दिवाळीतले चमत्कार-२

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
27 Oct 2008 - 4:55 pm

भुजबळांची `भाऊबीज'
--------------
दिवाळी सुरू होऊन दोन दिवस झाले होते. छगन भुजबळांच्या घरी शुभेच्छा द्यायला येणाऱ्या कार्यकर्त्यांची रीघ थांबली नव्हती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या या चाहत्यांना, समर्थकांना थोपवणं आता अवघड झालं होतं. विशेषतः साठीचा कार्यक्रम झाल्यानंतर ही गर्दी वाढलीच होती.
""अहो, चला! आज दिवाळीतलं शेवटचं स्नान आहे ना, लवकर उटणं लावून घ्या....'' पत्नीनं आठवण करून दिली, तसे भुजबळ जरासे सावरले.
""अगं, हे कार्यकर्ते थांबतील, तेव्हा उठणार ना?'' भुजबळ चिडचिड्या स्वरात म्हणाले.
""मग त्यांना आवरायला सांगा ना! किती वेळ चालणार हे शुभेच्छा प्रकरण?'"
""अगं, कार्यकर्त्यांच्या मनासारखं होऊ दे. हे कार्यकर्ते म्हणजेच माझं सामर्थ्य आहे...!''
""बरं. राहू दे; पण आटपा लवकर आणि फोन झाले का तुमचे नेहमीचे?''
""हो... काही झालेत, काही व्हायचेत. उद्धव, राज, राणे, सगळ्यांना फोन झाले. विलासरावांना सुद्धा झाला. पवारसाहेबांचा लागत नाही फक्त.''
""मग तो लवकर उरकून घ्या. आपल्याला भाऊबीजेला जायचंय, लक्षात आहे ना?''
""अगं हो! खरंच की! विसरलोच बघ! विमानाची वेळ गाठायला हवी. नाहीतर त्या सुबोध मोहितेंसारखं व्हायचं!'' भुजबळ स्वतःच्याच विनोदावर मोठ्यानं हसले.
त्यांनी मग कार्यकर्त्यांना आवरतं घ्यायला सांगितलं. वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते गटागटानं बसले होते. त्यांना एकत्रित शुभेच्छा देऊन भुजबळांनी त्यांना निरोप दिला. काहीसे नाराजीनंच कार्यकर्ते पांगले.
भुजबळ मग पुन्हा आत वळले. अभ्यंगस्नान वगैरे उरकून आले.
""चला, माझी तयारी झाली.'' मग ते आवरून निघाले. मुंबई विमानतळावरून थेट लखनौचं विमान पकडलं.
मुख्यमंत्री निवासात प्रवेश करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्यांना लवून नमस्कार केला. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर या नेत्यांच्या अशाच भव्य पुतळ्यांचे अनावरण करत आहोत, असं दृश्‍य काही क्षण त्यांच्या डोळ्यांसमोरून चमकून गेलं....काहीच क्षण! लगेच भुजबळांनी स्वतःला सावरलं.
"बहन' मायावतींच्या लखनौमधल्या दरबारात येण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. तिथला थाटमाट, प्रासादतुल्य निवास, झगमगाट बघून ते चाटच पडले. महाराष्ट्रानं उत्तर भारतीयांचा हेवाच करायला हवा, असं एकूण वातावरण होतं.
बहन मायावतींनी त्यांचं थाटामाटात, उत्साहानं स्वागत केलं. ओवाळणीचा साग्रसंगीत कार्यक्रम झाला. ओवाळणीच्या वेळीही ब्लॅक कॅट कमांडोंचं पथक भोवती कडं करून होतं. "केंद्रानं माझ्याविरुद्ध कट रचल्यामुळे एवढी काळजी घ्यावी लागते,' असा खुलासा मायावतींनी केला. भुजबळांनी चेहरा कसनुसा केला.
""बहनजी, भाऊबीज म्हणून काय देऊ?''
""मेरे को कोई भी अपेक्षा नहीं। किसी भी निजी अपेक्षा से मैं राजनीती में नहीं आई। माननीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेजी और स्वर्गीय कांशीरामजी का अधुरा सपना पुरा करने के लिए मैं लड रही हूँ।'' मायावतींनी खुलासा केला.
""हो, ते मला माहीत आहे...'' भुजबळांनी सावरून घेतलं. मग त्यांनी खिशातून एक पाकीट काढलं आणि मायावतींच्या ओवाळणीच्या ताटात टाकलं.
मायावतींनी उत्सुकतेनं फोडून पाहिलं. महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी संघटना, समता परिषद, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती वगैरेंच्या शुभेच्छांचं पत्र होतं. मायावती भारावून गेल्या.
""आंबेडकर आणि फुले साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीचं सिंहासन मिळवण्यासाठी एवढं पुरेसं नाही, हे मला माहीत आहे; पण हे केवळ भाऊबीज म्हणून दिलं. सर्वच राजकीय पक्षांशी माझे चांगले संबंध आहेत. शिवाजी पार्कवरच्या सत्कारात बघितलं असेलच तुम्ही! या पक्षांतूनही तुमच्या पाठीमागं बळ उभं करण्याची जबाबदारी माझी!'' भुजबळांनी शब्द दिला.
मायावती भारावून गेल्या आणि लगेच आंबेडकर, फुले, कांशीरामांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी वळल्या...
-------------

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

शेखर's picture

27 Oct 2008 - 5:19 pm | शेखर

दुसरा पण भाग मस्तच... छान फटाके फोडताय...

चालु दे :)

श्रावण मोडक's picture

27 Oct 2008 - 5:22 pm | श्रावण मोडक

फट्टाक!

प्राजु's picture

27 Oct 2008 - 8:01 pm | प्राजु

च्या एकदम बाहेरच.. मस्तच..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/