भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर
३० नोव्हेंबर २०१७ ची सकाळ. आज सद्गडहून निघायचं आहे. गामधून समोर काल बघितलेलं ध्वज मंदीर दिसतं! हे ह्या परिसरातलं सर्वोच्च स्थान आहे. तिथे काल मोबाईलला नेपाळी नेटवर्क मिळालं होतं. आज थोडं गावात फिरेन. सकाळी लवकर उठून निघालो. पायवाटेने खाली उतरत जाऊन रस्त्यापर्यंत आलो. हिमालयातलं गांव! रस्त्याला लागून असल्यामुळे दुर्गम नाही पण पहाड़ी असं गांव! गावात वाहनं अगदी थोडी. गरजच नाही पडत. आणि घरापर्यंत वाहनं येऊही शकत नाहीत. इथले लोक शेतीबरोबर ह्या प्रदेशामध्ये असलेले व्यवसाय करतात- मिलिटरी, बीआरओ व आयटीबीपीशी निगडीत कामं अनेक जण करतात. काही सरकारी कामात असतात. काही जण वीस किलोमीटर दूरच्या पिथौरागढ़मध्ये जाऊन नोकरीही करतात. शहराचा वारा आता इथेही पोहचला आहे. सद्गडचे अनेक मुलं इंग्रजी शाळेत स्कूल बसने जातात!
अशा व ह्याहूनही दुर्गम गावांना बघतो तेव्हा मनात अनेक प्रश्न येतात. पहली गोष्ट म्हणजे आधुनिक प्रगतीचे जे काही थोडे लाभ आहेत, त्यापासून ह्यांनी किती काळ वंचित राहावं? निसर्गाच्या सान्निध्याचे जसे अनेक लाभ आहेत, तसे आधुनिक जीवनाचेही आवश्यक असे फायदे आहेतच. जसं महिलांचं आरोग्य- प्रसुती सुविधा व अन्य सुविधा. हे त्यांनाही मिळायला हवं ना. पण ह्या गोष्टीचा दुसरा भाग असा आहे की, जेव्हा अशा गावांमध्ये शहराच्या सुविधा व फायदे येतात, त्याबरोबर लोकांचा जमिनीशी असलेला संबंध कमी होत जातो. आणि एक प्रकारे पहाड़ी गावं आपला अस्सलपणा गमावू लागतात. आता असे लोक आहेत जे अजून तिथेच राहतात, पण काम वेगळ्या प्रकारचं करतात- जसे दुकानदार किंवा ड्रायव्हर. हळु हळु त्यांच्यात फरक होत जातो. पहाडात खूप कमी लोक लठ्ठ असे दिसतात. पण असे व्यवसाय करणा-यांचं हळु हळु पोट वाढतं. त्यांचे विचारही शहरासारखे होत जातात आणि मग अनेकदा प्रत्येक कुटुंबातलं कोणी ना कोणी खाली मैदानाकडे किंवा दुस-या शहरांकडे सेटल होतात. आणि जसं हे प्रमाण वाढतं, तसा पहाड़ अधिक उदास होत जातो. ह्यामध्ये मग निवड कशाची करावी? इथेही सुविधा असाव्यात की येऊ नयेत? अर्थात् पहिली गोष्ट म्हणजे आता शहरीकरण व आधुनिक विचारांचं आक्रमण सगळीकडेच होणार आहे. प्रत्यक्षात निवड करणंही शक्यच नाहीय.
