मित्र नव्हे, परिचित !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
18 Apr 2018 - 8:51 am

माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. एम.डी. ही पदवी प्राप्त करून मी एका हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. हळूहळू हॉस्पिटलचा विस्तार होत गेला. मग तेथील डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली. अशाच एका नवीन भरतीच्या वेळी माझ्या विभागात डॉ. सतीश हा माझा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झाला. महिनाभरातच मी त्याच्याविषयी एक अंदाज बांधू शकलो. तो जरी फारसा हुशार नसला तरी तो नेमून दिलेली कामे व्यवस्थित करीत असे.

रोज जेवणाच्या सुटीत आम्ही दोघे एकत्र डबा खाऊ लागलो. त्या वेळेस मी विवाहित होतो तर तो अविवाहित. असंख्य विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा होत. त्यामध्ये क्रिकेट, राजकारण, नाटक-चित्रपट इ. नेहमीचे विषय तर असतंच, पण त्याचबरोबर स्त्री-पुरुष संबंध या तारुण्यसुलभ विषयाचाही समावेश असे. सतीश या विषयातील त्याच्या शंकांचे माझ्याकडून निरसन करून घेई. त्याचे असे कुतूहल पाहून मलाही माझ्या विवाहपूर्व दिवसांची आठवण होई! आमच्या विभागात आम्ही दोघेच डॉक्टर असल्याने आमची मैत्री दृढ होत गेली.

कालांतराने सतीशच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुली पाहणे सुरू केले. त्या ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमांचा सविस्तर वृत्तांत तो मला दुसऱ्या दिवशी सांगत असे आणि बायको कशी असावी यावर माझा सल्लाही विचारत असे. यथावकाश त्याचे लग्न झाले. हळूहळू तो संसारात रमला. दोन वर्षात नोकरीतही रुळला.

एव्हाना आमचे हॉस्पिटल सुरू झाल्याला चार वर्षे झाली होती. आता हॉस्पिटलचा विस्तार करण्याचे व्यवस्थापनाने ठरवले होते. त्यामुळे आम्हा सर्वांची जबाबदारी अधिकच वाढत गेली. सतीश व मी दिलजमाईने रोजची कामे जास्त वेळ थांबून पूर्ण करीत होतो. त्यामुळे आमची मैत्री घट्ट होत गेली. आम्हा दोघांना एकमेकांच्या आयुष्यातील काही माहिती नाही असे काहीच उरले नाही.

दरम्यान मी नोकरीची चार वर्षे समर्थपणे पूर्ण केल्याने आणि वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकारत असल्याने मी माझ्या बढतीचा प्रस्ताव वरिष्ठांपुढे मांडला. मग माझे मूल्यमापन करण्यात येऊन त्यांनी तो व्यवस्थापनापुढे ठेवला. थोड्याच कालावधीत मला ‘वरिष्ठ सल्लागार’ या पदावर बढती देण्यात आली. नवीन पदभार स्वीकारण्याचा दिवस होता १ जानेवारी. पगारामध्ये अर्थातच आकर्षक वाढ दिलेली होती.

नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला हे समजू शकेल की तिथल्या पहिल्या बढतीचा आनंद हा अवर्णनीय असतो. तरुणपणी योग्य वयात बढती मिळणे हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असतो. मात्र जर का तुम्ही पहिल्याच पदावर बरीच वर्षे कुजलात, तर मात्र तुमची प्रगती नक्कीच खुरटते. माझ्याबाबतीत ही बढती योग्य वयातच झाली होती. त्यामुळे एक प्रकारचे चैतन्य माझ्यात संचारले होते.

बढतीचा आदेश स्वीकारतानाच कार्यालयातील अनेकांनी “डॉक्टर, पेढे पाहिजेत, खरे तर पार्टीच हवी’, असा गलका केला. त्याने मी खूप भारावून गेलो. आमचे संपूर्ण हॉस्पिटल म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबांसारखेच होते. त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी त्या सर्वांना पेढे वाटण्याचे ठरवले. तारुण्यात आपण तसे शौकीन असतो. त्यानुसार माझ्या शहरातील सर्वात प्रसिद्ध मिठाईवाल्याकडून त्याच्याकडील सर्वात मोठ्या आकाराचे केशरी पेढे मी खरेदी केले.

