ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधायला जाऊ नये अशी एक म्हण आहे, पण मला वाटते वयाच्या एका टप्प्यावर सगळयांनाच "कस्त्वं कोऽहं कुत आयातः" असे प्रश्न पडत असावेत आणि मग माणूस आपल्या मुळाचा म्हणजे मूळ ठिकाण गाव देश कुलदैवत वगैरेचा विचार करू लागतो आणि शोध घेऊ लागतो.
माझेही थोडेसे तसेच झाले आणि मी त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. बरीच वर्षे इकडे तिकडे चौकशी केली, जे जे कोणी मेहेंदळे आडनावाचे भेटत गेले त्यांच्याकडे विचारत गेलो. मध्ये मध्ये त्यात खाम्द पडत होता , नोकरीनिमित्ताने भटकणे चालू होते, पण हा विचार मनाच्या एका कोपऱ्यात कायम असायचाच की आपण कोण कुठले आता मूळ ठिकाणी काय असेल आपले कुलदैवत काय (तसे सर्व कोकणस्थांची कुलदेवी म्हणजे योगेश्वरी अंबेजोगाई आणि कुलदैवत म्हणजे कुठलातरी शंकर हे ठरलेले ) तसेच मी ही योगेश्वरीलाच कुलदेवी मानत आलो आणि आमच्या घरी कोणीतरी पूर्वजाने काशीहून आणलेली कालभैरवाची दगडी मूर्ती आहे ते कुलदैवत मानत आलो.
पण वडिलांनी कधीतरी सांगितल्याप्रमाणे मेहेंदळे हे देवरुखजवळ हिंदळे गावाचे आहेत असे माहित होते.या सुट्टीत कोकणात जायचा बेत होताच तेव्हा जमल्यास याही दृष्टीने काही समजले तर बघू असा विचार करून निघालो.
गणपतीपुळे आणि मालगुंडला मुख्य मुक्काम होता तेव्हा मालगुंडला श्री. अमित मेहेंदळे (स्वाद रेस्टोरंट ०२३५७-२३५ १६२ ) यांना फोन करून माहिती घेतली आणि रवाना झालो.
गणपतीपुळ्याला श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पुढे मालगुंडला पोचून श्री. अमित यांना भेटलो . त्यांच्या कडून माहिती मिळाली ती याप्रमाणे ---
मेहेंदळे लोकांच्या अनेक शाखा विस्तारत गेल्या आणि अनेक गावे मूळ म्हणून सांगता येतील देवरुखजवळचे हिंदळे ,मालगुंड आणि गणपतीपुळे ,पनवेलजवळ वारसाई ,वैजनाथ ,रोहा ,कर्जत जवळचे कोठिंबे कोढीमबे अशी अनेक. त्यातील तुमच्या घरात कालभैरवाला कुलदैवत मानतात म्हणजे तुम्ही हिंदळेचे असणार कारण तिथले ग्रामदैवताच मुळी कालभैरव आहे. पण तसे पाहायला गेले तर आपले मूळ कुलदैवत म्हणजे कोळिसरे गावाचे लक्ष्मी केशव आणि मुसळादेवी. आता लक्ष्मी केशवाचे मूळ स्थान अजून तेथेच आहे आणि मराठे नावाच्या गुरुजींकडे त्याची पिढीजात व्यवस्था आहे.पुरवी दरीत २५० पायऱ्या उतरून आत जावे लागायचे पण आता सरकारने मंदिर पर्यन्त चांगला रस्ता केला आहे. कानडे /जोशी / बापट अशा बऱ्याच लोकांचे हे कुलदैवत आहे.
पण मुसळादेवीचे मूळ स्थान मात्र आता कोणाला माहीत नाही. सर्व मेहेंदळे लोकांनी एकत्र येऊन पुण्यात २ संमेलने घेतली त्यातही हा विषय मुख्यत्वे चर्चेला होता.पण बरीच विचारपूस आणि शोधाशोध करूनही काही तपास लागला नाही. इतर घराण्याचा असतो तसा मेहेंदळे घराण्याचा कुलवृत्तांत सुद्धा अजून झालेला नाही. मात्र www.mehendale.इन अशी वेबसाईट तयार झालेली आहे.
