सुखाचं मृगजळ

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जनातलं, मनातलं
27 Jun 2018 - 11:54 am

काही दिवसांपूर्वी एका मित्राची भेट झाली. थोडासा दुःखी वाटत होता. मी विचारलं काय झालं? तर म्हणाला बायकोशी पटत नाही. मी परत विचारलं, अरे हे काय अचानक? तर म्हणाला अचानक वगैरे काही नाही. तसं लग्न झाल्यापासूनच आमचं बऱ्याच गोष्टींवर पटत नाहीये. पण आता जरा त्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे. त्याला म्हटलं अरे एकदा का कळलं ज्या गोष्टींवर पटत नाही की मग त्या गोष्टी उगाळा कशाला? ज्या गोष्टींवर तुमचं पटतं तेच बोलत जा ना तिच्याशी. तर मला म्हणाला ‘अरे तुला काय माहित आमचं कुठल्या गोष्टींवर पटतं ते. जगात अण्वस्त्र स्पर्धा होता कामा नये, भारताचे शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध असायला हवेत, प्रदूषणाचा भस्मासूर रोखला गेला पाहिजे, पुढच्या ऑलिम्पिक मध्ये भारताला भरपूर पदके मिळाली पाहिजेत अशा फक्त जागतिक गोष्टींवर आमचं पटतं. आता अशा गोष्टी रोज तरी किती बोलणार रे तिच्याशी?’

त्यानंतर काही दिवसांनी दुसरा एक ओळखीचा मुलगा दिसला. तोही दुःखी दिसला. (का कुणास ठाऊक पण हल्ली सुखी माणसं भेटण्याचं प्रमाण जरा कमी झालंय). त्याला विचारलं काय झालं? तर म्हणाला ‘घरात जरा चिंतेचं वातावरण आहे. माझं लग्न जमत नाही आहे.’ असं वाटलं की वर उल्लेख केलेल्या माझ्या मित्राशी याची ओळख करून द्यावी. म्हणजे दोघांपैकी एकाला तरी नक्की पटेल तो सुखी आहे ते.

नवरा-बायको मध्ये परफेक्ट ट्युनिंग असणं हे आपण लहानपणी ‘सिंदबादच्या सात सफरी’ या ज्या अद्भुत गोष्टी वाचलेल्या आहेत त्यात घालण्यासारखी ही कल्पना आहे. पण काही जोडपी असतात बुआ अशी. अगदी जन्मोजन्मीचे नवरा-बायको असल्यासारखे. कशातच मतभेद होत नाहीत. बायको म्हणाली, आज आपण माझ्या माहेरी जाऊया की नवरा म्हणतो, कमाल आहे मी देखील तेच सांगणार होतो. नवरा म्हणाला, चल आज घरी कॅराओके घेऊन येऊ की बायको म्हणते, अय्या मी तेच म्हणणार होते. निव्वळ अद्भुत! बरं असंही काही नाही की फक्त पटणाऱ्या जोडप्यांच्या पत्रिका जुळलेल्या असतात आणि न पटणाऱ्यांच्या जुळलेल्या नसतात. मी असंही बघितलंय की अगदी लहानपणापासून मित्र म्हणून जबरदस्त ट्युनिंग जमलेल्या मुला-मुलीची पत्रिका जुळत नाही आणि म्हणून त्यांचं आपापसात लग्न होत नाही आणि नंतर पत्रिका जुळलेल्या माणसाबरोबर लग्न झाल्यावर नवरा-बायकोत वितंडवाद सुरु! झाली की नाही सिंदबादच्या सात सफरींची आठवण?

