(आस्था वाहिनी वर एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचा विस्तार)
एका गावात एक घर होते. घरात आत शिरायला फक्त एक छोटासा दरवाजा होता. तो हि सदैव जाड काळ्या कपड्याने झाकलेला. त्या घरातील लोक रोज सूर्य उगवल्यावर छोट्याश्या दरवाज्यातून हातात एक बादली घेऊन बाहेर यायची. हाताने बादलीत काही तरी भरायचे नाटक करायची आणि घरात जायची. हा प्रकार कित्येक तास चालत असे. लोकांना त्यांच्या या वागण्याचे आश्चर्य वाटायचे. हळू हळू हि वार्ता त्या राज्याच्या राजाच्या कानावर पडली. सत्य पडताळण्यासाठी एक दिवस राजा मंत्री सोबत भल्या पहाटे त्या घरासोमोर येऊन ठाकला. सूर्य उगवला, घरातून एक वयस्कर माणूस हातात बादली घेऊन बाहेर आला आणि आपल्या रिकाम्या हाताने बादलीत काहीतरी भरण्याचे नाटक सुरु केले. राजाला राहवले नाही त्याने विचारले, तुझ्या हातात काही नाही तरी हि तू बादलीत काहीतरी भरण्याचे नाटक करीत आहे. हा काय प्रकार आहे. तो माणूस विनम्रतेने म्हणाला, राजन आमच्या घरात आंधार आहे. मी सूर्याचे ऊन या बादलीत भरतो आणि घरात जाऊन ती बादली रिकामी करतो. राजाने हसू आवरीत विचारले, घरात प्रकाश पसरला का? तो म्हणाला, रोज कित्येक बादल्या भरून सूर्याचे ऊन घरात टाकतो तरी हि घरात आंधार राहतो. काहीच समजत नाही. राजा घराच्या दरवाज्याजवळ आला आणि तलवारीने काळे जाड कापड कापून टाकले. घरात सूर्याचा प्रकाश पोहचला. (गोष्ट इथेच पूर्ण होते). राजा म्हणाला, बघ दरवाजा उघडा असेल तर सूर्याचा प्रकाश घरात येईल, एवढी साधी गोष्ट तुला का कळत नाही. त्या माणसाने काही सांशक होऊन राजाकडे पहिले आणि विचारले, राजन सूर्याचा उन्हांसोबत धूळ माती पाऊस-पाणी, माश्या, डास व रात्रीच्या वेळी सर्प इत्यादी येतील त्याचे काय? राजा मंद हसला आणि म्हणाला त्याचाही बंदोबस्त करतो. त्याने मंत्रीला आदेश दिला गवंडी करून या परिवारासाठी व्यवस्थित घर बांधून द्या.
राजाच्या आदेशानुसार गवंडीने त्या परिवारासाठी घर बांधले. घरात शिरण्यासाठी एक मोठा दरवाजा, त्या शिवाय एक लोखंडी ग्रील असलेला एक जाळीचा दरवाजा हि. जेणे करून दिवस भर सूर्य प्रकाश व वारा घरात येत राहील. ग्रील सहित जाळीदार खिडक्या आणि काचेचे रोषनदान हि लावेले जेणेकरून धुळीची आंधी आल्यावर दरवाजे खिडक्या बंद केल्या तरी रोषनदान मधून प्रकाश येत राहणार. खिडक्या दरवाजांना जाळी असल्यामुळे रोगराई पसरविणार्या माश्या, डास इत्यादी घरात शिरू शकत नव्हते. रात्री दरवाजा बंद केल्यावर हिंसक पशु, विषाक्त सर्प इत्यादी घरात प्रवेश करु शकत नव्हते. तो परिवार आनंदाने त्या घरात राहू लागला.
इथे घर म्हणजे माणूस. सूर्याचा उजेड म्हणजे ज्ञान. राजा म्हणजे गुरु. ज्ञानवान गुरु भेटल्यावर ज्ञानरुपी सूर्याचा प्रकाश घरात येतो. धूळ माती म्हणजे वाईट विचार. वाईट विचारांना दूर ठेवण्यासाठी दरवाजे खिडक्या बंद कराव्या लागतात. खिडक्या व दरवाज्याला लागलेली जाळी रोगराई पसरविणार्या किड्यांना घरात येऊ देत नाही. विषाक्त सर्प हि घरात शिरू शकत नाही. हे सर्व किडे दुष्ट विचारांचे प्रतिक आहेत. मनात दुष्ट विचार आल्यावरच माणूस दुसर्यांना त्रास देतो, मारहाण करतो. या विचारांच्या जास्त आहारी गेल्यावर माणूस दुसर्यांचा खून हि करतो.
हृदयाचे कपाट मोकळे ठेऊन ज्ञानाचा प्रकाश आत येऊ द्या. पण वाईट व दुष्ट विचारांना हृदयात स्थान देऊ नका. बहुधा हाच या कथेचा सार आहे.
प्रतिक्रिया
18 Jul 2018 - 10:51 am | श्वेता२४
.
19 Jul 2018 - 9:44 am | ज्योति अळवणी
आवडली