प्रिय ओंकार,
जिथे असशील तेथे तू आनंदात असशील याची मला खात्री आहे... मी शक्यतो कोणाला अरे तुरे करत नाही पण आपल्यात जो काही पत्रव्यवहार झाला फ्रॅन्झ काफ्काबद्दल, त्याचा धागा धरुन तुला एकेरी हाक मारतोय. (अणि शिवाय वाढलेल्या वयाचा थोडास गैरफायदाही घेतोय !) तुझ्यासाठी एक युद्धकथाच लिहायचे मनात होते पण सध्या Caliphateचा इतिहास लिहित असल्यामुळे त्यात व्यस्त आहे. तुलाही हे सांगितले होतेच... असो पण ही एक छोटी कथा तुझ्यासाठी लिहित आहे.... तुला आवडेल अशी आशा आहे... पुढेमागे एक युद्धकथाही लिहिनच..
आपला,
जयंत कुलकर्णी
शवविच्छेदन
दररोज संध्याकाळी आम्ही ‘‘पारिजात’’मधे जमायचो. क्रियाकर्म करणारे भटजी, हॉटेलचा मालक, डिसुझा आणि मी. कधी कधी इतरजणही असायचे पण नियमीत येणारे आम्ही चौघेच. पाऊस असूदेत, वादळ असूदेत ठरलेल्या वेळी ठरलेल्या टेबलाभोवती, ठरलेल्या आराम खुर्च्यांमधे आम्ही विराजमान झालेलो असायचोच. म्हातारा डिसुझा नेहमी पिऊन तर्र असायचा पण शिकलासवरलेला आणि हुशार होता. श्रीमंतही असावा कारण तसा काही उद्योग करताना तो मला कधी दिसला नाही. त्या गावात तो काही वर्षांपूर्वी आला होता. जेव्हा आला तेव्हा तरुण होता. इथे आला, रमला आणि इथलाच झाला. त्याचे उंची कपडे गावात चर्चेचा विषय होते. त्याचे या हॉटेलमधे रोज बसणे, मद्य पिणे, चर्चला कधीच भेट न देणे, दारुडा, त्याचा बनेलपणा हे सगळे गावाला माहीत होते. त्याची काही मते अतिरेकी होती आणि ती मांडताना टेबलावर जोरात हात आपटण्याची त्याची लकब होती. एक नंबरचा विश्र्वासघातकी... असं लोकं म्हणायचे. तो रम प्यायचा. रोज पाच ग्लास रम. पारिजातमधे उजव्या हातात धुंद नजरेने शुन्यात पाहात बसलेलेला त्याला अनेकांनी पाहीला असेल. आम्ही त्याला डॉक्टर म्हणून हाक मारत असू कारण त्याला त्या विषयातील बरेच ज्ञान होते. सरकलेले हाड बसवणे किंवा तुटलेल्या हाडावर प्लास्टर बांधणे हा त्याचा डाव्या हातचा मळ होता पण त्याच्यापलिकडे आम्हाला त्याच्याबद्दल विशेष माहिती नव्हती ना त्याच्या पूर्वायुष्याबद्दल.
थंडीत अंधार लवकर पडतो. एका थंडीत संध्याकाळी मद्य पिता पिता, गप्पा मारत रात्री नऊ नंतर हॉटेल मालक टेबलावर उगवले. हॉटेल मधे कोणी मंत्री आजारी पडला होता म्हणे. मुंबईला विधानसभेला निघाले होते पण बरं वाटेना म्हणून त्यांनी या गावात, पारिजातमधे मुक्काम टाकला होता. या गावात असं काहीतरी प्रथमच घडत होते... मंत्रीमहोदयांसाठी खास मुंबईहून डॉक्टरला पाचारण करण्यात आले होते...
‘‘ तेही लगेच आले.... नशीब गाड्या वेळेवर होत्या...’’ ग्लास भरत आणि सिगरेट पेटवत हॉटेल मालक बोलते झाले.
