माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

Primary tabs

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
12 May 2018 - 3:16 pm

मायबोली संकेतस्थळावर आमचा एक गप्पांचा कट्टा आहे. तिथे एकदा सहज गप्पा मारता मारता तेथील अक्षय नावाच्या एका मित्राने सगळ्यांना 'माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?' ह्या विषयावर एक निबंध लिहिण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून मी तेथे खालील निबंध लिहिला. आपल्या सर्वांच्या वाचनाकरिता तोच निबंध मी खाली देत आहे.

विषय :- माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

माझं लिहिणं कसं सुरू झालं, हे लिहिण्याअगोदर मला वाटतं की माझ्या वाचन कसं सुरू झालं, ह्यावर मी दोन शब्द लिहावं. कारण माझ्या लिखाणाचा प्रवास हा माझ्या वाचनानेच सुरू झालेला आहे. माझ्या लिखाणाचे पुष्कळसे श्रेय मी माझ्या वाचनाला देतो. आपलं वाचन समृद्ध असलं की आपल्याला लेखन करणं सोपं जातं. आपल्या लिखाणाची भाषा समृद्ध होत जाते. आपल्या वाचनाचे प्रतिबिंब नेहमीच आपल्या लिखाणात उमटत असते. अवांतर वाचनानेच आपल्या लिखाणाचा प्रवाह, त्याचे व्याकरण कसे असावे याचे आपल्याला ज्ञान होत जाते. आणि म्हणूनच इथे माबोवर बरेच जण नवलेखकांना सल्ला देत असतात, की ' आपलं वाचन वाढवा', 'आपले वाचन वाढवण्याची गरज आहे'  ते त्याकरिताच.

मला वाचनाचं वेड कधी लागलं ते आता नक्की आठवत नाही. पण अवांतर वाचनाला सुरवात केली तेव्हा मी चौथी पाचवीत वगैरे असेन. मी मराठी माध्यमातून शिकलोय. माझ्या अवांतर वाचनाला हातभार लावला तो आमच्या शाळेतल्या लायब्ररीयन बाईंनी. त्या बाईंचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. इतर विद्यार्थ्यांना त्या बाई आपल्या टेबलावर परत आलेलीच पुस्तकेच इतरांना देत. पण माझे वाचनाचे वेड पाहून त्या मला खास उशिरा बोलवत. मी उशिरा गेलो की मग त्या मी सांगेल ते कपाट उघडून मला पुस्तकं चाळू देत. आणि मला आवडेल ते पुस्तक माझ्या नावावर मला देत. इतरांना सात दिवसातून एक पुस्तक मिळे तर त्या मला रोज एक पुस्तक वाचायला देत. ५ वी ते १० पर्यंत आमच्या शाळेतल्या लायब्ररीमधील वीसेक कपाटातली एकूणएक पुस्तकं माझी वाचून झाली होती. अगदी भा. रा. भागवत, रत्नाकर मतकरी यांच्या बालसाहित्यापासून ते गदिमा, व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथासंग्रहापर्यंत लहानथोर लेखकांची सर्व पुस्तके मी वाचून काढली होती. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मी एका कपाटावर एकावर एक रचून ठेवलेली यजुर्वेद, सामवेद आणि भगवद्गीता यांची पाच सहा किलो वजनाची गलेलठ्ठ पुस्तकं वाचायला मागितली. त्या लायब्ररीयन बाईंनी मला कोपरापासून हात जोडले. "बाळा रे! हे सर्व वाचण्याचं तुझं आता वय नाहीये". त्यावेळी उठता, बसता, जेवता माझ्या हातात गोष्टींचं पुस्तक असे. माझे वडील माझ्यावर चिडत. "अरे! जरा जेवणाकडे लक्ष दे, नाहीतर नाकात घास जाईल". रस्त्याने चालतानाही माझं लक्ष खाली असे. आणि कुठलाही छापील कागद दिसला की मी तो बिनदिक्कत उचलून वाचत असे. कधीतरी वाचायला काही नसलं तर वाचलेलंच पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचे. अशी त्याच त्याच पुस्तकांची कितीतरी पारायणं मी तेव्हा केली होती. माझी आत्या एका म्युनिसिपल शाळेत शिक्षिका होती. मे महिन्याच्या सुट्टीत आमची शाळा बंद असल्याने मला वाचायला काही नसे, तेव्हा ती आत्या तिच्या शाळेच्या लायब्ररीतील पुस्तकांची थप्पीच्या थप्पी मला वाचायला घरी आणून देत असे.