पण मला वाटतं ज्या प्रकारे रस्ते बनवताना डोंगराची काळजी घ्यायला पाहिजे; यात्रा- पर्यटनला प्रोत्साहन देताना पर्यावरणाचाही तितकाच विचार करायला पाहिजे; त्याच प्रकारे आधुनिक विचारांसोबत पहाड़ी वृत्तीसुद्धा वाचवली गेली पाहिजे. मला नेहमी एक प्रश्न पडतो- असेही काही थोडे लोक असतील ना जे पहाड़ाशी तितकेच जोडलेले आहेत, अजूनही तिथेच राहतात आणि शहरातली संस्कृतीही त्यांनी आत्मसात केली आहे. असे फार थोडे लोक असणार. पण जर असतील तर ते शहरात शिकून किंवा शहरात राहून आजही पहाड़ी साधेपणा व भोळेपणा न विसरता परत पहाडात येऊन राहात असतील. असे लोक निश्चितच एक सुवर्णमध्य असणार. त्यांच्यात शहरामधली आधुनिक व्यापक दृष्टी आणि पहाड़ी समजही असेल. कोणी ह्या दोन्ही बाबी टिकवून असेल तर निश्चितच तो माणूस खूप विशेष असणार. मला अनेकदा असंही वाटतं की, मिलिटरीचं ट्रेनिंग- मिलिटरी कौशल्य ही एक फार मोठी अचिव्हमेंट आहे. पण ते जीवनाचं एक एक्स्ट्रीमही आहे. असे कोणी असतील का जे मिलिटरी ट्रेनिंगमध्येही धुरंधर असतील आणि तरीही कवी किंवा बुद्धीजिवी असतील? असावेत, थोडे पण असावेत. आणि हा संगम अगदी वेगळा असावा. असो.
हायवेवर आलो आणि चालत गेलो. हा राष्ट्रीय महामार्ग पूर्वी मानस सरोवराचा एक मार्ग होता. जागोजागी ह्या रस्त्यावर बीआरओच्या खुणा दिसतात! हिवाळा असूनही रस्त्यावर अनेक ठिकाणी काम सुरू आहे. पिथौरागढ़च्या बाजूला रस्ता वर चढत होता, म्हणून तिकडे वळालो. सकाळची प्रसन्न थंडी आणि सगळीकडे दिसणारे नजारे! दूरवर डोंगरातले रस्तेही दिसतात. थोडा वेळ चालत राहिलो व फोटो घेत राहिलो. मग परत वळालो. सद्गड गावात येऊन पायवाटेने वर चढलो. एका जागी पायवाट चुकली तर जीपीएस वर ट्रेल रूट बघून घरी आलो. शाळेत जाणारी मुलंही भेटली. सव्वातीन किलोमीटर चालल्यामुळे थंडीपासून थोडावेळ सुटका झाली. घराच्या गच्चीत बसून ऊन्हात चहाचा आस्वाद! समोर दिसणारे डोंगर आणि नजारे! परवा एका लग्न कार्यक्रमात जायचं आहे; तिथे उद्या संध्याकाळीच पोहचावं लागेल. आणि ज्या घरी लग्न आहे, तिथे एका कार्यक्रमासाठी आजच जायचं आहे. त्यामुळे मला अन्य कुठे जाता येणार नाही. त्यामुळे पिथौरागढ़ जिल्ह्यातल्या हेल्पिया गावातल्या अर्पण संस्थेतही जाता येणार नाही. मागच्या वेळी तिकडे राहिलो होतो, म्हणून जाण्याची इच्छा होती. पण जमत नाही आहे.
दुपारी सद्गडवरून निघालो. सगळे सोबत निघत असल्यामुळे थोडा वेळ लागला. नंतर बसची वाट बघितली. बसने पिथौरागढ़मधल्या मुख्य बाजाराच्या जागी पोहचलो. शंभर टक्के लोक स्वेटर घातलेले आहेत! थोडा वेळ फिरल्यावर तिथूनच कांडा गावाजवळ नेणारी जीप घेतली. पहाड़ात पिथौरागढ़ शहर असलं तरी मोठं गावंच आहे. त्यामुळे जीप घेऊन इतर सवारी येऊन बसेपर्यंत निघता निघता बराच वेळ गेला. सगळे स्थानिक प्रवासी आहेत. त्यातही महिला जास्त आहेत आणि अर्थातच सगळे एकमेकांना ओळखतात. माझ्या नातेवाईकांनाही इकडून तिकडून ओळखतातच. जीपमध्ये एक मस्त गाणं लागलं- तेरो मेरो रिश्तो पहलो जनमवा असं काहीसं! खरंच तर आहे, पहाड़ासोबतचं माझं नातंही असंच तर आहे. जीप बुंगाछीना गावाजवळून अगन्या गावाकडे गेली. अगन्या गावामध्ये माझ्या सास-यांचं घर आहे. आत्ता तिथे जायचं नाहीय, पण एका दुकानात सामान ठेवलं. कारण आज जाऊ त्या कांडा गावाच्या आधी पायी चालावं लागेल. येताना परत सामान घेऊ.