‘‘ ते ? म्हणजे डॉक्टर आले की नाही ?’’ मी विचारले.
‘‘डॉक्टरच... फार मोठे डॉक्टर आहेत म्हणे..’’ हॉटेल मालक.
‘‘काय नाव त्यांचे?’’ मी
‘‘ डॉक्टर मानकामे.. एफ आर सी एस्...’’
डिसुझांचे तीन ग्लास झाले होते आणि त्यांनी नेहमीप्रमाणे शून्यात नजर लावली होती. दुसऱ्या ग्लास नंतर ते गप्प व्हायचे. मधेच ते इकडे तिकडे पाहात नेहमीप्रमाणे हलत डुलत होते. पण हे नाव ऐकल्यावर ते खडबडून जागे झाले. त्यांनी ते आडनाव परत एकदा खात्री करण्यासाठी उच्चारले.... मानकामे.. मानकामे. त्यांनी दुसऱ्यांदा ते नाव उच्चारले तेव्हा त्यांच्या आवाजातील कंप जाणविण्याइतपत वाढला.
‘‘ हो ! डॉक्टर मानकामे...’’ हॉटेल मालकांनी दुजोरा दिला.
ते ऐकताच डिसुझांची धुंदी झटक्यात उतरली. त्यांचे डोळे मोठे झाले. आवाज स्पष्ट आणि मोठा झाला त्यांच्या स्पष्ट बोलण्यात आता थोडासा ठामपणा दिसू लागला आणि थोडासा रागही. ते पाहून आम्ही जरा दचकलोच. एखाद्या मेलेल्या माणसाला थडग्यात जाग यावी तसं काहीतरी झालं..
‘‘ माझं लक्ष नव्हतं तुमच्या बोलण्याकडे. कोण आहे हा डॉ. मानकामे ? त्याचे नाव दिपक आहे का? डॉक्टर दिपक मानकामे ? शक्यच नाही , शक्यच नाही.. प्रत्यक्ष पाहिल्यावरच कळेल..’’
’‘तुम्ही ओळखता का त्यांना ?’’ मोघ्यांनी विचारले.
‘‘ तो नसावा रे बाबांनो ! पण आपल्याकडे हे आडनाव फारसे प्रचिलित नाही. नाही का ? मालक वयस्कर आहेत का तुमचे हे डॉक्टर ?
‘‘ ते तरुण निश्चितच नाहीत. त्यांचे केस पांढरे आहेत पण तुमच्यापेक्षा तरुण दिसतात बरं का !’’ मालकांनी डिसुझाकडे डोळे मिचकावत सांगितले.
‘’ माझ्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी वयाने मोठाच होता तो.. पण...’’ त्याने टेबलावर जोरात हात आपटला.. पण मी वयस्कर दिसतो त्याला कारण ही रम आहे आणि अर्थातच माझ्या पापांची खंत माझ्या चेहऱ्यावर दिसते तेही एक कारण आहेच म्हणा... हा माणूस अत्यंत सज्जन असावा आणि त्याची पचनशक्ती दारुने बिघडलेली नसावी. डिसुझा हसत हसत म्हणाले. नंतर त्यांनी आकाशाकडे हात केले आणि पुटपुटले,
‘‘ मी काही ढोंगीपणा करणार नाही जरी मी चर्चमधे जात नसलो तरी..’’
तेथे त्यानंतर अस्वस्थ शांता पसरली.
‘‘तुम्हाला हा डॉक्टर माहीत आहे हे गृहीत धरले तर मला वाटते तुमचे त्यांच्याविषयी फारसे चांगले मत नसावे...’’ मी म्हणालो.
डिसुझांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही.
‘‘हो ! मला त्याला समोरासमोर भेटलेच पाहिजे !’’ डिसुझा ठामपणे म्हणाले.
