औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ५ अंतिम

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
14 Jun 2018 - 7:48 pm

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: २
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ४

दोन मोठे शास्त्रज्ञ पदुआ विद्यापीठाशी निगडित होते. पहिला निकोलाय कोपर्निकस आणि दुसरा गॅलीलीओ. आणखी एक तेवढाच महत्त्वाचा पण पाश्चात्य वैद्यकीय क्षेत्र वगळता फारसा कोणाला ठाऊक नसलेला शास्त्रज्ञ पदुआशी निगडित आहे. तो आहे आन्द्रिअस वेसालिअस (१५१४-१५६४). खरे तर गॅलीलीओ वेसालिअसनंतर होऊन गेला. गॅलेनच्या वैद्यकाला बाजूला ठेवणारा हा पहिला क्रांतिकारक वैद्यकशास्त्री होता. १५४३ साली पदुआ विद्यापीठातून दोन क्रांतिकारक विचार मानवजातीला मिळाले. पहिला विचार होता वयाच्या ७०व्या वर्षी कोपर्निकसने माडलेला सूर्यकेंद्री विश्वाचा. दुसरा क्रांतिकारक विचार होता वेसालिअसचा. १५४३ साली वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी वेसालिअसने ‘द ह्यूमानी कॉर्पोरीस फाब्रिका’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. आधुनिक शरीररचनाशास्त्राचा संस्थापक असा सन्मान्य उल्लेख आज याच्याबद्दल केला जातो ते योग्यच आहे.

श्रीयुत ऍन्डर्स व्हॅन वेसेल आणि श्रीमती इसाबेल क्रॅब या दांपत्याने ३१ डिसेंबर १५१४ रोजी आन्द्रीसला ब्रसेल्स इथे जन्म दिला. आन्द्रीस वेसेल या नावाचेच आन्द्रीअस वेसालीअस हे लॅटीन रूप आहे. नावाचे लॅटीनीकरण करण्याची तेव्हा युरोपातल्या प्रतिष्ठितात फॅशनच होती. असो. तेव्हा ब्रसेल्स हे नेदरलॅन्डसच्या हॅसबर्ग या प्रांताचा भाग होते. आन्द्रीसचे पणजोबा यान व्हॅन वेसेल हे बहुधा वेसेल या गांवचे होते. त्यांनी पाव्हिआ विद्यापीठातून सन १५२८ मध्ये वैद्यकाची पदवी घेतली होती आणि ते ब्रसेल्सच्या ल्यूवेन विद्यापीठात वैद्यक शिकवीत असत तर आजोबा एव्हरार्ड वॅन वेसेल हे सम्राट मॅक्सीमिलीअन यांचे सेवक आणि राजवैद्य होते. आन्द्रीसचे वडील ऍन्डर्स व्हॅन वेसेल हे सम्राट मॅक्सीमिलीअन यांना औषधे बनवून विकण्याचा व्यवसाय करीत. म्हणजे ते सम्राटांचे अधिकृत फार्मासिस्ट आणि औषध पुरवठादार होते. नंतर आन्द्रीसचे वडील ऍन्डर्स हे नंतरचे सम्राट चार्ल्स ५ यांचे ‘व्हाले द चेंबर’ - Valet de chambre होते. आपल्या घराण्याची वैद्यकीय परंपरा चालू ठेवण्यासाठी ऍन्डर्स यांनी आपल्या मुलाला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन दिले आणि त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे लॅटीन आणि ग्रीक या दोन भाषा शिकण्यासाठी ब्रसेल्सच्या ‘ब्रद्रन ऑफ कॉमन लाईफ’ मध्ये आन्द्रीसचे नाव दाखल केले.

आन्द्रीस सन १५२८ मध्ये ल्यूवेन विद्यापीठात आर्ट्स शिकण्यासाठी गेला खरा पण सन १९३२ मध्ये त्याचे वडील ऍन्डर्स हे व्हाले द चेंबर झाले. व्हाले द चेंबर म्हण्जे स्म्राटांचे स्वीय सचिव - राजदरबारातील खास सेवक. हरकाम्यापासून उच्चशिक्षित तांत्रिक वा तात्विक सल्लागारापर्यंत वेगवेगळ्या दर्जाच्या विशिष्ट सेवा देणारी ही ‘व्हाले द चेंबर’ पदे होती. वेतनासह पद मिळाले तरी कार्यभार मिळेपर्यंत वाट पाहावी लागे. विश्वास संपादन केल्यानंतरच कार्यभार मिळे. तोपर्यंत वेतन असले तरी उमेदवारीच. कार्यभार मिळाल्यानंतर मंत्रालयातील सचिवासारखे हे पद असावे. सेवा कोणतीही असली तरी वेतन मात्र भरघोस असे. शिवाय सम्राटांच्या निकटवर्तीय म्हणून प्रतिष्ठा असे ती वेगळीच. असो. आन्द्रे वेसालिअसचे बाबा औषधी व्यवसायातले होते म्हणजे ‘रॉयल फार्मासिस्ट’सारखी सेवा देणारे त्यांचे हे पद असावे. या परिच्छेदातले हे सारे उपलब्ध माहितीवरून केलेले माझे तर्क.

असो. मग पॅरीसमध्ये जाऊन लष्करी शिक्षण घ्यायचे वेसालिअसने ठरवले. सन १५३३ मध्ये तो तिथे परत गेला. इथे त्याने जेकबस सिल्वीअस आणि ज्यॉं फर्नेल यांच्याकडून गॅलेनच्या वैद्यकाचे धडे घेतले. याच काळात त्याच्या मनात शरीररचनाशास्त्रात स्वारस्य निर्माण झाले. या काळात तो अनेकदा सिमेटरी ऑफ इनोसन्ट्स मध्ये दफन केलेया प्रेतांची हाडे उकरतांना दिसे.

परंतु रोम आणि पॅरीस यांमधले वितुष्ट वाढत गेल्यामुळे त्याला पॅरीसमधून गाशा गुंडाळावा लागला आणि तो ल्यूवेनला गेला. योहान विन्टर व्हॉन ऍन्डरनॅक याच्या मार्गदर्शनाखाली मग त्याने पुढच्या वर्षी पदवी मिळवली. Paraphrasis in nonum librum Rhazae medici arabis clariss. ad regem Almansorum de affectuum singularum corporis partium curatione अशा लांबलचक नावाचा त्याचा प्रबंध. अल राझी या प्रख्यात अरबी वैद्यकविशारदाच्या नवव्या ग्रंथाचा हा आढावा होता. वेसालिअस ल्यूवेनमध्ये अल्पकाळच राहिला. प्राध्यापकांशी त्याचे वाजल्यामुळे त्याला जावे लागले. सन १५३६ मध्ये व्हेनीसमध्ये स्थिरावल्यावर तो पदुआ विद्यपीठात वैद्यक शिकायला गेला. सन १५३७ मध्ये त्याला वैद्यकातली पदवी मिळाली.

