तमाशातील लावणी आणि बैठकीची लावणी

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
11 Apr 2018 - 8:35 am

तमाशातील लावणी आणि बैठकीची लावणी

तमाशा म्हणजे अनेक गोष्टींची सरमिसळ असते. मात्र गवळणीतल्या मावशीने किंवा नाच्याने केलेले कंबरेखालचे विनोद किंवा सिनेमातली उडती गाणी आणि त्यावरील नृत्य असणारा तमाशा खऱ्या लावणी रसिकांना फारसा भावत नाही. एखादी अर्थपूर्ण आणि अदाकारीपूर्ण लावणी असली तर नक्कीच तो संपूर्ण तमाशा खास दाद मिळवून जातो. त्यामुळे लावणी हा तमाशाचा आत्मा आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे तमाशात लावणी असलीच पाहिजे. पण अनेकदा तमाशामध्ये जी लावणी सादर केली जाते ती केवळ शृंगारिक लावणी असते. ज्यात शृंगारिक शब्दांना जुळणारे अत्यंत शृंगारिक हावभाव आणि ज्याला 'दिलखेचक' म्हणता येईल असे नृत्य केले जाते. अर्थात लावणी जितकी महत्वाची असते तितकीच महत्वाची ती सादर करणारी नृत्यांगना असते. अनेकदा तिच्या नावानेच तमाशा चालतो. लावणी व्यतिरिक्त तमाशात गण, गौळण, पोवाडे देखील सादर केले जातात. काहीसे नाट्यमय असे संवाद आणि अभिनय देखील असतो. मुख्य लावणीतील नृत्यांगनेव्यतिरिक्त नाच्या, गौळणीमधील मावशी, दौलातजाद्या, किसन (कृष्ण), पेंद्या अशी अनेक पात्रं देखील असतात. विविध वाद्ये वाजवणारे साजिंदे असतात; ज्यांच्यामुळे एकूण तमाशाचा फड जमतो. अशा तमाशाच्या लावणीच एक उत्तम उदाहरण म्हणजे.....

बुगडी माझी सांडली ग... जाता साताऱ्याला...
ग जाता साताऱ्याला..........

किंवा आजच्या काळातील सर्वात जास्त नावाजलेली लावणी....

अप्सरा आली... पुनव चांदन न्हाली.....

हे झालं तमाशाच्या लावणीबद्दल. बैठकीची लावणी हा अजून एक वेगळा प्रकार असतो. इथे नाच्या, गौळण, मावशी, पेंद्या, किसन अस काहीच नसत. अनेकदा बैठकीची लावणी ही लावणी सादर करणाऱ्या नृत्यांगनेच्या राहात्या ठिकाणी ठेवली जाते. कधी कधी गावांमधून अनेकदा मानाचा विडा-सुपारी देऊन अशा बैठकीच्या लावणीसाठी प्रस्तृत करणाऱ्या नृत्यांगनांना घरच्या एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा सणासुदीला बोलावले जाते.

बैठकीच्या लावणीमध्ये देखील श्रुंगार रस ओतप्रोत भरलेला असतो यात वादच नाही. परंतु तमाशाची लावणी ज्या प्रकारे सादर केली जाते तशी बैठकीची लावणी नसते. अनेकदा केवळ दोन ते तीन वादक बैठकीच्या लावणीत सोबत असतात; आणि ही लावणी बसून सादर केली जाते. यात भर दिला जातो तो शब्दांवर आणि चेहेऱ्यावरील भावांवर. हातांच्या हलक्या फुलक्या हालचालींनी शब्दातील भाव पोहोचवण्याच कसब बैठकीच्या लावणीमध्ये जास्त महत्वाच असत. या बैठकीच्या लावणीच सिनेमामधील अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे ...............

कळीदार कपुरी पान... कोवळ छान... केशरी चुना...
रंगला काथ केवडा... वर्खाचा विडा... घ्या हो मनरमणा.. घ्या हो मनरमणा...

किंवा...

राजसा जवळी जरा बसा... जीव हा पिसा.... तुम्हाविण बाई...
कोणता करू शिणगार सांगा तरी काही.....

वरती उदाहरणादाखल दिलेल्या सिनेमातल्या लावण्या तशा जनमानसाच्या मनात एक वेगळं स्थान मिळवून आहेत. पण सिनेमाव्यतिरिक्त देखील अनेक सुंदर लावण्या गावा-गावातून होणाऱ्या तमाशांमध्ये सादर केल्या जातात. पण अर्थात शहरातल्या लोकांना या लोककलेबद्दल फारसे माहीत नसते किंवा माहीत करून घेण्याची इच्छा देखील नसते; हे किती दुर्दैवी!

नृत्यविचार

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

11 Apr 2018 - 8:45 am | विजुभाऊ

राया माझ्या आंबोड्याला बांधावा गजरा.
या लावणी वरून बेतलेले
चांद केवड्याची रात, नागीनीची कात
असं एखादं पाखरू येल्हाळ ज्या भांगात बिंदीचा गुल्लाल
हे गाणे दोन्ही बैठकीच्या लावण्या
दुसरी म्हणजे
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना,पावसाचं उनं बाई मला सोसना. ही विदुषक चित्रपटातली लावणी.

