-----------
भडक लाल रंगाचे कपडे घालून एकता कपूर तिच्या गिरणीत नेहमीप्रमाणे कामात दंग होती. मधली एक गिरणी फारच अवाढव्य होती. एखाद्या ऑटोमोबाईल कारखान्यात शोभावी, अशी. या गिरणीवर एकता कपूर स्वतः काम करत होती. वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची वेगवेगळी पिंपं शेजारी मांडली होती. मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून धान्य काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून सकस, रसरशीत पीठ खालच्या पिंपांत पडत होतं.
या भल्यामोठ्या आवारात शेजारीच रांगेत, ठराविक अंतरावर पंधरा-वीस गिरण्या मांडल्या होत्या. त्यांच्यावरही एकतासारख्याच दिसणाऱ्या काही बाया कार्यरत होत्या. या एकताच्या "डमी'. त्यांच्या हाताखाली डझनभर लोकं काम करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले होते, कसल्यातरी ओझ्याखाली ते पार बुडून गेले होते. बहुधा, एकताच्या "कारखान्या'तले लेखक असावेत. तेही धान्य पुरवण्याच्या कामात मदत करत होते. कुठलं धान्य कुठल्या वेळी घालायचं, हे एकताच मुख्य गिरणीवरून ओरडून सांगत होती.
गिरणीच्या बाहेर गिऱ्हाइकांची भलीमोठी रांग लागली होती. प्रत्येकाने आपल्यासोबत ट्रकच आणले होते. तयार झालेलं पीठ लगेच नोकरांकरवी ट्रकमध्ये चढवलं जात होतं. ट्रक अगदी खच्चून भरले, की पुढच्या मार्गाला लागत होते. गिऱ्हाइकांनी मोठमोठ्या पिशव्या भरभरून नोटा आणल्या होत्या. बालाजीच्या भल्यामोठ्या फोटोसमोर ठेवलेल्या दानपेटीत ते या नोटा ओतत होते. दर अर्ध्या तासाने ही पेटी रिकामी करावी लागत होती.
असं सगळं पवित्र वातावरण हा एकूणच भारावून टाकणारा अनुभव होता. अचानक काय झालं कुणास ठाऊक, एकताच्या गिरणीतून "खडाम खट्ट....खुर्र खुर्र...' असा विचित्र आवाज ऐकू यायला लागला. गिरणीतून पीठ पडताना अडकायला लागलं. एकताच्या आणि बाहेरच्या गिऱ्हाइकांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली...पण क्षणभरच. एकतां ताबडतोब आधीच्या धान्याचं पिंप हलवलं आणि त्या जागी नवीन मागवलं. हे धान्य जरा वेगळ्या रंगाचं होतं, पण लगेच गिरणी पूर्वीसारखी सुरू झाली. गिऱ्हाइकांच्या रांगेतली चुळबूळही थांबली. पुन्हा दानपेटीत धान्याच्या राशी पडू लागल्या.
थोडा वेळ गेला आणि एकताच्या मुख्य गिरणीच्या शेजारच्या गिरणीला "घर घर' लागली. बऱ्याच खटपटी करूनही ती सुरू होईना. नंतर लक्षात आलं, तिचा पट्टाच कुणीतरी तोडला होता. शेवटी सगळ्यांनी नाद सोडून दिला.
मधली मुख्य गिरणी मात्र जोरात सुरू होती. खरंतर तिच्या क्षमतेचाच बाकीच्या गिरण्यांना आधार होता. सगळ्यात जास्त पीठ याच गिरणीतून पडत होतं. एकताचं काम वेगात सुरू असताना काहीतरी घडलं. जोराचा आवाज आला आणि एकाएकी गिरणी बंद पडली. पीठ पडायचं थांबलं. एकतानं आणखी धान्य ओतून पाहिलं, धान्य बदलून पाहिलं, पट्टा जोरजोरात फिरवून पाहिला, पण काही फरक पडेना. ती मागे वळली तेव्हा लक्षात आलं, की या गिरणीचा "मेन स्विच'च कुणीतरी काढून टाकला होता. तिनं वीज मंडळाला फोन लावला. पण त्यांचं हे काम नव्हतं. तिच्या विजेचं बिल भरणाऱ्या "स्टार' लोकांनी ही कारवाई केली होती.
एकतानं आपले सगळे "सोर्सेस' वापरून बघितले. मुदतीआधीच गिरणी बंद करायला लावणं म्हणजे कराराचा भंग होता. एकतानं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आलं, की "स्टार' लोकांना जास्त पीठ पाडणारी दुसरी गिरणी मिळालेय. तिच्यातून उत्पन्नही चांगलं मिळतंय. पिठानं माखलेला हात एकतानं कपाळावर मारून घेतला.
...काही क्षणांतच मग ती सावरली. बंद पडलेली गिरणी ताबडतोब तिथून हलवली आणि नव्या पद्धतीच्या, नव्या रूपातल्या गिरणीची ऑर्डर तिनं लगेच नोंदवून टाकली. आधीच्या धान्याला पॉलिशही करून आणायला सांगितलं आणि बाकीच्या गिरण्यांकडे वळली.
----------
प्रतिक्रिया
31 Oct 2008 - 6:51 pm | कपिल काळे
झकास आहे. उपहासाला अजून धार हवी होती.
उदा.
<<वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची वेगवेगळी पिंपं शेजारी मांडली होती. मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून धान्य काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून सकस, रसरशीत पीठ खालच्या पिंपांत पडत होतं.>>
ह्याएवजी,
"वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाची , होतकरु तरुण- तरुणींची पिंपं शेजारी मांडली होती.मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून नट, नटी, लेखन काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून 'सिरियल' च्य राशी खाली पडत होत्या"
असं लिहिलं असतं तर उपहासाला अजून धार आली असती का? बघा जरा.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
2 Nov 2008 - 12:35 pm | आपला अभिजित
उपहासाला आणखी धार हवी होती, हे बरोबर.
पण
"वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाची , होतकरु तरुण- तरुणींची पिंपं शेजारी मांडली होती.मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून नट, नटी, लेखन काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून 'सिरियल' च्य राशी खाली पडत होत्या
एवढं स्पष्ट लिहिलं, तर ते बाळबोध वाटतं. वाचकांनी वाचून त्यातून अर्थ काढण्यात मजा आहे. मी तरी तसंच लिहितो.
31 Oct 2008 - 8:27 pm | विनायक प्रभू
अशा रितीने एकताच्या दळ्णाच्या चपात्या खायला एकटा जितेंद्र च उरला.
31 Oct 2008 - 8:27 pm | विनायक प्रभू
अशा रितीने एकताच्या दळ्णाच्या चपात्या खायला एकटा जितेंद्र च उरला.
1 Nov 2008 - 12:07 am | खुसपट
या देशातल्या कोट्यवधि निरुद्योगी , हाताशी असलेला वेळ कसा आणि कशात घालवावा हे न समजणार्या लोकांनी , विशेषतः स्त्रियांनी फारसा खर्च न करता घरबसल्या कशाने मनोरंजन करून घ्यावे ? असे आपल्याला वाटते. दळण घेणारे जोपर्यंन्त आहेत तोपर्यन्त कुठलातरी गिरणीवाला गिरणी चालूच ठेवेल. लोकांच्या मनोरंजनासाठी नव्हे , जाहिरातींचे पैसे मिळवण्यासाठी गिरणी चालू ठेवावीच लागेल. बहुसंख्य लोक डोक्याने बथ्थडच असतात, आशयघन आणि केवळ ५ टक्के तथाकथित बुद्धीमान लोकांनाच पटणारे आणि पचणारे कार्यक्रम जाहिरातदारांना परवडत नाहीत.
खुसपट
1 Nov 2008 - 12:31 am | प्राजु
छान लिहिलं आहेस..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/