पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१
पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...२
पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...३
"'इज इट रिअली नेसेसरी डॉक्टर?"
"हो! आपण कोलोनोस्कोपी करून घेऊया."
"ते काय असतं?" मी अंदाज येऊन घाबरून म्हणालो.
"काही नाही! एंडोस्कोपी केली तसेच आतडेही चेक करून घ्यायचे. म्हणजे कसं एकदा सर्व चेक झाले की शंका उरणार नाही. उगीच नंतर पस्तावायला नको. दोन दिवस जास्त राहावं लागलं तरी पुढची ऑपरेशन्स आणि जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याचं टाळता येईल."
"ठीक आहे." पुन्हा माझा नाईलाज.
डॉक्टर मला भीतिदायक विचारांच्या आवर्तनांमध्ये झोकांड्या खाण्यासाठी सोडून निघून गेले. डॉक्टरांनी गुळमुळीत उत्तर दिले असले तरी मला अंदाज होताच की एंडोस्कोपी ही वरून केली जाते तर कोलोनोस्कोपी खालून केली जाते. बापरे! प्रसंग वेदनादायी असेल का? भूल वगैरे देतात की भूल दिल्याशिवायच करतात? रुग्णाच्या पार्श्वभागी कॅमेर्याची नळी घुसवून आतड्यांचे फोटो घ्यायचे आणि तपासणी करायची. कल्पनाच भयानक होती. पण मानवी शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यात बिघाड झाले तर ते दुरुस्त करण्यासाठी आताचे वैद्यकीय शास्त्र बरेच प्रगत आहे. अशी मनाची खोटीच समजूत घालायचा प्रयत्न करायला लागलो.
नर्सने विचारले, "अंकल, व्हॉट यू लाइक टू ड्रिंक? पेप्सी, मिरींडा, स्प्राईट?" मला प्रश्नाचा रोख कळेना.
मी म्हणालो, "सिस्टर, आय लाइक पेप्सी वुईथ जमाईकन डार्क रम अँड आईस."
ती हसायलाच लागली. "यू आर व्हेरी जोविअल! अंकल, कल कोलोनोस्कोपी है नं, उसके लिए पेट साफ करनेकी दवा सॉफ्ट ड्रिंकमेसे देनी है। टेल मी नाउ व्हॉट यू लाइक?"
"ठीक है। गीव्ह मी स्प्राईट."
त्या रात्री २ लिटर स्प्राईट जुलाबाचे औषध घालून थोडे थोडे प्यायलो. रात्रभर मी आणि नाइट ड्यूटीवरचे वॉर्ड बॉइज जागत होतो.
त्या रात्री शेजारच्या बेडवर एक ऍक्सीडेंट केस आली होती. बाई होती. पस्तीस-चाळिशीतली असावी. बापरे! फार वाईट ऍक्सीडेंट होता. बाई दिसत नव्हत्या पण त्यांचे ओरडणे, विव्हळणे, डॉक्टरांनी हात लावला की कळवळणे अंगावर भीतीचा काटा आणणारे होते. त्यांच्या गाडीला ऍक्सीडेंट झाला होता. त्यांचे पती आणि इतर दोघेही अतिदक्षता विभागात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करून घेतले होते. कोणाचा कोणाला पत्ता नाही. पण त्यांना भेटायला येणार्या नातेवाईकांकडून, जबानी घ्यायला आलेल्या पोलिसाकडून, कानावर पडणार्या त्यांच्या संभाषणातून जाणवले की चूक समोरच्या माणसाची होती. त्याला अटक झाली होती वगैरे.
त्या बाईंना हॉस्पिटलमध्ये भेटायला येणारी नातेवाईक मंडळीही गमतीशीर होती.
रात्रीच एक बाई आली.
"अग! काय झालं एकदम हे! मला सुलभाचा फोन आला तर माझ्या हातून फोन गळूनच पडला. मी ह्यांना म्हंटलं आपण ताबडतोब गेलं पाहिजे."
'हं", "हं.. हं", "हं... हं", "हं" बाई कण्हत होत्या.
