ग्रामीण पेहराव

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
2 Apr 2018 - 5:25 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

तीस ते चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण वासियांचा पेहराव इकडे सर्वत्र एकसारखा दिसत असे. उत्तर महाराष्ट्र पट्ट्यात पांढरा रंगाचा सदरा, पांढरे धोतर आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा पुरूषांचा पेहराव दिसायचा. वयाने तरूण आणि शाळा- महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलांत पांढर्‍या सदर्‍यासोबत पांढरा पायजमा असायचा आणि अशाच पेहरावात सर्रासपणे तरूण मुले कॉलेजलाही जात असत. महाविद्यालयात सुध्दा ड्रेसकोड नावाची भानगड त्यावेळी नव्हती.
आम्ही माध्यमिक शाळेत जायचो तेव्हा आमच्या गावच्या माध्यमिक शाळेचा गणवेश पांढरा सदरा आणि खाकी आखूड चड्डी असा होता. अंगातल्या सदर्‍याला पचरटी गुंड्या (बटणं) असायच्या. मुलींचा गणवेश पांढरे झंपर आणि निळ्या रंगाचा स्कर्ट होता. असा ड्रेसकोड सक्‍तीचा होता असेही नाही. या व्यतिरिक्‍त कोणी रंगीबेरंगी कपडे घालून शाळेत येऊ शकत होतं. त्या काळी बहुतांशी वापरले जाणारे कपडेच शाळेचा गणवेश असायचा. याचा अर्थ शाळेत न जाण्याच्या दिवशी सुध्दा ग्रामीण मुलांच्या अंगावर हेच कपडे असत.
उत्तर महाराष्ट्र पट्ट्यातली ग्रामीण महिला बहुतकरून नऊवारी साडीत दिसायची. पण या साडीला तेव्हा नऊवारी न म्हणता काष्टी पातळ वा काष्टी लुगडे म्हणायचे. (काष्टी लुगडे नेसणार्‍या गरीब घरातल्या स्त्रिया लुगडं दांडे करून नेसायच्या. एक लुगडं फाटल्यावर ते टाकून देण्यापेक्षा दुसर्‍या एखाद्या फाटक्या लुगड्याचा चांगला राहिलेला भाग या लुगड्याला जोडणे म्हणजे दांडे करणे. दांडे केलेले अर्धे लुगडे वेगळ्या रंगांचे असे.) सहा वारी साडीला गोल साडी म्हटलं जायचं. म्हणजे काष्टा न घेता नेसली जाणारी आणि शरीराभोवती गोल गुंडाळलेली दिसते म्हणून ती गोल साडी. शाळेत जाणारी मुलगी असो व शाळेत न जाणारी असो स्कर्ट वा लेंगा झंपर- पोलक्यात असायची. वयात आलेली मुलगी गोल साडी नेसायची. गोल साडी नेसणारी मुलगी विवाहीत झाली की ती लगेच काष्टी लुगड्यात दिसू लागायची.
खेड्यापाड्यातून असणार्‍या कापडांच्या दुकानातही तेव्हा पांढरे हरक, मळकट पांढरे सैन- मांजरपाट, खाकी कापड, काष्टी लुगडे आणि गोल साड्या अशा कपड्यांचेच गठ्ठे असायचे. आयते कपडे शहरात मिळतात असं ग्रामीण भागात त्या वेळी ऐकून माहीत असलं तरी मिटरने कापड मोजून शिंप्याकडे माप देऊन कपडे शिऊन घ्यायचा तो काळ होता. वडीलधार्‍या दाद्या माणसांच्या अंगात सदर्‍याखाली सैनची बंडी वा कोपरी असायची. बंडी- कोपरीची जागा आता बनियनने घेतली.
उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम ग्रामीण भागातील विशिष्ट पट्ट्यात राहणार्‍या कोकणी लोकांचा पेहराव यापेक्षा थोडा वेगळा असायचा. पुरूषाचे गुडघ्यापर्यंतचे आखूड धोतर, सैनच्या कापडाचा सदरा आणि महिलांच्या अंगावर असणारी फिकट लाल रंगाची फडकी, खाली कंबरेपासून तर गुडघ्यापर्यंत दांडे केलेल्या वेगळ्या रंगाच्या लुगड्याचा एक तृतीयांश भाग, हा फरक स्पष्ट दिसायचा. आता लुगडं नेसणार्‍या महिला शोधून काढाव्या लागतात तर धोतर नेसणारे लोकही लुप्त झाले आहेत. लेंगापँटीही आता नामशेष झाल्या आहेत. गांधी टोप्या फक्‍त लग्न समारंभापुरत्या उरल्यात. आमच्याकडच्या ज्यांना कोकणी म्हटलं जातं अशा बायांची फडकीही आता कालबाह्य ठरली आहे.
स्थित्यंतर होता होता पांढर्‍या पायजम्याची सुटपँट झाली, पांढर्‍या हरक कापडाच्या सदर्‍याचा रंगीबेरंगी डिझा‍यनींचे पॉलिस्टर ते आतापर्यंतचे सर्व बदल पचवलले शर्ट झाले. ऋतू कोणताही असो तेव्हा आर्थिक ओढाताणीमुळे बाराही महीने एकच पेहराव असायचा. आता ऋतू प्रमाणे कपडे बदलू लागले. विविध प्रकारचे स्वेटर हिवाळ्यात दिसू लागले. उन्हाळ्यात तरूणाईच्या अंगावर टी शर्ट चमकू लागले. पावसाळ्यात डोक्यावर छत्र्या दिसू लागल्या. पूर्वीच्या ग्रामीण भागात भर पावसात गोणपाटाच्या घोंगड्या डोक्यापासून कंबरेपर्यंत पांघरून घराबाहेर पडलेले लोक वाकून चालताना‍ दिसत.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

