देव पावला
मला जागरूक देवस्थानात जायला खुप भिती वाटते. शिरडी असो वा सिद्धीविनायक. मागे त्र्यम्बकेश्वर ला चार तास रांगेत उभे राहील्यावर दर्शनाच्या वेळी केवळ पैसे दिले नाहीत म्हणून हाकलूंन देणारा पुजारी आठवतो. पंढरपुर आणि तिरुपति बद्दल फक्त ऐकून आहे. अजून जायची हिम्मत झालेली नाही. मुद्दाम कबुल करतो की ही भिती देवाची नसून देवपण पांघरलेल्या पुजारी, भटजी, पंडित, गुरव, शास्त्री ह्यांची आहे. तूफान गरदीची आहे. देवाचे दर्शन म्हणजे देवाची मूर्ती पाणवलेल्या डोळ्यांनी साठवून घेणे आणि ती प्रतिकृति हॄदयावर झेरोक्स मारल्यासारखी छापून घेणे इतकीच माझी माफक अपेक्षा असते. पण मध्ये येणारे टुरीस्ट, पुजारी, भटजी, शेटजी हे तुम्हाला तो आनंद अनुभवू देत नाहीत.देवस्थानात प्रवेश करण्या पासून ह्या अपेक्षाभंगाची सुरुवात होते. देवाच्या नावावर दुकान उघड़णारे हार वाले आपले साधारण 100 रुपया पासून सुरु होणारे ते 1000 रुपया वर जाणारे ताट घ्यावे म्हणुन तुमच्या मागे लागतात. जर तुम्ही महागाताले ताट घेतलेत टार तुमची भक्ती अधिक सिद्ध होईल असा हिशोब मांडला जातो. ताटातले फूल आणि प्रसादाचे चार पेढ़े सोडले तर इतर एकूण एक जिन्नस मागच्या दाराने त्या त्या दुकानात परत विराजमान होतात पुन्हा नवीन ताट आणि नवीन भक्ती विकणयास सिद्ध होते. दाराबाहेरचे भिकारी तुमच्या भक्तीची किमत जोखू पहातात. जर तुम्ही चुकुन एखाद्या भिकार्याला अर्थ दान केलेत तर इतर भिकारी तुम्हा पाठी ब्रम्हाराक्षसारखे लागतात आणि तुम्ही कुठून दान दिलेत अशे तुम्हास होऊन जाते. थोडक्यात काय तर हे भिक्षुक , हार ताट वाले, टूरिस्ट , पुजारी, भटजी , पंड़ित, गुरव, पंड्या, सिक्युरिटी वाले तुम्हाला देवाशी कनेक्ट होऊ देत नाहीत. तुम्ही पाण्यात उतरूनही कोरडेच राहता.
पुन्हा सांगतो मी नास्तीक नाही पण वर सांगीतलेले bad conductors of आस्तिकता तुम्हा पर्यन्त भक्तीचा करंट पोहोचु देत नाहीत.
परवा एका परिचीताना आजारपणा साठी काही आर्थिक मदतीची गरज आहे अशे मला कुणा कडूनसे कळले. मी चुपचाप जाऊन त्यांना आर्थिक मदत करून आलो. आजारी बेड रिडन पेशंट कसे बेस उठून बसले. त्यानी समोरच्या देवाच्या तसबीरीला नमस्कार केला आणि माझ्याकडे बघून म्हणाले मी देवाजवळ रोज मला तो भेटावा म्हणुन प्रार्थना करत होतो पण तुमच्या रूपाने मला आज देव जीवंतपणीच भेटला. अंगावर काटा उभा राहिला. आणि माझे मन मधील सर्व bad conductors ओलांडून देव्हारयात देवाच्या मूर्ती मुखाशी पोहोचले. एक करंट पूर्ण झाला कारण देव तिथेच होता जो मला त्या क्षणी दिसला
केदार अनंत साखरदांडे
प्रतिक्रिया
27 Sep 2018 - 9:58 am | ज्योति अळवणी
देव आपण जिथे मानू तिथे आहे. मग तो तुमच्या घरच्या देव्हाऱ्यात असेल किंवा जागृत देवस्थानात असेल. _/\_
27 Sep 2018 - 10:32 am | सतिश गावडे
लेखात मांडलेले विचार आणि शेवटी दिलेला अनुभव दोन्ही आवडले.
