पिया तू अब तो आजा.....
रेडियोवर 'पिया तू अब तो आजा....' ची लकेर उठली की लालभडक फ्रिलच्या ड्रेस मधली हेलन डोळ्यासमोर येते.... आशाताईंचा आवाज जणूकाही हेलनसाठीच आहे असं वाटण्याइतपत हेलन आशाताईंच्या आवाजात विरघळते आणि आशाताई तिच्या नृत्यात! गाणं एकवेळ कोणीही सुरात म्हणू शकेल; पण आशाताई हे असं रसायन आहे की ज्यांनी श्वासाला देखील सूर-ताल-ह्रिदम दिला आहे. त्यांचं ते 'आ.. आ... आआ....' आपण बाथरूममध्ये देखील करू शकणार नाही... मग इतर कोणासमोर तर प्रश्नच येत नाही.
लता मंगेशकर हे भारताला पडलेलं एक नाजूक स्वप्न आहे; आणि आशा भोसले म्हणजे भारताचं चिरतारुण्य आहे! आशाताईंच्या आवाजाची लवचिकता तरी काय वर्णावी! 'पिया तू.....' च्या वेळी जितक्या सहज आपल्या डोळ्यासमोर हेलन उभी राहाते; तितक्याच तत्परतेने 'इन आंखो की मस्तिके....' म्हणत रेखा तिच्या मदनमस्त डोळ्यांनी आपल्याला साकी पिलवते. 'याय रे याय रे... जोर लगा के नाचो रे...' ऐकताना कंबरेला झटके देणारी उर्मिला देखील आपण पाहातो आणि 'में सितारों का तराना...' म्हणत मस्ती करणारी मधुबाला देखील आपल्या डोळ्यासमोर मूर्तिमंत उभी राहाते.
आशाताईंच्या आवाजाची ही करामत म्हणावी की आवाजाचा प्रामाणिकपणा? पण त्याचं गाणं ऐकतांना आपल्या डोळ्यासमोर त्या त्या गाण्यातली अभिनेत्रीच येते. लता दिदींच्या स्वर्गतुल्य आवाजाबद्दल काही प्रश्नच नाही; तरीही... लतादीदींची गाणी ऐकताना अनेकदा दोन्ही खांद्यांवरून पांढऱ्या शुभ्र साडीचा घट्ट पदर लपेटुन घेतलेल्या black n white जमान्यातल्या लतादीदी उभ्या राहातात. मात्र आशाताईंची गाणी ही त्यांची असूनही ती आपल्या भावबंधात रुजली आहेत आणि त्या त्या गाण्यातल्या अभिनेत्रींच्या माध्यमातून आपल्या मनात जपली गेली आहेत.
'आईये मेहेरबां... बैठीयें जान-ए-जां...' या गाण्यात तर केवळ मधुबालाचे नशिले डोळे बोलले आहेत. त्यावेळी गाणं रेकॉर्ड करण्याच्या अगोदर गाण्याची situation आशाताईंनी समजून घेतली होती म्हणे; आणि मग ते गाणं वेगळ्या ढंगात गात रेकॉर्ड केलं होतं. एका मुलाखतीमध्ये आशाताईंना विचारलं होतं की तुम्ही इतकी विविध प्रकारची गाणी अत्यंत भिन्न स्वभावाच्या अभिनेत्रींसाठी गायला आहात; हा आवाजातला फरक तुम्ही कसा करता?' त्यावेळी त्यांचं उत्तर त्यांच्या गण्याइतकच चपखल होतं. त्या म्हणाल्या,"मी गाणं रेकॉर्ड करण्याच्या अगोदर त्या अभिनेत्रींच्या बोलण्याची ढब तिच्याशी बोलून समजून घेते; आणि मग गाताना काहीसे तिच्यासारखे हावभाव करण्याचा प्रयत्न करत (इथे त्या खळखळून हसल्या होत्या) तिच्यासारखी ओठांची हालचाल करते. बाकी त्या अभिनेत्री पडद्यावर निभासून नेतातच न!"