"दुखतंय का गं?"....... काय प्रश्न आहे! (मी मनातल्या मनात)
"अगं! आत्ता आत सोडतच नव्हते. म्हणायला लागले उद्या या. असं कसं गं? एखाद्याचा पेशंट नाहीच जगला दुसर्या दिवसा पर्यंत तर कोण जबाबदार?" मी कपाळाला हात! (मनातल्या मनात). "शेवटी ह्यांनी कोणालातरी फोन लावला. ह्यांच्या ओळखी फार आहेत नं बिझनेसमुळे! त्याचा फायदा होतो. त्या माणसाने काहीतरी सांगितलं त्या बरोबर लगेच म्हणाला एकेकाने जा. सगळ्यांनी एकदम जाऊ नका. इतर पेशंटांना त्रास होतो. आता मला सांग! आम्ही काय लहान आहोत का इतर पेशंटांना त्रास द्यायला? पण नाही! काहीतरी अडवणूक करायचीच! हे म्हणाले तू जाऊन ये, मी मग जातो. ह्यांचा स्वभाव मेला अस्साच भिडस्त! येतीलच मी गेल्यावर."
"हं." ...... बाई वैतागल्या असाव्यात.
"बरं मी निघते आता. काही नाही, देव करतो ते बर्या करता करतो असं म्हणून सगळं चांगलं मानून घ्यायचं. मस्त आराम कर. नाहीतर तू कशाला कधी आराम केला असतास. नाही, मला माहित्ये त्रास होत असणारच. अगं एवढा मोठा ऍक्सीडेंट! पण काय करणार आपल्या हातात काय आहे? येऊ मी?"
बाई गेल्या. त्यांचे यजमान आले. माणूस शांत वाटला. थोडावेळ काहीच बोलला नाही.
"फार वाईट झालं, पण जिवानिशी वाचलात सगळे ही केवढी भाग्याची गोष्ट आहे! लवकर बर्या व्हा. काही लागलं तर सांगा. संकोच करू नका. येऊ मी? आराम करा!" गेला बिचारा. बाई रात्रभर विव्हळत होत्या. पायाचे हाड मोडले होते (बहुतेक).
मी जवळ जवळ रात्रभर जागाच होतो. पोटात अन्नाचा कण नाही आणि वर जुलाबाचे औषध. कपडे धुऊन काढावेत तशी माझी आतडी धुऊन काढली जात होती. हा सिलसिला सकाळी ९ पर्यंत चालला होता.
सकाळपासून पुन्हा नातेवाईकांची, मित्रांची वर्दळ सुरू झाली. त्यांच्याशी गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळले नाही. शेजारच्या बेडवरील ऍक्सिडेंटच्या पेशंटनाही भेटायला नातेवाईक येत होते. त्यांच्या यजमानांच्या ऑफिसमधील कोणी गृहस्थ आले होते.
ते म्हणत होते, "कसं वाटतंय आता? काळजी करू नका कंपनीचा विमा आहे. सर्व खर्च विमा कंपनीच करणार आहे."
दुसरे एक गृहस्थ म्हणाले, "काय वाट्टेल ते होऊ दे, पण हॉस्पिटलचे जिणे नको बाबा! फार त्रासाचे हो! मी बघा आज ६९ वर्षाचा आहे पण कधी हॉस्पिटल नाही."
मला बाईंची दयाच येत होती. कोणी धड नातेवाईक नाहीत. रूग्णाशी कसे आणि काय बोलावे ह्याचेही भान नाही!
त्यापेक्षा माझे मित्र बरे होते. यायचे, "अरे! काय रे! च्यायला, एकदम हॉरीझाँटल? बरं आहे नं आता? आपल्या पुढच्या शनिवारच्या बैठकीचे काय? आहे नं? की कॅन्सल? असं करू नकोस बाबा! मोठ्या मिनतवारीने बायकोची परवानगी मिळवल्ये!"
"नाही, नाही. कॅन्सल नाही. मी येतोच आहे तोपर्यंत घरी. आणि मी नसलो तरी तुम्ही करा? काय?"
"नाही... ते आहेच रे! आम्ही दुसरा प्लॅनही तयार ठेवलाय. उगीच शनिवार वाया घालवणार नाही. पण तू असतास तर बरं झालं असतं. बरं! मी निघू? आज एका क्लायंटबरोबर मीटिंग आहे. साला बॉस पण येतो म्हणालाय. जायलाच हवं!" आणि गेला पण!