शाळा संपली. पुढे शिक्षण पूर्ण केलं. नोकरीला लागलो. लग्न झालं. त्याकाळात दादर सार्वजनिक वाचनालयाचा मी सभासद झालो होतो. रोज दोन पुस्तकांचा वाचून फडशा पाडायचो. जवळ स्कुटर होती. पुटूपुटू जाऊन पुस्तकं बदलून आणायचो. पुढे कल्याणला आलो. २९ व्या वर्षी मूल झालं. आणि सगळा घोटाळा झाला. संसार, नोकरी, आणि मूल यांच्यात पूर्ण गुरफटलो गेलो. लायब्ररीत जाणेयेणे होत नसे. माझं अवांतर वाचन पूर्णपणे ठप्प झालं. पण एक मात्र झालं. रोज ट्रेनने येऊन जाऊन दोन तासाचा प्रवास सत्कारणी लावला. तेव्हा प्रवासात मी रोज दोनेक तरी वर्तमानपत्र वाचत असे. त्याबरोबर येणाऱ्या पुरवण्या मी आधाश्यासारखा वाचून माझी अवांतर वाचनाची भूक शमवे.

अशातच काही वर्षांपूर्वी मोबाईलचे आगमन झाले. मोबाईलवर सर्फिंग करता करता मला मायबोली संकेतस्थळाचा शोध लागला. माबोचा सभासद होण्यापूर्वी मी दोन वर्षे फक्त माबोचा वाचनमात्र होतो. माबोवरसुद्धा पुष्कळ वाचन केले. वाचता वाचता मला असे वाटू लागले की आपणही आपल्या आवडलेल्या लेख, कथांना प्रतिसाद द्यावा. आपलेही मत नोंदवावे. म्हणून मी मायबोलीचा रीतसर सभासद झालो. आवडलेल्या लेख, कथा, कवितांना प्रतिसाद देऊ लागलो. सुरवातीला मी एका ओळीचा प्रतिसाद लिही. 'आवडले, छान लिहिलंय, झकास आहे, वगैरे'. मग हळूहळू माझी भीड चेपली. मी चारपाच ओळीत माझे मत मांडू लागलो.

मी माबोचा सभासद होऊन चार एक महिने झाले होते. दीडवर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१६ साली तो दिवस नव्हे रात्र उजाडली, जेव्हा माझ्यासारख्या वाचकाचे एका नवलेखकात रूपांतर झाले. एका सुरवंटाने कात टाकली. त्याचे एका सुंदर फुलपाखरात रूपांतर झाले आणि माझा माझ्या वयाच्या ५४ व्या वर्षी वाचनाकडून लेखनाकडे प्रवास सुरू झाला. त्या रात्री माबोवर मी एक धागा वाचत होतो. त्यामध्ये रामानंद सागर यांच्या दूरदर्शनवरील रामायण मालिकेचा उल्लेख होता. आमच्या लहानपणी दूरदर्शनवर ही मालिका फारच प्रसिद्ध झाली होती. त्यासंबंधीच्या माझ्याही काही आठवणी उचंबळून येऊ लागल्या. मी प्रतिसादात दोनचार आठवणी सलग लिहून काढल्या. पण पाहतो तर प्रतिसाद चांगलाच मोठा झालेला. एक प्रकारे लेखच झाला होता. मग माझ्या मनात आले, हे सर्व आपण प्रतिसादात न लिहिता त्याचा नवा धागाच का काढू नये?

पण माझी नवा धागा काढायची हिम्मत काही होईना. माझ्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. प्रतिसादात काही लिहिणे वेगळे आणि स्वतंत्र लेखन करणे वेगळे. लेख सर्वच जण वाचणार. लोकं काय म्हणतील? लोकं माझ्या लिहिण्यावर बरेवाईट टीका करणार. कोणी वाद घालणार. कोणी माझ्या मागे हसणार. टिंगल करणार. मग मला शरमेने मेल्याहून मेल्यासारखे होणार. माझ्या मनावर भयंकर ताण येऊ लागला. तरीही मी स्वतःला धीर दिला. जे व्हायचे ते होऊन जाऊ दे. मी नवा धागा काढणारच. मग मी त्या प्रतिसादात थोडाफार बदल करून त्याचा मध्यरात्री १ वाजता एक स्वतंत्र धागा काढला. आणि त्याला नाव दिले 'दूरदर्शनवरील रामायण मालिकेची एक आठवण'

