महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

एकमेवाद्वितीय ग्रेटा गार्बो

Primary tabs

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
13 Apr 2018 - 2:20 am

ग्रेटा गार्बो आठवली अन् मन हळहळलं. कां...?

कारण तिच्या मुळेच मला हालीवुडचा लळा लागला.

1990 साली जेव्हां गार्बो वारली, तेव्हां मला तिचं नाव देखील ठाउक नव्हतं. पण ती गेली, त्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समधे तिच्यावरील गोविंदराव तळवळकरांचा अग्रलेख ‘एक सुंदर गूढ’ अप्रतिम असाच होता.

त्याची सुरवात ‘AGE CANNOT WETHER HER; NOR CUSTOM STALE’

या वाक्याने झाली होती. त्या अग्रलेखात गार्बो सोबत इनग्रिड बर्गमनचा ओझरता उल्लेख होता. तो अग्रलेख वाचून मी गार्बोच्या प्रेमात पडलो. कारकीर्दीच्या शिखरावर असतांना तिने निवृत्ति पत्करली असल्यामुळे असेल कदाचित, पण तिच्याबद्दल मनांत उत्सुकता निर्माण झाली. एक विचार देखील आला की नुसतं वर्णन इतकं अप्रतिम आहे, जर तिचे चित्रपट बघतां आले तर काय बहार होईल. पुढे छोट्या पडद्यावरील टीएनटी वाहिनीवर मला ग्रेटा गार्बोचे काही चित्रपट बघतां आले. त्यात ‘ग्रैंड होटल’ (जान बेरीमोर, वालेस बेरी), ‘क्वीन क्रिस्टीना’, ‘माताहारी’, ‘निनोत्च्का’, ‘एना केरेनिना’ (फ्रेडरिक मार्क) प्रमुख होते. या सर्व चित्रपटांमधील गार्बो चा सहज वावर डोळ्यांना सुखावणारा होता. तिच्या अभिनयातील तन्मयता वाखाणण्या सारखी होती.

1933 सालच्या ‘क्वीन क्रिस्टीना’ मधील तिने वठवलेली राणीची भूमिका अविस्मरणीय अशीच होती. चित्रपटाची पार्श्वभूमी जरी ऐतिहासिक असली तरी त्यात प्रेमाखातर केलेल्या त्यागाचं (सेक्रिफाइस) अप्रतिम वर्णन होतं. या चित्रपटाच्या जाहिराती मधे म्हटलं होतं-

‘A 17th century maiden who loved with a 20th century madness,’ and ‘She was crowned King of Swedon...lived and ruled as a man...But surrendered to Love...’

17व्या शतकात स्वीडनचे राजे गुस्ताव एडोल्फ यांच्या मृत्युमुळे त्यांची सहा वर्षाची पोर क्रिस्टीना स्वीडनची राणी होते. ती मुलासारखी वाढली आहे. राज दरबारात या राजकन्येचा परिचय करुन देतांना स्वीडनचा लॉर्ड चांसलर एक्सेल ओक्सेनस्टेरीना (लेविस स्टाेन) म्हणतो-

‘राजे गुस्ताव एडोल्फ हयात नाहीत. पण कन्या क्रिस्टीनाच्या रूपात ते सदैव आपलं मार्गदर्शन करतील. कारण त्यांनी तिला मुली नव्हे, तर मुला सारखंच वाढवलंय...राज्याची धुरा सांभाळण्यांत ती समर्थ आहे...’

इतक्यांत कुणीतरी म्हणतं-‘राजकन्येला आणा की...’

...ती सहा वर्षांची राजकन्या क्रिस्टीना (कोरा सू कालिंस) दरबारात प्रवेश करते आणि आपल्यापेक्षा उंच असलेल्या स्वीडिश राजसिंहासनावर स्वत: बसते (कुणाच्या आधाराविना). तिथे थाटामाटात तिचा राज्याभिषेक (Coronation Ceremony) होतो. त्यानंतर स्वीडनची ही नवी राणी क्रिस्टीना प्रजाननांना आपलं पहिलं वहिलं संबोधन देते. त्यांत ती म्हणते-

‘गुड लार्डस एंड स्वीडिशमैन, मी क्रिस्टीना. स्वीडनच्या राणीच्या वतीने तुम्हांला आश्वस्त करते की मी इमाने इतबारे तुमची सेवा करीन. ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी स्वीडनचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं. मी देखील तुमचं रक्षण करीन. सध्या चाललेल्या युद्धात माझे वडील खर्ची पडले...त्याने खचून न जाता आपण हे युद्ध नेटाने लढवूं...आणि मी वचन देते...वचन देते...की आपण...’