तेवढ्यात पहिल्या मजल्यावर दार आपटल्याचा आवाज आला आणि त्यानंतर पायऱ्यांवर कोणीतरी उतरत असल्याचा आवाज आला.
‘‘तेच डॉक्टर ! डिसुझा, नीट पाहून घ्या...!’’ मालक खालच्या आवाजात हळूच म्हणाले.
पायऱ्या संपल्यावर तेथे एक छोटा चौक होता ज्यावर एक गालिचा अंथरण्यापुरती जागा होती. त्यानंतर दोन तीन पायऱ्यांनंतर सरळ रस्त्यावर जाता येत होते. हा चौक बाहेरचा उजेड आणि जिन्यातील दिव्यांमुळे बऱ्यापैकी उजळून निघाला होता. काचेच्या दरवाजाबाहेरच हॉटेलची एक पाटी होती ज्यावर प्रखर प्रकाश योजना केलेली होती. थोडक्यात काय, या प्रकाशात डिसुझाची चुक होण्याची शक्यताच नव्हती. डिसुझा हळू हळू त्या चौकाकडे चालत गेले आणि तेथे थबकले. आम्ही मागे मागे होतोच. आम्ही त्या दोघांची समोरासमोर झालेली भेट पाहिली. डॉ. मानकामे चांगले तरतरीत आणि धिप्पाड वाटले. त्यांचा चेहरा चांगला तजेलदार दिसत होता. त्यांच्या पांढऱ्या केसांनी ते वस्कर वाटत होते नाहीतर कोणीही त्यांना वयस्कर म्हटले असते की नाही याची शंकाच आहे. त्यांनी अत्यंत महागडा, तलम, पांढरा शर्ट घातला होता आणि त्यांनी हातावर त्यांचा कोट रुबाबदारपणे टाकला होता. शर्टाला सोन्याची बटणे लटकत होती आणि गळ्यात पट्टे असलेला रेशमी टाय सैलसर बांधला होता. एकंदरीत घरंदाज श्रीमंती उतू जात होती आणि त्यापुढे आमचे दारुडे डॉक्टर, त्यांचे गबाळे कपडे, काळवंडलेला चेहरा घेऊन कसेबसे उभे होते.
‘‘मानकामे ऽ ऽ’’ डिसुझांनी एखादा पोस्टमन हाका मारतो तशी हाक मारली. ती हाक ऐकल्यावर या असल्या जागी कोण हाका मारतोय अशा अविर्भावात ते डॉक्टर महाशय थबकले.
‘‘ दिपक मानकामे !’’ डिसुझा म्हणाला. त्यांनी क्षणभर डिसुझाकडे नजर टाकली आणि ते हडबडले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती उभी राहिली. कापऱ्या आवाजात त्यांनी कुजबुजत विचारले,
‘‘ डिसुझा ! तू इथे ?’’
‘‘ हो ! मीच ! तुला काय वाटले मीही मेलोय की काय ! आपली ओळख अशी सहजासहजी मिटणारी नाही !’’ डिसुझा म्हणाला. हे सगळे आमच्या समोरच चालले होते.
‘‘ श्! श्!’’ डॉक्टर म्हणाले. त्यांनी त्याला त्यांच्या तिक्ष्ण नजरेने आपादमस्तक न्याहाळले.
‘‘ अगदीच अनपेक्षित ! पण तुला भेटून मला आनंद झाला.. पण मला आता तुझा लगेचच निरोप घेतला पाहिजे. नाहीतर माझी गाडी चुकेल. पण मला तुझा पत्ता दे. मी लवकरच तुझ्याशीए संपर्क साधतो... तुझी परिस्थिती चांगली दिसत नाही..मला वाटतं मला तुझ्यासाठी काहीतरी करायलाच लागेल.. काळजी करु नकोस.’’
