" तेथे कर माझे जुळती ! ! "

जयन्त बा शिम्पि's picture
जयन्त बा शिम्पि in जनातलं, मनातलं
16 Sep 2018 - 10:11 am

मित्रांनो, नुकतेच वर्तमानपत्रातून वाचनात आले की, सर्व माजी खासदार वा आमदार यांना तह-हयात पेन्शन कां म्हणून दिले जाते याचे स्पष्टीकरण न्यायालयाने, केन्द्र सरकारकडे मागितले आहे. आता यातील काही खासदार/आमदार वा पूर्वी कधीतरी मंत्री म्हणून काम केलेले,काहीजण सक्रिय राजकारणात असतील वा नसतीलही. पण असे कितीजण खरोखरच्या सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेत असतील हा संशोधनाचा विषय असू शकतो. हा प्रश्न पडण्याचे कारण :-
या संदर्भात नुकताच " TIME " ( २४ सप्टेंबर २०१८ चा ) या प्रसिध्द मासिकात आलेला एक लेख माझ्या वाचनात आला. अमेरिकेचे ३९ वे प्रेसिडेंट म्हणून ज्यांची निवड झाली होती, ते माननीय श्री. जिमी कार्टर यांचे वय आज ९३ वर्षांचे आहे. त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती रोसालीन ( Rosalynn) या सुद्धा ९१ वर्षांच्या आहेत. वयोमानाने त्यांच्या हातात हातोडा घेवून खिळे ठोकण्याचा जोर जरी ओसरला असेल तरीही किमान टेबलावर इलेक्ट्रिक करवत चालवण्याइतके बळ त्यांच्या हातात आहे. प्रेसिडेंट पदावरून पायउतार झाल्यानंतर, मानवतेच्या उत्तुंग अशा भावनेतून,निवारा नसलेल्या कुटुंबास ,निवारा तयार करण्यासाठी,श्री. व श्रीमती कार्टर दोघेजण, वर्षातून एक आठवडा,जगाच्या पाठीवर,कोठेही,कुणालातरी स्वतःचे घर बांधण्यास मदत करण्यासाठी जात असतात. या त्यांच्या व्रतास अनुसरुन,गेल्या ऑगस्ट महिन्याच्या एका गुरुवारी,डोक्यावर आपली निळ्या रंगाची टोपी घालून, दोघेजण,मिशवाका ,ईंडियाना
( Mishawaka ) येथे,एका घराच्या भोजनहॉल साठी लाकडाच्या फळ्यांचे माप घेतांना मग्न दिसले.
" घर " हा विषय श्री.कार्टर यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. या विषयाची गंभीरतेने दखल घ्यावीशी वाटणारा अलिकडील काळातील अमेरिकेतील, हा पहिलाच प्रेसिडेंट आहे,असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. आजही जिमी कार्टर व त्यांच्या पत्नी, १९६१ साली त्यांनी बांधलेल्या Plains.Ga. येथील दोन बेडरूमच्या घरात रहातात. स्वतःचे जेवण स्वतःच बनवितात.न चुकता दर रविवारी,स्थानिक चर्च मध्ये जातात. या ठिकाणी श्री.कार्टर Sunday School मध्ये शिकवितात. श्री.कार्टर यांना तुम्ही कधीही, एखाद्या बड्या बँकेत जावून," गुंतवणूक " या विषयावर भाषण देऊन, हजारो डॉलर्स ची कमाई करतांना पाहूच शकणार नाही. त्यांचा तो पिंडच नाही.
ऑगस्ट महिन्यात, South Bend च्या उपनगरात,२३ बेघरांसाठी मंजूर केलेल्या प्लॉट्वर ,
Vinyal Siding प्रकारातील घरांची रचना करण्यात कार्टर पती-पत्नी श्रमदान करीत होते. चार लेकरांची आई असलेल्या, निराधार श्रीमती Cleora Taylor यांना हे घर दिले जाणार आहे. याबाबतीत श्री. कार्टर म्हणतात," आम्ही ख्रिश्चन आहोत आणि आमच्या धर्माच्या श्रद्धेनुसार, प्रात्यक्षिक करुन दाखविण्याची,ही आम्हास प्राप्त झालेली एक संधी आहे.ज्यांना सुंदर घरे रहावयास मिळत नाही,असे लोक व आमच्यासारखे श्रीमंत लोक, यातील दरी मिटविण्यासाठीचा हा एक उपक्रम आहे,जो अनेक श्रीमंत लोकांना जमणे फार कठीण आहे."
श्री.कार्टर यांचा हा विचार, अवाजवी संग्रह करणार्‍यांच्या वा स्वतःच्याच वैभवाच्या दिमाखात रममाण असणार्‍यांच्या पचनी पडणारा नाही.पण कार्टर ठामपणे म्हणतात की,"ज्याच्या त्याच्या जीवनातील प्राधान्याने ज्याने त्याने जगावे.त्यावरून मी माणसांची पारख कधीच करीत नाही. आम्हाला जसे जगावयाचे आहे,तसे आम्ही जगणार,मग कोणी काहीही म्हणोत." त्यांना सध्याची अमेरिकेतील असमानता फारच विषण्ण करीत असते. गेल्या ३५ वर्षांपासून श्री.कार्टर यांचे हे व्रत अखंड सुरु आहे.जोपर्यंत शरीराची साथ मिळेल,तोपावेतो हे काम सुरुच ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. श्रीयुत कार्टर यांनी २०१५ साली ' कॅन्सर ' शी यशस्वी झुंज दिली आहे आणि ह्या वर्षी त्यांच्या पत्नीस शस्त्रक्रिया झाल्याने,चालण्यासाठी काठीचे सहाय्य घ्यावे लागते.मिसिसीपी ते मनिला पावेतो १४ देशात व २१ राज्यात त्यांचे प्रॉजेक्ट्स सुरु आहेत. २०१८ मध्ये ते ईंडियना च्या ग्रामीण भागात अशा ठिकाणी आले आहेत की जेथे त्यांचा आर्किटेक्ट मित्र LeRoy Troyer ( वय वर्षे ८० ) काम करीत आहे. ह्याच ग्रुहस्थाच्या देखरेखीखाली, कार्टर ह्यांचे काम सुरु असते. गेली ३३ वर्षे हे ग्रुहस्थ कार्टर यांच्यासोबत काम करीत असल्याने,कार्टर त्यांना " बॉस "म्हणतात.
इतर कामगारांसाठी असलेल्या तंबूवजा राहुटीतच कार्टर सर्वांसोबत जेवण घेतात. आपल्या सभोवती जमलेल्या ,स्वतःचा वेळ खर्च करणार्‍या स्वयंसेवकांकडे बघून,कार्टर म्हणतात की "आम्ही विभागलेलो ( divided)आहोत असे ज्यांना कोणाला वाटत असेल, त्यांनी येथे प्रत्यक्ष पुरावाच बघून घ्यावा. अमेरिकन माणसाच्या अंगी समानता व सदिच्छा हे दोन गुण वंशपरंपरेने आलेले आहेत.मला माझ्या देशाच्या उन्नत भविष्याबाबत खात्री आहे."
श्रीमती रोसालिन ह्या सुद्धा ,त्यांच्याच पुढच्या टेबलाजवळ, फळ्यांना रंग देत असतात.त्या म्हणतात" लोक आम्हाला विचारतात की तुम्ही काय म्हणून ओळखले जावे ? त्यावर कार्टर म्हणतात की सर्वसाधारणपणे शांतता आणि मानवी हक्कांसाठी आमचे कार्य ओळखले जावे. प्रत्येकाचे एक सर्व सोयींनी युक्त एखादे घर असावे,जेथे मुलांना नीट वाढविता येईल,जेथे प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहील,जेथे परमेश्वराने दिलेल्या अंगभूत गुणांचा विकास होऊ शकेल,अशा तर्‍हेचा मानवी हक्क प्रस्थापित व्हावयास हवा." Cleora Taylor साठी हे घर म्हणजे,जेथे कोणतीही घरभाडे वाढ नाही,सुंदर घरासाठी हेका धरणारी आजीची कटकट नाही,जेथे तिची चारही मुले व स्वमग्नतेची बाधा असलेली मुलगी,हकाने राहू शकेल अशी जागा आहे.श्रीयुत जिमी कार्टर बद्दल बोलतांना ती म्हणते, ' खरोखर त्यांना माझ्या घरासाठी परमेश्वरानेच पाठविले आहे. त्यांच्या रुपाने परमेश्वरच काम करीत आहे.त्यांनी केलेले हे काम म्हणजे माझ्यासाठी आयुष्यभराचा चिरंतन असा ठेवा आहे.'
" किं न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने " असा स्वातंत्र्यवीर सावरकारांचा वारसा सांगणार्‍या आम्ही सुद्धा असे एखादे व्रत घेण्यास काय हरकत आहे ? " TIME " मधील हा लेख वाचुन मला ही म्हणावेसे वाटले की " तेथे कर माझे जुळती ".