(इथे ती अडखळते तर मागून काउंसलर तिला प्राम्टिंग करतो-की आपण युद्ध सुरू ठेवू...) तिकडे दुर्लक्ष करीत ती प्रजाजनांना ठणकावून सांगते-

‘आपण हे युद्ध जिंकू...’

साेळा वर्षानंतर...

मोठी झाल्यावर ती कुशलते ने कारभार चालवते. तीस वर्षे चाललेल्या युद्धात स्वीडनला यश मिळालंय...पण या युद्धात झालेला खर्च आणि या साठी कामी आलेल्या दहा हजार स्वीडिश सैनिकांमुळे क्रिस्टीना खिन्न आहे...म्हणूनच विजेता प्रिंस चार्ल्सच्या सम्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या समारंभात क्रिस्टीना वेगळाच विचार मांडताना म्हणते-

‘प्रिंस चार्ल्स यांनी स्वीडनकरितां हे युद्ध जिंकलंय...त्यासाठी स्वीडन त्यांचा ऋणी आहे...’ पण त्याच समारंभात आर्च बिशप, सेनेचा जनरल, इतर अधिकारी स्वीडन करितां युद्ध चालू ठेवायची वकालत करतात, तेव्हां क्रिस्टीना त्याचा विराेध करतांना सांगते-

‘जगण्याकरितां युद्धा शिवाय करण्यासारख्या इतर गोष्टी देखील आहेत...मी जेव्हां लहान होते तेव्हां पासून आपण युद्ध करतोय. अाता पुरे...मी संबंधितांशी याबाबत पुन्हां विचार करण्याचा आग्रह करीन...हे कुठं तरी थांबलं पाहिजे...ग्लोरी, फ्लैग्स, ट्रंपेट्स हे शब्द खूपच महत्वपूर्ण आहेत...यांचं मोल होणं शक्य नाही, पण त्याकरितां खूप काही गमवावं लागतं...हे गमवणं कुणालाच परवडण्यासारखं नाही.

आता मात्र प्रजेला क्रिस्टीना च्या लग्नाचे वेध लागलेत...

राज्य हवं तर शासनाने ठरवलेल्या व्यक्ति सोबत लग्न करावं लागेल. त्याचप्रमाणे प्रियकरा सोबत जायचं तर राज्य सोडावं लागेल. या द्विधा मन:स्थितीत क्रिस्टीना प्रियकराची वाट धरते आणि राज्यावर पाणी सोडून आपला वारस घोषित करते...दरबार हाल मधे राज्य त्यागाचं चित्रण अभूतपूर्व असंच होतं. ती प्रजाननांना सांगते-

‘मी इथे तुम्हाला माझा निर्णय सांगायला बोलावलंय. शासनाने ठरवलेल्या प्रिंससोबत मी लग्न करु इच्छित नाही. मी तसं त्यांना सांगितलंय...माझा वारस ठरवण्याचा मला अधिकार आहे...त्याप्रमाणे मी प्रिंस चार्ल्स गुस्ताव यांना आपला उत्तराधिकारी घोषित करत आहे...आता ते या राज्याची धुरा सांभाळतील...’

प्रजा या घोषणेचा विरोध करते अाणि तिलाच राज्य सांभाळण्याचा आग्रह करते...पण ती निर्णयावर ठाम असते...

‘प्रत्येक माणसाला आपलं म्हणून मन असतं, आत्मा असतो...आणि आपल्याला त्याचं ऐकलं पाहिजे...मला दुसरा पर्याय नाहीये...’

ती एक-एक करुन राज्यकर्ता चे प्रतीक काढून ठेवते-राजदंड, अाेझं ठरलेला राजमुकुट आणि तो राणीचा गाऊन...तिच्या डोळयांत अश्रु असतात आणि आठवणी दाटून आलेल्या...