असे मित्र असावेत. प्रसंगाचं गांभिर्य मानायचेच नाही, उलट पेशंटला वेगळीच हुरहूर लावून जायचे! म्हणजे तोही 'शनिवार संध्याकाळच्या' ओढीने औषधाविनाही बरा होतो. ह्यालाच कदाचित नॅचरोथेरपी म्हणत असावेत! असो.
११ वाजता आमची यात्रा पुन्हा निघाली लॅबकडे. डॉक्टर तेच. म्हणजे सीमान्त पूजन, लग्न आणि रिसेप्शनला जसा एकच फोटोग्राफर असतो तसेच. हाही फोटोग्राफरच.
पुन्हा एकदा आमचे सर्व 'प्रायव्हेट' पार्टस 'पब्लिक' झाले. तिथे २-३ वॉर्डबॉइज होते. स्वतः डॉक्टर होते आणि कोणी २ लेडी ट्रेनी डॉक्टर होत्या. (माझा अंदाज). तीन दिवसांच्या वास्तव्यात मीही जरा निर्ढावलो होतो.
'हं, पेठकर कुशीवर वळा!"
कॅमेराच्या नळीने माझ्या शरीरात प्रवेश केला.
"उप्स!" मी.
"हं, घाबरू नका. काही कळणारही नाही. फार वेळ नाही लागणार, पाच मिनिटांचे काम आहे."
बोलता बोलता डॉक्टर आतील 'दृश्ये' काँप्यूटरच्या मॉनिटरवर पाहत होते. गरज वाटेल तिथे क्लिक करत होते.
वॉर्ड बॉइजचे काम होते माझे बंडल तिथे आणून सोडायचे. ते झाल्यावर त्यांनी खरे पाहता बाहेर जाऊन थांबायचे पण लॅब वातानुकूलित होती. ती त्यांच्यासाठी 'बातानुकुलीत'ही होती.
"मंग गनपतीला गावी जानार की नाय?" पोरे कोकणी होती. प्रश्नकर्त्याला ज्याला प्रश्न विचारला होता त्याची रजा कॅन्सल झाल्याची बातमी आधीच लागलेली असावी असे वाटले.
"नाय वो. कुठला गनपती न कुठली गवर. आमचा आपला सगला हितेच. रजा गावत नाय."
"गावत नाय म्हनजे? गनपतीत गावाकरे जायाला नको?" प्रश्नकर्ता आगीत तेल ओतू पाहत होता.
"ते खरा. पन आमचा डीपार्टमेट वेगला परतो नां. इमरजन्सी केसी असत्यात." त्याने हळूच आपण आय. सी. यू. चे वॉर्डबॉय असल्याचे भाव खाऊन सांगितले. "आमचं तुमच्या सारखं नाय, कवाबी आलं आनी कवाबी गेलं तरी चालतंय!"
इकडे दोघी ट्रेनी डॉक्टरणी टीव्हीवर शोले पिक्चर बघावा तशा 'इंटरेस्ट'ने मॉनिटर वरील दृश्ये पाहत होत्या.
"सर, ते ऍपेंडीक्स आहे का?"
"कुठे?.. अं.. नाही, नाही. ते ऍपेंडीक्स नाही. ऍपेंडीक्स दाखवतो हं.."
दर वेळी डॉक्टर त्यांच्या त्या कॅमेरा नळीलाच जोडलेल्या नळीने आंत पाण्याची फवारणी करायचे आणि आतडे तपासायचे. असे करत करत जवळ जवळ बादलीभर पाणी माझ्या आतड्यात फवारले असावे. त्याचे 'प्रेशर' वाढत होते. मला दुसर्याच संकटाची भीती वाटू लागली. जुलाबाचे औषध दिले होते. आणि फवारलेले पाणी प्रेशर वाढवीत होते. हे प्रेशर आता कसे हँडल करावे?
डॉक्टरांनी पुन्हा पाणी फवारून दोघींना ऍपेंडीक्स दाखवले.
"हे पाहा ऍपेंडीक्स."
"हं" दोघी हुरळल्या.
मला वाटलं दोघीही लहान मुलींसारख्या टाळ्या वगैरे वाजवतील. पण तसे झाले नाही.