समाजविचार

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

16 Sep 2018 - 11:26 pm | शाम भागवत

_/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2018 - 2:54 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख. मात्र, असे राजकारणविरहित व निस्वार्थी जीवन जगणे बहुसंख्य भारतिय राजकारण्यांमध्ये दिसणे केवळ अशक्य आहे.

पाश्च्यात्य देशातील प्रेसिडेंटस्, पंतप्रधान आणि इतर बर्‍याच राजकारण्यांमध्ये, "धडधाकट असतानाच राजकारणातून निवृत्त होऊन आपल्या निवडीचे आयुष्य जगायची" परंपरा आहे. राजकारणानंतरचे त्यांचे आयुष्य बहुतांशी राजकारणाविरहीत असते. काही सन्माननिय अपवाद सोडता वंशपरंपरागत आणि मरेपर्यंत राजकारणाला चिकटून राहण्याच्या परंपरेचा तेथे प्रचंड अभाव आहे. त्यामुळे, बहुसंख्य पाश्च्यात्य प्रेसिडेंस आणि पंतप्रधान धडधाकट असतानाच स्वतःहून निवृत्त होऊन (किंवा काही वेळेस इच्छा नसतानाही पायउतार व्हावे लागले असले तरी) सक्रिय राजकारणापासून दूर राहून, स्वतःच्या आवडीचे निवृत्त जीवन (राजकारणापासून दूर असलेले सामाजिक कार्य, स्वतःची धर्मदाय संस्था, खाजगी छंद, देशात/जगभर आपल्या अनुभवावर आधारीत मार्गदर्शनपर भाषणे देणे, आपल्या अनुभवांवर किंवा आवडीच्या विषयावर पुस्तक लिहिणे, एखाद्या विश्वविद्यालयात शिकवणे, इत्यादी) जगत असतात. सत्तेत असतानाही राजामहाराजासारखा बडेजाव करत नसल्याने त्यांना ते सहज जमूनही जाते. एक प्रकारे ते वानप्रस्थाश्रमात प्रवेश करतात.

याविरुद्ध, लहानपणापासून राजकारणाशिवाय इतर काही लक्षणिय न केलेल्या आणि वंशपरंपरागततेने राजकारणात उतरलेल्या राजकारण्यांची भारतात भरमार आहे. राजकारण सोडले तर इतर काय करण्यासारखे त्यांच्याकडे बहुदा काहीच नसते... किंबहुना, भारतिय "राजकारणाच्या शैलीमुळे" असेल कदाचित्, पण राजकारणावरची (आणि त्याबरोबर येणार्‍या अधिकार व अर्थकारणावरची) पकड थोडी जरी ढिली झाली तर, विरोधक (आणि कदाचित ज्यांच्यावर आपण भल्याबुर्‍या मार्गांनी सत्ता गाजवली आहे असे चेलेसुद्धा) (वाच्यार्थाने) आपले पाय (किंवा कदाचित मानही) कापतील, ही भिती त्यांना सतत भेडसावत असावी. मग, येन केन प्रकारेन, जरूर तर प्रसंगी मानहानी पत्करून का होईना पण मरेपर्यंत राजकारणाला चिकटून राहणे, ही त्यांची अनिवार्य गरज बनत असावी. मात्र असे करताना, मिळालेल्या सत्ता व पैशाचा उपयोग आनंदी जीवन आणि रात्रीची सुखकारक झोप, यांच्यासाठी होत असेल, असे काही वाटत नाही. त्यामुळे, एक वेळ मासा पाण्याविना जगू शकेल पण भारतिय राजकारण्याला राजकारणापासून विभक्त होणे जमणे शक्य नाही ! म्हणजे, दुर्दैवाने, प्राचीन भारतात निर्माण झालेल्या वानप्रस्थाश्रम या संकल्पनेचा आनंद भारतिय राजकारणी उपभोगू शकत नाहीत. किती मोठे आहे हे विडंबन !

या निमित्ताने खालील चित्रफीत इथे टाकण्याचा मोह आवरला नाही...

ही आहे, फ्रेंच प्रेसिडेंट इम्मॅन्युएल मॅक्रोन यांच्या डेन्मार्कच्या भेटीत त्यांनी डॅनिश पंतप्रधान लार्स लोक्कं रासमुस्सन यांच्यासह २९ ऑगस्ट २०१८ साली केलेली राजधानी कोपन्हेगनची सायकल सफर !!! ना संरक्षक ताफा, ना बडेजाव... आणि विशेषतः ट्रॅफिक सिग्नलवर त्यांनी काय केले हे लक्षात आले का ? भारतातल्या एखाद्या राज्याच्या मंत्र्याने असे काही केलेले पाहण्याचे नशीब तुम्हाला मिळाले आहे का ???

सगळ्यात मोठे विडंबन असे आहे की, भारत पूर्ण लोकसत्ताक राष्ट्र आहे आणि डेनमार्क (संवैधानिक का होईना पण) राजेशाही आहे... तर मग फुकाचा राजेशाही बडेजाव कोठे केला जातो आहे ???!!!