हॉस्पिटलच्या उभारणीपासून आम्ही सगळे एकत्र राबलेले असल्यामुळे आमच्यात जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे आमच्यातील कोणाच्याही आनंद वा दुखःद प्रसंगात सगळेच सामील होत. ठरवल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलभर फिरून पेढेवाटप सुरु केले. मला पहिला पेढा खरे तर सतीशला द्यायचा होता पण त्या दिवशी तो नेमका कामावर उशीरा येणार होता. म्हणून मी इतरांचे वाटप सुरु केले. त्या सगळ्यांनी माझे मनापासून अभिनंदन केले.
आता मी सतीशची आतुरतेने वाट पाहत होतो. साहजिकच होते ते, कारण आम्ही रोज जास्तीत जास्त काळ एकत्र असायचो आणि जेवणही बरोबर करायचो. थोड्या वेळाने सतीश आमच्या विभागात आला. आमची नजरानजर झाली. आमच्या मैत्रीच्या नात्याने तो आल्याआल्याच माझ्या बढतीबद्दल काही बोलेल अशी माझी अटकळ होती. परंतु, इथेच मला पहिला धक्का बसला. त्याने निर्विकारपणे त्याच्या कामास सुरवात केली.
मी त्याच्याजवळ जाऊन त्याला पेढा दिला. त्यावर त्याने “काय विशेष?” असा अनपेक्षित प्रश्न विचारला. हा मला बसलेला दुसरा धक्का होता. एव्हाना माझ्या बढतीची बातमी हॉस्पिटलभर आणि कर्णोपकर्णी अनुपस्थित लोकांपर्यंतही पोहोचली होती. त्यामुळे ती सतीशला माहिती नसणे जवळपास अशक्य होते. त्याच्या “काय विशेष” ला मी ,”माझ्या बढतीबद्दल”, असे उत्तर दिले. तिसरा धक्का मला आता बसायचा होता. “हं” एवढाच हुंकार काढून त्याने पेढा तोंडात टाकला. मग तो “पेढा मस्त आहे”, म्हणाला अन त्याच्या कामात गढून गेला.

दोन मिनिटे मी अगदी सुन्न झालो. माझ्या या आनंदाच्या प्रसंगी हॉस्पिटलमधील माझ्या सर्वात जवळच्या ‘मित्रा’कडून ‘अभिनंदन’ हा पंचाक्षरी शब्दही ऐकायला मी पारखा झालो होतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात एवढा नकारात्मक प्रतिसाद मी प्रथमच अनुभवत होतो. थोड्या वेळाने माझा पेढेवाटप कार्यक्रम संपला. नंतर रोजची जेवणाची वेळ झाली. सतीश व मी एकत्र जेवायला बसलो. त्या दिवशी मी चांगल्यापैकी कपडे केले होते. बुटांनाही चकाचक पॉलिश केले होते. जेवताजेवता सतीशने माझ्या पायांकडे पाहिले आणि “बूट छान आहेत” असे म्हणाला. जेवण संपेपर्यंत तो तसा अबोलच होता. माझ्या बढतीचा विषय तर त्याने कटाक्षाने टाळला.

माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात पेढे वाटण्याचे अनेक प्रसंग आले होते. किंबहुना सर्वांच्याच आयुष्यात ते कधीना कधी येतात. परंतु अशा प्रसंगी, “ अरे वा, छान झालं” असे न म्हणणारी व्यक्ती मला अद्याप भेटली नव्हती. द्वेष, मत्सर, असूया इत्यादी गुण हे मानवी स्वभावाचेच भाग आहेत. प्रत्येकाच्या ठायी ते वास्तव्य करतातच. पण एखाद्याच्या आनंदाच्या प्रसंगी वरकरणी तरी त्याचे अभिनंदन वा कौतुक करणे, ही व्यावहारिक सभ्यता असते. बहुसंख्य लोक ती पाळताना दिसतात. एखाद्याजवळ आपण आपला आनंद व्यक्त केल्यावर त्याने ‘अरे वा’ वगैरे काहीही नाही म्हटले तरी चालेल, हा विचार म्हणून ठीक आहे. पण, तेवढी स्थितप्रज्ञता आपल्यात असायला आपण साधुसंतच असायला हवे. ते नसल्यामुळे आपला अपेक्षाभंग होतो. किंवा ‘फलाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा’ हे पचवणे भल्याभल्यांना संपूर्ण आयुष्य खर्ची पडले तरी जमत नाही. मी तर तेव्हा जेमतेम तिशीत होतो.