शेवटी सर्वानुमते असे ठरले की आपण मुसळादेवीचे देऊळ परत बांधूया आणि स्थापना करूया. मालगुडला ओंकारेश्वर मंदिराच्या प्रांगणातील जागा त्यासाठी मुक्रर केली गेली आणि बांधकामाचा सर्व खर्च ठाण्याच्या तनवी हर्बल वाल्या डॉ. मेधा मेहेंदळे यांनी केला. आता देवीची मूर्ती घडवताना तिच्या हातातले मुसळ उभे ठेवायचे की आडवे हे कोणाला माहित नव्हते पण आडवे मुसळ ठेवून मूर्ती घडेना. म्हणून एक दोन जाणकार लोकांचे मत घेऊन तिच्या डाव्या हाती उभे मुसळ आणि उजवा हात आशीर्वाद देताना अशी मूर्ती घडवली व तिची स्थापना केली गेली.
मेहेंदळे घराण्यात अनेक पराक्रमी आणि किर्तीवंत पुरुष होऊन गेले त्यापैकी काही म्हणजे पुण्याच्या "अप्पा बळवंत चौक " वाले अप्पा यांचे वडील बळवंत गणपत मेहेंदळे , हिंदुस्थान बेकरीवाले मेहेंदळे/ मेहेंदळे गेरेज /मेहेंदळे हाऊस/ठाण्याच्या तनवी हर्बल वाल्या मेधा मेहेंदळे यांचा उल्लेख वर आलाच आहे / इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे ,कल्याणचे दूधवाले मेहेंदळे/अलिबागचे आणि नागावचे मेहेंदळे आणि असे अजून अनेक ज्ञात अज्ञात मेहेंदळे असतील.
"दैवायत्तम कुळे जन्म मादायत्तन तू पौरुषम" अर्थात जन्म कुठे घ्यावा हे दैव ठरवते पण पराक्रम हा ज्याचा त्याने साधण्यावर असते ही उक्ती खरी आहेच पण केवळ आडनाव बंधूचे कौतुक म्हणून जी माहिती मिळत गेली ती वर सांगितली आहे.
असो. मला या विषयांत रस आहे तसा सगळ्यांनाच असेल असे नाही .कदाचित तुम्हाला हे लिखाण कंटाळवाणे ही वाटू शकते पण बोलण्याच्या ओघात जी माहिती मिळत गेली ती लिहिली आहे इतकेच.
प्रतिक्रिया
2 May 2018 - 12:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
ती अशी की -- बर्याच घरांमध्ये लग्न कार्य झाल्यावर बोडण भरण्यची प्रथा असते. म्हणजे ५ किवा अधिक सुवासिनी एकत्र येउन देवीच्या साठी एक विधी करतात. पण मेहेंदळे घराण्यात ते बोडण ज्या परातीत करत असत त्यात मुसळ आडवे मावेल अशी परात असे. पानपताच्या युद्धात एक लाख बांगडी फुटली त्यामुळे बोडण भरण्या साठी सुवासिनी मिळेनात तेव्हापासुन मेहेंदळे घराण्यात बोडणाची प्रथा बंद झाली ती कायमची.
3 May 2018 - 4:33 am | रमेश आठवले
सरदार बळवंतराव मेहेंदळे पानीपतच्या लढाईत मारले गेल्या मुळे तर हे नसेल ?
http://thirdbattleofpanipatmaratha.blogspot.com/2012/08/balwantrao-mehen...
2 May 2018 - 1:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक शोधयात्रा !
2 May 2018 - 1:20 pm | माहितगार
अशातच कुठेतरी वाचले -आता आठवेला :) - , तोच संदर्भ पुन्हा वाचण्यात आल्यास माहिती देईनच पण भारतात मूसल (देवी) पुजा प्रथा बर्यापैकी प्राचीन आहे.
2 May 2018 - 3:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
माहीतीबद्दल धन्यवाद माहीतगार, संदर्भ मिळाल्यास नक्की द्या
2 May 2018 - 5:20 pm | अभ्या..
महांदळे किंवा मांधळे तुमच्यात येत नैत का?
2 May 2018 - 7:24 pm | राजेंद्र मेहेंदळे
हे वेगळेच आडनाव आहे, प्रथमच ऐकले मी तर
3 May 2018 - 2:23 pm | अभ्या..
देशस्थ ब्राह्मणात असते. बहुधा यजुर्वेदी. माझा एक मित्र आहे.