मी उगीच जरा कण्हल्यासारखे केले. मला भीती वाटत होती. आता ह्या दोघी प्लीहा कुठे? यकृत कुठे? विचारतील आणि डॉक्टर माझ्याच पैशात त्यांना 'एंटरटेन' करतील.
"हं....झालं आता. कॅमेरा बाहेर घेतो मी. ओके?"
मी हंऽऽऽऽ! केले.
नंतर पोटात फवारलेलं पाणी एका नळीद्वारे बाहेर काढण्यात आलं. मला दिसत नव्हतं. पण चाळीतल्या सार्वजनिक नळाखाली बादली लावावी असा आवाज येत होता.
शेवटी कोलोनोस्कोपीची सर्व प्रक्रिया संपली तेंव्हा वीसेक मिनिटे झाली होती. मी कपडे करेपर्यंत डॉक्टरही एप्रन उतरवून आले.
"सो. नॉट टू वरी. एव्हरीथिंग इज फाईन. यू आर क्वाईट नॉर्मल."
मी फक्त "थँक्यू, डॉक्टर" म्हणालो.
वरून-खालून तपासून मी नॉर्मल असल्याचे निदान झाले होते.
कोलोनोस्कोपी झाल्यावर स्पेशल वॉर्डात ट्रान्स्फर करू असे मोठे डॉक्टर म्हणाले होते. म्हणजे ईसीजीच्या नळ्या, मानेवरील ऍटॅचमेंट वगैरे काढतील, स्वतःच्या पायांनी संडास-बाथरुमला जाता येईल आणि मुख्य म्हणजे गरम पाण्याने अंग शेकून मस्त अंघोळ करता येईल, ह्या सर्व सुखांच्या प्रतीक्षेत ४ दिवस काढले होते.
स्पेशल वॉर्डात ट्रान्स्फर झाली. आय. सी. यू. चे दडपण उतरले. स्पेशल वॉर्डात आल्याआल्या अगदी कढत पाण्याने अंघोळ केली. स्वच्छ दाढी केली. आता उद्या घरी जायचे ह्या सुखस्वप्नात नातेवाईकांशी गप्पा मारण्यात संध्याकाळ घालवली. संध्याकाळी मुख्य डॉक्टर आले. मी मुद्दाम जास्तच फ्रेश दिसण्याचा प्रयत्न केला. अगदी ह्या कानापासून ते त्या कानापर्यंत हसून त्यांचे स्वागत केले.
"सो हाऊ आर यू, मिस्टर पेठकर?"
"ओह! क्वाईट फ्रेश अँड फिलिंग फिट, डॉक्टर!" मी उसन्या अवसानात.
"गुड!"
"उद्या... घरी जाता येईल?" मी घाबरत घाबरत. अजून ह्यांचा भरवसा नाही.
"ओ, या! रिपोर्टस आर नॉर्मल. सॉफ्ट डाएट सुरू करायला हरकत नाही. म्हणजे, इडली, आइस्क्रीम, ज्यूस वगैरे वगैरे. अजून एक दिवस वाट पाहू आणि परवा घरी जायला हरकत नाही."
बापरे! अजून एक दिवस.. पुन्हा नाईलाज!
पण स्पेशल वॉर्डात एक बरे होते. एसी आणि टीव्ही होता. शेजारी नातेवाईकांना झोपायला बेड होता. चालाफिरायची बंधने नव्हती. तो दिवसही कसाबसा काढला. आणि प्रत्यक्ष सुटकेचा दिवस उजाडला.... वीस वर्षांनी कैदेतून सुटणार्या कैद्याला कसे वाटत असेल?
सकाळ पासून मी उतावळाच होतो. पण नर्सेस रोजची कामे करीत होत्या. मला औषधांचे डोस पाजत होत्या. टीव्हीवर कार्यक्रम चालू होते. मला कंटाळा येत होता. शेवटी संयम सुटला. मी बेल दाबून नर्सला बोलावलं.
"काय चाललंय काय? मला कधी डिस्चार्ज मिळणार आहे?"
"वो.. बडा डॉक्टर अभीतक आया नही है। वो डिस्चार्ज शीटपर साईन करेगा बादमे घर जानेका।"
"कभी आएगा बडा डॉक्टर?"