ज्या दिवशी वैद्यकाची पदवी मिळाली त्याच दिवशी त्याला पदुआमधून शस्त्रक्रियातज्ञ आणि शरीररचनाशास्त्री म्हणून सेवा करण्याचा देकार मिळाला आणि मोठी संधी प्राप्त झाली. इटली पार करून वेसालिअस मग पोप पॉल ४ आणि इग्नेशिअस लोयोला यांना कुष्ठरोग्यांना बरे करण्यात हातभार लावायला गेला. व्हेनीसमध्ये त्याला टायटीअनचा विद्यार्थी असलेल्या योहान व्हॅन कल्कर Johan van Calcar भेटला. या व्हॅन कल्करच्या साथीने त्याने शरीररचनाशास्त्राच्या विद्यार्थ्यांना समजावे म्हणून वेसालिअसने लाकूड कोरून भलीमोठ्ठी अशी सहा चित्रे बनवून घेतली. या चित्रांची नक्कल करून घेतली जाते आहे असे आढळून येताच त्याने ती सहाही चित्रे सन १५३८ साली Tabulae anatomicae sex या नावाने प्रसिद्ध केली. वेसालिअसचे वय वर्षे केवळ २४. त्यामागोमाग सन १५३९ साली ग्विन्टर्स ऍनटोमिकल हॅन्डबुक - इन्स्टीट्यूशनेस ऍनेटॉमिसाए या शरीररचनाशास्त्रावरच्या पुस्तिकेची सुधारित आवृत्ती देखील प्रसिद्ध केली.

त्यापूर्वी हे मुद्दे अभिजात पाठ्यपुस्तके खासकरून गॅलेनची वाचून त्यानंतर मानवेतर प्राण्याचे शरीरविच्छेदन करूनच शिकवले जात. ही विच्छेद्ने अधिव्याख्यात्याच्या मार्गदर्शनानुसार केशकर्तन कलाकारांकडून केली जात. हे सारे करतांना गॅलेनचे दावे खरे आहेत की नाही हे तपासून पाहिले जात नसे. कारण गॅलेनबद्दल काही संशय दाखवणे हे वर्ज्य, नव्हे नव्हे, महापातक समजले जात होते. वेसालिअसने या विच्छेदनाकडे विषय शिकवण्याचे एक प्राथमिक साधन म्हणूनच पाहिले. विच्छेदन वेसालिअस स्वतः करीत असे आणि विद्यार्थ्यांना देखील स्वतःच विच्छेदन करावे म्हणून आवाहन करीत असे. फक्त स्वतः विच्छेदन करून केलेले निरीक्षण हेच खरे आणि विश्वासार्ह मानले. मध्ययुगीन प्रथेला हा भलामोठा धक्का होता त्यामुळे मानवी शरीराच्या विच्छेदनावर बंदी आली.

सन १५३९ साली वेसालिअसने नीलाविच्छेदित रक्तमोचनावर एक पत्रक प्रसिद्ध केले - Venesection letter on bloodletting. काही रोगासाठी रक्तमोचन ही उपाययोजना लोकप्रिय होती. परंतु कुठे छेद घेऊन रक्त काढायचे यावर मतमतांतरे होती. अभिजात ग्रीक वैद्यकाप्रमाणे गॅलेनपुरस्कृत पद्धतीने रोगस्थळाच्या जवळच्या भागातून रक्तमोचन करीत. परंतु मुस्लिम पद्धतीप्रमाणे मध्ययुगीन रीत होती रोगस्थळापासून दूरच्या स्थानातून थोडेसे रक्त काढण्याची. वेसालिअसची पत्रिका सहसा गॅलेनमार्गाचा अवलंब करी खरा, परंतु योग्य असेल तिथे वेसालिअस गॅलेनचे जू मानेवरून बाजूला ठेवून देई.

सन १५४१ सली बोलोना Bologna इथे वेसालिअसने जाहीर केले की गॅलेनचे जे काही संशोधन आहे ते फक्त मानवेतर प्राण्यापर्यंतच सीमित ठेवावे कारण गॅलेनकालीन रोममध्ये विच्छेदनावर बंदी होती. गॅलेन बर्बर मकाक या जातीच्या माकडांच्या विच्छेदनावर विसंबून होता कारण गॅलेनच्या मताप्रमाणे त्यांची शरीररचना मानवाच्या शरीररचनेच्या अगदी जवळ जाणारी होती. अगदी उपलब्ध असलेल्या शरीररचनाशास्त्रीय ऐवज असूनही गॅलेनने खूप चुका केलेल्या होत्या. गॅलेन हा अर्हताप्राप्त सक्षम परीक्षक होता परंतु त्याचे संशोधन तत्वचिंतनातून सांगितले गेल्यामुळे कमकुवत झाले होते. कारण त्याच्याजवळची माहिती ही विज्ञानाधिष्ठित नसून धर्माधिष्ठित होती. सैद्धान्तिक ज्ञान हे प्रयोगांचा पाया जरूर असावे पण गृहीतके प्रयोगातून तपासली जाऊन सिद्ध होण्याआधी प्रयोगांवर जर स्वार झाली तर हे असे होते. अंधश्रद्धा आणि विज्ञान यातला हा मूलभूत फरक आहे. काही वंदनीय लोकप्रिय शास्त्रात प्रयोगच नाहीत तसेच कारण - परिणाम यांचे नातेही सिद्ध केलेले नाही. पूर्वसूरींनी म्हणटलेले प्रमाण आणि मी म्हणतो तेही प्रमाणच.

गॅलेनच्या संपादित संशोधनप्रबंधाच्या नव्या Giunta edition या आवृत्तीत वेसालिअसने मोलाची भर घातली. स्वतःच्या निरीक्षणांवर आधारित असा स्वतःचा मजकूर त्याने त्यात घालण्यास सुरुवात केली. गॅलेनने मानवाऐवजी इतर प्राणी वापरले आहेत हे वेसालिअसने नोंदवीपर्यंत ते कुणाच्या ध्यानातही आले नाही. काही लोकांनी मात्र गॅलेनची ही चूक दाखवल्याबद्दल वेसालिअसवर दात धरला. गॅलेनला चूक ठरवतो म्हणजे काय! महापातकी माणूस कुठला!!

या काळात युरोपात झालेली शवविच्छेदने ही जुने सिद्धान्त न तपासता, जुन्या संकल्पनातील दोष दूर करून नवा विचार न मांडता सरकारी कामकाजासारखी वा पूजापाठासारखी यांत्रिकपणे मम म्हटल्यासारखी चालत. गॅलेनची तत्त्वे शिरोधार्थ मानून त्या तत्वांना आधारित असे निष्कर्ष काढावे लागत. नाहीतर विच्छेदन करणारा विद्यार्थी वा डॉक्टर नव्हे तर शव नापास. म्हणजे मृत व्यक्ती पापी किंवा सैतानाचा अंश असलेले.

