आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे : २

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
26 Apr 2018 - 10:52 am

मागिल पान : आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे

२०१४ मध्ये बाळंतपणासाठी दीर्घ भेट दिल्यावर आमच्या त्या पाहुण्यांनी २०१५ मध्ये एक दोन दिवसांची धावती भेट दिली होती. तेव्हा काय बिनसले माहीत नाही, पण जास्त दिवस ते थांबले नाहीत. बहुतेक त्यांना जास्त चांगले घर मिळाले असावे. कारण, त्यानंतरची दोन वर्षे तर त्यांनी आमच्याकडे फिरकूनही बघितले नाही. त्यांचे जपून ठेवलेले घरटे बिनवापराने मोडकळीला आले आणि केव्हातरी साफसफाई करताना काढून टाकले गेले. जणू आमचे पाहुणे आम्हाला विसरून गेले आणि आम्हालाही "दृष्टीआडची सृष्टी" या न्यायाने त्यांच्या आठवणीने रुखरुख वाटणे बंद झाले होते :(

आणि अचानक...

एक आठवडाभर अगोदर गॅलरीत हालचाल दिसू लागली आहे. यावेळचे पाहूणे बुलबुल प्रकारातलेच आहेत पण तेच ते जुने पाहुणे नाहीत. जुने पाहुणे तांबड्या रंगांची जोरदार शायनिंग मारणारे होते. आताचे तेवढे रंगीबेरंगी नाहीत, मध्येच एखादा लालसर ठिपका सोडला तर अंगभर बहुतांश करड्या रंगांच्या छटा आहेत. पण, रंग दुय्यम महत्वाचा आहे... कोणीतरी पाहूणे परत आपल्याकडे वस्तीला आले याचाच अत्यानंद झालेला आहे !

हे नवीन पाहुणे तसे बर्‍यापैकी बेफिकीरच दिसत आहेत. त्यांनी स्वतंत्र घरटे बनवण्याची पण तसदी घेतलेली नाही. "एखाद्या कुंडीतल्या झुडुपाच्या पानांचा आडोसा पुरे झाला, चार पाच आठवड्यांसाठी उगा मस्त घर बनवणे व ते सजवणे, यासारख्या फुटकळ गोष्टींत वेळ आणि श्रम खर्च करणे व्यर्थ आहे" असा व्यवहारी विचार करणारे हे समजूतदार आधुनिक जोडपे आहे ! त्यामुळे, पूर्वीच्या जोडप्याने वापरलेल्या, "नराने घरटे बनवणे, मादीने त्यांत खोट काढून एखादा भाग उध्वस्त करत राहणे, नराने निमुटपणे मादीचे समाधान होईपर्यंत उस्कटलेला भाग परत बांधून काढणे", अश्या अनेक पायर्‍या या जोडप्याने गाळल्या आहेत. त्यांनी एकमताने, गॅलरीत टांगलेल्या एका स्पायडर प्लँटच्या कुंडीचा कब्जा घेऊन सरळ त्यातच अंडी घातली आहेत ! यावरून, यांचे 'सातजन्मिच्या आणाभाकांसह लग्न' झालेले नसून, केवळ एका विणीच्या हंगामाचा 'लिव्ह-इन' करार झाला असावा असा अंदाज आहे. पाहुणे फार बुजरे असल्याने आणि आम्हाला पक्षांची भाषा येत नसल्याने या अंदाजाची खात्री करून घेणे कठीण आहे... पण वर सांगितलेला (घरटे बांधण्याच्या पायर्‍या गाळणारा) "सबस्टॅन्शियल सर्कमस्टॅन्शिअयल एव्हिडन्स" आमच्या बाजून आहे, यात वाद नाही ! :)

अंडी कुंडीत खोलवर असल्याने पाहुंण्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांचे फोटो घेणे टाळले आहे. मात्र, त्यांच्या नकळत, दूरून घराच्या आतून त्यांच्या लगबगीचे फोटो घेणे जमले आहे...

आता, खाऊसाठी चाललेला पिलांचा चिवचिवाट, त्यावेळी घरट्यातून वर दिसणार्‍या त्यांच्या आ वासलेल्या चोची आणि नंतर त्यांचे उड्डाणशिक्षण हे सगळे कौतूक ऐकण्या-पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे !

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

26 Apr 2018 - 11:03 am | अनिंद्य

अहाहा, तुमचा हेवा वाटतो.

फोटोतली हिरवळ दृष्ट लागण्यासारखी आहे.

पाहुण्यांना 'हाय' सांगा :-)

कुमार१'s picture

26 Apr 2018 - 11:14 am | कुमार१

त्यांची अन तुमची लगबग फार छान बुवा !

श्वेता२४'s picture

26 Apr 2018 - 11:43 am | श्वेता२४

असे पाहुणे राहायला आले तर कुणाला आवडणार नाही?

छान!
वेलकम ड्रिंक ठेवले का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2018 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

झाडाच्या प्रत्येक कुंडीच्या खाली असलेल्या बशीत नेहमीच पाणी असते. (पाणी वाहून वाया न जाता ते कुंडीच्या मातीत परत शोषले जावे व झाडाला सतत पाणी मिळत रहावे यासाठी केलेल्या या व्यवस्थेचा असा "डबल बेनेफिट स्कीम" सारखा उपयोग होतो. :)

जेम्स वांड's picture

26 Apr 2018 - 2:50 pm | जेम्स वांड

हे ही लिहितात काका! काका तुम कौन हो भाई! किती सुंदर लिहिता, ह्या लेखन प्रकारावर अजून जोर द्या ही एक नम्र विनंतीवजा डिमांड आमची :)

सस्नेह's picture

26 Apr 2018 - 3:32 pm | सस्नेह

तुम्ही बागेत राहता वाटतं ?
.. पाहुणे तुमच्या घरी की तुम्ही पाहुण्यांच्या ? :)

प्रचेतस's picture

26 Apr 2018 - 3:51 pm | प्रचेतस

मस्त एकदम

एस's picture

26 Apr 2018 - 4:48 pm | एस

अरे वा! भारीच की!

manguu@mail.com's picture

26 Apr 2018 - 6:28 pm | manguu@mail.com

छान

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2018 - 12:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या पाहुण्यांच्या कौतुकाचे चार शब्द टंकल्याबद्दल सर्व प्रतिसादकांना धन्यवाद !

पद्मावति's picture

27 Apr 2018 - 2:48 pm | पद्मावति

मस्तच.

Jayant Naik's picture

27 Apr 2018 - 3:15 pm | Jayant Naik

फार सुरेख निरीक्षण

nanaba's picture

27 Apr 2018 - 3:34 pm | nanaba

मज्जा आली वाचायला..

सुबोध खरे's picture

27 Apr 2018 - 8:32 pm | सुबोध खरे

सुंदर

अभिजीत अवलिया's picture

27 Apr 2018 - 10:43 pm | अभिजीत अवलिया

छान.
३ वर्षांपूर्वी आमच्या गावच्या घरात एका अश्याच बुलबुल सदृश्य जोडप्याने शेतातील माती वापरून घर बनवले होते. त्यांच्या घरट्यात हे जोडपे आणि ३ पिल्ले राहत. सकाळी लवकर उठून दिवसभर ते जोडपे पिल्लाना खाऊ आणून भरवत असे आणि संध्याकाळी साडेसहा वाजले की चिडीचूप झोपी जात. आम्हाला तर ते बिलकुल घाबरत नसत. १० दिवसाच्या माझ्या तिथल्या मुक्कामात त्यांचा हाच दिनक्रम होता. नंतर मी पुण्याला परत आलो. ३-४ महिन्यांनी परत गेलो तेव्हा घरटे रिकामे होते.
त्यांच्या घरट्यात परत कोणीतरी अंडी घालेल म्हणून आम्ही घरटे तसेच ठेवले. पण दोन वर्षांपूर्वी परत अशाच एका पक्ष्यांच्या जोडीने ते घरटे न वापरता दुसरे घरटे आमच्या घरात बांधले. पक्षी बहुतेक दुसऱ्यांची घरटी वापरत नसावेत.

नंदन's picture

28 Apr 2018 - 3:52 am | नंदन

झकास!