प्रस्तुत प्रसंगात सतीश हा कुठल्याच प्रकारे माझा स्पर्धक नव्हता. त्याचे वय आणि अनुभव हे माझ्याहून कमी होते. मी एम डी होतो तर तो एम बी बी एस नंतरचा डिप्लोमा धारक.
तसेच नजरेत भरावे असे काही वेगळे कामही त्याने केलेले नव्हते. तेव्हा याप्रसंगी त्याचे माझ्यावर जळणे हे माझ्या आकलनशक्तीबाहेरचे होते. आमच्या संपूर्ण स्टाफपैकी माझे अभिनंदन न करणारी सतीश ही एकमेव व्यक्ती होती आणि या गृहस्थाला मी माझा सर्वात जवळचा मित्र धरून चाललो होतो !

या एका कडवट प्रसंगाने माझ्या आनंदावर अगदी विरजण पडले. अनेक दिवस हे सतीशचे वागणे माझ्या डोक्यातून जात नव्हते. किंबहुना वरिष्ठ पदावर काम करण्याचा उत्साहच कुणीतरी काढून घेतल्यासारखे वाटत होते. त्यावेळेस मला माझ्या पूर्वायुष्यातील दोन व्यक्तींच्या उद्गारांची प्रकर्षाने आठवण झाली.

मी शाळेत नववीत असताना माझ्या वर्गात सुदेश नावाचा विद्यार्थी होता. त्या वयातही त्याचे विचार परिपक्व होते. वर्गातील सर्वजण त्याला ‘अकाली प्रौढ’ म्हणत. तो एकदा आम्हाला गप्पांच्या ओघात म्हणाला होता, “आपण वर्गातील सर्वजण हे एकमेकांचे ‘परिचित’ आहोत. एकमेकांना ‘मित्र’ म्हणण्याची चूक कोणी करू नका कारण, मित्र हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे.

तर दुसरे उद्गार मी एका दैनिकाच्या संपादकांच्या लेखात वाचले होते. त्यांनी लिहीले होते, “संकटकाळी जो उपयोगी पडतो तो खरा मित्र, ही मित्राची व्याख्या आता फार जुनी झाली आहे. सध्याच्या काळातील व्याख्या म्हणजे, आपल्या आनंदात मनापासून सहभागी होतो तो खरा मित्र !”
या दोन्ही उद्गारांची प्रचिती मला वरील प्रसंगातून पुरेपूर आली हे सांगायलाच नको.
…..

आज वरील घटनेनंतर २५ वर्षांनी मी त्याकडे तटस्थपणे बघू शकतो, हे नक्की. परंतु तेव्हा काय वाटले होते त्या ऊर्मितून हे लेखन झाले इतकेच.

********************************
( पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

समाजलेख

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

18 Apr 2018 - 10:58 am | प्रकाश घाटपांडे

अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रं अमित्रस्य कुतः सुखम् ॥
हे सुभाषित आठवले.परिचित ते मित्र हा प्रवास रिव्हर्सिबल ही आहे.कधी कधी आपण स्वत:ला देखील अनोळखी वाटतो.

कुमार१'s picture

18 Apr 2018 - 11:12 am | कुमार१

सहमत आहे !

कमीअधिक फरकाने नित्य येणारा अनुभव आहे. चालायचंच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Apr 2018 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंगर मनोगत !

माणूस वरवर कसा दिसतो त्यावरून त्याच्या मनात काय चालले आहे हे कळणे कठीण आहे. अपेक्षाभंग होणे हे कळत-नकळत अपेक्षा ठेवण्यामुळेच होते, हे जीवनातले एक फार मोठे शिक्षण आहे ! :)

तो कदाचित पहिला पेढा त्याला मिळाला नाही म्हणून चिडला असेल का?

कुमार१'s picture

18 Apr 2018 - 1:22 pm | कुमार१

वरील सर्वांचे आभार
डॉ सुहास,
अपेक्षाभंग होणे हे कळत-नकळत अपेक्षा ठेवण्यामुळेच होते, हे जीवनातले एक फार मोठे शिक्षण आहे ! :) >≥>> + १ आणि हे वाढत्या वयाबरोबरच आपण शिकतो.

कुमार१'s picture

18 Apr 2018 - 1:29 pm | कुमार१

आनंदा,
नाही, तसे बिलकूल नाही ! आमच्या बऱ्याच मित्रांचे त्याच्याबद्दलचे असेच अनुभव आहेत. काही जण तर म्हणतात की त्याने कधी कोणाचे अभिनंदन केलेच, तर आपण सगळे त्याच्याकडे जाऊन त्याचे अभिनंदन करू !!

