गोपाळकाल्याच्या निमित्ताने

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
3 Sep 2018 - 6:19 pm

गोपाळकाल्याच्या निमित्ताने 

काल मी एक कविता whatsapp वर वाचली. अनेकांकडून ती मला forward झाली होती. अलीकडे जो सण असतो त्याबद्दल कोणा थोरामोठ्यांनी काही म्हंटलेले असते ते किंवा मग असे माहित नसलेले अनेक लेखक-कवी यांच्या शब्दबद्ध झालेल्या भावना आपण आपल्याच मानून एकमेकांना पाठवत असतो. त्यातलीच ही एक कविता..... मात्र ही कविता वाचली आणि अगदी खोल मनाला स्पर्शून गेली. वाचल्यापासून ती मनात घोळत होती; आणि वाटलं या कवितेनंतर मनात आलेले विचार तुमच्यासोबत शेअर केलेच पाहिजेत.... 

(कविता.....

कृष्ण भेटायलाच पाहिजे. 
आयुष्यात प्रत्येक वळणावर 
कृष्ण भेटायलाच पाहिजे.

मनातलं बोलायला, 
लिहिलेलं वाचायला, 
रेखाटलेलं दाखवायला, 
अन् कधी गायलेलं ऐकवायला ....
हक्काचा सवंगडी पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला 
एक कृष्ण भेटायलाच पाहिजे

मुळात नात्यांच्या पलिकडचे 
भावबंध जोडणारा
एक हक्काचा 
सवंगडी पाहिजे.....
लहानपणापासून जपलेल्या 
अनेक नात्यांचीही 
वयं वाढत असतात
त्या नात्यांचे काळाप्रमाणे 
अर्थ बदलंत असतात
तस्संच....ते...पूर्वीचं...निर्व्याज.... अबोध नातं 
पुन्हा जमायला पाहिजे
आणि याकरताच 
आयुष्यात कृष्ण 
भेटायला पाहिजे......

"तो" कृष्ण "ती" ही 
असु शकते. 
आपल्या मनातलं 
सारं जाणणारी ती असते
कधीही आपलं खोलवर मन 
रीतं करता आलं पाहिजे
असा हक्काचा...विश्वासाचा 
कृष्ण भेटलाच पाहिजे........

आपल्या आजुबाजुला 
तो सापडेलंच असं नाही
जोडीदारामध्ये तो गवसेलंच 
असंही नाही
कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या 
झाला नाही पाहिजे....
सुंदर विचारांची 
रम्य मुरली छेडणारा तो......
आयुष्यात प्रत्येकाला 
कृष्ण भेटला पाहिजे.

खरंच त्या मुरलीधराकडे 
मुरली होती का?
की अनेकांच्या मनात रुंजणारी 
त्याची ती आश्वस्त 
मैत्री होती का?
त्याच्या अस्तित्वाने अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी
आणि त्यांचीच ऐकु येत असावी रुंजणारी मुरली...

अनेकांच्या मनामधे मुरणारा 
तो मुरलीमनोहर 
प्रत्येकाला भेटायला पाहिजे
आयुष्यात प्रत्येक वळणावर 
कृष्ण भेटायला पाहिजे......

कवी कोण आहे ते मला माहित नाही)

ही कविता वाचली आणि वाटलं.....खूप क्वचित का होईना पण असा कृष्ण तुम्हाला भेटू शकतो. तसं बघितलं तर एरवी तो त्याच्या संसारात सुखी असतो आणि तुम्ही तुमच्या... आणि मग कधीतरी अचानक एखाद्या नाजूक, भावनिक वळणावर तो तुम्हाला भेटतो... तुम्हाला माहीत नसतच की हाच तुमचा कृष्ण आहे. पण आतून काहीतरी वेगळं जाणवत... जे तुमच तुम्हाला देखील सांगता येत नाही...... मग तुमच्याही नकळत तुम्ही त्याच्याकडे व्यक्त व्हायला लागता. हे व्यक्त होणं कायमच भावनिक असत असं नाही. केवळ सांसारिक किंवा व्यवहारिक अडचणी तुम्ही सांगता अस तर मुळीच नाही. उलट त्याच्याकडे/तिच्याकडे तुम्ही तुमच्या अमूर्त कल्पना.... अवघड वाटणारी तरीही मनात जपलेली स्वप्न मनमोकळेपणी सांगायला लागता. 