हृदयाच्या डाव्या कर्णिकेतले शुद्ध रक्त धमन्यातून मेंदू, फुफ्फुसे इत्यादी उच्च अवयवांकडे जाते आणि उजव्या कर्णिकेमधले अशुद्ध रक्त नीलांमधून जठरासारख्या नीच अवयवांकडे जाते असे गॅलेनचे म्हणणॆ होते. या सिद्धान्त्याच्या पुष्ट्यर्थ कर्णिकांअधून रक्त बाहेर यायला काहीतरी मार्ग दिसायला पाहिजे. गॅलेनच्या म्हणण्याप्रमाणे हा मार्ग त्याला सापडला होता. कळस म्हणजे जवळजवळ सोळाशे वर्षे कर्णिकेतली ही मार्गछिद्रे सापडत नाहीत असे वेसालिअसने जाहीर करीपर्यंत गॅलेनच्या पाठिराख्या संशोधक विच्छेदकांना सापडत होती. वेसालिअसने निदान गॅलेनच्या रक्ताच्या वितरणाबद्दल वाद उकरायची जोखीम मात्र उचलली नाही. कारण त्याला पर्यायी उपपत्ती देता आली नाही. म्हणून मग कर्णिकांमधील अखंड पडद्यांमधून ते पाझरून जात असावे असा निष्कर्ष काढला.

गॅलेनचा आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष वेसालिअसने खोडून काढला तो म्हणजे खालच्या जबड्याला दोन हाडे असतात हा. कारण गॅलेन विच्छेदनासाठी मानवेतर प्राण्यांवर अवलंबून होता. त्याचप्रमाणे मेंदूच्या मुळाशी असलेले मेंढ्या आणि गुरांना असणारे रक्तवाहिन्यांचे जाळे माणसाला नसते हा गॅलेनचा निष्कर्ष देखील चुकीचाच निघाला.

माकडाच्या छातीच्या हाडात सहा तुकडे वा भाग जोडलेले असतात म्हणून माणसाच्याही छातीत सहा हाडे असतात असे गॅलेनचे मत. वेसालिअसने तीनच हाडे असतात असे विच्छेदनान्ती दाखवून दिले. पुरुषांना स्त्रियांपेक्षा एक बरगडी कमी असते हे गॅलेनचे मत चुकीचे असल्याचे वेसालिअसने दाखवून दिले. आणखी अनेक शरीरांतर्गत अवयवांबाबत वेसालीअसने गॅलेनच्या चुका दुरुस्त केलेल्या आहेत. त्याची जंत्री नीरस आणि कंटाळवाणी होईल. तेव्हा पुढे जाऊयात.

सन १५४३ मध्ये स्विट्झर्लंडमधील बेझेल इथला कुख्यात गुन्हेगार जेकब केरर व्हॉन गेबवेईलर याच्या शवाचे वेसालिअसने जाहीर विच्छेदन केले. एकेका हाडाचे नाव सांगून ती हाडॆ त्याने एकमेकांना सांगाड्यात जोडूनही दाखवली आणि शेवटी तो सांगाडा बेझेल विद्यापीठाला देणगी म्हणून देऊनही टाकला. वेसालिअसची ही कलाकृती ‘बेझेल स्केलीटन’ म्हणून विख्यात आहे. जतन करून ठेवलेली वेसालिअसची ही एकमेव कलाकृती. जगातली ही नाश पावण्यापासून वाचलेली सर्वात जुनी शरीररचनाशास्त्रीय कलाकृती. बेझेलच्या शरीररचना वस्तुसंग्रहालयात आजही ही अफलातून कलाकृती प्रदर्शनासाठी मांडून ठेवलेली आहे. अट्टल गुन्हेगाराचे शव फाडल्याबद्दल वेसालिअसच्या पापपुण्याच्या खात्यात पुण्याची भर पडली असेल.

त्याच वर्षी वेसालीअसने बेझेलला मुक्काम ठोकण्यसाठी घर घेतले. सात खंड असलेला ‘द ह्यूमानी कॉर्पोरीस फाब्रिका’ प्रसिद्ध करण्यासाठी योहानेस ऑपोरीनसला लागली तर मदत करण्यासाठी. प्राचीन शृंखला तोडणारी मानवी शरीररचनाशास्त्रातली ही क्रांतिकारक कलाकृती त्याने स्पेन साम्राज्याचा आणि पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट चार्ल्स ५ याला समर्पित केलेली आहे. काही मानतात की यातील चित्रे ही टायटीअनचा विद्यार्थी यान स्टीफन व्हॅन कल्कर याने काढलेली आहेत. परंतु याला पुरावा मात्र नाही. शिवाय एवढ्या कमी काळात एका चित्रकाराला २७३ एवढ्या मोठ्या संख्येने चित्रे काढणे देखील कठीण दिसते. जवळजवळ याच काळात त्याने या पुस्तकाची विद्यार्थ्यांसाठी संक्षिप्त आवृत्ती काढली. आवृत्तीचे नाव आहे ‘आन्द्रिआ वेसालीई स्यूओरम दे ह्यूमानी कॉर्पोरीस फाब्रिका लिबोरम एपिटोम’. ही आवृत्ती वेसालिअसने स्पेनच्या सम्राटाचा सुपुत्र फिलिप २ याला समर्पित केली. या दोन्ही अफलातून ग्रंथाचा मिळून ‘वेसालीअसची फाब्रिका’ असा उल्लेख केला जातो. ‘फाब्रिका’ ने पूर्वापार चालत आलेल्या शृंखला तोडून वैद्यकीय विज्ञानात मोठे पाऊल टाकले असे मानतात. या ग्रंथामुळेच शरीररचनाशास्त्राची आज आधुनिक वर्णनपर विज्ञान a modern descriptive science अशी ओळख बनली आहे.

या आपल्या ग्रंथात त्याने हिपोक्रेटसचे निसर्गाच्या निरीक्षणाचे तत्त्व त्याने पुनरुज्जीवित केले तसेच नवा विचार देखील मांडला. ऍरिस्टॉटल आणि गॅलेन यांनी केवळ अंदाजाने मांडलेल्या गृहीतकांवरून आणि शाब्दिक कसरतींच्या त्त्वचिंतनातून मांडलेल्या चतुःस्राव उपपत्तीला त्याने तिलांजली दिली. आपण स्वतःच लिहिलेल्य पाच वर्षांपूर्वींच्या सहा चित्रांच्या पुस्तकातील गॅलेनला चूक न ठरवण्याची चूक त्याने आता नव्या ग्रंथात केली नाही. केवळ निरीक्षणांवर आधारित माहितीवर त्यांने तर्कसुसंगत अशी विधाने केली. साडेसहाशेच्या वर पाने असलेल्या या ग्रंथात अर्थपूर्ण मजकुराला उत्कृष्ट जिवंत वाटणार्‍या तीनशेपेक्षा जास्त चित्रांची जोड होती. आकर्षक मांडणी आणि तत्कालीन अत्युच्च दर्जाच्या सफाईदार छपाईमुळे या ग्रंथाचा प्रभाव ठसा उमटवणारा होता.

