भुत प्रेत ही कल्पना, फक्त भारतातच नव्हे तर अगदी (आपण ज्यांना पुढारलेले म्हणतो अशा) पाश्चात्य देशांमध्ये देखील होती किंबहुना आज देखील आहे. म्हणुनच वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्स वर घोस्ट हंटर्स सारखे रीयॅलिटी कार्यक्रम दाखवले जातात आणि करोडोंच्या संख्येने लोक हे कार्यक्रम आवडीने पाहतात देखील. आणि आपल्याकडील काही तथाकथित पुढारलेले लोक अंधश्रध्दा निर्मुलनाच्या नावावर भारताला आणि भारतातील चालीरीतींना ढिगभर शिव्या शाप देऊन मोकळे होतात. माझ्या लेखांमध्ये मी कधीही अंधश्रध्दांचे समर्थन करीत नाही, करणार देखील नाही. अंधश्रध्दा निर्मुलन झालेच पाहिजे पण त्यासोबतच आपल्या या महान देशातील उपजत, मुळ ज्ञान-विज्ञान देखील पुनर्संशोधित केले पाहिजे असे मला वाटते. भुत खेत असतात. मानवी संकल्पनांच्या चष्म्यातुन आपण जर पाहिले तर भुत म्हणजे नक्की काय? तर भुत म्हणजे अशी व्यक्ति की जी सध्या अस्तित्वात नाही. कधीतरी अस्तित्वात असणा-या व्यक्तिसाठी भुत हा शब्द वापरला जातो. जे सत्यात म्हणजेच वास्तवात नाही तरी देखील ते आहे असा भास(किंवा अनुभव) होणे म्हणजे भुताचा अनुभव. बरोबर ना?
सब माया है वत्स !
आपल्या पाच इंद्रीयांच्या जोरावर आपण या समस्त सृष्टीचा अनुभव घेत असतो. या सृष्टीला संस्कृतात प्रपंच असे म्हणतात. प्रपंच या शब्दाची फोड प्र+पंच अशी होते. पंच महाभुतांनी बनलेली म्हणुन हीस प्रपंच असे म्हणतात. दुसरा तर्क असा ही निघु शकतो की आपणच आपल्या पंचेंद्रियांद्वारे या सृष्टीला जन्माला घालत असतो. आपली इंद्रीये असतील तरच आपण या सृष्टीचा अनुभव घेऊ शकतो. आपली इंद्रीये ज्या एका पिंडामध्यी सामवलेली आहेत ते म्हणजे आपले शरीर. तुर्तास “मी” म्हणजे हे शरीर असेच जरी आपण मानले तर आपण कल्पना करु शकाल की जर “मी” नसेल तर या “मी”ला येणारे अनुभव सुध्दा नसतील कारण ही इंद्रीये सुध्दा नसतील. इंद्रीयगोचर जग देखील त्यावेळेस नसेल. बरोबर ना? याचाच अर्थ जे कधीही नव्हते त्या सर्वांचा भ्रमच एका अर्थाने इथे तयार होत असतो. व तो तयार होतो कधी? तर जेव्हा इंद्रीयधारी “मी” चा जन्म होतो. म्हणजे हा “मी” च या सृष्टीला जन्म देत असतो व तो “मी” च शरीर जर्जर झाल्यावर, मृत होताना या सृष्टीचा नाहिसे करतो. त्यामुळे हे विश्व जे इंद्रीयामुळे नुसते अनुभवास येत असे नव्हे तर, इंद्रीयामुळेच