकामेने डिसुझाबद्दल वर्तवलेले भविष्य खरे झाले. डिसुझाला वाटणारी भीती जवळजवळ संपलीच आणि त्याला मनावरचे दडपण तर बिलकूल जाणवत नव्हते. किंबहुना तो आता मनतल्या मनात त्याच्या या पराक्रमबद्दल फुशारक्या मारू लागला. त्याने या सगळ्या प्रकाराची मनात अशा प्रकारे मांडणी केली की त्याला तो गुन्हा आहे असे वाटेचना ! कधी कधी यातून तो कसा सहीसलामत सुटतोय याचा त्याला अभिमान वाटू लागला. डॉ. मानकामेही आता त्याला फारच कमी भेटे. अर्थात वर्गाच्या कामानिमित्त ते एकमेकास भेटत. त्यांना नेहमीप्रमाणे प्रो.कडून वेळोवेळी सूचना येत आणि त्या सूचना ते दोघे पाळत. एकदोनदा ते भेटले, नाही असे नाही, पण त्याने या त्यांच्या रहस्याचा साधा उल्लेख करण्याचेही कटाक्षाने टाळले हे डिसुझाच्या लक्षात आले आणि अर्थात त्यालाही त्याच्यावर चर्चा नकोच होती. डॉ. मानकामे या भेटी दरम्यान त्याच्याशी अगदी हसत खेळत बोलत होता जणू त्यांच्या आयुष्यात असंलं काही घडलेच नव्हते. एका भेटीदरम्यान डिसुझाही त्याच्या कानात कुजबुजला होता की तो आता सिंहांच्या कळपात सामील झाला आहे आणि मेंढ्यांच्या कळपाची त्याला आता किव येते. पण मानकामे पुसटसं हसला आणि त्याला खुणेनेच गप्प राहण्यास सांगितले.

शेवटी अजून एका प्रसंगाने त्या दोघांच्यात अजून जवळिक निर्माण झाली. प्रो.ना शवविच्छदनासाठी प्रेते परत एकदा कमी पडू लागली. विद्यार्थ्यांना तो अनुभव आवश्यक होता. बरीच मंडळी श्रीमंत घरातील होती आणि त्यासाठी त्यांची कितीही पैसे मोजण्याची तयारी होती. त्याच वेळी कटकनहल्लीच्या दफनभूमीत एका अपघातातील प्रेते दफन करण्यात आली आहेत अशी बातमी यांच्यापर्यंत पोहोचली.

कटकनहल्ली त्या वेळेस एक अत्यंत बकाल, छोटे खेडेगाव होते.. अजूनही तसंच आहे. वस्ती मुसलमान व लिंगायतांची. दोन्ही धर्माच्या दफनभूमी वेगवेगळ्या. ही जी दफनभूमी होती, मुसलमानांची, पार गावाबाहेर जी सात चिंचांची जागा होती त्याच्या दाट सावलीत होती. कोणाला हाक मारली तरी उपयोग व्हायचा नाही अशी ती जागा. ना दिवा, ना पणती ना पाणी ! तर अशा ठिकाणी ही प्रेते पुरण्यात आली होती. आवाज यायचा तो सुद्धा पुढच्या टेकाडावर चरायला येणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाचा. सगळी रेताड, खुरटे गवत उगवलेली जमीन. या अशा जागी घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज त्यात उडणाऱ्या मातीमुळे जरा जास्तच भयप्रद असतो. या जागी कधी काळी म्हशी चरायला आल्यास त्यांच्या गळ्यातील घंटांचा आवाज काय तो या निरव शांततेचा भंग करायचा नाहीतर खरोखरीच स्मशान शांतता ! पण या सगळ्याचा प्रेते खणणाऱ्यांवर काहीच परिणाम होण्याचे कारण नव्हते. कधी काळी त्या स्मशानातून खणण्याचा आवाज येत असे. पण गावकऱ्यांना कल्पना होती की ते प्रेताच्या अंगावरच्या सोन्यासाठी येत असत.. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यां चोरांच्या नादी लागण्याचे धाडसही कोणात नव्हते... पण गावात दारिद्र्य इतके वाढले होते की आजकाल चोरांनीही ती जागा वाळत टाकली होती. पण एका दृष्टीने आपल्या जोडगोळीसाठी ही जागा सुरक्षित होती. जमिनीत गाडले गेलेले हे मुडदे अल्लाच्या भेटीस जाण्याऐवजी जमिनी बाहेर येणार होते.

दफनविधी झाल्यावर शोकग्रस्त गावकरी गावात परतले आणि डिसुझा व मानकामे गिधाडांसारखे त्या चिंचेखाली अंधारातील दफनभुमीवर उतरणार होते...

क्रमशः
अनुवाद : जयंत कुलकर्णी

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Dec 2018 - 8:58 am | प्रचेतस

क्या बात है काका.

सरस एकदम. पुढे काय होणार काहीच अंदाज येत नाहीये.

मस्त चालू आहे मालिका, अनुवाद वाचतोय असे कुठेच जाणवत नाहीये.
प्रत्येक भागागणिक उत्सुकता वाढत आहे, लवकर येउद्यात पुढचे भाग!

विनिता००२'s picture

29 Dec 2018 - 2:30 pm | विनिता००२

वाचतेय :)

पुभाप्र.

वाचतेय, मस्त आहे कथा. अनुवाद वाटत नाही.