नदी किनारी पाण्यात पाय सोडून समोरच्या हिरवळीकडे बघत बसावं; किंवा सूर्यास्ताच्या किरणासोबत सागर लाटातून पाय भिजवत चालावं; अगदी एखादा मस्त पेग हातात घोळवत बर्फाळ डोंगरमाथ्याच्या सोनपिवळ्या रंगाकडे टकलावून बघावं.... अशी स्वप्न देखील मग तुम्ही बघायला लागता. लता-आशा-रफी-नौशाद.... ज्यांचं नाव घ्याल ते तुमच्या मोबाईलच्या किंवा टेपच्या तबकडीवर मग तुम्हाला रिझवायला लागतात. तो/ती कृष्ण तुमच्या नकळत तुमचा जीवाभावाचा सखा होऊन जातो/जाते. अगदी कवितेत म्हंटल्यासारखं. मग कधीतरी तो देखील व्यक्त व्हायला लागतो तुमच्याकडे.... त्याच्या आणि तुमच्याही नकळत. तो तुमचा कृष्ण होतो आणि तुम्ही त्याचे कृष्ण होता.... 

काय आहे हा कृष्ण? एक निर्व्याज नातं! शब्दांच्या पलीकडचं.... स्पर्शाच्या अलीकडेच.... तुमचं सर्वस्वाने व्यक्त होणं समजतो तो... आणि त्याच्या अव्यक्त भावना तुम्हाला समजायला लागतात. कवितेत म्हंटल्या प्रमाणे, या नात्यात अपेक्षा नसतात. म्हणूनच त्यात निर्व्याजता असते... भेटता-भेटता राहिलं म्हणून नाराजी नसते... आणि भेटल्यानंतर वेळेची मोजणी नसते! ज्यांच्या नशिबात ते असत ते स्वतः कृष्ण होतात आणि कोणालातरी कृष्ण करतात... 

असा कृष्ण आयुष्यात आला की मग आयुष्य सोपं होऊन जातं. मग लहानपणापासून ज्या नात्यांच्या बरोबरीने आपण मोठे होत असतो आणि अपेक्षा वाढवत असतो... त्या अपेक्षाच थांबतात. आयुष्य कसं सोपं वाटायला लागत. जवाबदाऱ्यांना आणि बंधनांना कंटाळलेले आपण त्या कृष्णाच्या सानिध्यातल्या काही क्षणात स्वतःला परत उर्जित करून घेतो.... मग एकटे असताना आपण छानशी स्वप्न परत बघायला लागतो.... त्याच्याकडे व्यक्त करण्यासाठी काहीतरी हवं या भावनेतून मनाला रोजच्या त्याच त्या रुटीनमधून मोकळे करतो..... थोडक्यात आपणच आपलं आयुष्य सप्तरंगी करून टाकतो........  म्हणूनच.............

अनेकांच्या मनामधे मुरणारा 
तो मुरलीमनोहर 
प्रत्येकाला भेटायला पाहिजे
आयुष्यात प्रत्येक वळणावर 
कृष्ण भेटायला पाहिजे......

खरच शोधून तर बघा असा कृष्ण. कदाचित तुमच्या आजूबाजूलाच तुमचीच वाट बघत थांबला असेल तो.

------

विचार

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

3 Sep 2018 - 7:43 pm | मराठी कथालेखक

मुरलीमनोहर आणि लालकृष्ण दोघेही आहेत ...भेटतील :)

श्वेता२४'s picture

4 Sep 2018 - 11:22 am | श्वेता२४

खूप आवडलं

ज्योति अळवणी's picture

4 Sep 2018 - 7:12 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

यशोधरा's picture

4 Sep 2018 - 8:13 pm | यशोधरा

छान लिहिलंय.

पद्मावति's picture

5 Sep 2018 - 2:43 pm | पद्मावति

सुरेख!

टर्मीनेटर's picture

5 Sep 2018 - 2:52 pm | टर्मीनेटर

अप्रतिम

ज्योति अळवणी's picture

6 Sep 2018 - 8:16 am | ज्योति अळवणी

धन्यवाद, यशोधरा, पद्मावती आणि टर्मिनेटर जी