लैच अपुरा आणि वरवर लिहिलेला लेख. अपेक्षाभंग झाला.
बादवे एकेकाळी(बहुधा चाचा नहेरुंचा काळ) फिक्कट निळा तीन गुंड्याचा न्हेरु शर्ट आणि सफेद पैजाम्याची(लेंगा) आम आदमीसाठी लै फेमस होती म्हणे. खरे आहे काय?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Apr 2018 - 5:31 pm | डॉ. सुधीर राजार...

खरय. लेख थोडक्यात लिहिला आहे. आराखडा म्हणा हवे तर. सविस्तर लेख लिहायचाय. धन्यवाद. तुम्ही म्हणता तसं आमच्याकडे तरी नव्हतं. लेंगा पँट होती.

मराठी कथालेखक's picture

3 Apr 2018 - 6:16 pm | मराठी कथालेखक

फोटोशिवाय असे लेख अपुर्ण वाटतात.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 Apr 2018 - 5:42 pm | डॉ. सुधीर राजार...

फोटो मिळतील. टाकूया. धन्यवाद

तुमचा लेख जरी आटोपशीर असला तरी आशय लक्षात घेण्या सारखा आहे .आता या नवीन युगात ग्रामीण भागात धोतरजोडी ,लेंगा व इनामदारी सांगणारा तो तीन गुंड्याचा ,गुढग्याच्या खाली पर्यंत लोंबणारा ग्रामीण सदरा कालाच्या ओघात कधीच हरवला . सद्या तरी पाचवारी साड्या नेसणाऱ्या महिला बऱ्याच प्रमाणात आहेत पण त्या देखील घरात गाउन किंव्हा पंजाबी सलवार कुडता वापरतात . आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी या ठिकाणी पावरलूम मधून हजारो धोतर जोड्या रोज तयार होतात .मला नेहमी एक प्रश्न पडतो , इतकी धोतर नेसणारी लोक, भारतात खरोखरच आहेत काय ? कदाचित ह्या धोतर जोड्या बिहार,बंगाल मध्ये जात असाव्यात . नऊवारी हिरवी लाल काठाची साडी नेसलेली ,अनेक रंगाच्या कापडापासून बनवलेल्या चोळीला घट्ट गाठ मारलेली व कपाळाला राणीच्या रुपया एवढं लाल भडक कुंकू लावलेली , डोळ्याच्या बाजूला पारंपारिक गोंदण काढलेली व डोक्यावर भाजीचे शिप्तर घेतलेली ग्रामीण स्री, हि सद्या तरी फक्त चित्रकारांनी साकारलेल्या चित्रातच दिसते . आता तर जमाना फारच पुढे गेला आहे . बहुतेक ग्रामीण भागात राहणारी मुले जीन किव्हा बर्मोडा , व त्यावर कुठल्या न कुठल्या तरी नेत्याचा किव्हा राजकीय पक्षाचे चिन्हाचा फोटो असलेला टी शर्ट वापरतात . आता डोक्याला टोपी सोडाच पण या मुलांची हेयर स्टाईल पण फार बघण्या सारखा असते . डोकयावर देखील प्रायोगिक उसाची शेती केली आहे कि काय असा कधी कधी भास होतो .