‘‘पैसे ! तुझ्याकडून पैसे !’’ डिसुझा किंचाळला. जे काही पूर्वी मला मिळले ते मी जेथे मिळाले तेथेच फेकून दिलेत.
आत्तापर्यंत डॉक्टर मानकामे जरा आरेरावीनेच बोलत होता. पण डिसुझाच्या उत्तराने आणि मदत नाकारण्याच्या ठाम पावित्र्याने ते परत गोंधळले. त्यांचे पाय जमिनीला लागले.
त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर छटा उमटून गेली.क्षणभर त्यांचा चेहरा भयानक झाला.
‘‘मित्रा, तू म्हणतोस तसं ! मला तुला मदत करुन तुझा अपमान मुळीच करायचा नाही. मला कोणालाच दुखवायचे नाही. मी माझा पत्ता तुला देतो.. जर तुला भेटायचे....’’
त्याचे बोलणे डिसुझाने अर्ध्यावर तोडले,
‘‘ मला त्याची गरज नाही आणि तुला भेटण्याची मला इच्छाही नाही. ज्या घरात तू राहातोस, त्या घरात पाऊलही ठेवण्याची मला इच्छा नाही. मी तुझे नाव ऐकले आणि मला वाटले तुच असणार. तू अजून जिवंत आहेस म्हणजे या जगात देव नाही हेच सिद्ध झाले असं मी म्हणेन.. चालता हो !’’
तो अजून तेथेच त्या गालिचावर उभा होता. पायऱ्या आणि बाहेर पडण्याच्या दरवाजा याच्यामधे. जर त्याला बाहेर पडायचे असते तर त्याला डिसुझाला ओलांडूनच जावे लागले असते. त्याच्या सोन्याच्या काड्यांच्या चष्म्याआड एक हिंस्र छटा उमटली. पण बाहेरुन त्याच्या गाडीचा चालक डोकावून पहात होता आणि डिसुझाच्या मागे दोन चार लोक उभे असलेले त्याने पाहिले. बहुधा एवढे साक्षिदार असल्यामुळे त्याने विचार बदलला असावा. त्याने दरवाजाकडे मुसंडी मारली.. पण त्याच्या दुर्दैवाने डिसुझाने त्याच्या कोटाची बाही पकडली. हिसका बसताच त्याला थांबावे लागले. डिसुझाने त्याला पुटपुटत विचारले,
‘‘ तूला ते परत दिसले का ?’’
आम्ही ऐकले ना ते !
त्या मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरच्या घशातून किंचाळल्यासारखा आवाज आला; एखादा पाकिटमार जसा घोळक्यात सापडल्यावर पळतो तसा तो बाहेर पळाला. आमच्या कोणाच्या लक्षात येईपर्यंत त्याच्या गाडीने स्टेशनचा रस्ता पकडला सुद्धा. एखादे स्वप्न सरावे तसा तो प्रसंग काही क्षणातच संपला पण या स्वप्नाने मागे काही पुरावे सोडले होते. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या नोकराला तुटका चष्मा सापडला आणि त्याच रात्री आम्ही सगळे त्या बार मधे जमलो. खिडकीपाशी असलेल्या आमच्या नेहमीच्या टेबलावर डिसुझा आमच्या शेजारी बसला, पण त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर कसलातरी निश्चय दिसत होता.
या धक्क्यातून प्रथम सावरले ते हॉटेल मालक.
‘‘ अरे देवा ! हे सगळे काय चालले आहे... काहीतरी विचित्र गोष्टींबद्दल तुम्ही बोलत होता..’’
डिसुझा आमच्याकडे वळला,
’‘ जरा गप्प बसलात तर बरं होईल.’’ तो त्रासिक चेहऱ्याने म्हणाला. ‘‘तो माणूस अत्यंत धोकादायक आहे. जे त्याच्या वाटेस गेले आहेत त्यांना नंतर पश्चत्ताप झाला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.’’