तसे वेसालिअसचे संशोधन व कलाकृती हे या प्रकारचे त्या काळातले पहिलेच संशोधन वा कलाकृती नसली तरी दर्जा, अतिशय बारीक गुंतागुंत कलाकुसरीने दाखवण्याचे कसब यामुळे अजोड चित्रे काढणारा कसबी चित्रकार हा विच्छेदनावेळी जातीने हजर होता यात संशय रहात नाही आणि ग्रंथातल्या चित्राकृती अभिजात बनल्या आहेत. जवळजवळ ताबडतोबच ग्रंथाच्या नकली प्रती उपलब्ध झाल्या अशी वेसालिअसने कबुली दिल्याचे मुद्रकाच्या टिप्पणीवरून दिसून येते. फाब्रिकाची पहिली आवृत्ती निघाली तेव्हा वेसालिअस केवळ २८ वर्षांचा होता.

प्रकाशनानंतर लौकरच वेसालिअसला रोमन सम्राट चार्ल्स ५ यांच्या दरबारी राजवैद्य म्हणून ऋजू होण्याचे निमंत्रण आले. वेसालिअसने व्हेनीसच्या मंत्रीमंडळाला कळवले की तो पदुआ विद्यापीठातला पदभार सोडत आहे. त्यामुळे उमराव ड्यूक कोसिमो १ दे मेडिची याला जाग आली आणि त्याने वेसालिअसची पिसा विद्यापीठात बदली केली. या बदलीला वेसालिअसने नकार दिला. राजदरबारी मिळणारे पद वेसालिअसने स्वीकारले. पण इथे त्याची गाठ पडणार होती इतर वैद्यक व्यावसायिकांशी. वेसालिअसच्या असामान्य सैद्धान्तिक संशोधनाकडे काणाडोळा करून ‘नापित शल्यक्रियातज्ञ’ अशी वेसालिअसची ते खिल्ली उडवीत असत.

स्वतःपेक्षा चांगले, उजवे कार्य पाहिले की बुद्धिमान विचारवंतांना देखील न्यूनगंड येतो आणि पोटशूल उद्भवतो. त्रिदोष असंतुलित नसतांना देखील. तसा तो उद्भवला. गॅलेनच्या ईश्वरी सिद्धान्तावर टीका केल्याबद्दल वेसालिअसला शिक्षा करावी असे त्याचाच संशोधन मार्गदर्शक म्हणजे गुरू सिल्व्हीअसने रोमन सम्राटाला साकडे घातले. परंतु हा ग्रंथ वेसालिअसने सम्राटालाच अर्पण केला असल्याने हा प्रयत्न फसला. पण वेसालिअसविरोधी लोकमत तयार झाले ते झालेच. वेसालिअसचा शिष्य रिआल्दो कोलंबो हा देखील त्याच्या विरोधकात सामील झाला आणि एखाद्या वेडगळ विदूषकाकडे पाहावे तसे लोक वेसालिअसकडे पाहू लागले.

जवळजवळ अकरा वर्षे वेसालिअस सम्राटांबरोबर होता. सशस्त्र खेळांच्या स्पर्धांमध्ये तसेच लढायात होणार्‍या जखमांवर तो इलाज करी. शवविच्छेदने करी. औषधे देई आणि विविध वैद्यकीय प्रश्न उपस्थित करणार्‍या खाजगी पत्रिका देखील काढी. या काळात त्याने ‘एपिस्टल ऑन द चायना रूट’ ही पुस्तिका लिहिली. या वनस्पतीच्या औषधी परिणामाबद्दल तो साशंक होता. यात त्याने शरीररचनेसंबंधी आपल्या संशोधनाचे समर्थन देखील केले होते. या लेखनामुळे आता वेसालिअसवर सम्राटांकडून होणार्‍या शिक्षेला आमंत्रण देणारे आणखी शाब्दिक हल्ले होणार होते. सन १५५१ मध्ये चार्ल्स ५ ने वेसालिअसच्या संशोधनामुळे काही धार्मिक उल्लंघन होते की काय हे तपासून पाहाण्यासाठी सालामान्का इथे एक समिती बसवली. समितीने जरी वेसालिअसला निर्दोष ठरवून क्लीन चिट दिली तरी विविध आरोपांचे शाब्दिक हल्ले सुरूच राहिले. चार वर्षांनंतर वेसालिअसला आपल्या पुढे गेलेला पाहून वेसालिअसचा गुरू प्राध्यापक असलेला जेकोबस सिल्व्हीअस याच्या पोटात दुखले नसते तरच नवल. तोच आता विपर्यास करणार्‍यांचा म्होरक्या बनला आणि त्याने जाहीर केले की गॅलेनने संशोधन केल्यानंतर मानवी शरीरातच बदल झालेले आहेत. कुटिल राजकारणामुळे देखील नवे शोध लागतात बरे का! असो.

चार्ल्स ५ सम्राटपदावरून उतरल्यावर सुपुत्र फिलिप २ हा स्पेनचा सम्राट झाला तर फर्डिनंड १ हा ऑस्ट्रीयाचा आर्चड्यूक पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट झाला. राजवंशातली कट कारस्थाने आणि विषप्रयोग आणि खून हेच विषय कथाकादंबर्‍यातून सहसा रंगवले जातात. जिवंतपणी सम्राटपदावरून पायउतार होणारा चार्ल्स ५ हा प्रथमदर्शनी तरी त्याला अपवाद दिसतो आहे. (हा इतिहास मला ठाऊक नाही.) राज्यकर्त्यांच्या अशा चांगल्या उदाहरणांमुळेच रेनेसॉंला वाव मिळाला असावा.

असो. वेसालिअसने राजदरबाराची सेवा सुरूच ठेवली. आता तो रोमच्या माजी सम्राटांचा सुपुत्र जो आता स्पेनचा सम्राट झाला होता त्या फिलिप २ याच्या सेवेत ऋजू झाला. फिलिप २ ने वेसालिअसला आयुष्यभरासाठी निर्वाह वेतन - पेन्शन म्हणून पॅलेटाईन हे वारसपरंपरा नसलेले उच्च उमरावपद दिले. सन १५५५ मध्ये वेसालिअसने द ह्यूमानी कॉर्पोरिस फाब्रिकाची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली.