असं म्हणतात की सुखी संसारासाठी तडजोड ही अत्यंत आवश्यक असते. आता ही काय नवीन भानगड? ‘उत्तर-कोरिया आणि अमेरिका यांच्यात युद्ध होऊ नये या एकाच गोष्टीवर पती-पत्नी चं एकमत होत असेल तर मग मन मारून तडजोड म्हणून रोज त्याच विषयावर बोलत बसायचं का दोघांनी? नवऱ्याला जुनी हिंदी गाणी आवडतात आणि बायकोला हल्लीची. मग बायकोने आजपासून खय्याम आणि नौशाद आदींची गाणी वाजवायला सुरुवात करायची का? बायकोला मॉडर्न ड्रेस घालायला आवडतात आणि नवरा पारंपारिक विचारांचा. चला तर मग उद्यापासून फक्त पैठणी! असं होत नसतं राव... बोलायला ठीक आहे जोश्या तुझं....’ वरचा माझा पहिला मित्र मला पोटतिडकीने सांगत होता. त्या दोघांमध्ये तडजोड घडवताना आमच्या दोघांची मैत्री तुटणार की काय अशी भीती मला वाटायला लागली आणि मग, हल्ली काय मुसळधार पाऊस पडतोय ना असं म्हणून मी विषय बदलायचा केविलवाणा प्रयत्न केला. ‘हो पाऊस पडतोय रे, पण मग घरी बसून गरमागरम भजी करायचं सोडून आमच्या हिला बाहेर जाऊन भिजावंसं वाटतं, काय म्हणशील यावर तू?’ इति माझा मित्र. हरिदासाची कथा मूळ पदावर आली होती. आता यावर, अरे मग जायचंस ना तू पण बाहेर तिच्याबरोबर फिरायला असं जर मी त्यावेळी त्याला सांगितलं असतं तर भजीच्या ऐवजी त्याने मलाच तळून खाल्लं असतं. गप्प बसलो. बरं त्याच्या बायकोला जर सांगितलं असतं, ‘अहो वहिनी द्यायची भजी करून नवरा एवढं म्हणतोय तर’ की मग पुढचं वाक्य आलं असतं, ‘हो तुम्हा नवऱ्यांचं काय जातंय म्हणायला..दिवसभर राब राब राबत असतो आम्ही बायका...’ उगाच मला त्यांचं घर बंद झालं असतं.

देवाने सजीव सृष्टी बनविली आणि त्याचबरोबर माया निर्माण झाली. आणि नेमका तिथेच घोटाळा झाला बघा. तुझं-माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना हे मायेमुळेच व्हायला लागलं. रामदास स्वामी शुभमंगल ऐकताक्षणी मंडपातून निघून गेले. ‘आयला मी पण असंच करायला हवं होतं.’ मित्राची वाणी सुसाट वेगाने पुढे जात होती. ‘अरे पण बायकोच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून काही त्यांनी मंडप सोडला नाही. समाजोद्धाराचं फार मोठं काम करायचं होतं त्यांना. तुला तुझी नोकरी टिकवताना नाकी नऊ येतायत. तू काय मंडप सोडणार?’ अगदी माझ्या ओठांवर आलं होतं सांगणं पण आवरलं स्वतःला. जीवाची भीती असते अहो प्रत्येकाला.

‘जोश्या तुला सांगतो हे सुख म्हणजे ना नुसतं मृगजळ आहे बघ.’ माझा मित्र आता तत्वज्ञानी झाला होता. दारू प्यायलेल्या आणि बायकोशी पटत नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या माणसांच्या मुखातून फार महत्वाचं असं तत्वज्ञान नेहमी बाहेर पडत असतं. अशा वेळी त्या माणसाला थांबवायचं नसतं. मी देखील त्याला अधिक चकणा पुरवावा अशा थाटात म्हटलं, ‘अरे अगदीच असं काही नसतं रे. आयुष्य हा एक प्रवास असतो. त्यात कधी मृगजळ दिसतं मान्य आहे. पण कधी हिरवळ सुद्धा दिसते.’ हे ऐकताक्षणी त्या हिरवळीत वणवा पेटावा अशागत माझा मित्र पेटून उठला. ‘जोश्या उंटावरून शेळ्या हाकू नकोस. तुझं बरं आहे. समंजस बायको मिळाली तुला. आमच्या हिच्यासारखी मिळाली असती ना म्हणजे कळलं असतं तुला.’ म्हणजे माझ्या आणि माझ्या पत्नी मध्ये विसंवाद नाही याचं काडीचही श्रेय मला नसून माझ्या अर्धांगिनीच्या समंजसपणाला आहे हे दाखवून माझं उडत असलेलं विमान जमिनीवर आणण्यात माझा मित्र यशस्वी झाला होता. बरं त्याचं म्हणणं खोडून काढण्यासाठी, ‘बरं ठीक आहे, थोडे दिवस तुझ्या बायकोबरोबर मी दिवस काढून दाखवतो असं म्हणण्याची सोय नव्हती.’ खिंडीत गाठलं होतं मला त्याने.

‘तुला सांगतो जोश्या, इस जजबातो के वजह से जिंदगी बरबाद झाली बघ.’ आता हा शायरी करायला सुरुवात करणार की काय अशी मला भीती वाटायला लागली. ‘आपल्यापेक्षा रोबो परवडले. चुपचाप आपापली कामं करत असतात. बिलकुल इमोशन्स नाहीत.’ शायरी टळली याचा आनंद मी चेहऱ्यावरून लपवू शकलो नाही. पण त्याचा रोबो शब्द ऐकला आणि माझ्या डोक्यात एक कल्पना चमकली. त्याला म्हटलं, ‘अरे मग तुम्ही दोघं थोडे दिवस रोबो का होऊन बघत नाही?’ इतक्या वेळानंतर, मी प्यायलोय की काय अशी शंका मला त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागली. खुलासा करावा म्हणून मी म्हटलं, ‘अरे म्हणजे असं आहे की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता अशा थाटात तुम्ही दोघं वागा. आपापली कामं करत राहायचं. गुंतवून टाकायचं स्वतःला आपल्या कामात. आपला जोडीदार आणि आपण एक रोबो आहोत आणि त्यामुळे सुख आणि दुःखाच्या पलीकडे आपण गेलो आहोत असं मेकॅनिकली वागून बघायचं. सगळी दुःख अपेक्षाभंगांमुळे होतात. मग मूळ ठिकाणीच कुऱ्हाड चालवायची. अपेक्षाच ठेवायच्या नाहीत. रोबो ठेवतो का? बरं स्वतःला रोबो म्हणणं विचित्र वाटत असेल तर पेईंगगेस्ट म्हणाला स्वतःला. एखाद्या लँडलॅार्ड च्या घरात जेव्हा दोघं पेईंगगेस्ट राहतात तेव्हा एकमेकांबद्दल काही भावनिक अपेक्षा असतात का? म्हणून बघ नवरा-बायको मध्ये भांडणं होतात. पण दोन पेईंगगेस्ट मध्ये भांडणं झाल्याचं फारसं ऐकायला येत नाही. कामाव्यतिरिक्त गुंतवून घ्यायचं नाही. हे विश्व म्हणजे परमेश्वर या लँडलॅार्डचं घर आहे आणि नवरा बायको हे त्यातले पेईंगगेस्ट आहेत.’ मित्राचा संसार सुरळीत करण्याच्या भानगडीत मी मात्र पुरता तत्ववेत्ता झालो होतो.

सुट्टीचा दिवस होता आणि खूप उशीर झाला होता. अजून थांबलो असतो तर माझ्याच घरी पेईंगगेस्ट म्हणून राहायला लागलं असतं मला बायकोच्या रागाने. मित्राला म्हटलं चल पुन्हा भेटू. पण माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर कसलीतरी चमक दिसत होती. असं वाटत होतं की युरेका युरेका असं त्याचं मन ओरडत होतं. म्हणाला, ‘जोश्या लय भारी आयडिया दिलीस बघ! आजपासून असंच करून बघतो आम्ही दोघं. जर प्रॉब्लेम सुटला तर पार्टी.’
हसत हसत आम्ही निघालो. मनात निश्चय केला थोडे दिवसांनी पुन्हा माझ्या रोबो-मित्राला भेटायचा...

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

शाली's picture

27 Jun 2018 - 12:31 pm | शाली

वा! मस्तच लिहिलं आहे एकदम. मजा आली वाचायला.

Nitin Palkar's picture

27 Jun 2018 - 3:17 pm | Nitin Palkar

रंजक. आयडीयाचं फलित वाचायला उत्सुक आहे.

जयन्त बा शिम्पि's picture

28 Jun 2018 - 2:32 pm | जयन्त बा शिम्पि

छान लेख ! प्रसंग ही चांगले निवडले.तरुणपणी आमचेही असे बरेच खटके उडत असत, पण वय वाढत गेले तसे शहाणपण येत गेले आणि आता खटके बर्‍याच प्रमाणात कमी झालेत. ( पुर्णपणे थांबले असा दावा करण्याची हिम्मत मात्र नाही ) पुलेशु !!