(येकदम) स्मार्ट पुणे

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
3 Jun 2018 - 9:12 pm

कथा आहे सध्या पुण्यांत चालू असलेल्या " Smart City" मोहिमेच्या एका भागाची - शितावरून भाताची परीक्षा होईलच!

पुणे (आधीच "स्मार्ट" असले तरी "Smart City" मोहिमेखाली आणखी जास्त) "स्मार्ट" करण्याच्या प्रयत्नातली पहिली/प्रायोगिक पायरी (Pilot Project) म्हणून परिहार चौक, औंध, पुणे याच्या आजूबाजूचा काही भाग/रस्ता "Smart" करणे काही काळ चालू आहे. ITI रस्त्याशी काटकोनात असलेला परिहार चौक ते ब्रेमेन चौक हा साधारण अर्ध्या किलोमीटरचा रस्ता "ज्या अर्थी" काही काळ वाहतुकीला बंद असलेला आता वाहतुकीला खुला झालेला आहे "त्याअर्थी" तो नक्कीच "स्मार्ट" झाला असावा, किती (तसेच हे "ज्या अर्थी" आणि "त्या अर्थी" मी का म्हणतो आहे) ते आपण थोड्याच वेळात पहाणार आहोत. त्यानंतर "smart" करण्याकरता घेतलेल्या ITI रस्त्याच्या काटकोनात असलेल्या परिहार चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक या साधारण अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्याचे काम काही काळ (सुमारे ८-९ महिने) चालू आहे.

या सगळ्याच भागाला "DP (यातला हा DP बहुतेक Development Plan असावा) रोड" असे दुर्बोध नाव आहे आणि बऱ्याच वेळा माहिती नसलेले लोक या नांवाला "ढोले पाटील" रोड (जो पुण्याच्या वेगळ्याच भागात आहे) समजून स्वतःचा गोंधळ करून घेतात. असे होणे टाळण्याकरता तरी या "DP रोड"ला नांवाचा टिळा लावणारा कोणी "धर्मानंद परमानंद" (किंवा अगदी "देवेंद्र फडणवीस") शोधण्याचा "स्मार्ट"पणा करणे अजून कुणाला सुचलेले नाही.

परिहार चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावर सुमारे ८-९ महिने तुकड्या-तुकड्याने बंद भागात काम चालू, कधी काही भागांत "one lane" वाहतूक चालू, कधी जोरात, कधी संथ गतीने, कधी पूर्ण भागातला वीज पुरवठा आधी ठरवून बंद करून तर कधी आधी न ठरवताच बंद करून अशा वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पादपथ वाढवून जास्त रुंद करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्त्याला लागून असलेल्या सोसायटीची जागा (बहुतेक सोसायटीला वाढीव FSI देऊन म्हणजेच रोख रक्कम न देता) मिळवलेली आहे. रस्त्याचा पृष्ठभाग सिमेंटचा, वेगळ्या तऱ्हेचे/सौरशक्तीवर चालणारे दिवे, जास्ती धारणशक्तीच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या नव्या वाहिन्या (optical fibre cable, telephone cable, पिण्याचे आणि सांडपाणी इ. इ.) भूगर्भातून टाकण्याकरता रस्ता खोदून, वाहिन्या टाकण्याचे काम झाल्यावर पुन्हा नीट केला जाणार आहे. या कामाच्या आधी तयार झालेला परिहार चौक ते ब्रेमेन चौक हा रस्ता देखील याच पद्धतीनुसार काम होऊन पूर्ण झालेला आहे.

परिहार चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता आता लौकरच खुला केला जाईल म्हणून (नाही तर बहुतेक लोकांच्या सहनशक्तीचा अंत झाल्यामुळे किंवा त्या करता मंजूर झालेले पैसे संपल्यामुळे त्या करता केले जाणारे काम थांबेल आणि म्हणून) "स्मार्ट" झाल्याचे जाहीर होईल. या आधी झालेला परिहार चौक ते ब्रेमेन चौक हा रस्ता काम पूर्ण झाल्याने आणि त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने by definition "smart" झालेला आहे.