सन १५६४ मध्ये वेसालिअस जेरुसलेमच्या पवित्र भूमीच्या यात्रेला गेला. स्पेनमध्ये एका उमरावाचे शरीरविच्छेद्न त्याने केले होते. ते केले तेव्हा तो उमराव जिवंत होता म्हणून त्याला हद्दपार केले अशी एक किम् वदन्ती होती. इथे एक बाब ध्यानात येते. साधे गळू फोडले वा पायातील खोल गेलेला काटा किंवा खिळा काढला तरी ते शरीरविच्छेदन ठरू शकते. गळू झालेला वा पायात काटा गेलेला माणूस जिवंतच असणार आणि मुडद्याच्या अंगावरील गळू कोण कशाला फोडेल वा मुडद्याच्या पायातला काटा कोण काढेल? पण धर्मवेड्यांचे वा हितशत्रूंचे काही सांगता येत नाही.

असो. तर वेसालिअस जेरुसलेमला निघाला. जेम्स मॅलस्तेता याच्या नेतृत्त्वाखाली व्हेनीसच्या जहाजांचा एक ताफा सायप्रसमार्गे निघत होता. त्या ताफ्यातून तो निघाला. जेरुसलेमला पोहोचल्यावर त्याला एक निरोप मिळाला की पदुआ विद्यापीठातली प्राध्यापकी त्याने स्वीकारावी अशी व्हेनीसच्या मंत्रीमंडळाची इच्छा आहे. वेसालिअसचाच मित्र आणि माजी विद्यार्थी फॅलोपिअसच्या मृत्यूमुळे हे पद रिक्त झाले होते.

खूप दिवस त्याचे जहाज आयोनिअन समुद्रात प्रतिकूल वार्‍यांचा सामना करीत होते. अखेर झान्टे ऊर्फ झॅकिन्थॉस बेटावर त्याचे जहाज फुटले. उण्यापुर्‍या ५० वर्षांच्या वयात अखेर त्याला मृत्यू आला. कोर्फू बेटावर कुठेतरी त्याचे दफन झाले.

बरीच वर्षे असे गृहीत धरले जात होते की वेसालिअसने जेरुसलेमची धर्मयात्रा ही इन्क्विझीशनच्या (पापकृत्याची चौकशी करणारी ज्येष्ठ धर्मगुरूंची उच्चस्तरीय समिती) दबावामुळे केली होती. आज मात्र हे निराधार आहे असे समजले जाते. आधुनिक चरित्रकारांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. चार्ल्स ५ याच्या ह्यूबर्ट लॅन्गवे Hubert Languet या मुत्सद्द्याने आणि ऑरेन्जच्या राजपुत्राने ही वावडी उडवली होती. या राजपुत्राचे म्हणणे होते की स्पेनमध्ये सन १५६५ मध्ये वेसालिअसने एका उमरावाचे शरीरविच्छेदन केले होते तेव्हा त्या उमरावाचे हृदय धडधडतच होते. फिलिप २ ने मग वेसालिअसला जेरुसलेम यात्रा करण्याची शिक्षा दिली होती. ही कथा नंतर अनेक वेळा पुन्हापुन्हा पसरत राहिली आणि अजुनपर्यंत प्रसिद्ध राहिली आहे. पोप पॉल ४ आणि इग्नेशिअस लोयोला हे कुष्ठरोग्यांची सेवा करीत. वेसालिअस त्यात सहभागी होण्यास गेला होता ही बाब या मताला पुष्टी देणारी आहे.

तरीही संशोधनात एवढे स्वारस्य असलेला क्रांतिकारक विचारांचा वैज्ञानिक आपले संशोधन बाजूला ठेवून धार्मिक यात्रेला जाण्यात कालापव्यय करेल हे पटत नाही. त्याच्यावर जेरुसलेम यात्रेची सक्ती झाली असावीच. असे मत महाजालावर आढळते.

वैद्यकीय क्षेत्राबरोबरच वेसालिअसचा विविध क्षेत्रात एकंदरीतच मानवी आयुष्यावर काय परिणाम झाला हे पाहणे मनोरंजक ठरेल.

वेसालिअसकृत विविध पवित्र्यातील निसर्गचित्राच्या पार्श्वभूमीवरील मानवी शरीराच्या भागशः विच्छेदनाच्या फलकांचा प्रभाव बरोक चित्रकार पिएत्रो द कोर्तोना (इ.स. १५९६ ते १६६९) याच्या चित्रातून दिसून येतो. त्याने अतिशय नाटकी अशा अविर्भावातील विविध शारिरीक पवित्र्यातील मानवी शरीराचे शरीररचात्मक फलक चित्रित केले आहेत. त्यापैकी बहुतेक फलक हे वास्तुरचनात्मक वा निसर्गचित्रांच्या पार्श्वभूमीवर आहेत.

विसाव्या शतकातील अमेरिकन कलावंत जेकब लॉरेन्स याने वेसालिअस दालन बनवले. आन्द्रिअस वेसालिअसच्या शरीररचनात्मक चित्रांवर आधारित असलेल्या चित्रांचे दालन.

फाब्रिका पहिल्यांदा प्रसिद्ध झाले तेव्हा मिश्र प्रतिक्रिया उमटली. गॅलेनच्या कडव्या भक्तांनी त्यांच्या दैवतावरील आक्रमणाचा, हल्ल्याचा निषेध केला. इतर शरीररचनाशास्त्रज्ञांनी, खासकरून इटलीतल्या शास्त्रज्ञांनी वैद्यकीय जगतात मोलाचे योगदान दिले आहे असे म्हणून वेसालिअसची तारीफ केली. सन १९९८ मधील कॅथरीन पार्क हिची द फाब्रिकावरील समीक्षा हे सर्वात ताजे उदाहारण.

तीन शतकानंतरच्या डार्विनप्रमाणेच वेसालिअस हा प्राचीन परंपरावादी सर्वोच्च अधिकारी असलेल्या गॅलेनच्या विरोधात उभा ठाकला असे चित्र निर्माण झाले. खरे तर तो निसर्गाच्या सत्याच्या शोधात होता. त्याच्या बाजूला केवळ त्याचे निरीक्षण आणि अनुभव होता. आपल्या डोळ्यांना काय दिसले ते त्याला ठाऊक होते आणि हातांनी काय चाचपले तेही त्याला जाणवले होते. पारंपारिक विश्वास हा चूक होता असाच निष्कर्ष त्याने काढला होता. त्याच्या प्रकाशित लेखनातून आपल्याला दिसून येते की वेसालिअस आपल्या अधिकारवाणीला बळकटी येण्यासाठी मनात येईल ते सारे करतो आहे. स्वतःचे भव्य असे प्रतीक लेखनातून तो प्रकट करतो पण माहितीच्या मांडणीचा साचा वापरतो गॅलेनचाच. स्वतःला सम्राटांचा वैयक्तिक राजवैद्य म्हणून सादर करतो आणि ग्रंथावरच्या मुखचित्रात मात्र स्वतःचे चित्र सर्वश्रेष्ठ अधिकारी पदावर असल्यासारखे. चित्राचित्रागणिक स्वतःच्या शब्दांचे वजन वाढवीत नेतो. दूरवरच्या विस्तृत प्रदेशातल्या आपल्या विद्यार्थ्यांना प्रायोगिक मार्ग दाखवतो.