"अभी आना मंगता है। मालूम नही क्यों लेट हुवा।"
"फोन लगाव उनको। मै बात करुंगा।"
मग जरा धावपळ करून एक - दोन ठिकाणी फोनाफोनी केली त्यांनीच आणि सांगितले, "दस मिनिटमे आता है डॉक्टर."
डॉक्टर आले आणि परस्पर सह्या करून निघूनही गेले. मग सुरू झाली 'पैसे वसुली' प्रक्रिया. सगळे पेपर्स अकाउंटस डिपार्टमेंटला गेले. तिथे बिल बनायला २ तास लागले. कारण काय तर सर्व डिपार्टमेंटसचे रेकॉर्ड जमा करण्यात वेळ जातो. त्या नंतर बिल प्रत्यक्षात भरण्यात आलं. इन्शुरन्स नव्हताच. पुन्हा बिल भरल्याचे इथे दाखवा/तिथे दाखवा करून केस फाइल मिळवली आणि दुपारी ३ वाजता सुटका झाली.
सहा दिवसांच्या वास्तव्यानंतर मी 'दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल' मधून, ६५०००/- रुपये खर्च करून, पार अगदी 'दीऽऽऽऽन' आणि 'अनाथ' होऊन बाहेर पडलो!
समाप्त.
प्रतिक्रिया
29 Oct 2008 - 10:31 pm | नारायणी
खुपचं छान वर्णन. वाचताना मध्ये मध्ये टेन्शनही येत होतं, हसुही येत होतं. शिवाय सलग सगळे भाग वाचता आल्याने परिणामकारक लेख.
यापुढे तुम्हाला काहीही त्रास होउ नये , हीचं ईश्वरचरणी प्रार्थना!!
29 Oct 2008 - 10:49 pm | रामदास
मलाही असंच वाटतं की आता तब्येत ठिक असेल आणि असावी.हॉस्पीटल चा अनुभव फार भयावह असतो.
लेख चांगले आहेतच .कालच मनोगतावर वाचले होते.
29 Oct 2008 - 11:03 pm | बिपिन कार्यकर्ते
काका, मस्तच लिहिलंय. मनोगतावर वाचायचे होते अजून. तुम्ही तुमच्या खास मिश्किल शैलीत मस्त रंगवलाय किस्सा. आणि तब्येत कशी आहे आता?
बिपिन कार्यकर्ते
30 Oct 2008 - 2:43 am | प्राजु
मनांत धाकधुक होती थोडी.. पण वाचताना तुमच्या विनोदी शैलीने मजा आली.
आवडले तीनही लेख एकदम मस्त जमून आले आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Oct 2008 - 2:43 am | रेवती
ष्टोरी एकाच दिवशी वाचायला मिळाली म्हणून बरे वाटले.
लिहिली आहे छान. अनुभव मात्र त्रासदायक होता म्हणायचा.
रेवती
30 Oct 2008 - 7:46 am | मदनबाण
काकाश्री तब्येतीची काळजी घ्या..
अनुभव कथन छान झालय..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
30 Oct 2008 - 8:58 am | मुक्तसुनीत
एकूण अनुभव कितीही वेदनादायक असला ( आणि तो नि:शंकपणे वेदनादायक असणारच !) तरी , तुम्ही तुमच्या फाईटींग स्पिरीटने , विनोदी वृत्ती न सोडता, व्यवस्थेचे , व्यवस्थेत असणाआर्या माणासांचे नमुने टिपत स्वीकारला आणि आपल्या ओघवत्या शैलीत आमच्यापर्यंत पोचवलात ! काहीकाही प्रसंग भीषण विनोदी ( उदा. "सार्वजनिक नळावरची बादली" , "पब्लिक/प्रायव्हेट पार्टस्" ) तर काही प्रसंग हृदयद्रावक (उदा. आप्तेष्टांसमोर असहायतेची जाणीव झाल्याने आलेले अश्रू , भीषण अपघातात अडकलेल्या व्यक्ती) आहेत. एकंदरीत , अतिशय वाचनीय , मनोरंजक लिखाण. अभिनंदन !