पंढरपुरातल्या उत्पातबुवांच्या बैठया लावणींचा अभ्यास करावा, जमल्यास सोलापुरात शाहीर रामजोशाचं घराणं अजून त्यांचं साहित्य जतन करीत आहे, त्याचे एक खाजगी संग्रहालय देखील आहे ते पाहावे.
पूर्ण मनोरंजनच हवे असल तर दरवर्षी अकलूजला दादा लावणी महोत्सव भरवतात तो एकदा तरी पाहावा ही नम्र विनंती.
इथल्या इथंच प्राडॉ सारखे अस्सल रसिक मास्तर आहेत. त्यांच्या अभ्यासू प्रतिसादाचया प्रतीक्षेत.

आणि हो, दौलतजाद्या हे पात्र नसते तमाशातले, रसिकांनी खूष होऊन दिलेली रक्कम अथवा बक्षिसाच्या कृतीला दौलतजादा म्हणतात.

भीडस्त's picture

11 Apr 2018 - 12:59 pm | भीडस्त

आसं कुढं करीत आसत्याय का राव....

माह्यावाला प्रतिसाद म्या टायपायच्या आधुगरच तुम्हा लिहुनसनी टाखला बी ,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2018 - 9:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! सुरेख विषय काढला.

लावणी माझाही आवडता विषय. प्रसिद्ध लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मुलाखत आपल्या मिपाच्या दिवाळी अंकासाठी घेतली होती. मला त्यांच्या आणि इतर लावणी कलाकारांच्या लावणी आवडतात. मागे उपक्रम संकेतस्थळावर लावणी विषयावर लिहिलंही होतं.http://mr.upakram.org/node/636.

बाकी आता लावणीचं चित्र बदललं आहे, तमाशातली लावणी केव्हाच हद्दपार झालेली आहे, बाकी सविस्तर प्रतिसाद सायंकाळी.

-दिलीप बिरुटे

ज्योति अळवणी's picture

11 Apr 2018 - 2:51 pm | ज्योति अळवणी

आजवर केवळ एकदाच लावणी प्रत्यक्ष बघण्याचा योग्य आला. बाकी जन्म मुंबईतला असल्याने आणि जुन्या विचारांचे पालक असल्याने लावणी आवडत असूनही त्याबद्दल फक्त वाचन आणि ते ही थोडेफार जसे आणि जितके मिळाले तितके करू शकले. अर्थात नृत्यावर मनापासून प्रेम असल्याने भरतनाट्यम आणि कथ्थक ही नृत्ये शिकले. पुढे बऱ्याच उशिरा परदेशी नृत्ये देखील शिकले. परंतु लावणी शिकणे किंवा पहाणे हा योग काही फार आला नाही.

इथे जे लिहिले आहे ते मनापासून आहे इतकेच

धर्मराजमुटके's picture

11 Apr 2018 - 9:08 pm | धर्मराजमुटके

बैठकीच्या लावणीबाबत सहमत ! सुरेखा पुणेकर ही लावणी एकेकाळी फार सुंदर सादर करत असत. (आता माहित नाही). गावोगाव फिरणारे जत्रेतल्या तमाशातील लावण्या म्हणजे बॉलीवुडी गाण्यांचा भ्रष्ट अवतार असतो. इथे कोणी नारायणगावचे असतील आणि तमाशाचे माहितगार असतील ते जास्त चांगले सांगू शकतील.

यात्रेच्या तमाशात तुम्ही म्हणता तसं हिंदी चित्रपटातली नवीन गाणी असतात. लावणी अजिबात राहिली नाही.
कर्णकर्कश्श आवाजात गाणी म्हटली जातात. त्यावर जीवावर आल्यासारख्या नाचणारया तथाकथित नृत्यांगना .असं सर्व वातावरण असतं .
गण गवळण बतावणी वग असं रात्र रात्र चालणारं काही आता राहिलं नाही.
मनोरंजनाची साधनं, परिमाण, मापदंड सारंच काळाच्या प्रवाहात बदललंय

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2018 - 11:29 am | चौथा कोनाडा

छान लेख आहे. महितीपुर्ण चर्चा !
तमाशा / लावणी बघण्याचे फार कमी योग आले.
बघू या, मातब्बर लोक इथं काय काय रसग्रहण करतात.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

13 Apr 2018 - 2:57 pm | हणमंतअण्णा शंकर...

आमच्या कोल्हापूरच्या प्रा. आनंद गिरी यांच्यामुळे आता जवळपास नामशेष झालेला लोकसंस्कृतीचा ठेवा मला उपभोगता आला. यावर पुन्हा कधीतरी!

चौकटराजा's picture

14 Apr 2018 - 7:34 pm | चौकटराजा

मी लावणीचा अभ्यासक नाही तरी माझे एक निरिक्षण असे आहे की तमाशातील लावणी ही नृत्याबरोबर बांधलेली असते. सहाजीकच ती मध्य वा द्रुत लयीत खेचावी लागते. बैठकीची लावणी थोडी गंभीर प्रकृतीची असते . सबब काहीशी संथ लयीत. उदा' का हो धरीला मजवर राग' ( जगाच्या पाठीवर ) ही बैठकीची लावणी '.दे रे कान्हा चोळी लुगडी 'हिचा बाज बैठकीच्या लावणी चा तर 'मला लागली कुणाची उचकी' ही तमाशाची लावणी . एकाच सिनेमातील दोन गीतातील लयीचा फरक पहा !