कुलदैवत शंकर बहुधा.
एक लहानसा रॉकेलचा गाडा असताना इरेस पडून 12 पेट्रोलयम ट्रान्सपोर्ट चे टँकर बारा ज्योतिर्लिंगांचे नावे टाकून कमवून दाखव्हायची लै इंस्पायरिंग स्टोरी आहे.
2 May 2018 - 5:18 pm | गामा पैलवान
हेच खरे मुसळवान की मुसळमान की मुसलमान?
-गा.पै.
2 May 2018 - 5:11 pm | उगा काहितरीच
परवाच श्री. अमित मेहेंदळे (स्वाद रेस्टोरंट) इथे जेवण्याचा योग आला. साधं , शाकाहारी, पण चवदार होतं जेवण.
2 May 2018 - 7:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
आधी नंबर लावला नसेल तर निराश होउन परत जावे लागते.
2 May 2018 - 5:22 pm | गामा पैलवान
राजेंद्र मेहेंदळे,
तुमच्या वंशवृक्षाची माहिती आवडली. हिंदळ्याचे मेहेंदळे म्हणतात तर कर्नाटकातल्या हिंडलगा गावाशी काही संबंध आहे का? सहज मनांत आलं म्हणून विचारतोय.
बरीचशी कोब्रा आडनावं यज्ञसंस्थेशी निगडीत आहेत. तसा काही संबंध सापडतोय का हे पाहणं रोचक ठरावं.
आ.न.,
-गा.पै.
2 May 2018 - 7:22 pm | राजेंद्र मेहेंदळे
मलातरी हिंडलगा गावाशी काही संबंध असल्याची माहिती नाही.
2 May 2018 - 8:08 pm | माहितगार
सिंध मधले 'मेहें चो दाळो ' अहो तुमचेच असणार , अधिकार सांगावयास मुळिच हरकत नाही :) (ह. घ्या.)
2 May 2018 - 8:13 pm | माहितगार
खरं म्हणजे गावांच्या नावांचा डाटाबेस तपासण्याचा प्रयत्न केला पण मेहेंदळे शब्दाशी नेमके मिळते जुळते काही मिळाले नाही :(
3 May 2018 - 2:06 pm | राही
आपण हसून घ्या म्हटले आहेच तरी पण लिहावेसे वाटले. 'मोहेन जो दाडो' याचा सिंधी भाषेत अर्थ 'मृतांचे टेकाड'असा होतो.
3 May 2018 - 4:13 pm | माहितगार
व्युत्पत्ती शोधताना अनेक शक्यता लक्षात घ्याव्या लागतात कारण काळाच्या ओघात शब्दोच्चारणांचे अपभ्रंश कसे होतील ते सांगणे मोठे कर्म कठीण, अगदी ताणायचे ठरवले तर मेहेनचा अर्थ स्मृतीतून गेल्यामुळे सिंधीत माहित असलेल्या अर्थाचा उच्चार मोहेन गल्लत होऊन घेतला गेला -पण मी काय म्हणतो की प्रत्यक्षात तिथे काही मोहेन बिहेन काही नाही मस्त प्रशस्त शहर होते हि वस्तुस्थिती आहे की नाही , मग उगीचच आपला मनातला आधीकार का सोडायचा, बाकी भेटवस्तू देणे होत नाही चांगली स्वप्ने द्यावयास काय हरकत आहे ? आणि समजा त्यांना ते नाही आवडले तर माहिमला एखादे तळे (माहिमतळे ते माहिमदळे मेहेंदळे :) ) असल्यास तेही मेहेंदळें ना बहाल करु हाकानाका :) बाकी ह.घ्या . चे पूर्ण रूप मी सहसा हलकेच घ्या असे करतो , हसून घ्या पण ठिक आहे .
विनोदा कडून मूळ मुद्द्याकडे कोकणस्थांच्या आडणावातील मोठा भाग हा ग्रामनामावरुन आला आहे असे वाटते आणि मेहेंदळे बाबत हि शक्यता सुद्धा वाटते पण मेहेंदळे गावाच्या नावातील म जाऊन हिंदळे तेवढे शिल्लक रहाणे शक्य असले तरी एका गावाच्या नावा सारखी अनेक गावे असतात मग मेहेंदळे मधील म शिल्लक असलेले तत्सम उच्चारणाचे गाव अद्याप तरी नजरेत आलेले नाही . हे एक कोडे आहे. आडनावांचा दुसरा प्रकार व्यवसाय निष्ठ असतो,, वर अभ्यांनी सुचवलेले महांदळे एखाद्या मोठ्या दलाचा आधिकारी पद हि शक्यता मला व्यक्तीशः अधिक वाटते.