श्रीगुरुजी's picture

28 Apr 2018 - 2:41 pm | श्रीगुरुजी

मस्त! तुमचा हेवा वाटतो डॉक्टरसाहेब. काही वर्षांपूर्वी एका बुलबुलच्या जोडप्याने घराच्या बागेतील एका अशोक वृक्षावर घरटे करायला सुरूवात केली होती. घरटे बरेचसे पूर्ण झाल्यावर अचानक ते पक्षी नंतर फिरकलेच नाहीत. नंतर एका शिंपी पक्ष्यानेही एका लिंबाच्या मोठ्या झाडाच्या अगदी टोकावर घरटे बांधायला सुरूवात केली होती. घरटे निम्म्याहून जास्त पूर्ण झाल्यानंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने ते घरटे नष्ट झाले.

निशाचर's picture

28 Apr 2018 - 8:15 pm | निशाचर

हवेहवेसे पाहुणे

Nitin Palkar's picture

28 Apr 2018 - 8:31 pm | Nitin Palkar

सुंदर वर्णन.

मदनबाण's picture

28 Apr 2018 - 10:01 pm | मदनबाण

या 'लिव्ह-इन' कराराचा पुढचा प्रवास पाहण्यास उत्सुक ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firing part 2

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2018 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

आज पाहुण्या पालकांची जरा जास्तच लगबग दिसली. तेव्हा त्यांच्या नजरेस पडणार नाही अश्या बेताने खिडकीतून घरट्याकडे नजर ठेवली. फार वेळ वाट पहावी लागली नाही. आई-वडिलांपैकी (यांच्यात ओळखू यावा असा फरक दिसत नाही) एक येऊन कुंडित खोलवर चोच खुपसू लागला. चोचीत नक्की काय आणले हे दिसत नव्हते. पण, चोचीने आपले काम व्यवस्थित केले होते ! लगेचच आ वासलेली एक चिमुकली चोच कुंडीतून बाहेर डोकावू लागली...

नंतर थोड्या वेळाने मात्र चोचीत एक मोठा तांबूस रंगाचा तुकडा आला आणि यावेळेस ताणलेल्या मानांसह दोन आ वासलेल्या चोची स्पष्ट दिसू लागल्या. पालक दोघांत भेदभाव न करता आपल्या चोचीतला तुकडा आलटून पालटून मायेने दोन्ही पिल्लांना भरवत होता/होती. हा उदरभरण सोहळा भारून पहात असताना मध्येच जागा होऊन काही चलत्चित्रण केले...

आता हा सोहळा परत परत पाहण्यात काही दिवस भूर्रकन उडून जातील !

अजून बाळांना कंठ फुटलेला नाही... ती कसर भरून निघाली की या सोहळ्याची मजा द्विगुणीत होते !

यशोधरा's picture

29 Apr 2018 - 6:29 pm | यशोधरा

झकास!!

अनिंद्य's picture

30 Apr 2018 - 11:07 am | अनिंद्य

वाहव्वा. सोहळा मस्त टिपलाय.
मागच्या वर्षी आम्हालाही हे भाग्य लाभले होते पण चित्रफीत काढण्याचे सुचले नाही.

शेखरमोघे's picture

29 Apr 2018 - 9:08 pm | शेखरमोघे

आतापर्यन्तच्या या पक्षी कुटुम्बाच्या प्रगतीचे छान वर्णन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2018 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

पिल्लांचा चिवचिवाट सुरू झाल्यापासून पाच सहा दिवसांत, खाण्याच्या वेळेला तीन चोची वर डोकाऊ लागल्यावर दोन नव्हे तर तीन पिले आहेत हे कळले... आणि आमचा आनंद त्रिगुणित झाला !!

त्याच काळात चार दिवसांसाठी भेटायला आलेल्या नात्यातल्या एका पिलाने त्या आनंदात अजून जास्त भर घातली होती. घरातल्या व गॅलरीतल्या चिवचिवाटाचा आणि खाण्यापिण्याच्या वेळेच्या गोंधळाचा सोहळा पाहण्यात गेले काही दिवस कसे भुर्रकन उडून गेले हे कळलेच नाही !

