ओवाळिते भाऊराया!
------
तासगावातल्या आपल्या घरी दिवाळीसाठी गेलेल्या आर. आर. पाटलांना तिथेही चैन नव्हताच. आपल्या अनुपस्थितीत गावात कुठे काही गैरप्रकार सुरू झालेले नाहीत ना, याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी गावातून फेरफटका मारला. आबा गावात असले, की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावात "तीन पत्ती' खेळायला सुद्धा बंदी होती. गावातले गुत्ते बित्ते तर केव्हाच बंद झाले होते. एवढंच नव्हे, तर आबांसमोर तंबाखू खायचीही कुणाची टाप नव्हती.
गृहमंत्रिपद हाती घेतल्यापासून कधी नव्हे एवढा तणाव त्यांनी गेल्या वर्षभरात अनुभवला होता. राज्यात ठिकठिकाणी झालेले बॉंबस्फोट, दंगलीच्या काही घटना, जातीय तणाव सगळ्यांनी अगदी नकोनकोसं झालं होतं. त्यातून, राज्य सरकारच्या कामगिरीची अर्धी जबाबदारीही त्यांच्यावरच होती. त्यामुळं पक्षाबाहेरच्या विरोधकांपेक्षा पक्षातल्या विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावं लागत होतं आणि वेळोवेळी समाचारही घ्यावा लागत होता. सार्वजनिक जीवनात कुठलीही गोष्ट मनासारखी करता येता येत नाही, याचा अनुभव त्यांना घडोघडी यायला लागला होता. साधी तंबाखू खायची चोरी झाली होती! आता वेलदोड्यावरच समाधान मानावं लागत होतं.
आबांनी गावात फटाक्यांवरही बंदी घातली होती. मागे गणपतीत आबा गावात मुक्कामाला आले होते, तेव्हा सकाळी सकाळी फटाक्यांच्या आवाजांनी ते एकदम दचकून जागे झाले होते. हे स्फोटांचे नव्हे, साधे फटाक्यांचे आवाज आहेत, हे समजेपर्यंत त्यांची फार धावपळ झाली होती. तेव्हापासून कोणत्याही समारंभात, कोणत्याही सणात फटाके उडवायचे नाहीत, असा आदेशच त्यांनी काढला होता.
आबांनी नेहमीप्रमाणे कडक इस्त्रीचा सफारी घातला होता. कार्यकर्त्यांशी गप्पागोष्टी करून झाल्या. पत्नी आणि मातोश्रींसोबत ते देवळातही जाऊन आले. घरी परत आल्यावर कार्यकर्त्यांनी निरोप दिला- "कुणी भगिनी आल्या आहेत, आबांना ओवाळायला.' दिवाळीच्या दिवशीच भाऊबीज कुणाला सुचली, असा विचार आबांच्या मनात आला. तरीही, भाऊबीज म्हटल्यावर त्यांचं मन भरून आलं.
""पाठवून द्या त्यांना आत...'' असं म्हणून आबांनी घरात ओवाळणीची तयारी करायला सांगितलं.
साधारण वीस-तिशीतल्या दहा-बारा तरुणी होत्या. त्यांच्याकडे छुपा कॅमेरा वगैरे नाही ना, याची आधी आबांनी आपल्या सुरक्षारक्षकांना खात्री करून घ्यायला सांगितली. मागे एकदा कुठल्या तरी मुलाखतीच्या निमित्तानं आलेल्या एका मुलीनं असं काहीतरी "स्टिंग ऑपरेशन' करण्याचा प्रयत्न केला होता.
सर्व तरुणींनी आबांना ओवाळलं. भावनांच्या आरतीत भिजलेल्या या प्रसंगानं सगळेच उपस्थित भारावून गेले.
""कोण आहात तुम्ही मुलींनो? आणि भाऊबीज काय देऊ तुम्हाला?'' आबांनी विचारलं.
तशी त्या मुलींची चुळबूळ सुरू झाली. "तू बोल, तू बोल' अशी ढकलाढकली करायला लागल्या. आबांना काही कळेना.
शेवटी धीर करून एक तरुणी म्हणाली, ""साहेब, आम्ही बारगर्ल आहोत. ओवाळणी म्हणून आमचा रोजगार आम्हाला द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे.''
""काय?'' आबा ताडकन जागेवरून उठले. ते फार चिडले होते आणि काहीसे अस्वस्थही झाले होते.
या तरुणींना आत कुणी सोडलं, म्हणून त्यांनी सुरक्षारक्षकांना फैलावर घेतलं. पण चिडचिड करून फारसा उपयोग नव्हता. आता त्यांनी भाऊ म्हणून आबांना ओवाळलं होतं आणि मागितलेली ओवाळणी त्यांना देणं भाग होतं.
""बायांनो, तुम्ही मला चांगलंच फसवलं आहे. तुम्ही मागितलेली ओवाळणी मी थेट तरी काही देऊ शकत नाही. सरकारच्या "इमेज'चा प्रश्न आहे. पण एक काम करू शकतो. सरकारी परवाना असलेल्या हॉटेलांत, पबमध्ये तुम्हाला काम करता येईल. खासगी पार्ट्या किंवा कार्यक्रमांमध्ये तुम्हाला तुमची कला सादर करता येईल.'' आबांना एकदम मनावरचा भार उतरल्यासारखं वाटलं.
----------
प्रतिक्रिया
27 Oct 2008 - 5:22 pm | श्रावण मोडक
तडतड लवंगी.
27 Oct 2008 - 8:11 pm | प्राजु
हे ठीक ठीक वाटलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/