ग्रामीणांचे लग्नसोहळे (भाग:एक)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
16 May 2018 - 5:30 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

आधी ‍तीन दिवसांचा लग्न समारंभ व्हायचा. तो आज दोन दिवसांवर आला. लग्नाची तारीख धरली की आधी सर्व भाऊबंद बस्त्याचा दिवस नक्की करायचे. भाऊबंदांना गोळा करून तालुक्याच्या गावी मोठ्या कापडाच्या दुकानात बस्त्याला जायचं. बस्ता म्हणजे नवरा नवरीसाठी घेतले जाणारे नवे कपडे. या बस्त्यात पहिल्यांदा फडकी नावाचं कापड खरेदी करायची परंपरा होती. ती आता नामशेष झाली आहे. बाकी बस्त्यात वराला दोन पोषाखांचे कापड, नवरीला पाच साड्या, परकर, झंपरचे कापड, वरमायांसाठी लुगडे, सुख्यासाठी कापड, टॉवेल, उपरणे – टोप्या आदी कापडे बस्त्यात असायचे.
पूर्वी गावात तीन दिवसांचे लग्न असायचे. पहिला दिवस मांडवचा. दुसरा टाळीचा- म्हणजे लग्नाचा तर तिसरा दिवस हा मांडवफळ आणि सत्यनारायणचा असायचा. लग्न आठ दिवस पुढे असायचे तेव्हापासून लगीनघराच्या ओट्यावर लोकगीतं गायले जायचे. लग्नातही मोठ्या प्रमाणात लोकगीतांचा समावेश होता. लग्न विधींच्या निमित्ताने अनेक लोकगीतांचा जन्म झाला होता. ही लोकगीतेही आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. लोकगीतांची जागा आता आधुनिक गाण्यांसह वाद्यांनी घेतली.
लग्नाच्या तिसर्याे दिवसांच्या लोकपरंपरा खूप मजेशीर होत्या. नवरा नवरी तोंड धुवायला गावाच्या बाहेर नदीत वा पाटावर वाजत गाजत बैलगाड्यातून जात असत. मांडोफळ, नवरानवरीची सार्वजनिक अंघोळ, काकण सोडणं, घरोघर चहापाणी आदी प्रथांचा वराकडील लग्नाचा हा तिसरा दिवस असायचा. आता तो फक्ता सत्यनारायणापुरता उरला. बाकी परंपरा कालबाहय झाल्या आहेत.
तीन दिवसाचे लग्न आता दोन दिवसावर आले. पहिला दिवस मांडवचा आणि दुसरा विवाहाचा. ग्रामीण भागात विवाह सोहळे अगदी कालपरवापर्यंत आपापल्या अंगणातच होत असत. नंतर काही विवाह शाळेच्या पटांगणात होऊ लागलीत. विवाहाच्या जेवणात वरण, भात, घुगरी आणि शिरा नंतर शिराला पर्याय म्हणून बुंदी असे मोजकेच पदार्थ असत.
आता मंगल कार्यालयांच्या काळात विवाह ग्लोबल व्हायला लागलीत. जेवणावळीतल्या पात्रात अन्न मावणार नाही इतके पदार्थ ठेऊन अन्न मोठ्या प्रमाणात वाया घालवलं जातं. हा समारंभ खरं तर लवकर एका दिवसावर यायला हवा. पण तो एका दिवसावर न येता दिवसेंदिवस प्रतिष्ठित होताना दिसतो. पहिल्या दिवसाच्या मांडवच्या कार्यक्रमात देवांचे लग्न लावणे आणि हळद लावणे हे मुख्य कार्यक्रम असून सायखेडं, वरमायांचे पाय धुणे, तेलन पाडणे आदी अन्य विधी आहेत. वधूचे घर असेल तर वधूला वा वराचे घर असेल तर वराला हळद लावण्याचा कार्यक्रम आता थाटामाटात आणि वाद्यांच्या गजरात होत असतो. पूर्वी हळद लावणे हा विधी केवळ घरगुती कार्यक्रम असायचा. आता हा कार्यक्रम दिवसेंदिवस कमर्शियल होत महत्वाचा समजला जाऊ लागला.
मांडवच्या एका बेळीजवळ माठणी ठेऊन तिथे आरबोर ठेवणे हा विधी आहे. मांडवला कच्च्या धाग्याच्या दोराने गुंडाळणे हा एक विधी आहे. हळद फोडणे, तेलन पाडणे आदी वि‍धीही आज केले जातात. देवांचे लग्न लावणे हा मांडवच्या दिवसाचा मुख्य वि‍धी. वरमायांचे पाय धुणे ही लोकपरंपराही कमी होण्याऐवजी वाढताना दिसते. थोडक्यात, लग्न घरातून आता लोकगीतं ऐकू येत नाहीत. लग्नातले लोकगीतं म्हणणे दिवसेंदिवस कमी होत चालले. मानपानाची प्रथाही कमी होताना दिसत असली तरी लग्न समारंभांना येणारे व्यावसायिक रूप आणि दिखाऊपणा कमी होताना दिसत नाही. कार्यक्रमांना आपल्याला गर्दी हवी असते. मग तो लग्नसमारंभ का असेना. अशी मानसिकता कार्यरत असेपर्यंत लग्नसमारंभ खर्चिकच होत राहतील.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

कर्कश्श आवाजात 8 दिवस रात्री उशिरापर्यंत गाणे वाजवून लोकांना छळणे, हे नवीन खूळ सुरु झाले आहे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

17 May 2018 - 5:23 pm | डॉ. सुधीर राजार...

हो ना.काय करावे? आणि फटाकेही

वकील साहेब's picture

16 May 2018 - 7:49 pm | वकील साहेब

बेळी म्हणजे काय? मांडवाचा बांबू का ?
माठनी ? आमच्याकडे माथनी म्हणतात बुवा.
आणि आरबोर म्हणजे काय ?
मांडवाच्या बांबूला नवीन माथनी बांधून त्यात पाणी भरून ठेवण्याचे काय कारण असावे बरे ?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

17 May 2018 - 5:26 pm | डॉ. सुधीर राजार...

बेळी म्हणजे मांडवाचा बांबूच. बांबूऐवजी लाकडाचा खांब सुध्दा असतात.माठणी आणि माथणी एकच. आर म्हणजे रुई नावाची वनस्पती.पाणी शुभ असते. ते जमीनीत पाझरत असते. आणि जमीनीतून सृजन होते.

पैसा's picture

17 May 2018 - 6:33 pm | पैसा

वेगळ्या प्रथांची थोडक्यात माहिती झाली.