3 May 2018 - 10:21 am | प्रचेतस
छान लिहिलंय.
आडनावांचा इतिहास शोधणे अतिशय रंजक असते.
योग्य तेच केलेत. आयुधधारी देवतांच्या हातातील लांबलचक आयुधे ही उभीच असतात उदा. खड्ग, गदा, तलवार, खट्वांग
3 May 2018 - 2:13 pm | राही
अन्नपूर्णेच्या हातांतली पळी ही आडवी दोन हातांत धरलेली अशी तिच्या मांडीजवळ असते. अर्थात अन्नपूर्णेची मूर्ती बसलेल्या स्थितीत असते. त्यामुळे ती लांब पळी उभी दाखवणे शक्य होत नसेल किंवा सौंदर्यपूर्ण दिसत नसेल.
3 May 2018 - 2:46 pm | प्रचेतस
इथे आयुध हा शब्द शस्त्र ह्या अर्थाने वापरलेला आहे. त्यामुळे पळी, वीणा आदी वस्तु गृहित धरल्या नाहीत. मुसळ हे जास्तकरुन शस्त्रांमध्ये समाविष्ट केले जाते.
3 May 2018 - 2:16 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण काही देवतांच्या हातात आडवी आयुधे असु शकतात ना? जसे की अन्नपुर्णा देवीच्या हातातील पळी, सरस्वतीची वीणा वगैरे...
3 May 2018 - 2:48 pm | प्रचेतस
शस्त्र म्हणून आयुध हा शब्द वापरलेला आहे म्हणून, मुरली, वीणा, पळी, तंबोरा आदी सहसा आडवे दाखवले जाते. मौसल मात्र सदैव उभेच दिसते.
3 May 2018 - 4:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
आता समजले. बाकी आपल्याएव्हढा माझा अभ्यास नाहीच, फक्त उत्सुकता म्हणुन विचारले.
3 May 2018 - 4:26 pm | पैसा
बलराम मुसळ धारी होता त्याच्या मूर्ती कशा असतात?
3 May 2018 - 4:33 pm | प्रचेतस
मुसळ नाही, नांगर. हलधर.
नांगर सदैव उभाच असतो हातात. सहसा नांगराचा फाळ हा खांद्यावर टाकलेला आढळतो.मुसळ असलेली मूर्ती म्हणजे लकुलिश शिव. त्याच्या हातात लकुड असते (मुसळसदृश निमुळता होत जाणारा लाकडी दांडा. लकुलिश बैठ्या स्थितीत असूनही लकुड उभेच असते.
3 May 2018 - 5:27 pm | पैसा
http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/10765-2013-03-0... या मुसळच्या तुकड्याचे दर्भ झाले आणि त्या दर्भाची पुन्हा मुसळे बनली. त्यांनी मारामाऱ्या करून यादव नष्ट झाले.
3 May 2018 - 4:30 pm | पैसा
अशा जुन्या कथा खूप मनोरंजक असतात.
3 May 2018 - 4:35 pm | खिलजि
फार सुंदर धागा . सुदैवाने आमच्या घराण्यामध्ये अजूनही वंशावळ उपलब्ध आहे . मी तर असं ऐकलं आहे कि त्यांची दौतही वेगळी असते म्हणे . आमचा नंबर तर जन्माला आलो तेव्हाच लागला आहे त्यामध्ये आता मुलांचीही नावे टाकून घेईन म्हणतोय . हा धागा वाचून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि नवीन कामही लक्षात राहिले आहे . ते म्हणजे माझ्या मुलांची नावे तिथे जाऊन दाखल करणे . सुंदर धागा ,मेहेंदळे साहेब ..
सिद्धेश्वर विलास पाटणकर
3 May 2018 - 5:20 pm | शाली
छान माहीती मिळाली.
3 May 2018 - 5:57 pm | सूड
सुंदर माहीती.