पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
27 Aug 2018 - 10:40 pm

५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान

३० नोव्हेंबर २०१७ ची दुपार. सद्गडहून पिथौरागढ़ मार्गे कांडा गावाला जायचं आहे. कांडा गाव रस्त्याला जोडलेलं नाही, त्यामुळे इथे एक छोटा ट्रेक करायचा आहे. सोबतच्यांनी सांगितलं की, इथे रस्ताही नव्यानेच झाला आहे आणि पूर्वी लांब अंतर पायी चालून यावं लागायचं. जीपमधून उतरल्यावर समोर उतरणारी पायवाट दिसली आणि घोडेही दिसले! ह्या ट्रेकबद्दल नातेवाईकांनीही सांगितलं होतं. आणि सुरू झाला एक रमणीय ट्रेक! रस्त्यावरून उतरणारी पायवाट सरळ जंगलाकडे जाते आहे आणि खालीही उतरते आहे. लवकरच घनदाट अरण्य सुरू झालं आणि पायवाट हळु हळु छोटी होत गेली.

किती सुंदर दृश्य आहे! अरुंद वाट आणि आजू बाजूला झाडे व पहाड! थोडं अंतर वाट जरा पक्की होती, नंतर फक्त मातीची वाट उरली. दुपारची वेळ असूनही घनदाट झाडे असल्यामुळे सकाळचं दवंही काही ठिकाणी अजूनही वाळलेलं नाहीय व त्यामुळे काही ठिकाणी पाय घसरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर दरीचं चांगलंच एक्स्पोजर आहे. जर मी हिमालयात पहिले ट्रेक केले नसते किंवा कधी जवळून दरीचं एक्स्पोजर अनुभवलं नसतं तर मला हा ट्रेक नक्कीच कठीण गेला असता. कठीण नाही पण हा ट्रेक रोमांचक नक्कीच आहे. थोडं अंतर पुढे गेल्यावर पायवाट सपाट झाली. काही ठिकाणी थोडं थांबण्याइतकी जागाही आहे. सगळे जण सोबत जात आहेत. नंतर तीव्र चढ सुरू झाला. काही ठिकाणी जेमतेम पाय टेकवायला पुरेल इतकी जागा आहे. हळु हळु कांडा गांव जवळ येतं आहे. झाडांमधून पुढे गेल्यावर शेत दिसले व नंतर गावाचा वरचा भाग म्हणजे मल्लासुद्धा दिसतोय.

रस्ता सोडल्यानंतर जवळपास एका तासाने गावात पोहचलो. सगळे जण सोबत असल्यामुळे थोडा उशीर लागला. मध्ये मध्ये अनेक पायवाटा एकत्र येत असल्यामुळे स्थानिक लोकांच्या सोबतीनेच पुढे जावं लागलं. संध्याकाळ होता होता कांडा गावातल्या लग्न घरी पोहचलो. अगदी डोंगराच्या आत दरीत वसलेलं गांव आणि तिथले तितकेच साधे सुंदर लोक! हे गाव आणि हा ट्रेक नेहमी लक्षात राहील. जर आमच्याजवळ सामान असतं, तर हा ट्रेक अतिशय कठीण झाला असता. ते वाटेत एका ओळखीच्या ठिकाणी ठेवलं होतं, म्हणून बरं झालं. थोड्याच वेळात अंधार पडला आणि दूर डोंगरात दिवे उजळले. इथे मोबाईल नेटवर्क अगदी काठावर आहे. गाव चढ- उतारावरच वसलेलं आहे. इथे पारंपारिक कुमाऊनी विवाह रिवाज बघायला मिळतील. संध्याकाळी संगीत सुरू झालं. मग कळालं की, इथे डीजेसुद्धा लागणार आहे. एका अर्थाने इतकं दुर्गम गांव असूनही इथेही शहरी वारं आलंय, अर्थातच. हळु हळु थंडी वाढते आहे.

संध्याकाळी ब-यापैकी पारंपारिक कुमाऊनी विवाहातील रिवाज बघायला मिळाले. पण डीजेचा गोंगाट मला मानवणारा नसल्यामुळे लगेचच झोपेकडे वळलो. पण त्याआधी घराच्या आजूबाजूला थोडं फिरलो. किती मस्त जागा आहे ही! दूर डोंगरात चमकणारे इवले इवले दिवे! आता उद्या जाईन तर जितकं जमेल तितकं पायीच जाईन. जिथपर्यंत जीप येत होती, तोही शेवटचा पॅच पायी चालण्यासाठी सुंदर रस्ता आहे. उद्या सकाळी इथून निघून लग्नाच्या ठिकाणी जायचं आहे. लग्न कार्यक्रम मुलींकडे लोहाघाटला होईल. लोहाघाट पिथौरागढ़- टनकपूर रस्त्यावर आहे.

सुमारे सव्वा किलोमीटरचा रोमांचक ट्रेक!


क्रमश:

पुढचा भाग- पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ६: कांडा गावाहून परत

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग