एका गावात एक दांपत्य राहत होते. चरितार्थाचे साधन म्हणजे भिक्षुकी. परिस्थिती बेताची. म्हणजे एका भिक्षुकाची असावी तशीच. रोज जशी भिक्षा मिळेल तशी गुजराण व्हायची. अर्थात कधी कधी महिन्यातून चार-पाच एकादश्याही घडायच्या. पण या परिस्थितसुध्दा एक घास गाईला व एक अतिथीला देण्यास भिक्षुकाची पत्नी विसरत नसे. ही सवय तिने व्रत पाळावे तशी पाळली होती. प्रथम अतिथी, मग पती आणि काही उरलेच तर स्वतःसाठी असा तिचा क्रम असे. कैकदा घरात असलेली एकुलती एक भाकरीही अतिथीला द्यावी लागुन फक्त पेज पिऊन झोपावे लागे दोघांना. अर्थात यावरुन दोघाही पती पत्नीमध्ये खुपदा वाद होत. वाद म्हणन्यापेक्षा पती खुप बोले आणि पत्नीला ऐकावे लागे. भिक्षुकाची विचारसरणी अगदी सरळ होती. “आपण आहोत तर विश्व आहे, एवढेच काय, आपण आहोत तोवरच आपला ईश्वर आहे.” त्यामुळे सर्वात प्रथम आपण आपली सोय पहावी. परोपकार करुन समाजात नाव मिळेल पण नुसत्या नावाने काही पोट भरत नाही.
त्याचे पत्नीला कायम सांगणे असे की “मीच याचक म्हणून जन्म काढतो आहे, त्यात दारावर आलेल्या याचकाला काय देणार?” पत्नी सगळं ऐके आणि हसुन म्हणे “असा एक दिवस नक्की येईल की तुम्हाला माझे वागणे पटेल.”
भिक्षुक चिडून म्हणे “…आणि तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होईल असेही म्हण पुढे.”
“तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप करावा लागेल असा दिवस तुमच्या आयुष्यात कधीच येउ नये” असं म्हणत पत्नी कामाला लागे.
दिवस चालले होते. परिस्थितीत काही फरक नव्हताच. उलट कालचा दिवस दोघांनाही उपासंच घडला होता. त्यामुळे आज भिक्षुकाने ठरवले “नेहमी पेक्षा सकाळी लवकर निघू, चार घरे जास्त मागू.” त्याने आन्हिके उरकली. झोळी खाद्यावर अडकवली. झोळीत काही वजन हवे म्हणून घरातील उरले सुरले तांदूळ झोळीत टाकले आणि भिक्षांदेही साठी तो घराबाहेर पडला. बाहेर सकाळचे सुंदर वातावरण होते. लोकांची सकाळची लगबग दिसत होती. ‘कुठून सुरवात करावी?’ या विचारात असतानाच भिक्षुकाला अचानक लोकांची लगबग वाढल्याचे जाणवले. काही समजायच्या आत रस्ता मोकळा झाला. सर्वजण आदबीने उभे राहीले. भिक्षुकाची नजर समोर गेली. नगराची हालहवाल पहाण्यासाठी आज राजा स्वतः भल्या सकाळी बाहेर पडला होता. प्रजेला त्रास नको म्हणून अत्यंत कमी लवाजमा त्याच्यासोबत होता. काही समजायच्या आत राजाचा रथ भांबावलेल्या भिक्षुकापाशी येउन थांबला. नमस्कार करुन बाजूला व्हायचे भानच त्या भिक्षुकाला राहीले नाही. त्याला बाजूला सारण्यासाठी सरसावणाऱ्या सैनिकांना थांबवून राजा रथाखाली उतरला. आता मात्र भिक्षुक भानावर आला. त्याची चतुर बुध्दी क्षणभरात खुप काही विचार करुन गेली. आज प्रत्यक्ष राजा समोर उभा होता. आज जर झोळी पसरली तर आयुष्यभराची ददात मिटणार होती. आनंदाने त्याचा हात झोळीकडे गेलाच होता इतक्यात कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असं घडले. राजाने प्रसन्नपणे हसत आपला भरजरी शेला भिक्षुकासमोर पसरला आणि म्हणाला “महाराज आज आपणच मला भिक्षा घालावी. माझ्यासाठी तोच आशिर्वाद आहे.”
हे पाहून भिक्षुक गोधळला, घाबरला, धर्मसंकटात पडला. काही द्यायची वृत्ती नव्हतीच आणि प्रत्यक्ष राजाला नाहीही म्हणता येईना.