मंदिरांच्या दानपेट्या करोडो रुपयांनी भरण्याऐवजी सश्रद्ध लोकांनी तोच पैसा खऱ्या गरजूंना दिला तर तो अधिक सत्कारणी लागेल.
27 Sep 2018 - 11:36 am | सुबोध खरे
मंदिरांच्या दानपेट्या करोडो रुपयांनी भरण्याऐवजी सश्रद्ध लोकांनी तोच पैसा खऱ्या गरजूंना दिला तर तो अधिक सत्कारणी लागेल.
एके काळी माझी पण अशीच धारणा होती. परंतु माझ्या कडे आलेल्या अनेक गरीब रुग्णांनी दिलेल्या माहिती नुसार (जी मी सत्यतेसाठी तपासून पहिली आहे.) हि देवस्थाने मोठ्याप्रमाणावर गरजूंसाठी कामे करताना आढळली आहेत. वानगीसाठी दोन दुवे देतो आहे.
https://www.sathyasai.org/saihealth/pnhosp.htm येथे गरीब रुग्णांना अद्ययावत अशा शल्यक्रियांपासून सर्व सोयी नि:शुल्क पुरवल्या जातात.
http://www.tirumala.org/SABIRRD.aspx
http://www.tirumala.org/SocialActivities.aspx
लालबागचा राजा हे देवस्थान गरीब रुग्णांना १०० रुपयात डायलिसिस ची सोया उपलब्ध करून देतात. म्हणजे दर महिना केवळ८०० रुपयात हि सोय होते. माझा एक रुग्ण तेथे गेली दीड वर्षे याचा उपयोग करून घेतो आहे. त्यांची इतर पण अनेक कामे आहेत.
http://www.lalbaugcharaja.co.in/en/social-activities-1/
तेंव्हा देवस्थाने फक्त पैसे मिळवतात हा एकांगी विचार सोडून द्यावा हि विनंती
27 Sep 2018 - 1:52 pm | आनन्दा
देवळांचा पैसा खालील प्राधान्यक्रमाने वापरला जात असावा.
१. देवस्थानाचा मेंटेनन्स, कामगारांचे पगार वगैरे
२. येणार्या भक्तांसाठी सुविधा वगैरे
३. सुरक्षा ठेव
४. यातून सरप्लस झाला तर तो समाजोपयोगी कामासाठी खर्च करत असावेत.
प्रत्येक देवस्थानच्या आर्थिक आवकीनुसार हे बदलत असेल. पण साधारण असेच असते. आणि त्यात त्यांना दोष देण्याचे कारण नाही. मण्दिर सरकारी असेल तर काय होते ते मात्र माहीत नाही. कोल्हापुर मंदिरात मोठा घोटाळा झाला असे ऐकुन आहे, खखोदेजा.
अवांतर१ : ज्यांना देवस्थानाला पैसे दान दिल्याचे दु:ख होते त्यांनी अजिबात देउ नये. कारण दानामधून समाधान मिळणे अपेक्शित असते, आणि दात्याने दिल्यानंतर त्याचा विनियोग कसा झाला याकडे ढुंकुन देखील बघायचे नसते.
अवांतर२ : मी देखील सहसा गर्दीची देवस्थाने टाळतो, पण तिरुपतीला मात्र मी गेल्यावर्शी आवर्जुन जाऊन आलो, आणि तो अनुभव नक्कीच समाधानकारक होता.
27 Sep 2018 - 3:05 pm | टर्मीनेटर
पैसे दानपेटीत टाकण्या पेक्षा ज्या देवस्थानांमध्ये अन्नदान चालते त्यांना देणगी रूपाने देणे मला योग्य वाटते. तसेही हल्ली बरीचशी देवस्थाने ऑनलाईन देणग्या स्वीकारत असल्याने तो पैसा थेट कोणाच्या खिशात जाण्याचीही शक्यता नसते. बाकी तिरुपतीचा अनुभव नक्कीच चांगला येतो. कितीही तास रांगेत थांबावं (बसावं) लागलं तरी भाविकांना चहा/कॉफी/दुध/नाश्ता/ अशा सगळ्या गोष्टी रांगेतच विनामुल्य उपलब्ध करून देण्याची काळजी देवस्थान व्यवस्थित घेते.