बनलेले आहे ते देखील लुप्त होते. त्यामुळेच आपल्या संस्कृतीमध्ये या बाह्य विश्वास प्रपंच म्हणतात. मानवी आकलन क्षमता व व्यक्त होण्याची क्षमता, या खुप म्हणजे खुपच मर्यादीत आहेत. आपण जे काही बोलतो, करतो,विचार करतो ते सर्वच्या सर्व आपल्या मर्यादीत इंद्रीयांनी संकलित केलेल्या माहितीचे पुनःप्रक्षेपण करीत असतो. या जगात नवीन असे काहीही नाही. जे काही आहे ते सर्व येथीलच आहे व ते देखील आपल्या पाच इंद्रीयांच्या कक्षेमध्ये येणारेच आहे. यापुर्वी कुणीतरी कधीतरी आपण जो विचार करीत आहोत तो केलेला आहेच आहे. इंद्रीयांच्या कक्षेबाहेर काय आहे? आपल्याकडे या इंद्रीयांच्या कक्षेबाहेरील अनुभवास किंवा विश्वास “अतींद्रीय” असा एक शब्द वापरला गेलाय गेले हजारो वर्षे. म्हणजेच काय तर आपण ज्यास सत्य वास्तव विश्व म्हणतो ते केवळ आणि केवळ इंद्रीयांच्या भरवशावर चालते. इंद्रीये आहेत तर विश्व आहे इंद्रीये नाहीत विश्व नाही. प्रपंच नाही. वरील परिच्छेद वाचुन तुम्हाला कदाचित असे वाटले असेल की हा लेख एखाद्या आध्यात्मिक विषयावर आहे की काय? बरोबर ना? अध्यात्मामध्ये आणि केवळ अध्यात्मामध्ये अशा अतींद्रीय (इंद्रीयांच्या कक्षेबाहेरील म्हणजे जे इंद्रीयांना गोचर होत नाही असे) सृष्टी व अनुभवाविषयी वर्णन आपणास पहावयास, वाचावयास मिळते मिळते. आपण अध्यात्म म्हणजे जगावेगळे काहीतरी आहे अशापधतीनेच त्याच्याकडे पाहत असतो. त्यामुळेच आपण अशा कोड्यांकडे कधी ही डोळसपणे पाहत नाही. अशी कोडी फक्त अध्यात्मामध्ये किंवा वेद पुराणांमध्येच आहे असे आपल्याला वाटते. पण आपले असे वाटणे म्हणजे आपल्या “कुपमंडुक” विचारसरणीचे लक्षण आहे हे लक्षात असु द्या. सांप्रत वैज्ञानिक नील डीग्रास टायसन त्याच्या एका विश्व प्रसिध्द, स्तुत्य आणि निव्वळ वैज्ञानिक कार्यक्रमाची सुरुवात खालील विधानांनी करतो. लक्षपुर्वक वाचा. “पाहणे किंवा दिसणे म्हणजे विश्वास ठेवणे असे कधीही नसते. आपली इंद्रीये आपल्या फसवु शकतात. जे काही तारे आपण पाहतो ते खरतर जसे दिसतात तसे नसतातच. कधीही आपल्या कल्पनेत सुध्दा नसेल इतके हे ब्रह्मांड, विज्ञानामुळे समजलेले ब्रह्मांड, विचित्र आहे. प्रकाश, काळ (वेळ), अवकाश आणि गुरुत्वाकर्षण एक महान षडयंत्र करुन वास्तव निर्माण करतात. व हे वास्तव आपल्या इंद्रीयांच्या कक्षे बाहेर आहे. अतींद्रीय आहे.”
काय आहे विज्ञान?
