सगळ्या बापांसारखेच,
आपल्या बापालाही काही कळत नाही
याची खात्री पटल्यानंतर…
मला ह्याच शाळेत का घातलं?
फुटबॉल ऐवजी क्रिकेटला का नाही टाकलं?
असे आरोप केल्यानंतर…
बाप आहे ना, तो चुकतोच.
आपल्यासारखा स्मार्ट तो मुळात नसतोच
हे समजून चुकल्यानंतर…
मग तू स्वतः बाप झाल्यावर,
वैतागून पोरांना ओरडून झाल्यावर
प्रेमाने जवळ घेतल्यानंतर…
कधीतरी आठवेल का तुला
लहानपणी तू शांत झोपल्यावर,
कित्येकदा तुझ्या केसांमधून हात फिरवत,
हळूच तुझी पापी घेऊन,
तुला एकटक पहात असतांना
भरून आलेले माझे डोळे.
माझ्या गालांवरून ओघळणारे ते पाणी
कधीतरी उतरेल का तुझ्या डोळ्यात,
माझ्या हळव्या आठवणीने
मी नसल्यानंतर?
~ मनिष (28/5/2018)
प्रतिक्रिया
29 May 2018 - 4:52 pm | यशोधरा
आई गं.. बाबाची आठवण काढायला लावणारी कविता..
29 May 2018 - 5:07 pm | पद्मावति
मस्तं..आवडली.
29 May 2018 - 5:14 pm | चाणक्य
मनाला चटका लावून गेली.
29 May 2018 - 5:20 pm | सस्नेह
बापाची रिअल व्यथा !
29 May 2018 - 5:38 pm | चांदणे संदीप
चांगली आहे!
Sandy
29 May 2018 - 8:24 pm | सत्यजित...
वाह्...खासंच!
अतिशय सहज शब्दांत अत्यंत भावस्पर्शी!
29 May 2018 - 10:11 pm | अभिजीत अवलिया
चांगली आहे ...
29 May 2018 - 11:08 pm | ss_sameer
बहोत खूब
30 May 2018 - 9:40 am | नाखु
अनुभुती देत डोळे उघडणारे काव्य
आनंदीत बापुस नाखु
30 May 2018 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार
पहिली चार कडवी जबरदस्त आवडली. त्यानंतरचे पाचवे मात्र संदीप खरेंनी लिहील्यासारखे वाटले.
म्हणजे काटाकिरची मिसळ खाताना मधेच एक घास चितळ्यांच्या श्रीखंडाचा अला तर कसे वाटेल? तसे काहीसे वाटले.
बाप म्हणजे अस्सल गावरान कोल्हापुरी मटन रस्सा असतो नुसता जाळ. पहिल्या घासात डोळ्यातन पाणी काढणारा.
आमचा बाप असाच आहे, आणि तो जसा आहे तसाच आवडतो
पैजारबुवा,
30 May 2018 - 11:25 am | मनिष
प्रतिसाद देणार्या सर्वांचेच आभार!
@ ज्ञानोबाचे पैजार - :-)
30 May 2018 - 11:32 am | रातराणी
सुरेख!!
30 May 2018 - 2:10 pm | पुंबा
अप्रतीम.
31 May 2018 - 5:40 pm | खिलजि
असं काहीसं मी पण वागतो माझ्या मुलांबरोबर . सुंदर कविता .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
17 Jun 2018 - 5:14 pm | मनिष
आज father's day निमित्ताने वर काढतोय...