या काम पूर्ण झालेल्या रस्त्याच्या उदाहरणावरून "smart city"च्या उज्वल भविष्याची चांगली कल्पना येणार आहे. या भागांत प्रत्येक इमारतीचा तळमजला दर्शनी तसेच आतल्याही भागात दुकानांनी (किंवा तशाच उद्योगांनी जसे बँक किंवा ग्राहक सेवा केंद्र) भरलेला आहे. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांखेरीज इतर बरेच लोक नेहमीच या रस्त्यावर बहुधा दुचाकी किंवा चार चाकी वाहनाने येत रहातात, आपले वाहन रस्त्यावर थांबवतात आणि आपले काम आटोपून वाहन घेऊन निघून जातात. हा रस्ता "smart" होण्याचे काम सुरू होण्याआधी रस्त्याच्या कडेला खेचाखेच करून बरीच दुचाकी किंवा चार चाकी वाहने थांबलेली असत. आपापले काम आटोपून परत आल्यावर जे लोक आपले वाहन घेऊन तेथून हलत त्यांच्या वाहनांची जागा लगेच दुसरी वाहने घेत असत. या रस्त्याची आखणी करणाऱ्यानी कदाचित George Orwellच्या लिखाणाने उत्स्फूर्त होऊन "Four Wheels Good, Two Wheels Better" असे ठरवून रस्त्याच्या कडेला रुंद केलेल्या पादपथामधून कोरून काढलेल्या वाहन थांब्यांच्या जागा आखताना दुचाक्यांकरता बऱ्याच पण चार चाकी वाहनाकरता थोड्याच जागा आखल्या.आता एखाद्या चार चाकीच्या मालकाला वाहन थांबवण्याकरता "वैध" जागा मिळालीच तर ती बऱ्याच वेळा (काही) दुचाक्यांकरता आखून ठेवलेल्यातली (म्हणजे "अवैध") असते आणि म्हणून एकदाची कुठलीही जागा मिळवल्याच्या आनंदांत थोडेसेच दुर्लक्ष झाल्यास चारचाकीला लागलेल्या खोड्यातून सुटका करून घेण्याची तजवीज शोधण्याची वेळ येते. आधी ३-४ फूट रुंद असलेल्या पण आता ५-६ फूट रुंद केलेल्या पादपथावरून जाण्यायेण्याकरता पायी चालणाऱ्या लोकांची संख्या तशाच प्रमाणांत न वाढल्यामुळे आता रिकामे रिकामे दिसत असणारे पादपथ हळूहळू स्मार्टपणे फेरीवाले, पथारीवाले किंवा टपरीवाले ताब्यात घेणेही शक्य आहे.

आपल्या देशात "पंचवार्षिक योजना" ही संकल्पना इतकी दृढ झालेली आहे की जे काय करायचे ते लगेच मुळीच न करता त्याचे आधी पांच वर्षे (तरी) नियोजन झाले(च) पाहिजे असा परिपाठ ठरला असल्याने या रस्त्याच्या जवळपासच पोलीस खाते, वीज मंडळ अशांची रिकामी पडलेली जागा वाहने ठेवण्याकरता वापरून अशा वाहन तळापासून लोकांनी फक्त पायी चालत आपले या रस्त्यावरील व्यवहार उरकावेत असा लोकोपयोगी विचार त्यामुळेच कुणाला लगेच करावासा वाटलेला नाही.

म्हणूनच "या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी स्मार्ट व्हावे" या संदेशाचा खरा अर्थ काही तरी वेगळाच आहे हे कळण्याकरता आणखी एक उदाहरण - वाहन थांब्यासारखीच पुरेशी आणि स्वच्छ सार्वजनिक प्रसाधनगृहे (toilets) ही देखील एक नागरी गरज आहे आणि आधीच्या स्मार्ट नसलेल्या रस्त्यांवर ती अपुरी तसेच अस्वच्छ असणे हे जरी नेहेमीचेच असले तरी या स्मार्ट रस्त्यावर काही फारशी वेगळी परिस्थिती नाही.