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 Apr 2018 - 5:43 pm | डॉ. सुधीर राजार...

सविस्तर प्रतिक्रिया दिली आपण. खूप आभारी आहे.

सूड's picture

4 Apr 2018 - 3:39 pm | सूड

अपूरा वाटला.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 Apr 2018 - 5:43 pm | डॉ. सुधीर राजार...

पूर्ण लेख लवकरच वाचायला मिळेल.

तुषार काळभोर's picture

5 Apr 2018 - 3:17 pm | तुषार काळभोर

पुण्याचा ग्रामीण भाग ...
माझे दोन्हीकडचे आजोबा धोतर-बंडी- त्यावर पांढरा सदरा (डोक्यावरून घालायचा) घालायचे. आणि डोक्यावर एक आजोबा गांधी टोपी अन् दुसरे फेटा बांधायचे.
अजून बरीच ७०+ मंडळी तेच घालतात. डोक्यावर कायम गांधी टोपी/क्वचित कुणीतरी फेटा.
(फेटा म्हणजे तो तुरा असलेला असतो तसा नाही. तो फक्त लग्नात फेटेवाला बांधून देतो. हा फेटा म्हणजे पांढरा फेटा गुंडाळायचा, पण मुंडाश्याइतकं साधं पण प्रकरण नाही.)
माझे वडील व त्यांचे सख्खे-चुलत सगळे भाऊ शाळेत असल्यापासून पांढरा ढगळ शर्ट अन् त्याच कापडाचा पायजमा वापरतात. कार्यक्रमापुरती डोक्यावर गांधी टोपी.
माझ्या वडीलांप्रमाणे नोकरी करणारे इतर लोक्स शर्टपँट वापरायला लागले. पण शेती करणारे ५०+चे लोक अजून तसाच शर्ट-पायजमा वापरतात. कार्यक्रमापुरती डोक्यावर गांधी टोपी.
या पिढीचं बालपण १९६०-७० च्या दशकातलं

माझ्या दोन्हीकडच्या आज्ज्या नऊवारी नेसायच्या काष्टा पद्धतीनं. पण त्या साड्या सुती असायच्या अन् त्यावर गोल डीजाईन असायचं (बहुतेक त्याला बुट्टी म्हणतात). खणाची चोळी असायची.
माझ्या दोन आत्या (दोघी ६०-६५) अजून नऊवारी नेसतात. ६०+ बहुतेक बायका नऊवारी नेसतात. या नऊवारी साड्या (बहुतेक) पॉलिस्टरच्या असतात. आणि चोळीऐवजी ब्लाउज असतो.
वरच्या चौघींच्या लहानपणी परकर-पोलकं असायचं, असं म्हणतात. म्हणजे १९५०च्या दशकापर्यंत.
माझी आई -चुलत्या-मावश्या (५०+) सहावारी नेसतात. त्यांच्या लहानपणी लेखात लिहिल्यासारखं शाळेचाच ड्रेस असायचा. आणि मॅट्रिकनंतर लगेच साडी सुरू झाली होती. यांचं लहानपण १९६०च्या दशकातलं.
माझ्या ३०+ बहिणी आणि वहिनी साड्या नेसतात. यांनी लग्नाच्या आधी सलवार/चुडीदार-कुर्ता आणि थोडेफार गुडघ्याच्या खाली जाणारे फ्रॉकसारखे ड्रेस. (याला काय म्हणतात माहिती नाही. त्यावेळी फक्त ड्रेस एवढंच म्हटलं जायचं) म्हणजे बालपण ८० अन लग्नाआधीचा काळ ९०च्या दशकातला.
त्याच्या अलिकडील- लग्न झालेल्या- सर्वजणी बहुतेक घरात ड्रेस घालतात. नातेवाईकांकडे जाताना आवर्जून साड्या नेसतात. माहेरी ड्रेस्/जीन्स-टीशर्ट-टॉपवर असतात.
लग्न न झालेल्या सर्व आधुनिक कपड्यांत वावरतात. म्हणजे बालपण ९०च्या दशकात आणि कॉलेज नव्या सहस्त्रकात झालेल्या.

नव्या सहस्रकात जन्मलेली पीढी आपल्या समोर आहेच की.!

फरक आताच किंवा मागच्या १-२ दशकातच झालाय असं नाही. तो हजारो वर्षांपासून होत आलाय. आणि पुढेही होत राहीलच!