पुढचे दोन दिवस माझे कठीण गेले. मी गुपचूप माझा तो लेख उघडून बघायचो, की काही प्रतिसाद आलाय का? आणि माझ्याकरिता आनंदाची गोष्ट होती, की सर्व प्रतिसाद सकारात्मक आले होते. काहींनी माझ्या लिखाणाचे कौतुकही केले होते. ते पाहून माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. मग कालांतराने मी छोटे छोटे लेख, कथा लिहून माबोवर प्रसिद्ध करू लागलो. ते वाचून त्यावर काही नकारात्मक प्रतिसादही येत होते. पण तोपर्यंत माझीही भीड चेपली होती. तशा प्रतिसादांनाही तोंड द्यायला मी शिकलो होतो. माझे लिखाण बऱ्याच जणांना आवडू लागले होते. काही लोकं व्यक्तिशः भेटल्यावर माझे अभिनंदन करू लागले. मी विविध मराठी संकेतस्थळावरही लिहू लागलो. माझा स्वतंत्र ब्लॉग तयार केला. व्हाट्सएप, फेसबुकद्वारे माझे लेख, कथा मी विविध वाचकांपर्यंत पोहोचवू लागलो.

मला निव्वळ वाचक या भूमिकेतून लेखकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचवण्यामध्ये मायबोली, मिसळपाव आणि ऐसी अक्षरेवरील लेखक आणि वाचकांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. मायबोलीवरील 'आपला कट्टा' भाग १ या धाग्यावरील अक्षय, मेघा, च्रप्स, सायुरी, पंडित, अंबज्ञ आणि धागामालक र।हूल यांनी वेळोवेळी माझ्या लिखाणाला दिलेल्या प्रोत्साहनाचा मी शतशः ऋणी राहीन. अक्षय यांचे मी पुन्हा आभार मानतो की त्यांनी मला हा निबंध लिहिण्यास प्रवृत्त केले. तसेच फेसबुक आणि व्हाट्सएपच्या माझ्या मित्रमैत्रिणींचेही मी आभार मानतो, की ते माझे मोडके तोडके लेख, कथा गोड मानून मला लिखाण करायला नेहमीच प्रोत्साहित करीत असतात. धन्यवाद.

(समाप्त)

ता. क. - वरील निबंधात माझे साहित्यिक लिखाण कधी आणि कसे सुरू झाले हे लिहायला मला खूप गंमत आली. मी माझ्या भूतकाळात पुन्हा फिरून आलो. सुरवातीला लिखाण करायला आणि त्याकरिता माहिती गोळा करायला मी घेतलेली  मेहनत आठवली. तेव्हा आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय आठवले. लोकांना आपले लिखाण आवडेल की नाही, हया मानसिक अस्वस्थतेमध्ये जागवलेल्या रात्री आठवल्या. माझ्या लिखाणावर लोकांनी ओढलेले ताशेरे तसेच त्यांनी केलेले कौतुकही आठवले. हा निबंध लिहिण्याचा माझा एक खरोखरच सुखद अनुभव होता. या विषयावर मला तुमचेही अनुभव वाचायला नक्कीच आवडतील. त्यातून मला नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

प्रकटन

प्रतिक्रिया

या धाग्यावरून एक कल्पना सुचली आहे. 'माझं लेखन कसं आणि का बंद झालं?' असा धागा काढण्याचा मिपाकर सिद्धहस्त लेखकांना आवाहन करूया. ;-)

सचिन काळे's picture

12 May 2018 - 5:29 pm | सचिन काळे

हा! हा! हा! अगदी छान कल्पना आहे.

पण मला माफ करावे. मी तिथे लिहू शकणार नाही. कारण गेले चार महिने मी एक अक्षरही लिहू शकलो नाही. याचे कारण शोधण्याचा मी पुष्कळ प्रयत्न करून पाहिला होता. विविध शक्यतांचा विचार केला. पण कुठलेच समाधानकारक उत्तर मला मिळाले नाही. झरा का आटला होता समजलेच नाही. मग मी काय लिहू? हा! हा!! हा!!