१. जर तुम्हाला माझ्या म्हणण्याबद्दल शंका असेल तर स्वतःचे असे नवे शरीरशास्त्र निर्माण करा.
२. आपल्या स्चतःच्या डोळ्यांनी पाहा आणि मग तुमचा अनुभव माझ्यासारखाच असेल.
३. मग त्या अनुभवातून आलेल्या प्रत्ययाने अखेर प्राचीन स्त्रोतांच्या अधिकारवाणीवर मात केलेली आहे आणि युरोपात एक नव्या युगाची पहाट उगवली आहे.’

या तीन वाक्यांनी मात्र त्याच्याबद्दलचा आदर दुणावतो आणि आपण त्या शिकवणीपुढे नतमस्तक होतो.

त्याबरोबरच वेसालिअसचे संशोधन हा ज्ञात असलेला सर्वात प्राचीन असा सार्वजनिक आरोग्याचा रोगनिर्मूलन कार्यक्रम होता. व्हेनीसच्या न्यायमूर्तींच्या मंडळाने १४व्या शतकाच्या मध्यातल्या ब्यूबॉनिक प्लेगच्या अटकावासाठी पदुआ विद्यापीठाच्या वैद्यकीय प्रशालेला हा प्लेग कसा होतो, कसा फैलावतो आणि व्यक्तीच्या शरीरात कसा शिरकाव करून घेतो आणि रोगग्रस्तांना बरे कसे काय करता येईल हे शोधून काढायला सांगितले होते. हे शोधून काढायला तीन शतके लागली खरी पण मानवजातीचा सगळ्यात मोठा मारेकरी असलेल्या या प्लेगला युरोपमधून हद्दपार करण्याच्या तत्कालीन प्रयत्नात व्हेनीस आघाडीवर होते हे मात्र खरे.

शरीररचनाशास्त्राला आणि शवविच्छेदनाला वेसालिअसने प्रतिष्ठा दिली. धर्माच्या प्रभावामुळे तशी ती मिळणे कठीणच होते. शवविच्छेदनातूला प्रतिष्ठा न मिळण्याचे दुसरे कारण म्हणजे शवविच्छेदनाविरोधात जाणारी प्रतिष्ठितांची व्यक्तिगत अशी ठाम मते. काही थोर वैज्ञानिक कधीकधी विचित्र वागतात. उदा. आईनस्टाईनने विश्वाची प्रसरणशीलता, हबलची उपपत्ती वगैरे सुरुवातीला अजिबात स्वीकारली नव्हती. तसेच ब्रिटीश हिपोक्रेटस म्हणून गौरवला गेलेला थॉमस सिडनहॅम (इ.स. १६२४-८९) याने शवविच्छेदनातून रुग्णाचे काहीही भले होत नाही तेव्हा ती करूच नयेत असे म्हटले होते. अशा या काळात वेसालिअसचे कार्य निस्संशय डोळ्यात भरण्याजोगे आणि असाधारण असे आहे.

अशा तर्‍हेने आंद्रे वेसालिअसच्या प्रामाणिक परंतु क्रांतिकारक विचाराने तर्कविसंगत गृहीतकांच्या जोखडातून वैद्यकशास्त्राला कायमचे मुक्त केले. परंतु वैद्यक एकटेच पुढे जाऊ शकत नाही आणि गेले नाही. वैद्यकाला तोलामोलाची साथसंगत लाभली ती आधुनिक औषधनिर्मितीशास्त्राची. चिकित्सामात्रा निश्चिती - थेराप्यूटीक डोस डिटरमिनेशन हा सुरुवातीचाच फारच महत्त्वाचा टप्पा आधुनिक वैद्यकाचे औषधनिर्मितीशास्त्राशी नाते जोडून गेला. औषधाचे शरीरात होणारे शोषण - ऍबसॉर्पशन, शोषणानंतर औषधाच्या रेणूंचा शरीरांतर्गत होणारा पुढील प्रवास आणि या प्रवासात औषधात तसेच शरीरातल्या पेशींवर होणारे परिणाम आणि शेवटी त्या रेणूंचे शरीराबाहेर होणारे उत्सर्जन वा विघटन याच्या तपशीलवार अचूक नोंदी ठेवून औषधांचे अभिकल्पन - डिझाईन केले गेले. शरीराचे वजन आणि चिकित्सा मात्रा - थेराप्यूटीक डोस याची सांगड घातली गेली. हे सारे होतांना तर्कविसंगत गृहीतकांना दूर ठेवले. या टप्प्यावर आधुनिक पाश्चात्य वैद्यकाने इतर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा.

बहुतेक सर्व प्रकारच्या वेदनांपासून मोठ्या प्रमाणावर आराम देणार्‍या अफूपासून मॉर्फीन आणि सिंकोनापासून क्विनाईन वेगळे करून आधुनिक औषधशास्त्राने पहिले पाऊल टाकले. उद्देशांनुसार मात्रानिश्चिती केली. वनस्पतिज वा प्राणिज औषधातला गुणकारी रेणू ओळखून वेगळा करून तो रेणु रासायनिक तंत्रज्ञानाने बनवणे आणि त्यानंतर ते औषध मोठ्या प्रमाणावर बनवणे हा फारच मोठा टप्पा आधुनिक औषधनिर्मितीशास्त्राने पार केला. त्या रेणूच्या पुढील पायर्‍यांचे नवे जास्त परिणामकारक रेणू बनवणे, त्यांचे गुणधर्म काटेकोरपणे तपासून मात्रानिश्चिती इ. पायर्‍या ओलांडणे ही प्रगती साधली. नंतर सल्फा औषधे, प्रतिजैविके, व्हिटॅमीन्स, हार्मोन्स, इ. अनेक औषधांचे शोध लागले.

