८६ वर्षांचं तारुण्य हरपलं!

Primary tabs

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जनातलं, मनातलं
8 Jul 2018 - 7:59 pm

आदरणीय सर –

कोणी म्हणेल की आता तर सर गेले मग आता त्यांना पत्र लिहून कसं चालेल? पण आमच्यासाठी तुम्ही गेला नाहीत सर. आपल्या धडाडीने कर्तृत्व गाजविणाऱ्या असामान्य लोकांच्या बाबतीत लौकीकार्थाची फुटपट्टी लावायचीच नसते. स्वतःच्या मृत्यूने नाहीशी होतात ती सामान्य माणसं. तुमच्यासारखी माणसं तर हयातीत आणि मरणानंतर लोकांच्या हृदयात विराजमान असतात. अशी माणसं कधी मरत नाहीत.

सॅटर्डे क्लबच्या संस्थापकाला शनिवारीच आपल्या जवळ बोलावून साक्षात मृत्यूनेच तुम्हाला मानवंदना दिली सर.

काहीच दिवसांपूर्वी तुम्हाला पहिल्यांदाच (आणि शेवटचंच) भेटायला तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो. ८६ वर्षांचा तरुण मनुष्य माझ्यापुढे कामात गढलेला होता. आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला, आपण चेक वर सही करायला उपलब्ध नसल्यामुळे, या महिन्यात थोडा उशीर झाला अशी रुखरुख तुमच्या मनात त्यावेळी होती ती तुम्ही मला बोलून दाखविलीत. मी मनात म्हटलं, ‘सर या वयात कसला हा दुनियादारीचा विचार करताय? शांतपणे घरात सोफ्यावर बसून राहायचं तुमचं वय.’ पण पहिलीच भेट होती म्हणून इतक्या स्पष्टपणे सांगू नाही शकलो.

पण वस्तुस्थिती ही होती की तुमच्या या दुनियादारीमुळेच १७०० च्या वर महाराष्ट्रातल्या उद्योजकांना घरपण मिळालं होतं. आज आम्ही पोरके झालो सर. जरी तुम्ही आमच्या हृदयात असलात तरी आमच्यासारख्या सामान्यांना आधार देणारा हाडामासाचा माणूस आम्हाला जवळ लागतो सर. तो कुठून आणायचा आता?

श्रीमंती ही कमवायची गोष्ट नसून वाटायची गोष्ट आहे हे तुम्ही आम्हाला शिकवलंत. पुढच्या ५ वर्षांची स्वप्नं तुम्ही बघत होतात आणि त्याचं प्लानिंग तुमच्या डोक्यात चालू होतं. (बाय द वे सर मला वयाच्या चाळीशीत सुद्धा अजूनही पुढच्या सहा महिन्यांनंतरचं प्लानिंग देखील जमत नाही!). पण त्यावेळी नियतीचं वेगळंच प्लानिंग सुरु होतं. तिच्या त्या अलिखित प्लानिंग पुढे आपलं लिहिलेलं प्लानिंग नेहमीच तोकडं पडतं सर.

आमच्या वाशी चॅप्टर मध्ये गेल्या महिन्यात तुम्ही आला होतात. आमचा देवच आमच्यासमोर आलाय असं आम्हाला वाटत होतं. आपल्या सॅटर्डे क्लबमध्ये वन-टू-वन भेटायचा प्रघात आहे. तुमच्याबरोबर वन-टू-वन करायचा नंतर थोडेच दिवसांनी योग आला. योग आला म्हणण्यापेक्षा, तुम्हीच तो योग आणलात मला तुमच्या ऑफिस मध्ये यायला सांगून. इतक्या मोठ्या व्यक्तीला पहिल्यांदाच एकटा भेटायला जात होतो. त्यामुळे थोडसं बुजल्यासारखं झालं होतं. पण माझं हे अवघडलेपण तुमच्या केबिनमध्ये पाऊल टाकताक्षणी कुठच्याकुठे पळून गेलं. प्रसन्न चेहरा आणि बोलण्यातला आपलेपणा यातून तुम्ही फक्त पैशानेच नाही तर मनाने देखील श्रीमंत आहात हे त्याचवेळी मी जाणलं आणि मग कित्येक वर्षांपासून आपले ऋणानुबंध आहेत अशा थाटात आपण गप्पा मारल्या.