अनिंद्य's picture

18 Apr 2018 - 1:44 pm | अनिंद्य

@ कुमार१,

प्रांजळ अनुभवकथन आवडले.

उमदेपणाचे, भावना सुयोग्य शब्दात व्यक्त करता येण्याचे वरदान सर्वांनाच लाभत नाही. विशेषतः ईर्षा - मत्सर - हेवा असल्या भावना तर सर्रास अव्यक्त राहतात, शब्दांअभावी कृतीतून व्यक्त होतात.

तसेही कुठल्याही दोन व्यक्ती सारख्याच प्रसंगात तंतोतंत सारख्या व्यक्त होत नाहीत.
That why we humans are such an interesting species in the universe :-)

अनिंद्य

अनिंद्य's picture

18 Apr 2018 - 2:03 pm | अनिंद्य

*That’s why

कुमार१'s picture

18 Apr 2018 - 3:06 pm | कुमार१

अनिंद्य , आभार आणि सहमती.
म्हणूनच म्हणतात ना, की पृथ्वी वरील सर्व प्राणिमात्रांत माणूस हा ‘समजायला’ सर्वात अवघड प्राणी आहे.

कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीच्या लोकांसमवेत कितीही गप्पा- टप्पा, मौजमजा करत असू तरीही त्या बंधांना मैत्र म्हणता येतेच असे नव्हे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

18 Apr 2018 - 3:51 pm | अनिरुद्ध.वैद्य

फरक असतोच, अन तो प्रकर्षान जाणवतोही. सहकार्‍यांपैकी कितपत आपले मित्र होऊ शकतील (किंवा उलटही), हा प्रश्न बर्‍याचदा पडत असतो.

कुमार१'s picture

18 Apr 2018 - 7:48 pm | कुमार१

त्यावरून एक वचन आठवले:
People work together, whether they work together or not.

नाखु's picture

18 Apr 2018 - 8:27 pm | नाखु

सगळेच सहकारी पुढे टिकून रहात नाहीत, शाळेतला असो किंवा नौकरीतला.

मोजकेच मित्र पदात आपसूक येतात , आर्थिक/पत प्रतिष्ठा अवडंबर माजवले नाही की निकोप मैत्री टिकते

मैत्र जीवांचे अनुभवी नाखु संसारी

कुमार१'s picture

19 Apr 2018 - 7:37 am | कुमार१

या लेखासंबंधी एक आठवण सांगतो. लेख २००५ साली छापील मासिकात प्रकाशित झाला होता. त्यावेळेस मी परदेशात होतो. तो अंक पुण्याहून टपालाने मला मिळायला १२ दिवस लागत.
हा अंक प्रकाशित झाल्या नंतर दोनच दिवसात मला औरंगाबादच्या एका वाचकाची इ मेल आली. त्यात त्याने लेख आवडल्याचे आणि त्यालाही अगदी तसा अनुभव आल्याचे लिहिले होते.
माझा छापील लेख मी पाहण्यापूर्वीच मला जलद वेगाने त्यावर आलेला प्रतिसाद सुखावून गेला. इ- माध्यमामुळे जग किती जवळ आलंय याचे तेव्हा अप्रूप वाटले होते.

गवि's picture

19 Apr 2018 - 8:49 am | गवि

"पेढा मस्त आहे”

हीच कॉम्प्लिमेंट समजायची..

कानडाऊ योगेशु's picture

19 Apr 2018 - 9:01 am | कानडाऊ योगेशु

३ इडियट्स मधला डाय्लॉग आठवला.
"दोस्त फेल होता है तो दुख होता है लेकिन दोस्त फर्स्ट आता है तो बहुत दुख होता है"..
हा अनुभव कमीअधिक फरकाने सगळ्यांनाच येतो व आपण ही वेगवेगळ्या वेळी वेगळ्या बाजुला असू शकतो.
इथे तुमच्या मित्राच्या दृष्टीकोनातुन विचार करायचा झाल्यास तुम्हाला प्रमोशन मिळाले पण मला नाही मिळाले असा विचार ही असू शकतो.
हे म्हणजे नापास झालेल्या मित्राने डिस्टींक्शन मिळवलेल्या मित्राचे अभिनंदन करण्यासारखे झाले.
बाकीच्य कलिगची तुमच्याबरोबर ह्या मित्रांसारखी नेहेमीची उठबस नसल्याने त्यांना तुमचे अभिनंदन करणे जड गेले नसावे.