म्हणूनच कदाचित आजकालच्या पूर्णपणे टेक्निकल रेकॉर्डिंगच्या जमान्यात इतका विचार करून आणि अभ्यास करून गाणी रेकॉर्ड करणाऱ्या आशाताई आपल्या मनावर अधिराज्य करत आहेत.
आज या स्वरमोहिनीचा पंच्याऐंशीवा जन्म दिवस आहे.त्यानिमित्त पाच तारखेला त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात झाला. त्यावेळी त्यांना प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी एक मस्त मिश्किल प्रश्न विचारला,"आशाताई, तुमच्या दोन्ही गालांना इतक्या सुंदर खळ्या पडतात... चेहेरा देखील मोहक आहे; मग तुम्हाला कशी कोणी अभिनेत्री व्हा असं नाही का हो म्हंटल?" त्यावर त्यांच्याच इतक्या मिश्किल आणि मोकळ्या स्वभावाच्या आशाताईंनी सभागृहातल्या प्रेक्षकांकडे बघत अत्यंत मार्मिक उत्तर दिलं," पंच्याऐंशी वर्षाची एकतरी अभिनेत्री तुमच्या लक्षात आहे का?" त्यांच्या त्या उत्तराने संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आणि हास्याच्या आवाजाने भरून गेलं.
अशा या मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेल्या पद्म विभूषण आशाताईंचा आपण प्रेमाने आदरार्थी उल्लेख करत असलो तरी; वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळं सहन करूनही मनात एक तारुण्य जपलेली अवखळ आशा आपल्या अनेक भावनांच्या गुंत्यात तिच्या गाण्यांमधून उमलत असते.... हे त्रिकालाबाधित सत्य नाही का?
प्रतिक्रिया
8 Sep 2018 - 7:54 pm | लौंगी मिरची
आशा भोसले ना वाढदिवसाच्या शुभेच्छा :)
लेख अनुरुप .
8 Sep 2018 - 8:50 pm | ज्योति अळवणी
धन्यवाद लौंगी मिर्ची
8 Sep 2018 - 9:24 pm | नाखु
कौटुंबिक आयुष्य फार क्लेषदायक असूनही आपल्या कामावर असीम निष्ठा आणि मेहनतीने कार्यरत राहण्याचे धैर्य याला माझा सलाम आणि शुभेच्छा
नाखु विविध भारती वाला
8 Sep 2018 - 9:30 pm | नूतन
लेख आवडला.आशाबाईंना कोण आणि कसं विसरेल?
8 Sep 2018 - 10:17 pm | ज्योति अळवणी
धन्यवाद नाखुजी आणि नूतनजी
9 Sep 2018 - 6:06 am | बाजीप्रभू
छान लिहिलंय.. आशा ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
9 Sep 2018 - 9:14 am | सस्नेह
उचित लेख .
आशाताईंना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !
9 Sep 2018 - 9:26 am | ज्योति अळवणी
धन्यवाद बाजीप्रभू आणि स्नेहांकीता जी
10 Sep 2018 - 6:13 pm | श्वेता२४
आणि आशाताईंबद्दल कितीही लिहावे तितके कमीच
10 Sep 2018 - 6:24 pm | अथांग आकाश
लेख आवडला.
11 Sep 2018 - 1:17 am | चित्रगुप्त
छान, समयोचित लेखन.
आशाचा स्वर आणि ओपीचे संगीत ..... याशिवाय जगण्याची कल्पनाही कठीण.
11 Sep 2018 - 4:38 am | कंजूस
छान लेख.
परवाच स्टारप्लस चानेलवरच्या " दिल है हिन्दुस्तानी" कार्यक्रमात होत्या. अजूनही सहजतेने गातात.
बारा वर्षांच्या सौम्याच्या गाण्याचे कौतुक करत तिला गाण्याचा पाठ दिला. आणि तिच्या दोन वेण्या घालून दिल्या. हा प्रसंग अविस्मरणीय.
11 Sep 2018 - 9:20 am | सोन्या बागलाणकर
आशा भोसले म्हणजे गायिकांमधल्या मोहम्मद रफी!
जीवेत शरदः शतम
11 Sep 2018 - 1:45 pm | ज्योति अळवणी
तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार.