रविवारची सकाळ. छान मुड लागला होता. बरेच दिवस पडून असलेला लेख आज पुर्ण करायला घेतला होता. इतक्यात सौभाग्यवतींने बटर लावलेली थालिपीठाची डिश समोर आणून ठेवली. थालिपीठ म्हणजे शिळ्या भाकरीचे थालिपीठ. (कधी तरी सविस्तर पाककृती सांगेन याची.) मन कसं प्रसन्न झालं. कारण एकतर हे थालिपीठ मला फार आवडतं आणि दुसरं म्हणजे सकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी म्हणजे दुपार चविष्ट होणार हे ठरलेल. किबोर्डबरोबर चाळा करत मी विचारलं “तुला बरा सारखा सारखा कंटाळा येतो स्वयपाकाचा!” त्याचं काय आहे, ईतकी वर्ष संसार केल्यानंतर कुठे ईतकीशी समजायला लागलीय बायको. तिचं सरळ शब्दात कौतूक केलं की तिला संशय येतो मी खरच कौतूक करतोय की टोमणा मारतोय याचा. मग असं तिरक्यात बोलायला लागतं. मग तिचं सुरू होतं “सकाळी सकाळी शेंगोळीचं पिठ भिजवायला घेतलय तुझ्यासाठी. पण आहे का तुला त्याचं काही” वगैरे वगरै. गम्मत अशी आहे की बायकोने निटनेटकी साडी घालून, चकचकीत चेहऱ्यावर गोड हसू ठेवत, “दहा मिनिटात होईल, मग वाढते” असं बोलत मटणाचा रस्सा केला तरी एकदम मचूळ होतो. खरं सांगतोय. पण केसांना, गालाला, हातातल्या बांगड्यांना पिठ लागलय, पदरावर पाणी सांडलय, तोंडाने “टिव्ही बंद कर, कांदा कापून लिंबू पिळ जरा त्यावर” असे हुकूम सोडीत तिने केलेली मटकीची उसळ सुद्धा अशी चवदार होते की दृष्ट काढावी वाटते अगदी बायकोची.(नशिब आई नाही सोशल साईटस् वर नाही. नाहीतर हे वाचून आमची परत वरात काढली असती.)
असो. तर आज आमच्याकडे शेंगोळीचा मेन्यू होता तर. अरे हो, दत्तोबा येवून गेले मागच्या आठवड्यात. मग बरोबर आहे. हे दत्तोबा प्रकरण जरा विस्ताराने सांगण्यासारखं आहे. दत्तोबा माझा गावाकडचा शाळूसोबती. हा कधी बोलावून येत नाही आणि हाकलून जात नाही. मागच्या शनिवारी सकाळी साडे आठच्या आसपास दार वाजलं. बायको म्हणालीही “दत्तूभाऊ आले की काय” कारण हा प्राणी कधीही डोअर बेल वाजवत नाही. कडी वाजवतो. दार ऊघडलं तर समोर दत्तराया ऊभे. साडे आठाला इथे म्हणजे सकाळी सहाला निघाला असनार घरून.
म्हणालो “दत्त्या लेका बेल वाजवत जा रे”
तर दत्तोबांचं उत्तर “छ्या, बेल वाजवून कुणाला डिस्टर्बड् नाय करू कधी”
अचानक लक्षात आलं, या दत्त्याबरोबर वाद घालायचा म्हणजे मुर्खपणा असतो.
माघार घेत म्हणालो “धन्यवाद दत्तोबा, आमची बेल वाजवून आम्हाला डिस्टर्ब न केल्या बद्दल. अशीच मंजूळ आवाजात कडी वाजवत जा” तोवर दत्तू आत, सरळ किचन मधे. “वहीणी या पिशव्या ठेव पाहू. आणि चहा पोह्याच्या भानगडीत पडू नको अज्जिबात.” याचा अर्थ ‘जेवायलाच वाढ सरळ’. या दत्तूबरोबर जेवणं म्हणजे फार आनंदाचा भाग असतो. मजा. मग दत्तू स्वतःच “वहिणी खायचा डबा कोणता?” असं विचारुन डिश वगैरे न घेता बाकरवडीचा डबाच बाहेर घेउन आला आणि “बोला साहेब, काय नविन खबर” म्हणत माझ्याच घरात मलाच पाहूणा करत सोफ्यावर बसला. बरं याचे हट्टही वेगळे. जेवायला बसलो की “वहिणी तुही बस बरं, आपण आपलं वाढून घेउ” म्हणत हिलाही जेवायला बसवतो आणि चार वेळा जेवताना उठवतो. याही वेळेस असच. ही दोन घास खाते न खाते तर “वहिणी, हुलगे आणलेत. मांजे आहेत. दाखव याला, त्या पिवळ्या पिशवीत आहे बघ.” म्हणत कसे, कुठून, काय काय प्रयत्न करून आणले हे मला सांगत होता. मुठभर हुलगे बायकोने एका वाटीत आणले. तोवर याचं “वहिणी, कुरड्याची भाजी दिलीय म्हातारीने ती आण” परत ही भाजी आणायला आतमध्ये. आपल्या मुळे बायकांना त्रास नको म्हणनारा हा, याला आपण चारदा वहिणीला जेवताना उठवतोय याचं भानच नाही. पण हे सगळं निर्मळ मनाने. नाहीतर बायको काय सहण करते! तर दत्तोबाला यावेळेस कुणाकडे तरी ‘मांजे हुलगे’ मिळाले होते. ते घेऊन तो सकाळी सकाळी अवतरला होता. गायी व्याली की खर्वस घेऊन, तर कधी चांगले तांदूळ मिळाले की ते घेऊन हा येणार पुण्यात. बरं आलाच आहे तर पुण्यात कुठे फिरेल, खरेदी करेल, नाटक वगैरे पाहील, तर ते नाही. तो आला की बायको त्याला आवडणारा स्वयपाक करते, हा पोटभर जेवणार, मनभर गप्पा मारणार आणि जाणार. असो. हुलगे, याला कुळीथही म्हणतात. कोकणातले कुळीथ लालसर रंगाचे असतात. त्याचं पिठलं छान होतं. पण आमच्या मावळपट्ट्यात मात्र काळसर रंगाचे हुलगे होतात. बरड माळरानावर, डोंगरऊतारावर यांची जोमाने वाढ होते. एकेकाळी जनावरांना खावू घालायचे हे हुलगे पण आजकाल हे बरेचसे दुर्मीळ झालेत. या हुलग्यांची आमच्याकडे शेंगोळी होते. पावसाळ्यात, हिवाळ्यात माडगंही करतात. बऱ्याच भागात शेंगोळीचं कालवण करतात वाटलेला मसाला घालून पण खरा खाणारा दर्दी मात्र शेंगोळीला दाद देतो. ज्यात नावाला रस्सा केला जातो आणि रस्साही फक्त पाण्याचा असतो. कोणताही मसाला किंवा फोडणी न देता हा प्रकार केला जातो. जो काही मसाला असतो तो पिठ मळतानाच टाकलेला असतो. यातही परत दोन प्रकार आहेत. आजकाल कुणाला हातावर शेंगोळी करण जमत नाही. म्हणजे दोन तळहाताच्या मध्ये छोटासा पिठाचा गोळा घेउन, मांडीवर ठेवलेल्या परातीमधे याचे वेढे तयार करायचे. सोऱ्या वापरुन चकली करतात तो प्रकार. पण हे फार कौशल्याचं काम असतं. बऱ्याच गृहिणी जमत नाही म्हणून पोळपाटावर हाताने लाटून मग त्याला गोल आकार देतात. अर्थात खाणारा जर जाणकार असेल तर पहिल्याच घासात ओळखतो की आज्जीच्या हातची आहे की सुनबाईच्या. आमच्या जुन्नर भागात जर शेंगोळी किंवा मासवडीचा बेत असेल तर सामिष आहाराकडे कुणी ढुंकूणही पहात नाही. तसं पाहीलं तर मासवडीचं रुपडं तसं मोहक. छान तर्रीचा तवंग असलेला झणझणीत रस्सा, कांदा, लसूण आणि तिळाचा भरपुर वापर केलेला मसाला पोटात भरलेली नाजूक मासवडी, खरपुस पापुद्रा सुटलेली पातळ भाकरी, मिठाच्या पाण्यात टाकलेला कांदा, लिंबाच्या फोडी आणि सोबत इंद्रायणी भात. वा! पण शेंगोळीचं मात्र तसं नाही. दिसायला थोडी वेगळी, रंगरुप जवळ जवळ नाहीच. शेंगोळीचं प्रेम रक्तातच असावं लागतं. ते मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे वारश्यानेच येतं. तुमच्या घराला जर शेंगोळीची परंपरा नसेल तर तुम्ही कितीही टेस्ट बड डेव्हलप केले तरी तुम्हाला त्या चविची आवड निर्माण होईलच असं काही नाही. नविन मानसाने पहिल्यांदा शेंगोळी पाहीली तर हमखास नाक मुरडणारच. आम्ही एकदा शेजारी रहाणाऱ्या गुजराथी कुटूंबाला शेंगोळी दिली होती. पण डिशकडे पाहुनच त्या गुजराथी भाबीने “ई ऽ हे क्काये?” म्हणत असे काही तोंड केले की वाचारु नका. त्यामुळे नविन पाहूण्यासाठी हा खास मेन्यू करायचं टाळलं जातं. ईतर वेळीही हा पदार्थ घरी होतोच पण जेंव्हा सणाचे पुरणा-वरणाचे किंवा गोडाचे जेवण होते त्याच्या दुसऱ्या दिवशी हमखास हा पदार्थ घरी होतोच होतो. हे हातावर वेढे वळायचं कौशल्य बायकोला फार छान साधलय. तर या दत्तूमुळे आज अस्मादिकांच्या पानात शेंगोळीचे वेढे पडणार होते. शेंगोळीची प्रस्तावणा जरा लांबलीच.