श्वेता२४'s picture

19 Apr 2018 - 1:21 pm | श्वेता२४

मलापण थ्री इडियटमधला हाच प्रसंंग आठवला लेख वाचल्यावर

कुमार१'s picture

19 Apr 2018 - 2:46 pm | कुमार१

परत पाहणे आले ☺

कुमार१'s picture

19 Apr 2018 - 2:52 pm | कुमार१

* 3 इडियटस असे वाचावे

कुमार१'s picture

19 Apr 2018 - 9:22 am | कुमार१

अगदी सहमत आहे !

कुमार१'s picture

21 Apr 2018 - 11:47 am | कुमार१

चांगल्या चर्चेबद्दल आपणा सर्वांचे आभार.
क्षणभर लेखातील व्यक्ती बाजूला ठेऊ.

तर चर्चेचा सारांश असा. आयुष्यात आपल्या ‘ओळखीचे’ अनेकजण असले तरी त्यातील ‘मित्र’ म्हणता येणारे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात.

चौकस२१२'s picture

10 Aug 2022 - 4:17 pm | चौकस२१२

भावला अनुभव
कामाच्या ठिकाणी मित्र हे अवघडच आहे कारण कधीतरी स्पर्धा होऊ शकते
दुसरी कानाला खडा लावण्यासारखी गोष्ट म्हणजे "मैत्री आणि पैसे -वयवहार ...यांची सांगड शक्यतो कधी घालू नये .. एकेवेळ द्व्यावे मित्रत्वाने , घेऊ मात्र नये

यशवंत पाटील's picture

22 Apr 2018 - 5:13 pm | यशवंत पाटील

लई हसलो..
माफी असावी कुमार साहेब, तुमचा अनभव खराच असणार. ते न्हायी म्हणत मी.
पण हितं कुणाला काय असतीय अडचण आन् एकदम तुमचा हा अनभव वाचुन हसायला आलं.
मला त्याचं काय वाटत नाही, मी विसरलो, मी ते मागं टाकुन पुढं आलो ... अस सांगणार्‍या लोकांच्या मनात असलं उलीसक काय तरी जपुन ठेवलेलं असतंय. पंचवील वर्श झाली म्हणताय.. खरंच विसरा साहेब. लई किरकोळीतलं हाये प्रकरण. तोंडदेखलं खोटं बोलण्यापरीस हे बरं हाये की.
मित्र आणि ओळखीचा, ज्यालात्याला आपापलं माहिती असतंय की ... दुनियादारीत चालायचं असलं ...

manguu@mail.com's picture

24 Apr 2018 - 12:30 am | manguu@mail.com

आता तो कुठे आहे ?

कुमार१'s picture

24 Apr 2018 - 7:52 am | कुमार१

ठीक आहे, तुमचे कुतुहल शमवितो. त्यानंतर आम्ही दोघे वर्षभरच एकत्र होतो. त्याकाळात जेवढयास तेवढे असे संबंध राहिले. पुढे मी काही वर्षे परदेशात होतो. मायदेशी परतल्यावर नंतर बऱ्याच वर्षांनी आम्ही रेल्वे स्टेशनवर अचानक भेटलो.

आता खरी गंमत पुढेच आहे.....

माझा हा लेख ‘अंतर्नादमध्ये प्रसिद्ध झालेला होता. गप्पांमध्ये त्याने मला तोही त्या मासिकाचा वर्गणीदार असल्याचे स्वतः होऊन सांगितले. त्या लेखानंतरच्या महिन्यात माझा परदेशातील अनुभवाचा अन्य लेख प्रसिद्ध झाला होता तो चक्क त्याने वाचला होता ! अर्थात “मी वाचला” एवढेच तो म्हणाला. मी धन्यवाद म्हटले.

...आता ही दाट शक्यता आहे की प्रस्तुत लेखही त्याने मासिकात वाचला असेल. याबाबत आम्ही दोघेही मूग गिळून गप्प ! तो स्वतः विषय काढणे अवघड होते आणि मी तरी कशाला उकरून काढेन ?

आम्ही कौटुंबिक गप्पा छान मारल्या. ट्रेन १ तास उशीरा ने होती. त्यामुळे रेल्वे यंत्रणा, आपला देश वगैरे ‘सुरक्षित’ विषयांवरही गप्पा झाल्या.

अखेर ट्रेन आली. आमचा डबा वेगळा होता . आम्ही एकमेकांना अच्छा केले.
बास, त्यानंतर भेट नाही. पुढे कधी झालीच तर हवापाणी, कुटुंब व क्रिकेट वर गप्पा मारायला माझी काहीच हरकत नाही.