परिहार चौक ते ब्रेमेन चौक हा साधारण अर्ध्या किलोमीटरचा रस्ता "ज्या अर्थी काही काळ वाहतुकीला बंद असला तरी आता वाहतुकीला खुला झालेला आहे त्याअर्थी स्मार्ट झाला असावा" असे म्हणणे आणखी काहीही नसले तरी नक्कीच तर्कशुद्ध ठरेल. स्मार्टपणाचे आणखी काही आगळे पुरावे परिहार चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक या साधारण अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्यावर सध्या काही काळ चालू असलेल्या कामांत दिसत आहेत.

कुठलेही काम वक्तशीर आणि योग्य खर्चात होण्याकरता standardisation केल्याने (आणि customisation टाळल्याने) बराच उपयोग होतो हे एक व्यवस्थापनशास्त्राचे सर्वमान्य तत्व आहे. हे तत्व या कामाशी संबंधित सर्वानी अगदी शिरोधार्य मानून नवीन तयार केलेला standard design चा रस्ता standard पद्धतीने सध्या असलेल्या "सोसायटीच्या गेट" शी जोडताना, जरूर असलेल्या चढ-उताराची काहीही जाण न ठेवता असा कौशल्याने जोडला आहे की बऱ्याच ठिकाणी "सोसायटीच्या गेट" मधून रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांना कधी आकाश-उड्डाणाचा तर कधी पाताळात बुडी मारण्याचा अनुभव तसेच वाहनाच्या तळाच्या मजबुतीची विनासायास चांचणी-परीक्षा करून घेण्याची संधी मिळत आहे. ज्या जुनाट विचारांच्या लोकांना "standardisation चांगले" हे बहुमोल तत्व मान्य नाही आणि "आकाश-पाताळ प्रवासाच्या" या अनमोल संधीचा फायदा न घेता रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांशी योग्य तऱ्हेचा जोड न दिल्याबद्दल जाता-येता भांडावेसे वाटते त्यांना फक्त "साहेबांशी बोला" असा मितभाषी सल्ला मिळतो आहे. आता, साहेबांशी बोलण्याकरता साहेब शोधणे, त्यांना भेटता येणे आणि मग त्यांना non-standardisation जरूर असल्याचे पटणे या सगळ्याचा रस्त्याच्या smart पणाशी काय संबंध?

काही काळ चालू असलेल्या कामांत रस्ता खोदून त्यांत नव्या विजेच्या आणि दूरभाष/संदेश वाहिन्या तसेच इतरही भूमिगत वाहक नळ्या टाकतांना कधीतरी एका भागात रस्त्याच्या कडेला एक साधारणतः २' x २' x २' मापाचे देऊळ निर्माण झाल्याचे लक्षात आल्यावर रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांनी स्मार्टपणाने पुढे काय करायचे ते त्या सर्वसाक्षी परमेश्वराच्या हातांत सोपवले आहे. त्या स्वयंभू (म्हणजे कुणी तयार न करता आपले आपणच तयार झालेल्या पण ते नक्की कसे तयार झाले याबद्दल मतभेद असलेल्या) देवळाच्या ठिकाणी नेमक्या कशा प्रकारे खड्डा असावा आणि त्यांतून कशा प्रकारे वाहिन्या जोडाव्यात (देऊळ न हलवता त्याच्या खालून किंवा वरून किंवा बाजूने किंवा देऊळ हलवून किंवा आणखी कुठल्या तरी प्रकाराने) यावर एक जोरदार आणि सर्वपक्षीय passing the buck हा खेळ smart पणे चालू आहे. अर्थातच या खेळाचा निर्णय, त्या सर्वसाक्षी परमेश्वराकडून जाहीर होईपर्यंत (आणि नंतर सुद्धा) अशा खेळानंतर बनलेला पादपथ वापरणाऱ्या आम जनतेचे संरक्षण त्या सर्वसाक्षी परमेश्वराकडून होईलच. कुणास ठाऊक, या प्रकारातून कदाचित "अशी स्वयंभू देवळे अचानक रस्ता करण्याच्या किंवा इतर कुठल्याही कामांत अचानक समोर आल्यास काय करावे" याबद्दल कदाचित एखादी संपूर्ण नवी कार्यप्रणाली सगळ्या देशाच्या भल्यासाठी तयार होईल (कारण अशी देवळे रातोरात तयार झाल्याची उदाहरणे अनेक ठिकाणी असतात).

कुठलीही यंत्रणा जेव्हा non -standard असते तेव्हा तिच्या भागांची काळजी घेण्याकरतासुद्धा non -standard यंत्रणेची जरूर लागते. DP Road चा हा चकाचक झालेला भाग चकाचक ठेवण्याकरता -जसे रस्त्याकडेच्या दिव्यांकरता ठेवलेल्या सौर-शक्ती-पटलांची, दिव्यांची, पादपथाची आणि शोभेकरता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या धातूच्या प्रतिमा या सगळ्यांची स्वच्छता ठेवणे - धावत येऊन पळत (अर्धेच) काम करून गायब होणारे नेहेमीचेच सफाई कामगार काही वेगळ्या तऱ्हेने काम करतील किंवा इतर काही व्यवस्थित चालणारी कार्यक्षम व्यवस्था निर्माण केली गेली आहे किंवा त्याची जबाबदारी सर्वसाक्षी परमेश्वराने घ्यायची आहे हे अजून नक्की कळलेले नाही.

सारांश, DP Road चा हा भाग आता एक चकाचक (दोन्ही "च" हे चीजमधल्या "च" सारखे म्हणावेत, चाकातल्या "च" सारखे नव्हेत) रस्ता झालेला असला तरी नक्की कसा आणि किती smart झाला आहे यावर बराच काळ चर्चा(च) चालू राहणार आहे. चर्चेचा शेवट कधीही आणि कसाही झाला तरी एखादा रस्ता जेव्हा गाजावाजा करून, एखाद्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सरकार दरबारी "smart रस्त्याचे काम पूर्ण होऊन आता तो वापरात आणला आहे" असे जाहीर होऊन वापरात येतो, तो smart आहे किंवा नाही याबद्दल सरकार दरबारी तरी काहीच संदेह शिल्लक राहात नाही. म्हणूनच आधी "ज्या अर्थी ... त्या अर्थी..." चा प्रयोग केला आहे.

रस्ता जरी smart व्हायचा असला तरी त्याला smart करताना सगळ्या रूढींचे पालनही केले जात आहे हे वरील उदाहरणांवरून लक्षात येईलच. आतल्या गोटातील बातमी ही की सगळ्यांसाठीच या तऱ्हेच्या (म्हणजे रस्त्यांना smart बनवून टाकण्याच्या) कामाची पुरेशी पूर्वतयारी व्हावी म्हणून (pilot project for a pilot project) त्या आधीच एक दोन वर्षे पुण्याच्या काही भागांत आधी ठीकठाक असलेले डांबरी रस्ते उखडून त्यांवर एक सिमेंटची लादी टाकली गेली आणि अशी रस्त्याची उंची वाढवताना रस्त्याच्या दोन्ही बाजूत काहीही बदल न केल्याने, रस्त्यावरचे पावसाचे पाणी आजूबाजूच्या सोसायटयांच्या आवारांत शिरून आणि सांचून तळी निर्माण होणे इथपासून ते अशा अपुऱ्या रुंदीच्या रस्त्यांवरून मध्येच उंच झालेल्या सिमेंटच्या लादीवरून जाणाऱ्या चारचाकी वाहनांची लादीवरची बाजू आकाशात तर दुसरी रस्त्याच्या कडेची बाजू पाताळांत इथपर्यंत अनेक तऱ्हेचे अफलातून अनुभव लोकांना मिळाले.

सध्या काम चालू असलेला हा रस्ता खुला झाल्यावर कितपत "स्मार्ट" असेल या माझ्या प्रश्नाला बहुतेक या दीर्घकाळ चाललेल्या कामाला वैतागलेल्या एका दुकानदाराने मासलेवाईक उत्तर दिले "आता एSSSकदम बोलून सोडायचं बघा की हे सSSSगळं कसं एकदम स्मा SSSर्टच करून सोडलंय म्हणून न्हाईतर हे सSSSगळं लोSSSकं गोंधळ घालायचं काय सो SSS डत नाहीं बघा". हे मासलेवाईक उत्तर मला जर "smart"पणे record करून इथे टाकता आले असते तर हा रस्ता (आणि त्याच्याशी संबंधित लोक) किती smart झाले आहेत हे देखील यकदम कळून चुकले असते.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

4 Jun 2018 - 5:06 am | कंजूस

कल्याण, नाशिक,पुणे या अतिपुरातन शहरांना जमेल ते वढ्या सोयी द्याव्यात. स्मार्ट शहरे नवीनच निर्माण करावीत.

उगा काहितरीच's picture

4 Jun 2018 - 6:57 am | उगा काहितरीच

आठवड्यातून किमान ३-४ वेळेस या रस्त्यावरून जावं लागतंय आणी हाच तो स्मार्ट रस्ता हे आज कळतंय !

(स्वतःच्या अज्ञानाचि घोर लाज वाटत असलेला) उका !

तब्बल शंभर कोटी प्रत्येक शहराच्या वाट्याला येणार आहेत. आता इतके पैसे कुठे खर्च करायचे? म्हणून आपले मायबाप नोकरशाही नि राजकारणी अशा चानचान 'स्मार्ट' युक्त्या शोधून काढतात. काय राव, करू द्या की त्यांना थोडंसं 'काम'!

नाखु's picture

4 Jun 2018 - 1:03 pm | नाखु

अतिस्मार्ट नगरश्येवक असतील तिथेच पंडीत भीमसेन जोशी सभागृह ही फक्त सत्कार वाढदिवस सोहळ्यापुरते राहील

औंध रस्ता हा एक न उमगणारा भाग आहे, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी हे व्रत पाळत असावा

३६ चा प्रवासी नाखु

मनिमौ's picture

4 Jun 2018 - 2:21 pm | मनिमौ

बाकी पुण्यातल्या सतराशे साठ DP रस्त्यांना सुधा अचूकपणे लागू पडेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jun 2018 - 4:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

स्मार्ट सिटि अंतर्गत की काय माहित नाहि पण..मयुर कॉलनी, आयडियल कॉलनी, वगैरे भागात चांगले डांबरी रस्ते खोदुन, एकेरी वाहतुक वगैरे करुन रस्त्याची पद्ध्दतशीर वाट लावायचे ( पक्षी काँक्रिटीकरण ) काम कित्येक महिने सुरु आहे. आणि त्याची जाहिरात वचनपुर्ती वगैरेची होर्डिंग्स करताहेत. डहाणुकर कॉलनीचीपण अशीच वाट लावली आहे, आणि त्यामुळे सोसायट्यांमध्ये पाणी शिरत आहे.

एकिकडे मेट्रोने पुर्ण पौड आणि कर्वे रस्त्याचा ताबा घेतलाच आहे. आणि वरती थोडा त्रास होईल आज वगैरे बोर्ड लावलेत. त्यातच रोज एक तरी पी एम पी ची बस बंद पडते आणि जनतेचे हाल कुत्रा खाईना अशी परिस्थिती ट्रॅफिकने ओढवते.

तरी आम्ही या सगळ्याकडे अगतिकपणे दुर्लक्ष करुन आणि आणि उज्वल भविष्याची स्वप्ने वगैरे बघत रोज हापिस गाठतोय . काय करणार आलिया भोगासी...