वैद्यकाला जसे स्पेशल्टी, सुपरस्पेशल्टी, स्त्रीरोगवैद्यक, बालरोगवैद्यक, शरीरविकृतीशास्त्र - पॅथॉलोजी, दंतवैद्यक, शारीरचिकित्साशास्त्र - फिजिओलॉजी, प्रतिमाशास्त्र - इमेजिंग (क्ष किरण, अल्ट्रा सोनोग्राफी, इ.) विशिष्ट प्रारणचिकित्सा (रेडिओ उत्सर्जने, लेसर, इ.), इस्पितळ व्यवस्थापन, सार्वजनिक व्याधीनिर्मूलन, इ. धुमारे फुटले तसे औषध निर्मितीशास्त्राला देखील गोळ्या बनवणे, वेष्टित - कोटेड टॅब्लेट्स, एन्टेरिक कोटिंग - आंत्रवेष्टन, सीरप्स - सस्पेन्शन्स इ. पेय औषधे, इंजेक्शने, डोळ्यात घालायचे, कानात घालायचे, नाकात घालायचे जंतुरहित थेंब, मलमे, सपोझिटरीज, पेसरीज बनवणे, या प्रगतीनंतर डायग्नॉस्टीक औषधनिर्मिती, विशिष्ट औषधनिर्मिती, शरीरांतर्गत विशिष्ट ठिकाणी कार्यरत होणारी औषधे बनवणे असे अनेक धुमारे फुटले. विविध टप्प्यांवर आधुनिक औषधशास्त्राने तर्कविसंगत गृहीतकांना दूर ठेवले. संवेदनाशील, अतिसंवेदनाशील औषधे विशिष्ट तापमानात जंतुरहित वातावरणात बनवली जातात. त्यामुळे यशस्वितेचे प्रमाण १०० टक्क्यांच्या जास्तीत जास्त जवळ जाणारे आहे.

तशीच अविश्वसनीय आणि नेत्रदीपक प्रगती शल्यक्रियाशास्त्रात झाली. फारशा धोक्याच्या नसलेल्या अस्थिभंग दुरुस्ती इ. शस्त्रक्रिया, बाळंतपणे देखील विशिष्ट तापमानात, जंतुरहित वातावरणात पार पाडली जातात. त्यामुळे व डॉक्टर, सेवकादी संपूर्ण शल्यचमूच्या व्यावसायिक कौशल्यामुळे यशस्वितेचे प्रमाण जवळजवळ १०० टक्के आहे. या शस्त्रक्रिया फारशा धोक्याच्या वाटत नाहीत हेच मोठे यश आहे. खरे तर कोण्तीही शस्त्रक्रिया काही कमी धोक्याची नसते. परंतु यशस्वितेच्या १००कडे जाणार्‍या उच्च टक्केवारीमुळे आज त्या कमी धोक्याच्या वाटतात. शल्यक्रिया खोलीचे उत्कृष्ट निर्जंतुकीकरण, भूलतज्ञ, शल्यक्रियातज्ञ आणि सहाय्यक सेवकवर्ग तसेच शस्त्रक्रियोत्तर शुष्रुषा यांनी सादर केलेले ते एक समूहसंगीत असते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियात तर अनेक सुपर स्पेशालिस्टसच्या अचूक मार्गदर्शनाचा मोठा वाटा असतो.

विविध लसींचे शास्त्रशुद्ध उत्पादन आणि त्यांचे कार्यक्षम वितरण या कार्याने तर देशोदेशींच्या सीमा ओलांडून अनेक साथींचे रोग पार अस्तंगत केले. देवी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला ही उदाहरणे आहेत. कांजिण्या, गोवरासारख्या काही रोगांच्या आक्रमणाची धार लसीमुळे कमी होते तर आधुनिक औषधांनी हे रोग पूर्ण बरे होतात.

आधुनिक औषध निर्मितीशास्त्राने रसायनशास्त्र, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रातल्या प्रगतीचा आणि अनुषंगाने झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेतला आणि जलद आणि दर्जेदार उत्पादनासाठी फ्लुईड बेड ड्रायर, ग्रॅन्युलेशन तंत्रज्ञान, रोटरी टॅब्लेटींग मशीन्स, कोटींग पॅन्स, नियमित तापमानाच्या जॅकेटेड व्हेसल्स(टाक्या), इ. यंत्रे तर उत्पादित औषधांचा दर्जा राखायला चाचण्यांसाठी इलेक्ट्रॉनिक मायक्रोग्रॅम तराजू, (रामन परिणामावर आधारित)संगणकीकृत स्पेक्ट्रोफोटोमीटर्स, टायट्रीमीटर्स, अशी आधुनिक यंत्रे वापरण्यास सुरुवात केली. दर्जासातत्य राखण्यासाठी आय एस ओ, सिक्स्थ सिग्मा, डेमिंग, जुरान, क्रॉसबी अशा विविध दर्जा मानकप्रणाल्या स्वीकारल्या.

आधुनिक वैद्यकात भ्रष्टाचार माजला आहे, आधुनिक वैद्यकाने रोग दबला जाऊन वरवर रोगमुक्ती मिळते आणि अमुक अमुक औषधप्रणालीमुळे रोग मुळापासून बरा होतो त्यामुळे आमचीच औषधप्रणाली श्रेष्ठ आहे वगैरे धाडसी विधाने सुशिक्षित व्यक्तींकडून सर्रास केली जातात. विनोद म्हणजे असा उघड उघड दावा करणारे औषध देणारे काही व्यावसायिक ‘अगोदर रोगनिदान तुमच्या डॉक्टरकडून करून या’ म्हणून सांगतात. आपल्या औषधप्रणालीने किती प्राणघातक रोगांवर उपचार निर्माण केले आणि त्यामुळे किती टक्के रुग्ण पूर्ण बरे होतात हे मात्र सांगू शकत नाही. खरे तर व्याधीतीव्रतेच्या पायर्‍यांच्या तसेच व्याधीमुक्तीच्या व्याख्याच इतर बहुतेक वैद्यकप्रणालीत नाहीत. शिस्तबद्ध काम आणि परिणामांचे पद्धतशीर विश्लेषण करण्याच्या वृत्तीचाच अभाव असतो. सध्या जारी असलेल्या ‘जादूटोणा आणि आक्षेपार्ह जाहिरातीविरोधी कायदा’च्या कार्यकक्षेत अशी वक्तव्ये करणे हा त्या कायद्याच्या काही कलमांनुसार गुन्हा असून ऊठसूठ त्या कायद्याचा वापर होऊन रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने त्या कायद्याची ‘अतिपरिचयेत अवज्ञा’ होऊ नये म्हणून अशा काही ढिसाळ, काही अति आक्रमक, खोटारड्या वक्तव्याबद्दल दावे दाखल (करता येत असून) केले जात नाहीत. शिवाय असा कायदेभंग करणांचे अतिप्रतिष्ठित राजकीय पाठिराखे दावा ठोकणार्‍यांनाच ठोकून काढतील ते वेगळेच.