रस्त्यावर सगळीकडे सुंदर नजारे व मध्ये मध्ये डोंगरातली गावं! मध्ये मध्ये नद्या व अन्य जलधारा! वा! जीपमध्ये गमतीची गोष्ट वाटली की, इथे राहणा-या लोकांनाही उलट्या होत आहेत! पिथौरागढ़वरून निघाल्यानंटर अडीच तासांनी कांदा गावाच्या जवळ रस्ता संपतो तिथे पोहचलो. इथून पुढे पायी जायचं आहे. रस्त्याचा शेवटचा टप्पाही खूप नाजूक स्थितीतला होता! बायकोने सांगितलं की, हा रस्ताही नवाच आहे. पूर्वी त्यांना आधीच चार किलोमीटर पायी पायी यावं लागायचं आणि आत्ता जीपचा रस्ता आहे तिथे असलेली पायवाटही बिकटच होती! पुढचा ट्रेकही कठीण आणि रोमांचक असणार! कारण इथे घोडे उभे आहेत! ट्रेकच्या वाटेवर घोडा असेल तर ट्रेक निश्चितच रोमांचक असणार!
कांडा गांवाकडे जाणारा रस्ता. इथे पिथौरागढ़, सद्गड व नेपाळ सीमासुद्धा दिसते.
क्रमश:
पुढचा भाग- पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
14 Aug 2018 - 1:00 pm | अनिंद्य
@ मार्गी,
मिपाच्या 'भटकंती' विभागात हमखास डोकावतो मी पण पिथौरागढ भ्रमण सलग वाचायचे म्हणून हात लावला नव्हता. आज सगळे भाग वाचले, एका वेगळ्याच जगातली सफर ! ते काय म्हणतात - अनचारटेड टेरिटोरी वगैरे.
फार आवडले, फोटोही 'कॅन्डीड' (मराठी प्रतिशब्द ?) आणि सुंदर आले आहेत, विशेषतः या भागात.
पु भा प्र,
अनिंद्य
14 Aug 2018 - 5:14 pm | सिरुसेरि
हा ही भाग माहितीपुर्ण झाला आहे .
14 Aug 2018 - 7:40 pm | भुजंगराव
खूप छान वर्णन न तितकेच perfect फोटोग्राफी विशेष म्हणजे झाडावर खेळणारी मुले ........क्लासिक
14 Aug 2018 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं वर्णन आणि फोटो !
16 Aug 2018 - 12:24 pm | मार्गी
सर्वांना खूप खूप धन्यवाद!!
17 Aug 2018 - 12:11 pm | जेम्स वांड
कांडा गावाचं नाव ऐकल्याबरोबर जिम कॉर्बेटची "द मॅन ईटर ऑफ कांडा" ही कथा आठवली. हे तेच गाव आहे काय?
17 Aug 2018 - 6:17 pm | मार्गी
शक्यता आहे! पण नक्की सांगता येणार नाही. कारण कांडा नावाची दोन- तीन गावं कूमाऊँमध्ये आहेत. आणि अशा सगळ्याच गावांमध्ये वाघ बघितले जातात (पूर्वी तर अधिक प्रमाणात). :)
18 Aug 2018 - 3:12 am | निशाचर
सुरेख लिहिलंय. फोटोही सुंदर!