पराजय नव्हे, विजय!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
14 Oct 2018 - 10:53 pm

सह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा...
तर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं.
लांजा राजापूर संगमेश्वर तालुका विकास मंडळ नावाची एक संस्था गेल्या सुमारे पाव शतकापासून मुंबईत काम करते. ज्या मातीत आपला जन्म झाला, आपली नाळ पुरली, त्या मातीचे कर्ज फेडले पाहिजे या जाणिवेने एकत्र आलेल्या काही सर्वसामान्य माणसांनी स्थापन केलेली ही संस्था! मुंबईच्या नायर इस्पितळात काम करणाऱ्या काही जणांचे या तीन तालुक्यांतील कुठल्या ना कुठल्या गावाशी जन्माचे नाते असल्याने, मुंबईत स्थिरावल्यावर गावासाठी, तालुक्यासाठी आणि जगण्याचा संघर्ष करतानाही आनंद शोधणाऱ्या आपल्या माणसांच्या, त्यांच्या मुलाबाळांच्या विकासासाठी काहीतरी करायचं या निश्चयाने एकत्र येऊन या कर्मचाऱ्यांनी ही संस्था स्थापन केली, आणि ग्रामविकासाचं एक अनोखं माॅडेलही जन्माला आलं. आपल्या तुटपुंज्या पगारातील नेमकी रक्कम दरमहा बाजूला काढून त्या बचतीतून दर वर्षी गावाकडच्या शाळांमधील गरजू मुलांना वह्यापुस्तके, दप्तरे, छत्र्यांचे वाटप करायचे हा उपक्रम ठरला. दर वर्षी, एप्रिल उजाडला की बाजारात जाऊन गणवेशाच्या कापडाची घाऊक खरेदी करायची, महालक्ष्मी येथील स्टाफ क्वार्टरमध्ये स्वत: वेगवेगळ्या मापांचे गणवेश शिवायचे, आणि जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात, सारं सामान भाड्याच्या टेम्पोत टाकून त्या ढिगाऱ्यावरूनच प्रवास करत तीन तालुक्यांतील गावागावांत जाऊन गरजू मुलांना या साहित्याचं स्वत: वाटप करायचं.
कुठलाही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून लांब राहून सुरू असलेल्या या कामाने आज मोठा पल्ला गाठलाय... आता गणवेश, वह्यापुस्तकं तर दिली जातातच, पण गरीब, हुशार मुलांना बक्षिसे, त्यांच्या आईला भाऊबी म्हणून साडीचोळी, गुणवत्ता असलेल्या शाळांना शैक्षणिक साहित्य, पंखे - आणि संगणकही- दिले जातात. काही शाळांकरिता पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय तर काही शाळांना स्वच्छतागृहे बांधून दिली जातात....
याच मातीशी नाते असल्याने कधीतरी योगायोगाने मी या संस्थेशी जोडला गेलो, आणि त्यांचा सहप्रवासीही झालो.
तशाच एका प्रवासात, या गावात गेलो...
... शाळेत तो कार्यक्रम सुरू झाला, साहित्याचे वाटप झाले, आणि मी मुलांशी अनौपचारिक गप्पा मारू लागलो.
सहावी सातवीतली एक चुणचुणीत मुलगी, खूप गप्पा मारत होती. ती अवांतरही खूप वाचते हे जाणवलं, आणि, सगळ्यात आवडलेलं पुस्तक कोणतं असा प्रश्न मी तिला विचारला.
क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली, ‘पराजय नव्हे, विजय’ ...लेखक विजय फळणीकर!’
...
एका नव्या कहाणीची सुरुवात इथे झाली.
त्या मुलीनं सांगितलेलं ते पुस्तक वाचलं पाहिजे असे मलाही वाटू लागले, अाणि मी ते पुस्तक मिळवून वाचून काढले....
.....
कोकणातल्या त्या शाळेची भेट, त्या चुणचुणीत मुलीमुळे वाचून झालेलं फळणीकरांचं पुस्तक, याला आता पाचसहा वर्षं झालीत. त्यानंतर फळणीकरांच्या भेटीची उत्सुकता वाढली, आणि कुठून तरी त्यांना फोन नंबर मिळवून मी त्यांच्याशी बोललो. एका दुर्दैवी कौटुंबिक प्रसंगातून स्वतःला कष्टाने सावरून हे दाम्पत्य एका सामाजिक कार्यात उतरले आणि समर्पणभावाने समाजसेवा करू लागले. वैभव फळणीकर मेमोरियल फाऊंडेशन नावाने रुग्णसेवा सुरू झाली. मग अनाथ, निराधार बालकांना आधार देणे सुरू झाले, समाजात उपेक्षित, निराधार आणि जगण्यासाठी हातपाय हलविण्याचीही शक्ती नसलेल्या वृद्धांना आधार देण्याची गरज आहे हे जाणवल्यावर वृद्धाश्रमही सुरू झाला. पुण्याजवळ डोणजे नावाच्या गावात, सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या जवळपास १४ गावांतील गरीब, आदिवासी कुटुंबांसाठी फळणीकरांची संस्था हिमालयासारखी पाठीराखी ठरली आहे. जिथे पोहोचायला कालपर्यंत पक्का रस्ताही नव्हता, तिथे या संस्थेचं सुसज्ज इस्पितळ आहे, आणि अवघड शस्त्र्क्रियांपासून सामान्य आजारापर्यंतचे सारे उपचार या गावांतील गरीबांसाठी मोफत उपलब्ध आहेत...
फळणीकरांची संस्था ही एक विजयगाथा आहे...
या संस्थेत जाण्यासाठी धड रस्ता नाही, म्हणून काही महिन्यांपूर्वी आपल्या आजारी बाळाला कडेवर घेऊन चालत जाणारी एक आदिवासी महिला धडपटून पडली, आणि स्वतःच रुग्ण होऊन बाळासोबत कशीबशी फळणीकरांच्या संस्थेतील कराड इस्पितळात दाखल झाली.
एका नव्या लढ्याची ती सुरुवात होती.
पुढे सुरू झाले, पक्क्या रस्त्याचे प्रयत्न... तो झाला नाही तर संस्था बंद करून टाकावी असा विचार फळणीकरांनी बोलून दाखवला, आणि केवळ सरकारी अनास्थेचा फटका बसल्यामुळे हे सारे बंद झाले तर बेघर वृद्ध कुठे जाणार, अनाथ मुलांचे काय होणार, आणि मुख्य म्हणजे, त्या १४ गावांतील गरीब आदिवासी कुटुंबांच्या रुग्णसेवेचे काय होणार अशी काळजी उगीचच मन पोखरू लागली, आणि माझा सहकारी संदीप आचार्य याच्या मदतीने पक्क्या रस्त्याचे प्रयत्न सुरू झाले.
पुणे जिल्ह्याचे मुख्याधिकारी सूरज मांढरे यांनी संवेदनशीलतेने हा प्रश्न हाताळला, सोडविला, आणि एक सत्कार्य नव्या विश्वासाने पुढे वाटचाल करू लागले...
फळणीकरांची संस्था हा या कहाणीचा उत्तरार्ध!
गेल्या रविवारी फळणीकरांनी मला व संदीपला आग्रहाने संस्थेत बोलावून घेतले. सूरज मांढरेही आले. बाजूलाच फार्म हाऊस असलेला नाना पाटेकर त्या दिवशी तिथेच होता. आणि एक कौटुंबिक स्नेहसोहळा सहजपणे पार पडला...
सूररज मांढरे, मी आणि संदीपचा नानाच्या हस्ते सत्कार करून फळणीकरांनी समस्यामुक्तीचा आनंद साजरा केला...
सत्कार्य करणारी हिमालयाच्या उंचीची व्यक्तिमत्वे फळणीकरांसारख्या माणसांच्या रूपाने आढळतात. त्यांच्यासाठी काहीतरी करता आले याचं समाधान घेऊन आम्ही त्या दिवशी परतलो...
कोकणातल्या गावातल्या त्या प्रसंगाची गोष्ट मी मुद्दाम फळणीकरांनी आयोजित केलेल्या त्या कार्यक्रमात सांगितली...
विधायक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे परस्परांशी नाते जडावे यासाठी आता फळणीकर प्रयत्नशील आहेत.
ते यशस्वी झाले, तर एक वेगळा, माणुसकीने भारावलेला महाराष्ट्र पहायला मिळेल.
आज त्याची खरी गरजही आहे...

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Oct 2018 - 11:08 pm | मुक्त विहारि

‘पराजय नव्हे, विजय’ ...लेखक विजय फळणीकर!’

पुस्तक वाचावे(च) लागेल असे दिसत आहे.

नाखु's picture

15 Oct 2018 - 11:23 pm | नाखु

दिसतेय.
पळणिकर यांस शुभेच्छा.

सुरेख आणी महत्वपुर्ण माहिती .

प्रचेतस's picture

15 Oct 2018 - 8:32 am | प्रचेतस

उत्तम लिहिले आहेत.

मंदार कात्रे's picture

15 Oct 2018 - 12:44 pm | मंदार कात्रे

छान लेख ! अभिनन्दन !!

लांजा राजापूर संगमेश्वर तालुका विकास मंडळ तर्फे आमच्या चोरवणे ( ता.संगमेश्वर ) गावातील शाळेतही गणवेश व शालेय साहित्य वाटप झाले होते काही काळापूर्वी !!!

कर्मवीर फळणीकरांच्या कार्याला सलाम! छान लेख!

.