ही लिंक बघा-

https://www.youtube.com/watch?v=bY6mYYQ7v04

हे कसं प्रेम आहे...

एका घटनेमुळे ती स्पेनच्या राजदूताच्या प्रेमात पडते. पण, आपल्या राणीने एका राजदूताच्या प्रेमात पडावं, ही गोष्ट तिच्या प्रजेला मान्य नाही. ते याचा विरोध करतात अन महालावर चालून येतात. इथे गार्बोने म्हटलेले संवाद आज देखील मनन करण्यासारखे आहेत, ती म्हणते-

‘Evidently my people who are said to love me, do not wish me to be happy.’

‘माझी प्रजा म्हणते की आम्ही राणीवर प्रेम करतो, पण हे लोक मला सुखी बघूं इच्छित नाहीत.’

‘Why! Do I peer into the lives of my subjects and dictate to them whom they shall love? Will I serve them less if I’m happy? What strangely-foolish title is it that calls me ruler. Even what concerns me most dearly, I am to have no voice. It is intolerable! There is a freedom which is mine and which the state cannot take away for the unreasonable tyranny of the mob, and to the malicious tyranny of palace intrigue. I shall not submit़! Know this, all of you.’

‘कां...? मी तर कधी तुमच्या खासगी जीवनात लुडबुड केली नाही किंवा आदेश नाही दिला की तुम्ही कुणावर प्रेम करावं? तुम्हां लोकांना असं कां वाटतं की मी दु:खी राहून तुमची ईमाने इतबारे सेवा करू शकेन? माझ्या विषयीचे निर्णय ध्यायची सुद्धा मला स्वतंत्रता नाही, अन् तुम्हीं मला रूलर म्हणता...काय बालिशपणा आहे...? हे कल्पनातीत आहे. ज्याप्रमाणे तुम्हां प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्याच प्रमाणे ते मलाहि आहे अन माझं हे स्वातंत्र्य कुणीच हिसकावून घेऊं शकत नाही, समजलं...!’

‘My business is governing and I have the knack of it as you have yours for your trade by inheritence. My father was a King, and his father before him. My father died for Sweden and I live for her. Now my good people, go home to your work and leave me to mine. My blessing on all of you.’

‘ज्या प्रमाणे तुमचे उद्योग ठरलेले आहेत, त्याच प्रमाणे माझं कार्य शासन चालवणं आहे. माझे वडील राजा होते, त्यापूर्वी त्यांचे वडील होते. माझ्या वडिलांनी स्वीडन साठी आपले प्राण गमावले, मी पण त्याच वाटेने जाणार...

बरं...माझे प्रजाजन हो, घरी जाऊन आपली कामे करां आणि मला माझं काम करूं द्या...।’

महालावर चालून आलेल्या प्रजेला ती ज्या निर्भयतेने सहज सामोरी जाते, त्यावेळचा तिचा अभिनय एखाद्या राजकन्येला साजेसा होता...

-------------------

आणि ते शेवटचं दृश्य...

एमजीएमच्या या चित्रपटांतील शेवटच्या दृश्यांत जहाजा वर उभी असलेली गार्बो शून्याकडे एकटक बघतेय...वारयामुळे उडणारे तिचे केस, कुणालाहि आरपार भेदू शकणारी ती तिची धारदार नजर...सगळं कसं भारुन टाकणारं होतं...

हे दृश्य चित्रित होतांना दिग्दर्शक रुबीन मेमॉऊलियन (Rouben Mamoulian) याने गार्बोला काय बरं सांगितलं असेल‌? तो म्हणाला होता-

‘To think about nothing...absolutlely nothing...I want your face to be a blank sheet of a paper. I want the writig to be done by everyone in the audience...’

आणि हा सीन त्या चित्रपटासाठी मैलाचा दगड ठरला...

https://www.youtube.com/watch?v=EEab8NZO3Fg

----------------

19 वर्षांत 27 चित्रपट, 36 व्या वर्षी हॉलीवुड सोडलं...