28 Sep 2018 - 9:15 am | सुबोध खरे
मंदिरांच्या दानपेट्या करोडो रुपयांनी भरण्याऐवजी सश्रद्ध लोकांनी तोच पैसा खऱ्या गरजूंना दिला तर तो अधिक सत्कारणी लागेल.
एक पुरवणी -- मी यातील कोणत्याही देवस्थानाला आजतागायत गेलेलो नाही.
27 Sep 2018 - 2:17 pm | मराठी_माणूस
पायाभूत सुविधा प्रकल्पा मध्ये सहभागी व्हावे. जसे की टोल , खड्डे विरहित रस्ते. ज्याचा सर्व प्रकारच्या लोकांना वर्षानुवर्षे उपयोग होत राहील आणि प्रामुख्याने त्यांच्या मदतीची सर्वांना माहिती होईल, देशाच्या प्रगतीला हातभार लगेल.
28 Sep 2018 - 10:54 pm | अभिजित - १
मग आपण कर रूपाने भरलेला पैसे जातो कुठे ? सगळे मोठे रस्ते तर BOT तत्वावर बनवताना दिसतं सरकार .
27 Sep 2018 - 3:47 pm | टवाळ कार्टा
मुळात मंदिरांना/मशिदींना/चर्चला/अन्य धार्मिक स्थळांना पैसा द्यावाच कशाला
27 Sep 2018 - 4:07 pm | खिलजि
एक नंबर साहेब , खरंय हे . जर असंच देत गेलात तर तुम्हाला एक दिवस देव नक्की भेटेल .. आणि हो हे मनातून काढून टाका कि " मी जर असंच वाटत गेलो तर माझं पुढे काय होईल किंवा माझ्या कुटुंबच काय होईल ? काही होत नाही साहेब , मी माझं स्वतःच उदाहरण आणि माझे एक मार्गदशक " डॉ गोरुले " यांचे उदाहरण देऊन सांगतो , कि सर्व काही नीटच होते . फक्त एक अढळ विश्वास असावा लागतो तो कुठेही ढळता कामा नये ...
देव आता त्या जागृत मंदिरांमध्ये उरलाच नाही आहे . उगाच लोक लाईन लावून असतात .. जेजुरी येथे मी पाच पौर्णिमा केल्या दोन वर्षांपूर्वी ..प्रत्येक पौर्णिमेला उपवास तोही निरंकार करायचो . इथे कामावर आलो कि काहीबाही कारण सांगून चार वाजता कल्टी मारायचो आणि तिथे गडावर जाऊन मस्तपैकी एकटा उपवास सोडायचो . शेवटची पौर्णिमा करताना मी ठरवलं कि आपण सहकुटुंब जायचं . ठरलं . मी त्यादिवशी सुट्टी घेतली आणि एकदम निवांत होतो . मुळात आळशी असल्याने आणि त्यात घरीच असल्याने , ठरवलं कि आरामात जाऊ . कसाबसा तीनच्या सुमारास निघालो . पुण्यात जाऊन असांकाही अडकलो कि विचारू नका . तिथेच संध्याकाळचे साडेसात वाजले . मग नारायणपूरहून मी गाडी सुस्साट मारली नि कसाबसा पावणे नऊच्या सुमारास छोट्याला हातात घेऊन गाद चढायला सुरुवात केली . बायको मागून मोठ्या मुलाबरोबर येताच होती . मी पायऱ्या चढत असताना एक कुटुंब खाली येताना बोलले कि लवकर जा मंदिर बंद होत आहे . मी तस्साच धावत सुटलो . श्वास फुललेला आणि एका दरवाजातून लोक सर्व बाहेर पडत होते . मी आत जाण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या पहारेदाराने मला अडवले . मला बोलताही येत नव्हते मी हळूहळू करून माझा श्वास पूर्ववत केला त्याच्याशी संवाद साधला पण तो ऐकायलाच तयार नाही . माझ्या बायकोनेही मग त्याला अनेक विनंत्या केल्या पण एकजात तो ऐकला नाही . त्याने सरळ तो दरवाजा बंद केला . मी त्या दरवाज्याच्या फटीतूनही ओरडत होतो पण त्याने सरळ दुर्लक्ष केलं . मग मात्र माझ्या सहनशीलतेचा कडेलोट झाला . तिथेच दगड पडलेले होते , ते सरळ भिरकावयाला चालू केले . दगड दरवाज्यावर बसत होते , बसत होते . नंतर तर घाणेरड्या शिव्याही द्यायला चालू केल्या . माझ्यासारखेच इतरही भाविक जमलेले होते , ते या आशेवर होते कि निदान आता तरी दरवाजा उघडून आत घेतील . पण साले ऐकलेच नाहीत .