अंडी तीन चार दिवसांच्या अंतराने घातली गेली असावी. कारण, पिल्ले जसजशी मोठी होऊ लागली तशी त्यांच्या आकारमानातला फरक सहजपणे दिसून येऊ लागला. काही दिवसांतच, सगळ्यात मोठे पिल्लू इकडेतिकडे पाहत, धीटपणे कुंडीच्या बाजूवर बसू लागले आणि मधूनच बसल्या बसल्या पंख फडफडवण्याचा व्यायाम करू लागले.

खाणे आल्यावर आपल्या छोट्या भावंडांबरोबर "मी पहिला, मी पहिला" असा गोंघळ न घालता ते बराच वेळ कुंडीच्या कडेला उभे राहून इकडे तिकडे पाहत जणू राखणदाराचे काम करत असे. छोट्या भावंडांची भूक भागत आल्यावरच त्याच्या समोर केला गेलेला घास घेत असे. असे हे भलतेच शहाणे मूल होते ! पक्ष्यांमध्ये सहसा असे दिसत नाही. किंबहुना, कित्येक पक्षांत, प्रबळ (अल्फा) पिल्लाने लहान पिल्लांचे खाणे चोरणे, त्यांना घरट्यातून खाली ढकलून देणे, पालकांनीही प्रबळ पिल्लाची जास्त काळजी घेणे, इत्यादी प्रकार सर्वसामान्य आहेत. या कृती कठोर वाटल्या तरी त्यांच्यामुळे पुढील पिढी जास्तीत जास्त कणखर व ताकदवर राहते. या पार्श्वभूमीवर, आमच्या पाहुण्यांचे कुटुंब फारच "सुधारलेले" दिसत होते आणि मुलांना चांगले वळण लावण्यातही यशस्वी झालेले दिसत होते ! आमच्या शेजाराचा त्यांच्यावर इतका सकारात्मक प्रभाव पडलेला पाहून आम्हाला भरून आले नसते तरच आश्चर्य ! ही ही ही, ख्या ख्या ख्या ;) :)

या प्रजातीत पिले अकालीच प्रौढ होतात असे दिसते. पिल्लांना उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यासाठीही पालकांना फारसे श्रम घ्यावे लागत नाही. कारण, कुंडीतच बसून पंख फडफडवणारे ते मोठे पिल्लू केव्हा उडून कायमचे निघून गेले हे कळलेच नाही. एका दिवशी, खाऊ खाण्याच्या वेळेस फक्त दोनच चोची दिसू लागल्या, तेव्हाच ते समजले...

नंतरच्या चार सहा दिवसांत इतर दोन पिलांची इतक्या भरभर वाढ झाली की आश्चर्य करायलाही पुरेसा वेळ मिळाला नाही. हा हा म्हणता कुंडी रिकामी झाली. दोन दिवस काहीच हालचाल नाही म्हणून कुंडीत डोकाऊन पाहिले तर, कुंडीत खोलवर असलेले, आजपर्यंत नजरेस न आलेले आणि रिकामे पडलेले, चालू प्रकारचे (नो फ्रिल्स, वर्किंग स्टाईल) तरीही सुबक असे हे घरटे दिसले...

असे हे आमचे पाहुणे, आले काय नी गेले काय !... त्यांच्या इन मिन तीन चार आठवड्यांच्या सहवासांने आमचे विश्व भारून ठेवले होते. आपली पिल्ले वाढविण्यात आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यात दशके खर्च करणार्‍या प्रजातितील आपण. त्यांच्या एका पिढीतिल एक छोटा कालखंड, आपल्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या कालखंडाचे फास्ट फॉरवर्ड पुनर्दर्शन देऊन गेला... कर्मधर्मसंयोगाने त्याच कालखंडात आमच्याकडे आलेल्या छोट्या पाहुणीच्या उपस्थितीमुळे, हा सोहळा काळजाला जरा जास्तच भिडला !

आता, पुढच्या वर्षाच्या भेटीची अपेक्षा आणि दीर्घ प्रतिक्षा करणे भाग आहे. हे पाहुणे वर्षातून दोन-तीनदा तरी का बरे भेट देत नाहीत ?! त्यासाठी त्यांच्या काही खास अटी असल्या तरी त्या आम्हाला (माहीत होण्याअगोदरच) मान्य आहेत !