विजुभाऊ's picture

12 May 2018 - 5:49 pm | विजुभाऊ

धमाल मुलगा , पिवळा डांबीस , प्राजू , प्रभू मास्तर ,भडकमकर मास्तर , रामदास इत्यादीनी नक्कीच लिहावे

कुमार१'s picture

12 May 2018 - 5:06 pm | कुमार१

असेच लिहिते राहा.
माझ्या लेखनाची सुरवात २१व्या वर्षी कशी झाली ते मी खालील
धाग्यावर लिहिले आहे :
http://www.misalpav.com/node/42534

सचिन काळे's picture

12 May 2018 - 5:31 pm | सचिन काळे

@ कुमार१, धन्यवाद. वाचतो धागा!

शाली's picture

12 May 2018 - 6:29 pm | शाली

छान लिहिलय.
काहींच्या आतला नुकताच जन्मलेला लेखक 'प्रतिसादांच्या राजकारणाने' मेलेला मी पाहिलाय. तो प्रकार जरा वाईटच. असो.
वाचाताना मजा आली.

सचिन काळे's picture

12 May 2018 - 8:11 pm | सचिन काळे

@ शाली, आपले आभार!

थोडीशी असहमत. जर लिखाणात काहीही चांगल असेल तर नक्की चांगले प्रतिसाद मिळतात. संख्या कमी असेल कदाचित पण मिळतात.

कपिलमुनी's picture

13 May 2018 - 2:40 am | कपिलमुनी

णवलेकखांना प्रोत्साहन द्यावे असे धोरण असल्याने या निबंधाला फुल्ल मार्क !
लिहीत राहा

सचिन काळे's picture

13 May 2018 - 7:49 am | सचिन काळे

@ कपिलमुनी, फुल्ल मार्क आणि प्रोत्साहन देण्याकरिता आपले आभार!!

विजुभाऊ's picture

13 May 2018 - 2:22 pm | विजुभाऊ

प्रत्येक प्रतिसादावर री प्रेअतिसाद देण्यासाठी काळे काकाना डब्बल फुल्ल मार्क

सचिन काळे's picture

13 May 2018 - 2:59 pm | सचिन काळे
सचिन काळे's picture

13 May 2018 - 3:00 pm | सचिन काळे

@ विजुभाऊ, हा! हा!! हा!! धन्यवाद!

विजुभाऊ's picture

13 May 2018 - 2:23 pm | विजुभाऊ

प्रत्येक प्रतिसादावर री प्रतिसाद देण्यासाठी काळे काकाना डब्बल फुल्ल मार्क

कंजूस's picture

13 May 2018 - 5:10 am | कंजूस

##लेखक 'प्रतिसादांच्या राजकारणाने' मेलेला मी पाहिलाय.###

- लेखक मरत नाही, लेखन प्रसिद्ध करण्याची उर्मी मरते. प्रतिसाद प्रसवण्यासाठीच केलेल्या लेखनास माफ करत आहे.
---
स्मरण आवडले, लिहित रहा. हजारो फुलं फुललेली आहेत म्हणून छोटंसं रानफूल उमलायचे थांबते काय?

सचिन काळे's picture

13 May 2018 - 7:41 am | सचिन काळे

@ कंजूस, धन्यवाद.

हजारो फुलं फुललेली आहेत म्हणून छोटंसं रानफूल उमलायचे थांबते काय?

वा! फारच सुंदर वाक्य लिहिलंय. आवडलं.

टवाळ कार्टा's picture

13 May 2018 - 12:09 pm | टवाळ कार्टा

शाळा संपली. पुढे शिक्षण पूर्ण केलं. नोकरीला लागलो. लग्न झालं. त्याकाळात दादर सार्वजनिक वाचनालयाचा मी सभासद झालो होतो. रोज दोन पुस्तकांचा वाचून फडशा पाडायचो. जवळ स्कुटर होती. पुटूपुटू जाऊन पुस्तकं बदलून आणायचो. पुढे कल्याणला आलो. २९ व्या वर्षी मूल झालं. आणि सगळा घोटाळा झाला.

मग ऑफिसची कामे कधी केलीत?