इतर अनेक क्षेत्रातल्या माणसांप्रमाणे वैद्यकक्षेत्रात देखील भ्रष्ट व्यक्ती आहेत. आधुनिक वैद्यकात होणारे भ्रष्टाचार भ्रष्ट व्यक्तींमुळे होतात. भ्रष्ट शास्त्रामुळे नाहीत. दोष मानवाचा आहे शास्त्राचा नाही. दम्यासारख्या रोगाने पूर्वी माणसे वर्षानुवर्षे बिछान्याला किळत. आज दमा झालेली माणसे जवळजवळ सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात, खेळात देखील असामान्य प्राविण्य मिळवतात. यात अधुनिक वैद्यकाचा आणि औषधशास्त्राचा वाटा मोठा आहे हे आपण नाकारू शकत नाही. भ्रष्टाचार असला तरी यशस्वितेचे सत्य आपण नाकारू शकत नाही.

आधुनिक वैद्यकाचे हे दैदीप्यमान यश केवळ प्रामाणिक प्रयत्न, विविध वळणांवर आणि टप्प्यांवर तर्कविसंगत गृहीतके टाळल्यामुळे, संबंधित असलेल्या विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आवश्यक तिथे वापर केल्यामुळे मिळालेले आहे. तसेच उपलब्ध ज्ञान आणि साधने वापरण्याचे त्या त्या व्यक्तीचे वैयक्तिक कसब हेही महत्त्वाचे आहे. वैद्काच्या कवतिकात मूळ विषयापासून थोडेफार किंबहुना फारच विचलन - डेव्हिएशन झाले असे वाटते. तेव्हा आणखी लांबण न लावता ज्ञानसंपादनाचा हा तेजोमार्ग वैद्यकाला दाखविल्याबद्दल आणि वैद्यकाला मध्ययुगातून आधुनिक युगाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणार्‍या वेसालिअसला प्रणाम करून ही लेखमाला संपन्न करतो.

संदर्भ:
१. आत्मा ते जनुक:डॉ. चंद्रकांत शंकर वागळे:२००९:पॉप्युलर प्रकाशन.
या लेखमालेला एखाद्या वाचकाने एक गुण दिला तर तो/ती या पुस्तकाला १०० गुण देईल एवढे सुरेख हे पुस्तक आहे. हे पुस्तक दोनतीन वर्षांपूर्वी वाचले आणि ही तेव्हाच लेखमाला तेव्हाच लिहीली. श्रीगणेश लेखमालेत प्रसिद्ध करणार होतो परंतु शेवटचा हात फिरवणे कार्यबाहुल्याने राहून गेले. मग हे लेखनच पूर्णपणे विसरून गेलो. साठी पार केल्यामुळे विस्मरणाचा परवानाच आहे माझ्याकडे. आता डॉ. कुमार१ यांच्या लेखमालेने हे संगणकाच्या अडगळीत पडलेले लेखन आठवले तेव्हा त्यांना अनेक धन्यवाद.
२. फार्माकोलॉजी ऍंड फारमाकोथेराप्यूटीक्स: १९८०:सातोस्कर भांडारकर
३. विकीपेडिया आणि इतर महाजालसंदर्भ आणि कधीतरी वाचलेली परंतु टाचणे न काढलेली पुस्तके.
४. चॅनल सर्फिंग करतांना विविध वाहिन्यावर पाहिलेले या विषयावरील अनेक लघुपट.
५. माझ्या काही डॉक्टर मित्रांनी तसेच काही रुग्णाबरोबर गेल्यावर त्यांच्या डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेली अमूल्य माहिती आणि व्यक्त केलेली अमूल्य मते.
६. माझ्या इन्डस्ट्रीअल फार्मसीमधील मित्रांनी तसेच महाराष्ट्र औषध अणि अन्न प्रशासनातील काही अधिकार्‍यांनी वेळोवेळी दिलेली अमूल्य माहिती आणि व्यक्त केलेली अमूल्य मते.

- X - X - X -

विज्ञानलेख

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

14 Jun 2018 - 8:06 pm | manguu@mail.com

छान

कुमार१'s picture

14 Jun 2018 - 8:08 pm | कुमार१

ही लेखमाला परिश्रम पूर्ववक लिहिल्याबद्दल तुम्हाला प्रणाम !

तुमचे संदर्भ बघून एक विचारतो.
Lawrence चे Clinical Pharmacology वाचलेत/चाळलेत का कधी?
प्रेमात पडावे असे पुस्तक आहे ते !

या लेखमालेची उपयुक्तता मोजणे शक्य नाही. अत्यंत माहितीपूर्ण लेखमाला. या आणि अशा विषयांवर अजून लिहा. श्रीगणेश लेखमाला ह्याही वर्षी आहेच. तेव्हा त्यासाठीही जरूर लिहा.

धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

15 Jun 2018 - 3:44 pm | सुधीर कांदळकर

मंगूजी, डॉक्टर्साहेब आणि एस यांना धन्यवाद.
@डॉक्टरसाहेबः नाही. माझ्या व्यवसायात मला जेवढी प्राथमिक माहिती हवी होती तेवढी किंबहुना थोडीशी जास्तच सातोस्कर भांडारकर मध्ये होती. त्यामुळे त्या विषयावरचे दुसरे पुस्तक कधी वाचलेच नाही. इन्डस्ट्रीअल फारमसीचे रेमिन्ग्टन, गुडमन-गिलमन, विश्लेषणाचे गॅरट आणि इतर माहितीसाठी मार्टींडेल आम्हाला जास्त जवळचे होते. लॉरेन्सचा ग्रंथ आकाराने किती मोठा आहे ठाऊक नाही. परंतु आता तुम्ही माझ्या मेंदूत किडा सोडला आहे. मुंबईपुण्याला गेलो की फार मोठे नसेल तर लॉरेन्स नक्की घेऊन येणार आहे. अब चौकात रस्त्यावर मिळेल अशी आशा आहे. नाहीतर मुंबई आहेच. पण किंमतीत न पटल्यास कुठेतरी लायब्ररीमध्ये पाहीन किंवा एखद्या मित्राच्या कंपनीत असले आणि त्यांना नेहमी लागत नसले तर उसने मागून घेईन. असो. अनेक अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

15 Jun 2018 - 4:31 pm | कुमार१

जरूर आणा, वाचा. मग त्यावर आपण व्य नि तून चर्चा करू ☺ मजा येईल

यशोधरा's picture

15 Jun 2018 - 3:59 pm | यशोधरा

हाही लेख आवडला. उपयुक्त आणि अत्यंत माहितीपूर्ण लेखमाला.धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2018 - 5:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखमाला. परिश्रमाने माहिती जमा करून ती सोप्या मराठीत लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि आभार !

अजून लिहा. वाचायला नक्की आवडेल.

सुधीर कांदळकर's picture

16 Jun 2018 - 8:52 pm | सुधीर कांदळकर

@ डॉ. कुमार१: नक्कीच डॉक्टरसाहेब. मजा येईल. या विषयाशी माझा संबंध १९९४ साली नोकरी बदलल्यानंतर तुटलाच होता.
@ यशोताई धन्यवाद.
@ डॉ. सुहास म्हात्रे: धन्यवाद डॉक्टरसाहेब.