पैसा's picture

24 Apr 2018 - 9:48 am | पैसा

लिखाण आवडले. यात २ गोष्टी आहेत. २ माणसातले नाते सदा सर्वकाळ एक प्रकारचे राहत नाही. अनेक चढ उतार येतात. बदल होतात. नक्की एका क्षणी सगळे बदलले असे बोट ठेवले अनेकदा कठीण असते.

दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या दोघात एक नाते होते असे तुम्ही समजत होता, त्याच्या बाजूने तसे नसेलही. मित्र असता तर मला हेवा वाटला असे कधीतरी त्याच्या तोंडून आले असते.

पैसा,
आभार आणि पूर्ण सहमती.

arunjoshi123's picture

24 Apr 2018 - 10:36 am | arunjoshi123

सर्वसाधारणपणे "इतर लोकांच्या स्वकेंद्रितपणाचा त्रास" मलाही काही वर्षांपूर्वीपर्यंत होत असे. ईर्ष्या, स्पर्धा, इ इ मानवी मनाचे मूलभूत गुणधर्म आहेतच याची प्रत्येकालाच कल्पना असते. पण काही विशिष्ट प्रसंगी यांची अपेक्षा नसते.
माझे मते मनुष्यांचे दोन प्रकार आहेतः १. ज्यांच्या सर्व गरजा पालकांनी वेळोवेळी (कोंबून कोंबून) पूर्ण केल्या आहेत आणि म्हणून ज्यांना कधीही समाजाची, नात्यात नसलेल्यांची भावनिक, मानसिक वा आर्थिक अशी कोणतीच गरज कधीच पडली नाही. अशी मंडळी सर्वसाधारणपणे तुटकपणे वागतात असं निरीक्षण आहे. २. ज्यांना नेहमीच काही गरजा कुंटुंबाबाहेर भागवाव्या लागल्या आहेत. याचा अर्थ असा होत नाही कि यांची आर्थिक परिस्थिती खराब होती. असंही असू शकतं कि या माणसाची भावनिक गरजच खूप मोठी असेल.
स्वकेंद्रित प्रकारच्या व्यक्तिंना कोणताही कायदा वा सामाजिक संकेत मोडायचा नसतो. ते कोणाचे नुकसानही करत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल काही आकांक्षा असतात, वा निराशा असतात ज्या ते कधीही त्यांच्या जवळचे म्हणवणारांसोबत देखील शेअर करत नाहीत. अशा व्यक्ति आपल्यासारखेच मनमोकळेपणाने वागत आहेत असे स्वकेंद्रित नसलेल्या व्यक्ति गृहित धरतात. आणि प्रसंग आला कि स्वकेंद्रित माणसाची निगेटिविटी उघडी पडते. स्पष्ट प्रांजळ चांगलं वागायचं नाही आणि उघड वाईट तर अजिबातच वागायचं नाही अशीच ही मंडळी बनलेली असतात.
अशा लोकांशी कधीही तीव्र भावनिक दुतर्फी बंध बनलेला नसतो. तो आहे असा आपला गैरसमज असतो त्यावेळेचा. अशा लोकांशी तितकाच कोरडेपणा ठेवलेला मानसिक सौख्यासाठी कदाचित बरा असावा. बाकी नेहमी प्रत्येकाचा कोरडेपणा घालवायला प्रयत्न करावा हे आहेच.

अशा लोकांशी तितकाच कोरडेपणा ठेवलेला मानसिक सौख्यासाठी कदाचित बरा असावा. >>>>> +११

चांगले विवेचन

कुमार१'s picture

9 Aug 2022 - 9:56 am | कुमार१

मैत्री या विषयावर तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतून लिहिलेला एक लेख

बऱ्यापैकी क्लिष्ट आहे परंतु त्यातले हे विचार करण्याजोगे आहे :

पुस्तक, संगणक, हार्डडिस्क, पेनद्राईव्ह या ज्ञानवाहक-धारक वस्तूचीही खरेदी-विक्री होऊ शकते, तर 'ज्ञान' या वस्तूचीही खरेदी-विक्री होऊ शकते. ज्ञान अमूर्त वस्तू असूनही आपण ती पुस्तके, संकेतस्थळ इत्यादीवरून पैसे देऊन विकत घेतो. तशी मैत्रीदेखील ज्ञानवस्तू असून तिचा खरेदी-विक्री व्यवहार शक्य आहे. आणि मैत्री विकत घेणे हा मित्र मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे! किंबहुना जगातील प्रत्येक जण आपले मित्र विकतच घेत असतो. सगळे जग म्हणजे मैत्रीच्या मुक्त बाजारव्यवस्थेचा मोठा उद्योग आहे

तर्कवादी's picture

9 Aug 2022 - 4:36 pm | तर्कवादी

डॉक्टर कुमार सर,
मनोगत आवडलं, पण , पुर्णतः पटलं असं म्हणू शकत नाही.