टायसन सारखा विद्वान वैज्ञानिक ज्याने अवकाशातील महान अशी कोडी सोडवण्यात योगदान दिले आहे तो असे म्हणतो आहे तर यात काहीतरी तथ्य असणार. आपल्या भारतीय मानसिकतेची एक विचित्र सवय आहे. जेव्हा कधी “भारतीय” म्हणुन असे काही आपणास सांगितले जाते तेव्हा आपण “पुढारलेले” आहोत असे दाखवण्यासाठी किंवा पुढारलेले आहोत असे स्वःतस वाटण्यासाठी, ते “भारतीय” तत्व चक्क नाकारतो. पण तेच तत्व जेव्हा एखादा पाश्चात्य व्यक्ति सांगतो तेव्हा मात्र आपणास ते ग्राह्य वाटते. दुर्दैव आपले. दुसरे काय! असो, आपण मुळ मुद्द्यावर येऊ आता. भुते खरेच असतात काय? तर उत्तर आहे.. हो. भुत म्हणजे काय हे आपण वर पाहिले आहेच. जे अस्तित्वात नाही तरीदेखील ते आहे असे आपणास वाटणे म्हणजे तसा अनुभव होणे म्हणजे भुत. ब्रह्मांडातील सर्व तारे स्वयंप्रकाश मान आहेत असे आपण मानतो व तसा अनुभव देखील आपणास येतो. याचा सर्वात पहिला प्रत्यय येतो तो सुर्याच्या बाबतीत. सुर्य उगवणे ही नैसर्गिक क्रिया आपणास माहित आहेच. प्रत्यक्षात सुर्य उगवतो आहे असे आपणास वाटते किंवा आपण अनुभवतो, तेव्हा तो खरेच उगवलेला नसतो. तो क्षितिजाच्या खाली असतानाच आपणास पृथ्वीभोवतीच्या वातावरणामुळे असे वाटते की सुर्य उगवला आहे. सुर्यापासुन निघणारा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला आठ मिनिटे व वीस सेकंद लागतात( ८-२०). सुर्य आपणास दिसतो कशामुळे तर सुर्यापासुन निघणा-या प्रकाश किरणांमुळे. जे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांना दिसतात प्रत्यक्षात ते आठ मिनिटांपुर्वीचे असतात. म्हणजेच आपण जो सुर्य पाहतो तो आठ मिनिटे जुना असतो. आता आपणास जो दिसतो तो आठ मिनिटांपुर्वीचा दिसत असतो. चालु क्षणाचा सुर्य आपण पाहु शकत नाही. गम्मत म्हणुन असे समजा की सुर्याचा विनाश झाला. आणि पृथ्वीमात्र अशीच आहे. सुर्याचा विनाश होऊन देखील पुढचे आठ मिनिटे व वीस सेकंद सुर्य आपणास असाच दिसत राहील. तो प्रत्यक्षात मात्र अस्तित्वात नसणार आहे. आणि नेमके ते आठ मिनिटे आपण पृथ्वीवासी सुर्य म्हणुन जे काही पाहु ते म्हणजे सुर्याचे भुत. बरोबर ना? सुर्य आपणास इतर ता-यांच्या तुलनेत थोडा मोठा दिसतो. व आकाशातील अन्य तारे मात्र छोटे, खुपच छोटे फिकट दिसतात. प्रकाशकिरण एका सेकंदामध्ये ३ लाख किमीचा प्रवास करतो. प्रकाशाचा वेग इतका आहे. सुर्य मोठा व बाकी तारे छोटे दिसण्याचे कारण आपण व त्या ता-यामधील अंतर हे आहे. अवकाशीय अंतरे मोजण्याचे मुलभुत एकक प्रकाशवर्ष आहे. सुर्याचा एक किरण, वर सांगितलेल्या वेगाने, एका वर्षामध्ये जितके अंतर प्रवास करेल तितक्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात. सेकंदास ३ लाख किमी प्रमाणे एका वर्षात किती अंतर होईल? तर ३६५ x २४ x ६० x ६० = 9,500,000,000,000 kilometers किमी च्या आसपास हे अंतर आहे. सुर्य किरणास सुर्यापासुन पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आठ मिनिटे आणि वीस सेकंद लागतात. याचाच अर्थ सुर्य व पृथ्वी यांमधील अंतर एक प्रकाशवर्ष इतके देखील नाही. एका प्रकाशवर्षाच्या खुपच कमी, अगदी नगण्य अंतर सुर्य व पृथ्वीमध्ये आहे. मग बाकीचे जे तारे पृथ्वीपासुन किती अंतरावर असतील बरे? आपल्या सुर्यमालेला सर्वात जवळचा तारा म्हणजे प्रॉक्सिमा सेंटॉरी होय. हा तारा पृथ्वीपासुन ४ प्रकाश वर्षे दुर आहे. पण तो इतका क्षीण आहे की तो आपल्या उघड्या डोळ्यांना दिसतच नाही. हल्ली म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पुर्व आकाशामध्ये संध्याकाळनंतर एक सर्वात तेजस्वी तारा दिसतो. आपण त्याला व्याध म्हणतो. आता हा व्याध पृथ्वीपासुन साधारणपणे ८.