(त्यामुळे ही ‘ललित’मध्ये टाकतोय. सविस्तर कृती ‘पाककृती’ या सदरात टाकली आहे.)
प्रतिक्रिया
6 Jun 2018 - 11:44 am | विजुभाऊ
काय राव. नुसती चव लावून तोंड खवळंवलंत.
दत्तोबाच्या नावाखाली तुमचा मावळी भाज्यांचा सफारी कार्यक्रम चाललाय
6 Jun 2018 - 12:11 pm | कंजूस
हा! गप्पीष्ट धागा.
6 Jun 2018 - 12:51 pm | उपेक्षित
वाह मस्त लेख, माझी माय जुन्नर भागातालीच (ओतूर/ धोलवड मधली) लगी दाखवतोच तिला तुमचा लेख.
6 Jun 2018 - 1:20 pm | शाली
अरे वा! आपण गाववालेच की मग. मीही ओतुरचाच आहे. धोलवडला बरेच नातेवाईक आहेत.
6 Jun 2018 - 1:36 pm | श्वेता२४
आमच्या जुन्नर भागात जर शेंगोळी किंवा मासवडीचा बेत असेल तर सामिष आहाराकडे कुणी ढुंकूणही पहात नाही. तसं पाहीलं तर मासवडीचं रुपडं तसं मोहक. छान तर्रीचा तवंग असलेला झणझणीत रस्सा, कांदा, लसूण आणि तिळाचा भरपुर वापर केलेला मसाला पोटात भरलेली नाजूक मासवडी, खरपुस पापुद्रा सुटलेली पातळ भाकरी, मिठाच्या पाण्यात टाकलेला कांदा, लिंबाच्या फोडी आणि सोबत इंद्रायणी भात. वा!
राजगुरुनगर आठवलं. त्यानंतर मासवडी खाण्याचा योग आला नाही. तुमच्या शेंगोळी प्रकरणाचे एवढे वर्णन वाचून ही पाकृ करणारच आहे. फक्त ती सुनबाईच्या हातची होणार त्यामुळे कितपत जमेल शंका आहे.
6 Jun 2018 - 2:05 pm | शाली
वा वा! नक्की करा.
राजगुरुनगर म्हटले की मला 'चिवडा' आठवतो. खुप आठवणी आहेत त्या चिवड्याभोवती.
6 Jun 2018 - 7:58 pm | Ranapratap
शाली, आता निघालोय नारायनगावला, भुजबलांच्या आपुल्कि मध्ये, मासवड़ी छान मिलते.
6 Jun 2018 - 8:07 pm | शाली
शुभेच्छा! वातावरणही मस्त आहे. माझ्या वाट्याच्या दोन मासवड्या जास्त खा. पोहोचतील मला :)
7 Jun 2018 - 12:26 pm | विशुमित
मस्त लिहले आहे.
एका जिल्ह्यातील असून ही बरीच माहिती नवीन होती.
===
" शेंगोळीचं प्रेम रक्तातच असावं लागतं. ते मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे वारश्यानेच येतं. तुमच्या घराला जर शेंगोळीची परंपरा नसेल तर तुम्ही कितीही टेस्ट बड डेव्हलप केले तरी तुम्हाला त्या चविची आवड निर्माण होईलच असं काही नाही.""
-->> जगाच्या रहाटगाडग्यातसुद्धा हे प्रेम पिढ्या गिनीज असेच वाढत जावे ही सदिच्छा !
7 Jun 2018 - 12:39 pm | शाली
धन्यवाद विशुमित!
7 Jun 2018 - 2:55 pm | किसन शिंदे
शेंगोळी अगदी लहानपणापासूनच घरी व्हायची, पण मी ती आवडीने कधीच खाल्ली नाही.
माझ्या आईला जमतात अशा पारंपारिक पद्धतीने केलेल्या शेंगोळ्या.
7 Jun 2018 - 7:32 pm | जेम्स वांड
काय मस्त लिहिलंय हो!.
आम्ही शेंगोळ्या करतो ते सरळ वळून नूडल्स प्रमाणे पाण्यात उकडून, अश्या केल्या नाहीत कधी बघायला हव्या. करून बघू, शेंगोळ्यांचं मार्केटिंग करायला हवं नीट, 'रास्टीक फूड' 'कंट्री फुडं' 'टेस्ट ऑफ द हिंटरलँड' वगैरे म्हणून विकता यायला हवं