भिक्षुकाने खांद्यावरची झोळी खाली ठेवली आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत तांदुळ भरले. पण त्याने विचार केला “या ओंजळभर तांदळात माझा उद्याचा पुर्ण दिवस निघेल, राजा काय करणार या तांदळाचे?” त्याने भरलेली ओंजळ अर्धी रिकामी केली. मग त्याने परत विचार केला “अर्ध्या ओंजळीत निदान पत्नी तरी जेवेल उद्या” त्याने ओंजळ रिकामी करुन मुठभर तांदूळ घेतले. राजा मात्र अजुनही शेला पसरुन उभा होता. भिक्षुकाने विचार केला “हे मुठभर तांदूळ तर राजाच्या शेल्याच्या जरीत कुठे अडकतील हे राजालाही कळणार नाही.”
राजा हसुन म्हणाला “महाराज, देताय ना भिक्षारुपी आशिर्वाद?”
राजाचे हे शब्द ऐकूण त्याचे डोळे चमकले. “आशिर्वादासाठी कशासाठी हवेत मुठभर तांदुळ? त्यासाठी दोन दाणेही पुरतात” असा विचार करुन त्याने चिमूटभर तांदूळ झोळीतुन बाहेर काढले आणि राजाच्या शेल्यात टाकले. राजाने अत्यंत नम्रपणे ते स्विकारले आणि “धन्यवाद महाराज!” म्हणत रथात बसुन मार्गस्थ झाला.
“एकूणच मोठी माणसे जरा विक्षिप्तच असतात” असा विचार करत भिक्षुक नगरभर फिरुन संध्याकाळी घरी आला. सकाळचा ‘राजाचा प्रसंग’ सोडला तर त्याचा दिवस आज अगदी छान गेला होता. आज त्याला अपेक्षेपेक्षाही जास्त भिक्षा मिळाली होती. आता किमान आठ दिवस तरी त्याला ‘मिठ-भाताची’ चिंता नव्हती. खांद्यावरचे ओझे सांभाळत त्याने घरचा रस्ता धरला.
घरी येताच त्याने मोठ्या आनंदाने पत्नीकडे झोळी सोपवली आणि स्नान वगैरे उरकुन तो संध्येच्या तयारीत गुंतला. पत्नीने झोळी जमीनीवर रिकामी केली आणि तांदुळ निवडून साफ करायला सुरवात केली. तिलाही खुप बरे वाटले होते इतकी भिक्षा पाहून. स्नान उरकुन भिक्षुक जेंव्हा घरात आला तेंव्हा पत्नी आनंदाने ओरडली “अहो, हे पहा काय आहे! तुम्ही आणलेल्या भिक्षेतले दोन दाणे चक्क सोन्याचे आहेत!” ते पहाताच त्याच्या डोळ्यांसमोर सकाळी राजाच्या शेल्यात टाकलेले दोन दाणे आठवले.
पत्नी त्या दोन दाण्यांकडे अतिशय आनंदाने तर भिक्षुक हतबुध्दतेने पहात होता.
(मार्मिक लघू कथा)
कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे
प्रतिक्रिया
18 Jul 2018 - 10:59 am | एकनाथ जाधव
खुपच छान!
18 Jul 2018 - 11:24 am | श्वेता२४
छान कथा. नेहमाप्रमाणे
18 Jul 2018 - 11:51 am | कुमार१
आवडली
18 Jul 2018 - 12:24 pm | उगा काहितरीच
छान !
18 Jul 2018 - 12:31 pm | Ranapratap
जुनी लोक म्हणत असत देताना श्रीमंता सारखे द्यावे, अन जेवताना गरीबा सारखे जेवावे.
18 Jul 2018 - 12:45 pm | सोमनाथ खांदवे
1 नंबर
18 Jul 2018 - 1:39 pm | मराठी कथालेखक
छान
18 Jul 2018 - 4:08 pm | सिरुसेरि
छान . हा राजा नक्कीच जादुगार असणार .
18 Jul 2018 - 7:22 pm | Ram ram
sorry.pan hich gosht aamhala Sanskrit madhye dhada hoti.
19 Jul 2018 - 2:35 pm | खिलजि
एकदम मस्त बोधकथा आहे . आवडली , मुलांना सांगण्यासाठी तर एकदम छान आहे .
दानत आवश्यक आहे . या धरतीला बळीराजा जेव्हा पेरतो तेव्हाच तर उगवते , त्याने पेरलच नाही, सर्व आपल्याकडचं ठेवलं तर काय उगवणार नि आपण काय खाणार ...
19 Jul 2018 - 4:03 pm | ज्योति अळवणी
आवडली
19 Jul 2018 - 4:30 pm | शाली
सगळ्यांचे मनापासून आभार!