६० प्रकाशवर्षे (८.६० गुणिले १५ कोटी इतके किमी) इतका दुर आहे. व्याधाच्या थोडेसे वर मृग नक्षत्र दिसते. यातील सर्वात तेजस्वी ता-याचे पृथ्वीपासुनचे अंतर ८६० (आठशे साठ) प्रकाशवर्ष इतके आहे. कोणता तारा मुळातच किती प्रकाशमान आहे व त्याचे पृथ्वीपासुनचे अंतर किती आहे यावरुन आपणास तो तारा कसा दिसेल हे ठरते. ता-यांचे अंतर इतक्या खोलात सांगण्याचे कारण एवढेच आहे की जितके अंतर जास्त तितका जास्त वेळ त्या ता-यापासुन येणा-या प्रकाशास लागतो पृथ्वीपर्यंत येण्यासाठी. आपणास उघड्या डोळ्यांना उत्तर दिशेला, शर्मिष्टा तारकामंडलाच्या थोडे खाली, उजवीकडे देवयानी तारकापुंज दिसतो. देवयानी तारकापुंज प्रत्यक्षात एक स्वतंत्र आकाशगंगा आहे. व ही आकाश गंगा पृथ्वीपासुन २५० लाख वर्षे दुर आहे. याचाच अर्थ देवयानी चा जो प्रकाश आपण पाहतो किंवा आपणास तारे सदृश्य जे दिसते त्यातील तो लुकलुकता, मिणमिणता प्रकाश अंदाजे अडीशचे लक्ष वर्षापुर्वी तिथुन सुरु झाला पण तो आपणास दिसतो मात्र आज आहे. प्रत्येक ता-याचे जीवनमान असते. तारे जन्माला येतात, यौवनावस्थेमध्ये जातात नंतर जर्जर, वृध्द होऊन नष्ट देखील होतात. विचार करा २५० लक्ष वर्षापुर्वी निघालेली प्रकाश किरणे आपणास हल्ली दिसताहेत. काय जाणो इतक्या काळात तो तारा नष्ट देखील झाला असेल. नव्हे असे अनेक तारे आहेत की जे नष्ट झाले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जे अद्याप नष्ट झालेले नाहीत त्यांचे प्रकाशमान संपते पण गुरुत्वाकर्षण हळु हळु संपते. त्यामुळे त्या ता-यांना प्रकाश नसतो पण वस्तुमान असते. अशा ता-यांना डार्क स्टार म्हणजे कृष्ण तारा असे म्हणतात. आपल्या उघड्या डोळ्यांना जे काही तारे दिसतात त्यातील कित्येक एव्हाना नष्ट झालेले असतील असा खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. ते नष्ट झालेले असले तरी त्यांचा प्रकाश मात्र अजुनही येतो आहे कारण प्रकाश खुप दुरवरुन येतो व तो पृथ्वीपर्यंत पोहोच पर्यंत तारा नष्ट झालेला असतो. प्रत्यक्ष तारा संपलेला असतो पण तो आहे असा आपल्याला भास होतो एवढेच. म्हणजेच काय तर ही आहेत ता-यांची भुते. त्यामुळेच आपण रात्रीच्या आकाशात असंख्य भुते पाहत असतो. खालील व्हिडीयो आवर्जुन पहा. शास्त्रज्ञ विलियम हर्षेल आणि त्याचा मुलगा जॉन यांच्या मधील संवाद खुपच सुंदर आहे.
व्हिडीयो इथे टाकता येईना म्हणुन व्हिडीयो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
प्रतिक्रिया
25 Nov 2018 - 9:21 pm | मार्मिक गोडसे
छान माहिती. ह्यामुळेच आपल्याला अनेक ताऱ्यांचा जन्म बघायला मिळू शकतो.
27 Nov 2018 - 7:53 am | सुहासवन
पण नकळत सीएसटीला जाता जाता दादरला का उतरलो ते मात्र कळलं नाही.
27 Nov 2018 - 12:05 pm | हेमंत ववले
सब माया है !!!!
27 Nov 2018 - 3:07 pm | टर्मीनेटर
रोचक माहिती.