तुमचं आवडीचं वाक्य मला तेव्हा दाखवलंत. People become miserable because they build walls instead of bridges. तुम्ही तर इंजिनीअर होऊन खरेखुरे bridges तर बांधलेतच पण १७०० हून अधिक उद्योजकांना जोडणारा सॅटर्डे क्लब नावाचा एक अनोखा ब्रिज बांधलात आणि त्या ब्रिजवर आम्ही सगळेच स्वार झालो. तुमच्या इंजिनीअरींगच्या शास्त्रानुसार प्रत्येक ब्रिजची वजन पेलण्याची एक क्षमता असते. पण तुमच्या सॅटर्डे क्लब या ब्रिजला मात्र क्षमतेचं बंधन नाही. कितीही माणसं लीलया पेलू शकणारा हा ब्रिज बांधून अभियांत्रिकी शास्त्रातला चमत्कार तुम्ही घडवलात आणि आमचे माधवराव भिडे, जनमानसातले ‘सेतु’माधवराव भिडे झाले.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तुमच्याही मागे तुमची पत्नी होती अन् तुमचं इतर कुटुंबही. इतरांना श्रीमंत करण्याचं तुमचं वेड बघून, ‘तुम्हाला काय करायच्यात नसत्या भानगडी?’ असं त्यांनी तुम्हाला कसं नाही म्हटलं याचं राहून राहून आश्चर्य वाटतं आणि यावरून, आम्हाला श्रीमंत करण्याचं काम सर फक्त तुम्हीच नाही तर तुमच्या सगळ्या कुटुंबानेच केलं याची माझी खात्री पटली.

आयुष्यातली खरी मजा ही इतरांना श्रीमंत होताना बघण्यात असते हे तुमचं वाक्य त्या दिवशी मी ऐकलं आणि खरं सांगतो सर अंग शहारलं. इतक्या उत्तुंग विचारांचा मनुष्य ही कालौघात आपोआप घडणारी गोष्ट नसते. मुद्दाम त्या विधात्याने घडवून आणलेली गोष्ट असते ही. आम्हाला परीस मिळाला आणि आमच्यातल्या लोखंडाचं सोनं झालं. Show must go on असं म्हणायचात ना तुम्ही. मग आम्ही तेच करू. आता आम्ही परीस होऊ आणि तुमचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करू.

तुम्ही आता फक्त एकच करा आमच्यासाठी सर. हो माझी खात्री पटल्ये की तुम्ही आमच्यासाठी काहीही करू शकता. या जन्मात आम्हाला श्रीमंत व्हायला शिकवलंत. पुढच्या जन्मात आम्हाला अमर व्हायला शिकवा आणि तसं होण्याचा पहिला मान तुम्हीच घ्या. म्हणजे आमच्यातून तुम्ही कधीच जाणार नाही...

- तुमच्याच सॅटर्डे क्लब ब्रिजवरचा एक महाराष्ट्रीय उद्योजक

व्यक्तिचित्रणसद्भावना

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

9 Jul 2018 - 8:54 am | ज्योति अळवणी

ऐकलं आहे या सॅर्डे क्लब बद्दल

सुबोध खरे's picture

9 Jul 2018 - 10:25 am | सुबोध खरे

अरेरे
अतिशय वाईट झालं.
माधवरावांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मराठी माणसाने चाकोरीबद्ध नोकरीचा नाद सोडून उद्योजक आणि श्रीमंत व्हावे म्हणून अक्षरशः रक्ताचे पाणी करणारा "परिस" माणूस.
__/\__

शलभ's picture

9 Jul 2018 - 12:14 pm | शलभ

आदरांजली _/\_

नाखु's picture

9 Jul 2018 - 2:04 pm | नाखु

श्रद्धांजली

७-८ वर्षे पूर्वी लेख वाचला होता, आणखी भिडे सरांच्या बद्दल वाचायला आवडेल

नितवाचक नाखु