गार्बो अवघी 19 वर्षे हॉलीवुड मधे वावरली. या दरम्यान तिने एकूण 27 चित्रपटांमधे काम केलं. वयाच्या 36व्या वर्षी तिने निवृत्ति पत्करली. 15 एप्रिल 1990 साली ती हे जग सोडूल गेली तेव्हां 84 वर्षांची होती.

आस्वादचित्रपट

प्रतिक्रिया

ग्रेटा गार्बो आणि इनग्रिड बर्गमन यांच्यात डावंउजवं करता येणं अशक्य आहे असे माझे मत.

लेख आवडला हेवेसांनल.

पद्मावति's picture

13 Apr 2018 - 11:54 am | पद्मावति

तुमचे लेख नेहमीच आवडतात. हाही अपवाद नाहीच. सुंदर लेख.

ग्रेटा गार्बोविषयी थोडफार वाचलय. इतके जुने ईंग्रजी चित्रपट बघणे होत नाही. पण तुमच्या धाग्यामुळे उत्सुकता वाढली. आता डाउनलोड करतोच.

गामा पैलवान's picture

14 Apr 2018 - 2:01 am | गामा पैलवान

अवांतर १ :

ग्रेटा गार्बोला हिंदू तत्त्वज्ञानाविषयी बरीच आस्था होती. भारत ही उच्च अध्यात्मिक मूल्यांची खाण आहे असं तिचं मत होतं. त्यामुळे ती भारतीयांना नशीबवान समजंत असे. मालगुडी डेज वाले आर.के.नारायणन यांनी तिला गायत्री मंत्र शिकवलेला होता.

अवांतर २ :

महाराष्ट्राला जसे शिवाजी महाराज तसा स्वीडनला राजा गुस्ताव अडॉल्फ विषयी आदर व आत्मीयता आहे.

-गा.पै.

मारवा's picture

15 Apr 2018 - 3:39 pm | मारवा

सुंदर लेख आहे
आवडला.

राही's picture

15 Apr 2018 - 7:28 pm | राही

लेख आवडला.
वरती एस यांनी म्हटल्याप्रमाणे इनग्रिड आणि ग्रेटा यात डावं उजवं करणं कठिण. पण ग्रेटाने कुठल्याही प्रसिद्धीला स्वत:पासून दूर राखले. त्यामुळे तिच्याभोवती एक गूढतेचे वलय निर्माण झाले. ह्या एनिग्म्यामुळे तिच्याविषयीचे कुतूहल आणि आकर्षण वाढत गेले असे मला वाटते. त्या उलट इनग्रिड. तिचे आयुष्य म्हणजे खुली किताब. मला इनग्रिड कणभर अधिक आवडते.

महामाया's picture

16 Apr 2018 - 2:34 am | महामाया

‘गार्बो आणि बर्गमन...डावं-उजवं करता येणं अशक्य आहे...’

सही...

इनग्रिड चा कॉसाब्लांका, अनास्ताशिया...डाॅ जेकॉल एंड मिस्टर हाइड...(यात स्पेंसर ट्रेसी, लाना टर्नर होते...), स्पेलबाउंड...(ग्रेगरी पैक) बघायला मिळाले...अनास्ताशिया तर सर्वस्वी इनग्रिडचाच चित्रपट होता...युल ब्रेनर तर मस्तच होता...

राहिला प्रश्न डावं उजवं करण्याचा...मला वाटतं...दोघींची आपली स्वतंत्र अभिनय शैली होती...

गार्बो नी अापली प्रतिमा जाणून बुजून जपली असेल...

जेम्स वांड's picture

18 Apr 2018 - 11:16 am | जेम्स वांड

ह्यांच्याशी मुरलीधर देविदास उर्फ आपल्या बाबा आमटेंचा पत्रव्यवहार होता असे कुठंतरी वाचल्याचे स्मरते, बाबांचा जन्म मूलतः एका मालगुजारी घरातला, रेस कार चालवणे चित्रपट पाहणे वगैरे शौक तरुणपणी फर्मावलेला माणूस. ग्रेटाच्या सिनेमांची परीक्षणे बाबा तिला लिहून पाठवत असा काहीसा संदर्भ पुसटसा लक्षात आहे.