सप्तश्रृंगी देवी
काल रातीला देवी माझ्या सपनात आली
गड देवीचा चढायाला सुरूवात मी गा केली || धृ ||
रडतोंडीचा घाट होता लई अवघड
पाहून छातीमधी बाई व्हयी धडधड
रस्त्यामुळं नांदूरीगड चढण आता सोपी झाली ||१||
अठरा शस्त्रे घेतले तू ग अठरा हातामधी
सौभाग्याचे अलंकार तुझ्या अंगावरती
महिषासुर मारी तू आदिमाया शक्तिशाली ||२||
विडा तांबूलाचा खावूनी मुखी रंगला
सप्तश्रृंगीच्या पायी जीव माझा दंगला
देवी माझी सोळा शिणगार ग ल्याली ||३||
कुंकवाचा मळवट भरला देवीच्या कपाळी
अकरा वार साडी नेसूनी अंगावर चोळी
घाई करा दुपारच्या आरतीची वेळ आता झाली ||४||
- पाषाणभेद
प्रतिक्रिया
3 Mar 2018 - 1:15 pm | चौथा कोनाडा
छान !
तिथं आता रोप वे झालाय असं ऐकलंय, त्याचा उल्लेख नाही केलात का या भक्तीगीतात ?
सप्तशृंगी माता की जय !
3 Mar 2018 - 3:12 pm | चांदणे संदीप
रोप वे चं माहित नाही पण तिथल्या स्कायवॉकचं 3D कन्सेप्ट मी केलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी. ज्यावरून नंतर तो प्रत्यक्षात बांधला गेला.
(काळा गॉगल घातल्याची स्मायली) ;)
Sandy
4 Mar 2018 - 11:42 pm | पाषाणभेद
रोप वे टाकला होता पहिल्याच कडव्यात पण मिटरमध्ये बसत नव्हता. म्हणून काढून टाकला.
रच्याकने, रोपवे ज्या कंपनीने बांधला त्याचे उपकंत्राटात काम माझ्या चुलत भावाने केले आहे.
3 Mar 2018 - 1:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आरती आवडली.
बोलो, सप्तशृंगी माता की जय !
-दिलीप बिरुटे
3 Mar 2018 - 7:21 pm | दुर्गविहारी
मस्तच हो पा.भे. साहेब. केव्हा जाउन आलात ? ;-)
3 Mar 2018 - 9:59 pm | manguu@mail.com
छान
5 Mar 2018 - 12:14 am | बापू मामा
सप्तशृंगीला जायला रोपवे हवी कशाला? भक्तीभाव पाहिजे
5 Mar 2018 - 3:00 am | पाषाणभेद
मामा रोपवे खरोखरचा रोपवे नाहीये. फनीक्यूलर ट्रॉली आहे ती. अन ती फक्त पायथा ते मंदिर अशी आहे.
इतर पर्यटनस्थळी असते तशी मौज मजेसाठी नाही. अन दर्शन घेणे अन ट्रॉलीत बसणे दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
रच्याकने, अजून फनीक्यूलर ट्रॉली चालू झालेली नाही.
हे बघा:
https://www.youtube.com/watch?v=z5nrWT2zIe8
5 Mar 2018 - 9:04 am | प्रचेतस
नाशिक आजोळ आणि सप्तशृंगीमाता आजोळची कुलदेवता असल्याने खूपदा ह्या परिसरात येणे झाले आहे. सप्तशृंगी परिसर खरोखर प्रचंड सुंदर आहे. गडाचा एकदम लांबलचक पण अतिशय निरुंद कडा अगदी अंगावर येणारा भासतो. दरेगावचे पाटील कुठल्या मार्गे हा कडा चढून वर ध्वज लावतत हे अजूनही उलगडत नाही. शीतकड्यावरुन समोरची अजिंठा सातमाळा रांग खूप छान दिसतो, समोरचा मार्कंड्या, मोहनदरीचे आरपार छिद्र, रवळ्या-जवळ्या, धोडपची खाच, इखारा लै भारी दिसतात. खूप पूर्वी शीतकड्याजवळच्या उभ्या वाटेने मार्कंड्या आणि सप्तशृंगीच्या खिंडीत उतरलो होतो.