माणसांचा घोळका आजूबाजूला असतो. आपली (म्हणजे केवळ नात्याने आपली. ती खरोखरंच आपली असतात का हे कोडंच!) म्हटलेली माणसं आपल्या जवळ असतात. सोशल मिडिया वर शे-दोनशे माणसं ‘कनेक्टेड’ असतात. आणि तरी देखील आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा या भाऊगर्दीत मी एकटा आहे असं वाटायला लागतं.
कशामुळे होत असावं हे असं? जरी आपण या जगात कोणीच नाही हे जरी मनाला पटविण्याचा प्रयत्न केला तरी ते मनोमन स्वीकारणं कठीण असतं. आपल्या सुखदुःखांशी कोणालाच म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे आपल्या म्हटलेल्या माणसांना देखील काहीच देणंघेणं नाही हे वाटणं ही माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी शिक्षा असते असं मला वाटतं. आपली माणसं आपल्या बरोबर आहेत हे ठाम माहीत असतं तेव्हा माणूस सगळं काही पचवू शकतो. अगदी समुद्रमंथनातून आलेलं विष सुद्धा. पण जेव्हा कुणीच बरोबर नाही जाणवतं तेव्हा आनंद देखील नकोसा वाटायला लागतो.
आणि माणसांचं बरोबर असणं म्हणजे केवळ शरीराने नव्हे तर मनाने असायला हवं. किंबहुना शरीराने लांब असून सुद्धा मनाने असलेली जवळीक आयुष्यभर आनंद देऊन जाते. आणि काही वेळा माणूस यातंच कमनशिबी ठरतो. का होत असावं हे असं काहींच्या आयुष्यात? स्टीफन हॉकिंग ला इतकं शारीरिक दौर्बल्य येऊन सुद्धा, वर्षोनुवर्षे एकाच खुर्चीला खिळून राहून सुद्धा नसेल का जाणवलं एकटेपण? मग धडधाकट माणसांना का बरं असं कधी कधी वाटत असावं? ध्येयाने झपाटलेल्या माणसांना कधी एकटं वाटत नाही असं म्हटलं जातं कारण इतर कुणीही बरोबर नसलं तरी त्यांचं ध्येय त्यांच्या सदैव बरोबर असतं. कायम सोबत असते त्याची. पण हे झालं असामान्यांचं. समाजात असामान्य माणसं तेव्हाच असतात जेव्हा तिथे सामान्य माणसं देखील असतात. कुणीच सामान्य नसेल तर असामान्य असायचा प्रश्न येतोच कुठे? मग अशावेळी सामान्यांनी काय करायचं?
एक गोष्ट आठवली. एक माणूस आपल्या BMW मधून नेहमी सुसाट वेगात, नेहमीच्या ठरलेल्या रस्त्यावरून जायचा. एका शेतकऱ्याचा मुलगा त्या रस्त्यावर कडेला उभा असायचा. दर दिवशी त्या माणसाची BMW जवळ आली की हा मुलगा हात करून त्याला थांबवायची खूण करायचा. पण वेगाने गाडीतून चाललेल्या या पठ्ठ्याचं कुठलं लक्ष जायला! जायचा सुसाट वेगाने. कित्येक दिवस असे गेले. एक दिवस या शेतकऱ्याच्या मुलाने ती BMW जवळ येताक्षणी त्या गाडीवर दगड भिरकावला. पाठची काच खळकन फुटली. आता मात्र ह्या BMW मधल्या माणसाने गाडी थांबविली. रागानेच तो त्या मुलाकडे आला आणि त्याला जाब विचारणार एवढ्यात तो मुलगा बोलू लागला. म्हणाला, “सॉरी. माझा नाईलाज होता. कित्येक दिवस तुम्हाला हात दाखवून थांबवायचा प्रयत्न करत होतो. तुम्हाला विनंती करून सांगायचं होतं की इथून जाताना गाडीचा वेग थोडा कमी ठेवत जा कारण तुमच्या गाडीच्या प्रचंड वेगाने माझी कडेलाच असलेली शेतातली नाजूक रोपं वाकडी होतात. पण तुम्ही लक्षच द्यायला तयार नाही. मग मी तरी काय करणार? नाईलाजास्तव दगड मारला तुम्हाला हे सांगण्यासाठी. तुमचं नुकसान करायचा हेतू नव्हता. मनापासून सॉरी.” त्या BMW च्या माणसाचा राग कुठच्या कुठे पळून गेला आणि त्या मुलाबद्दल उलट त्याला वाईट वाटलं. “काही हरकत नाही. या पुढे इथून गाडी हळू नेत जाईन.” असं म्हणून तो माणूस तिथून जाऊ लागला. तेवढ्यात त्या मुलाने त्या माणसाला पुन्हा थांबवलं आणि जे काही सांगितलं त्याने त्या माणसाच्या डोळ्यांत पाणी आलं. म्हणाला, “काका, आयुष्यात बेभान होऊन एव्हढ्या वेगाने देखील जाऊ नका की ज्यामुळे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी इतरांना तुमच्यावर दगड मारण्याची वेळ येईल. BMW बाहेर देखील जग आहे. तिथल्या माणसांचा देखील विचार करा.”
मला वाटतं हा विचार, पैसा व मानमरातब या सगळ्याच्या मागे लागून दिशाहीन होऊन सुसाट वेगाने पुढे जात चाललेल्या प्रत्येकाने केला तर गर्दीत एकटेपण वाटणाऱ्या माणसांना कुणीतरी आपला माणूस सापडेल. काय वाटतं?
प्रतिक्रिया
7 May 2018 - 4:33 am | अक्षय कापडी
छान लिहीलंय
7 May 2018 - 10:36 am | श्वेता२४
मला वाटतं हा विचार, पैसा व मानमरातब या सगळ्याच्या मागे लागून दिशाहीन होऊन सुसाट वेगाने पुढे जात चाललेल्या प्रत्येकाने केला तर गर्दीत एकटेपण वाटणाऱ्या माणसांना कुणीतरी आपला माणूस सापडेल. काय वाटतं?
+१००