ग्रामीण राहणीमान

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Sep 2018 - 5:29 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

उत्तर महाराष्ट्र वासियांचे खानदेशी ग्रामीण राहणीमान अतिशय नैसर्गिक पध्दतीचे होते. रहायला चार भिंतींचं आणि एका छपराचं घर, अंग झाकण्यापुरते फाटके मळके कपडे आणि दोन वेळचं वेळच्या वेळी जेवण मिळालं की ते कुटुंब खाऊन पिऊन सुखी असल्याचं समजलं जायचं. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गोष्टीच त्या वेळी सुखी जीवनाची गुरूकिल्ली ठरत होत्या. अशा गरजा पूर्ण करणारे काही शेतकरी, काही शेतमजूर, काही अन्य व्यावसायिक मजूर, गावातील बारा बलुतेदारांपैकी काही लोक, कारूनारू समाज, कुठेतरी शिक्षक वा अन्य नोकरी करणारे कर्मचारी- चाकरमानी वरील व्याखेच्या सुखी जीवनात रमताना दिसत.
मनगटी घड्याळ, सायकल आणि रेडीओ ज्यांच्याकडे असे ते कुंटुब संपन्न- श्रीमंत समजलं जात होतं. (पण यातलेच काही दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचं त्यावेळीही निदर्शनास येत असे.) लोकांच्या मुळात गरजाच कमी असल्याने गावातले अनेक लोक खाऊन पिऊन सुखी असल्याचं दिसून यायचं. श्रीमंत वगैरे असण्याच्या कल्पना फक्‍त बोलण्यापुरत्या असायच्या. ‘तो लाख्या शे’ असं श्रीमंत माणसाचं वर्णन केलं जायचं. लाख्या म्हणजे ज्याच्याकडे लाखभर रूपये आहेत तो. (त्यावेळचे लाख म्हणजे आज कोटी.)
गावाच्या आसपास राहणारे आदिवासी लोक व दलित समाजाच्या वेगळ्या वस्तीत मात्र गावाच्या तुलनेत अधिक दारिद्र्य असल्याचं दिसून यायचं. त्यामुळे त्यांना पोटासाठी अनेक उपद्व्याप करावे लागत. कोणी लोक गावात घरोघरी दोन्ही वेळा भाकरी मागायला यायचे. जो तो ज्याच्या त्याच्या मगदूराप्रमाणे या लोकांना अर्धी - चोखांड भाकर द्यायचा.
पोटासाठी भील समाजातील लोक गावठी दारू तयार करून अनाधिकृत दारू विक्री करण्याचा व्यवसाय करत. अथवा नदीतल्या बारीक मासोळ्या पकडून गावात विकत असत. मात्र यातून त्यांना खूप पैसा मिळून त्यांचे दैनंदिन जीवन सुधारलं असं दिसत नव्हतं. कोकणा जमातीच्या महिला करवंद, आवळा, ‍सीताफळ, जांभळं, टेंभरं, चिंचा, बोरं आदी रानफळं चावडीवर बसून विकत असत. आदिवासी पुरूष लोक मजूरी करून आपली उपजीविका भागवायचे. या फळ विक्रेत्या महिलांना फळांच्या बदल्यात पैश्यांऐवजी धान्य मिळत असे.
ग्रामीण भागातील सर्वसाधारण लोक आणि आदिवासी कुटुंबातील कोणीही व्यक्‍ती यांच्या राहणीमानात जमीन अस्मानचा फरक त्याकाळीही दिसून यायचा. आदिवासींचे मळके व फाटके कपडे आणि डोक्याच्या केसांना कधीच नसलेले तेल यामुळे हा फरक जास्तच अधोरेखित व्हायचा. हा फरक अलीकडे कुठं कुठं कमी झालेला दिसत असला तरी आदिवासी डोंगरी- दुर्गम भागात काही ठिकाणी ही दरी अजून रूंद झाल्याचं लक्षात येतं. अलीकडे जाती जमातीय वर्गीकरण करण्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या सबल आणि कमकुवत यावर ही दरी वाढतांना दिसते.
ग्रामीण घर साधं असायचं. घराला रंगरंगोटी केलीच पाहिजे असं त्यावेळच्या ग्रामीण माणसाला वाटलं नाही. कोणी घराला रंग दिलाच तर तो मातीचा अथवा चुन्याचा रंग असे. भिंतींना कोणी खेटून बसलं की तो रंग कपड्यांना- हातापायांना लागायचा. घराच्या मातीच्या भिंतीला रंग घट्ट बसावा म्हणून चिकटपणा येण्यासाठी मातीच्या रंगात साखर न टाकता साबुदान्याची पातळ खीर करून टाकली जायची. साबुदाण्याच्या‍ चिकटपणामुळे रंग आवळला जायचा. राहण्यासाठी फक्‍त घर हवं मग ते कसंका तोडकं मोडकं असेना. डोकं घालायला घर पाहिजे एवढीच अपेक्षा ग्रामीण लोकांची असायची. घराच्या बाहेरच्या भिंती चिखलाने सारवल्या जात, तर आतल्या मातीच्या पोताराने पोतारले जायच्या. घराची जमीनही मातीची असायची आणि ती चार पाच दिवसांनी शेणाने सारवावी लागायची. नुकतीच दगडी काळी फरशी त्या काळी येऊ लागली होती. ही फरशी श्रीमंत लोक आपल्या घराला बसवत. आता ती फरशी शेतातल्या झ्यापालाही कोणी बसवत नाही. त्याकाळी अलिशान घराची कल्पना कोणी करत नव्हतं, तरीही घराला घरपण येत होतं हे मात्र खरं.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

सतिश पाटील's picture

15 Sep 2018 - 10:08 pm | सतिश पाटील

अजून लिहा, आवडले

सतिश पाटील's picture

15 Sep 2018 - 10:08 pm | सतिश पाटील

अजून लिहा, आवडले

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Sep 2018 - 4:51 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

जयन्त बा शिम्पि's picture

16 Sep 2018 - 5:06 am | जयन्त बा शिम्पि

चोखांड म्हणजे चतकोर किंवा पाव भाकरी. लिखाण मी खानदेशचाच असल्याने जास्त आवडले.पुलेशु.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Sep 2018 - 4:52 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Sep 2018 - 4:52 pm | डॉ. सुधीर राजार...

342 वाचकांना नमस्कार