कर्मण्येवाधिकारस्ते...

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जनातलं, मनातलं
6 May 2018 - 6:31 pm

गेली कित्येक वर्ष भगवंतांनी सांगितलेल्या या वाक्याचा अर्थ लावतोय... हो बरोबरच वाचलत. कित्येक वर्ष.... अहो, भगवद्गीता ही गोष्टच अशी आहे की जितके वेळा ती वाचू तितके वेळा वेगवेगळे अर्थ लक्षात यायला लागतात.

जितक्या प्रमाणात कर्म करू तितक्या प्रमाणात फळ मिळालं पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यात काय चुकलं माझं असं माझं मन मला सारखं विचारायचं. या श्लोकात ४ गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितल्या आहेत. १) फक्त कर्म करण्याचा तुला अधिकार आहे २) कर्माच्या फळांवर तुझा अधिकार नाही. ३) मिळालेल्या फळाला तू कारणीभूत आहेस असे समजू नकोस. आणि ४) या सगळ्यामुळे कर्म न करण्यासही तू उद्युक्त होऊ नकोस.

कसं जगावं आणि का जगावं या दोन्ही प्रश्नांची आयुष्यात उत्तरं हवी असतील तर माणसाने भगवद्गीता वाचावी. नुसते श्लोक नाही. अर्थ महत्वाचा आहे.
फळांवर आपला अधिकार नाही. फळ मिळाले तरी ते माझ्यामुळे असं समजायचं नाही. आणि या सगळ्यामुळे विरक्ती येऊन कर्म थांबवायचं देखील नाही.... किती कुचंबणा होईल माणसाची असं वागलं तर असं सारखं वाटायचं. पण काही प्रश्नांची उत्तरं कालानुरूपच मिळत असतात आपल्याला.

श्री. हिराभाई ठक्कर यांचं ‘कर्माचा सिद्धांत’ नावाचं पुस्तक आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की काही कर्म अशी असतात की त्यांची फळं आपल्याला लगेच मिळतात. उदा. खाल्लं की लगेच पोट भरतं. पाणी प्यायलं की लगेच तहान भागते. पण काही कर्म अशी असतात की त्यांची कर्म मिळायला काही काळ जावा लागतो. आपण एखाद्याला मदत केली की लगेच उद्या तो आपल्याला मदत करेल असं नाही. पुढे काही काळानंतर आपली ही मदत लक्षात घेऊन तो आपल्याला मदत करतो. एखाद्या शिक्षकाने आपल्याला लहानपणी इतकं चांगलं घडवलेलं असतं की त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना जर मदत हवी असेल तर एका पायावर करायला आपण तयार होतो. आज बी रुजविली की उद्या झाड असं होत नाही. इतकंच काय पण एखादा गुन्हा केल्यावर लगेच दुसऱ्या क्षणी शिक्षा असंही होत नाही. मध्ये काही काळ जातो. अशी जी कर्म असतात त्यांची फळं ही साचून राहतात आणि या साचलेल्या फळांचच प्रारब्ध बनतं. योग्य वेळ येताच या प्रारब्धातून आपल्याला फळ मिळतं. पण आपण एवढे आत्ममग्न असतो की जेव्हा वाईट फळ मिळतं तेव्हा आपण आपली या अगोदर केलेली दुष्कृत्य विसरलेले असतो. माझ्या दासबोध समीक्षकांनी खूप छान सांगितलंय मला. ते म्हणाले, वाईट घडतं तेव्हा आपण आपल्याला अगदी बिच्चारे समजू लागतो आणि आपली काहीही चूक नसताना परमेश्वराने आपल्याला ही शिक्षा दिली असं वाटायला लागतं. वास्तविक आपण बिच्चारे वगैरे बिलकुल नसतो. वर जे साचलेलं प्रारब्ध असतं त्याची पिकण्याची वेळ झालेली असते. आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त चांगलं आणि लायकीपेक्षा कमी चांगलं असं कधीच काही मिळत नाही. प्रत्येक फळ हे आपल्या कर्मातूनच निर्माण झालेलं असतं. आपल्याला आपलं जुनं कर्म आठवत नाही कित्येक वेळा (खास करून ते वाईट असेल तर नाहीच नाही!). जुन्या कर्मांची फळं कधी मिळतील हे आपण सांगू शकत नाही आणि ती मिळत असताना कुठल्या कर्मांची ही फळं आहेत हे समजून घेण्याची कुवत नसल्यामुळेच भगवंताने दुसऱ्या अध्यायात सांगितलं की करत असलेल्या कर्मांच्या फळावर तुझा अधिकार नाही. कारण तुझ्या सर्वच कर्मांची Balance Sheet ही मी बनवत असतो. कुठली जुनी Liability कधी मॅच्युअर होईल हे फक्त त्या परमेश्वरालाच ठाऊक असतं.

भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकात स्वामी प्रभुपाद यांनी, माणसाने सदैव कृष्णभावनाभावित कर्म करावे, असं बरेच ठिकाणी म्हटलंय ते त्याच करीता. आपली सगळी कर्म ही त्या परमेश्वराकरीताच करायची असतात. त्यातून २ फायदे होतात. त्याच्या करीता कर्म करीत आहोत ही भावना मनात ठेवल्यामुळे वाईट कर्म करायला मन धजावत नाही. आणि दुसरा फायदा, त्याच्या करीता केलेल्या कर्माचे आपण फळ घेण्याची आसक्तीच मनातून नाहीशी होते.
साधी गोष्ट आहे. जिथे आपला जन्मच मुळी आपण ठरवत नाही तिथे आपण केलेल्या कर्माचे फळ ठरविण्याचा अधिकार आपल्याला असण्याचा प्रश्न येतोच कुठे? केलेलं प्रत्येक कर्म हे यज्ञाप्रमाणे परमेश्वराला अर्पण करत जावं. असं केलं की आपल्यात आणि परमेश्वरात द्वंद्व उरत नाही. आणि मग आपली काळजी तोच घ्यायला लागतो... ‘....योगक्षेमं वहाम्यहम’ म्हणत.

समाजविचार

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2018 - 9:11 pm | प्रसाद गोडबोले

खरं सांगु का ? ह्या श्लोका विषयी थोडीशी अढीच आहे ! उगाचच ओव्हर हाईप आहे हा श्लोक ! कधी कधी तर वाटतं की वेळ त्या महाभारत सीरीज मध्ये वापरल्याने हा श्लोक जास्त प्रसिध्द झाला आहे , =))))
पण हा श्लोक म्हणजे , आमच्या फील्ड मधील उधाहरण देवुन सांगायचं तर रेग्युलेटरी गायडन्स सारखा आहे , म्हणजे " काय करायचं , काय करायचं नाही " हे सांगतो पण "कसं करायचं " ते सांगत नाही !

आता ह्याच श्लोकाच्या नंतरचा हा श्लोक पहा कसला भारी आहे :
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गंत्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ ४८ ॥

तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संगु टाकुनी ।
मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥ २६७ ॥
परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे ।
तरी विशेषें तेथ तोषावें । हेंही नको ॥ २६८ ॥
कीं निमित्तें कोणें एकें । तें सिद्धी न वचतां ठाके ।
तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥ २६९ ॥
आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाची कीर आलें ।
परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥
देखैं जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे ।
तरी परिपूर्ण सहजें । जहालें जाणैं ॥ २७१ ॥
देखैं संतासंतकर्मीं । हें जें सरिसेंपण मनोधर्मीं ।
तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥ २७२ ॥

ह्यात एकदम स्पष्ट गायडन्स आहे की कसं केले पाहिजे ! मला हा श्लोक जास्त महत्वाचा वाटतो ! सेम असाच प्रकार त्या इशावास्योपनिषद मध्ये पण आहे , पहिला श्लोक पहिला चरण काय केलें पाहिजे असा गायडन्स देतो की तेन त्यक्तेन भुञ्जीथा: पण कसं करायचं ते दुसर्‍या श्लोकात - कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः । एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।।२।।

:)

अवांतर : बाकी मला प्रभुपादांविषयी जास्त माहीत नाही , पण श्रीकृष्ण हे त्यांचे पुस्तक अन त्यातील अतर्क्य भाषांतर वाचल्याने माझे मत त्यांच्या विषयी प्रतिकुल झाले आहे ! त्यांचा अचिंत्यभेदाभेद की काय सिध्दांत आहे देव जाणे पण एकुणच मला तो संप्रदाय म्हणजे हिंदु धर्माचे अब्राहमिक रुपांतरण वाटतो. त्यांच्या मते आपण कृष्ण होवुच शकत नाही ! अत एव , गीतेवरील काहीह संदर्भ पहायचा असल्यास ज्ञानेश्वरी उत्तम !

जे मन बुद्धि इहीं । घर केलें माझ्यां ठायीं ।
तरी सांगें मग काइ । मी तू ऐसें उरे ? ॥ ९९ ॥

:)

अबोलघेवडा's picture

7 May 2018 - 12:16 am | अबोलघेवडा

प्रत्येकाला नक्की कुठला श्लोक मनाला भावेल हे ज्याच्या त्याच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. शेवटी आपली इतरांबद्दलची मते काय आहेत यापेक्षा सुद्धा आपण योग्य मार्गावरून जात आहोत ना हे जास्त महत्वाचं.

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.