कार्टर दाम्पत्याच्या व्रतस्थ वृत्तीला अभिवादन!

नमस्ते

सुबोध खरे's picture

17 Sep 2018 - 7:14 pm | सुबोध खरे

बऱ्याचशा भारतीय राजकारण्यांच्या बाबतीत हि गोष्ट सत्य आहे पण याला सन्मान्य अपवादहि आहेत.
उदा श्री मनोहर पर्रीकर. त्यांच्या मुलाला अपघात झाला असल्याने तो हिंदुजा रुग्णालयात भरती होता त्या वेळेस श्री पर्रीकर अतिदक्षता विभागात बाहेर सामान्य माणसासारखेच वाट पाहत बसत. आपल्या मित्र कडे राहत होते आणि दादर च्या प्रकाश रेस्टोरंट मध्ये साबुदाणा वडा आणि मिसळ खाताना दिसत.

श्री.कार्टर यांना तुम्ही कधीही, एखाद्या बड्या बँकेत जावून," गुंतवणूक " या विषयावर भाषण देऊन, हजारो डॉलर्स ची कमाई करतांना पाहूच शकणार नाही. त्यांचा तो पिंडच नाही.
स्वतःच्या हाताने लाकूड कापून घर बांधून देणे हे काम स्तुत्य असले तरीही अशा जागी मी असेन तर त्यापेक्षा असे श्रीमंत बँकेत भाषण देऊन मिळालेल्या पैशातून मी पंचवीस सुताराना नोकरी देईन (रोजगार निर्मिती हि एक नक्कीच उच्च दर्जाची समाजसेवा आहे) आणि स्वतःच्या हाताने काम करण्यापेक्षा तिप्पट चौपट काम होईल.
मी एक विकिरण विशषज्ञ आहे ( RADIOLOGIST)
भारताला आज दीड लाख विकिरण विशषज्ञांची गरज आहे पण भारतात फक्त १० हजार विकिरण विशषज्ञ उपलब्ध आहेत
अशा परिस्थितीत मी जर माझा व्यवसाय ( विकिरण विशषज्ञ) सोडून मी औषधांच्या पुड्या देणे सुरु केले तर तो एक राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय ठरेल. यापेक्षा मी जर जेथे गरज असेल अशा जिल्ह्या तालुक्याच्या जागी विकिरण विशषज्ञ म्हणून (विनामूल्य) काम केले तर ती जास्त चांगली समाजसेवा ठरेल.
माझ्या ऐवजी एखादा मेंदू विकार तज्ज्ञ कल्पून पहा कि ज्याच्या शल्य कौशल्याने अनेक गरीब लोकांचा फायदा होईल. त्याने रुग्णांची शुश्रूषा करणे( नर्सचे काम करीत राहणे) हा राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय ठरेल.
कोणतेही काम हलके नाही हे मान्य करताना फार मेहनतीने मिळवलेले कौशल्य आणि अनुभव वाया घालवणे समर्थनीय होत नाही हे कृपया समजून घ्या.
म्हणून हातपाय चालतील तोवर मी काम करेन. एका विशिष्ट काळानंतर मी विनामूल्य काम करेन पण नक्कीच नर्सचे किंवा वैद्यकीय सहाय्य्कचे काम करणार नाही.

कुमार१'s picture

18 Sep 2018 - 10:17 am | कुमार१

दुर्दैवाने, प्राचीन भारतात निर्माण झालेल्या वानप्रस्थाश्रम या संकल्पनेचा आनंद भारतिय राजकारणी उपभोगू शकत नाहीत. किती मोठे आहे हे विडंबन ! >>> + ११

लौंगी मिरची's picture

21 Sep 2018 - 8:43 pm | लौंगी मिरची

छान लेख .

शलभ's picture

22 Sep 2018 - 12:51 pm | शलभ

छान लेख.
दोन्ही डॉक चे प्रतिसाद आवडले आणि पटले.

शाम भागवत's picture

22 Sep 2018 - 5:24 pm | शाम भागवत

छे बॉ
लाईक करायची सोय पाहिजे होती बॉ

Sanjay Uwach's picture

22 Sep 2018 - 7:11 pm | Sanjay Uwach

मध्यंतरी कुठल्या तरी वृत्तपत्रात वाचले होते ,की त्या काळातील एक रेल्वे मिनिस्टरना श्री. मधु दंडवते, इतके साधे व सभ्य होते की , सरकारी निवासाच्या ठिकाणी स्वतःचे कपडे स्वतः धुत अ सत. प्रवासात देखील सरकारी बडेजाव टाळत असत. भारतात असे राजकारणी लोक कमी आढळतील. खरोखरच अंतर्मुख करायला लावणारा लेख.