सचिन काळे's picture

13 May 2018 - 1:13 pm | सचिन काळे

@ टवाळ कार्टा, मग ऑफिसची कामे कधी केलीत? >>> कामावर प्रोडक्शन जॉब होता. वेगाने काम केले तर कोटा लवकर पूर्ण होई.

बाजीप्रभू's picture

13 May 2018 - 3:49 pm | बाजीप्रभू

माझा माझ्या वयाच्या ५४ व्या वर्षी वाचनाकडून लेखनाकडे प्रवास सुरू झाला

तुमचं वय ५४ आहे? फोटो पाहून वाटत नाही.... तुम्हीपण मोदींसारखे रोज तैवानी मश्रुम खाता कि काय?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
तैवाणी मश्रुम !!!! हा हा हा !!

वय ५४+ असेल तर रामायण लहानपणी कसं पाहिलं!??

सचिन काळे's picture

13 May 2018 - 8:14 pm | सचिन काळे

@ निशाचर, हो! आपली शंका खरी आहे. मी लहानपणी लिहिण्याऐवजी तरुणपणी असे लिहायला हवे होते. लिहिण्याच्या फ्लोमध्ये माझ्या हातून चूक झाली. माबो आणि ऐसीच्या लेखात चुकीची दुरुस्ती मी कालच केली होती. पण मिपावर मूळलेख आपण स्वतः अपडेट करण्याची सोय नसल्याने, फक्त एका शब्दाच्या दुरुस्तीकरिता ऍडमिन यांना मेल करून त्रास देणं योग्य वाटलं नाही.

तरी मी येथे सर्व वाचकांना विनंती करतो की त्यांनी लेखात लहानपणी ऐवजी तरुणपणी वाचावे.

सचिन काळे's picture

13 May 2018 - 8:40 pm | सचिन काळे

@ बाजीप्रभू, मिपाच्या प्रोफाइलवर माझा फोटो कितीही प्रयत्न करूनही धुरकट आणि अस्पष्ट दिसतोय. त्यामुळे त्यावरून तुम्हाला माझ्या वयाचा स्पष्ट अंदाज करता येत नसावा. पूर्वी येथे मी तो स्पष्ट कसा करता येईल याविषयी मदत मागितली होती. पण कोणाकडून प्रतिसाद काही मिळाला नव्हता. तरी आपल्या अवलोकनार्थ तो खाली देत आहे. हा फोटो दोन तीन वर्षांपूर्वीचा आहे. आणि तसंही वयाच्या मानाने मी तरुणच दिसतो. हा! हा!! हा!!

अभिजीत अवलिया's picture

14 May 2018 - 10:26 pm | अभिजीत अवलिया

तुमचे वय खरेच ५४ वाटत नाही काळे साहेब. क्या है आपके चिरतारुण्य का राज हे आम्हाला पण कळू द्या ना. (संतूर सोप वगैरे काही?)
बादवे - मेफोस्टे च्या घवघवीत यशानंतर तुम्ही मेविस्टे लेखमाला लिहिणार होता असे स्मरते. कधी करताय सुरवात ?

सचिन काळे's picture

14 May 2018 - 10:57 pm | सचिन काळे

@ अभिजीत अवलिया, तुमचे वय खरेच ५४ वाटत नाही काळे साहेब. >>> धन्यवाद!!
क्या है आपके चिरतारुण्य का राज >>> ये तो हमेंभी पता नहीं। हा! हा!! हा!!
बादवे - मेफोस्टे च्या घवघवीत यशानंतर तुम्ही मेविस्टे लेखमाला लिहिणार होता. >>> दिल थाम के बैठीये, मेविस्टे आएगा जरूर।

माहितगार's picture

13 May 2018 - 7:59 pm | माहितगार

थोड्या वेळा पुर्वी दुसर्‍या एका धागा लेख प्रतिसादातून समाजऋण या विषयावर मन मोकळ केलं .

आणि या लेखाचे वाचन करताना लायब्रेरीयन लोकांनी आपुलकीने वाचनाची आवड जोपासली जाताना केलेली मदत आठवली. आणि तसे पुर्वाश्रमीचे लेखक प्रकाशक वितरक ई. दृष्य अदृश्य असे अनेकांचे ऋण वाटतात.

सचिन काळे's picture

13 May 2018 - 8:46 pm | सचिन काळे

@ माहितगार, प्रतिसाद आवडला. धन्यवाद.