एवढे बोलून त्यांनी घाईघाईने तिसरा ग्लास संपवला व पुढच्या दोन ग्लासची वाट न बघता त्यांनी आमचा निरोप घेतला. त्याची आकृती रस्त्यावरच्या दिव्याखालून अंधारात अदृष्य होईपर्यंत आम्ही तेथेच उभे होतो. नंतर आम्ही परत आमच्या टेबलावर आलो. बाहेरच्या जहिरातींच्या लाल उजेडात आमच्या चेहर्यावरील उत्सुकता जास्तच उठून दिसत होती. कदाचित आमचे चेहरे काळजीने भेसूरही झाले असावेत. देव जाणे ! त्या रात्री आम्ही बऱ्याच उशीरापर्यंत गप्पा मारत बसलो. अर्थात विषय कुठला होता हे काही सांगण्याची गरज नाही. सगळ्यांनी काय भानगड असेल या विषयी वेगवेगळे अंदाज बांधून, काय झाले असेल याच्या गोष्टी अगदी रंगवून सांगितल्या. आम्हाला तिघांनाही वेळ भरपूर होता आणि तो कसा घालवायचा हाही एक मोठा प्रश्र्न आमच्या समोर होताच ! मग डिसुझाकडे त्या मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरचे कुठले रहस्य होते हे शोधून काढण्यासाठी आम्ही तो वेळ कारणी लावला नसेला तर नवलच. मी गर्वाने सांगत नाही पण मी ज्या चौकशा केल्या, जे काही डिसुझाशी बोललो, (उलट तपासणीच म्हणा ना! ) जे काही तर्कशास्त्र वापरले त्याने मी जे काही रहस्य होते त्याच्या जवळपास मी पोहोचलो होतो. अर्थात इतर दोघांपेक्षा खूपच जवळ...
आता दुर्दैवाने (का सुदैवाने) यापैकी कोणीच जिवंत नसल्यामुळे या रहस्याचा गौप्यस्फोट माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही हेही तितकेच खरे आहे.....
क्रमशः
बॉडी स्नॅचर या कथेचा अनुवाद.
मुळ लेखक : रॉबर्ट लुईस स्टिव्हनसन.
अनुवाद : जयंत कुलकर्णी
या लिखाणाचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.
प्रतिक्रिया
16 Dec 2018 - 11:04 am | कोण
मस्त सुरुवात
16 Dec 2018 - 3:45 pm | ट्रम्प
छान !!!
17 Dec 2018 - 3:32 am | सोन्या बागलाणकर
वाह! बहारदार आणि उत्कंठावर्धक सुरवात.
17 Dec 2018 - 1:50 pm | प्रचेतस
जबरदस्त सुरुवात.
पुभाप्र
19 Dec 2018 - 10:15 am | स अर्जुन
आयला माला वाटल सत्यकथा आहे कि काय....... एकदम भारी सुरवात !!!
पुभाप्र
19 Dec 2018 - 11:52 am | टर्मीनेटर
उत्कंठावर्धक सुरुवात. पुढील लेखनास शुभेच्छा!
19 Dec 2018 - 1:17 pm | रागो
भारी सुरवात, पुभाप्र
19 Dec 2018 - 1:23 pm | किशोरकुमार
छान लिहलयं!
19 Dec 2018 - 2:08 pm | विनिता००२
उत्कंठावर्धक :)
19 Dec 2018 - 5:25 pm | स्वधर्म
पुढचा भाग लवकर येऊद्या.
19 Dec 2018 - 8:51 pm | नाखु
सुरूवात
22 Dec 2018 - 2:48 pm | ज्योति अळवणी
झक्कास सुरवात. पुढचा भाग लवकर टाका
22 Dec 2018 - 6:59 pm | सविता००१
काका, सुरुवात खूप सुरेख. आता पटपट पुढचे भाग येउदेत. उत्सुकता वाढलीये