30 Oct 2008 - 12:46 pm | डॉ.प्रसाद दाढे
एकदम सहमत!
बाकी पेठकरकाका॑ची ही शैली मला ज्याम आवडते. ग॑भीर प्रस॑गाचे सुद्धा त्या॑नी काय खुसखुशीत वर्णन केल॑य.
डॉक्टर म्हणून नेहमीच आयसीयूतल्या वा ऑपरेशन थिएटरमधल्या रूग्णा॑शी स॑पर्क येतो पण त्या॑च्या भावना अश्या कधी कळल्या नव्हत्या. वाचून बराच शहाणा पण झालो :)
30 Oct 2008 - 9:21 am | सहज
तीनही भागात योग्य तो वेग, वाचकाला खिळवुन ठेवणारे लेखन.
हॉस्पीटलमधील वास्तव्याचा अतिशय जिवंत बोलका अनुभव. व मार्गदर्शक देखील.
तुम्हाला नवे वर्ष अत्यंत आरोग्यदायी जावो ह्या मनापासुन शुभेच्छा.
30 Oct 2008 - 9:23 am | अनिल हटेला
>>वरून-खालून तपासून मी नॉर्मल असल्याचे निदान झाले होते.
सही ....
पेठकर साहेब अतीशय छान शब्दबद्ध केलये अनुभव कथन ....
+१...................
विशेष म्हणजे एकाच दिवशी सर्व वाचता आले म्हणून बरे वाटले.
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
30 Oct 2008 - 10:15 am | विजुभाऊ
पेठकर काका
हॉस्पिटलचे अनुभव तुम्ही अगदी ट्वेन्टी २० ची मॅच ऑखो देखा हाल सांगावा तशी सांगितलीत.
'बातानुकुलीत' रूम एकदम मस्तच होती.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
30 Oct 2008 - 10:22 am | अनिरुध्द
प्रसंगाचं गांभिर्य मानायचेच नाही, उलट पेशंटला वेगळीच हुरहूर लावून जायचे
एकदम छान. तुम्हीही हा लेख प्रसंगाचं गांभिर्य न जाणवू देता आम्हाला वाचायचा आनंद दिलात. आभार.
तब्येतीची काळजी घ्या. शुभेच्छा.
30 Oct 2008 - 10:45 am | यशोधरा
>> पार अगदी 'दीऽऽऽऽन' आणि 'अनाथ' होऊन बाहेर पडलो!
:))
मस्तच लिहिलंत काका!! आवडलं! आता कसे आहात?
30 Oct 2008 - 10:47 am | अभिज्ञ
पेठकरकाका,
एकाच दिवशी तिनहि भाग देउन एक चांगला पायंडा पाडलात. :)
अतिशय खुमासदार लेखनशैली !!! +१.
मनापासून अभिनंदन. इस्पितळातील वर्णने खासच. अन शेवटच्या वाक्यातला श्लेष जबरीच.
अभिज्ञ.
अवांतरः
तब्येतिची काळजी घ्या.
30 Oct 2008 - 11:20 am | प्रभाकर पेठकर
नारायणी, रामदास, बिपिन कार्यकर्ते, प्राजु, रेवती, मदनबाण, मुक्तसुनीत, (मुक्तसुनीत), सहज, अनिल हटेला, विजुभाऊ, अनिरुद्ध, यशोधरा आणि अभिज्ञ.
मनापासून धन्यवाद. आता तब्येत खणखणीत आहे. आपल्या सर्वांच्या शुभचिंतनाने ती अशीच कायम खणखणीत राहील अशी आशा आहे. (अर्थात, ती तशी ठेवण्याचा माझ्याकडूनही प्रयत्न असणार आहे.)
30 Oct 2008 - 11:37 am | विसोबा खेचर
सहा दिवसांच्या वास्तव्यानंतर मी 'दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल' मधून, ६५०००/- रुपये खर्च करून, पार अगदी 'दीऽऽऽऽन' आणि 'अनाथ' होऊन बाहेर पडलो!
आयला! ६५००० ला फोडणी?
असो, आपली तब्येत आता उत्तम आहे हीच महत्वाची बाब! आणि ईश्वर करो, सर्वांच्याच तब्येती नेहमीच चांगल्या राहोत..!