हे सारं असं झालं तेव्हा . बायकोने घाबरून हात जोडले आणि येड्यासारखी बरळत होती , देवा काही चुकलमाकल असेल तर यांना माफ कर . हे असेच आहेत , भडकले तर काही खैर नाही पण तुझ्या पौर्णिमा त्यांनी एकदम मनापासून केल्या .
दर्शन ना घेताच आम्ही तावातावाने परत माघारी आलो . बायकोने कुण्यातरी देवाच्या दलालाला ( ज्योतिष्याला ) फोन लावला आणि सर्व कथा सांगितली . त्याने सांगितलं वाहिनी काही घाबरून जाऊ नका , पौर्णिमा वाढलेली कधीही चांगलीच असते . त्याने तुम्हाला फळ देण्यासाठीच वाढवून दिली आहे ती मान्य करून घ्या आणि पुढच्या पौर्णिमेला परत जा दर्शनाला .
तोपर्यंत मी इथे जेजुरीच्या रद्दड कारभारावर इतके ताशेरे ओढले होते आंजावर कि काय विचारू नका . मी शक्य होईल तिथे तहसीलदारापासून ते सध्या ग्रामपंचायतीपर्यंत हा मुद्दा मांडून टाकला .
परत तो दिवस आला , पौर्णिमेचा . मी सर्व जय्यत तयारीनिशी तिथे कुटुंबकबिल्यासह पोचलो आणि काय आनंद वर्णावा , अहो चक्क देवाची आरती मिळाली , गादी मिळाली आणि बरंच काही . मी धन्य झालो .
28 Sep 2018 - 10:35 am | प्रकाश घाटपांडे
देव हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे हे मान्य असेल तर दुरावस्था व गर्दीअसलेल्या मंदिरात जाउन त्रास करुन घेण्यापेक्षा शांत स्वच्छ व निसर्गरम्य वाटेल अशाच देवळात जावे. देउळ हे असे असावे कि जिथे गेल्यावर नास्तिकाला सुद्धा प्रसन्न वाटेल.
28 Sep 2018 - 11:52 am | सुबोध खरे
+१००
असे असले तरीही मानवी मन हे विचित्र आहे.
एखाद्या माणसाला आपल्या दिवंगत माता पित्याचे अस्तित्व घरातील प्रत्येक वास्तूत जाणवत असेल तरीही तो त्यांची तसबीर भिंतीवर लावतोच.
28 Sep 2018 - 12:40 pm | माहितगार
१००% + १
28 Sep 2018 - 12:19 pm | माहितगार
__/\__
5 Oct 2018 - 4:48 pm | एमी
आस्तिक असाल तर मनातल्या मनात मनापासून नमस्कार/प्रार्थना करा. पोचेल त्याच्यापर्यंत.
गरिबांना/रुग्णांना मदत करायची यासेल तर ती त्याच उद्देशाने करा.
मंदिर, चर्च, मस्जिद, गुरुद्वार आर्किटेक्चर, इमारत, आजूबाजूचं लँडस्केप बघायला जा.