तेव्हा याप्रसंगी त्याचे माझ्यावर जळणे हे माझ्या आकलनशक्तीबाहेरचे होते.

या संपुर्ण प्रसंगात फक्त ही एकच शक्यता असू शकते काय ? जरी ही शक्यता सर्वाधिक असेल कदाचित तरी पण ही एकमेव शक्यताच असेल काय ? त्याने तुमचे अभिनंदन न करण्याचे दुसरे काहीच कारण असण्याची शक्यताही नाही का ? आपण दुसर्‍याच्या मनातले भाव नेहमीच अचूक ओळखू शकतो हे मला तितकेसे पटत नाही.

पण त्याचबरोबर स्त्री-पुरुष संबंध या तारुण्यसुलभ विषयाचाही समावेश असे. सतीश या विषयातील त्याच्या शंकांचे माझ्याकडून निरसन करून घेई.

बायको कशी असावी यावर माझा सल्लाही विचारत असे

या वाक्यांतून असे जाणवते की व्यक्तिगत आयुष्यातही तो तुमच्या मोठेपणाची कदर करत होता असे दिसते. खरे तर व्यावसायिक आयुष्यात माणूस समोरच्याचे ज्येष्ठत्व सहज मान्य करु शकतो - खास करुन समोरच्याची शैक्षणिक पात्रता वा अनुभव अधिक असेल तर त्याचे ज्येष्ठत्व मान्य करण्यात फारशी अडचण येत नाहीच --अगदी १-२ वर्षांनी जरी अनुभव जास्त असला तरी. त्याउलट व्यक्तिगत पातळीवर समोरच्याचे ज्येष्ठत्व मान्य करणे कठीण असते. इथे तर सतीश स्वतः एक डॉक्टर असूनही स्त्री-पुरुष संबंधातील शंकांचे निरसन करुन घेई. मग अशा व्यक्तीला तुमचे व्यावसायिक ज्येष्ठत्व समजून ते मान्य करणे कठीण असू शकेल ? मग ज्येष्ठ व्यक्तीला आधी पदोन्नती मिळणार हे तर साहजिकच आहे आणि हे न समजण्याइतका वा मान्य न करण्याइतका तो अपरिपक्व असेल काय ?
तसेच त्यादिवसानंतर त्याचे आणि तुमचे संबंध कसे होते ? तो तुमच्याशी पुर्वीप्रमाणेच गप्पा मारायचा / मिसळायचा का किंवा कसे हे तुमच्या लेखातून समजत नाही.
इथे तुमच्या विचारांना विरोध करणे हा माझा उद्देश नाही पण एक व्यक्ती म्हणून या शक्यतेचा विचार करावासा वाटला.

कुमार१'s picture

9 Aug 2022 - 4:50 pm | कुमार१

धन्यवाद. विश्लेषण आवडले.
त्या घटनेला आता ३० वर्षे झालीत.
हा लेख पूर्वी लिहिताना तेव्हाच्या मनस्थितीनुसार लिहिला गेला आहे.
त्यातील अपरिपक्वता मला मान्य आहे !
....

तसेच त्यादिवसानंतर त्याचे आणि तुमचे संबंध कसे होते ?

>>
संबंध कायमचे दुरावले गेले. आम्ही क्वचित कधी भेटलो तरी, "काय कसं काय हवापाणी" इतपत बोलून थांबतो.

तर्कवादी's picture

9 Aug 2022 - 5:20 pm | तर्कवादी

संबंध कायमचे दुरावले गेले. आम्ही क्वचित कधी भेटलो तरी, "काय कसं काय हवापाणी" इतपत बोलून थांबतो.

दुर्दैवी गोष्ट.. पण नेमकं काय झालं असेल हे सांगणं कठीणच. त्याच्या मनातली भावना "जळण्याची" असेलच असं नाही. कदाचित त्या दोन पदाच्या अधिकारांतील तफावत (त्याच्य मते किंवा वास्तवातही ) खूप जास्त असल्याने मोठ्यापदावरील व्यक्तीशी मैत्रीपुर्ण संबंध राहू शकतील असे त्याला वाटले नसावे. त्यामुळे एक 'मित्र गमावल्याची' भावनाही त्याच्या मनात असू शकते. अर्थात या सगळ्या केवळ शक्यता झाल्यात.. कुणाच्या मनात नेमके काय चालू आहे हे सांगणे कठीणंच. पण त्यामुळेच संशयाचा फायदा (बेनिफीट ऑफ डाऊट) द्यायला हवा असे मला वाटते.