वरील मंडळींशी सहमत, खुमासदार व सहजसोपे अनुभवकथन. आज बर्याच दिसांनी आपले लेखन वाचले.
अवांतर - १) आपल्याशी फोनवर बोलल्याप्रमाणे आता तीनही भाग दुवे देऊन जोडले आहेत.
अवांतर - २) हे लेखन सर्वप्रथम मिपावर आले असते तर आम्हाला अधिक आनंद वाटला असता.. असो.
तात्या.
31 Oct 2008 - 12:31 pm | झकासराव
आयला!!!!
काका तुम्ही आजारी होता???
तुम्हाला आता बर वाटत असेलच.
सर्व वर्णन तुमच्या खास शैलीत केल आहे :)
पब्लिक आणि प्रायव्हेट अस काही उरतच नाय की इस्पितळात.
................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao
31 Oct 2008 - 6:02 pm | लिखाळ
छान वर्णन !
भेटायला येणारे लोकांत अनेक नमुने असतात.. त्यांची मजा वाचायला आवडली.
'बातानुकुलित' खोली मस्तच ! :)
--लिखाळ.
31 Oct 2008 - 6:45 pm | चतुरंग
अगदी दिवाळीतल्या खमंग चकलीसारखे!
तुम्हाला ह्या दिव्यातनं जावं लागूनही तुमच्यातल्या विनोदबुद्धीनं तो ताण सुसह्य करायला मदत केली.
खालून-वरुन तपासणी, बातानुकूलित खोली, अपघातातल्या पेशंटशी कोणताही मुलाहिजा न बाळगता बोलणारे भन्नाट लोक, सार्वजनिक नळावरची बादली असे अफलातून प्रकार वाचून करमणूक झाली!
एकदा डॉक्टरांच्या ताब्यात गेलो की मग फक्त बघत रहाणे ह्याखेरीज पर्याय नसतो! काय करतील ते करतील म्हणायचे आणि शांत रहायचे!
तुमची तब्बेत ठणठणीत राहो ही सदिच्छा!
(खुद के साथ बातां : रंग्या, तू वजन कमी करण्याचा प्रयत्न चालू ठेव! बघितलेस न कसे 'दीन' आणि 'अनाथ' व्हावे लागते ते, आजारी पडू नकोस. फराळ हवाय काय दिवाळीचा? चल जा जिमला. ;) )
चतुरंग
2 Nov 2008 - 11:17 pm | विसोबा खेचर
पेठकरशेठ,
एका अर्थी बरंच झालं इथेही हा लेख टाकलात ते!
खणखणीत १८ प्रतिसाद..!
आपला,
(मिपाकरांच्या रसिकतेचा सार्थ अभिमान वाटणारा!) तात्या.
3 Nov 2008 - 2:16 am | पिवळा डांबिस
प्रभाकरजी,
तुम्हाला सहन कराव्या लागलेल्या शारिरीक (आणि मानसिक!) व्यथेबद्दल दु:ख्ख वाटते....
कुणालाही व्यथा सहन करावी लागली तर आपण हसू नये असे म्हणतात, पण इथे तुम्हीच इतक्या मजेशीरपणे वर्णन केलंय की हसू अनावर झालं....
विशेषतः दुसर्या भागातिल एन्डोस्कोपीचे वर्णन वाचताना ह्यापेक्षा कोलिनॉस्कोपीचं वर्णन वाचतांना जास्त मजा आली असती असं वाटून गेलं, आणि लो ऍन्ड बिहोल्ड, तिसर्या भागात तुम्ही आम्हाला निराश केलं नाहीत!!!!:)
असो, बरेच पैसे खर्च झाले हे तर खरंच पण या सर्व सोपस्कारांतून तुम्ही आपले तोंड (आणि बिंड!!!) सहिसलामत ठेवून निसटलात हेही नसे थोडके, नाही का?
आता तब्येतीची काळजी घ्या.
आपला,
पिवळा डांबिस
3 Nov 2008 - 8:26 am | प्रभाकर पेठकर
डॉ. प्रसाद दाढे, विसोबा खेचर, झकसराव, लिखाळ, चतुरंग आणि पिवळा डांबिस आपल्या उत्तेजनात्मक प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा