सामान्य माणसाचा सिनेमा

मकरंद घोडके's picture
मकरंद घोडके in जनातलं, मनातलं
28 May 2018 - 7:03 pm

सिनेमा म्हटलं की सगळं कसं वेगळ्याच दुनियेतलं दिसू लागतं आणि आपण त्यात रमून जातो.
काही निखळ मनोरंजन म्हणून तर काहीजण स्वतःला रिलेट करता आलं त्यातून म्हणून तर काहीजण सोशल रिऍकशन म्हणून या माध्यमाकडे आकर्षित होत असतात. पण मेड फॉर इच आदर, पराकोटीचा संघर्ष , कुणीतरी शोधलेली वेगळी वाट,शॉकिंग/ सुखासीन/दुःखदायक द एन्ड च्या संकल्पना या खरंतर फक्त सिनेमा साठीच योग्य आहेत अशी माझी ठाम समजूत होऊ लागली आहे.
दोन तासात ज्या गोष्टीचा उरक उरकायचा आहे त्यातल्या घटना कशा धारदार टोकदार आणि वेगवान असतात. प्रेमी जीवाचं दिसणं वागणं बोलणं राहणं सुद्धा असंच मॅच असलं की ते पाहणं सुद्धा 'के दिल अभी भरा नहीं' अशा अवस्थेत घेऊन जातं!
खऱ्या माणसाचा सिनेमा हा काही हिरोगिरी गाजवण्यासाठी नसतो.
तिथली माणसं सामान्य शक्ती असलेले कधीही भांगपट्टी न करणारे अगदीच बिन इस्त्रीची कपडे घालणारे आणि खुरटलेली दाढी वाढवून घरादाराची काळजी करत फिरणारे असतात. त्यांना हिरोईन वर प्रेम करावं अशा प्रेरणा हिरोईन म्हणवणारी बायको कितीही सुंदर असली तरी मिळणं फार अवघडच असतं!
त्यांचा रोमान्स हा फक्त बेडवर बायकोला कधी वेळ मिळालाच तर कुशीत घेणे किंवा महिन्याकाठी पोराबाळांसकट फिरायला गेल्यावर पाणीपुरी खाऊ घालणे, आईसक्रीम खाऊ घालणे असा लिमिटेड असतो.
महिनाकाठीचे इ एम आय चे आकडे आणि किरणामालाची यादी यातच तो दमून अगदीच शेजारी झोपलेल्या घामेजलेल्या बायकोला आणि निष्पाप मुलांना वाढताना पाहून तृप्त होत असतो.त्यांच्या विवंचना भले छोट्या असतील पण त्या व्हिलन म्हणाव्यात इतक्याही जीवघेण्या वाईट नसतात.
त्यांच्या स्वप्नांची बजेट्स सुद्धा मर्यादित असली तरी ते त्यात खुष असतात.त्यांना फाईट करायची असते ती पोट भरण्यासाठी आणि त्यासाठी त्यांनी अगदी मोहल्लेके दादा ला मारावं इतकं काही गल्लीत कुणी त्यांच्याशी वाकडं वागत नाही. हिरो सारखी जिम करावी म्हटलं तरी त्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि पोषक असा आहार ते पोराबाळांना देऊन मोकळे झालेले असतात.
चार विरंगुळ्याचे क्षण साजरे करण्यासाठी गाणी हवीतच आजूबाजूला! आणि त्यासाठी चार भिंतींच्या आतच कुकर शिट्टी मारतो , वॉशिंग मशीन कपडे डूगडुग करत तबला वाजवते आणि टीव्ही वरच्या मालिका , गल्लीतली वाहने बॅकग्राऊंड म्युझिक वाजवतात आणि लिरिक्स म्हणजे पोराबाळांचे केकाटणारे बिनार्थी संवाद !
प्रेम असतंच पण व्यक्त करायचं कसं ? हलके चुकून आणि ओझरते झालेले स्पर्श हे- सासूबाई बघतील किंवा मुलं मोठी होत आहेत बास करा आचरटपणा अशा शेलक्या शब्दात व्यक्त होत राहतात.
आयुष्यात एकदम जादू वाटाव्यात अशा लोकांची/ वस्तूची एन्ट्री होते आणि आयुष्य बदलूनही जातं खरं पण ती सगळीच लोकं आणि वस्तू आनंद देतीलच असं नाही! काही लोकं (नातेवाईक) नको असताना टपकतात तर काही हवीहवीशी या दुनियेतूनच गळतात.काही वस्तू खूप घासाघीस करून घरात प्रवेश करतात आणि त्या हव्या तशा वापरताच येत नाहीत.त्यानेही हिरो कातावून गेलेला असतो .
हिरो हिरोईन प्रमाणे विरह तर कायम ठरलेला असतो.सकाळी तास दोन तास आणि रात्री तास दोन तास वाट्याला येतात मग त्यातही दिवसभराची उजळणी करण्यापेक्षा उद्या काय काय वाढून ठेवलंय ते बोलण्यात जातो आणि कुचंबलेल्या मनाने नवरा बायको इच्छा नसतानाही पाठीला पाठ लावून कधीतरी झोपून गेलेले असतात.
एकमेकांसाठी इतक्या कसोट्याचं आणि विना अपेक्षांचं आणि फक्त पुढच्या पिढीसाठी म्हणून स्वतःला झिजवून घेणं हेच खरं आयुष्य आहे आपलं आणि ते एकमेकांनी एकमेकांना न सांगता एकमेकांसाठी स्वीकारलं आहे ! यापेक्षा सुखासीन द एन्ड काय असू शकतो या सिनेमाचा?
हे सगळं मेड फॉर इच आदर म्हणण्यापेक्षा म्याड फॉर इच आदर असेल तरच जमू शकतं . नाही का!

साहित्यिकसमीक्षा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

28 May 2018 - 7:38 pm | उगा काहितरीच

साध्या सरळ हिरोवर लिहीलेला साधा सरळ लेख. आवडला. आत्ता जी पिढी ४०-५० च्या आसपास आहे त्यांनी अक्षरशः हेच आयुष्य जगले आहे. आत्ता आत्ता विचार , परिस्थिती थोडीफार बदलत आहे. स्वतःचा , जोडीदाराचा विचार करीत आहेत.

मकरंद घोडके's picture

29 May 2018 - 10:53 am | मकरंद घोडके

बरोबर आहे तुमच