सर टोबी's picture

10 Aug 2022 - 12:46 pm | सर टोबी

जे मित्र असतात किंवा जी मैत्री होते ती 'खरी' मैत्री नसते या समजापोटी बरेच जण एक तत्व म्हणून हातचं अंतर राखून सहकाऱ्यांशी संबंध ठेवतात. आणि मग लहानपणाच्या सवंगड्यांची आठवण काढीत उसासे टाकतात.

माणसांच्या भावनिक नात्यांमध्ये निरपेक्ष वगैरे असं काही नसतं. काही देण्या घेण्याचा संबंधच नसेल अथवा अपेक्षा नसेल असं नातंच नसतं. आपल्यालादेखील सकाळच्या प्रसन्न वातावरणात ताज्या फुलांचा सडा पडलेलं प्राजक्ताचं झाड सुखावतं. तसाच फुलांचा सडा पडलेलं बाभळीचं झाड आपल्याला खुणावत नाही. तेव्हा तुमचा हा सहकारी नक्कीच दुखावला असणार असा माझा कयास आहे. "त्याच्या कडून मी जे काम करून घेत होतो तो त्याच्या कामाचा आणि कर्तव्याचा भागच होता" असा ताठरपणा आता शिल्लक नसेल तर "मित्रा मी तुला अजाणतेपणानं दुखावलं" असं म्हणण्यात फार कमीपणा असू नये. बघा हा उपाय पटतो का.

कुमार१'s picture

10 Aug 2022 - 1:50 pm | कुमार१

माणसांच्या भावनिक नात्यांमध्ये निरपेक्ष वगैरे असं काही नसतं

>>>
हा मुद्दा पटला. तो नीट समजायला मध्यमवयीन व्हावे लागते.
धन्यवाद.
......
वर म्हटल्याप्रमाणे ही घटना तीस वर्षांपूर्वीची आहे तत्कालीन वय, भावना आणि विचारानुसार हा लेख लिहिला गेला होता. समजा, आज अशी घटना घडली तर असे लेखन बिलकुल होणार नाही ! कारण जग कसे असते हे एव्हाना पुरते समजलेले आहे.

अजून थोडे स्पष्टीकरण आवश्यक वाटते.
लेखात वर्णन केलेला जो “तो” आहे, ते एक वेगळे रसायन आहे. माझ्या अन्य ३ मित्रांनाही माझ्याप्रमाणेच अनुभव आलेले आहेत. किंबहुना, ते तर म्हणतात की आपण आपल्या आयुष्यातील एखादी चांगली घटना त्याला सांगितली तर त्यावर तो कुठलीही प्रतिक्रिया न देता शुंभासारखा बसतो. त्याच्या बरोबर राहताना असेच नॉर्मल आहे, हे आपल्याला शिकायचे आहे. त्याचे काही वाटून घेता कामा नये.

(याहून अधिक तपशील जाहीरपणे लिहिणे योग्य नाही).

नि३सोलपुरकर's picture

10 Aug 2022 - 1:54 pm | नि३सोलपुरकर

अलिकडेच कुठेतरी वाचलेले आणी पटलेले .
" Not everyone at your workplace is your friend ,
Do your job
Get paid
Go Home "

कुमार१'s picture

10 Aug 2022 - 2:05 pm | कुमार१

माझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात असलेल्या दुसऱ्या एका मित्राचा अनुभव सांगतो.
तो ग्रामीण पार्श्वभूमीत वाढला. पुढे झगडून पीएचडी झाला. तेव्हा त्यांच्या कार्यालयात त्याने या घटनेचे पेढे वाटले. तेव्हा त्याला एक दुक्कल अशी भेटली की जी तोंडावर म्हणाली,
"आम्हाला नकोत तुमचे पेढे !"
मात्र बाकी सर्व सहकाऱ्यांनी त्याचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले होते.
....
वरील अनुभव मी लेखातील घटना घडल्यानंतर काही वर्षांनी ऐकला. त्यानंतर अर्थातच मला माझे दुःख सौम्य वाटले होते. :)

.... असेच आपण आयुष्यात 'तयार ' होत जातो.